Skip to main content

पाहिली मी पंढरी

लेखक क्रान्ति यांनी बुधवार, 10/06/2009 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी माळ तुळशीची गळा, कासे पितांबर, कर कटी भाळि कस्तुरिटिळक, कानी मकरकुंडल शोभती स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुंठ शोभे भूवरी भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी चरणि माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी
लेखनविषय:

वाचने 3333
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हा जणू अभंगच झालाय. मुळात धृपदच (पहिल्या दोन ओळी ) मनाची पकड घेतात आणि त्यानंतरचा आख्खा अभंगच ( मी ह्या रचनेला अभंगच म्हणतो ) सुंदर झालाय. क्रांतीताई, हि रचना ग्रेट झालीये.

अमृताची चंद्रभागा झुळझुळे ज्या अंतरी | याचि देही याचि डोळा, का न पाहे पंढरी || क्रांती (मराठीत अंत्य वेलांटी दीर्घच असते), अतिशय सुंदर रचना आहे. अंतरातून स्फुरलेली, ओघवत्या शब्दांत रूप घेतलेली आणि नादमय.

In reply to by नरेंद्र गोळे

ही कविता नसून... भक्ती गीतच आहे. सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by नरेंद्र गोळे

ही कविता नसून... भक्ती गीतच आहे. सुंदर!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

छान!.. भक्तीमय रचना! ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

चांगली रचना.
नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी
या ओळीचा भावार्थ जरा विस्तृतपणे मांडाल का? राघव ( आधीचे नाव - मुमुक्षु )

नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी त्या निराकाराला सगुण रूपात पाहिल्यावर अजाणताच त्याचं नाम मुखी येतं, आणि वाचा धन्य होते, पवित्र होते! वाणीला वेगळीच शक्ती मिळते. १९८३ मध्ये मी नोकरीनिमित्त पंढरपूरला असताना रोज रात्री ९.३० ते १० च्या सुमारास मी आणि माझी मैत्रिण शशी मंदिरात जात असू. त्यावेळी कर्नाटकातून आलेले भक्तगण गरुडखांबाजवळ बसून मृदंगाच्या तालावर भक्त पुरंदरदासाच्या रचना गात असत. ते वातावरण इतकं भारून टाकणारं असे, की स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं, असं वाटे! ही रचना त्याच काळातली. [आता पंढरी बरीच बदलली आहे, आणि पांडुरंग कैदेत असल्यासारखा वाटतो!] क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा

सकाळी सकाळी अभंग वाचून प्रसन्न् वाट्लं मस्त रचना .. अश्विनि ....