(आपल्याच) धाग्याचा खफ
पूर्वतयारी: प्रथम एक विषय घ्यावा. वर्तमानपत्र, ब्लॉग्ज, सोशल नेटवर्किंग वेबसाईट्सवर हा कच्चा माल सहजगत्या सापडतो. आता संपूर्ण खात्री करून घ्यावी आपल्याला त्या विषयातलं एक अक्षरही कळत नाही. मग त्या विषयावर गूगल वापरून माहिती मिळवावी. एकाच वेळा चार वेगवेगळ्या वेबसाईट्स उघडून चारही ठिकाणचे वेगवेगळे परिच्छेद एक आड एक वाचावेत. अर्थातच ती आपल्याला कळणार नाही याचीही खात्री करावी. आता पूर्वतयारी पूर्ण झाली.
किंवा आपल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) जन्मापूर्वी घडलेल्या (प्रत्यक्ष किंवा जालीय) घटनांबद्दल कुठूनतरी माहिती मिळवावी. माहिती अर्धवटच असेल याची खात्री करावी. ही खात्री करणं हे अतिशय कठीण काम आहे. त्यासाठी आपल्या जाणीवा, नेणीवा अतिशय बोथट असणं गरजेचं आहे; महत्त्वाची आहे ती आपल्यातली उणीव. शिवाय महत्त्वाचं आहे ते लांबुळकं नाक असणं. अर्थात प्रत्यक्षात तुमचं नाक लांबुळकं आहे का चपटं याला महत्त्व नाही, ते नाक फक्त चष्म्यासाठीचा स्टँड असतो. या चष्म्याचा (बदलण्याची गरज असलेल्या) 'त्या' चष्म्याशीही काही संबंध नाही. तर 'तो' चष्मा घ्यावा, जो बदलण्याची गरज आहे.... हं हं हं, एक मिनीट बदलू नका. फक्त बदलण्याची गरज असलेला चष्मा घ्या आणि वापरा. आणि आता मुख्य पदार्थ, पक्षी: जन्मापूर्वी घडलेली घटना, घ्या. ती 'ह्या' चष्म्यातून पहा. अर्थातच सगळंच धूसर, फिकट दिसेल आणि काहीही समजणार नाही.
यापैकी कोणतीही एक पूर्वतयारी केली असेल तरीही आणखी महत्त्वाचे घटक म्हणजे 'मला सगळं समजलंच पाहिजे', 'मला अमकी-फलाणी गोष्ट सगळ्यांना ओरडून सांगायचीच आहे' किंवा 'पहा मला कित्ती कित्ती माहिती आहे हे मी सगळ्यांना ओरडून सांगितलंच पाहिजे' यातले एक किंवा जास्त घटक.
मुख्य कार्यः मिपावर ही पाकृ करण्याची मुख्य ठिकाणं दोन आहेत: एकतर काथ्याकूट किंवा दुसरा कौलं फोडणं. तर 'लेखन करा'वर टिचकी मारायची, माऊसाने हो, बोटांनी नव्हे! मग आपल्या तेव्हाच्या मूडप्रमाणे एकतर काथ्याकूट नाहीतर कौल बनवा. काथ्याकूट अंमळ सोपा असतो, कारण त्यात एकच ओळ देऊन पुरते. कौलं फोडायची असतील तर आधी पर्याय काय द्यायचा याचाही विचार करावा लागतो. म्हणजे काथ्याकूटात टाकण्याची एक ओळ कौलाची पार्श्वभूमी बनते आणि वर पर्यायांचा विचार करावा लागतो. हरकत नाही, कौलारू लोकं जास्त प्रसिध्द पावतात. तर या एका ओळीत हा न समजलेला विषय किंवा माहिती नसलेली घटना यांच्यावर लिहा. शक्यतोवर अशुद्धच लिहा, म्हणजे काही प्रतिसादकर्ते तुमच्याबद्दल थोडी सहानुभूती ठेवू शकतील. अर्थात त्यासाठी तुम्ही खूप जुने सदस्य असून चालणार नाही. तेव्हा एकतर नवे सदस्य असा किंवा नवा आय.डी. घ्या, तो शक्यतोवर प्रसिद्ध व्यक्ती (उदा: महमंद अली जिना) अथवा व्यक्तीचित्रांच्या (उदा: शुभ्रा) नावे नको.
मुख्य काम असतं की या धाग्याचं शीर्षक बनवणं, ते अतिशय कॅची असलं पाहिजे. म्हणजे काय होतं की मिपावर पडीक असणारे आद्यटवाळ प्रतिसादक, ज्यांना काही लोकं ७०% कंपूबाजही म्हणतात, ते लोकं हा धागा उघडतील. (अर्थात, या लोकांना तसंही काही काम नसतं, म्हणूनच ते पडीक असतात ना! त्यामुळे ते तसाही तुमचा धागा एकदातरी उघडून भोचकपणा* करून पहाणार.) तर अशा लोकांनी हा धागा पाहिला की त्यात त्यांना टवाळी करण्याचा अगदी हुकमी मूड आला पाहिजे. आता हे काम अगदी सोपं आहे. थोडं अशुद्धलेखन, थोडी आक्रमक भाषा, आणि थोडा आगाऊ नम्रपणा पाहिला की हे लोकं अगदी हटकून प्रतिसाद देतात. म्हणजे सुरूवातीला एखादा तास एखाददुसरा टवाळच, सॉरी पडीक मिपाकर, प्रतिसाद देईल. पण या लोकांना एकाने केलं म्हणून दुसर्याने केलं अशी काहीशी डॉमिनो इफेक्टसारखी सवय असते. त्यामुळे एकजण काहीसं संबद्ध प्रतिसाद लिहेल. मग दुसरा येऊन जास्त असंबद्ध, पण मोठा आणि गप्पाटप्पा टाईप प्रतिसाद लिहेल. आणि इथेच सुरूवात होते डॉमिनो इफेक्टची.
.... कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। त्यामुळे आधी धाग्याची शिकवणी पूर्ण करू या, नंतर जमलं तर या टवाळखोरांची, सॉरी पडीक मिपाकरांची, मानसिकता सांगते मी! तर एक ओळ कशी व्यवस्थित लिहावी हे मी सांगितलंच. जमलं तर सुरूवातीला नमस्कार-चमत्कार हेही म्हणून घ्यावं, आणखी एक पॉईंट सहानुभूती मिळवण्याचा! आता पुढे विचार करू या, कौलं फोडली तर पर्याय कसे आणायचे. ही जी काही माहिती असेल, जी खरंतर आपल्याला नाही आहे, त्याची आपण एक ओळ बनवली आहे, तिला व्याकरणाची थोडीशी फोडणी घालायची आणि तिचा बनवायचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर शक्यतोवर 'हो', 'नाही' किंवा 'माहित नाही' असं असेल असाच प्रश्न बनवायचा, सोपं पडतं. शिवाय कोणाचं उत्तर आणखी काही असेल तर तो माणूस (माणूस म्हणजे पडीक मिपाकराचा आय.डी. पण म्हणायची पद्धत म्हणून माणूस म्हटलं) प्रतिसादात ते ही लिहीतो. त्यानुषंगिक आणखी दोनचार प्रतिसाद येतात. असो, प्रतिसाद खेचण्याच्या गप्पा इथे अवांतर ठरतील म्हणून त्याबद्दल जास्त लिहीत नाही. खरंतर अवांतर ठरणार नाही, कारण प्रतिसादांमधे गप्पा-टप्पा झाल्या तरच धाग्याचा खफ पूर्ण होईल.
अशा तर्हेने आपला धागा बनला की त्याचं पूर्वपरीक्षण करून, प्रकाशित करून टाकायचा धागा!
उपसंहारः खरंतर मीच लिहीणार होते, पण एक मीटींग आहे आत्ता, तिकडे फुकट चहा मिळणार आहे, तो कसा सोडायचा? फुकट ते पौष्टीक आणि मुळापासून! तेव्हा लवकरच तिकडे पळालेलं बरं. पण हरकत नाही, काही पडीक मिपाकर या धाग्याला प्रतिसाद देतीलच. त्यातूनच तुम्हाला उपसंहार कळेल. शिवाय या पडीक लोकांकडून प्रतिसाद कसे 'खेचावेत' याचंही एक टूटोरीयल आणि धाग्याचा खफ कसा बनवावा याचं प्रात्यक्षिक याच धाग्यात होईल.
या भोचकपणाचा आपले मिपाकर भोचक यांच्याशी काहीएक संबंध नाही.
वाचन
26268
प्रतिक्रिया
0