मायबापहो,
मिसळपाववर गेले बरेच महिने येवून आस्वाद घेत होतो. काहीतरी आपणही करावे असे बरेच दिवस वाटत होते पण धाडस होत नव्हते. जरी व्यवसाय लिहिण्याचा असला तरी ललित अक्कल नाही ना कधी लिहिण्याची शैली तयार केली. आज मुलाची शाळा सुरु झाली आणी गेले काही दिवस डोक्यात घोळत होते ते काळ्यावर उतरावे अशी ऊर्मी आली. त्यामुळे हे लिहिले. ओनामा तर केलाय पण भट्टी जमली आहे असे काहि वाटत नाही पण चुका पोटात घाला आणी जर लिहून अजून छळू नये असे वाट्ले तर तसेही कळवा.
पुनेरी
आज नऊ जून..... गोटूची शाळा आज परत सुरु झाली. गोटू म्हणजे आमचा सुपुत्र _ वय वर्षे चार आणी शाळा म्हणजे सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल
आमचा गोटू आता जूनियर केजी वर्गात गेला. तशी तो शाळेत जायला लागून दीड-दोन वर्षे झाली पण आत्तापर्यंत प्ले ग्रुप, मिनी केजी अश्या वर्गात असल्यामुळे एबीसी फोनेटिक्स सह घडा घडा म्हनने, पोएम पाठांतर, फ्रुटस, फ्लोवर ओलखने, रोड-वे, एयर-वे, रेलवे, वाटर-वे वेहिकल ओलखने, थोड़े क्राफ्ट आणि पेंटिंग एवढाच अभ्यास. त्यामुले अजुन शाळेचा फील आला नव्हता.
जूनियर केजी म्हणजे अभ्यासाची सुरुवात याची जाणीव शनिवारीच आली. सुट्टीचा मुहुर्त साधून मी आणी बायको शाळेत गोटूची पुस्तके घ्यायला गेलो होतो. अर्थातच गोटू बरोबर होता. "बाबा आता शाळा सुरु होणार ना? मग मला माझे सगळे मित्र भेटतील ना? अर्चना टीचर आणी प्रीता टीचर पण भेटतील ना?" एक ना अनेक, गोटू सतत प्रश्न विचारत होता आणी त्याला उत्तरे देता देता माझी पुरेवाट होत होती. मधेच बायको गोटूला "आत्ता आपल्याला तुझ्या नवीन टीचर भेटतील, त्याना गुड मॉर्निंग म्हणायचे, नाव सांगायचे" असे शिकवणीवजा सांगत होती. एकदाचे शाळेत पोचलो आणी गोटू एकदम चेकाळला , "बाबा, ए बाब्या.... तो बघ सिंदाल दरक घसरगुंडी खेलतोय. तो माझ्या वर्गात आहे." थोड्या विचारांती लक्षात आले सिंदाल हा सिद्धांत चा गोटू ने त्याला जमेल तसा केलेला उच्चार होता.
वर्गात नविनच टीचर होत्या. त्यानी गोटूला नाव विचारले आणी तो चक्क लाजला. अरेच्या नेहमी एवढा डेअर-डेविल वाटणारा गोटू चक्क बुजला? "होते असे कधी कधी. ओळख नसल्याने मुले बुजतात पण एक दोन दिवसात सरावतात," टीचरनी आम्हाला धीर दिला. "बघालच मग," म्हणावेसे वाटले त्याना. पण तोवर गोटू सरावला होता आणी टीचरना गुड मॉर्निंग म्हणत होता. टीचर छान हसल्या आणी त्यानी एक भली मोठी पिशवी आमच्या हातात दिली. बापरे! केवढे तिचे वजन? दीड-दोन किलो सहज असेल. उघडून पाहिले तर आत दहा-बारा पुस्तके, दोन फुलस्केप वह्या, एक पोएमची सीडी, क्रेयॉन्सचा बॉक्स, पेंसिल बॉक्स, खोड-रबर, शार्पनर आणी काय काय?
"हे सगळे रोज घेऊन यायचे शाळेत," बायकोचा चिंतातूर प्रश्न. एवढासा आमचा गोटू एवढे वजन घेउन स्कूलबस मधे कसा चढ़नार-उतरणार हा प्रश्न तिच्या चेहर्यावर! "आता घरी गेल्यावर सगळ्या वह्या-पुस्तकांवर नाव वगैरे लिहा आणी मंगळवारी सगळी पुस्तके पाठवा. काही आम्ही इथे ठेवून घेवू मग रोज दोन-तीनच पुस्तके आणी वह्या आनाव्या लागतील,"टीचरनी परत विको वज्रदंती स्माईल देत सांगितले. मी आणी गोटू नविन पुस्तके बघत होतो तर बायको जरा बाजूला गेली आणी थोड्या वेळाने हसत परतली. "गेल्या वर्षी गोटूला होत्या त्या अर्चना टीचर भेटल्या मला. त्या म्हणाल्या काही काळजी करू नका. थोड़े दिवस त्या ही जूनियर केजी च्या क्लास मधे जाणार आहेत, नविन टीचरबरोबर मुले रुळेपर्यंत," तिने सांगितले आणी जीव जरा भांड्यात पडला. मग जाऊन दप्तर खरेदी, दुकानात मुलांची आणी त्यांच्या आई-बापांची ही गर्दी.... ते हनुमान चे दप्तर हवे, मला सुपरमन चे..... सगला गिल्ला. गोटूला स्पायडरमनचे हवे होते.
त्यानंतर युनिफॉर्म खरेदी. तिथेही मुलांची आणी पालकांची खचाखच गर्दी... नवीन कपड्याचा, बुटांच्या लेदरचा छान वास... चड्डीची ट्रायल घ्यायला गोटू लाजला. "असू देत! बरोबर बसेल मापात! आणी नाहीच बसली तर बदलून घ्या केव्हाही," दुकानदार काकानी भरवसा दिला.
घरी आल्यापासूनच गोटू मनाने शाळेत पोचला होता. दोन दिवस फक्त सगळी पुस्तके मांडून बसला. सगळ्या पुस्तकातली चित्रे पाहिली, नविन पुस्तकाचा वास घेत बसला. मग दोन दिवस फक्त पुस्तक _ ए, बी, सी, डी करत सगळ्या पुस्तकाची कव्हर वाचली.
काल सन्ध्याकाळी आम्ही बाहेर जेवायला गेलो होतो. एरवी हॉटेलात जेवणे गोटूला खूप आवडते पण काल सगळे लक्श घरी कधी पोहोचतो याकडे. घरी पोहोचलो आणी कुठ्लीही खऴखळ न करता गोटू झोपला ही. बहुतेक रात्रभर शाळेची स्वप्ने पहात होता आणी मी आणी बायको त्याच्या पुस्तक्-वह्याना कवर घालत होतो.
पहाटे सहा वाजताच गोटूचा गजर सुरु. "बाबा, ए बाब्या! ऊठ! आज माझी शाळा सुरु होतेय. मला तयार व्हायचेय मग तु मला बाय कर. आठ वाजता बस येणार पण सात वाजताच गडी तयार ना! अगदी दप्तर खान्दयाला लावून. नाचत नाचत गेला बस स्टॉपवर तर इतर मुलेही जमली होती. माने काका आणी गाडे काका बस घेऊन आले तर सगळी मुलं खुश.
दुपारी परत घरी आल्यावर गोटू सगळ्या गमती सांगत होता. "टीचर छान आहेत. त्यानी टीव्ही वर कार्टून दाखवली आणी नावे विचारली. मी बरोबर बोललो तर गुड बॉय म्हणाल्या...." बायको बोलती झाली, "आठवते? आजोबांच्या वेळी म्हणे शाळेच्या पहिल्या दिवशी ओनामाशीढ्म (ओम नम सिद्धम!) म्हणायचे. आपण श्री गणेशाय नमा म्हणायचो. आणी ह्याच्या ईंग्लीश मीडीयम मधे काय तर कार्टून."
तेव्हढ्यात गोटू उत्तरला,"अग! पण रोजच्यासारखी सगळ्यात आधी मोरया मोरया मी बाळ तान्हे ही प्रार्थना आम्ही म्हणलीच ना!"
वाचने
2820
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोटु मस्तच
मस्त ...
मस्त ...
सहमत
In reply to मस्त ... by छोटा डॉन
५०% सहमत
In reply to सहमत by क्रान्ति
गोटुचा फोटु टाका ,,,,
फारच गोड
लेख आवडला
गोटूचा ओनामा आवडला!
आवडलं!!!
गोटू