Skip to main content

लक्ष लक्ष दीप उजळले

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 27/10/2026 22:24 या दिवशी प्रकाशित केले.

 

मला अनेक गोष्टींचे कौतुक वाटते. त्यात एक सुंदर गोष्ट म्हणजे ' दिवे '!
त्या कापसाच्या वातीने, तेलाच्या साथीने, उजळेले दिवे खुप सकारात्मकता देतात.
कोजागिरीला ज्येष्ठय अपत्य ओवाळणी हा फार घरात होणारा रूढी परंपरा आहे. काही घरात मुलगा ज्येष्ठय असेल तरच ओवाळतात. पण आता तसें करत नाही. मुलगा असो वा मुलगी तिला ओवाळतात.
हं... तर असें दिव्यांविषयी जे काही सुचेल, समजेल ते इथे देत राहीन.... दिवाळी पर्यंत!!
उठा उठा दिवाळी आली... लक्ष लक्ष दिव्यांची आरास लावण्याची वेळ झाली....😊

निराञ्जन (निरंजन) : संस्कृत अर्थ

संस्कृतमध्ये  निरञ्जनम् आणि नीराजन (नीराजनम्) हे शब्द वेगवेगळ्या अर्थांनी वापरले जातात.

1. निरञ्जन (निर् + अञ्जन) : अंजनरहित, निर्मळ, निष्कलंक, मलिनतारहित. आध्यात्मिक अर्थाने परमात्मा किंवा शुद्ध चैतन्य यांसाठीही निरञ्जन हा शब्द वापरला जातो.

2. नीराजन (नीराजनम्)  दीप किंवा ज्योत दाखवून देवतेची आरती करणे, ओवाळणे. पूजाविधीमध्ये हा अर्थ विशेष महत्त्वाचा आहे.

मातुः स्नेहनीराजनम् -आईचे निरंजन

आकाशाच्या घरात कोजागिराचा चंद्राचा आला,
नभात उतरला शुभप्रकाश, मंगल सोहळा सजला। 
आईने घेतले निरांजन हाती, 
वाती सजविल्या तिळाच्या तेलात भक्तिभावाने न्हाती।

बाळाला ओवाळिले हळुवार हातांनी, मायेचे दीप उजळले प्रेमळ नजरेने। 
आयुष्याच्या उंबरठ्यावर उभे ते बाळ, 
डोळ्यांत स्वप्ने, चेहऱ्यावर कौतुकाची लाली।

निरांजनाभोवती हात फिरत राहिले, चंदनाचे सुगंधी दरवळ हवेत मिसळत गेले। 
तेजाचे मोहक किरण पसरले चारही दिशांनी, घर भरून गेले आशीर्वादांच्या प्रकाशकिरणांनी।

कितीही दिवे इकडे-तिकडे लागलेले असले, 
आईच्या निरांजनाने प्रेमाचे नाते उजळले। 
ते नाते आशीर्वादांनी सदैव फुलत राहिले, बाळाच्या आयुष्यावर मंगल सावट धरून राहिले।
-भक्ती

तसेच निरांजन म्हटलं की आठवतात माणिकताई...

"लाविते मी निरांजन" हे सुप्रसिद्ध मराठी भावगीत, ज्येष्ठ शास्त्रीय व सुगम संगीत गायिका माणिक वर्मा यांनी गायले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सासरच्या मुलीला येणारी माहेरची अन् आईची आठवण या गाण्यात अत्यंत भावूक शब्दांत मांडली आहे.

लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी
भाग्य घेऊनिया आली आज धनत्रयोदशी
आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या आंघोळी
घरोघरी जागविते माय मुले झोपलेली
घरोघरी दीपज्योती वर्षाचा मोठा सण
क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण
चार वर्षांमागे होता हात तुझा अंगावरी
कधी नाही जाणवली हिवाळ्याची शिरशिरी
आज झोंबतो अंगाला पहाटेचा थंड वारा
कुठे मिळेल का आई तुझ्या मायेचा उबारा
तुझ्याविना आई घर सुनेसुनेसे वाटते
आणि दिवाळीच्या दिशी तुझी आठवण येते
लाविते मी निरांजन
सासरीच्या या संसारी माहेराची आठवण
आठवती बाबा भाऊ आणि दारीचं अंगण
अंगणात पारिजात कोण देई त्याला पाणी
दारी घालिते रांगोळी माझ्यावाचून का कोणी
लाविते मी निरांजन
आई तुझ्या पायापाशी घोटाळते माझे मन
जिथे उभे अंगणांत तुळशीचे वृंदावन
दारापुढे लिंबावर साद घालतो कावळा
कोण येणार पाहुणा आतुरला जीव भोळा
लाविते मी निरांजन...

 


वाचने 1119
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

छान सुरुवात आहे, कोजागरीची कविता आवडली.

अनेक प्रकारच्या दिव्यांबद्दल भरपूर काही लिहीण्यासारखे आहे, वाचत राहीन.


In reply to by श्वेता व्यास

अनेक प्रकारच्या दिव्यांबद्दल भरपूर काही लिहीण्यासारखे आहे,...

+१ जरूर, श्वेता तुम्हीही दिव्यांचे प्रकार सुचवत राहा 👍

धन्यवाद सर 👍


'समई' या शब्दाच्या उत्पत्तीमागे भाषातज्ज्ञ आणि अभ्यासकांचे तीन मुख्य मतप्रवाह आढळतात. 

पहिल्या प्रवाहानुसार, 'महाराष्ट्र शब्दकोशा'त या शब्दाचा संबंध संस्कृतमधील 'संदीपिका' या शब्दाशी जोडला गेला आहे, ज्याचा अर्थ मजकुराचा किंवा जागेचा सदासर्वकाळ उद्धार करणारा दिवा असा होतो. तसेच समदीपिका' (समान प्रकाश देणारा दिवा)  काळाच्या ओघात प्राकृत आणि अपभ्रंश होत 'संदीपिका'पासून 'समई' हा शब्द तयार झाला असावा.

 दुसऱ्या प्रवाहानुसार, भारताच्या मध्ययुगीन काळात परकीय संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अरबी भाषेतील 'शमअ'  हा शब्द मराठीत आला, ज्याचा अर्थ 'दिवा' किंवा 'मेणबत्ती' असा होतो आणि याच शब्दावरून पुढे 'समई' हा शब्द रूढ झाला. 

याव्यतिरिक्त, तिसऱ्या एका विचारसरणीनुसार प्राचीन काळी मंदिरात किंवा शुभ कार्यात "निश्चित वेळेसाठी -समयासाठी प्रकाश देणारा मोठा दिवा" म्हणून याला 'समयी' किंवा 'समई' म्हटले गेले असावे, म्हणजेच याचा संबंध थेट 'समय' -वेळ या संकल्पनेशी जोडला जातो.

भारतीय संस्कृतीमध्ये कोणत्याही शुभकार्याची किंवा मंगल प्रसंगाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्याची अत्यंत प्राचीन परंपरा आहे. जेव्हा मंचावर किंवा देवघरात एक भलीमोठी समई ठेवली जाते आणि मान्यवरांच्या हस्ते तिच्यातील एक-एक वात पेटवली जाते, तेव्हा तो केवळ अंधार दूर करण्याचा उपक्रम नसून, एकत्रित शुभेच्छा, सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानाचा प्रकाश पसरवण्याचा एक पवित्र क्षण असतो. आपल्या संस्कृतीमध्ये समईचे स्थान आणि तिची महत्ता मनामनात ठासून भरलेली दिसते.

संध्याकाळच्या सांध्यप्रकाशामध्ये जेव्हा घरात समई लावली जाते, तेव्हा अवतीभवतीचे वातावरण अत्यंत शांत आणि पवित्र भासू लागते. समईच्या चारी बाजूंनी पडणारा तो मंद, पिवळसर प्रकाश संपूर्ण देवघराला जसा उजळून टाकतो, तसाच तो दिवसभराचा थकवा दूर करून आपल्या मनालाही एका अनामिक शांततेने प्रकाशित करतो. तो प्रकाश केवळ डोळ्यांनाच नाही, तर आत्म्यालाही सुखावून जातो.

समईचा संबंध आपल्या कौटुंबिक नात्यांशी आणि भावनांशी खूप जवळून जोडलेला आहे. लग्नकार्यात, बाळाच्या जन्माच्या वेळी किंवा कोणत्याही मोठ्या आनंदाच्या प्रसंगी समई भेट देण्याची प्रथा आजही तितकीच जिवंत आहे. माझ्या मुलीच्या जन्मानंतर सासरच्यांनी आईला दिलेली मोठी समई दिली होती तशीच जावेला तिच्या माहेरकडून कमरेच्या उंची एवढी भव्य समई मिळाली होती या वस्तू केवळ 'भेट' नाही तर , तर त्या नवीन पिढीच्या आयुष्यात प्रकाश आणि समृद्धी यावी म्हणून दिलेले आशीर्वाद असतात. अनेकांच्या दिवाणखान्यात किंवा देवघरात माणसाच्या उंचीएवढ्या समया ऐटीत उभ्या असलेल्या आपण पाहतो, ज्या त्या घराण्याच्या वैभवाची साक्ष देतात.

समईच्या रचनेत आपल्याला भौगोलिक आणि प्रादेशिक विविधता पाहायला मिळते.

• महाराष्ट्र आणि उत्तर भारत येथे प्रामुख्याने ५ किंवा ७ ज्योतींच्या (वातींच्या) समया वापरल्या जातात, ज्या आकाराने मध्यम आणि सुटसुटीत असतात.

जसे आपण दक्षिण भारताकडे (तामिळनाडू, कर्नाटक, केरळ) जातो, तसा समईचा आकार आणि रूप बदलत जाते. तिथे माणसाच्या उंचीएवढ्या, अत्यंत नक्षीदार आणि अनेक वाती असलेल्या भव्य समया मंदिरांमध्ये आणि घरांमध्ये पाहायला मिळतात.

 तामिळनाडूमध्ये या पारंपरिक समईला 'कुतुविळक्कू'  म्हटले जाते, जी अत्यंत पवित्र मानली जाते.

तामिळनाडूतील 'नाचिआरकोईल'  या गावच्या नक्षीदार कुतुविळक्कू समया जगप्रसिद्ध असून त्यांना भारत सरकारचा 'जीआय टॅग' मिळाला आहे. 

एक संपूर्ण कुतुविळक्कू मुख्यत्वे ५ भागांमध्ये विभागलेली असते, ज्याला आध्यात्मिक भाषेत सृष्टीच्या विविध तत्त्वांचे प्रतीक मानले जाते:

• कीळभागम समईचा सर्वात खालचा गोल पाया, जो ब्रह्माचे प्रतीक मानला जातो.

• कंदम मधला उंच दांडा (स्तंभ), जो विष्णूचे प्रतीक मानला जातो.

• मेळभागम वरचा मुख्य भाग जेथे तेल किंवा तूप भरले जाते, हे शिवाचे प्रतीक मानले जाते.

• नेई/एण्णई वाती ठेवण्याच्या जागा आहे.

• प्रभाई समईच्या सर्वात वरच्या टोकावर असणारी नक्षी. सहसा या टोकावर 'अण्णम' हंस किंवा मोर याची अतिशय सुंदर पितळी मूर्ती असते.

शब्दाची उत्पत्ती काहीही असो, पण कवीच्या प्रतिभेत उतरताना समई हे स्त्रीच्या अंतर्मनाचे, तिच्या सोशिकतेचे आणि तिच्या मूक वेदनेचे प्रतीक बनते. कवी आरती प्रभू यांनी लिहिलेल्या आणि आशा भोसले यांनी गायलेल्या 'समईच्या शुभ्र कळ्या' या सुप्रसिद्ध भावगीतात समईच्या माध्यमातून सासरी गेलेल्या एका नवोढ प्राजक्तासारख्या हळव्या मुलीचे भावविश्व उलगडले आहे.

"समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते

केसातच फुललेली जाई पायांशी पडते."

सांजवेळी देवघरात समई लावताना तिच्या कापसाच्या वातींची शुभ्र कळ्यांची ज्योत उजळते. जशी ती समईची ज्योत थरथरते, तसेच सासरी आलेल्या मुलीचे मनही भूतकाळ आणि वर्तमानाच्या हिंदोळ्यावर थरथरत असते. लग्नात केसात माळलेली जाई आता कोमेजून पायाशी पडते आहे, म्हणजेच तिचे बालपण, तिचे स्वातंत्र्य संपून ती एका नव्या बंधनात -वैवाहिक जीवनात बांधली गेली आहे.

भावार्थ -शब्दयात्री 

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते

केसातच फुललेली जाई पायांशी पडते.

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे

मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे.

साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची

आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची.

गाठीमध्ये गं जिवाच्या तुझी अंगार्‍याची बोटे

वेडी उघडाया जाते उगा केतकीचे पाते

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये

पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन गं ये.

उगा बावरते मन भरू येताना केसर

अशा वेळेची, वाटते, अंगावर घ्यावी सर 

डोळ्यातल्या बाहुल्यांनी घरीदारी उतरावे

असे काहीसे वाटते याला कसली गं नावे?

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना

अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा !

-आरती प्रभू 

'ग्लो ऑफ होप' (Glow of Hope) या अतिशय प्रसिद्ध चित्रकृतीमागची कथा तितकीच मोहक आहे. या उत्कृष्ट कलाकृतीमध्ये चित्रित झाल्यामुळे गीता उपळेकर भारतीय कलाविश्वातील एक अविस्मरणीय व्यक्तिमत्त्व बनल्या.

प्रसिद्ध चित्रकार एस. एल. हलदणकर यांची कन्या असलेल्या गीता कोल्हापूरयेथे राहत होत्या. दिवाळीच्या एका संध्याकाळी, दिवा लावताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला मंद प्रकाश आणि ज्योत जपण्यासाठी त्यांनी हाताच्या बोटांनी जो आडोसा केला होता, तो पाहून त्यांचे वडील भारावून गेले.

त्या क्षणी असलेल्या शांत आणि सुंदर दृश्याने प्रभावित होऊन, हलदणकर यांनी आपल्या मुलीला तीन तास स्थिर बसून पोझ देण्यास सांगितले. यातून साकारलेली कलाकृती पुढे भारतातील सर्वात प्रतिष्ठित कलाकृतींपैकी एक ठरली.

१९४५-४६ च्या सुमारास पूर्ण झालेल्या या चित्रात, गीता हातात दिवा घेऊन उभी आहे आणि ज्योत सुरक्षित राहावी म्हणून तिने अतिशय नजाकतीने आपल्या हातांनी तिला वेढले आहे.

Source -TheBetterIndia


In reply to by Bhakti

छान जमून आला लेख, समयी ची व्युत्पत्ती माहिती नव्हती. 

समईच्या शुभ्र कळ्या कविता आणि हळदणकरांचे हे चित्र या दोन्ही अजरामर कलाकृती आहेत.


In reply to by Bhakti

व्वा सुरेखच ! 

हाच एक सुंदर लेख झालाय ! 

 

दुसऱ्या प्रवाहानुसार, भारताच्या मध्ययुगीन काळात परकीय संस्कृतींशी आलेल्या संबंधातून अरबी भाषेतील 'शमअ'  हा शब्द मराठीत आला, ज्याचा अर्थ 'दिवा' किंवा 'मेणबत्ती' असा होतो आणि याच शब्दावरून पुढे 'समई' हा शब्द रूढ झाला. 

 

रोचक आणी पट्ण्यासारखी माहिती.... 

म्हणजे 'संदीपिका / समदीपिका'  पासून समई पेक्षा 

शमअ - शमई - समई .... हे पट्ण्याजोगे आहे. 


In reply to by श्वेता२४

लेख मालिका होणार होती, त्यामुळे नाही सुचले. पण हा वेळ तर दिवाळी जवळ येतेय हा निवडला गेला म्हणजे सुचला 😊

दोघांना 🙏


लेख व चर्चा वाचत आहे. 

 

पितळेचे दिवे, उंच समया मलाही आवडतात.‌ काही आहेत, काही घ्यायच्या नियोजनात आहेत! 

नाचिआरकोईल (Nagercoil) च्या समयांचा उल्लेख विशेष. त्या भागात गेल्यावर नक्कीच खरेदी करण्याचा प्रयत्न करीन. 

Glow of Hope पाहून, हे चित्र राजा रवी वर्मांनी काढलेलं आहे असं वाटलं.


लेख आवडला. त्यातील चित्रे,फोटो सुद्धा आवडले.  काही शब्दांचे अर्थ नव्याने उलगडले.

 

ते नाते आशीर्वादांनी सदैव फुलत राहिले, बाळाच्या आयुष्यावर मंगल सावट धरून राहिले।

 

मी आजपर्यंत सावट या शब्दाचा नकारात्मकच वापर केलेला वाचला होता.

माझ्या मराठी वाचनावर आज या लेखाचं मंगल 

सावट पडलं.


In reply to by मारवा

हायला पायोनिअर म्हणावी का मग मी 😅😂
 
 
"मंगल सावट" हा शब्दप्रयोग कवयित्री भक्ती ****-****** यांच्या 'दिवे' या कवितेत आला आहे. या कवितेत आईच्या निरंजनाचे आणि आशीर्वादांचे एक पावन संरक्षण बाळाच्या पाठीशी सदैव राहते, या सकारात्मक अर्थाने हा सुंदर शब्दप्रयोग करण्यात आला आहे. [1, 2]

 

 

लामणदिवा हा मराठी संस्कृतीचा एक अमूल्य वारसा आहे. शब्दकोशात ‘लामणदिवा’ किंवा ‘लाम्हणदिवा’,'लांबणदिवा' या शब्दाचा अर्थ दोरी किंवा साखळीने टांगून ठेवता येणारा लोखंड, पितळ इत्यादी धातूचा दिवा असा दिला आहे. कोंकणी भाषेत त्याला मध्यभागी साखळी लावलेला पितळी कंदील असेही म्हटले जाते. मूळ शब्द ‘लांबण’ आणि ‘दिवा’ यांच्या संयोगातून आला असून संस्कृतमधील ‘लावण्यदीप’ या शब्दाशी त्याची तुलना केली जाते. हा दिवा फक्त प्रकाश देणारा साधन नसून शुभता, ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो.

 

 

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत राजमुद्रेमध्ये या लामण दिव्याला विशेष स्थान आहे. राजमुद्रेच्या मध्यभागी प्रकाशमान समई किंवा लामण दिवा दर्शवण्यात आला आहे. या दिव्याभोवती वर्तुळाकार सोळा कमळाची फुले कोरलेली आहेत. दिवा आणि कमळांच्या मध्ये संस्कृत भाषेतील ऐतिहासिक ब्रीदवाक्य कोरलेले आहे. “प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता महाराष्ट्रस्य राज्यस्य मुद्रा भद्राय राजते।” याचा अर्थ असा आहे की, ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र आपल्या कलेने वाढत जातो आणि संपूर्ण जगाकडून वंदिला जातो, तशीच महाराष्ट्र राज्याची ही मुद्रा लोकांच्या कल्याणासाठी शोभून दिसते. हे ब्रीदवाक्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ राजमुद्रेवरून घेतले असून त्यात राजाच्या नावाऐवजी ‘महाराष्ट्र राज्य’ असा बदल केला आहे. अशाप्रकारे लामण दिवा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक बनला आहे.

 

गोव्यातील पारंपरिक लग्नविधींमध्ये लामण दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘दिवा दाखवणे’ या विधीवेळी घरणीबाई ओव्या गातात. त्या ओव्यांमध्ये दिव्याच्या उत्पत्तीची कल्पनात्मक कहाणी सांगितली जाते !!

 

“तानलाडू भूकलाडू  

बांदले शेल्या पदरी  

चाल केली नगरी  

काय गिरजे तीरी  

गिरजे तिरीच्या बाजारा  

आम्हा लागली गराज  

काशा शिसयाची  

एक मणू कासा शिसा  

दोन मणू इंगळे  

गनिस देवाचे साळेक  

दिवा घडईला  

घडप्याने घडईला  

वतयानी वतयीला  

चितयांनी चितयीला  

दोन गे ताटीचो  

धाई गे वातीचो  

सोबत इनीयेचो  

दिवो घडईलो.”

 

ही लोककथा शास्त्रीय पुराणातील नसून गोव्यातील पारंपरिक कथा आहे. लग्न ठरलेल्या नवरदेवाला लामण दिवा हवा असतो. तो ‘तान लाडू-भूक लाडू’ची शिदोरी गाठीस बांधून पायी चालत निघतो. गिरिजा नदीच्या काठी असलेल्या नगरात पोहोचल्यावर त्याला काशा (पितळ), शीसा (शिसे) आणि इंगळे (कोळसा) मिळतात. नंतर हा दिवा गणेश देवाच्या शाळेत तयार होतो. घडप्याने त्याला आकार दिला जातो, वतायाने सुशोभित केला जातो आणि चिताने नक्षीकाम केले जाते. दोन ताटींचा व दहा वातींचा हा दिवा साखळीने जोडलेला असतो, जेणेकरून तो माटवात टांगता येईल.

 

दिवा तयार झाल्यानंतर तो लग्नासाठी लागणारे सामान गोळा करण्यासाठी विविध कारागिरांच्या घरी जातो. कुंभाराकडे मातीची भांडी, कासाराकडे चुडा, गावकऱ्याकडे पाटा-वल्ली-पंखे, तेलीयाकडे तेल, फुलकाराकडे फुले, विणकाराकडे साडा आणि सोनाराकडे वेढे व मणी घेतो. प्रत्येक घरात तो प्रकाश टाकतो आणि शेवटी स्वयंवराकडे येतो. माटवाच्या दारी येऊन सुंदर मंडप पाहून तो आनंदित होतो आणि संपूर्ण मंडप प्रकाशमान करतो.

या कथेचा प्रतीकात्मक अर्थ अत्यंत महत्त्वाचा आहे. दिवा प्रकाश, शुभता आणि मंगलकार्याचा आरंभ दर्शवतो. गणेश देवाची शाळा विघ्नहर्ता गणपतीचा आशीर्वाद दर्शवते. विविध कारागिरांचे घर समाजातील सर्व जाती-जमातींचा सहभाग आणि अठरा पगड जातींचा हातभार दाखवते. दिव्याचा प्रवास लग्नासाठी सर्व सामान एकत्र येणे आणि संपूर्ण समाजाचा आशीर्वाद मिळणे याचे प्रतीक आहे. ही कथा सांगून घरणीबाई लग्नाला शुभत्व आणि सामूहिक सहभागाचा संदेश देतात. ही लोककथा गावोगाव थोडीफार फरकाने सांगितली जाते, परंतु तिचा मूळ संदेश एकच राहतो.प्रकाशाने अंधार दूर होतो आणि समाज एकत्र येतो.

 

अशाप्रकारे लामणदिवा केवळ एक दिवा नसून महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही प्रदेशांच्या सांस्कृतिक जीवनातील एक जिवंत प्रतीक आहे. तो ज्ञानाचा प्रकाश, सामूहिक सहभाग आणि मंगलकार्याचा शुभारंभ दर्शवतो.

 

संदर्भसूची

१. महाराष्ट्र शासनाची अधिकृत राजमुद्रा - Wikipedia (Emblem of Maharashtra) आणि महाराष्ट्र शासन दस्तऐवज.

२. Molesworth Marathi and English Dictionary तसेच महाराष्ट्र शब्दकोश - लामणदिवा शब्द व्याख्या.

३. गोवा पारंपरिक लग्नविधी आणि ओव्या - Goan Varta व स्थानिक लोकपरंपरा.

४. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा - ऐतिहासिक संदर्भ आणि संस्कृत ब्रीदवाक्य. 

५.स्थानिक लोककथा व घरणीबाईंच्या ओव्या -गोव्यातील मौखिक परंपरा.


In reply to by Bhakti

खूप आवडला लेख, दिव्यांची नावे तर माहिती आहेत, पण त्यामागचा इतिहास, आणि जोडल्या गेलेल्या लोककथा नव्याने समजत आहेत. 


@Bhakti

 

आपली  सविस्तर माहिती देण्याची पद्धत उत्कृष्ट आहे.

अशीच माहितीची एक लेखमाला लिहून आम्हाला उपकृत करावे हि विनंती.  

त्यामुळे आपल्या संस्कृतीतील अनेक माहिती नसलेल्या गोष्टी समजण्यास मदत होईल.  


नंदादीप 

‘नंदादीप’ या शब्दातील ‘नंदा’ हा भाग मूळ संस्कृत शब्द ‘नंद’  पासून आला आहे. या शब्दाचा मुख्य अर्थ आनंद, समृद्धी किंवा मंगल असा होतो. हा शब्द वापरण्यामागे तीन प्रमुख कारणे आणि अर्थ आहेत.

पहिला अर्थ ‘आनंद देणारा’ असा आहे. काही भाषातज्ज्ञांच्या मते ‘नंदादीप’ हा शब्द ‘आनंद’ आणि ‘दीप’ या दोन शब्दांच्या संधीतून तयार झाला आहे. म्हणजेच जो दिवा घरात किंवा मंदिरात लावल्याने मनाला आणि वातावरणाला आनंद व शांतता मिळते, तो नंदादीप.

दुसरा अर्थ ‘सतत नांदणारा’ किंवा ‘अखंड जळणारा’ असा आहे. मराठी संस्कृतीत ‘नांदणे’,वसती करणे किंवा सुख-समृद्धीने राहणे या क्रियापदाशी हा शब्द जोडला जातो. जो दिवा कधीही विझत नाही आणि जो अहोरात्र नांदत,तेवत राहतो, त्याला नंदादीप किंवा अखंड दीप म्हटले जाते.

तिसरा अर्थ धार्मिक व ज्योतिषशास्त्रीय महत्त्वाशी संबंधित आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हिंदू पंचांगात शुक्ल व कृष्ण पक्षातील प्रतिपदा (पहिली तिथी), षष्ठी (सहावी तिथी) आणि एकादशी (अकरावी तिथी) या तिथींना ‘नंदा तिथी’ म्हटले जाते. या तिथी अत्यंत शुभ आणि आनंद देणाऱ्या मानल्या जातात.

नंदादीप सतत आणि अखंड जळत राहण्यामागे शास्त्रीय तत्त्वे (केशाकर्षण क्रिया)-capillary action आणि योग्य व्यवस्थापनाचे तंत्र असते. पूर्वीच्या काळी मंदिरात व राजवाड्यात दिवे न विझता अनेक वर्षे जळत राहण्यासाठी विशिष्ट पद्धती वापरल्या जात. अखंड दीप तेवत ठेवण्यासाठी खालील बाबी महत्त्वाच्या असतात.

तेलाचा किंवा तुपाचा सतत पुरवठा आवश्यक असतो. साध्या दिव्यात तेल संपले की दिवा विझतो. अखंड दिव्यासाठी ‘घट दिवा’ किंवा उलटा तांब्या/चंबू गुरुत्वाकर्षण-आधारित दिवा वापरला जातो. यात दिव्याच्या वर एक उलटा धातूचा किंवा काचेचा कलश असतो. त्यात तेल भरलेले असते आणि त्याचे तोंड दिव्याच्या खालच्या वाटीत बुडवलेले असते. वाटीतील तेल संपत जाईल तसे हवेच्या दाबाच्या नियमामुळे वरच्या पात्रातून तेल आपोआप खाली येते. त्यामुळे वाटीतील तेलाची पातळी नेहमी कायम राहते.

वातीची विशेष रचनाही महत्त्वाची असते. अखंड दिव्यासाठी जाड व घट्ट विणलेली कापसाची वात वापरली जाते. कापसाच्या वातीतील सूक्ष्म धाग्यांमुळे केशाकर्षण क्रियेद्वारे तेल सतत वर खेचले जाते. वात लवकर जळून खाक होऊ नये म्हणून ती जाड ठेवली जाते. काही वेळा दिव्याच्या मागच्या बाजूने मोठी वात हळूहळू पुढे सरकवण्याची सोय असते.

हवेच्या झोतामुळे किंवा वाऱ्यामुळे ज्योत विझू नये म्हणून दिव्याभोवती काचेचे कंदील किंवा चिमणी बसवली जाते. या काचेला वर आणि खाली छिद्रे असतात, ज्यामुळे ज्योतीला जळण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन सतत मिळत राहतो आणि हवा आत-बाहेर खेळती राहते.

दिवा सतत जळत राहिल्यामुळे वातीच्या टोकावर काजळी (कार्बन) जमा होते. याला मराठीत ‘गुल’ पडणे म्हणतात. जर हा गुल साफ केला नाही तर प्रकाश मंद होतो आणि दिवा विझू शकतो. अखंड दिव्याची काळजी घेणारी व्यक्ती छोट्या चिमट्याने किंवा सुईने ज्योत न विझवता वातीचे जळालेले टोक हळूच बाजूला करते किंवा वात थोडी पुढे सरकवते. या प्रक्रियेला ‘दिवा उजळणे’ म्हणतात.

अखंड दिव्यासाठी शुद्ध गाईचे तूप किंवा तीळाचे तेल सर्वोत्तम मानले जाते. तीळाचे तेल संथ आणि दीर्घकाळ जळते, तसेच त्यामुळे काजळी कमी प्रमाणात तयार होते. या सर्व घटकांमुळे आणि रोजच्या देखभालीमुळे नंदादीप न विझता महिने किंवा अनेक वर्षे अखंड जळत राहू शकतो.

१९६२ मधील प्रसिद्ध मराठी चित्रपट ‘नंदादीप’ मधील एक अत्यंत लोकप्रिय आणि भावपूर्ण गीत आहे. हे गाणे सुप्रसिद्ध लेखिका व गीतकार हिराकांत कलगुटकर यांनी लिहिले असून, संगीत दत्ता डावजेकर यांनी दिले आहे आणि आशा भोसले यांनी गायले आहे. गाण्याचे संपूर्ण शब्द खालीलप्रमाणे आहेत:

नंदादीप हा लाविते श्रीहरी  

जीवनातील कण कण उजळो, आस ही अंतरी  

तुझ्या चरणाची सेवा घडावी, हीच एक मनी आस उरावी  

तुझ्या दर्शने शांत व्हावी, मनीची ही काहिली  

नंदादीप हा लाविते श्रीहरी...  

चंदनापरी देह झिजावा, पुष्प होउनी सुगंध द्यावा  

भाग्य कोणते दुजे याहुनी, सांग ना श्रीहरी  

नंदादीप हा लाविते श्रीहरी...  

सुख-दुःखाच्या लाटा येती, जीवननौका डळमळू पाही  

तूच आमुचा पाठीराखा, तूच आमुचा कैवारी  

नंदादीप हा लाविते श्रीहरी...  

नंदादीप हा लाविते श्रीहरी  

जीवनातील कण कण उजळो, आस ही अंतरी  

हे गाणे भक्ती आणि आत्मसमर्पणाचे एक सुंदर प्रतीक मानले जाते. त्यात स्वतःचे जीवन देवाच्या चरणी आणि समाजाच्या सेवेसाठी चंदनासारखे झिजवण्याची भावना व्यक्त केली आहे.

 

…

संदर्भसूची

1. श्रीकेतन कुलकर्णी गुरुजी – नंदादीप, वात आणि समईविषयी माहिती (फेसबुक पोस्ट).

2. बिहाइंड द नेम – ‘नंदा’ शब्दाचा अर्थ.

3. एज्युकेलिंगो आणि ट्रान्सलिटरल – नंदादीप शब्दाचा अर्थ व शब्दकोशीय नोंदी.

4. मायमराठी – नंदादीपविषयी माहितीपूर्ण लेख.

5. अखंडदीप – अखंड दिव्याची रचना, पितळ व काचेची चिमणी आणि इंधनपुरवठ्याची व्यवस्था

6. यूट्यूब – Akhand Nandadeep – Ghee Lamp (तुपाच्या अखंड नंदादीपाची माहिती). [व्हिडिओ पाहा](https://youtu.be/axMjnsmXpBY?si=T5NJt_dWanC6uIa\&utm_).

7. यूट्यूब – ‘नंदादीप हा लाविते श्रीहरी’ हे भक्तिगीत

 


In reply to by Bhakti

किती सुंदर साधं सोपं सहज लिहिलंय तुम्ही, Bhakti!

आमच्याकडे देवघरात अखंड दीप असतो. आठवडा-पंधरवड्यातून एखादे वेळी तो दिवा स्वच्छ करण्यासाठी शांत होतो.  त्यावेळी आम्ही दुसरा दिवा लावतो. 


In reply to by कांदा लिंबू

तुमच्याकडे असाच नंदादीप आहे का?मी असा नंदादीप नाही पाहिला अजुन...


In reply to by Bhakti

आमच्याकडे असा नंदादीप नाही. पण हा पाहून अगदी टेम्पटिंग वाटतोय!

आम्ही मधोमध वात लावतात त्या पितळी निरांजनात अखंडदीप लावतो. पूजा करताना तुपाचा दिवा चांदीच्या निरंजनीत लावतो. काही प्रसंगी इतर समया, दिवे वगैरे वापरतो.


माझी आईच्या बोलण्यात काही वेळा दिवलानं / दिवलाणं अशा शब्द येतो. 


In reply to by Bhakti

नंदादीप कार्यरत राहण्यामागचे शास्त्रीय विश्लेषण आवडले आणि दीपाच्या माहितीसोबत एखादी कविता, गाणे, चित्र-छायाचित्र देण्याच्या पॅटर्नमुळे सर्व लेख वाचनीय झाले आहेत. जमल्यास वेगवेगळे धागे टाकून अनुक्रमणिका करता आली तर छान लेखमाला होईल.


‘पंचारती’ हा शब्द संस्कृत व प्राकृत भाषेतून आला आहे. यात द्विगु समास आहे. पंच म्हणजे पाच आणि आरती हा शब्द संस्कृत ‘आरात्रिक’ पासून आलेला असून त्याचा अर्थ रात्रीचा अंधार दूर करणे किंवा देवाप्रती पूर्ण भक्ती व निष्ठा व्यक्त करणे असा होतो. त्यामुळे पंचारती म्हणजे पाच दिव्यांचा किंवा पाच वातींचा समूह एकत्र करून देवाला ओवाळणे. हिंदू तत्त्वज्ञानानुसार पाच या संख्येला विशेष महत्त्व आहे, कारण ती सृष्टीच्या पंचमहाभूतांचे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे प्रतिनिधित्व करते. या पाचही तत्त्वांना देवाचरणी समर्पित करणे, हा यामागचा मुख्य आध्यात्मिक हेतू आहे.पंचारती दिवा सामान्यतः पितळ किंवा चांदी या धातूंचा बनवलेला असतो. काही उच्च दर्जाचे दिवे शुद्ध चांदीचेही असतात. दिव्याच्या पुढच्या भागात पाच छोट्या वाट्या किंवा पाकळ्यांसारख्या खाचा ओळीने किंवा अर्धवर्तुळाकार जोडलेल्या असतात. यात तेल किंवा तूप भरून कापसाच्या पाच स्वतंत्र वाती लावल्या जातात. अनेक पारंपरिक पंचारती दिव्यांच्या मध्यभागी कापूर पेटवण्यासाठी एक सपाट किंवा थोडी उंच जागा असते. हातात धरून ओवाळता यावे म्हणून पाठीमागे एक लांब, जाड दांडा असतो. यावर मोर, गरुड, हत्ती, सिंह किंवा नागाची नक्षी कोरलेली असते. दिवा खाली ठेवताना तो कलंडू नये किंवा तेल सांडू नये म्हणून खाली जड आणि मजबूत बैठक असते. जेव्हा सर्व पाच वाती पेटवल्या जातात, तेव्हा दिव्यातून निघणारा प्रकाश देवाचा चेहरा तेजस्वीपणे उजळवतो आणि संपूर्ण वातावरण दिव्य वाटू लागते.पाच ज्योती पंचमहाभूतांचे प्रतीक आहेत. आरती करताना आपण संपूर्ण सृष्टीच देवाच्या चरणी अर्पण करतो, असा भाव असतो. प्रकाश म्हणजे ज्ञान आणि अंधार म्हणजे अज्ञान. पंचारतीने अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो, अशी मान्यता आहे. तूप किंवा तेल अहंकार आणि वासनांचे, वात मनाचे आणि ज्योत आत्मा किंवा भगवंताच्या चैतन्याचे प्रतीक मानले जाते. ज्योत जसजशी वर जात राहते, तसेच साधकाचे मनही ऊर्ध्वगामी व्हावे, असा संकेत आहे. कापूर पूर्णपणे जळून जातो आणि काही उरत नाही. हे पूर्ण समर्पणाचे आणि अहंकाराचा नाश होण्याचे प्रतीक आहे.पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर मुख्य आरती सुरू होते तेव्हा इतर दिवे विझवून केवळ पंचारती दिवा पेटवला जातो. आरती ओवाळताना दिवा घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने म्हणजे उजवीकडून डावीकडे फिरवावा. प्रथम देवाच्या चरणांजवळ चार वेळा, नंतर नाभीपाशी दोन वेळा, नंतर मुखापाशी एक वेळा आणि शेवटी संपूर्ण मूर्तीभोवती सात वेळा गोलाकार ओवाळावे. एकूण सुमारे चौदा वेळा ओवाळणे शुभ मानले जाते. देवाच्या डोक्यावरून थेट ओवाळू नये. अनाहत चक्र ते आज्ञा चक्रापर्यंत ओवाळावे. आरतीनंतर कापूर-आरती करून ज्योतीचा प्रकाश हाताच्या तळव्यावर घेऊन डोळ्यांना आणि डोक्याला लावला जातो.एकारती म्हणजे एकच वात असलेला दिवा जो नित्य पूजेसाठी वापरला जातो, सप्तारती म्हणजे सात वातींचा दिवा जो विशेष पूजा, नवरात्र किंवा मोठ्या उत्सवांसाठी वापरला जातो, तर पंचारती पाच वातींचा असून तो सर्वात अधिक प्रचलित आणि पंचमहाभूत पूजेसाठी आदर्श मानला जातो. पंचारती दिवा केवळ एक प्रकाशयंत्र नाही, तर भक्ती, ज्ञान, समर्पण आणि सृष्टीच्या मूलतत्त्वांचे साक्षात प्रतीक आहे. मंदिरातील आरतीच्या वेळी किंवा घरातील सायंकाळच्या आरतीत जेव्हा पाच ज्योती एकत्र पेटतात, तेव्हा वातावरणात एक विलक्षण दिव्यता आणि शांती निर्माण होते.

 

 

पंचारती

मराठीच्या महाराष्ट्रा

आज स्वागत स्वागत

सह्याद्रीच्या कड्यावरी

वाजे वाऱ्याची नौबत !

 

काळ-कवाड फोडून

आल्या आल्या साऱ्याजणी,

महाराष्ट्राच्या स्वागता

आज मानाच्या धनिणी !

 

शकुनाचा हाती दीप

महदंबा आधी येई,

रचे दीपांची आरास

घवळिल्या दिशा दाही !

 

नामयाच्या जनाईने

केले सडासंमार्जन,

हात अबीर-मंजिरी

गंधे भारिले गगन !

 

केली जळक्या काडीची

लक्ष्मीबाईने लेखण,

चित्रे रेखिली स्वागता

रंग प्राणाचे भरून !

 

अहिराणी बहिणाबाई

आणि तव्याची भाकर

ओवाळून टाकायाला

उभी राहिली तत्पर !

 

देवी अहिलेच्या हाती

पुण्यतीर्थाचा कलश,

नेत्र कराया पवित्र

उभी राहिली सहर्ष !

 

ओवाळाया महाराष्ट्रा

आज जिजाईच्या हाती,

कोटी सूर्याच्या तेजाने

उचंबळे पंचारती !

 

— इंदिरा नारायण संत

पंचारती’ ही इंदिरा संत यांची एक ओजस्वी, भावपूर्ण आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत भरलेली कविता आहे. या कवितेत कवयित्रीने महाराष्ट्राच्या भूमीला पावन करणाऱ्या पाच महान स्त्रियांचे स्मरण करून त्यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला पंचारतीने ओवाळले आहे. पंचारती हा शब्द येथे केवळ दिव्याचा प्रकार नसून, पाच महान नारीशक्तींच्या रूपाने महाराष्ट्राला अर्पण केलेल्या भक्ती, श्रद्धा आणि तेजाचे प्रतीक बनला आहे.कवितेच्या पहिल्या चरणात नामदेवांच्या आई जनाई यांचे वर्णन आहे. जनाईने सडासंमार्जन करून, हातात अबीर-मंजिरी घेऊन गगन गंधाने भरून टाकले. येथे सामान्य गृहिणीच्या रूपात असलेली जनाई ही शुद्धतेची आणि भक्तीची प्रतिमा आहे. तिच्या हातांनी केलेले साधे कामही दिव्य बनते.दुसऱ्या चरणात लक्ष्मीबाई टिळक यांचे चित्रण आहे. त्यांनी जळक्या काडीची लेखणी बनवून प्राणांच्या रंगाने लक्ष्मी चित्रे रेखिली.तिसऱ्या चरणात बहिणाबाई यांच्या रूपाने सामान्य श्रमिक स्त्रीचे दर्शन घडते. अहिरणी बहिणाबाई भाकर घेऊन टाक्यावाल्याला श्रमिकालाओवाळण्यासाठी उभी राहिली. येथे कवयित्रीने श्रमाची, माणुसकीची आणि साध्या जीवनातील महानतेची कल्पना मांडली आहे.चौथ्या चरणात अहिल्यादेवी होळकर यांचे वर्णन आहे. त्यांच्या हाती पुण्यतीर्थांचा कलश आहे आणि त्या नेत्र पवित्र करण्यासाठी उभ्या आहेत. अहिल्यादेवी या दानशूर, धर्मपरायण आणि लोककल्याणकारी राणी होत्या. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला पवित्रतेचे आणि दानशूरतेचे वरदान मिळाले आहे.शेवटच्या चरणात जिजाबाई यांचे दर्शन घडते. महाराष्ट्राला ओवाळण्यासाठी आज जिजाईंच्या हाती पंचारती आहे आणि कोट्यवधी सूर्यांच्या तेजाने ती उजळली आहे. जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता होत्या. त्यांनी स्वराज्याचे बीज पेरले. त्यांच्या हाती असलेली पंचारती म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे आणि तेजाचे प्रतीक आहे.या कवितेत ‘पंचारती’ हा शब्द अत्यंत प्रभावी प्रतीक म्हणून वापरला आहे. पाच महान स्त्रिया म्हणजे पाच ज्योती.

 

 

 

 


कदाचित अवांतर: दिवा, आरती इत्यादींमध्ये एकाहून अधिक वाती लावण्याची कारणपरंपरा काय असावी? 

सुरुवातीला दिव्यात एकच वात असावी. ‌कालांतराने, एक वातीचा दिवा शांत होण्याच्या घटनांमुळे कदाचित backup म्हणून अजून एक वात असा दोन वातींचा दिवा standard मानला गेला असावा. ‌

माणूस ईश्वर भक्ती करतो, पूजा अर्चना, कर्मकांड, व्रतवैकल्य इत्यादी करतो, आपापल्या परीने आराधना करण्याचा प्रयत्न करतो. ‌ 

माणसाचे षडरिपू कर्मकांडांतही दृग्गोचर होत असतील का? 

विशेषतः देवाजवळ दिवा लावताना, आरती करताना वगैरे, "तुमच्याकडे दोनच वातींची आरती असते, आम्ही मात्र पाच वातींची आरती करतो", "राहू देत, आम्ही दर शुक्रवारी अकरा वातींची आरती करतो", "तुम्हीही राहू देत, आम्ही दर सोमवारी एकवीस वातींची आरती करतो, आणि पौर्णिमेला तर प्रत्येकी एकवीस वातींची पंचारती असते म्हटलं" असं काहीसं झालं असेल का? 


दिवटी, बुधली आणि टवळी 

 

खंडोबा आणि तुळजाभवानी सारख्या कुलदैवतांच्या पूजेत ‘दिवटी-बुधली’ या जोडीला एकाच नाण्याच्या दोन बाजूंसारखे पवित्र स्थान आहे. एका हातात जळती दिवटी -पोत आणि दुसऱ्या हातात तोटी असलेले तेलपात्र म्हणजेच 'बुधली' धरून देवाचे जागरण-गोंधळ किंवा आरती केली जाते.

 

• दिवटी (ज्ञानी ज्योत): दिवटी हा धातूपासून प्रामुख्याने पितळ किंवा तांबे बनवलेला एक पारंपरिक दिवा आहे, ज्याला पकडण्यासाठी खाली एक लांब दांडा (हँडल) असतो. याच्या वरच्या भागात तेल भरण्यासाठी आणि कापसाची जाड वात ज्याला 'पोत' म्हणतात ठेवण्यासाठी खोल वाटीसारखा आकार असतो. देव्हाऱ्यात देवाचे जागरण-गोंधळ करताना किंवा आरती करताना दिवटी पेटवून ती हातात धरली जाते.दिवती' म्हणजे लहान दिवा किंवा मशाल.

• बुधली (समर्पणाचे तेलपात्र): जुन्या काळी मशालीसोबत तेल वाहून नेण्यासाठी चामड्याची -कातड्याची बुधली वापरली जाई. मात्र, देवकार्यासाठी पितळेची बुधली वापरतात. ही तांब्यासारखी गोल असून तिला एक लांब, अरुंद नळी -तोटी जोडलेली असते. दिवटी अखंड जळत राहण्यासाठी या बुधलीतून अचूक धार धरून तेल ओतले जाते.

 

भाषेच्या जुन्या शब्दकोशांचा धांडोळा घेतला, तर 'दिवटी' या शब्दाची मुळे थेट जागतिक इतिहासाशी जोडलेली दिसतात.

 ऐतिहासिक 'मोल्सवर्थ मराठी अँड इंग्लिश डिक्शनरी' नुसार, 'दिवटी' या शब्दाचा मूळ उगम (हिब्रू) भाषेशी संबंधित असून, त्याचा अर्थ 'एका काठीभोवती तेल लावलेल्या कापडाचे वेढे असलेली मशाल' असा होतो. मोल्सवर्थनुसार याचा दुसरा एक अतिशय प्राचीन प्रकार म्हणजे, 'एका काठीच्या टोकाला नारळाच्या अर्ध्या कवचात -कवटीत तेल आणि वातीसाठी कापडाचे तुकडे ठेवून बनवलेला दिवा'. तसेच 'आर्यभूषण स्कूल डिक्शनरी' मध्येही दिवटीचा सरळ अर्थ 'मशाल किंवा एक प्रकारचा दिवा' असा दिला आहे.

महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही या दिव्याला पवित्र स्थान आहे. कन्नड-इंग्रजी शब्दकोशात 'दिवटी' किंवा 'दीवती' चा अर्थ 'लाकडाचा एक लांब, जाड तुकडा, ज्याच्या एका टोकाला कापडाचे लांब तुकडे गुंडाळलेले असतात आणि जो ज्वलनशील तेलात बुडवून धार्मिक प्रसंगी व प्रवासात पोर्टेबल दिवा म्हणून पेटवला जातो' असा आढळतो.

जुन्या ऐतिहासिक पत्रांमध्ये आणि दस्तऐवजांमध्ये ‘दिवटी-बुधलीची जहागीर’ (संदर्भ: 'दिवटी बुदलीची जहागीर ) असा उल्लेख येतो. याचा अर्थ राजांच्या किंवा सरदारांच्या दरबारात वा स्वारीमध्ये मशाली/दिवटी सांभाळणाऱ्या आणि तेल पुरवणाऱ्या सेवकांना दिलेली हक्काची जहागिरी किंवा मान असा असायचा.

 

संत एकनाथ महाराजांनी आपल्या प्रसिद्ध 'मुरळी' भारुडात मानवी मनाला उपदेश करताना या जोडीचा सुंदर वापर केला आहे.

"इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी ।"

"बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥"

एकनाथ महाराज म्हणतात की, मनातील वासनांचा अंधार दूर करायचा असेल तर अंतःकरणात 'ज्ञानाची दिवटी' पेटवा आणि ती अखंड जळत राहण्यासाठी सद्गुरूंच्या 'बोधाची, उपदेशाची बुधली' वापरून त्यात विवेकाचे तेल ओतत राहा.

 

बुधली उताणी पडणे' आणि 'दिवटा'-म्हणींचा इतिहास

•या दिव्यांच्या वैशिष्ट्यांवरून मराठी भाषेत अनेक मजेशीर म्हणी रूढ झाल्या. शब्दकोशातील पहिल्या अर्थानुसार, जुन्या काळात अत्तर किंवा महागडे सुगंधी तेल चामड्याच्या कातड्याच्या लहान बुधलीत सुरक्षित ठेवले जाई. एका जुन्या लोककथेनुसार, एका तेल चोराची बुधली जेव्हा जमिनीवर 'उताणी पडली' -उलटी झाली, तेव्हा त्याचे सगळे चोरलेले तेल सांडले आणि त्याचे कपट उघड झाले. यावरून, जेव्हा एखाद्या कपटी किंवा लबाड माणसाचे कारनामे सर्वांसमोर उघडे पडतात आणि त्याचे बंड फुटते, तेव्हा "त्याची बुधली उताणी पडली" किंवा "बुधली भोवता येणे" अशी म्हण वापरली जाते.

 

• वंशाचा दिवा की दिवटा? घरात स्थिर राहणाऱ्या 'दिवटी'वरून पुरुषवाचक 'दिवटा' शब्द आला. घराण्याला प्रकाश देणाऱ्या मुलाला आपण 'वंशाचा दिवा' म्हणतो, पण तोच मुलगा जेव्हा आडदांड निघतो आणि कामधंदा करत नाही, तेव्हा त्याला उपरोधाने 'दिवटा' म्हटले जाते.

 'टवळी'

आजच्या काळात 'टवळी' किंवा 'टवळा' या शब्दांचा वापर शिवी किंवा हिणवण्यासाठी केला जातो, परंतु हा अतिशय मोठा भाषिक गैरसमज आहे. मुळात टवळा आणि टवळी हे शिवी नसून प्रकाशासाठी वापरले जाणारे दिव्याचे प्रकार आहेत.

समई किंवा दिव्याच्या ज्या खोलगट तबकडीत तेल आणि वात घातली जाते, त्या मुख्य भागाला 'टवळी' म्हणतात. देवघरातील दिवटी ही एका जागी स्थिर असते, तर 'टवळी' हा दिवा हव्या त्या ठिकाणी उजेडासाठी फिरवता येत असे.समईचा वरचा भाग असाच असतो.रात्रीच्या वेळी घरात, दारात, गोठ्यात किंवा पडवीत काम करताना ही टवळी हाताने धरून सर्वत्र फिरवली जायची.

भाषिक रूपक "गावभर फिरणारी टवळी " टवळीच्या याच 'सर्वत्र फिरण्याच्या' गुणधर्मावरून, ग्रामीण भागात घरात एका जागी स्थिर न राहता सतत गल्लीबोळात हिंडणाऱ्या किंवा चपळाईने वावरणाऱ्या मुलगी/स्त्रीला लाक्षणिक अर्थाने 'टवळी' म्हटले जाऊ लागले.

•आला टवळ्याला वात लावून'-टवळीप्रमाणेच 'टवळा' हा गावातील प्रकाशासाठी वापरला जाणारा एक मोठा, वेटोळ्याचा दिवा असायचा. याची वात खूप मोठी असल्याने ती पेटवायला आणि उजेड पडायला खूप वेळ लागायचा. यावरूनच, एखादी व्यक्ती खूप रात्री उशिरा घरी आली की घरातली जुनी माणसे उपरोधाने म्हणायची, "आला मोठा टवळ्याला वात लावून!"

 आज जरी आपण विजेच्या युगात जगत असलो, तरी ‘दिवटी, बुधली आणि टवळी’ या शब्दांच्या मागे अंधार नष्ट करून प्रकाश पसरवण्याचा एक समृद्ध इतिहास आणि भाषिक वारसा दडलेला आहे. हे शब्द शिवी नसून आपल्या सांस्कृतिक पाऊलखुणांचे देदिप्यमान दिवे आहेत.

फुलवितो दिवटी दीपकळी

आम्ही अंबेचे गोंधळी !

उधे ग अंबे उधे !

उधे ग अंबे उधे !


दीपावली आणि पणती 

“कार्तिक महिन्याचा पहिला दिवस, म्हणजे अमावास्या, जेव्हा सूर्य तुळ राशीत प्रवेश करतो, त्याला दिबाली म्हणतात.

 

त्या दिवशी लोक आंघोळ करतात, उत्सवी वस्त्रे घालतात, एकमेकांना पान-सुपारी देतात; ते मंदिरांना जातात, दान देतात आणि दुपारपर्यंत आनंदाने खेळतात-गातात.

 

रात्री ते सर्वत्र मोठ्या प्रमाणात दिवे लावतात, इतके की हवा पूर्णपणे प्रकाशमान होते.

 

या सणाचे कारण असे आहे की वासुदेवाची पत्नी लक्ष्मी या दिवशी वर्षातून एकदा बलीला (विरोचनाचा पुत्र) सातव्या पृथ्वीतून मुक्त करते. म्हणून या सणाला बलिराज्य असेही म्हणतात.”

 

हे वर्णन सुमारे १०३० सालाचे आहे. अल-बिरूनीने ते उत्तर भारतात पाहिलेल्या/ऐकलेल्या प्रथेवरून लिहिले आहे.

अल-बिरूनी हे ११व्या शतकातील महान पर्शियन विद्वान, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि इतिहासकार होते. त्यांनी सुमारे १०३० साली “तहकीक मा लि-ल-हिंद” हा ग्रंथ लिहिला. याला इंग्रजीत Alberuni’s India म्हणतात.या ग्रंथाचा प्रसिद्ध इंग्रजी अनुवाद Edward C. Sachau यांनी केला (१८८८/१९१०). हा अनुवाद दोन खंडांत उपलब्ध आहे आणि आजही मानक मानला जातो.या ग्रंथात अल-बिरूनी यांनी भारतातील धर्म, तत्त्वज्ञान, साहित्य, भूगोल, खगोलशास्त्र, रीतिरिवाज, कायदे आणि सण-उत्सवांचे सविस्तर वर्णन केले आहे. त्यांनी संस्कृत शिकून थेट ब्राह्मण पंडितांकडून माहिती घेतली आणि शक्य तितके वस्तुनिष्ठ राहण्याचा प्रयत्न केला.

 

दिवाळी हा प्रकाश, समृद्धी, नूतनीकरण आणि सांस्कृतिक स्मृतींचा सण आहे. 

या विषयावर सर्वात महत्त्वाचे संशोधन परशुराम कृष्ण गोडे (P.K. Gode) यांनी केले. १९४५ मध्ये त्यांनी *Annals of the Bhandarkar Oriental Research Institute* मध्ये “Studies in the History of Hindu Festivals—Some Notes on the History of Divālī Festival” हा विस्तृत शोधनिबंध प्रकाशित केला. नंतर तो Studies in Indian Cultural History या ग्रंथातही समाविष्ट करण्यात आला. गोडे यांनी उपलब्ध सर्व लिखित पुराव्यांची कालगणना करून दिवाळीची उत्क्रांती दाखवली.

 

गोडे यांनी सर्वात जुना उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्रात सापडलेल्या “यक्षरात्रि” या उत्सवाचा मानला. यक्षरात्रि म्हणजे यक्षांची रात्र. यक्ष हे कुबेराचे सेवक मानले जातात आणि संपत्तीशी संबंधित आहेत. या रात्री फासे खेळणे, आनंदोत्सव करणे आणि दिवे लावणे यांचा समावेश होता. नंतर ११व्या-१२व्या शतकातील जैन विद्वान हेमचंद्र यांनी आपल्या देशीनाममाला मध्ये यक्षरात्रि म्हणजेच दीपावली किंवा दीपमालिका असे स्पष्ट समीकरण केले. गोडे यांनी या नंतरच्या व्याख्यांवर आधारित यक्षरात्रि हा दिवाळीचा एक महत्त्वाचा पूर्वज असल्याचे सिद्ध केले.

 

सातव्या शतकात हर्षवर्धनाच्या नागानंद नाटकात “दीपप्रतिपदुत्सव” चा स्पष्ट उल्लेख येतो. त्यात दिवे लावणे आणि नवविवाहित जोडप्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा सांगितली आहे. नीलमत पुराणात (काश्मीर) “सुखसुप्तिका” किंवा “दीपमाला” म्हणून या सणाचे वर्णन आहे. आदित्य पुराण, पद्मपुराण, भविष्योत्तर पुराण, स्कंदपुराण, कालिकापुराण आणि ब्रह्मवैवर्त पुराणातही दीपोत्सव, लक्ष्मीपूजा, यमपूजा आणि शिव-पार्वतीचा फासे खेळण्याचा प्रसंग आढळतो. नवव्या शतकातील राजशेखराच्या काव्यमीमांसा मध्ये “दीपमालिका” म्हणून घरे स्वच्छ करणे आणि दिवे लावणे यांचा उल्लेख आहे.

 

शिलालेखीय पुराव्यांमध्ये १११९ सालाचा कन्नड शिलालेख महत्त्वाचा आहे. पश्चिम चालुक्य राजा त्रिभुवनमल्ल विक्रमादित्य सहाव्याच्या काळात दीपावळी सणानिमित्त मंदिरास देणगी दिल्याचा उल्लेख त्यात आहे. 

जैन धर्मात दीपावलीला फार वेगळे आणि खोल आध्यात्मिक महत्त्व आहे. जैन परंपरेनुसार, कार्तिक महिन्याच्या अमावास्येला भगवान महावीर (२४वे तीर्थंकर) यांनी बिहारमधील पावापुरी येथे निर्वाण प्राप्त केले. ज्ञानाचा प्रकाश निघून गेल्यामुळे त्या रात्री राजे आणि लोकांनी दिवे लावले, आणि त्यामुळे या सणाला “दीपालिका” किंवा दीपावली असे नाव पडले. जैन ग्रंथात, विशेषतः आचार्य जिनसेनांनी लिहिलेल्या हरिवंश पुराण मध्ये या घटनेचा उल्लेख सापडतो. दुसऱ्या दिवशी, म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला, महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम स्वामी यांना केवलज्ञान प्राप्त झाले, आणि तो दिवस जैन नववर्ष म्हणून साजरा केला जातो. अशा प्रकारे जैन धर्मात दीपावली हा केवळ प्रकाशाचा सण नसून ज्ञानाचा, निर्वाणाचा आणि नूतनीकरणाचा दिवस मानला जातो.

 

गोडे यांनी या सर्व पुराव्यांना एकत्र करून दाखवले की दिवाळी हा एकाच कथेचा सण नसून अनेक सांस्कृतिक स्तरांचा संगम आहे. तो ऋतुबदलाचा, खरीप पिकाच्या कापणीचा, नवीन वर्षाच्या प्रारंभाचा आणि प्रकाशाच्या विजयाचा सण आहे. पणती या छोट्या मातीच्या दिव्यातूनच हा सगळा प्रकाश फुलतो. हडप्पा काळापासून चालत आलेली ही पणती आजही दिवाळीच्या रात्री घरोघरी पेटते आणि आपल्याला आपल्या पूर्वजांशी जोडते.

 

दिवाळी सणाच्या केंद्रस्थानी असते ती छोटीशी मातीची पणती. पणती म्हणजे फक्त दिवा नाही; ती हजारो वर्षांच्या मानव संस्कृतीची साक्ष आहे. मराठीत “पणती” हा शब्द आजही घरोघरी रुळलेला आहे. या शब्दाचा उगम कसा झाला, तिचा आकार कसा विकसित झाला आणि दीपावलीशी तिचा संबंध कसा जुळला, हे सगळे एकत्र पाहिले तर दिवाळीचे खरे रूप समोर येते.

 

“पणती” हा शब्द मूळतः दक्षिण भारतीय भाषांशी संबंधित आहे. जुने कन्नड “हणटे” आणि तमिल-मल्याळममधील “पंतम” किंवा “पंताम्” या शब्दांपासून तो आला असावा. मराठीत तो “पणती” किंवा “पंती” म्हणून रूढ झाला. मोलस्वर्थच्या मराठी-इंग्रजी शब्दकोशात आणि दाते यांच्या महाराष्ट्र शब्दकोशातही या शब्दाचा उल्लेख सापडतो. मूलतः हा शब्द मातीच्या त्या छोट्या पात्रासाठी वापरला जात असे, ज्यात तेल ओतून वात ठेवून प्रकाश निर्माण केला जात असे. आजही महाराष्ट्रात दिवाळीच्या वेळी मातीच्या पणत्यांची मागणी वाढते, कारण त्यात एक प्रकारची पारंपरिक उब आणि पवित्रता जाणवते.

 

पणतीचा इतिहास फार जुना आहे. हडप्पा संस्कृतीत (सुमारे ३३०० ते १८०० BCE) मातीच्या छोट्या दिव्यांचे अवशेष सापडले आहेत. त्यांचा आकार आजच्या पणतीसारखाच होता. एक लहान वाटी आणि एका बाजूला नाक किंवा चोंचासारखा भाग. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात असे अवशेष जतन करून ठेवले आहेत. नंतरच्या ताम्रपाषाण युगात आणि इंडो-रोमन व्यापाराच्या काळातही (तेर, अरिकामेडू इत्यादी ठिकाणी) अशाच प्रकारच्या मातीच्या दिव्यांचे पुरावे मिळाले आहेत. यातून स्पष्ट होते की प्रकाश निर्माण करण्याची ही पद्धत भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात होती. दिवा हा केवळ अंधार दूर करण्याचे साधन नव्हता, तर तो शुभत्वाचे, संरक्षणाचे आणि देवांच्या स्वागताचे प्रतीक बनला होता.

 

दीपावली किंवा दिवाळी या शब्दाचा अर्थ “दीपांची रांग” किंवा “दीपांची माळ” असा होतो. संस्कृतमधील “दीप” आणि “आवली” किंवा “मालिका” या शब्दांपासून तो तयार झाला. हा सण फक्त एका कथेवर अवलंबून नाही. लोकप्रिय समजुतीनुसार तो रामाच्या अयोध्येतील पुनरागमनाशी जोडला जातो, पण रामायण किंवा तुलसीदासांच्या रामचरितमानसातही दीपावलीचा थेट उल्लेख आढळत नाही. याउलट, अनेक पुराणे, नाटके, कोशग्रंथ आणि शिलालेख या सणाचे विविध रूपे दाखवतात.

 

अशा प्रकारे पणती ही फक्त मातीची वस्तू नाही. ती आपल्या संस्कृतीची जिवंत साक्ष आहे. दिवाळीच्या निमित्ताने जेव्हा आपण पणती पेटवतो, तेव्हा आपण फक्त अंधार दूर करत नाही, तर हजारो वर्षांच्या प्रकाशाच्या परंपरेलाही नमन करतो.

 

---

 

**संदर्भसूची**

 

1. Gode, P.K. “Studies in the History of Hindu Festivals—Some Notes on the History of Divālī Festival (Between c. A.D. 50 and 1945).” *Annals of the Bhandarkar Oriental Research Institute*, Vol. 26, No. 3/4, 1945, pp. 216–262. (नंतर *Studies in Indian Cultural History*, Vol. 2 मध्ये पुनर्मुद्रित.)

 

2. वात्स्यायन. *कामसूत्र*. (यक्षरात्रि उल्लेख)

 

3. हेमचंद्र. *देशीनाममाला* (Deśīnāmamālā).

 

4. हर्षवर्धन. *नागानंद*.

 

5. *नीलमत पुराण*.

 

6. राजशेखर. *काव्यमीमांसा*.

 

7. अल-बिरूनी. *तहकीक-ए-हिंद* (Alberuni’s India), अनुवाद Edward C. Sachau.

 

8. मोलस्वर्थ, जे.टी. *A Dictionary, Marathi and English*. 1857.

 

9. दाते, यशवंत रामकृष्ण. *महाराष्ट्र शब्दकोश*.

 

10. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय (मुंबई) – हडप्पाकालीन मातीच्या दिव्यांचे संग्रह.

 

11. विविध पुरातत्त्व अहवाल (तेर, अरिकामेडू उत्खनन अहवाल).

 

12. १११९ CE चा कन्नड शिलालेख (Western Chalukya कालखंड).