Skip to main content
लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 30/09/2026 09:05 या दिवशी प्रकाशित केले.

 

इस्राएलचे पंतप्रधान श्री नेतान्याहू यांच्या संयुक्त राष्ट्र संघटनेमधील भाषणाचा मराठीत अनुवाद -


भाषणाला सुरुवात करण्याआधी मला काही लोकांचे आभार मानायचे आहेत. जे भेदरट आहेत आणि ज्यांची नैतिकता ढोंगी आहे त्यांनी सभात्याग केला आहे, त्यांचे मी आभार मानतो. अजून ज्यांना बाहेर चालते व्हायचे आहे त्यांनी कृपया तसे करावे ही विनंती.

सभ्य स्त्री पुरुषहो, मी १४ वर्षांपूर्वी मी याच व्यासपीठावर मी एक प्रतिज्ञा केली होती त्याचे मी तुम्हाला स्मरण करून देतो. मी म्हटले होते, की इराणच्या खुनी हुकूमशाहीला आम्ही अण्वस्त्रे करू देणार नाही. आम्ही त्यांना त्यापासून हर एक प्रयत्नाने रोखू कारण ही अण्वस्त्रे त्यांनी केवळ इस्राईल नष्ट करण्यासाठी विकसित करायचा प्रयत्न चालवला आहे. हीच अण्वस्त्रे जगाला अस्थिर करण्यासाठीही वापरली जाऊ शकतात हे लक्षात घ्या.

आम्ही तेच केले आहे हे सांगण्यास मला अभिमान वाटतोय. आता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. इराणची अणुसंशोधन केन्द्रे आणि अण्वस्त्रे संशोधन केंद्रे उद्ध्वस्थ करणे हे सोपे काम कधीच नव्हते. अर्थात हा निर्णय घेणे इस्राईलचा पंतप्रधान म्हणून माझ्यासाठी फार सोपे होते, कारण नाहीतर आम्ही आज जिवंत राहिलो नसतो.

आत्ता ज्या राष्ट्रप्रमुखांनी सभात्याग केला आहे त्यांच्यापैकी कित्येक देशांचे आम्ही आमच्याबरोबर रक्षण केले आहे. ही विडंबना म्हणायची नाहीतर काय ! आम्ही इराणचे अण्वस्त्र तळ उद्ध्वस्थ केले म्हणून यातील कित्येक राष्ट्रप्रमुखांनी खाजगीत आमचे आभारही मानले आहेत. साऱ्या विश्र्वात यासारखा ढोंगीपणा शोधूनही सापडणार नाही, पण ते सत्य आहे.

इस्राईलला या पृथ्वीतलावरून नष्ट करण्याची धमकी आम्हाला वारंवार मिळत आली आहे. ही काही पहिली वेळ नाही. जून १९६७ या महिन्यात आम्ही शत्रूराष्ट्रांनी वेढले गेलो होतो आणि त्यांनीही अशीच धमकी आम्हाला दिली होती हे तुम्हाला आठवत असेल. त्यावेळी आम्ही ज्युडिया सामारियामध्ये नव्हतो. हा प्रदेश तर आमचे मुळस्थान आहे. ज्यू हा शब्दच ज्युडिया या नावावरूनच आला आहे. आम्ही त्यावेळी गझात नव्हतो ना आम्ही गोलनच्या टेकड्यांवर होतो. मि ओशारा, तुम्हाला माहीत असायला हवे की मोझेसच्या काळापासून ज्यू जमात गोलनच्या टेकड्यांवर स्थायिक होती. पुरावा म्हणून तुम्ही बायबल वाचू शकता.

ज्याला तुम्ही आम्ही सिक्स डेज वॉर (१९६७) म्हणून ओळखतो, त्या युद्धाआधी आम्ही वर उल्लेख केल्याल्या कुठल्याही प्रदेशात नव्हतो. आम्ही एका अत्यंत छोट्या प्रदेशात राहात होतो. अरब राष्ट्रांकडे जेवढी भूमी होती त्याच्या एक टक्क्याच्या १/३ भूमी आमच्या ताब्यात होती, ज्याला आज तुम्ही इस्राईल म्हणून ओळखता. असे असले तरी आज ते आमच्यावर निर्लज्जपणे वसाहतवादी असल्याचा आरोप करतात. काहीजण लाजेने ज्यू थोडेसे वसाहतवादी असल्याचा आरोप करतात. आणि हा आरोप कोण करतंय? ज्यांनी वसाहतवाद हा शब्द जन्माला घातलाय ते. ज्यांनी जगभर अत्याचार करून स्वतःच्या वसाहती उभारल्या त्या राष्ट्रांनी असे आरोप करताना जराशी तरी लाज बाळगायला हवी.

त्यावेळेपासून इस्राईलच्या या छोट्याशा भूमीने आपले अस्तित्व टिकवून धरले आहे. हा भूमीचा प्रश्न नाही हा राष्ट्राच्या सीमांचा प्रश्न नाही, तर सर्व सीमांवरील ज्यूंच्या अस्तित्वाचा हा प्रश्न आहे. त्याच काळात अरब सैन्याने आमची कत्तल करून इस्राईलचे नाव नकाशावरून पुसून टाकण्याची धमकी दिली होती. त्यांची आक्रमण करण्याची तयारीही झाली होती.

तुम्हाला माहीत आहे का, की इस्राईलची प्रजा त्यावेळेस काय करत होती? आम्ही युद्धात आमचे जे सैनिक मारले जातील, त्यांची शवे पुरण्यासाठी सामूहिक थडगी खणत होतो.

त्यावेळी मी शाळकरी विद्यार्थी होतो. फिलाडेल्फियामध्ये शिकत होतो. युद्धाला तोंड फुटण्याआधी पाच दिवस आधी मी इस्राईलला परत गेलो. सगळीकडे ब्लॅक आऊट जाहीर झाला होता. युद्धाला तोंड देण्याची तयारी चालली होती. वातावरण तंग आणि गंभीर होते. मी परत आलो होतो तो माझ्या भावाला, जोनाथन योनाटन योनी, याला भेटण्यासाठी.

त्यावेळी त्याचे वय होते २१ वर्षं. तो पॅराट्रूपर रेजिमेंटमध्ये अधिकारी होता. इतर रेजिमेंटस्प्रमाणे त्याचीही रेजिमेंट आघाडीवर रुजू होण्याच्या तयारीला लागली होती. मी त्याला शोधत असताना मला कळले, की त्याची रेजिमेंट रमालाजवळ असलेल्या एका संत्र्याच्या बागेत हलली आहे. मी तेथे गेलो आणि एका सैनिकाला विचारले, ‘‘योनी नेतान्याहू कुठे आहे हे तुम्हाला माहीत आहे का?’’ त्याने उत्तर दिले की त्याला माहीत नाही. दोन तीन सैनिकांनी असेच उत्तर दिल्यावर मी निराश झालो, तेवढ्यात एकाने विचारले, ‘‘तो पोरगेलेसा सैनिक का? तो पुढच्या बागेत आहे.’’ झाडांच्या लांबलचक रांगांच्या शेवटी तो मला अचानक दिसला. मी धावतपळत त्याच्याकडे गेलो. मला पाहताच त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. ‘‘बीबी!!’’ तू काय करतो आहेस इथे?’’ आम्ही आनंदाने एकमेकांना मिठी मारली आणि एका टेबलावर जेथे कॉफीची तात्पुरती सोय करण्यात आली होती, तेथे एकत्र कॉफी प्यायला बसलो. माझ्या मनात एकच प्रश्न होता (तसा तो प्रत्येक इस्राईलीच्या मनात होता) आणि मला तो कोणाला तरी विचारायचा होता.
 

‘‘योनी पुढे काय होणार आहे?’’ तो क्षणभर बोलायचा थांबला आणि माझ्याकडे रोखून बघत त्याने उत्तर दिले ते मी कधीच विसरणार नाही. ‘‘आपण जिंकणार आहोत, कारण आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही!’’

हे उत्तर त्याने मला कालच दिले असल्यासारखे मला स्पष्ट आठवतंय.

ते युद्ध जिंकल्यावर पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्राईलला जाणारे एक विमान हायजॅक केले. त्यांनी ते विमान आफ्रिकेला एन्टेबी विमानतळावर उतरवले आणि इस्राईलच्या ताब्यात असलेले सगळे अतिरेकी सोडून देण्याची मागणी केली. ती मान्य झाली नाहीतर सर्व ज्यू उतारूंना ठार मारण्यात येईल अशीही धमकी देण्यात आली. त्यांनी नाझींप्रमाणे सर्व ज्यू उतारूंना इतर उतारूंपासून वेगळे केले आणि त्यांचा मानसिक छळ केला.

१४ जुलै १९७६ या दिवशी अमेरिकेला २०० वर्षे पूर्ण झाली आणि त्याच दिवशी एका नाट्यमय बचाव मोहिमेत इस्रायली कमांडोंनी सर्व  ओलीस ठेवलेल्या १०३ ज्यू नागरिकांना सुरक्षितपणे इस्राईलला परत आणले.

या मोहिमेत एकच इस्रायली सैनिक/अधिकारी मृत्यू पावला. त्याचे नाव आहे योनी. माझा भाऊ. युगांडा सरकारनी तो जेथे पडला तेथे त्याचे स्मारक उभे केले आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो.

मित्रांनो, ‘‘जिंकण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही!’’ हे योनीचे शब्द आजही तेवढेच लागू पडतात. आम्ही जिंकणार आहोत, कारण आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही.

७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी हे जेवढे ठामपणे सिद्ध झाले तेवढे आजवर कधीच झाले नाही. तो दिवस इस्राईलच्या इतिहासातील सगळ्यात काळा दिवस होता. त्या दिवशी हजारो पॅलेस्टाईन अतिरेक्यांनी इस्राईलवर गझामधून भ्याड हल्ला चढवला. एक लक्षात घ्या, त्या दिवशी गझामध्ये एकही इस्रायली नव्हता. सामान्य नागरिक नव्हता ना एकही सैनिक.

अर्थात त्याने त्यांना काही फरक पडला नाही. हमासच्या अतिरेक्यांनी ज्यूंची जी कत्तल केली, ती नाझींनी ज्यूंची जी कत्तल केली त्याच्यापेक्षा कमी नव्हती. त्यांनी घरोघरी जाऊन, निर्घृणपणे सामान्य नागरिकांची कत्तल केली. हे करताना त्यांनी त्यांच्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवले. या मृत्यूच्या थैमानाचा त्यांना आनंद होत होता. त्यांनी हे हत्याकांड करताना इंटरनेटवर त्याचे चित्रीकरण दाखवले. असे क्रौर्य आजवर तुम्ही पाहिले आहे का?

आणि त्यांनी कोणाचे मुडदे पाडले? इस्रायली नागरिकांचे, जे त्यांचे शेजारी होते, ज्यांनी त्यांना नोकऱ्या दिल्या, त्यांच्या मुलांना इस्राईलच्या इस्पितळात कर्करोगासाठी मोफत वैद्यकीय उपचार दिले. असला कृतघ्नपणा तुम्ही पाहिला आहे का?

या हमासच्या राक्षसांनी जे नाझींपासून वाचले होते, त्यांचे मुडदे पाडले. त्यांनी लहान बाळांना त्यांच्या आईबापांसमोर जिवंत जाळले. त्यांनी आमच्या स्त्रियांवर बलात्कार केले आणि नंतर त्यांना ठार मारले. आमच्या तरुणांची मुंडकी उडवली. त्या दिवशी १२०० इस्रायली नागरिकांना ठार मारण्यात आले.

ज्या देशाची लोकसंख्या १० दशलक्ष आहे त्यांच्यासाठी याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुम्हाला एक तुलना सांगतो. लोकसंख्या आणि जमिनीचे क्षेत्रफळ यांचे प्रमाण पाहिले तर असे म्हणता येईल की एका दिवसात ४०,००० निष्पाप अमेरिकन नागरिक ठार झाले. ९-११ या दिवशी ठार झालेल्या नागरिकांपेक्षा १६ पट. थोडक्यात इस्राईलमध्ये त्या दिवशी सोळा ‘‘९-११’’ सारखी हत्याकांडे घडवून आणण्यात आली.

त्या काळ्या दिवशी झालेल्या या हत्याकांडामुळे आम्ही खचून जाऊ असे आमच्या शत्रूंना वाटत होते, पण आम्ही खचलो नाही. आम्ही उठलो आणि सिंहासारखे लढलो.

गेले तीन वर्षे आमच्या शूर सैनिकांनी प्राणांची पर्वा न करता दिवस रात्र सात आघाड्यांवर युद्ध केले. न्यू जर्सीच्या आकाराच्या देशाने सात आघाड्यांवर युद्ध केलेले आपल्याला माहीत आहे का? आणि ते सुद्धा सतत तीन वर्षे. हमास, हुती, इराण, इराकमधील अतिरेकी, सिरियामधील युद्धखोर संघटना, पॅलेस्टाईनचे अतिरेकी. या सगळ्यांनी एकत्र येऊन आम्हाला या पृथ्वीतलावरून नष्ट करण्याची प्रतिज्ञाच केली होती.

त्यांचा या युद्धात पराभव झाला कारण खचून जाण्याऐवजी आम्ही त्यांचे कंबरडे मोडले. आमच्या अमेरिकन मित्रांबरोबर आम्ही इराणच्या लष्कराचा, नौदलाचा आणि हवाईदलाचा पराभव केला. आम्ही त्यांना आज चिरडून टाकले आहे. एवढेच नाही तर आम्ही त्यांची अणुऊर्जा प्रकल्प नष्ट केले.

आम्ही हमासला ठोकले. आम्ही त्यांना झोडपून काढले. तुम्हाला पेजर्सने काय केले हे आठवत असेलच. कदाचित तुम्हाला आठवणार नाही, पण हेजबल्लाला निश्चितच आठवत असेल.

इस्राईलवर रोखलेल्या त्या १५०,००० क्षेपणास्त्रांचे काय झाले याचा अंदाज तुम्ही बांधू शकता. ती सगळी नष्ट झाली आहेत. हेजबल्लाचे नेते ठार झाले आहेत. त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले आहे.

जहाल अतिरेकी, सामूहिक हत्याकांड करणारे, ज्यांनी फक्त इस्राईलच्या नागरिकांना मारलेले नाही तर ब्रिटन, अमेरिका आणि इतर अनेक देशांच्या निष्पाप नागरिकांना ठार मारलेले आहे. खामेनी, डाईफ, सिनवार, हानिये, नसरल्ला आणि इतर हजारो अतिरेकी वर गेले आहेत.

आता उरलेले अतिरेकी हताश होऊन परत एकदा एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक दिवशी ते आमच्या नागरिकांना ठार मारण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः आमच्या मूळस्थानात, ज्युडियामध्ये. परत एकदा सांगणे भाग आहे. या शब्दापासूनच ज्यू हा शब्द आला आहे. ही आमची भूमी आहे.

दर वर्षी आमच्या कुटुंबांवर रस्त्यात हजारोने हल्ले केले जातात. ते गर्भार स्त्रियांनाही सोडत नाहीत. त्यांनी आजवर कुटुंबाच्याकुटुंबे ठार मारली आहेत. अर्थात आंतरराष्ट्रीय माध्यमांत या बातम्या कधीच येत नाही ना या कुठे छापून येत. छापून काय येते तर मूठभर दगडफेक करणाऱ्या मुलांना इस्राईलच्या सैनिकांनी अटक केली. ही मुले दगडफेक करतात, शेतकऱ्यांची ऑलिव्हची झाडे तोडतात, त्यांना आगी लावतात. त्यांना हे कोण करायला सांगते हे सगळ्यांना माहीत आहे. हे सहन करण्यापलीकडचे आहे, मग आम्ही ही प्रकरणे शीनबेतकडे सोपवतो. त्याला ते आमच्या नागरिकांचा हिंसाचार म्हणतात.

या शिनबेतच्या कारवाईत एक दोन मृत्यू ओढवले असतील. त्याच्यावर चर्चा होतात, पण आमच्या कायद्याची चाड ठेवणाऱ्या, सामान्य नागरिकांवर झालेल्या हजारो हल्ल्यांची चर्चा होत नाही.

ही विकृती मी समजू शकत नाही. येथे काहीजण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असल्यासारखे म्हणतात की ते वसाहतवाद्यांचा हिंसाचार सहन करू शकत नाहीत. दुर्दैवाने असे म्हणावे लागते आहे की तुम्हाला तुम्ही काय बोलताय हे कळत नाही.

ऐका, दोनच दिवसांपूर्वी घडलेल्या एका घटनेविषयी मी आमचे सहकारी श्री. मॅन्युएल मॅक्रॉन यांना आठवण करून देतो. नॅथॅनिएल शुक्रून नावाच्या एका फ्रेंच नागरिकाला एका झऱ्याला भेट देताना गोळ्या घालून ठार मारण्यात आले. त्यावेळी त्याचा १६ वर्षाचा मुलगा त्याच्याबरोबर होता. त्याचे शेवटचे शब्द होते, ‘‘पळ मुला पळ!! स्वतःला वाचव!!’’

अजून एका घटनेत नारिया राईटर नावाच्या एका राखीव दलाच्या सैनिकाला गाडीखाली चिरडण्यात आले. आता तो मृत्यूशी इस्पितळात झुंज देतोय. येथे येण्याआधी मी त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. हा सैनिक येचियेल राईटरचा मुलगा आहे. येचियेल आमचा अमेरिकेतील राजदूत आहे. याच्याच थोरल्या मुलाचा भूसुरुंग निकामी करताना गझामध्ये मृत्यू झालाय. या दोघांनाही चार मुले होती. येचिएल, माझ्या भावा, तुझे दुःख मी समजू शकतो. सारा इस्राईल आणि जगभरातील नागरिक तुझ्या दुःखात सहभागी आहेत.

पण कितीही दुःख झाले, कितीही वेदना झाल्या तरी आम्हाला माघार घेणे परवडणारे नाही. नारिया राईटरने त्याच्यावर हल्ला होण्याआधी एक पोस्ट लिहिली होती. त्यात तो काय लिहितो ते नीट ऐका, ‘‘आम्हाला दुसरा देश नाही. जे आहे त्याचे रक्षण करणे हे आम्ही आमचे पवित्र कर्तव्य समजतो.’’

नेरिया आणि त्याच्या सारख्या इस्राईलच्या सुपुत्रांना मी वचन देतो : तुमचा त्याग वाया जाणार नाही. आम्ही आपल्या देशाचे रक्षण करत राहू. आणि त्यात आम्ही यशस्वी होणार आहोत याची खात्री बाळगा, कारण आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही.

या रानटी लोकांविरुद्धच्या लढाईत आम्हाला प्रेसिडेंट ट्रंप यांच्या इतकी मदत  कोणाचीच झाली नाही. मी त्यांचे आभार मानतो. त्यांनी मोठ्या धैर्याने अमेरिका, इस्राईल आणि जगावर कोसळलेल्या संकटाशी सामना केला आहे.

दहा वर्षांपूर्वीच त्यांनी हे संकट ओळखले होते. त्यांना तसेच सोडले तर ते ‘‘डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्राईल ’’ या घोषणा ते माथेफिरू अमलात आणतील याची आम्हाला खात्री होती. म्हणून अमेरिकेने आणि इस्राईलने एकत्र येऊन जगाला नाशापासून वाचवले आहे.

शूर अमेरिकन आणि इस्राईलच्या वैमानिकांनी इराणच्या भूमीवर अनेक हल्ले चढवले. इस्राईलच्या आणि अमेरिकेच्या सैनिकांनी एकत्रितपणे गझामधून ओलिस ठेवलेले नागरिकही सोडवले. आम्ही जिवंत असलेल्या प्रत्येक ओलिसाला सोडवून आणले आहे.

तुम्ही विचाराल की आम्ही हे युद्ध का जिंकतोय? योनीने याचे स्पष्ट उत्तर, साधासुध्या शब्दात केव्हाच दिले आहे, ‘‘आमच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता आणि नाही.’’

या दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धात आम्ही आमच्या ध्येयापासून किंचितही ढळलो नाही. आमचे ध्येय होते हे युद्ध जिंकणे. आमचा सारा देश, मुले, तरूण उजवे, डावे, पुरुष, स्त्रिया, धार्मिक आणि उदारमतवादी, सर्वांनी आमच्या भविष्यासाठी हे युद्ध अत्यंत नेटाने आणि शौर्याने लढले.

आमच्यात मतभेद नव्हते का? अर्थात होते ना! कुठल्या देशात मतभेद नसतात? पण अणीबाणीच्या काळात हे मतभेद बाजूला सारून आम्ही आमचे भविष्य घडवू शकतो. हे शक्य झाले त्याला कारण आहे, आमचा इतिहास, आमची संस्कृती आणि आमचे शौर्य. आमच्या नागरिकांनी १००० बॅलास्टिक क्षेपणास्त्रांच्या वर्षावाला ज्या धैर्याने तोंड दिले ते धैर्य.

सभ्य स्त्रीपुरुषांनो आज आपण जनरल असेंब्ली हॉलमध्ये बसलो आहोत. यावर एक टनी क्षेपणास्त्र पडले तर काय होईल याची आपल्याला कल्पना आहे का? त्याने ही इमारत आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर खाक होईल.

आमच्या शहरांवर असली १००० क्षेपणास्त्रे आकाशातून पडली तर काय होईल याची आता तुम्ही कल्पना करू शकाल. मी आमच्या शूर नागरिकांना सलाम करतो. मी आमच्या सैनिकांना- ज्यात ख्रिश्चन आहेत, ज्यू आहेत, ड्रूझ आहेत आणि मुसलमान आहेत, त्यांना सलाम करतो.

तीन वर्षं आमचे शूर सैनिक या सात आघाड्यांवर न थकता युद्ध करत आहेत, पण या युद्धात अजून एक आघाडी आहे. हे युद्ध सत्यासाठी आहे. हे युद्ध सोशल मिडियावर अत्यंत क्रौर्याने लढले जात आहे.
अनेक देशांनी लाखो कोटी डॉलर्स खर्च करून माझ्या देशाबद्दल खोटा प्रचार चालवला आहे. यात प्रथम क्रमांक लागतो कतारचा. काही दशकांपासून कतार अमेरिकन विद्यापीठांना यासाठी भरघोस देणग्या देत आहे. त्यांना इस्राईलविरुद्ध विखारी प्रचार करण्यासाठी भाग पाडले जात आहे आणि यात त्यांना मदत करते अल्जझिरा. त्यांनी युरोपमध्येही हेच धोरण राबवले होते. त्यात त्यांनी एकच उद्दिष्ट समोर ठेवले होते. तरुणांची मने कलुषित करून त्यांची माथी इस्राईलविरुद्ध भडकावणे. त्यांना अमेरिकेचा आणि पश्चिमी देशांचा द्वेष करण्यास शिकवणे. कतारने ७ ऑक्टोबरच्या गुन्हेगारांना राजाश्रय दिला आहे.

आता या कुकर्मात अजून एका देशाने उडी घेतली आहे. ज्यूंचा द्वेष करणारा हा अजून एक देश आहे. त्याचे नाव तुर्कस्तान. त्याचा पंतप्रधान एर्दोगान एक क्रूर, जुलमी तानाशाह आहे. हा देशही हमासच्या अतिरेक्यांना आश्रय देतो. त्याने हजारो कुर्दी नागरिकांची कत्तल केली आहे. हा माणूस अर्मेनियाचा वंशविच्छेद आजही नाकारतोय. तो पत्रकारांना आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना निर्दयपणाने तुरुंगात टाकतो. मला तर वाटते यात आजतरी या जगात कोणी याचा हात धरू शकणार नाही. त्याने बेकायदेशीरपणे उत्तर सायप्रसवर कबजा केला आहे. हा देश युरोपियन युनियनचा सदस्य आहे आणि ग्रीस सारख्या दुसऱ्या सदस्याच्या प्रदेशांवरून कटकटी निर्माण करत असतो. हा नाटोचाही सदस्य आहे. आता त्याला सिरियावर कब्जा करायचा आहे. अर्थात त्यात आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही, कारण हा माणूस इस्राईलला नष्ट करण्याची धमकी रोजच देत असतो. त्याला म्हणे जेरुसलेमचा राजा व्हायचे आहे.

तुम्ही होणार नाही! आम्ही तुम्हाला तसे करू देणार नाही. जेरुसलेम आमचे शहर आहे आणि अनंतकाळ आमची राजधानी राहणार आहे.

जगातील अत्याचारी तानाशाही राजवटी आम्हाला सतत धमक्या देत असतात. त्यांना वाटते की खोट्यानाट्या प्रचाराची यंत्रणा राबवून ते आम्हाला अस्थिर करू शकतील, पण युद्धभूमीवर जे घडत आहे तेच येथेही होणार आहे कारण आमचा या संघर्षातही विजय होणार आहे, कारण आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही.

अर्थात याला जरा वेळ लागेल. त्यांचा खोटारडेपणा उघड पडत चाललाय. जे स्पष्ट दिसत आहे हे मान्य करण्यास थोडा वेळ द्यावा लागेल. उदा. पॅलेस्टाईनच्या हमासने सामान्य नागरिकांना ढाल म्हणून वापरले, इस्पितळाच्या तळघरात बंकर बांधले, मशिदीच्या तळघरात शस्त्रात्रे साठवली, गझाच्या मदतीतील बराचसा भाग हमासच्या अतिरेक्यांनी चोरलाय हे आम्ही सांगत होतो, पण ही वस्तुस्थिती मान्य करायला त्यांना बराच वेळ द्यावा लागलाय.

इकडे हमासने नागरिकांना जबरदस्तीने ढाल म्हणून वापरले तर आमच्या सैन्याने युद्धभूमी सोडण्याचे लाखो मेसेजेस त्यांच्या नागरिकांना पाठवले. आम्ही लाखो फोन केले, आम्ही हवेतून कोट्यवधी पत्रके टाकली.

मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. वंश विच्छेद करणारी कुठली राजवट लाखो पोलिओची लस शत्रूच्या प्रजेला पुरवते? गझाला २० लाख टन अन्नाचा पुरवठा करते? म्हणजे माणशी एक टन अन्नाचा आम्ही पुरवठा केला आहे. इस्राईलवर वंशविच्छेदाचा आरोप करणे यासारखा खोटारडेपणा या जगात नाही.

हा खोटा प्रचार किती विकृत आहे हे तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर तुम्ही कर्नल जॉन स्पेन्सर काय म्हणतोय ते ऐकले पाहिजे. कर्नल स्पेन्सर वेस्ट पॉईंट येथे नागरी युद्धाभ्यासाच्या विभागाचा प्रमुख आहे. नागरी युद्धाचा त्याचा अभ्यास दांडगा आहे. त्याने प्राचीन काळापासून ते आत्तापर्यंत जी काही नागरी युद्धे झाली आहेत त्यांचा सखोल अभ्यास केला आहे. तो या विषयातील एक तज्ञ मानला जातो. तो म्हणतो, ‘‘नागरिकांची जीवितहानी होऊ नये म्हणून इस्राईलने जेवढी काळजी घेतली आहे तेवढी काळजी आत्तापर्यंत कोणीच घेतलेली नाही.’’

आम्ही सामान्य माणसे मरू नयेत म्हणून अनेक पावले उचलली. याला तुम्ही वंशविच्छेद म्हणाल काय ? हे तर नरसंहाराच्या विरुद्ध आहे.

जे आमच्या देशाविरुद्ध आणि आमच्या बहादूर सैनिकांविरुद्ध खोटा प्रचार करतात, मग ते या सभागृहात बसणारे असोत किंवा बाहेर न्यू यॉर्कच्या ज्यूद्वेष्टी मेयरच्या कार्यालयात बसणारे असोत, मी त्यांना म्हणतो, ‘‘तुम्हाला शरम वाटली पाहिजे. तुम्ही बेशरम आहात.’’ तुम्हाला सत्याचा विपर्यास करण्याची लाज वाटली पाहिजे. आक्रमक आणि पिडीत यांची अदलाबदल केल्याबद्दल तुम्हाला शरम कशी वाटत नाही? सत्यावर थुंकताना तुमची मान खाली कशी गेली नाही?

ममदानी तुम्ही न्यू यॉर्कचे मेयर झाल्यापासून ज्यूंना न्यू यॉर्कमध्ये सुरक्षित वाटत नाही हे सत्य आहे. ते बोलतात माझ्याशी. सांगतात मला. ते म्हणतात, ‘‘पूर्वीचे न्युयॉर्क राहिलेले नाही. अर्थात यात काही अघटित घडले आहे असे वाटण्याची अजिबात गरज नाही. ज्या गुन्हेगारांनी हमासला उघडपणे पाठिंबा दिलाय त्यांना तुम्ही पाठीशी घालता, त्यांची स्तुती करता. तुमच्याकडून अजून काय अपेक्षा करणार? अमेरिकेला ९/११ ने चांगली अद्दल घडवली, अमेरिकेला हीच शिक्षा हवी होती असे म्हणणाऱ्यांना तुम्ही जवळ केले आहे. ते तुमचे चांगले मित्र आहेत.

तुम्ही त्या पत्रकाराबरोबर भोजन करता, ज्याने एका अतिरेक्याला ज्यूंना मारतानाचे चित्रीकरण केले पण त्यात त्या अतिरेक्याचे रूप उघड होईल, म्हणून ती चित्रफीत प्रसिद्ध केली नाही. अशी त्याने नंतर कबुलीच दिली आहे. ज्या पोस्टमध्ये हमासचे आणि ७ ऑक्टोबरच्या हत्याकांडाचे समर्थन केले आहे ती पोस्ट तुमच्या बायकोला आवडते. अजून एका पोस्टमध्ये तेल अव्हिव नष्ट झाले पाहिजे असे लिहिले होते, ती पोस्ट तुमच्या बायकोला आवडते. तुम्ही असल्या पोस्टचा कधीच निषेध केलेला नाही. तुम्ही सतत खोटेनाटे आरोप इस्राईलवर करत आला आहात - त्यातच एक आहे नरसंहाराचा.

मि.ममदानी, तुम्ही मला येथे येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केलात. तुम्ही माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केलात, पण तुम्ही सत्य दाबू शकत नाही. आणि सत्य हेच आहे की इस्राईलने नरसंहार केलेला नाही उलट इस्राईलने पुढे होणारा भयंकर नरसंहार थांबवला आहे.
जर आम्ही हमासचा पाडाव केला नसता तर हमासने हेच केले असते - आमचा नरसंहार. त्यांनी शेवटचा ज्यूही मारला असता.

हा जो ज्यूंविरुद्ध खोटा प्रचार तुम्ही चालवला आहे त्याचे वाईट परिणाम ज्यू भोगत आहेत. न्यू यॉर्कमध्ये ज्यूंना सिनेगॉगमध्ये जाताना धमकावले जाते. त्यांच्यावर भ्याड हल्ले केले जातात. ज्यूंची बदनामी केली जाते कारण फक्त ते ज्यू आहेत म्हणून.

ज्यूंची हत्या सिडनेमध्ये झाली आहे, मॅन्चेस्टर, कोलॅरॅडोमधील बोल्डर, अशा शहरातही अशा हत्या होत आहेत. लॉस एन्जल्स, लंडन, पॅरीस, बर्लिन, वॉशिंग्टन डीसी अशा शहरात ज्यूंवर सतत हल्ले होत असतात. ज्यू द्वेष्ट्यांना ज्यूंना भयभीत करून सोडायचे आहे. मला त्यांना एक महत्त्वाची बातमी सांगायची आहे. एके काळी ज्यू असाह्य होते, त्यांना कत्तलखान्यात हाकलत घेऊन जाण्याचे ते दिवस होते. ते दिवस आता संपले आहेत.

आज आमचा देश आहे आणि तो स्वतंत्र आहे. आज आमच्याकडे लष्कर आहे, नौदल आहे आणि हवाईदलही आहे आणि त्यांची या देशाच्या रक्षणासाठी प्राणही देण्याची तयारी आहे. माझा जगभरातील ज्यूंना एक संदेश द्यायचा आहे. तुम्ही ज्यू आहात याचा अभिमान बाळगा. ताठ मानेने चाला. आत्मविश्र्वासाने जगा. कोणाच्याही धमक्यांना भीक घालू नका.

इतरांनाही मला एक संदेश द्यायचा आहे. जर तुम्हाला सत्याची कास धरायची असेल, तर तुम्ही या रानटी जमातींशी लढण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या.

पण मला कटू असले तरीही एक सत्य येथे नमूद करावेसे वाटते. ज्याप्रमाणे इस्राईल अन्यायाविरुद्ध उभे ठाकले आहे त्याप्रमाणे युरोपमधील काही देश उभे राहिलेले नाहीत. या देशांनी ज्युद्वेष्ट्यांपुढे शरणागती पत्करली आहे. त्यांनी भेदरटपणे लांगूलचालनाचा पर्याय स्वीकारला आहे.

एक कटू सत्य नाकारता येणार नाही. जगातील अनेक देश घाबरून स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी काही करत नाहीत. मी त्यांना विचारतो, ‘‘तुमचे भविष्य काय? तुमच्या पुढील पिढ्यांचे भवितव्य काय? येणाऱ्या काळात तुमची लोकशाही टिकणार आहे की नाही? तुम्हाला लोकशाही मानणाऱ्यांचा बंधुभाव पाहिजे का मुस्लिम ब्रदरहुड पाहिजे आहे? याची उत्तरे तुम्हाला आज द्यावी लागतील.

ही जहाल अतिरेकी विचारसरणी तुमचा गळा घोटत आहेत हे सत्य तुम्ही कधी मानणार आहात?

सभ्य स्त्री पुरुषहो, इस्राईलमध्ये आम्ही इतर जग नैतिकतेच्या झापडातून उठण्याची वाट बघणार नाही, बघत नाही. आमचे भविष्य आम्हीच ठरवणार आहोत. आम्ही आरोग्य, शेती, ए आय, विज्ञान, संशोधन या आघाड्यांवर बरीच आघाडी घेतली आहे. याचा फायदा अर्थात अखिल मानवजातीला होणार आहे.

थोडक्यात सांगायचे तर, इस्राईल आजवर एवढा शक्तिशाली नव्हता. आता आम्ही घाबरत नाही. कोण घाबरत आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. इराणचे तानाशाह आज घाबरले आहेत. ते आता त्यांच्या प्रजेलाच घाबरत आहेत. शूर इराणी जनता जिने आजवर भयंकर अत्याचार सहन केले आहेत आणि कित्येकांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे.

इराणचे खोमेनी इराणच्या जनतेला आज घाबरत आहेत कारण त्यांच्या हातात आता हे उपकरण आहे. याचे नाव आहे स्टारलिंक. आता सरकारने इंटरनेट बंद केले तरी इराणी जनता सत्य काय आहे ते जाणून घेऊ शकते, त्यावर आपले विचार व्यक्त करू शकते. त्यांना आता आपले म्हणणे मांडण्याचे स्वातंत्र्य मिळेल. लाखो डॉलर खर्च करून इराणच्या सरकारने इंटरनेटवर ताबा मिळवला होता. आता ते सगळे संपुष्टात आले आहे.

अध्यक्ष महाशय, मी हे उपकरण तुमच्याकडे सोपवून जाणार आहे. आत्ता जे इराणी प्रतिनिधी मंडळ सभा सोडून गेले आहे, त्यांना ते विरुद्ध पक्षाला मिळाल्यावर हे उपकरण उपयोगी पडेल. कृपया त्यांना ते सुपुर्त करावे.

आत्ता जे बाहेर निदर्शने करत आहेत आणि ज्या ढोंगी प्रतिनिधींनी सभात्याग केला आहे, त्यांना मी विचारतो, ‘‘जेव्हा इराणच्या इस्लामी राजवटीने हजारो सामान्य इराणी नागरिकांची कत्तल केली तेव्हा तुम्ही कुठे होता. त्यावेळी तुमची वाचा का बसली होती? तुम्ही तेव्हा निदर्शने आणि उपोषणे केली होती का? तेव्हा तुम्ही इराणच्या प्रतिनिधी मंडळासमोर निदर्शने केली का? त्यांचा निषेध केला होता का? इस्राईलचे सोडा, इराण आणि त्या मध्यपूर्व प्रदेशात जेव्हा ख्रिश्चनांची कत्तल होत होती तेव्हा तुम्ही कुठे होता? त्या प्रदेशात आज फक्त इस्राईलमध्ये ख्रिश्चन जनता आनंदाने नांदते आहे.

नाही! तेव्हा तुम्ही काहीच केले नाही, कारण तुम्ही एक ढोंगी/बनावट निदर्शक आहात. तुम्हाला माहीत आहे का? मध्यपूर्वेत इस्राईल सोडून सर्व ठिकाणी ख्रिश्चनांचा संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यांचा छळ होत आहे आणि तो प्रदेश सोडून जाण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही, पण तुम्ही त्यांच्यासाठी निदर्शने केली नाहीत. आम्ही जेव्हा बेथेलेम सोडले तेव्हा तेथे ८० % जनता ख्रिश्चन होती आणि आम्ही पॅलेस्टाईन ॲथॉरिटीच्या ताब्यात दिल्यावर तेथे आत ८० ते ९० टक्के मुसलमान आहेत. मुसलमानांनी ख्रिश्चन जनतेला तेथून हाकलून लावले आहे. त्याचा तुम्ही निषेध केला का? तुम्ही त्याविरुद्ध आवाज उठवला का? नाही. दुर्दैवाने नाही..
आणि आजही तुम्ही इराणबद्दल बोलत नाही, पण तुम्हाला मला एक आनंदाची बातमी द्यायची आहे. तुमच्या ढोंगीपणाची आणि शांततेची पर्वा न करता एक दिवस इराणमध्ये काहीतरी अघटित घडणार आहे. जनशक्तीपुढे ही जुलमी राजवट कोलमडून पडणार आहे.

माझे शब्द लक्ष देऊन ऐका : एक दिवस आणि जो लवकरच येणार आहे, इराणी प्रजेला खरेखुरे स्वातंत्र्य मिळेल ही खुनी, अत्याचारी, भ्रष्टाचारी आणि क्रूर राजवट उलथवली जाईल आणि मग आपण सर्व तो दिवस साजरा करू.

सभ्य स्त्रीपुरुषहो, माझ्या जनतेची कहाणी ३००० वर्षे प्राचीन आहे. आम्ही तीच भाषा बोलतो जी तेव्हा बोलत होतो. ज्या भूमीवर आम्ही राहात होतो त्याच भूमीवर आम्ही आज राहतोय. डेव्हिड, सोलोमन, ईसा, आणि जेरेमिया यांची ही भूमी आहे. ही आमची भूमी आहे, इस्राईलची भूमी.

आमचे प्रेषित, आमची ध्येये आणि आमची प्रजा यांनी इतिहासात एक अद्वितीय स्थान मिळवले आहे. आमच्या मूल्यांनी सहस्र वर्षांपासून मानवतेला प्रेरणा दिली आहे: देवावर विश्वास, जीवनाची पवित्रता, कायद्याचे राज्य, शांतीसाठीची आपली शाश्वत तळमळ, न्यायासाठीची आपली तळमळ. हीच ती पवित्र मूल्ये आहेत ज्यांनी आम्हाला युगानुयुगे तारून नेले आहे. ही तीच मूल्ये आहेत ज्यांनी आम्हाला इतिहासात संकटांवर मात करण्यास मदत केली आहे

अमेरिकन थोर लेखक श्री मार्क ट्वेन यांनी १२५ वर्षांपूर्वी हे अत्यंत चांगल्या रितीने स्पष्ट करून सांगितले आहे. ते म्हणतात -
"या जगात सर्व युगांमध्ये ज्यूंनी एक अद्भुत लढा दिला आहे आणि तो सुद्धा आपले हात पाठीमागे बांधून. इजिप्शियन, बाबिलोनियन आणि पर्शियन लोक उदयाला आले, त्यांनी पृथ्वीच्या वैभवात भर टाकली आणि ते लोप पावले.,  इतर लोक उदयाला आले आणि त्यांनी काही काळ आपली मशाल उंच धरली, पण ती विझली आणि ते अंधारात लोप पावले. ज्यूंनी त्या सर्वांना पाहिले, त्या सर्वांवर मात केली आणि आज ते तसेच आहेत, कोणताही ऱ्हास नाही, वयोमानाचे कोणतेही दौर्बल्य नाही, त्यांच्या ऊर्जेत कधीही कमकुवतपणा आला नाही..’’

आज अनेक शतके लोटली, जुलमी राजसत्तांनी आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यात सतत अपयश आले आहे. आणि देवकृपेने त्यांना यापुढेही सतत अपयश येणार आहे. जर आम्ही धैर्याने या संकटांशी सामना केला, ठामपणे उभे राहिलो तर आम्ही यापुढेही सतत जिंकत राहू.

बायबल म्हणते तसे - इस्राईलचे अस्तित्व निरंतर राहणार आहे, आम्ही जिंकत राहणार आहोत, कारण एकच आहे, आमच्यापुढे दुसरा पर्याय नाही.

मी सर्वांचे आणि इस्राईलचे आभार मानून माझे भाषण संपवतो..

 

संकलन आणि अनुवाद : जयंत कुलकर्णी.

 


वाचने 196
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

स्वतःच्या देशासाठी भाषण असावे तर असे. खूप छान भाषण केले नेतान्याहू यांनी. आणि यातला शब्द न शब्द जर खरा असेल तर ते फार भयानक आहे. अनुवाद ओघवता केल्याने पूर्ण वाचले.


काहीही झाले असले तरी विद्यालयावर क्षेपणास्त्र सोडून १६० इराणी विद्यार्थिनी ठार मारणे अत्यंत अमानवी व घृणास्पद आहे. नेतनयाहूला रक्तपाताची चटक लागली आहे. दिसेल त्याला ठार मारत सुटलाय. गाझापट्टीतील ७५ टक्क्यांहून अधिक घरांच्या जागी केवळ दगडमातीचा ढिगारा आहे.  उपचारकेंद्रावर हल्ला करून माणसे मारणे, विद्यालयावर हल्ला करून माणसे मारणे, विवाहसमारंभावर हल्ला करून माणसे मारणे ही विकृती आहे. 

 

भविष्यात अरब देशांना कधी संधी मिळाली तर ते संपूर्ण इस्राएलमध्ये एकही ज्यू जिवंत ठेवणार नाहीत इतके शत्रुत्व निर्माण झाले आहे. 


In reply to by श्रीगुरुजी

भविष्यात अरब देशांना कधी संधी मिळाली तर ते संपूर्ण इस्राएलमध्ये एकही ज्यू जिवंत ठेवणार नाहीत इतके शत्रुत्व निर्माण झाले आहे. 


अरब देश म्हणजे नक्की कोणते देश? ज्या अरब देशांनी इस्राएलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले नाहीत त्यात एक सौदी अरेबिया हाच मोठा आणि प्रमुख देश आहे. इस्राएलशी संबंध प्रस्थापित न करणाऱ्या अरब देशांमध्ये इतर देश आहेत- कुवेत, ओमान, कतार, येमेन, अल्जिरीया, ट्युनिशिया, लिबिया, मॉरीटानिया, सोमालिया, जिबुती, सिरीया, लेबेनॉन आणि इराक. सौदी अरेबिया पण इस्राएलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित करायच्या मार्गावर होता पण ७ ऑक्टोबर २०२३ च्या घटनेनंतर ते प्रयत्न बंद झाले. सौदी वगळता यापैकी नक्की कोणता अरब देश इस्राएलमध्ये एकही ज्यू जिवंत ठेऊ शकणार नाही असा विध्वंस करायच्या स्थितीत आहे? सौदीनेही १९४८ आणि १९७३ चे युद्ध यात इस्राएलविरोधात काही प्रमाणात थेट भाग घेतला होता. पण इतर दोन युध्दांमध्ये तो ही घेतला नाही. आणि तसेही सौदीला हुतींची कटकट सांभाळताना नाकेनऊ येत आहेत. ते नसते झेंगट आपल्या गळ्यात घेतील असे वाटत नाही. तेव्हा शत्रुत्व निर्माण झाले असले तरी इस्राएलचा असा विध्वंस करू शकेल अशा स्थितीत कोण आहे? इराण हा काही अरब देश नाही पण जर आताची युध्दाची भानगड संपली आणि इराण अणुबॉम्ब बनवू शकला तर कदाचित इराणच अणुबॉम्ब टाकून ते करू शकेल. नाहीतर इतर कोणताही देश ते करायच्या स्थितीत आहे असे वाटत नाही.

 

अरब देशांमध्ये पॅलेस्टिनींना आश्रय दिलेला ट्युनिशिया हा एक देश होता. तो वगळता तोंडदेखल्या पॅलेस्टिनींना समर्थन देणाऱ्या कोणत्या अरब देशाने पॅलेस्टिनींना या या केले होते? जॉर्डनने तर १९७० मध्ये पॅलेस्टिनींना आपल्या देशातून हाकलून लावले होते. त्याचे कारण १९७० पर्यंत यासर अराफात जॉर्डनमध्ये होते आणि पी.एल.ओ ने जॉर्डनच्या सरकारचे वर्चस्व झुगारून द्यायला सुरवात केली होती- कुठे पोलिस स्टेशनवर हल्ला कर, कुठे सरकारी इमारतींवर हल्ला कर असले प्रकार पी.एल.ओ च्या लोकांनी सुरू केले होते. हा उद्दामपणा कोण मान्य करणार होते? म्हणून जॉर्डनने सप्टेंबर १९७० मध्ये ब्लॅक सप्टेंबर नावाने (कु)प्रसिध्द असलेल्या कारवाईत पॅलेस्टिनींना त्यांच्या देशातून हाकलून दिले. मग अराफात बैरूतला पळून गेले.

आणि हो... ब्लॅक सप्टेंबरसाठी जॉर्डनला कोणी मदत केली होती?पी.एल.ओ ची डोकेदुखी मुळापासून मिटवायला जॉर्डनने आपला मित्रदेश पाकिस्तानकडे मदत मागितली. तेव्हा याह्याखानने झिया उल हकला जॉर्डनच्या मदतीला पाठविले आणि ब्लॅक सप्टेंबरच्या लष्करी आखणीत झिया उल हक होता. त्यावेळेस जॉर्डनने पाकिस्तानच्या मदतीने जवळपास २५ हजार पॅलेस्टिनींना कंठस्नान घातले होते. १९७० पर्यंत इस्राएलनेही २५ हजार पॅलेस्टिनींना ठार मारले नव्हते- तितके पाकिस्तानने मारले. त्यानंतर साडेतीन वर्षातच काय झाले? फेब्रुवारी १९७४ मध्ये लाहोरमध्ये ओ.आय.सी च्या परिषदेत लिबियाच्या मुअम्मर गद्दाफीने पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला जाहीर पाठिंबा दिला. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून लाहोरमधील क्रिकेट मैदानाचे नाव गद्दाफी स्टेडिअम असे दिले गेले आहे. त्यावेळेस झालेल्या जाहीर सभेत कोण कोण होते बघा-

यासर अराफात लाहोरला त्या परिषदेत सहभागी झाले होते- इतकेच नाही तर पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमालाही पाठिंबा द्यायच्या गद्दाफीच्या प्रस्तावाला अनुमोदनही दिले होते. म्हणजे इस्राएलने मारले होते त्यापेक्षा जास्त पॅलेस्टिनी मारायला पाकिस्तानने मदत केली तरीही पाकिस्तानबरोबर त्या पॅलेस्टिनींचे वैर नव्हते तर पाकिस्तानला ते समर्थनच देत होते. हे कोडे कसे सोडवायचे? 

जाता जाता... या फोटोत यासर अराफात आणि झुल्फिकार अली भुत्तोंच्या मध्ये कोण आहे? तर शेख मुजिबूर रेहमान. पाकिस्तानने सप्टेंबर १९७० मध्ये २५ हजार पॅलेस्टिनींना मारायला मदत केली होती. म्हणजे पॅलेस्टिनींचे त्यांच्याशी वैर असले तरी बांगलादेशपेक्षा- आणि त्यातही मुजीब नेते असलेल्या बांगलादेशपेक्षा कितीतरी कमी हवे. पाकिस्तानने मार्च ते डिसेंबर १९७१ मध्ये बांगलादेशात २५-३० लाख बांगलादेशींना ठार मारले होते आणि तेच शेख मुजीबूर रेहमान त्या बांगलादेशच्या लढ्याचे नेते होते. तरीही त्यांना परत त्याच पाकिस्तानच्या गळ्यात गळे घालायला काही वाटले असे दिसत नाही. बरं त्या मुजीबचे लाहोर विमानतळावर स्वागत कोणी केले होते? तर टिक्काखानने- तोच टिक्काखान- बुचर ऑफ बांगलादेश नावाने कुप्रसिध्द.

एकूणच धर्मच सर्वात महत्त्वाचा- सर्वतोपरी दिसतो. आणि त्यातही पंथ, हॅशेमाईट विरूध्द इतर वगैरे भेद आहेतच. त्यामुळे पॅलेस्टिनींच्या नादाला खरं तर कोणी लागू नये.


In reply to by चंद्रसूर्यकुमार

युद्ध असो वा मतभेद वा कोणताही संघर्ष तुटेपर्यंत ताणायचा नसतो. इस्राएल नेमके हेच विसरलाय. 

 

इस्राएल जितका जास्त नरसंहार सुरू ठेवेल तितकी पॅलेस्टिनी किंवा अरबांच्या मनातील आग भडकत जाईल. आज इस्राएलच्या शस्त्रसामर्थ्यापुढे अरब देश दुर्बल दिसतात. पण म्हणून ते गप्प बसून राहिले असे नाही. ३ वर्षांपूर्वी हमासने एकाच दिवसात १२०० इस्राएली मारले होते. आजच ११ सप्टेंबरसारखा विमान अपघात करण्याचा प्रयत्न फसला व त्यामुळे १८० ज्यू प्रवासी वाचले. परंतु एक प्रयत्न फसला म्हणून हमास, हुती, तुर्की, इराणी गप्प बसणार नाहीत. ते नवीन कल्पना शोधतच राहतील.

 

आज जरी इस्राएल तुलनेने खूप बलाढ्य असला तरी जगाच्या इतिहासात एकच देश सर्वकाळ तसाच बलाढ्य राहत नाही. पूर्वी जगावर राज्य करणारा इंग्लंड आज लष्करीदृष्ट्या एक साधारण देश आहे. महाशक्ती अमेरिकेला इराणला पराभूत करता येत नाही व इराणचा अणुकार्यक्रमही थांबविता येत नाही. इराणकडे अणुबॉम्ब आला की पहिला हल्ला इस्राएलवर होईल. अमेरिकेने प्रदीर्घ काळ इराणची आर्थिक व लष्करी नाकेबंदी करून इराणला अणुकार्यक्रमाकडे जाण्यास भाग पाडले आहे. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब अमिराती हे अरब देश इस्राएलशी आज जुळवून घेत असले तरी संधी मिळत असेल तर ते तात्काळ विरोधात जातील. 

 

तुटेपर्यंत ताणू नये हे इस्राएलला समजेल तो सुदिन. 


राष्ट्रीय रक्षा अकादमी ( एन डी ए) च्या मुख्य इमारतीत एका मोठ्या गरुडाची प्रतिकृती आहे आणि त्याच्या खाली लिहिलेले आहे.

Train your team to win

beause

there is no runners up award in war.  

 

देशाच्या सीमा चरख्याच्या सुताने नव्हे तर तलवारीच्या टोकाने आखायच्या असतात - स्वातंत्र्यवीर सावरकर