मायकेल गॉकेलिन हा फ्रान्स मधल्या पॅरिस या शहरात १९२८ साली जन्मला. गॉकेलिनने विविध व्यावसायिक क्षेत्रातील हजारो लोकांचे जन्मटिपण म्हणजे जन्मवेळ , जन्मतारीख आणि जन्मठिकाण हा डेटा घेऊन त्यांचे संख्याशास्त्रीय विश्लेषण केले.गॉकेलिनचे ज्योतिषविषयक मुख्य सांख्यिकीय संशोधन साधारण १९४० च्या दशकाच्या सुरुवातीपासून १९८० च्या दशकापर्यंत चालले.
हे करताना त्याने वैदिक ज्योतिषाप्रमाणे जन्माच्या वेळचे आकाश बारा राशींमध्ये न विभागता ग्रहाच्या जन्मस्थानावरून दिसणाऱ्या दैनिक आकाशमार्गाचे १२ विभाग केले होते. त्यामध्ये त्याला असे आढळले की पूर्व क्षितिजावर विशिष्ट ग्रहाच्या उदय बिंदूपासून लगतच्या वेळेत जे लोक जन्मले तसेच तोच ग्रह मध्यान स्थानी गेल्यानंतर (Mid heaven) च्या लगतच्या वेळेत जन्मलेले जे लोक होते ते त्या ग्रहाशी संबंधित व्यवसायामध्ये उत्कृष्ट/प्रसिद्ध कामगिरी केलेले असे लोक होते. म्हणजे समजा जर पूर्व क्षितिजावर मंगळ उगवला असेल तर त्याच्या उदय बिंदूपासून लगतच्याच वेळेत तसेच मंगळ मध्यानावर गेल्यावर त्याच्या लगतच्या वेळेत जन्मलेले जे लोक होते ते सैन्य , मैदानी खेळ , पोलीस दल , मिलिटरी बँड तसेच अन्य अशी क्षेत्रे ज्यात शारीरिक कष्ट , जोम , धडाडी धाडस हे फार महत्त्वाचे असते अशा क्षेत्रांमध्ये नावाजलेले लोक होते.
गॉकेलिन याने केलेले हे संख्याशास्त्रीय संशोधन फार महत्त्वाचे आहे. कारण गॉकेलिन हा ज्योतिषशास्त्र शिकला होता आणि तो अतिशय उत्तम असा संख्याशास्त्रज्ञ देखील होता. त्याने मानसशास्त्रामध्ये देखील डॉक्टरेट मिळवली होती. गॉकेलिन याच्या या संशोधन कार्यात त्याची पत्नी फ्रांसवाझ हिनेदेखील मोलाची मदत केली होती.
गॉकेलिनच्या संशोधनातून आलेल्या अन्य काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्याही आपण लक्षात घेतल्या पाहिजेत.
१) गॉकेलिनने आनुवंशिकता या दृष्टीने ज्योतिषशास्त्रीय पडताळणी करून पाहिली त्यावेळी त्याला असे आढळले की आई किंवा वडील यांच्या जन्माच्या वेळी जे ग्रह प्रभावी(उदित बिंदूपासून लगतच्या वेळेत) होते तेच ग्रह अपत्यांच्या जन्माच्या वेळी देखील तसेच प्रभावी असलेले दिसतात. परंतु याला एक मर्यादा अशी देखील आहे की गॉकेलिनच्या मते, Caesarean किंवा प्रसूतीमध्ये वैद्यकीय हस्तक्षेप झालेल्या जन्मांमध्ये त्याने शोधलेला planetary heredity effect आढळत नव्हता.
२) ग्रहांचा प्रभाव हा विशिष्ट प्रकारचा व्यवसाय किंवा कौशल्य यासाठी लाभदायक/जुळणारे असणारे व्यक्तिमत्व निर्माण करतो. विशिष्ट ग्रह विशिष्ट व्यवसाय चालवण्यासाठी सहाय्य करतो असा त्याचा अर्थ नव्हे. विशिष्ट ग्रहाचा आणि विशिष्ट व्यवसायाचा संबंध नाही.
३) गॉकेलिनचे संशोधन प्रामुख्याने अनुभवजन्य आणि सांख्यिकीय होते. त्याने ग्रह माणसांवर कोणत्या भौतिक यंत्रणेद्वारे परिणाम करतात हे सिद्ध केले नाही; त्याने जन्ममाहितीच्या मोठ्या नमुन्यांमध्ये ग्रहस्थिती आणि मानवी वैशिष्ट्ये/व्यावसायिक यश यांच्यात सांख्यिकीय संबंध आहे का, हे तपासले. ग्रह जर माणसावर परिणाम करत असतील तर ते तो कशाप्रकारे करतात हा त्याच्या संशोधनाचा भाग नव्हता.
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावरील ज्योतीषी आणि…
मिपावरील ज्योतीषी आणि पुर्वाश्रमातील ज्योतीषी यांचे मत जाणण्यास उत्सुक
- भृगु जोशी
रोचक माहिती आहे, धन्यवाद…
रोचक माहिती आहे, धन्यवाद.
गॉकेलिनने आनुवंशिकता या दृष्टीने ज्योतिषशास्त्रीय पडताळणी करून पाहिली त्यावेळी त्याला असे आढळले की आई किंवा वडील यांच्या जन्माच्या वेळी जे ग्रह प्रभावी(उदित बिंदूपासून लगतच्या वेळेत) होते तेच ग्रह अपत्यांच्या जन्माच्या वेळी देखील तसेच प्रभावी असलेले दिसतात.
हे थोडं अशक्य वाटतंय, योगायोग असू शकेल.
संशोधन
डॉ. मिशेल गॉकेलिन या फ्रेंच मानसशास्त्रज्ञाने जे प्रचंड संशोधन केले तसे संशोधन दुसऱ्या कुणीही केलेले नाही. साधारण १९६० ते १९७५ या काळात हे त्यांनी हे संशोधन केले. या संशोधनाचा सुरुवातीचा जो निष्कर्ष निघाला तो मार्स इफेक्ट या नावाने गाजला. लढाऊ प्रवृत्तीचा आणि मंगळाचा काहीतरी संबंध आहे असे त्यावरून दिसत होते. सर्वसाधारण म्हणजे अॅव्हरेज लढाऊ माणसांना हे तत्व लागू नाही असे गॉकेलिनचे म्हणणे होते. उच्च श्रेणीच्या म्हणजे शौर्य-पदके मिळालेल्या जवानांनाच फक्त ते लागू आहे, आणि ते सुद्धा त्यांच्यातल्या फक्त पाचसहा टक्के लोकांनाच लागू आहे असे त्यांचे म्हणणे! आम्हाला हे सगळे अगदी विचित्र वाटते. गॉकेलिनने अपार कष्ट करून त्याचे निष्कर्ष काढले यात वादच नाही. पण त्याचा अन्वयार्थ ज्योतिष-समर्थकांनी जो लावला आहे तो आम्हाला पटत नाही. मंगळाच्या गूढ परंतु नैसर्गिक प्रभावाचा हा परिणाम आहे असे आम्हाला बिलकुल वाटत नाही. मंगळाला बुद्धी आणि इच्छाशक्ती असेल तरच हे सगळे शक्य आहे. साधी गोष्ट आहे, ज्यांनी रणांगणावर आपल्या प्राणांची बाजी लावली पण ज्यांना फक्त कसलेही किताब मिळाले नाहीत अशा लाखो जवानांचा मंगळाशी काही संबंध नाही, फक्त काही मूठभर लोकांच्यावरच मंगळाचे नैसर्गिक प्रभाव पडतात ही गोष्ट तर्कशक्ती कितीही ताणली तरी मनाला पटत नाही. अर्थात्, मंगळाला जर चोखंदळपणे निवडानिवड करता येत असेल तर मात्र गोष्ट वेगळी!
याचा सरळ अर्थ असा होतो की गॉकेलिनने जो डाटा जमवला, जी सांख्यिकी पद्धत वापरली, तिच्यातच काही तरी गडबड घोटाळा नकळत का असेना पण शिरला असावा. कार्ल ई. कोप्पेनशार नावाच्या शास्त्रज्ञाने नेमके हेच दाखवून दिले. यूरो स्केप्टिक ९२ या नावाच्या नेदरलॅण्ड मधून प्रकाशित झालेल्या शास्त्रीय नियतकालिकात 'मार्स इफेक्ट अनरिडल्ड` या शीर्षकाच्या लेखात त्याने गॉकेलिनच्या संशोधनात 'सिलेक्शन बायस` हा दोष असल्याचे निदर्शनास आणले. दुर्दैवाने गॉकेलिन त्यापूर्वीच मृत्यू पावला होता, त्यामुळे हा वाद पुढे अनिर्णित राहिला. आता शास्त्रीय जगतात गॉकेलिनच्या संशोधनाचे महत्व उरलेले नाही. फलज्योतिषालाही या संशोधनाचा प्रत्यक्ष असा काहीच उपयोग झाला नाही. अप्रत्यक्ष उपयोग एवढाच झााला की ग्रहांचे प्रभाव माणसावर पडतात या मूलभूत कल्पनेला सलाईनचे एक इंजेक्शन मिळाले!
( अस्मादिकांच्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी..... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकातून उधृत)
पुस्तक https://faljyotishachikitsa.blogspot.com/ इथून डाउनलोड करुन घेता येइल
टीकाकार निर्लेप होते का?
In reply to संशोधन by प्रकाश घाटपांडे
खालील भाग यशोदा भागवत यांच्या फल ज्योतिष्य शास्त्र की अंधश्रद्धा या पुस्तकातून घेतला आहे.
गॉकेलिनचे टीकाकार
गॉकेलिनने नोंदविलेल्या शोधांचे साधारण मूल्यमापन करण्यापूर्वी त्याच्या टीकाकारांबद्दल, विशेषतः ज्यांना काही शास्त्रीय पार्श्वभूमी आहे अशा टीकाकारांबद्दल काही गोष्टी सांगाव्यात असे आम्हांला वाटते. शास्त्रात पक्षपात होत नाही अशी एक लोकप्रिय समजूत आहे. परंतु आम्हांला असे आढळून आले की, गॉकेलिनवर टीका करणाऱ्यांनी साधा शिष्टाचारही न पाळता वाकडी वाट करून पक्षपात, पूर्वग्रह व शत्रुभाव दाखवून देण्यात नैतिकंतेचीही बूज राखलेली नाही. बेल्जियम कमिटी पॅराचे एक उदाहरण त्यासाठी पुरेसे होईल. खरे तर ज्योतिषशास्त्राला पूर्णपणे बळकटी देणारे गॉकेलिनचे अभ्यास पाहूनही त्यांनी ते सिद्ध होऊ नयेत म्हणून आपला अहवाल अर्धवटच प्रसिद्ध केला. (तसे नसते, तर ते का नाकारले त्याचा संपूर्ण अहवाल कमिटीने सादर केला असता.) शास्त्रामध्ये तर ही गोष्ट मुळीच बसणारी नाही. पण मग त्यामुळे झाले काय, की गाँकेलिनच्या निष्कर्षांबाबत कमिटी या निर्णयास का आली त्याचे ज्ञान आम्हांला केवळ गॉकेलिनच्या काही उद्धृतांमधून आणि त्याच्याशी केलेल्या चर्चेमधूनच मिळवावे लागले. त्यामुळे आम्हांला जरी गॉकेलिनच्या कामाबाबत यत्किचितही शंका नाही, तरी कमिटीचा अहवाल वैचारिक आदानप्रदानासाठी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे.
अमेरिकन कमिटीचा उल्लेख आम्ही आधी केलेलाच आहे. त्या कमिटीने पुन्हा नव्याने काही संख्याशास्त्रीय आक्षेप उभे केले आणि त्यांचे निराकरण केले तरच तुमचे काम ग्राह्य धरले जाईल, असे गॉकेलिन-द्वयीला कळवले. मग पुन्हा गॉकेलिन-द्वयीने खूप मोठ्या प्रमाणात तपशिलांची जमवाजमव केली आणि संख्याशास्त्राची ती अटही पूर्ण केली. त्यातूनही त्यांच्या कामाला बळकटीच मिळाली. त्याउपरसुद्धा कमिटीने गॉकेलिन-द्वयीचा दावा सिद्ध झाला असे मान्य करण्यास नकारच दिला! शास्त्रातली ही पद्धतसुद्धा आगळीच दिसते आणि कमिटीला तरी ती श्रेयस्कर ठरत नाही. नेमके 'पडद्यामागे' काय कटकारस्थान झाले त्याचा संपूर्ण दुर्दैवी अहवाल रॉवलिन (१९८१) आणि करी (१९८२) यांनी दिलेला आहे आणि तो जर खरा असेल तर कमिटीला अनेक गोष्टींचा जाब द्यावा लागेल.
कल्व्हर व ईना (१९७९) यांच्याचसारखे इतरही टीकाकार गॉकेलिनचे संशोधन हाणूनच पाडायचे असा खेळ खेळताना दिसतात. त्यांनी आपल्या टीकेमध्ये गाँकेलिनच्या संशोधनाला खूपच अपुरी जागा दिलेली आहे. त्यामुळे अनभिज्ञ वाचकांना गॉकेलिनने आपल्या कामासाठी केवढा प्रचंड खटाटोप केला, केवढे अमाप परिश्रम घेतले, किती पुनरभ्यास केले किंवा त्यांत त्याला कितपत यश, केव्हा केव्हा मिळाले, ते कळणेही कठीण होऊन बसते. त्यांनी आपल्या मीमांसेत अर्थपूर्ण परिणाम मिळविण्यात अपयशी ठरलेले इतर लहानसहान पुनरभ्यास नमूद करण्यावर अकारणच भर दिलेला आहे. आणि ते अभ्यास अयशस्वी ठरण्याचे मुख्य कारण वाचकांपर्यंत पोहोचूच दिलेले नाही, की त्यांत पुरेसे प्रख्यात नसणाऱ्या व्यक्तींचे गट वापरण्यात आलेले होते; आणि गॉकेलिनच्या कामाची रास्त परीक्षा करायची तर ते गट प्रख्यात लोकांचेच असावे लागतील.
गॉकेलिनच्या कामाबाबत जे संख्याशास्त्रीय आक्षेप घेण्यात आले तेही अनेकदा अशाच पद्धतीने घेण्यात आले आहेत. त्यामुळे या टीकेतून त्यांना नेमके काय म्हणायचे आहे ते वाचकांना कळणेच अवघड होऊन बसते. कल्व्हर व ईना यांनी काय म्हटले आहे ते पहा :
मूलतः गॉलिन-द्वयीच्या पृथक्करणाबाबत वेगवेगळ्या कारणांनी टीका होते. परंतु त्यापैकी बरीचशी त्यांच्या मोजणी-पद्धतीवर आणि तर्पाशलांत त्यांनी किती प्रमाणात स्वातंत्र्य घेतलेले आहे, त्या हिशोबाबाबत आहे. दावा असा आहे की हे घटक जर नेमके सांगण्यात आले तर गॉकेलिनने घेतलेल्या दोन्ही गटांच्या वर्गीकरणाचे मूल्यमापन साधारण १०६ पेक्षाही खाली जाऊ शकते.
लक्षात घ्या, की कल्व्हर व ईना यांनी अगदी संदिग्ध असे विधान केले आहे आणि त्यांनी असेही म्हटलेले नाही की, या विधानाशी ते सहमत आहेत. त्यांनी तो दावा फक्त मांडलेला आहे, पण त्याच्या नेमक्या मूल्यमापनाचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. त्यांनी त्यात हे पण नमूद केलेले नाही की, गॉकेलिनचे पृथक्करण तपासण्यासाठी एका नामवंत संख्याशास्त्रज्ञाची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेत गॉकेलिनचे पृथक्करण पूर्णपणे यशस्वी ठरले. तेव्हा ही टीका वस्तुतः गॉकेलिनची काहीच चूक नसूनही, तो चूक ठरला असा गैरसमज निर्माण करण्यासाठीच केलेली दिसते. 'शास्त्रीय टीका' खरे तर अशी असत नाही.
आम्ही स्वतःच गॉकेलिनची प्रयोगरचना आणि संख्याशास्त्रीय सप्रमाणता अत्यंत काळजीपूर्वक तपासली. तसेच त्याचे टीकाकार आणि तो यांच्यातले सर्व विवाद्य मुद्देही मोठ्या जिज्ञासेने पाहिले. तेव्हा त्यातून आम्ही अगदी ठाम अशा निष्कर्षास पोहोचलो की, अनेकदा टीकाकारांची वर्तणूक अनुचित होती. शास्त्रसंमत तर ती मुळीच नव्हती. त्यांनी स्वतःची तत्त्वे स्वतःच पायदळी तुडविलेली होती; सर्व शास्त्रीय नियमांचे उल्लंघनही त्यांनीच केले होते; स्वतः चाचण्या करताना तपशिलांबाबत गॉकेलिनला विचारलेही नव्हते किंवा मिळालेल्या निष्कर्षांमधले आवश्यक मुद्दे दडवून ठेवले होते. गाँकेलिन पति-पत्नींकडून मात्र तशा प्रकारचे कोणतेच दुराचरण न झाल्याचे आम्हांला आढळून आले. ते दोघेही पूर्णवेळ शास्त्रीय भूमिकेशी सुसंगत, शांत व तर्कनिष्ठ वर्तणूक करीत होते. प्रत्येक टीकेला उत्तर देण्यासाठी नवीन तपशील गोळा करत त्यांचे यथायोग्य पुनः पृथक्करण सादर करीत होते आणि हे सारे काम अत्यंत कष्टप्रद असूनही आपली तर्कनिष्ठ भूमिका सोडत नव्हते. त्यामुळे गाँकेलिनवर केलेल्या टीकेच्या भडीमारातून 'शास्त्रीय' समाज सहज निसटू शकेल असे वाटत नाही.
फलज्योतिषशास्त्रा-बाबतच्या…
In reply to संशोधन by प्रकाश घाटपांडे
फलज्योतिषशास्त्रा-बाबतच्या सर्व गोष्टी मूर्खपणाच्या व थोतांड असल्याचे एक निवेदन घाईने काढले होते. विरोधकांमध्ये मुख्यत्वे बऱ्याचशा शास्त्रज्ञांचाही समावेश होता. 'ऑब्जेक्शन्स टु ऍस्ट्रॉलॉजी' (फलज्योतिषशास्त्रावरील आक्षेप) या शीर्षकाखाली 'दी अमेरिकन ह्यूमॅनिस्ट' या मासिकाच्या सप्टेंबर १९७५ च्या खास वार्षिक अंकात ते प्रसिद्ध झाले होते. ('अमेरिकन ह्यूमॅनिस्ट' हे सामाजिक समस्या व विवेकशून्यता या विषयांच्या विचारविनिमयाला वाहिलेले प्रसिद्ध मासिक आहे.) त्यावर १८६ प्रमुख शास्त्रज्ञांनी आपल्या मान्यतेचे शिक्कामोर्तब केलेले होते. आणि त्यांपैकी १८ शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिकाचे मानकरी होते. फलज्योतिषशास्त्रावर काही शास्त्रीय आक्षेप घेणाऱ्या एका छोट्या निवेदनाचा मसुदा तयार करण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. वरील निवेदन म्हणजेच त्यांनी तयार केलेला तो मसुदा, पुढे विस्तृत व सुधारित करून अमेरिकन एस्ट्रॉनॉमिक सोसायटी व नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस यांच्या निवडक व मान्यवर सभासदांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला.
अनेकांच्या सही-शिक्क्यांनिशी मान्य झालेला तो मसुदा नंतर अमेरिकेत व इतरत्रही वेगवेगळ्या वृत्तपत्रांकड़े पाठविण्यात आला. संपादकांनी आपापल्या पत्रांतून त्याला प्रसिद्धी द्यावी, असे त्यासोबत कळविण्यात आले. जे संपादक दैनिक वा साप्ताहिक भविष्यरकाने छापतात, त्यांनी विशेषतः हे निवेदन प्रसिद्ध करावे, अशी टीपही त्यासोबत दिली गेली होती. उद्देश असा की, शास्त्रीय गुणावगुणांच्या विवेचनाशी ज्यांचा क्वचितच संबंध येतो अशा भाबड्या वाचकांच्या मनात हा विचार नकळत घुसडवल्यामुळे फलज्योतिषाच्या वाढत्या लोकप्रियतेला आपोआपच आळा बसेल. उद्देश संभावित खरा, पण प्रश्न पडतो तो असा, की हा दावा तरी खरा कशावरून? आणि अशा तऱ्हचा शिरकावही अशास्त्रीयच नाही का?
कार्ल सेगन या एका शास्त्रज्ञाने मात्र त्यावर सही करण्याचे नाकारले. त्याने सही नाकारण्याचे कारण 'दी ह्यूमॅनिस्ट' ला लिहिलेल्या पत्रात व्यवस्थित मांडलेले आहे :
मी स्वतः 'ऑब्जेक्शन्स टु अॅस्ट्रॉलॉजी'वर (सप्टेंबर-ऑक्टोबर १९७५) सही करण्यास असमर्थ आहे-कारण, फलज्योतिषात काही तथ्य आहे किंवा ते शास्त्र आहे असे मला वाटते म्हणून नव्हे तर, मला असे वाटले आणि अजूनही वाटत आहे की, या निवेदनाचा सूर अति अधिकारवादी आहे. रसायन, वैद्यक व खगोल यांसारख्या उल्लेख करता येण्याजोग्या तीनही शास्त्रांप्रमाणेच फलज्योतिषशास्त्राचा उगमही कदाचित लोकभ्रमाच्या पडद्याआडून झालेला असेल. परंतु मूळ मुद्दा तो नाही. विश्वास ठेवणाऱ्यांची भावनिक गरज ही चर्चासुद्धा यथार्थतेच्या संदर्भात गौण आहे. फलज्योतिषशास्त्राबाबतच्या कोणत्याही कल्पनेचा आपण विचार करणेसुद्धा पटणारे नाही. पण उदाहरणच द्यायचे तर वॅग्नेरने जेव्हा सरकत्या भूखंडाची (कॉन्टिनेन्टल ड्रिफ्ट) ची कल्पना मांडली, तेव्हा तत्संबंधीची यंत्रणा कुणालाच ज्ञात नव्हती. ज्या कुणी तशी यंत्रणा अस्तित्वातच नाही म्हणून विरोध केला ते सर्व चूक ठरले; आणि वॅगनेर बरोबर ठरला, हे आपण जाणतोच.
लोकभ्रम, दिखाऊ विज्ञान किंवा सीमारेषेवरचे शास्त्र यांच्या विरोधात हुकुमशाहीचा सूर असणारे निवेदन हितकारक ठरण्याऐवजी हानिकारकच ठरेल. दिखाऊ शास्त्राशी चाळे करणाऱ्यांनादेखील ते काही पटवून देऊ शकेल असे नाही. उलट, शास्त्रज्ञ हे हेकट व बंद मनांचे असतात या त्यांच्या समजुतीला ते दुजोराच देणारे आहे.
फलज्योतिष-श्रद्धांची मूलभूत तत्त्वे कशी चुकीची आहेत, ते खंडण करणाऱ्या विवेचनात्मक निवेदनावर मी सहज सही केली असती. माझा असा विश्वास आहे, की अशा प्रकारच्या समर्थनाने लोकांची मने वळवता आली असती; आणि आत्ताच्या प्रसारित केलेल्या निवेदनाने जो वादंग निर्माण केला, तो वादंगही निर्माण झाला नसता.
आइनस्टाइनचा 'सापेक्षता-सिद्धान्त' धिक्कारण्यासाठी 'रेसिस्ट जर्मन संघटने'ने १९२० साली एक सभा घेतली. बर्लिन फिल्हार्मनिक हॉलमध्ये त्यासाठी बोलावलेल्या १०० प्राध्यापकांना त्याचा तो सिद्धान्त पुस्तकातून वगळला जावा, अशी गळ घालण्यात आली होती. आइनस्टाइनचे त्यावर भाष्य असे : "मी चुकलो असेन तर ते दाखवून देण्यासाठी केवळ एक प्राध्यापकही पुरला असता!"
'अधिकारवाणी'च्या सुराबरोबरच इतरही दोष त्या निवेदनात आढळतात. ते निदर्शनास आणून फेअरबेन्डने (१९७८) म्हटले की, त्या १८६ शास्त्रज्ञांची चूक अशी की, फलज्योतिषशास्त्र कसे अमलात आणले जाते त्यावर टीका करण्याऐवजी त्यांनी शास्त्राच्या मूळ संकल्पनेवरच घाव घातला आहे. पुढे तो म्हणतो "लोकांची मने काबीज करावयास निघालेले ज्योतिषवादी व प्रतिवादी हे दोन्ही पक्ष अहंकाराच्या व अडाणीपणाच्याही बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात ही मोठी गंमतच आहे!" त्याने असेही नमूद केले आहे की, त्या निवेदनानंतर बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी मुलाखती देण्याचे नाकारले. कारण त्यांनी फलज्योतिषशास्त्र अभ्यासले नव्हते. याचाच अर्थ, सह्या करणाऱ्यांनी केवळ 'धार्मिक' कल्पनांआधारे फलज्योतिषशास्त्राला दोषी ठरविले होते.
केवळ कल्पनांआधारे फलज्योतिषशास्त्राला दोषी ठरविले असल्यामुळे खगोल-शास्त्रज्ञांचे त्यांना परिचित असणाऱ्या पुराव्यांकडेही दुर्लक्ष झालेले दिसते, असे फेअरबेन्डचे म्हणणे आहे उदाहरणार्थ, त्या निवेदनासोबत जोडलेल्या लेखात प्रो० बॉक (१९७५) याने असे लिहिले आहे की, ग्रहांत व आपल्यांत खूपच अंतर असल्यामुळे ते मानवी क्रियांवर प्रभाव पाडू शकणार नाहीत. तसेच त्याने असेही गृहीत धरलेले दिसते की, ग्रहांनी सोडलेल्या प्रभावी किरणांपासून ढाल बनून प्रसूतिगृहाच्या भिंती, नवजात बालकाचे संरक्षण करतील. खगोलशास्त्रज्ञ असूनही त्याने अशी विधाने करावी म्हणजे नवलच आहे. त्याला माहीत असावयास हवे की, ग्रह सूर्याच्या कार्यक्षमतेवर प्रभाव पाडू शकतात; आणि त्यातूनच आपल्यावरही तहत-हेचे परिणाम होत असतात; आणि हेही ज्ञातच आहे की, काही विशिष्ट रश्मिकिरण अभेद्य अशा भिंतीही भेटून जाऊ शकतात- त्यांना प्रसूतिगृहांच्या भिंती अपवाद असणार नाहीत !
'अॅक्वारिअन एजंट' या ज्योतिषपत्रकाने १९७६मध्ये त्या शास्त्रज्ञांच्या विरोधात एक निवेदन प्रसिद्ध केले. त्याचा आशय असा, की 'फलज्योतिष हा निदान एक संशोधन व्हावे असा प्रांत आहे. केवळ एका विशिष्ट रविराशीवरून संपूर्ण भविष्य सांगणारे पाखंडी ज्योतिषी आणि अनेक ज्योतिषशास्त्रीय घटकांचा सखोल अभ्यास करणारे, शास्त्राची कास धरणारे ज्योतिषी यांच्यामधला फरक आपण जाणून घ्यावयास हवा. या निवेदनावर त्यांनी विश्वविद्यालयीन पदवीधरांच्या १८७ (!) सह्या मिळविलेल्या आहेत. त्यांनीही हुकमी दाद मागितलेली असली तरी त्यांचा दृष्टिकोन काहीसा कमी पूर्वग्रहदूषित आहे. अर्थात, केवळ अधिक संशोधन व्हावयास हवे असे त्यांचे म्हणणे आणि पुराव्यांची प्रत्यक्ष परीक्षा करण्याचे त्यांनी टाळणे वा नाकारणे - म्हणजे पापभीरूपणा असला तरी पापच करण्यासारखे आहे! अर्थात, असेही शक्य आहे की, ज्योतिषशास्त्राच्या कोणत्याच बाबीत काही तथ्य नसेल. पण मुद्दा असा, की त्या १८६ शास्त्रज्ञांनी तसे दर्शवून दिलेले नाही. त्यासाठी त्यांनी फलज्योतिषाला पुष्टी देणारे सर्व उपलब्ध पुरावे पद्धतशीर तपासावे लागतील आणि मगच ते कसे व्यर्थ आहेत ते दाखवून द्यावे लागेल.
शास्त्रज्ञांमध्ये काहीशी समतोल वृत्ती दिसते ती जे० अॅलन हायनेक याची. हायनेक हा नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील अॅस्ट्रॉनॉमी विभागाचा चेअरमन; आणि प्रो० बॉकची जी दुसरी कमिटी, 'हॉर्वर्ड कमिटी ऑन अॅस्ट्रॉलॉजी' तिचा तो सभासद. त्याने 'अमेरिकन मेन ऑफ सायन्स' या डिरेक्टरीत समाविष्ट असलेल्या वीस हजार जणांच्या कुंडल्या तयार केल्या; तपासल्या. तेव्हा त्यांत 'बुद्धीचा कारक मानला गेलेला बुध' किंवा रविराशी यांचे तथाकथित योगसंबंध त्याला कुठेच आढळले नाहीत. ज्या वेधशाळेत त्याने हे काम केले तेथल्या संचालकांनी नकारात्मक निकाल असूनसुद्धा ते प्रसिद्ध करण्यासाठी त्याला परवानगी नाकारली. त्यांनी साधा विचारसुद्धा केला नाही की, आपल्या कर्मचाऱ्याने त्यासाठी केवढा वेळ खर्च केलेला आहे. त्यामुळेच, १९७८ साली प्रकाशित झालेल्या गॉकेलिनच्या पुस्तकाला प्रस्तावना देताना हायनेकने लिहिले: "अतिशय घुटमळत, दोलायमान होत...मी ही प्रस्तावना लिहितो आहे. कारण, फलज्योतिषशास्त्राशी अगदी दूरान्वयाने जरी एखाद्या खगोलशास्त्रज्ञाचा संबंध आला, तरी त्याचे शांस्त्रीय बंधुभाव झुगारावयास ते पुरेसे होईल."
अशा या ढळढळीत वैराच्या पार्श्वभूमीवर फलज्योतिषशास्त्राबाबत कोणतीही नवी संकल्पना मांडताना वा प्रयोग करताना उघड्या मनाच्या शास्त्रज्ञांना युद्धपातळीच गाठावी लागेल. संशोधन करण्याचा त्यांचा मूलभूत हक्कही या क्षेत्रासाठी नाकारला जाईल. परिणामी दोषारोप व उपहास ओढवून घेण्यापेक्षा मूग गिळून गप्प बसणे प्रस्थापित शास्त्रज्ञ स्वीकारतील. मनोधैर्य असणारे काही थोडेच फक्त कबूल करतील की, "त्यात काही तथ्य असू शकेल."
मानसोपचारतज्ञ किंवा मानसशास्त्राचे अभ्यासक हे तरी मोकळ्या मनाचे असतील असे आपल्याला वाटते का? तर तसेही दिसत नाही.
गुडस्टाइन व ब्राझीस (१९७०) यांनी आपल्या ज्योतिषविषयक प्रयोगाचे स्वतःच वर्णन केलेले आहे ते असे की, त्यांनी 'अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन'च्या सभासदांपैकी कोणतेही १००० सभासद घेतले आणि त्यांना एक प्रश्नावली पाठविली. जन्मवेळेच्या ग्रहस्थितीनुसार उपजीविकेचा व्यवसाय ठरू शकतो का, यासंबंधीची ती प्रश्नावली होती; आणि त्या सभासद मानसशास्त्रज्ञांनी प्रयोगाचा दर्जा वा शास्त्रीय गुणवत्ता योग्य आहे का, ते ठरवावयाचे होते. खरे तर हा प्रयोग बनावट होता. मानसशास्त्रज्ञांच्या अर्ध्या गटाला एक नमुना व दुसऱ्या अर्ध्या गटाला दुसरा नमुना पाठविण्यात आला होता. एका गटाच्या प्रश्नावलीसोबत, निवडलेला व्यवसाय आणि ग्रहांची सांगड असल्याचे पुरावे दर्शविण्यात आले होते; तर दुसऱ्या गटाची प्रश्नावली तीच असली तरी तशी सांगड नसते असे परिणाम दर्शविण्यात आले होते.
मानसशास्त्रज्ञ निकाल देताना वस्तुनिष्ठ असतील अशी अपेक्षा होती. परंतु या प्रयोगाने ते तसे नसतात, असेच दाखवून दिले. बऱ्याच जणांनी उर्मट शेरे मारून प्रश्नावली अनुत्तरित परत पाठविली. फक्त २८२ जणांनी उपयुक्त ठरेल अशी भरून पाठविली. त्यातही ज्यांना नकारात्मक परिणाम पाठविण्यात आले होते त्यांनी प्रश्नावली चांगली आहे, मांडणीच्या दृष्टीने साधार आहे, निर्णयाप्रत येण्यास पुरेशी आहे, असा निर्वाळा दिला. दोन्ही गटांना पाठविण्यात आलेली प्रश्नावली जरी एकच होती तरी त्यासोबत आलेल्या मानसशास्त्रज्ञांच्या भावनिक प्रतिक्रिया आणि पक्षपातीपणाचा पुरावा पाहून, गुडस्टाइन व
ब्राझीस यांना तत्परतेने लिहिणे भाग पडले की, "दुर्दैव असे की भावविवशतेचे आणि पक्षपातीपणाचे दुष्परिणाम माहीत असूनही, चिकित्सा करतेवेळी मानसशास्त्रज्ञ आपल्या इतर शास्त्रीय सहकाऱ्यांपेक्षा फारसे वस्तुनिष्ठ वा निःपक्षपाती नसतात."
+१
मिपावर आपल्या ज्या काही पटलेल्या गोष्टी आहेत त्यातील हाही एक स्पष्ट लिहिलेला मुद्दा पटला. आपले म्हणने अगदी योग्य आणि तर्काला धरुन आहे. या अवकाशाच्या अथांग पोकळीत अजून किती सूर्यमाला आणि किती ग्रह आहेत, याचा हिशेबच नाही. त्या अगणित ग्रह-ताऱ्यांच्या झुंडीमध्ये हा एक छोटासा ग्रह पृथ्वी. आणि या पृथ्वीवरच्या असंख्य जीवांमधील मिपावरील आमचे ज्येष्ठ मित्र प्रकाश घाटपांडे यांच्यावर लक्ष ठेवणारी एखादी अदृश्य नजर आहे, हे आपल्यालाही सहज पटत नाही ! ( मिपावरील संपादकांची घाटपांडे काकांवर नजर असू शकते ;) ) -दिलीप बिरूटे