Skip to main content

एक धुकाळ सहल!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 07/07/2009 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
tahini 5th july 09 063 ताम्हिणीत जाण्यात "रिस्क' होती. दरवर्षीप्रमाणे दणकून पाऊस, दरडीबिरडी कोसळण्याची भीती म्हणून नव्हे. तर अजिबात पाऊस नसल्याच्या बातम्या होत्या म्हणून! जूनपासून पावसाची वाट पाहूनपाहून थकलो होतो. गाडीतून दोन ट्रिपा केल्या, दोन्ही कोरड्या! जेजुरी आणि कार्ला इथे घामानं पुरेवाट झाली होती. ताम्हिणीत पाच जुलैला जायचं हे तर ठरलं होतं, पण धाकधूक होतीच. ताम्हिणीत जायचं म्हणजे मस्त पाऊस, धुकं, धबधबे, असं समीकरण गेली आठ-दहा वर्षं डोक्‍यात पक्कं बसलं होतं. पहिल्यांदा तिथे गेल्यापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता दरवर्षीची एक फेरी कधीच चुकली नव्हती. रोज पावसाच्या बातम्यांवर आणि आभाळाकडे लक्ष ठेवून होतो. आज पाऊस येईल, उद्या येईल, असं गेले दोन आठवडे वाटत होतं. रोज निराशाच पदरी येत होती. ताम्हिणीचा "व्हेन्यू' बदलायला लागतो की काय, अशी परिस्थिती होती. आदल्या दिवसापर्यंत "अपडेट्‌स' घेणं सुरू होतं. अखेर गेल्या आठवड्यात पुण्यात हलका पाऊस झाला आणि जरा जीवात जीव आला. तरीही जिल्ह्यात फार दमदार पाऊस झाल्याची वार्ता नव्हती. ऑफिसातल्या एका सहकाऱ्यानंही तिथं जाण्याविषयी नकारघंटाच लावली होती. शेवटी गुरुवारी त्याच भागात राहणारा एक सहकारी निदान तिकडे प्रसन्न वातावरण असल्याची सुवार्ता घेऊन आला. हा खरंच थोडा दिलासा होता. तरीही, मी सोडून कुटुंबीयांपैकी बहुतेक जणांचा तिकडे जाण्याबाबत आग्रह कमीच होता. निघण्याच्या आदल्या दिवशी एका मित्रानं खबर आणली, की थोडे-थोडे धबधबे आहेत. जरा आणखी उमेद आली. पाच जुलैला सकाळी दहा जणं मिळून दोन गाड्यांतून ताम्हिणीकडे कूच केले. साधारणपणे चांदणी चौक ओलांडला, की ताम्हिणीच्या वातावरणाचा वास यायला लागतो. या वेळी पिरंगुट ओलांडले, तरी फारसे काही वातावरण नव्हते. पौडमध्ये मिसळ खाल्ली, तेव्हाही "पाऊस नाही' या चर्चेनं जरा धडधड वाढली. "सगळ्यांना घेऊन आलोय खरं, पण धबधबे मिळाले नाहीत तर आपली काही खैर नाही,' या विचारानं जीव खालीवर होत होता. वाटेत एके ठिकाणी हवा भरायला थांबलो, तर तिथेच आमचा नेहमी थांबण्याचा फेवरेट स्पॉट होता. जरा पुढे जाऊन बघितलं, तर धबधबा! डोळ्यांवर विश्‍वासच बसत नव्हता! ज्याच्या शोधात पुण्याहून 80 किलोमीटरवर बोंबलत आलो होतो, तो साक्षात पुढ्यात हात जोडून उभा होता! आम्ही तिथे फोटोबिटो काढले, पण भिजलो मात्र नाही. कारण भिजायला घाटमाथ्यावर भरपूर धबधब्यांच्या सान्निध्यात जायचं होतं! मग वाटेत थांबतथांबत निघालो होतो. एका पठारावर आलो, तर रस्ता धुक्‍यात बुडून गेलेला. समोरची गाडीही दिसत नव्हती. दोन्ही बाजूला पाणी आहे आणि आपण बंधाऱ्यावरून निघालो आहोत, असंच भासत होतं. शेवटी गाडी धांबवली आणि मस्त धुक्‍यात बुडून गेलो. धुकं जसं आलं त्याच वेगानं नाहीसंही झालं. चला, ताम्हिणीचा आटापिटा अर्धाअधिक सत्कारणी लागला होता! घाटमाथ्यावर गेलो, पण धबधब्यांची रांग काही दिसत नव्हती. एखाददुसरा ओघळ दिसत होता. वाटेत एक-दोन धबधबे लागले, पण तिथे थांबावंसं वाटलं नाही. शेवटी धबधब्यांच्या शोधात घाटउतारापर्यंत गेलो. शेवटी तिथून परत फिरलो. परतीच्या वाटेवर जो धबधबा लागला, त्यात मस्त भिजलो. फार मोठा नव्हता, पण आनंद घेण्याएवढ्या धारा होत्या. दरवर्षीपेक्षा जरा लवकरच यंदा ताम्हिणीत गेलो होतो. पावसाची स्थिती नव्हती, तरी निराशा झाली नाही. उलट, सहल फलदायी झाल्याचाच अनुभव आला! tahini 5th july 09 077 tahini 5th july 09 096 अभ्यंगस्नान! tahini 5th july 09 047 अधिक्रुत पत्नीबरोबरचा अधिक्रुत फोटो! tahini 5th july 09 108 tahini 5th july 09 071
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4605
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

मजा आली असेल ना? एकदा पावसाळ्यात मुंबईहून पुण्याला जात असताना खंडाळ्याच्या अलिकडे, अमृतांजन पॉइंटला असा काही धुक्याचा अनुभव घेतला होता. गाडी बाजूला लावून बराच वेळ मस्त कट्ट्यावर बसलो होतो. ते आठवलं. शेवटचे दोन फोटो फारच आवडले. बिपिन कार्यकर्ते

फारच छान सहल झाली. मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते. - मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

रानहिरवे, धुकट फोटू आवडले! येताना घाटात भजी चहा झाला की नाही? थोडं वर्णन सुद्धा टाकायचं होतं की राव! (धुक्यातला)चतुरंग

फोटो सही आहेत.

वा !!! छाण !!! -- टारुलिया !#@ $%$% %$@ %^%# @! ^& ॑व %$# $% @@$ ^$#& &^$ &%& शौजण्य - यरलव

सुंदर. एकदा कोकणात जाताना असे धुके अनुभवले होते. शेवटचे दोन फोटु खुपचं आवडले. :) जियो अभिजितदा!

अवांतर : जाताना पौडात मिसळ हाणली. पण फारशी खास नव्हती. पहिल्या धबधब्यापाशी कांदा भजी पण मिळाली. पण २५ रुपयांच्या मानाने खास नव्हती. येताना एका महागड्या हॉटेलात जेवण झालं. बरं होतं. तिथे मात्र भजी उत्तम मिळाली. एकुणात, उदरभरण काही खास झालं नाही. पण आमचं पोट आधीच भरलं होतं! नकाशा टाकायचे ज्ञान मला नाही. (मग कशाला हवं होतं!) पण जाण्याचा मार्ग सांगू शकतो. १. पुण्यातून चांदणी चौक. (पाषाण.) २. तिथून पौडचा रस्ता धरायचा. ३. आधी पिरंगुट, मग पौड, मग मुळशी धरणाच्या बाजूचा सरळ रस्ता आहे. ४. ताम्हिणी गावापासून पुढे ८/१० किलीमीटर जावं लागतं. घाटातच धबधबे सुरू होतात. आपल्याला आवडेल तिथे थांबायचं! अजून काय सांगू??

हुर्रर्रर्र ! सतत निसर्गात भ्रमंती करणार्‍या आणी वर त्याचे झकास फोटु टाकुन खुमासदार वर्णन लिहिणार्‍या अभिजितदाचा निषेध असो ! निवार निषेध !! घरकोंबडा º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© काय? आज तुम्ही मुर्तीपूजा करणार्‍यांवर थुंकले नाही ? देशाचा अभिमान असणार्‍यांना हसले नाही ? आणि समलैंगीकांचे उदात्तीकरण पण केले नाही ? अरेरे ! स्वतःला आधुनीक कसे म्हणवते तुम्हाला ? आमचे राज्य

मस्त फोटो, पाहून अंदाज येतोच आहे सहल मस्तच झाली असणार... स्वाती

वा मस्त फोटु...मस्त वर्णन.. अजून येऊ द्या पावसाळा म्हटलं की अशी भटकंती नाहि केली तर पावसाळा कसला :) अजुन येऊ दे! या विकांताला "लवासा"ला गेलो होतो रस्ता मुळशी डॅमपर्यंत सारखाच आहे.. लवासासाठी डावीकडे फाटा आहे.. अगदी अस्सच वातावरण होतं.. फोटू अपलोड करायचेत.. आता गरज नाहिसं वाटतंय ;) ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

फोटो खासच! :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

फोटो आवडले !

अरे वा ! छान वर्णन छान लेख :) -- लिखाळ. या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

अशी धुकाळ ठिकाणं म्हणजे अधिकृत लग्नानंतर अधिकृत पत्नीबरोबर अधिकृत मधुचंद्र अधिकृतरित्या साजरा करण्याची अधिकृत जागा :D यातील बर्‍याचश्या विशेषणांच्या जागी "अनधिकृत" हे विशेषण ही वापरता येईल ;-)