Skip to main content

|| शिवराज्याभिषेक ||

|| शिवराज्याभिषेक ||

Published on 01/06/2009 - 00:31 प्रकाशित मुखपृष्ठ
काजळल्या रात्री - आशंकित गात्री उसासे ही धात्री - भयभीत । गोठलेले जिणे - बंध हे पडले कोडे हे कसले - ईश्वरास । दुर्दैवी पखाली - दैन्यही सामोरी कावड अंधारी - काळ वाही । अस्मानी, सुल्तानी - घोर हा जीवासी नसे आसराही - कोणा येथे । करपली भूमी - उजाड ही सृष्टी ओसाड ही वस्ती -खिन्न शांत । तेज ते उजळे - काळोख्या गर्भात आस ही नेत्रात - वसुधेच्या । स्वये भाग्य लक्ष्मी - बळ ते सावरी माळराना वरी - अवतरी । शपथ ग्रहण - करिती प्रमाण राष्ट्रास्तव प्राण - देऊ आम्ही । शृंखला दास्याच्या - गळोनी पडती बंध हे तुटती - अमानुष । निजाम, आदिल - ही कुतुबशाही मात अन घेई - मोगलाई । सिद्धी तो नमला - झुकला इंग्रज अन पोर्तुगीज - हत:प्रभ । तो जरीपटका - झळके डौलात उजळे डोळ्यात - अभिमान । आनंद भुवनी - ओसंडूनी वाही सौभाग्यासी नाही - खळ काही । सुखावली प्रजा - जागे मनी आस सकळांना ध्यास - एक लागे । सह्यागिरीस या - लाभो असा एक न्यायी, पुण्यवान - वीर राजा । दशदिशांना ही - वार्ता आनंदाची राज्याभिषेकाची - फिरे द्वाही । ती छत्रचामरे - आणि आभूषणे मंगल तोरणे - गगनात । ते अष्टप्रधान - ते शूर सोबती जिजाउ पाहती - क्षात्रतेज । वर्धिष्णू अशी ही - चंद्रकलेसम विश्ववंदनीय - राजमुद्रा । सुवर्ण मंडित - सिंहासनावरी आरोहण करी - महाराजा । जयजयकार - करिती हे जन नाद हा भेदून - नभ जाई । जलाभिषेक त्या - सप्तनद्या करती शिवछत्रपती - राजा होई ।
लेखनविषय:

याद्या 2458
प्रतिक्रिया 8

छान कविता... मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.

कविता आवडली. काही ठिकाणी वृत्त थोडे चुकल्यासारखे वाटते.. आशय सुंदर आहे कवितेचा. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

नाट्यातला राज्याभिषेकाचा भव्य प्रसंग नजरेसमोर उभा राहिला. अप्रतिम कविता! :) क्रान्ति क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो? गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं| अग्निसखा

छान आहे कविता! हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

अप्रतिम.. :) जबरदस्त. डोळ्यासमोर चित्र उभे केलेत तुम्ही. आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!