Skip to main content

बी एम एम अधिवेशन २००९

लेखक संदीप चित्रे यांनी गुरुवार, 25/06/2009 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
२ जुलै २००९ उजाडायला असे कितीसे दिवस राहिले आता? बघता बघता “बी एम एम”चं अधिवेशन जवळ आलंच की ! खरंच वाटत नाहीये, म्हणजे अजूनही खरंच वाटत नाहीये. दोन तारखेला बिझनेस कॉन्फरन्स आणि आशाताईंच्या हिंदी गाण्यांचा कार्यक्रम. तीन तारखेपासून अधिवेशन सुरू ! आत्ता तर अधिवेशनाच्या पहिल्या मीटिंगसाठी तासभर गाडी दामटवत एका मंदिरात गेलो होतो. त्याला जवळपास एक वर्ष झालं? आत्ता तर कुठे भारतातून आणायचे कार्यक्रम निवडण्यासाठी ’इंडिया प्रोग्रॅमिंग कमिटी’मधे आलो. त्याला जवळपास एक वर्ष झालं? आत्ता तर कुठे भारतातल्या कार्यक्रमांबद्दल शोधाशोध आणि चर्चा सुरू केली. त्याला जवळपास एक वर्ष झालं? Time flies by म्हणतात त्याप्रमाणे अक्षरश: एक वर्ष कधी संपलं कळलंच नाही. २००५ साली माझ्या आयुष्या्तल्या पहिल्या “बी एम एम” अधिवेशनाला हजेरी लावली त्यालाही आता चार वर्ष झाली? ते अधिवेशन ऍटलांटाला झालं आणि आता हे अधिवेशन फिलाडेल्फियाला.. म्हणजे अगदी आपल्या शेजारीच. तसं पाहिलं तर बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बी एम एम) अधिवेशन दर दोन वर्षांतून एक ह्या संख्येने वेगवेगळ्या ठिकाणी नियमितपणे होतंय. बरं, अधिवेशन उभं करणारे सगळेच स्वयंसेवक. स्वत:चे नोकरी, उद्योग सांभाळून, घर-संसार सांभाळून, वेळप्रसंगी संसार तात्पुरते विसरून झोकून दिलेले ! आता जसजशी अधिवेशनाची तारीख जवळ येतीय तसतशी उत्सुकता वाढायला लागलीच आहे शिवाय एक दडपणही जाणवतंय. अधिवेशनाचा डोलारा पण मोठाच आहे ना. जवळपास ४,५०० लोक एका छताखाली अडीच-तीन दिवस असणार आहेत ! अडीच – तीन दिवसांत एकूण जवळपास ६० च्या आसपास कार्यक्रम आहेत ! नाटक, नृत्य, संगीत, अध्यात्मिक कार्यक्रम, एकांकिका , मराठी सिनेमा, उभ्या उभ्या विनोद, संगीत नाटक अशा कार्यक्रमांची रेलचेल आहे. रसिकांसाठी ’घेता किती घेऊ दो नयनांनी’ अशी आनंदी अवस्था असेल ! भारतातून ऐंशीपेक्षा अधिक संख्येने कलाकार आणि विशेष अतिथींना सन्मानाने आमंत्रित केलं गेलंय! पेशवाई, कोल्हापुरी, नागपुरी आणि मालवणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अस्सल मराठी पदार्थांची दोन दिवसांची मेजवानी यशस्वी व्हावी म्हणून कित्येक लोक कष्ट घेतायत. भारतातील कलाकारांचे visa processing वगैरे ती धावपळ वेगळीच. अधिवेशनाला येणाऱ्या सगळ्यांची नाव नोंदणी नीट पार पडावी म्हणून रजिस्ट्रेशन कमिटी झपाटलीय. ’सगळी सोंगं घेता येतात पण पैशांचं सोंग घेता येत नाही’ ह्या म्हणीची जाणीव ठेवून आर्थिक व्यवहार बघणारे स्वयंसेवक कष्ट करतायत. ’हम भी कुछ कम नहीं’ म्हणत अमेरिकेतील कानाकोपऱ्यातून स्थानिक कलाकार वेगवेगळे कार्यक्रम घेऊन येतील. बच्चे कंपनी कंटाळू नये म्हणून त्यांच्यासाठी असंख्य मजेदार प्रकार आणि कार्यक्रम हजर असतील. येणाऱ्या सगळ्यांच्या राहण्याची सोय उत्तमप्रकार व्हावी म्हणून मॅरियॉट, हिल्टन, डबल ट्री अशी दर्जेदार हॉटेल्स सज्ज असतील. वीकांतला स्वयंसेवकांच्या दिवस दिवसभर मीटींग्ज चालल्यात आणि काहीजण तर रात्रभर मीटिंग्जमधे तळ ठोकून आहेत. सोमवार ते रविवार कुठल्याही दिवशी रात्री अपरात्री गरज पडल्यास स्वयंसेवक एकमेकांना फोन करतायत आणि विशेष म्हणजे ज्याला फोन येतोय तो ही “कटकटच आहे च्यायला” असं म्हणत नाहीये ! घरात एक लग्न असलं तरी केव्हढी धावपळ असते; इथे तर चक्क अधिवेशन आहे ! तर, ह्या अधिवेशनाबद्दल संपूर्ण माहिती www.bmm2009philadelphia.org ह्या संकेतस्थळावर आहेच. अधिवेशनाला येण्यासाठी सस्नेह आमंत्रण आहे. तुम्ही येणार असाल तर आनंदाने स्वागत आहे; जरूर कळवा म्हणजे भेटता येईल. ’जावं की नाही’ हा विचार अजूनही करत असाल तर आता विचार सोडा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची कृती करा !! भेटूया तर मग – २/३ जुलै, २००९! ---------------------------------------- माझा ब्लॉगः www.atakmatak.blogspot.com ----------------------------------------
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2931
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

माझा मित्र अजित बेडेकर (बेडेकर लोणचेवाले) येतोय...... चुचु

अधिवेशनासाठी अनेक शुभेच्छा. घरात एक लग्न असलं तरी केव्हढी धावपळ ... खरच तुम्हा स्वयंसेवकांचे कवतुक करावे तेवढे थोडेच.

अधिवेशनाला हार्दिक शुभेच्छा! मुळं कुठेही रुजली तरी मराठी मातीवर अपार प्रेम करणा-या स्वयंसेवकांचं अभिनंदन आणि कौतुक! =D> क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

दणक्यात करा अधिवेशन. च्यामारी, होऊन जाऊद्या धडाका :) हार्दिक शुभेच्छा!!!! अवांतरः
’जावं की नाही’ हा विचार अजूनही करत असाल तर आता विचार सोडा आणि रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची कृती करा !! भेटूया तर मग – २/३ जुलै, २००९!
पुणे ते अधिवेशन स्थळ आणि परत असा खर्च+मानधन देताय काय? लगेच येतो :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

In reply to by धमाल मुलगा

>> पुणे ते अधिवेशन स्थळ आणि परत असा खर्च+मानधन देताय काय? लगेच येतो त्या पेक्षा मीच तिथे चक्कर मारणं स्वस्तात पडेल ना भौ ;)

बीएमएमचा हा सोहळा अनुभवण्यासारखा असतो - आतूनही आणि बाहेरूनही :-) एकदा तो पार पडला की त्यात अनेक दिवस (१-२ वर्षे) कामे करणार्‍यांना एकीकडे सुटल्याची भावना होते तर दुसरीकडे एकदम मोकळ्या वेळाचे काय करायचे याचा विचार करत हुरहुर लागते. मला खात्री आहे ह्या वेळचा सोहळापण एकदम मस्त आणि यशस्वी होईल. आम्हाला येयला जरी जमणार नसले तरी मनःपुर्वक शुभेच्छा! कार्यक्रम झाल्यावर वृत्तांत आणि फोटो अवश्य येथे दाखवा.

In reply to by विकास

अभिनंदन आणि शुभेच्छा! मनःपुर्वक शुभेच्छा! कार्यक्रम झाल्यावर वृत्तांत आणि फोटो अवश्य येथे दाखवा. हेच म्हणतो.

तुम्हा लोकांच्या कष्टांना दाद द्यायला खरंतर उपस्थित रहाणं हीच सगळ्यात मोठी पावती आहे पण काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं जमणार नाहीये असं दिसतंय. तुम्हा सर्वांना शुभेच्छा आणि सोहळा व्यवस्थित पार पडूदे अशा सदिच्छा! :) (काही वेचक क्षणचित्रांचे 'तूनळीकरण' करण्यासंबंधी विचार करता येऊ शकेल का?) (बृहन्महाराष्ट्रियन)चतुरंग

In reply to by चतुरंग

+१ (कधी नव्हे ती) चतुरंगाशी सहमत! रेवती

संदीप तुला व सर्वच स्वयंसेवकांना शुभेच्छा! म.मं.मध्ये काही वर्षे काम केले असल्याने यामध्ये आयोजन, ताण, कष्ट, रसिक प्रेक्षकांची मर्जी, तर कधीकधी कलाकारांचा मुडीपणा व हट्टीपणा सांभाळणे म्हणजे खरोखर तारेवरची कसरत असते याची कल्पना आहे. आणि हे तर अधिवेशन असल्याने कितीतरी पट अधिकच. एका मैत्रिणीने तर सांगितले होते की एका कार्यक्रमात तिला कोणीतरी विचारले होते की त्यांना डायबेटीस आहे मग म.मं. त्यांच्या तिकीटाचे अर्धे पैसे परत देइल का? - कारण त्यांना श्रीखंड खाता येणार नाही. :)

In reply to by सखी

एका मैत्रिणीने तर सांगितले होते की एका कार्यक्रमात तिला कोणीतरी विचारले होते की त्यांना डायबेटीस आहे मग म.मं. त्यांच्या तिकीटाचे अर्धे पैसे परत देइल का? - कारण त्यांना श्रीखंड खाता येणार नाही. हा, हा, हा!!! धिस इस रियली फनी!!!!!! =))

In reply to by सखी

हा हा..मग किती मोठ्ठा डबा घरी नेला त्यांनी ? ;-) शेवटी डालर मधला पॅका..

आई -बाबा नेमके त्याच विकेंडला भारतात परतत आहेत त्यामुळे मनांत असूनही हजर नाही राहता येणार याचं वाइट वाट्तं आहे. माझ्यातर्फे कन्व्हेंशन ला शुभेच्छा! :) - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/