Skip to main content

भूमिका

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 11/08/2009 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाठ वार्‍याने फिरविली ती दिशा माझीच होती मूक, हळवी, दीन, शापित नायिका माझीच होती दैव दुबळे; शाप माझा भोगते जन्मांतरी मी राम तो नव्हता, अहिल्येची शिळा माझीच होती एकही नव्हता दिवा, ना काजवा होता कुठेही चांदणे ना चंद्र, अवसेची निशा माझीच होती भंगले फुलताक्षणी का स्वप्न माझे मोहराचे? वादळाने मोडलेली वाटिका माझीच होती संशयाने गोठल्या संवेदना माझ्याच होत्या, जाळली क्रोधाग्निने ती संहिता माझीच होती काळजाला विंधणार्‍या आप्तस्वकियांच्या विषारी बोलण्यावर चालली उपजीविका माझीच होती ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी, काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती राख झाल्या भावना फासून पिंगा घालणार्‍या सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3162
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

लांब बेहर घेतला की गुंतागुंतीच्या कल्पना मांडता येतात, त्याचे चांगले उदाहरण आहे. छान, करुण गजल.

मस्त!!! खूपच सुंदर शब्द रचना. शेवट तर कळस आहे. :) हॅट्स ऑफ!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

सुरेख.. मस्त.. अप्रतिम :) --अवलिया

अप्रतीम रचना! नेहमीप्रमाणेच!! आता एक आशादायी विचारही मांडा पुढच्या गझलेत. आम्हाला त्याचे कौतुक करायला जास्त आवडेल. :) राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु ) कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी.. सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा!

In reply to by राघव

नक्कीच आशावादी असेल पुढचं काव्य! क्रान्ति सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा अग्निसखा रूह की शायरी

क्रांती, सुरेख लिहिली आहेस गं गझल! सुरेख! एकेक द्विपदी सुरेख!

क्रांतिजी .. अप्रतिम कविता खास करुन ह्या दोन ओळी जीवाला घोर लावून जातात राख झाल्या भावना फासून पिंगा घालणार्‍या सावल्यांनी वेढलेली ती चिता माझीच होती अशाच छान कविता लिहित रहा (कविताप्रेमी कवी) सागर

ज्या कथेला वाचता आले तुझ्या डोळ्यांत पाणी, काय सांगू? ती खरी आख्यायिका माझीच होती ए वन... मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती व्वाह वाह्ह.... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

In reply to by मदनबाण

असेच म्हणतो. सुंदर शब्दरचना :)

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच होती
अप्रतिम शेर... अप्रतिम गझल ऋषिकेश ------------------ सकाळचे ९ वाजून ३६ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक करूण गीत "भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी..."

मी कधीही अढळपदि ना राहिले, उल्काच झाले, नेहमी पडत्या फळाची भूमिका माझीच
होती वा! तात्या.