युयुत्सु महाराजांच्या या धाग्यातील पहिल्या दोन परिच्छेदाशी आम्ही सहमत आहोत. फलज्योतिषाची काहि लोकांसाठी असलेली उपयुक्तता आम्हाला मान्य देखील आहे. सर्वच ज्योतिषी हे जातकाच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतात अस सरसकट मी म्हणू शकत नाही.
फलज्योतिष हे विज्ञान नसेना का पण उपयुक्त तर आहे?
त्याची उपयुक्तता कोणास व कशी यावर ते अवलंबून आहे. दारुच्या आहारी गेलेल्या माणसाला दारु ही त्याच्यासाठी उपयुक्तच नव्हे तर उपकारकही वाटत असते!दारू, गांजा, अफू यामुळे माणूस आपली दु:खं काही काळ का होईना विसरतो म्हणून त्याने व्यसनात बुडून जाणे हा काय त्यांच्या दु:खावरचा ईलाज झाला का?
प्रथम, ते उपयुक्त का नाही, इतकेच नव्हे तर ते उपद्रवकारक का आहे ते पाहू. एक सश्रद्ध गृहस्थ ज्योतिषाकडे कधीही जात नसत. त्याचे कारण सांगताना ते म्हणाले, ''हात दाखवून अवलक्षण का करून घ्यायचे?`` याचा अर्थ असा की भविष्यात घडणार असलेल्या प्रतिकूल घटना आधी कळून घेउन उगीच मन:स्ताप कशाला करून घ्यायचा ? जे होणार आहे ते अटळ आहे हे जर खरे असेल तर ते आधी कळण्याने काय फायदा ? नसत्या विवंचनेला आपण होउन का आमंत्रण द्यायचे ?
यावर ज्योतिषीलोक जो युक्तिवाद नेहमी करतात तो असा. चक्रीवादळ टाळता येत नाही म्हणून वेधशाळेने ते वर्तवूच नये का? पुढे येणार असलेल्या प्रतिकूल परिस्थितीची आधी कल्पना आली तर माणूस त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू शकतो. प्रतिकूल परिस्थितीची तीव्रता कमी व्हावी यासाठी व्यवहारी किंवा दैवी उपाय योजू शकतो. उन्हाळा आहे कडकडीत उन थोपवणे काही आपल्या हातात नाही पण चपला घालणं, टोपी घालणं, छत्री घेणं हे तर आपल्या हातात आहे ना! त्यामुळे उन्हाचे चटके तर बसत नाहीत ना.
या युक्तिवादात हे गृहीत धरण्यात आले आहे की ज्योतिष्यांना आगामी घटनांची कल्पना आधी निश्चितपणे येउ शकते. आणखीही एक गोष्ट नकळत गृहीत धरली आहे ती म्हणजे जे होणार आहे ते पूर्णपणे अटळ नाही. त्यात माणसाच्या प्रयत्नाने थोडाफार फेरबदल होउ शकतो. ही दोन्ही गृहीतकृत्ये वादग्रस्त आहेत. चक्री वादळाचे उदाहरण इथे गैरलागू आहे. वेधशाळेने चक्रीवादळ वर्तवल्यामुळे ते टाळता आले नाही तरी त्याची सत्यता तपासता येते. उपग्रहाद्वारे त्याचे चित्रण बघता येते. चक्रीवादळांचे अंदाज तपासता येतात कारण त्यांचा संख्यात्मक अभ्यास उपलब्ध असतो. परंतु ज्योतिषांच्या भााकितांबाबत असा अभ्यास केला जात नाही. फलज्योतिषाचे अनिष्ट भाकित योगायोगाने खरे ठरले तर 'बघा! सांगितले होते. पण ऐकले नाही.` असे म्हणता येते. खोटे ठरले तर 'योग्य ते उपाय, तोडगे केले म्हणून अरिष्ट टळले` असेही म्हणण्याची सोय आहे.
प्रतिकूल परिस्थितीने हैराण झालेला माणूस ज्योतिष्यांचा सल्ला घेण्यासाठी पैसे खर्च करीत असतो. चांगल्या गोष्टी घडणार असल्याचे भाकीत सांगून ज्योतिषी त्याला दिलासा व आधार देउ शकतो, किंवा आताचे वाईट दिवस लवकरच संपणार आहेत अशी मनाला उभारी देउ शकतो हे जरी खरे असले तरी त्यासाठी त्या बिचाऱ्याचा आधीच हलका झालेला खिसा आणखी हलका होत असतो. भरल्या गाडीला सुपाचे काय ओझे? या विचाराने दैवी उपाय करण्यासाठी प्रसंगी माणूस कर्जसुद्धा काढतो. फलज्योतिष हे जर खरोखरीच विश्वसनीय शास्त्र असते तर हा खर्च कारणी लागला असे म्हणता आले असते. पण तशी वस्तुस्थिती नाही, आणि हेच तर आम्हाला पुढे सांगायचे आहे.मन खंबीर करण्यासाठी आवश्यक अशी उपाययोजना केली तर सतत उठसूट ज्योतिषाचा आधार लागण्याची मानसिकता निर्माण होणार नाही. लहान मूल सुद्धा स्वत:च्या पायावर उभे रहाण्यासाठी आवश्यक तेवढाच आईचा आधार घेतं. नंतर आईचा हात सोडूनच चालायला शिकतं ना? खाचखळग्याच्या रस्त्यावर, अवघड ठिकाणी गिर्यारोहक सुद्धा काठीचा, दोराचा आधार घेतातच ना! पण तो तेवढयापुरताच. आधार घ्यावा लागणं ही गोष्ट स्वाभाविक आहे. पण हा आधार विवेकपूर्ण असावा.
पत्रिका पहाण्याच्या प्रथेमुळे लग्ने जुळवण्यात येणाऱ्या अडचणीत आणखीच भर पडते. पत्रिका जुळून केलेले विवाह सुखाचे ठरतात असे जर हमखासपणे सिद्ध झाले असते तर ही अडचण सोसायलाही हरकत नाही असे म्हणता आले असते. पण वस्तुस्थिती तशी नाही हे सर्वांना माहीत आहे.
आता उपयुक्ततेबद्दल विचार करू. कुंडलीवरून माणसाचा नैसर्गिक कल कोणत्या गोष्टीकडे आहे ते कळते असे ज्योतिषी म्हणतात. तसे खरोखरीच कळत असेल तर ती फार चांगली गोष्ट आहे. पाशात्य देशात या अंगाने खूप संशोधन झालेले आहे. त्याचे निष्कर्ष फलज्योतिषाला बहुतांशी प्रतिकूल असेच निघालेले आहेत. म्हणजे त्याची उपयुक्ततासुद्धा वादातीतपणे सिद्ध झालेली नाही. आता ते मनोरंजन म्हणून उपयुक्त आहे असा दावा कुणी केला तर मात्र त्याची उपुक्तता आम्ही मान्य करु. कारण जगात शास्त्रज्ञांची चलती झाली म्हणून कवी लगेच ओस पडले असे दिसून येत नाही. उपयुक्ततेच्या मुद्याचे यश हे ज्योतिषाच्या सामर्थ्यात नसून जातकाच्या मानसिकतेमध्येच आहे.
[ ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ... मधुन उधृत]
वाचने
5123
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
नको वाटते आता हे लेख वाचणे
तु आपला
In reply to नको वाटते आता हे लेख वाचणे by अवलिया
योगायोग
In reply to नको वाटते आता हे लेख वाचणे by अवलिया
पटले...
फलज्योतिष
+१
In reply to फलज्योतिष by युयुत्सु
आपण नक्की
In reply to +१ by प्रशांत उदय मनोहर
अर्थात,
In reply to आपण नक्की by युयुत्सु
The technique used by
In reply to फलज्योतिष by युयुत्सु
>>The astrologer made
In reply to फलज्योतिष by युयुत्सु
पकाकाका
जाहिर विनंती...
सहमत....
In reply to जाहिर विनंती... by बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे!
In reply to जाहिर विनंती... by बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे!
In reply to जाहिर विनंती... by बिपिन कार्यकर्ते
नो
छान