खरं तर, ‘शब्द झाले मोती’ हे लिखाण पुन्हा सुरू केलं, त्याचं कारण ‘चाळीशी पार’ हा मूळ विषय होता...
मागे तिशीबद्दल... त्यातील दिमाखदारपणा, निर्णय, जबाबदाऱ्या आणि त्यांचं प्राधान्य याबद्दल मी लिहिलेलं होतं. पण जसजसं माणूस चाळिशीत येतो आणि त्यापुढे चालू लागतो, तसतशा त्याच्या भावना, त्याच्या मनात येणारे विचार आणि मनाला लागलेली शांततेची आस त्याला पुन्हा पुन्हा सगळ्या गोष्टींचा विचार करायला भाग पाडतात...
तिशीत दिसणारं आकाश, ते क्षितिज सारं तिथंच असतं. काही गवसलेलं असतं, काही अजून मिळवायचं असतं... पण चाळिशीत माणूस आकाश सोडून पुन्हा जमिनीशी नातं सांगू पाहतो, असं मला वाटू लागलं आहे.
चाळिशीत मग त्याला आठवतात सारे क्षण... सारे सुख-दुःखांचे हिशेबच जणू तो स्वतःपुढे मांडतो... आणि मग विचारांच्या तराजूत तो स्वतःच प्रत्येक गोष्ट उगाचच तोलून पाहतोय की काय, असं वाटत राहतं...
मग अचानक चाळिशीत त्याला हे सगळं फोल वाटू लागतं. मनाच्या तरल, कुठेही वाहवत जाणाऱ्या विचारांना बाजूला सारून, हृदयाच्या खोल ताल-सुरांत निनादणाऱ्या गझलेच्या प्रेमात तो पुन्हा बुडू लागतो...
मग त्याला कळतं... अर्ध्याहून अधिक आयुष्य आपण जगलो आहोत. आणि राहिलेल्या निम्म्या आयुष्यातीलही अर्धंच आयुष्य कदाचित आपल्या हातात नीटसं असू शकतं...
सर्व माणसं नक्कीच सारखी नसतात. प्रत्येक जण वेगळा असतो. प्रत्येकाची स्वप्नं, आकांक्षा वेगळ्या असतात... पण मला माझ्यापुरतं असं वाटतं की, ‘चाळिशीत माणूस स्वतःवर पुन्हा प्रेम करू लागतो...’
माझं तर असं म्हणणं आहे की, चाळिशीतही जो माणूस स्वतःवर आणि इतरांवरही निस्सीम, नितळ, निखळ प्रेम करू शकत असेल, तर तो स्वतः अतिशय सुंदर दिसतो...
आजकाल सोशल मीडियाच्या जमान्यात असंख्य रील्स आपल्यापुढे येऊन धडकत असतात. चाळिशी पार केल्यानंतरही व्यायाम करून, निरोगी राहून तुम्ही कसे सुंदर दिसू शकता, तुमचा चार्म कसा टिकून राहतो, वगैरे वगैरे...
पण खरं सांगायचं तर, मला वैयक्तिकपणे वाटतं की, तुम्ही मनाने सुंदर असाल, तुमच्या हृदयात प्रेमाची गझल उमटत असेल, तर तुम्ही खूप सुंदर दिसता...
आणि आपसूकच तुमचं मन तुम्हाला या मानसिक सुंदरतेतून शारीरिक स्वास्थ्याकडे... व्यायामाकडे... घेऊन जातं.
मनाची सुंदरता हीच खरं तर चाळिशीतही आनंदाने जगण्याची चावी आहे, असं माझं वैयक्तिक आणि स्पष्ट मत आहे.
नाहीतर, खूप सारा ताण आणि मनात विखारी विचार घेऊन जगणारी व्यक्ती कितीही व्यायाम करत असली, तरी ती सुंदर दिसत असेलच, याबद्दल मला शंका वाटते...
चाळिशीबद्दल असं खूप लिहिता येईल... पण त्यासाठी असंख्य भाग करावे लागतील. म्हणून चाळिशीत मला जाणवणाऱ्या काही विषयांवर थोडक्यात लिहिण्याचा आणखी प्रयत्न करतो. त्या विषयांवरही विस्तृतपणे नंतर बोलता येईल...
१. FIRE (Financial Independence, Retire Early)
खरं तर, चाळिशीत माणूस असला की त्याला वाटू लागतं... आपण जे खरे आहोत ना, तसं जगावं!
आत कुठेतरी सुख आणि समाधान यांचं द्वंद्व आपल्यात सुरू झालेलं असतं...
मग असलेल्या सुखापेक्षा समाधानाची शांतता अधिक प्रिय वाटू लागते.
आणि मग त्याचं मन त्याला स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करायला उद्युक्त करतं...
आणि मग विषय येतो, वेळ असण्याचा!
कारण मनाला एखादी गोष्ट करावीशी वाटणं आणि प्रत्यक्षात तसं जगता येणं, यात फरक असतो.
मी अनेकदा पाहिलं आहे की, माणूस आपल्या जबाबदाऱ्या... नकळत सगळ्या गोष्टींचं ओझं स्वतःच्या खांद्यावर पेलू पाहतो... आणि पुन्हा आपणच निर्माण केलेल्या उंच आकाशात विहार करण्याचा प्रयत्न करत राहतो...
त्यात वावगं काहीच नाही. पण कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळतानाच स्वतःच्या आयुष्यालाही जागा करून देता आली पाहिजे, असं मला चाळिशीत आल्यावर मनापासून वाटतं.
FIRE ही संकल्पना अशी आहे की, ती योग्य नियोजनाने प्रत्यक्षात आणता आली, तर माणसाला त्याच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य मिळू शकतं.
खरं तर आनंदाचं परिमाण व्यक्तिसापेक्ष असतं. आनंदासाठी केवळ पैसा पुरेसा नसतो, तर आपल्याकडे असलेला वेळ, आपल्या माणसांची सोबत आणि मनाचं समाधानही महत्त्वाचं असतं.
FIRE म्हणजे केवळ नोकरी सोडण्यासाठी पुरेसा पैसा जमवणं नाही. त्यात आर्थिक स्वातंत्र्य, खर्चाचं नियोजन, आपत्कालीन निधी, आरोग्यविषयक खर्च, महागाई आणि दीर्घकाळ पुरेल अशी गुंतवणूक यांचाही समावेश होतो.
आणि एक... आर्थिक स्वातंत्र्य मिळालं म्हणजे प्रत्येकाने नोकरी सोडावीच असं नाही. काहींसाठी पूर्ण निवृत्ती, तर काहींसाठी कमी काम, आवडीचं काम किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी वेळ मिळवणं, हेदेखील FIRE मधून साध्य करता येऊ शकतं.
वैयक्तिक सांगायचं झालं, तर मी अजून दोन-तीन वर्षं नोकरी करेन... मी मला वाटेल तसा स्वतःच्या व्यवसायाला वेळ देणार... माझ्या आवडींना वेळ देणार... प्रत्येक आवडणारी गोष्ट मनापासून जगणार...
आता हे करताना आर्थिक नियोजन कसं करता येतं, हा प्रश्न आहेच. पण हा लेख उपदेशात्मक झाला नाही पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. म्हणून हा मुद्दा मी इथेच वगळतो... वाटल्यास पुन्हा केव्हातरी लिहीन...
२. मैत्री.. नाती..
खरं तर, माझ्यासाठी हा खूप मोठा विषय आहे. माझ्या आधीच्या आयुष्यातील अनेक गोष्टी मी यापूर्वीच या विषयाभोवती लिहिलेल्या आहेतच...
पण चाळिशी पार केल्यानंतर मात्र माणूस आतून थोडा बदलतो, असं माझं वैयक्तिक मत आहे...
आणि मग त्याला जाणवू लागतं, आपले खरे मित्र कोण आहेत... लहानपणीचे.. शाळेतील.. कॉलेजमधील.. आणि त्यानंतरच्या आयुष्यात भेटलेले... ज्यांच्याशी आपण मनमोकळेपणाने खूप साऱ्या गोष्टी अगदी सहज, आपल्या मनासारख्या बोलू शकतो...
भले ते कमी असतील.. पण असतील, तर आयुष्यात इतर मित्र किंवा नाती नसली तरी चालतील; पण ही माणसं आपण जपली पाहिजेत, असं वाटू लागतं...
अगदी आपल्याला आधी आवडलेल्या प्रिय व्यक्तीलाही पुन्हा भेटावंसं वाटणं... निखळ.. नितळ.. नात्यांना पुन्हा जगावंसं वाटणं... हे सगळं चाळिशी घेऊन येते...
खरं तर, आयुष्याच्या या टप्प्यावर माणसाला नात्यांमधला मोकळेपणा अधिक महत्त्वाचा वाटू लागतो. आपल्याला समजून घेणारी, आपल्याला आपल्यासारखं राहू देणारी आणि आपल्यासोबत कोणताही मुखवटा न घालता जगू शकणारी माणसं हवीशी वाटू लागतात...
आणि या व्यक्तींमध्ये आपला पार्टनरही असेल, तर खऱ्या अर्थाने चाळिशी आनंदात घालवता येऊ शकते... या बाबतीत मी नशीबवान आहे...
खरं तर, चाळिशी ही पुन्हा नव्याने, पहिल्यासारखं जगण्याची एक उमेदच घेऊन येते, हे माझं स्पष्ट मत आहे...
३. आवड.. छंद.. स्वतःसाठी जगणं
खरं तर, ‘चाळीशी पार’ मधील हा माझा आणखी एक आवडता विषय...
खरं तर, बऱ्याचदा आपण आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, हे इतकं झालं की मग हे करू... हे असं केलं की मग वेळच वेळ आहे... असं म्हणत म्हणत अर्धं आयुष्य घालवलेलं असतं. काळाचे दोरे कधी हातातून निसटत गेले, हे आपण नकळत विसरतो...
म्हणूनच आता आपल्या आवडी... आपले छंद जोपासावेत, निदान आपल्या हव्याशा गोष्टींसाठी तरी वेळ काढावा, असं वाटू लागतं...
कदाचित आपल्याला खूप फिरायचं असेल... खूप लिहायचं असेल... किंवा निवांत राहून फक्त मित्रांमध्ये मिसळायचं असेल... किंवा आणखी काही! चाळिशीत या गोष्टींची एक हलकीशी जाणीव होऊ लागते...
कदाचित आपल्या जबाबदाऱ्या... आपण निर्माण केलेलं जग अजूनही या गोष्टींसाठी अनुमती देत नसेल. परंतु चाळिशीच्या या वयात, या मनाला अशा असंख्य गोष्टी कराव्याशा वाटू लागतात...
कदाचित चाळिशीत आपल्याला कोणासमोर काही सिद्ध करायचं नसतं, किंवा प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा अट्टाहासही नसतो. फक्त आपल्याला... आपल्या मनात असलेल्या गोष्टींसाठी... स्वतःसाठी थोडं जगावंसं वाटतं...
आणि मला स्पष्टपणे असं म्हणावंसं वाटतं की, चाळिशीत माणसाने असं मुक्त जगावं... थोडं स्वैर.. थोडं स्वच्छंदी...
असं जगणं म्हणजे स्वैराचार नव्हे, किंवा स्वतःपुरतं जगणंही नव्हे.
उलट, चाळिशीत कधीतरी स्वतःलाही विचारावंसं वाटतं... ‘मला नेमकं काय करावंसं वाटतं?’
आणि कदाचित, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याइतकी समज चाळिशीत आलेली असते...
कारण शेवटी, आपण आयुष्य किती परिपूर्ण जगलो यापेक्षा, आपल्या मनाला जे जगावंसं वाटलं, ते किती मनापासून जगलो... हेच कदाचित चाळिशी पार केल्यावर अधिक महत्त्वाचं वाटू लागतं...
-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वच्छंदी जीवन.. (गणेशा)
२४-१०-२०२६
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेम पिंच
हेच विचार गेल्या 3-4 वर्षापासून चाळिशीच्या उंबरठ्यावर येत असल्याने प्रत्येक वाक्याशी सहमत....
आयुष्य सुखी जगण्यापेक्षा समाधानाने जगणे, करीअर सोबतच आपल्या छंदांचा, आपल्या माणसांना,नात्यांना वेळ देणे, तो बंध जोपासणे जास्त महत्वाचे वाटू लागते.
हल्ली तर सोबत असणारे काका काकू, मामा आत्या, सासरची/माहेरची ज्येष्ठ मंडळी हे हळूहळू कायमचे सोडून जात असताना, अजून 10 वर्षांनी निर्माण होउ घातलेल्या एकटेपणाच्या पोकळीला आपण कसे सामोरे जाणार? असेही वाटू लागले आहे.
लेख आवडला...