Skip to main content

डिगर

लेखक कॉमी यांनी रविवार, 01/11/2026 14:15 या दिवशी प्रकाशित केले.

डिगर बघितला. 
उत्तम सिनेमा. खूप आवडला.

स्पॉयलर शिवाय ह्या सिनेमाबद्दल बोलणे शक्य नाहीये. तेव्हा स्पॉयलर अलर्ट.

सिनेमा सुरू होतो डिगर रॉकवेल (टॉम क्रुझ) पासून. हा पिढीजात तेलसम्राट आहे. आजोबांपासून त्यांच्या घराण्यात तेलाने वारेमाप पैसे कमावले आहेत. (रॉकवेल नावाचा स्रोत रॉकफेलर आहे हे स्पष्टच आहे.) आणि ह्या सिनेमाच्या जगात त्यांच्या ट्रम्पसदृश्य अध्यक्षाने ग्रीनलँड, अलास्का, उत्तर व दक्षिण ध्रुव सर्व ठिकाणी तेल काढण्याची परवानगी दिली आहे. डिगरचा पर्यावरण सेफ्टी ऑफिसर त्याला सतत एका आगामी संकटाबद्दल फोन, मेल इत्यादी करत असतो पण डिगर एकदम स्टिरिओटिपिकल विलन सारखं त्याला धुडकावत असतो. त्याला त्याच्या अतिजीर्ण मरणासन्न मांजरीच्या तब्येतीविषयी जास्त काळजी वाटत असते. 
तर त्याच जागेवर मोठा स्फोट होऊन एक मोठा बर्फखंड सुट्टा होतो. आणि हा ज्युडी नावाचा खंड आता युरोपला धडकेल आणि त्यामुळे सुनामी येऊन लाखो लोकं मरतील हे माहीत असूनही डिगर आणि कंपनी ही माहिती दडवून ठेवतात. हे सर्व इतके ओवर द टॉप दाखवले आहे की गंभीर विषय असून विनोदी आहे.  अमेरिकन जनरल्सचे मत असते त्या खंडावर बाँब टाका आणि मोकळे व्हा.

इथे ट्विस्ट येतो.

समजते की जे आत्तापर्यंत पाहिले ते सर्व एका नाटकाची रिहर्सल होती. टॉम क्रुझ हा मुख्य अभिनेता आहे. आणि हे नाटक खऱ्या गोष्टीवर आधारित आहे - आजचे जग हे त्या नाटकात दाखवलेल्या सगळ्या भयानक घटना झाल्यावर परिणामांसोबत राहणारे जग आहे. प्रमुख पात्र साकारणारा कर्टिस (टॉम) चिंतीत आहे की आपण इतक्या गंभीर गोष्टी इतक्या लाईटली का दाखवतोय. तश्यातच त्याची मुलगी एका हरिकेन मध्ये अडकली असते हे समजते.

पुन्हा नाटक चालू.

युरोपियन युनियन. आधी अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष भाषण देतो - शिव्या खातो. त्यानंतर Digger चा प्रमुख पर्यावरण शास्त्रज्ञ जातो आणि कंपनीचे सारे कुटिल शेडी व्यवहार जगासमोर मांडतो. त्यानंतर Digger स्वतः जातो- तो त्या शास्त्रज्ञाचे सगळे आरोप कबूल करतो, पण उलटे बोट प्रेक्षकांकडे दाखवतो (आपल्याकडेही!) की तुम्ही स्वतः गाड्या वापरता, उबदार घरांमध्ये राहता. तुम्ही डिमांड करता मी सप्लाय करतो. त्यात तो थोडे फियरमंगरिंग पण करतो. अमेरिकेने ऑइल नाही घेतले तर चायना घेईल, रशिया घेईल. हे युद्ध आहे ! हा मोनोलॉग, त्याची सिनेमाटोग्राफी निव्वळ अप्रतिम आहे.

अजून एक संकट. आणखी एक बर्फखंड सुटा होतो - आणखी मोठा. ह्या सगळ्यात बराच विनोद पेरलाय. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना किलोमिटर मध्ये माप चालत नाही. त्यांना खंडाचा नुसता आकार ऐकून काही समजत नाही. अमेरिकेतल्या शहराच्या आकाराशीं तुलना केली तरच ट्यूब पेटते. ह्या नवीन खंडात तर युएसएसआरने डंप केलेला न्युक्लिअर वेस्ट सुद्धा असतो. ह्या खंडाचे नाव आधी असते किंबर्ली. राष्ट्राध्यक्ष जोराने म्हणतात अमेरिकन नाव नको. नवीन नाव - क्रेमलिनोवा. बाँब टाकण्यासाठी हात शिवशिवणारा जनरल शेवटी मर्जीनुसार त्यावर बॉम्ब टाकतो आणि संकट अजूनच गहिरे होते.

कट टू रिहर्सल. 
बाँबिंगच्या प्रसंगातले संवाद, नेपथ्य, खऱ्या आणि गंभीर घटनांना इतक्या लाईटली दाखवल्याने टॉम क्रुझ अस्वस्थ आहे. शेवटी त्याचे दिग्दर्शिकेसोबत वाजते. ती त्याला सांगते की हो, आम्ही घेतोय गोष्टी लाईटली! इतकी लोकं मेली ह्या घटनांमुळे, आता चार घटका करमणूक हेच आमचे उद्दिष्ट आहे! पानापानावर रडायचे नाहीये ! इथेच समजते की हे नाटक (फॉसिल फूल्स) हे चौथ्यांदा बनवले जात असते. प्रथम अवतरणानंतर पंचवीस वर्ष झाली आहेत !

आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर येते. नाटकाचा निर्माता (कलाकृती म्हणून निर्माता नव्हे, पैसे टाकणारा) हा डिगरचा भाचाच असतो ! आणि त्याच्या परिवाराला इतक्या वाईट रंगात रंगवणाऱ्या नाटकाला पैसे देण्यात त्याला काही वाटत नसते. तो त्याच्या मामाच्या दुष्कृत्यांचा ओझ्याखाली अजिबात दबलेला बिबलेला नाहीये.  त्याने जेव्हा पहिल्यांदा फॉसिल फूल्स पाहिले असते, त्याने पण जनरल प्रेक्षकांसोबत त्याच्या मामाच्या शेवटाला उठून हुर्रे आणि टाळ्या वाजवलेल्या.  तो पुन्हा टॉम क्रुझ आणि दिग्दर्शिकेत समन्वय आणतो. सोबत तो टॉमला त्याच्या मुलीला शोधण्यास मदत करेन म्हणतो - मला फक्त तिचा फोन नंबर दे, मी ट्रॅक करतो ती कुठे आहे !

ह्यातून हेच ध्वनित होते की पब्लिक डिगर बद्दल इतके वाईट बोलते, त्याला हिटलर सदृश्य व्हिलन म्हणून पाहते. पण सत्तेच्या नाड्या अजूनही त्याच्या कुटुंबाच्या किंवा त्याच्यासारख्याच माणसाच्या ताब्यात आहेत.

डिगरचा करुण शेवट होतो. मान, पैसे, ताकद सगळे गमावलेला डिगर जहाजातले अन्न संपले समजल्यावर भ्रमिष्ट होऊन आत्महत्या करतो.  ऑडियन्स उठून जोरजोराने टाळ्या वाजवतात. टॉम क्रुझ आणि इतर कलाकार मानवंदना घेतात. टॉम क्रुझची मुलगी कुठे आहे हे समजले आहे. नाटक संपले आहे. नाट्यगृहाचे दार उघडण्याआधी लेव्हल फोर अशी वॉर्निंग येते. प्रेक्षक विशिष्ठ मास्क लावतात आणि मगच बाहेर पडतात. बाहेर आपल्या जगापेक्षा फार वेगळं नाही पण विजिबली सर्वांसाठी बरंच वाईट झालेलं प्रदूषित जग दिसतं.

सिनेमा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी अनेक गोष्टी क्लिक झाल्या. टॉम क्रुझ त्याच्या मुलीबद्दल चिंतेत असतो तर सगळे काळजी न करता नाटकावर फोकस कर असं सांगत असतात.  आजच्या जगात क्लायमेट बद्दल काळजी तशीच तर आहे. कितीही काळजी वाटो कोणीही काहीही करत नाही, आपले आपले काम करत राहतात. बर,सिनेमाच्या शेवटी टॉम क्रुझ आणि त्याची पत्नी खुश होतात मुलगी कुठे आहे हे समजले असे जेव्हा केनी त्यांना सांगतो. पण फक्त लोकेशन समजणे हे काय तिच्या सुरक्षित असण्याचे द्योतक नाहीये! किंबहुना ती ह्या अपघातातून वाचली असली तरी बाहेरचे जग तिच्यासाठी काय होऊन बसले आहे !

प्रेक्षक फक्त कुणाला ब्लेम करायचं इतकंच त्या नाटकातून घेतात. नाटक खुद्द डिगरच्या भाच्याने निर्मित केले असते. अजूनही तो सत्तेच्या जवळ आहे हे स्पष्ट आहे. 
सर्व कलाकारांनी उत्तम काम वठवले आहे. छायाचित्रण खूपच भारी आहे.

 

 

 

लेखनविषय:

वाचने 136
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

स्पॉयलर अलर्ट मुळे कधी चित्रपट पाहिला तर लेख वाचता येईल. रहस्य असेल आणि ते समजले तर नंतर पाहताना हिरमोड होईल.