Skip to main content

प्रहार- द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्वल निकम

लेखक आगाऊ म्हादया यांनी सोमवार, 26/10/2026 22:10 या दिवशी प्रकाशित केले.

हे नाव चित्रपटगृहात दिसलं आणि त्यानंतर फक्त उज्वल निकम दिसत राहिले. राजकुमार राव ने फार छान साकारली आहे ही भूमिका. आता मी इथे एक स्पष्ट करतो, अनेक लोक त्यांचं पर्सनल आयुष्य जास्त दाखवलं म्हणून बोंबा मारत आहेत, पण मला वाटतं आपण त्यांची कथा बघायला जातोय तर नीट बघावी. त्या माणसाच्या व्यक्तिमत्वाचे पदर त्यांच्या खाजगी आयुष्यामुळेच आहेत ही जाणीव असू द्यावी.

93 च्या स्फोटांची केस जिंकलेले उज्वल निकम ते 26/11 ची केस जिंकलेले उज्वल निकम असा हा चित्रपटाचा प्रवास आहे. त्यात राजकुमार राव ने उचललेली बोलण्याची, बसण्याची, चालण्याची ढब हे सगळं अफाट आहे. त्याच्या पाठोपाठ ललित प्रभाकर ने साकारलेला अजमल कसाब सुद्धा चीड आणणारा. अर्थातच उत्तम अभिनयाचं लक्षण. काही हत्याकांडाची दृश्य ललितला घेऊन पुन्हा चित्रित केलेली आहेत. त्यामुळे त्याची दाहकता नव्याने जाणवते. खरं तर ८-९ वर्षांची मुलगी असो वा, इतर कुणी, अभिनय ह्या कणखर आधारावर चित्रपट उभा आहे. वामीका गब्बीने 'ज्योती उज्वल निकम' ह्या ध्येयासक्त पुरुषाच्या ध्येयाची जाण आणि कदर असलेल्या स्त्रीची भूमिका छान साकारली आहे.

हल्ला, त्यानंतर कसाबचं पकडलं जाणं, मग कोर्टातले युक्तिवाद आणि फाशी हा सिनेमाचा मूळ गाभा आहे. तरी ह्या सगळ्याच्या भोवती हरामखोर (सांसदीय भाषेत लिहिलंय, इथे मनातील तीव्र शिवी घालून वाचणे) लोकांनी मग ते देशातले असो व देशाबाहेरचे ह्यांनी रचलेला भगवा आतंकवाद आणि तो सिद्ध करण्याची इथल्या बांडगुळांची चाललेली धडपड मात्र ह्यात कुठेच आलेली नाही. 
सिनेमा मुद्देसूद ठेवण्याच्या प्रयत्नात हा मुद्दा वगळावासा वाटणे ही चूक मात्र अक्षम्य आहे.

सिनेमात एकंच गाणं आहे, त्याचीही गरज नव्हती, पण ते छान जमलं आहे. मी हे परीक्षण लिहायला उशीर केलेला आहे. सिनेमा चित्रपटगृहात आहे की नाही ठाऊक नाही. असल्यास जाऊ शकता. OTT वर बघितलात तर मात्र शहिदांच्या बलिदानाची जाणीव ठेवून चित्रपट एका बैठकीत बघा. Snacker Watch म्हणून अनेक चित्रपट मिळतील, पण हा तो चित्रपट ठरू नये.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 640
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हा चित्रपट OTT रिलीजला बघण्याच्या यादीमध्ये आहे. कसाब खटल्याविषयी काय दाखवले असेल याची उत्सुकता आहे.

>>ह्यांनी रचलेला भगवा आतंकवाद आणि तो सिद्ध करण्याची इथल्या बांडगुळांची चाललेली धडपड मात्र ह्यात कुठेच आलेली नाही

चित्रपट निकम यांच्यावर असल्याने हा भाग अवांतर समजून सोयीस्कररीत्या वगळलेला दिसतोय. 


सर्वांनी अभिनय उत्तम केला आहे. ललित प्रभाकरला चांगलाच चान्स मिळाला आहे अभिनय दाखवायला. राजकुमार रावही मस्त. तसेच काझ्मी ची भूमिका साकारलेला नट (आणि जज्ज आशिष विद्यार्थी सुद्ध्हा)  

 

पण जरा  टेक्निकल नजरेतुन पाहिल्यास

१. सिनेमा डॉक्युमेंटरी कडे जास्त झुकला आहे. आणि मध्येच देशभक्तीचे उमाळे (वहा टेररिझम ही कानून है, यहा टेररिस्ट के लिये भी कानून है) वात आणतात.

२. अजिंक्य देवची व्यक्तिरेखा (आणि ईतर अनेक व्यक्तिरेखाही) जरा उथळ वाटल्या. कदाचित एडिटींगमध्ये कापल्या गेल्या असतील.

३. कोर्ट रूम ड्रामा आहे पण त्यात जशी चढती भाजणी दिसायला पाहिजे तशी जमली नाहिये. कदाचित पब्लिक बोर होईल म्हणुन कायदेविषयक गोष्टी वगळल्या असाव्यात.

४. मध्यंतरा पर्यंत सिनेमा पकड घेतो. त्यातही मध्येच सी एस टी चा बॉम्ब स्फोट, गोळीबार असे प्रसंग अंगावर येतात पण नंतर मध्येच घरगुती गोष्टी, बापलेकाचा मेलोड्रामा, पत्नीचे आजारपण अशा गोष्टी पकड कमी करतात.

 

असो, हे माझे मत आहे. पण वन टाईम वॉच म्हणुन ठिक आहे. भारतमाता की जय!!


 दुसऱ्या आणि तिसऱ्या मुद्द्याबाबत सहमत. चित्रपट संपल्यावर आम्ही पण हे बोललो होतो, पण लिहिताना हे मुद्दे विसरलो.