Skip to main content
लेखक गवि यांनी शुक्रवार, 02/10/2026 01:53 या दिवशी प्रकाशित केले.

 

 

फ्लायदुबई या एअरलाईनच्या फ्लाईट FZ 1073 बद्दलची बातमी आता सगळ्यांच्या समोर न्यूज चॅनल्स, यूट्यूब, इंस्टाग्राम रील्स आणि अन्य मार्गांनी येते आहे.

 

विमानाशी सबंधित काहीही घटना आणि दुर्घटना घडली की तिच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवत राहणं आणि इथे मिपावर त्याविषयी चर्चा आणि अपडेट धागा काढत राहणं ही एक सवयच बनली आहे.

 

ही लेटेस्ट घटना एकदम एखाद्या थरारक सिनेमाच्या कथेला मागे टाकणारी आहे.

 

३४,००० फुटांवर हवेत घडलेली अत्यंत भयंकर, भीषण, रक्त गोठवणारी सत्यघटना आहे. नेहमीप्रमाणे विमानांच्या जगात अशा घटना घडल्या की सुरुवातीला विखुरलेले आणि सनसनाटी बातम्यांचे तुकडे येतात, खूप अफवा पसरतात, अर्धवट माहितीचे झरे जिवंत होतात.. आणि मग हळूहळू खरा टेक्निकल डेटा समोर यायला लागतो.

 

हा धागा या संपूर्ण घटनेचे धागेदोरे गोळा करण्यासाठी आणि या विलक्षण घटनेचे अपडेट्स मिपावर नोंदवले जावेत म्हणून सुरू करत आहे.

 

नेहमीप्रमाणे आधी निव्वळ अ- ललित वस्तुनिष्ठ माहिती:

 

विमान कंपनी: फ्लायदुबई

फ्लाईट नंबर: FZ 1073 (दुबई ते तेल अवीव)

विमानाचं मॉडेल: बोईंग ७३७ मॅक्स (Boeing 737 MAX 8) जे आपल्या एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीने खूप मोठ्या संख्येने ऑर्डर केलं आहे आणि वापरत पण आहेत.

 

पायलट इन कमांड (PIC): कॅप्टन स्मित मच्छार

 

फर्स्ट ऑफिसर (को-पायलट): ओमानी नागरिक (याचं नाव का लपवलं आहे हा एक वादग्रस्त मुद्दा निर्माण झाला आहे.)

 

प्रवासी आणि क्रू: सुमारे १७० प्रवासी (चुभूदेघे) क्रू नेमका किती होता ते बघावं लागेल. पण सुदैवाने दोन ड्यूटीवर नसलेले पायलट पण प्रवाशांमध्ये बसलेले होते. या लेखात मी या सर्व लोकांच्या जिवंत राहण्याला चमत्कार म्हणणार आहे त्यातला एक महत्वाचा भाग.

 

क्रूझिंग अल्टीट्यूड: फ्लाईट लेव्हल ३४० (३४,००० फूट). यासाठी माझा फ्लाईट लेव्हल संबंधित लेख शोधू शकता जर इंटरेस्ट असेल तर.

 

इमर्जन्सी लँडिंग: ताबुक विमानतळ, सौदी अरेबिया

 

आता घटनाक्रम आणि नेमकं काय झालंय ते बघूया. कारण मीही जशाजशा बातम्या वाचत गेलो तसं तसं आगोदर सरळ वाटणारी घटना अधिकाधिक क्लिष्ट आणि सिरियस होत गेली.

 

 

विमान जॉर्डन आणि सौदी यांच्या सीमेजवळ आपल्या ठरलेल्या क्रूझ लेव्हलवर (३४ हजार फूट वर लिहिल्याप्रमाणे) उडत असताना अचानक कॉकपिटमध्ये आजवर न झालेलं काहीतरी अघटित घडलं. को-पायलटने (ज्याचं नाव अजूनही लपवलं आहे) अचानक धारदार शस्त्राने पायलट इन कमांड कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर एकदम अनपेक्षित हल्ला चढवला. हे बहुधा काही वैयक्तिक भांडण नव्हतं, तर प्राथमिक माहितीनुसार विमानाचे कंट्रोल कॉलम्स खाली दाबून आणि इंजिन पॉवर म्हणजे थ्रॉटल फुल पॉवरमध्ये सेट करून विमान जमिनीवर आदळवण्याचा तो प्रयत्न होता असं सध्या तरी दिसतं आहे.

 

कॉकपिटमध्ये को पायलटने चाकू (जो अनेक माध्यमांत सांगितला जातोय पण प्रत्यक्षात विमानाच्या इमर्जन्सीत वापरल्या जाणाऱ्या उपकरणांतल्या कुऱ्हाडीसारखं एक उपकरण होतं.) वापरून मुख्य पायलटवर जो जीवघेणा हल्ला केला त्यात कॅप्टन स्मित यांच्या अनेक नाजूक जागी घाव बसले. डोक्यावर, पोटावर आणि इतर अनेक जागी. त्यातून प्रचंड रक्तस्त्राव सुरू झाला. तरीही कॅप्टन स्मित यांनी प्रतिकार चालू ठेवला. ट्रू एअरमनशिप..

 

ही जीवघेणी झटापट सुरू असताना विमानाने अंदाजे ३० सेकंदांत ३४,००० फुटांवरून थेट १७००० फुटांपर्यंत थरकाप उडवणारा सूर मारला. रडारवर हा ड्रॉप पाहणाऱ्या कोणाचेही ठोके चुकावेत असा हा दर होता.

 

डेव्हिल इज इन द डीटेल्स. प्रथमदर्शनी हा केवळ एका माथेफिरू किंवा अतिरेकी हल्ल्याचा आणि सुटकेचा प्रसंग वाटेल; पण एक एव्हिएशन अभ्यासक म्हणून डेटा आणि फिजिक्सच्या चष्म्यातून पाहिलं तर खूप गोष्टी अंगावर काटा आणणाऱ्या आहेत. आणि माझी काही निरीक्षणं आणि अंदाज आहेत आपल्या त्या भारतीय पायलट इन कमांडबद्दल.. जी खरी ठरतात का हे काळच सांगेल.

 

पहिलं म्हणजे वीक स्पॉटवर वार झाला असता तर ? आणि कॉकपिट लॉक उघडायला काही सेकंद उशीर झाला असता तर..??!!

 

जर्मनविंग्जच्या अपघातानंतर ९/११ चे नियम आणि कॉकपिटचे आतून लॉक होणारे दरवाजे खूपच चर्चेत आले होते. जर को-पायलटने केलेला वार कॅप्टनच्या गळ्यातील कॅरोटिड आर्टरीवर किंवा छातीवर लागून कॅप्टन स्मित दुर्दैवाने तात्काळ गतप्राण अथवा बेशुद्ध झाले असते, तर आज आपण १७० किंवा अधिक मृतांची बातमी वाचत असतो. कारण तसं झालं असतं तर कॉकपिटमध्ये त्या आत्मघातकी को पायलटला रोखणारं कोणीच शिल्लक राहिलं नसतं. बाल बाल बचना या उक्तीचं हे उदाहरण का आहे यातला हा पहिला मुद्दा.

 

आता दुसरा पॉईंट बघूया. ज्यामुळे या सर्व लोकांचं जिवंत असणं हे किती अशक्य कोटीतलं आणि केवळ उच्च कोटीचं नशीब असल्याशिवाय कसं अशक्य होतं हे अधिकाधिक स्पष्ट होईल.

 

थोडा तांत्रिक भाग अपरिहार्य आहे. इथवर जे वाचक टिकून आहेत त्यांनी नेटाने पुढे वाचा.

 

मुद्दा एक.. स्ट्रक्चरल लोड आणि एअरफ्रेमचं विघटन ऊर्फ डिसइंटिग्रेशन (Aero Structural Stress):

बोईंग ७३७ मॅक्ससारखी प्रवासी विमानं साधारणपणे +२.५ जी (गुरुत्वाकर्षण) ते -१ जी लोड फॅक्टरसाठी डिझाइन केलेली असतात. ३०-४० सेकंदांत १६-१७ हजार फूट खाली येणं म्हणजे हा निव्वळ नॉर्मल डिसेंट (खाली उतरणं) नव्हता. तो हेतुपुरस्सर पूर्ण पॉवरवर (फुल थ्रॉटल म्हणतात तसा) केलेला स्टीप डाईव्ह होता. विमान ऑलरेडी प्राणघातक स्पिनमध्ये गेलं होतं. अशा स्थितीत विमानाच्या फ्रेमची ताण सहन करण्याची जी एक सर्वाधिक मर्यादा असते ती जवळपास ओलांडली गेली होती.

 

आतापर्यंत जे कळलं आहे त्यानुसार विमानाच्या टेल रडरला (Tail Rudder) आणि शेपटीच्या भागात असलेल्या स्टेबिलायझरचं प्रचंड नुकसान झालं आहे.

 

मुद्दा दोन.. अशा तीव्र वेगात जेव्हा विमान आवाजाच्या वेगाच्या मर्यादेकडे जातं, तेव्हा हवेचा डायनॅमिक दाब विमानाचे पंख किंवा शेपूट हवेतच उखडू शकतो.(डिसइंटिग्रेशन)

 

या घटनेत त्या फिरत फिरत खाली पडणाऱ्या पानासारख्या कोसळण्यातून बाहेर पडताना (पुल आऊट प्रोसिजरमध्ये) जर वैमानिकाने किंचितही जास्त जोरात कंट्रोल कॉलम मागे खेचला असता, तरी अतिरिक्त जी फोर्सेसमुळे विमानाचे हवेतच तुकडे झाले असते. विमान हवेत शाबूत राहणं हा त्या बोईंगच्या डिझाइनचा आणि रिकव्हरी करणाऱ्या हातांचा चमत्कार आहे. जरी अनेक मिडियांमध्ये त्या ऑफ ड्यूटी पायलट्सनी विमान सांभाळले असं लिहिलं असलं तरी माझं विश्लेषण ठामपणे सांगतं की सर्वात महत्वाची कृती म्हणजे रक्तबंबाळ अवस्थेत आणि कोणतीही हालचाल करणं अशक्य होईल अशा नोज डाईव्ह स्थितीत (शून्य गुरुत्वाकर्षण स्थितीत) देखील ते जीवघेणं कोसळणं थांबवून विमान पुन्हा क्षितिजसमांतर स्थिर अवस्थेत आणणं.. आणि तेही सबुरीने योग्य प्रमाणात विमानाचं नाक वर उचलत.. हे केवळ स्थितप्रज्ञ मनुष्यच करु शकतो. हॅट्स ऑफ टू कॅप्टन स्मित.

 

मुद्दा ३.. तीस सेकंदांचा खेळ..

३४ हजार फुटांवरून १७ हजार फूट खाली येण्यासाठी जर अर्धं मिनिट लागलं असेल तर उर्वरित १७,००० फूट अंतर कापून जमिनीवर स्फोट होण्यासाठी त्यांच्याकडे हार्डली आणखी ३० ते ४० सेकंद उरले होते. टाइम वॉज लाईफ. हा त्या चमत्काराचा आणखी एक भाग..

 

मुद्दा ४.. निगेटिव्ह जी फोर्स आणि मानवी हालचालींचं भौतिकशास्त्र..

काही बातम्यांमध्ये असं म्हटलं गेलं की प्रवाशांनी धावत जाऊन कॉकपिटमध्ये को पायलटला पकडलं आणि विमानाची रिकव्हरी केली. पण फिजिक्सच्या दृष्टीने विचार करा..

 

जेव्हा विमान पूर्ण थ्रॉटलवर नोज-डाउन फेकलं जातं (जे त्या को पायलटने केलं), तेव्हा केबिनमध्ये प्रचंड भयंकर निगेटिव्ह जी (ऋण गुरुत्वाकर्षण) निर्माण झालं. अशा वेळी उभे असणारे लोक आणि विमानातल्या सर्व वस्तू थेट छतावर आदळतात. अशा स्थितीत कोणालाही पायावर उभं राहून कॉकपिटच्या दिशेने धावणं फिजिकली अशक्य आहे.

 

त्यामुळे माझ्यामते या घटनेचा खरा क्रम असा असावा..

 

गंभीर जखमी झालेल्या कॅप्टन स्मित मच्छार यांनी स्वतः आधी हल्लेखोर को पायलटच्या हल्ल्याच्या वेदनेला सहन करत त्याच्या तावडीतून कंट्रोल्स आपल्या हातात घेतले. को पायलटने विमान कोसळून नष्ट व्हावं म्हणून फुल पॉवरवर सेट केलेला थ्रॉटल मागे ओढला.

विमानाचं नाक वर ओढून तो मरणाकडे नेणारा डाईव्ह शांत चित्त ठेवत योग्य नियंत्रित प्रकारे रोखला.. त्यांनी विमानाला साधारण १७,००० फुटांवर जवळपास एक जी फोर्सवर, म्हणजे नॉर्मल अवस्थेत स्थिर केलं. विमान स्थिर झाल्यावरच कॅप्टनने कॉकपिट डोअरचा अनलॉक स्विच दाबला असणार. कॉकपिट डोअर उघडून, पॅसेंजर्स आणि कॅबिन क्रू आतमध्ये घुसून कोपायलटला जेरबंद करुन मग जे ऑफ ड्यूटी पायलट विमानात होते त्यांनी पायलट सीट्सवर बसून विमान नियंत्रित करणं हे डाईव्ह होत असताना शंभर टक्के अशक्य होतं. त्यामुळे आता कॅप्टन स्मित यांनी केवळ कॉकपिटचं दार उघडलं इतकंच श्रेय दिलं जातं आहे ते माझ्यामते अन्यायकारक आहे. कॅप्टन स्मित यांनी आधी पहिल्या पंधरा सेकंदात जर ते कोसळणं नियंत्रणात आणलं नसतं, तेही गंभीर जखमी अवस्थेत आणि को पायलटशी झगडत झगडत.. तर पुढचं सगळं अशक्य होतं.

 

मुद्दा ५... द मल्टिपल मिरॅकल्स.. विचार करा.. दार उघडल्यावर प्रवाशांनी आत घुसून त्या हल्लेखोर कोपायलटला बांधून टाकलं.

 

पण सर्वात मोठा स्ट्रोक ऑफ लक म्हणजे याच विमानात फ्लाईदुबईचेच २ अतिरिक्त वैमानिक, ऑफ ड्यूटी क्रू , हे प्रवासी म्हणून प्रवास करत होते..

 

कॅप्टन मच्छार प्रचंड रक्तस्त्रावामुळे झपाट्याने अशक्त होत जात असताना या क्वालिफाईड वैमानिकांनी कॉकपिटची सूत्रं आपल्या हातात घेतली. वेळेत डॅमेज असेसमेंट केली, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला आणि विमानाला सौदी अरेबियातल्या ताबुक नावाच्या विमानतळावर सुखरूप उतरवलं.

 

एव्हिएशनच्या इतिहासात अशा घटना "झीरो सर्व्हायव्हल प्रॉबेबेलिटी" मानल्या जातात. एकाच वेळी पायलटवर हल्ला, आत्मघातकी डाईव्ह, हवेत तुटण्याच्या उंबरठ्यावर आलेली एअरफ्रेम आणि तरीही अगदीच जीवघेण्या जखमा न होता सर्वजण जिवानिशी जमिनीवर उतरणं.. हे निव्वळ नशीब नाही, तर कॅप्टन स्मित मच्छार यांनी मरणाच्या दारात दाखवलेली "एअरमॅनशिप" आहे

 

FDR (फ्लाईट डेटा रेकॉर्डर) आणि CVR (कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर) या दोन्हींचं विश्लेषण आल्यावर नक्की किती जी फोर्स नोंदवले गेले, एअरस्पीड किती होता, डाईव्हमधून ती केवळ काही सेकंद हातात असताना केलेली कौशल्यपूर्ण रिकव्हरी कोणी केली हे सगळं स्पष्ट होईलच.

 

तूर्तास अपडेट्स सुरू ठेवण्यासाठी हा धागा खुला करतो आहे. तुम्हीही अपडेट्स आणि तुमची मतं नोंदवत रहा..


वाचने 2018
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

अपेक्षेप्रमाणे तुमचा धागा आलाच! 

अर्थात जेवढ्या वस्तुनिष्ठपणे तुम्ही facts and figures गोळा करून मांडले आहेत ते पाहता धागा यायला लागलेला वेळ योग्यच आहे.‌


या धाग्यावरील चर्चेत भाग घेण्याची माझी लायकी नसली तरी वाचत राहीन.


कांदा लिंबू यांच्याशी सहमत. खूप अभ्यास करून हा लेख लिहिला आहे हे वाक्या वाक्यातून जाणवतंय. 
तूर्तास, कॅप्टन स्मित हे लवकर पूर्ण बरे होवोत ही प्रार्थना .


गविशेठ, तपशीलवार लिहिले आहे. कालच बातमी वाचली आणि कॉकपीटमधील थरार, झटापट,  आणि त्या सर्व गोष्टीचं आश्चर्यही वाटलं होतं. प्रसंग पाहिला तर,   प्रवाशांचा जीवघेण्या प्रवासाचीच ती  वाटचाल सुरु होती. नशीब सर्व सुखरूप जमिनीवर पोहोचले.

सहप्रवासी असलेल्या वैमानिकांनी विमान नियंत्रणात आणले असे वाचले होते. पण आपल्या तपशीलवार लेखाने सर्व गोष्टी क्लियर झाल्या.

 

-दिलीप बिरुटे

 


विमान या वाहनाविषयी शून्य माहिती आहे. तुम्ही सविस्तर लिहिलंय त्यातला सुद्धा बराचसा भाग समजला नाही. भारतीय वैमानिकाने अतुलनीय शौर्य दाखवून स्वतःबरोबर १७० प्रवाशांचे प्राण वाचविले हे असामान्य शौर्य आहे. 

 

त्याचबरोबर अजून एक वेगळा राजकीय मुद्दा आहे. समजा ते विमान पडले असते तर मुख्य चालक भारतीय असल्याने जगभर भारताला उत्तरदायी ठरविले असते, भारताचे इस्राएल व युअअ यांच्याबरोबरील राजनैतिक संबंध गंभीररीत्या वाईट झाले असते व हिंदू दहशतवाद नावाचा भ्रम नव्याने जिवंत केला असता.

 

शूरवीर स्मित यांनी त्या १७० प्रवाशांवर व देशावर अनंत उपकार केले आहेत. 

 

एक भीति आहे. दहशतवाद्यांना एक नवीन कल्पना सुचली आहे. पहिल्या प्रयत्नात ती स्मित यांच्या 

पराक्रमामुळे अयशस्वी झाली असली तरी भविष्यात अतिरेकी अधिक नियोजन करून व सुधारणा करून असेच कृत्य करतील ही शक्यता नाकारता येत नाही आणि प्रत्येक वेळी चालक स्मित असतीलच असे नाही. 


In reply to by श्रीगुरुजी

समजा ते विमान पडले असते तर मुख्य चालक भारतीय असल्याने जगभर भारताला उत्तरदायी ठरविले असते, भारताचे इस्राएल व युअअ यांच्याबरोबरील राजनैतिक संबंध गंभीररीत्या वाईट झाले असते व हिंदू दहशतवाद नावाचा भ्रम नव्याने जिवंत केला असता. 

परिस्थितीच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे हा, कारण 

१. ते विमान पडले असते तरी कोणी ते असेच सोडून दिले नसते, खासकरून इस्रायलने. 

२. एअर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय एक्सिडेंटला शिकवणी सारखा वापरत असतो त्यामुळे काटेकोर अभ्यास होणारच आहे ह्या घटनेचा 

३. तुम्ही एकीकडे म्हणता आहात की विमानाबद्दल काहीच माहिती नाही अन् दुसरीकडे डायरेक्ट हिंदू दहशतवाद वगैरे मध्ये घुसत बसलात म्हणून (गवि ह्यांची माफी मागून टेबलावरच हिशोब मांडतोय) दुर्दैवी परिस्थितीत जर हे विमान कोसळलेच असते तर त्यातील ब्लॅक बॉक्स (नावाला ब्लॅक रंगाने फ्लोरेसेंट केशरी) हा भाग क्रॅश रेसिस्टंट केसिंग मध्ये असल्यामुळे शाबुत सापडतो. ह्या ब्लॅक बॉक्सचे दोन भाग एक फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि एक कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डर (सीव्हीआर)

 एफडीआर - विमान उड्डाणशील असताना प्रत्येक ऑन बोर्ड सेन्सरचा इत्यंभूत डेटा इथे रेकॉर्ड होतो अक्षरशः प्रत्येक फ्लाईट पॅरामीटर इथे तपशीलवार रेकॉर्ड होणार. 

सीव्हीआर - कॉकपीट मधे बोलले जाणारे एकूण एक मानवी शब्द इथे नोंदवले जातात अक्षरशः लाइव्ह रेकॉर्डिंग सारखे. 

कॅप्टन स्मित मच्छार, ओमानी सह - वैमानिक, नंतर कॉक्पीट मध्ये शिरलेली मंडळी जे काही ओरडली असेल, बोलली असेल, किंचाळली असेल ते सगळे रेकॉर्ड होणार आहे!.

(विमानप्रवासी) खोंडे.


In reply to by वृषभ खोंडे

होय. एफडीआर मध्ये नेमक्या कोणत्या बाजूच्या कंट्रोलने विमान डाईव्हमधे टाकलं आणि नेमक्या कोणी काय इनपुट दिले याची नोंद होते. अती उच्च वेगाने हा इम्पॅक्ट झाला असता पण जर खोल समुद्रात नसेल तर जनरली ब्लॅक बॉक्स मिळतो. त्यामुळे आणि एकूणच तपशील पाहता दुर्दैवाने अपघात घडला असता तरी भारताला यात नाहक गोवणे , तेही धार्मिक किंवा दहशतवाद या कोनातून केले जाणे प्रथमदर्शनी शक्य वाटत नाही.


In reply to by गवि

बोईंग कॉर्पोरेशन सारख्या बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपनीचे रेप्युटेशन दावणीला लागलेले असल्यामुळे कॅप्टन क्लाइव्ह कुंदर आणि कॅप्टन सभरवाल ह्यांच्या कार्यक्षमतेवर अवास्तव प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते नक्कीच. पण फ्लाय दुबई मध्ये असे काही होण्याचा स्कोप मुळात नाहीच. को - पायलट जिहादी मानसिकतेचा होता नव्हता, त्याचा फर्स्ट इम्पल्स काय होता, ट्रिगर काय होता, काय झालं काय नाही झालं ते सगळं रेकॉर्डेड आहेच.


खरेच अशक्य ते शक्य असेच म्हणावे लागेल.

पायलट गंभीर जखमी झालेला आहे. सोबतचा पायलट हा अतीरेकी आहे.विमान अस्थिर झालेले आहे.

अशा वेळेस विमानात आणखी दोन पायलट प्रवास करत असावेत. त्यानी विमान नियंत्रनात आणावे. सुखरूप जमिनीवर उतरवावे.

या पेक्षा आणखी  जास्त चमत्कार  तो काय असू शकतो


तुमच्या लेखाची वाट पाहत होतो, मला पण हे वाटले होते की नोज डाईव्ह मधे असताना विमानात लोकांनी पळत जाऊन कसे काय हँडल केले असेल परिस्थितीला. 

कारण एविएशन जास्त कळत नसले तरी हे कळते की एका खास उंचीवरून विमान खाली झोकून दिल्यास विमानाच्या आतील माणसे झिरो ग्रॅव्हिटी फील करतील (कैक अंतराळ संशोधन संघटना हे फिचर्स वापरतात आपापले अंतराळवीर स्पेसवॉक करता प्रशिक्षित करण्यासाठी). 

इन द ओबवियस कॅप्टन स्मित मच्छार ह्यांचे शौर्य अतुलनीय आहे. त्यांच्या लिंक्ड इन प्रोफाईल नुसार ७८७ फॅमिली वर ९७५० तास फ्लाइंग एक्स्पेरियन्स होता त्यांना तसेच ते आता लाईन ट्रेनर म्हणून नवोदित वैमानिकांना मेंटरिंग करत होते, किमान आता फ्लाय दुबईच्या शाळेतील पंतोजी तरी किती जबरदस्त असतात ह्यावर शिक्कामोर्तब झालेच आहे म्हणायचे. 

उरता उरला राजकीय विचारांचा प्रश्न तर मानवी गाढवपणाला सीमा नसते. आता ह्यातून हजार गोष्टी आणि दहा हजार अंदाज वर्तवले जातील प्रत्येकाकडून आपापल्या चौकटीला सुखावणारे पण सत्य काय ते येईल तोपर्यंत थांबता यायला हवे. 

अहमदाबाद एअर इंडिया क्रॅश झाली तेव्हा पण पायलट एरर म्हणून बोंबाबोंब झाली होती, पण नंतर बोईंगला प्रश्न विचारले गेलेच होते. फक्त मिडल ईस्ट वर उडणारी फ्लाईट, सह-वैमानिक ओमानी (पर्यायाने मुसलमान) आणि कॅप्टन इन कमांड / फ्लाईट कमांडर भारतीय हिंदू असल्याच्या कच्च्या मालातून वाटेल तसे गुऱ्हाळ चालू झालेच आहे.

 

(हिंडेनबर्ग) खोंडे


पण सर्वात मोठा स्ट्रोक ऑफ लक म्हणजे याच विमानात फ्लाईदुबईचेच २ अतिरिक्त वैमानिक, ऑफ ड्यूटी क्रू , हे प्रवासी म्हणून प्रवास करत होते..

👍👍

अगदी बरोबर, दैव बलत्तर!

यापुढे विमानात एक तरी(तिसरा) राखीव वैमानिक असावा असा नियम व्हावा 👍

 


In reply to by Bhakti

मी कायम बघतो, खासकरून विस्तारा आणि इंडिगो मधे. रात्री शेवटच्या किंवा शेवटकडच्या फ्लाईट मध्ये सहसा साइन ऑफ केलेले पायलट आणि फर्स्ट ऑफिसर अशा जोडगोळ्या दिसतात कैकवेळा आमच्याच एअरक्राफ्ट मध्ये बोर्ड करून परत (कदाचित) घरी जाणाऱ्या. 

युनिफॉर्म चुरगळून गेलेले असतात अन् सहसा ही मंडळी पुढच्या बाजूला बसतात (एअरबस ए -३२० नियो मध्ये तरी) . 

प्रसंगी ते इंडिगो प्रीमियम म्हणून ऑफर करते त्या एक्स्ट्रा लेग रूम सीट वर असतात. त्यांच्याकडून त्या सीटचे चार्ज घेत असतील का ? असा व्यवहारीक मध्यमवर्गीय प्रश्न मला कायम पडतो ! 

पण हो, असे ऑफ ड्यूटी पायलट आपला दिवसभराचा/ फ्लाइंग अवर्स कार्यभाग संपवून विमानात इतर प्रवाशांच्या सोबत बसलेले बऱ्याचवेळी बघितले आहे.

(कोटीच्या कोटी उड्डाणे) खोंडे


In reply to by वृषभ खोंडे

आपला दिवसभराचा/ फ्लाइंग अवर्स कार्यभाग संपवून

 

कार्यभार म्हणा हो.  

कार्यभाग या शब्दाचा अर्थ वेगळा होतो.

( एखाद्या पुरुषाने स्वत:चा कार्यभाग संपवून स्त्रीला फेकून द्यावे ...... यातला अर्थ होतो त्या शब्दाचा)


In reply to by विजुभाऊ

म्हणजे -

Screenshot 20261002 161512

 हे टॉप दोन अर्थ

(दिपलेला) खोंडे

 

संपादित.  व्यक्तिगत टिपणी आढळल्यास कारवाई केली जाईल.
-व्यवस्थापन

 

 

.


In reply to by वृषभ खोंडे

आता सगळा प्रकार बऱ्यापैकी लक्षात येतो आहे. धन्यवाद आपल्या कारवाईमुळे छान सुस्पष्टता मिळाली.


In reply to by वृषभ खोंडे

न्यायालयात मिळतो त्याला न्याय म्हणतात/ की न्यायालयात न्याय नाही निवाडा मिळतो असे काहीसे. बोलण्यासारखे किंवा दाद मागण्यासारखे भरपूर आहे पण खालील नियम कसोशीने पाळतो आयुष्यात :) IMG 20261002 WA0003(1)


हा लेख अपेक्षित होता तुझ्याकडून. 😊

बातम्या वाचताना काही  शंका आल्या होत्या. त्यांच व्यवस्थित समाधान केलं या लेखानं. धन्यवाद 🙏🏻

 


लोकहो,

 

ओमानी वैमानिक नियुक्त झालाच कसा विमानात मुळातून? इस्रायलचा नियम सांगतो की इस्रायलशी राजनैतिक संबंध नसलेल्या देशाचा नागरिक हा इस्रायलमध्ये उररणाऱ्या विमानाचा वैमानिक म्हणून नेमण्यात येऊ नये.

 

ओमानचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नाहीत. मग ओमानी शिरूच कसाकाय शकतो काकपीठात? मोसाद झोपा काढीत होती काय ? मलातरी ही एक तद्दन थापेबाजी वाटते आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

उररणाऱ्या च्या जागी उतरणाऱ्या असे वाचावे. चुकीची क्षमा असावी !

-गा.पै.


आपल्याला प्रश्न पडला होता की नोज डाईव्ह मधे असलेल्या विमानात प्रवासी कॉक्पीट पर्यंत पोचले कसे ? त्यावर हे (पटण्यालायक) एक्स्प्लेनेशन असे आहे की यानिव हायून आणि एक ऑफ ड्यूटी पायलट ऑनबोर्ड असताना विमानातील लाईट कट झाले आणि केबिन प्रेशर जाणवण्याइतके कमी झाले. ह्यात हायुन हा स्वतः एअर क्रॅश इन्व्हेस्टीगेशन बघून बघून शिकलेला माणूस (आमच्या जमातीचा) होय आणि जो ऑफ ड्यूटी पायलट होता तो अर्थातच तुमच्या जमात - ए - उडनखटोलाचा होताच. केबिन प्रेशर आणि लाईट लक्षात आल्यावर ते दोघे कॉक्पीट डोअर पर्यंत पोचले तेव्हा त्यांना कळले की काहीतरी गडबड आहे आणि तोवर आतमधून भयानक साहस दाखवत कॅप्टन मच्छार ह्यांनी जखमी अवस्थेत cockpit door अनलॉक केले ज्यामुळे तो पायलट आणि हायुन आत शिरले आणि नोज डाईव्ह मधे गेलेल्या विमानाला कंट्रोल करून स्पायरल मध्ये जाण्याच्या आधी परत लेवल वर घेऊन आले. तुर्तास उपलब्ध डेटा मधे तरी हे जास्त कन्व्हिन्सिंग वाटते आहे. अर्थात अजून प्रश्नही निघतीलच ह्यातून बघू पुढे काय काय होते ते.


राहुल गांधही ते इंडिी युतीतील एका ही नेत्याने पायलटची प्रश्ंसा केली नाही. व्होट बॅँक भीतीने.  


In reply to by विवेकपटाईत

खरंय, माझी कल्पना अशी आहे की,

 

 पायलटने मा.नरेंद्र मोदी की जय असे त्याही  अवस्थेत बोलला असावा आणि चमत्कार झाला.  विमान साधारण 30,875–34,000 फूट उंचीवर cruise करत होते. त्याची उंची सुमारे 29 सेकंदांत 14,125 फूटांनी कमी झाल्याचे flight-tracking data दाखवत होते,  त्यानंतर विमान पुन्हा वर गेले आणि पुन्हा खाली आले, मग ते सुमारे 15,000 फूटांवर स्थिर झाले, 

 

त्यामुळेच राहुल गांधी इंडिया आघाडीतील कोणी प्रतिक्रिया दिली नसावी असे वाटते. =))

 

-दिलीप बिरुटे

( गप्पात पटाईत )

 


या धक्कादायक घटनेवर तुमचा लेख येणे अपेक्षितच होते. नेहमीप्रमाणे मस्त लेख.

 

बोईंग ७३७ मॅक्ससारखी प्रवासी विमानं साधारणपणे +२.५ जी (गुरुत्वाकर्षण) ते -१ जी लोड फॅक्टरसाठी डिझाइन केलेली असतात.

यात काहीतरी फॅक्टर ऑफ सेफ्टी असेलच ना?म्हणजे +२.५ ते -१ जी साठी डिझाईन केले असले तरी फॅक्टर ऑफ सेफ्टी धरून प्रत्यक्षात त्या फ्रेमची सहन करायची क्षमता जास्त असेल का? थोडी चूक झाली तर लोकांचे जीव जातील अशा कोणत्याही सिस्टीममध्ये फॅक्टर ऑफ सेफ्टी बऱ्यापैकी असावी असे वाटते. त्यामुळे नॉर्मल लोड येईल या परिस्थितीची मर्यादा जरी ओलांडली गेली तरी फॅक्टर ऑफ सेफ्टीमुळे विमान वाचले असेल का? 

 

मागे एअरक्रॅश इन्व्हेस्टिगेशनमध्ये एक भाग बघितला होता. एका फेडेक्स विमानाच्या वैमानिकाला आत्महत्या करायची होती म्हणून त्याने विमान पाडायचा प्रयत्न केला होता. त्यानंतर स्वत: वैमानिकानेच विमान पाडायचा प्रयत्न केला अशी दुसरीच घटना वाचली/ऐकली.

 


In reply to by चंद्रसूर्यकुमार

तीन चार केसेसमध्ये असा संशय किंवा खात्री झालेली आहे. इजिप्त एअर, जर्मन विंग्ज, एअर इंडिया केसमध्ये संशय जो अत्यंत चुकीचा आणि अन्यायकारक असू शकतो, आणि ही चौथी ठळक. ज्यात पायलटने घातक पाऊल उचललं.


समयोचित अभ्यासपूर्ण तांत्रिक लेख. 

ब्लॅक बॉक्स चे विष्लेषण करतात, त्यातील डेटा खाजगी, संवेदनशील असतो, पण त्यातील तथ्ये सार्वजनिक उपलब्ध करतात का?

 

अजित पवारांच्या घटनेतील तथ्य अभ्यासली गेली आहेत का? 


सर्वच घटना हि संशयास्पद आहे. अमेरिकेतील मिडटर्म जवळ असताना आणि ट्रम्प चा सुपडा साफ होण्याची चिंन्हे असताना हे अचानक हि घटना घडते. त्यामुळे ह्यावर सखोल तपास होण्याचा गरज आहे.

- विमान इतक्या जोराने खाली आहे तर प्राणवायूची मास्क खाली का आली नाहीत ? 
- ओमानी वैमानिकाने नक्की हत्यार कसे आणले ? 
- ओमानी वैमानिकांना इस्राएल मध्ये येण्यास बंदी आहे तरी सुद्धा हा माणूस आला कसा ?
- विमान ने म्हणे nose dive घेतली पण इतर कुणी जखमी झाल्याची बातमी नाही. 
- अनेक लोकांनी विडिओ रिकॉर्डिंग केले आहे पण हीच मंडळी मदत करण्यास पुढे आली नाही. 
- एका प्लम्बर ने म्हणे प्लॅन लेवल केले. इतर पायलट नि नाही.

भारतीय कॅप्टन मच्छर ह्यांना दाद द्यायला पाहिजे. हसबरा च्या प्रोपागंडा मध्ये मच्छर ह्यांना महत्व दिले गेले नाही. कदाचित मच्छर ह्यांचा जीव वाचणे झिओनिस्ट आणि CIA च्या प्लेबुक मध्ये नसावे.

हा सर्व माझा skepticism आहे. इस्राएल सारख्या दुष्ट आणि रोग राष्ट्राचा जिथे जिथे संबंध आहे इथे कुठल्यास माहितीवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

 


अपडेट: अधिकृत तपासात को पायलटची कबुली जाहीर झाली आहे.  प्रमुख मिडियांमध्ये असल्याने खूप लिंक्स देत नाही. थोडे सोर्सेस पुढे दिले आहेत. 

एकूण सारांश असा दिसतो की.. या लेखातल्या आतापर्यंतच्या सर्व नव्हे पण काही प्रमुख तांत्रिक अंदाजावर शिक्कामोर्तब होतं आहे.  शिवाय को पायलटचा हेतू जो आतापर्यंत केवळ संशय म्हणून होता तो आता बऱ्यापैकी स्पष्ट झालेला दिसतो.

काही सोर्स असे: यूएईचे प्रॉसिक्युटर जनरल हमाद सैफ अल शमसी (उच्चारी चुभूदेघे), सौदी सुरक्षा यंत्रणा आणि जागतिक माध्यमांमधून (वॉल स्ट्रीट जर्नल, गार्डियन वगैरे) समोर आलेली अत्यंत महत्त्वाची अधिकृत माहिती खालीलप्रमाणे:

ज्या सह-वैमानिकाचं नाव गुप्त ठेवण्यात आले होते, त्याचं नाव हमाम अल-हमामी असं आहे.  त्याचं वय २९ वर्षं, आणि तो ओमानी नागरिक आहे. 

सौदी अरेबिया आणि यूएईच्या तपास अधिकाऱ्यांसमोर त्याने थेट गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याचा उघड हेतू हे विमान इस्रायलच्या हद्दीत किंवा जमिनीवर नेऊन क्रॅश करण्याचाच होता. म्हणजे ९-११ सारखाच.

चौकशीत तो म्हणाला की, त्याला मरण्याची अजिबात भीती नव्हती. प्रवाशांनी त्याला कॉकपिटमध्ये जेरबंद करून बांधल्यानंतरही तो "मला मारून टाका, मला संपवून टाका" (Kill me) असं सतत ओरडत होता. 

यूएई सरकार(!?) ने आता या संपूर्ण घटनेला अधिकृतपणे दहशतवादी कृत्य म्हणून घोषित केलं आहे.

काही माध्यमांनी बाहेरून सुरा किंवा चाकू आणला गेला असा जो दावा केला होता, तो चुकीचा ठरला आहे. विमानातच इमर्जन्सी उपकरणांमध्ये संकटकाळी वापरायला ठेवलेली "कॉकपिट क्रॅश ॲक्स" म्हणजेच छोटी पण तीक्ष्ण कुऱ्हाड काढून को पायलटने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर मागून डोक्यावर आणि शरीरावर अनेक जोरदार खोल वार केले. ९/११ नंतर कॉकपिट एवढं अभेद्य केलं गेलं की बाहेरून आत काही नेता येत नाही किंवा कोणाला सहज आत जाताही येत नाही. पण दुर्दैवाने आतच ठेवलेलं इमर्जन्सी टूल एका वैमानिकाने दुसऱ्याविरुद्ध शस्त्र म्हणून वापरलं.

यातून आता आणखी खोल नवीन अविश्वासाचे प्रश्न उभे राहणार.  दोन पायलट्सना एकमेकांपासून संरक्षण देणं किंवा त्यांच्यामधे पुन्हा अभेद्य पार्टिशन करणं असे उपाय करायचे का?  इतक्या पातळ्यांवर अविश्वास दाखवून फ्लाईट ऑपरेशन्स सुरळीत पार पडतील का? दोघांपैकी कोणताही पायलट आक्रमक निघू शकणार असेल तर कोणा एकाकडे दुसऱ्याचे कंट्रोल काढून घेण्याची ज्येष्ठता ठेवणे देखील अशक्य.  म्हणजे पायलट इन कमांड आणि को पायलटला अगदी समान अधिकार देणं पण दोघांनाही पलीकडच्या व्यक्तीचे कंट्रोल्स निकामी करण्याचा हक्क देणं हा प्रकार निरर्थक वाटतो.  पायलट्सचं मानसिक स्क्रिनिंग तरी किती आणि कसं करणार? त्यात नैराश्य, मनोविकार कदाचित जाणवतील पण कट्टर विचार आणि त्यानुसार कारस्थानी कट हे कसं ओळखणार अशा तपासण्यांतून? असे नवे प्रश्न उभे राहताहेत.

आणि उद्या कॅबिन क्रू असा निघाला तर ? किती भिंती बांधणार?

 

लेखात जे म्हटलं होते की डाईव्ह चालू असताना आणि ऋण जी फोर्सेस तीव्र असताना कोणालाही उठून कॉकपिटकडे धावणं भौतिकदृष्ट्या अशक्य किंवा अत्यंत अवघड होतं.. यावर प्रत्यक्षदर्शी प्रवासी यानिव हायून आणि इतर प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीने शिक्कामोर्तब केलं आहे.

त्यांनी दिलेल्या जबाबातलं सर्वात महत्त्वाचं वाक्य (आशय):

"विमान जेव्हा भयानक वेगाने खाली कोसळत होते, तेव्हा आम्ही सीटवरून इंचभरही हलू शकत नव्हतो. पण एका क्षणी जेव्हा विमानाचा तो तोल पुन्हा सावरला (Plane balanced out.. G-forces leveled off), आणि त्यानंतरच आम्ही कॉकपिटच्या दिशेने धावू शकलो.

यावरून निर्विवाद सिद्ध होतं की:

कॉकपिटचं दार उघडण्यापूर्वी, रक्तबंबाळ आणि अंगावर घाव झेलत असताना, नजर अंधुक होत असताना, अंगात ताकद नसताना आणि त्या भयानक नोजडाईव्हमधून विमानाचं नाक वर ओढून, थ्रॉटल नियंत्रित करून विमानाला पुन्हा "१ जी" वर स्थिर करण्याचं अशक्यप्राय काम कॅप्टन स्मित मच्छार यांनीच केलं होते.  त्यानंतर त्यांनी जिवाच्या आकांताने दार उघडलं आणि इतर प्रवाशांनी आत घुसून त्या माथेफिरूचा ताबा घेतला. त्या प्रवाश्यांचं धाडस आणि श्रेय कणभरही कमी नाही. आणि पुढे विमान ताब्यात घेऊन योग्य विमानतळावर लँडिंग करून जखमींना वेळेत वाचवणारे ते ऑफ ड्यूटी पायलट्स देखील तितकेच कौतुकास पात्र.

 

आता ब्लॅक बॉक्स डेटा आणि इतर काही अधिकृत अपडेट येण्याची वाट पाहू.  इतरांनीही अपडेट्स लिहावे. 


In reply to by गवि

एखाद्या लढवय्या सैनिकाप्रमाणे कॅ. स्मित लढले आहेत. इतर सैनिकांचेही योगदान आहेच.

कॅ. स्मित यांच्या अतुलनीय साहसास प्रणाम.


In reply to by गवि

कॉकपिटचं दार उघडण्यापूर्वी, रक्तबंबाळ आणि अंगावर घाव झेलत असताना, नजर अंधुक होत असताना, अंगात ताकद नसताना आणि त्या भयानक नोजडाईव्हमधून विमानाचं नाक वर ओढून, थ्रॉटल नियंत्रित करून विमानाला पुन्हा "१ जी" वर स्थिर करण्याचं अशक्यप्राय काम कॅप्टन स्मित मच्छार यांनीच केलं होते.  त्यानंतर त्यांनी जिवाच्या आकांताने दार उघडलं आणि इतर प्रवाशांनी आत घुसून त्या माथेफिरूचा ताबा घेतला

हे सगळं डोळ्यासमोर घडत असताना को पायलट काय करत होता ? तो झटापटीत गंभीर जखमी झाला होता का? नसेल त्याने स्मितला दरवाजापर्यंत जाऊ कसे दिले ? 


In reply to by आग्या१९९०

हे सगळं डोळ्यासमोर घडत असताना को पायलट काय करत होता ? तो झटापटीत गंभीर जखमी झाला होता का? नसेल त्याने स्मितला दरवाजापर्यंत जाऊ कसे दिले ? ते नेमकं अजून स्पष्ट नाही. पण तो देखील खुद्द त्याच्या सीटवर पोचून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत असावा. कारण त्याने आता जे म्हटलं आहे की इस्रायलमधे विशिष्ट वास्तूवर नेऊन कोसळवणे हा त्याचा बेत होता, (म्हणजे विमानावर एकट्याचा ताबा मिळवून, नियंत्रित पद्धतीने ते इस्रायलच्या हद्दीत नेऊन पाडणे). त्यानुसार जागच्याजागी विमानाने जी डाईव्ह घेतली ती त्याच्या प्लॅनचा भाग नसून त्या संघर्षाचा परिणाम असावा.


आज ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७७७ विमान आयर्लंडवर असताना अचानक ३७,००० फुटांवरून ९००० फुटांवर आल्याने चालकाने तात्काळ ७७०० संदेश पाठविला.

 

ते बहुतेक नियंत्रणात आणून लंडनला परत आणण्यात आले.

 

एकंदरीत बोईंग विमानांचे अपघात जास्त होताना दिसताहेत व अमेरिकन कंपनी असल्याने फारशी चर्चा होताना दिसत नाही.


In reply to by श्रीगुरुजी

लॉस ऑफ केबिन प्रेशर - प्रवासी भागात हवेचा विशिष्ट दाब कमी झाल्यामुळे ते विमान आयर्लंड वर असताना लंडन हिथ्रो कडे पुन्हा वळवण्यात आले. अर्थात ट्रान्स अटलांटिक फ्लाईट असल्यामुळे इतक्या शॉर्ट नोटीस वर परत फिरताना पूर्ण टेक ऑफ वेट सहित परत लँड करणे धोकादायक असल्यामुळे ते विमान घिरट्या घालून तसेच जेटिसन करून फ्युएल लोड कमी करत होते आणि निर्धारित/ सुरक्षित लँडिंग वेट आल्यावर ते लँड केले गेले हिथ्रो वर. 

 

(उडनखटोला) खोंडे

 


एव्हिएशन ऊर्फ विमानन क्षेत्रात squawk code (स्क्वॉक कोड) हा कॉकपिटमध्ये पायलटद्वारे सेट केला गेलेला चार आकडी नंबर असतो. प्रत्यक्ष तोंडी न बोलता (रेडिओ बंद पडला तरी) देखील समांतर प्रक्रियेने एक यांत्रिक संदेश सतत ट्रान्समिट करण्यासाठी हे कोड सेट करण्याची सोय असते. कोड आणि पायलट्स शिकत असताना त्यांचे अर्थ लक्षात ठेवण्याच्या ज्या शाब्दिक युक्त्या करतात (ज्याला mnemonics म्हणतात) त्या अशा: 

७५०० (7500) : "सेव्हन फाईव्ह स्टे अलाईव्ह" (हायजॅक / जिवाला धोका) 

७६०० (7600): "सेव्हन सिक्स रेडिओ फिक्स" (Radio Communications problem) 

७७०० (7700): "सेव्हन सेव्हन, गोईंग टू हेवन" (General Emergency / Critical Distress) 

कॅप्टन स्मित यांनी कसातरी ७७०० हा कोड सेट करण्यात यश मिळवलं. नंतर जेव्हा विमान ऑफ ड्यूटी पायलट्सच्या काबूत आलं तेव्हा त्यांनी ७५०० हा हायजॅक कोड सेट केला.


विमान नोजडाईव्ह मधून सरळ करायचे काम स्मित यांनी केले की त्या ओमानी पायलटाने केले हे कळेलच. 

३४००० फुटावरुन १७००० फुटावर फक्त ३० सेकंदात आले म्हणजे नाक खाली आणि शेपूट वर असेच झाले असणार. त्या स्थीतीत प्रवाशांची काय हालत झाली असणार कल्पनाही करवत नाही. 

अभ्यासपूर्णं लेखाबद्दल धन्यवाद. 

 


ग्राउंड ऑपरेशन्स मधले घोर लॅपसेस ह्या निमित्ताने नजरेस आले, ते पण फ्लाय दुबई साईडने. जनरल ऑपरेशनल अग्रीमेंट नुसार इस्रायलचे ज्या देशांसोबत राजनयिक (डिप्लोमॅटिक) संबंध नाहीत तिथले पायलट ह्या सेक्टर वर नसतात. अशात हमामी नियुक्त कसा झाला ? ह्याच्या अगोदर त्याला ओमान एयर ने सतत कट्टरपंथी साहित्य वाचतो/ वेबसाईट सर्च करतो म्हणून नोकरीवरून काढून टाकले होते असे असताना फ्लाय दुबईने त्याला नोकरीवर ठेवले कसे ? म्हणजे क्रिटिकल जॉब वर ठेवताना फ्लाय दुबईने काहीही बॅकग्राऊंड चेक घेतले नव्हते का ? असल्यास त्याची नियुक्ती तेल अविव सेक्टर वर कशी अन् का झाली असावी ? ह्याच्या मध्ये फ्लाय दुबईच्या पायलट ड्यूटी असैनमेंट रोस्टर्स किंवा ती देणाऱ्या सिस्टिमचा ग्लिच आहे का ? असे हे कैक प्रश्न आहेत.


सगळा प्रकार अतिशय उत्कंठापूर्ण आणि थरारक आहे. भीतिदायक देखील आहे.

लार्ज कॉर्पोरेशन्स आणि मुळात एविएशन सारख्या स्पेसिफिक तांत्रिक, लॉजिस्टिकल आणि ऑपरेशनल अशा अनेक अंगानी जटील असणाऱ्या सिस्टिम्स मधे एखादा जरी मूविंग पिस बिघडला की त्याचे परिणाम दशकानुदशके चालणाऱ्या युद्धांत होतो. मला वाटते की अजस्त्र सिस्टीम्स मधे चेकलिस्ट मनिफेस्टो किती आणि कुठवर करणार फॉलो? कुठेतरी लूपहोल राहणारच.

शेवटी मानवी मन या सगळ्या डिटरमिनिस्टिक, नियमबद्ध, कायदेशीर, हायरार्किकल सिस्टीमवरती कसे अब्सर्डली मात करते हे पाहून थक्क व्हायला होते. कुणाच्या मनात कुठल्या धारणा राज्य करीत असतील हे अत्यंत अचूक ओळखणे जोवर शक्य नाही तोवर एक लूज कडी कायम राहणार.  एका हजारो फूट उंचावरून उडणाऱ्या मानवी बुद्धिचा एक उच्च आविष्कार असलेल्या तांत्रिक चमत्काराला जमिनिवर आदळून लोकांचा प्राण घेत इश्वरापाशी स्वर्गात जाण्याच्या धारणा बाळगणाऱ्या किंवा या क्रूर घटनेला न्याय्य म्हणणाऱ्या मध्ययुगीन धर्मकल्पनांना  कवटाळणाऱ्या मनांचे काय करायचे हो गविजी?

 


In reply to by हणमंतअण्णा शंक…

लार्ज कॉर्पोरेशन्स आणि मुळात एविएशन सारख्या स्पेसिफिक तांत्रिक, लॉजिस्टिकल आणि ऑपरेशनल अशा अनेक अंगानी जटील असणाऱ्या सिस्टिम्स मधे एखादा जरी मूविंग पिस बिघडला की त्याचे परिणाम दशकानुदशके चालणाऱ्या युद्धांत होतो. 

इगोर सिकोर्स्की हा हेलिकॉप्टरचा जनक (ह्याच्या नावाने सिकोर्स्की कॉर्पोरेशन होते जे नंतर बोईंगने घेऊन बोईंग सिकोर्स्की केले त्याचे) ह्याने का कोणतरी विमानन क्षेत्रातील दादा माणसाने हेलिकॉप्टरची केलेली परिभाषा A million moving parts put together in a such a way that each part thinks of killing you infividually

 

(धास्तावून वैष्णोदेवी पायी तंगड्या तोडत चढलेला) खोंडे


आताच ही बातमी दिसली -दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान, एका प्रवाशाच्या पॉवर बँकला आग लागल्याने हैदराबाद विमानतळावर उतरविण्यात आले. विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू सुरक्षित आहेत. अधिकाऱ्यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.


चेक इन बॅगेज घेताना प्रत्येक वेळी "यात पॉवर बँक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य आहे का?" असे विचारतात पण हॅन्ड बॅगेज मध्ये मात्र पॉवर बँक किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य नेऊ देतात. त्याचे कारण विमानाच्या पोटात, सामान ठेवतात तिथे अश्या घटना टाळणे हे असते.

 

लगोलग ही बातमीसुद्धा दिसली! प्रवाशाच्या पॉवरबँकला आग लागल्याने लुफ्थांसाचे विमान वळवण्यात आले. थोडी शोधाशोध केली असता अश्या घटना वेळोवेळी घडत आहेत असे दिसते. 


साहना,

 

इस्राएल सारख्या दुष्ट आणि रोग राष्ट्राचा जिथे जिथे संबंध आहे इथे कुठल्यास माहितीवर विश्वास ठेवणे कठीण आहे.

 

शतश: सहमत आहे. विमान खाली येतानाचे ट्रॅक लॉग आजूनही अंदाजे ( estimated ) असेच दाखवताहेत. कृष्णपेटिकेचा पत्ता नाही. अपघातग्रस्त एअर इंडिया १७१ च्या पेटिकेचा अहवाल ज्याप्रमाणे आजूनही गुलदस्त्यात आहे, तसंच हिचंही होणार.

 

न्यूयॉर्क पोस्ट म्हणतो की क्याप्टन स्मित यांस डोक्यावर वार झाले होते आणि त्याचा हात फाटला होता ( इंग्रजी दुवा ). पण या दाव्याची पुष्टी केलेली मलातरी सापडली नाही.

 

नाही म्हणायला विमानाच्या सुकाणूचा ( रडर ) तुकडा निखळलेला दिसतो आहे. विमान अचानक खाली आल्याने असा तुकडा तुटू शकतो का, तसंच इतर नियंत्रणपृष्ठांना काही हानी पोहोचली आहे का हे माहीत नाही. उत्तरं मिळतील अशी आशा नाही.

 

बाथरूम अल-बाथरूमी विमानाचा सहवैमानिक असणार आहे हे मोसादला माहीत नव्हतं, यावर माझा विश्वास नाही. मलातरी हे सगळं नाटक वाटतं. मोदींनी तब्बल दहा मिनिटं क्याप्टन स्मितशी बातचीत केली हे अगदीच केविलवाणं वाटतं. कुणीतरी मोदींचा हात पिरगळला आहे. आमचं न ऐकाल तर एअर इंडिया १७१ सारखा अपघात पुनरपि घडवू, अशी धमकी दिलेली असू शकते.

 

यांकी तांबडतोंड्यास मध्यावधी निवडणुका जिंकायच्या आहेत. तस्मात तो इस्रायलशी फटकून वागणार वा तसं नाटक तरी करणार. कदाचित दोनेक वर्षांत नवा यांकी राष्ट्राध्यक्ष इस्रायलशी विपरीतीवान निपजू शकतो. अशा वेळेस भारतासारखा खंदा सहकारी सोबत असलेला बरा. यासंबंधी इंग्रजी बातमी : https://www.msn.com/en-in/news/other/netanyahu-warns-future-us-presiden…

 

म्हणून असली नाटकं चाललेली वाटतात. 

 

आ.न.,

-गा.पै.