याज्ञवल्क्य ऋषींच्या आश्रमात त्या दिवशी नेहमीपेक्षा वेगळीच शांतता होती. सकाळची कामे नेहमीप्रमाणे सुरू होती; शिष्य वेदपठण करत होते, अग्नीसमोर आहुती दिली जात होती, आश्रमातील गाईंची देखभाल सुरू होती. बाहेरचे जीवन आपल्या नेहमीच्या लयीत चालले होते; पण याज्ञवल्क्यांच्या मनात मात्र काहीतरी निर्णायक घडून गेले होते. अनेक वर्षे शास्त्राध्ययन, यज्ञ, चर्चा, राजसभांतील प्रश्नोत्तरे आणि ब्रह्मविद्येवरील चिंतन यांत व्यतीत केल्यानंतर आता त्यांना आपले जीवन एका नव्या दिशेने वळवायचे होते.
याज्ञवल्क्यांना जाणवत होते की ज्ञानाबद्दल बोलणे आणि त्या ज्ञानात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाहेरच्या जगात मिळवण्यासारखे बरेच काही त्यांनी मिळवले होते; पण मनाच्या अंतरंगात अजून एक प्रवास बाकी होता. त्यांनी गृहस्थाश्रमातून निवृत्त होऊन पुढील जीवन साधना आणि आत्मविद्येच्या चिंतनासाठी अर्पण करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या दोन पत्नी होत्या, मैत्रेयी आणि कात्यायनी. कात्यायनी गृहस्थजीवनातील व्यवहार, आश्रमाची व्यवस्था आणि दैनंदिन जबाबदाऱ्या सांभाळत असे. मैत्रेयी मात्र स्वभावानेच जिज्ञासू होती. तिला संपत्तीपेक्षा ज्ञानाचे आकर्षण होते. याज्ञवल्क्यांनी आपला निर्णय दोघींना सांगितला आणि म्हणाले, “माझ्याकडे जे धन आहे, ते तुमच्यामध्ये वाटून देतो. त्यानंतर मी दुसऱ्या जीवनमार्गाला निघेन.”
कात्यायनीने त्यांच्या निर्णयाचा स्वीकार शांतपणे केला. पण मैत्रेयी काही क्षण विचारात पडली. तिच्या मनात एक प्रश्न उभा राहिला आणि तिने तो थेट विचारण्याचे ठरवले.
“आर्य,” ती म्हणाली, “समजा या संपूर्ण पृथ्वीवरील संपत्ती माझ्या वाट्याला आली, तरी त्या संपत्तीमुळे मला अमरत्व मिळेल काय?”
याज्ञवल्क्यांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित उमटले.
“नाही, मैत्रेयी. संपत्तीमुळे मनुष्याचे जीवन सुखकर होऊ शकते, त्याला वैभव मिळू शकते; परंतु संपत्तीमुळे अमरत्व मिळत नाही. धनवान मनुष्य जसे जीवन जगतो, तसेच जीवन तुला मिळेल. पण त्यातून अमरत्वाची आशा करता येणार नाही.”
मैत्रेयी काही क्षण शांत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर जणू धनाचे सारे आकर्षण क्षणात फिके झाले.
“आर्य,” ती म्हणाली, “ज्यामुळे मला अमरत्व मिळणार नाही, त्या संपत्तीचे मी काय करू? जर आपल्याला जे माहीत आहे, जे आपल्याला मृत्यूच्या पलीकडे नेऊ शकते, ते ज्ञान मला मिळू शकत असेल, तर मला त्याबद्दल सांगा. आपण ज्या मार्गाने अमरत्वाचा शोध घेत आहात, तो मार्ग मला जाणून घ्यायचा आहे.”
याज्ञवल्क्य काही क्षण तिच्याकडे पाहत राहिले. हा प्रश्न संपत्ती नाकारणाऱ्या स्त्रीचा साधा प्रश्न नव्हता. त्यामागे जीवनाच्या अंतिम सत्याचा शोध होता.
“मैत्रेयी,” ते म्हणाले, “तू धनाबद्दल विचारले असतेस तर मी तुला धनाचे वाटप सांगितले असते. पण तू आज मला जे विचारलेस, तो प्रश्न मला प्रिय आहे. ये, माझ्याजवळ बस. मी तुला जे सांगणार आहे ते काळजीपूर्वक ऐक.”
मैत्रेयी त्यांच्या समोर बसली.
याज्ञवल्क्यांनी हळूहळू बोलायला सुरुवात केली.
“मैत्रेयी, या जगात आपल्याला अनेक गोष्टी प्रिय असतात. पती पत्नीला प्रिय असतो, पत्नी पतीला प्रिय असते. पुत्र प्रिय असतो, संपत्ती प्रिय असते, मित्र प्रिय असतात, समाज, सत्ता, प्रतिष्ठा, देवता—या सगळ्यांशी माणसाचे प्रेम जोडलेले असते. पण विचार कर. एखादी वस्तू आपल्याला का प्रिय वाटते?”
मैत्रेयी शांतपणे ऐकत होती.
“एखादा पती केवळ पती म्हणून प्रिय असतो का? पत्नी केवळ पत्नी म्हणून? पुत्र केवळ पुत्र म्हणून? धन केवळ धन म्हणून? माणूस ज्या गोष्टींवर प्रेम करतो, त्यामागे त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाशी जोडलेली एक खोल आकांक्षा असते. म्हणूनच श्रुती म्हणते—
‘न वा अरे पत्युः कामाय पतिः प्रियो भवति, आत्मनस्तु कामाय पतिः प्रियो भवति।’
पती पती म्हणून प्रिय नसतो; आपल्या आत्मस्वरूपाच्या कारणाने तो प्रिय होतो. त्याचप्रमाणे पत्नी, पुत्र, धन, जग, देवता—या सर्वांचे प्रेम शेवटी आत्म्याशीच येऊन जोडले जाते.”
मैत्रेयीने मध्येच विचारले, “म्हणजे आपण ज्या प्रत्येक गोष्टीवर प्रेम करतो, त्या प्रेमाच्या मुळाशी आपले स्वतःचे अस्तित्व आहे?”
“हो,” याज्ञवल्क्य म्हणाले. “आणि म्हणूनच प्रश्न बाहेरच्या वस्तूंचा उरत नाही. प्रश्न आहे तो त्या ‘स्व’चा. ज्याला आपण ‘मी’ म्हणतो, त्या ‘मी’चे खरे स्वरूप काय आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.”
मैत्रेयीच्या चेहऱ्यावरची उत्सुकता अधिक गडद झाली.
याज्ञवल्क्य पुढे म्हणाले, “त्या आत्म्याचा शोध घेण्यासाठी केवळ ऐकणे पुरेसे नाही. त्यासाठी श्रवण, मनन आणि अंतर्मुख चिंतन आवश्यक आहे. म्हणून श्रुती सांगते—
‘आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्यः।’
आत्म्याचे दर्शन घ्यायचे आहे; त्याच्याविषयी ऐकायचे आहे; ऐकलेल्या सत्याचे मनन करायचे आहे आणि त्यातच मन स्थिर करून निदिध्यासन करायचे आहे.”
मैत्रेयीने विचारले, “पण आर्य, आपण म्हणता तो आत्मा दिसत कसा नाही? मग त्याचा शोध घ्यायचा तरी कसा?”
याज्ञवल्क्य म्हणाले, “जे दिसते, ते तू पाहतेस. जे ऐकू येते, ते तू ऐकतेस. जे मनात येते, त्याचा तू विचार करतेस. पण या सगळ्या अनुभवांच्या मागे जो जाणणारा आहे, त्याच्याकडे लक्ष दे.”
ते काही क्षण थांबले.
“तुला एखाद्या नगाऱ्याचा आवाज ऐकू आला तर तुझे लक्ष आवाजाकडे जाते. पण तो आवाज निर्माण करणारा नगारा नसेल, तर आवाज कुठून येणार? शंखाचा नाद ऐकताना नाद वेगळा आणि शंख वेगळा असे म्हणता येते; वीणेचा स्वर ऐकताना स्वर जाणवतो, पण त्या स्वरामागे वाद्य आहे. मात्र हे उदाहरणही पूर्ण नाही. कारण आत्मा एखाद्या बाह्य वाद्यासारखा नाही. तो तर अनुभव घडण्याचीच पूर्वअट आहे.”
मैत्रेयी त्यांचे शब्द मनात साठवत होती.
“डोळे बाहेरचे रूप पाहतात. कान आवाज ऐकतात. जीभ चव ओळखते. त्वचा स्पर्श जाणते. मन या अनुभवांना जोडते, त्यांची तुलना करते, त्यांच्याबद्दल विचार करते. पण या सर्वांना ‘मी पाहिले’, ‘मी ऐकले’, ‘मला जाणवले’, ‘मला समजले’ असे कोण म्हणते?”
मैत्रेयीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.
“मन?”
“मनाचा विचार कोण करतो?”
ती पुन्हा शांत झाली.
“डोळे?”
“डोळ्यांनी पाहिलेले दृश्य कोण जाणतो?”
मैत्रेयीच्या चेहऱ्यावर विचारांची छाया उमटली.
याज्ञवल्क्य म्हणाले, “इथेच शोधाचा खरा वळण आहे. डोळ्यांनी दृश्य पाहिले जाते; पण डोळे स्वतःला पाहू शकत नाहीत. मन विचार करते; पण त्या विचारांची जाणीव कोणाला होते? बुद्धी निर्णय घेते; पण ‘मी निर्णय घेतला’ हे कोण जाणते?”
आश्रमातील वातावरण अधिकच शांत झाले होते. बाहेर कुठेतरी पक्ष्यांचा आवाज येत होता. अग्नी मंदपणे जळत होता. पण मैत्रेयीचे लक्ष आता बाहेरच्या कोणत्याही गोष्टीकडे नव्हते.
“आर्य,” ती हळू आवाजात म्हणाली, “म्हणजे आपण ज्याला जाणतो, ते आत्मा नाही; कारण जाणलेली वस्तू आपल्यापासून वेगळी असते. मग आत्मा तो आहे जो या सगळ्याला जाणतो?”
याज्ञवल्क्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले.
“हो. पण इथेच शेवटचा आणि सर्वांत कठीण प्रश्न उभा राहतो.”
मैत्रेयीने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिले.
“तो कोणता?”
“ज्याच्यामुळे हे सर्व ज्ञात होते, त्या जाणणाऱ्याला तू जाणणार कसे?”
मैत्रेयी काही क्षण गप्प राहिली. प्रश्न साधा होता; पण त्यातच सगळे गुंतले होते.
“आपण एखाद्या वस्तूला जाणतो तेव्हा ती वस्तू आपल्या जाणिवेचा विषय बनते. पण जर जाणणाऱ्यालाच आपण जाणण्याचा विषय बनवला, तर त्या जाणणाऱ्याला जाणणारा पुन्हा कोण?”
याज्ञवल्क्य म्हणाले, “याच कारणाने आत्मा हा बाहेरून पाहायची वस्तू नाही. तो एखादा पर्वत, नदी, अग्नी किंवा तारा नाही की आपण त्याच्याकडे पाहून म्हणावे—‘हा आत्मा.’ तो तर त्या पाहण्याच्या क्रियेलाच शक्य करणारा आधार आहे.”
मैत्रेयीच्या मनात आता आणखी एक प्रश्न निर्माण झाला.
“मग आर्य, आत्म्याचे ज्ञान म्हणजे नेमके काय? जर तो एखाद्या वस्तूप्रमाणे जाणता येत नसेल, तर ‘आत्मज्ञान झाले’ असे म्हणायचे तरी कसे?”
याज्ञवल्क्य म्हणाले, “ज्या क्षणी मनाला हे स्पष्ट होते की जाणणाऱ्याला एखाद्या वस्तूप्रमाणे बाहेर उभे करून पाहता येणार नाही, त्या क्षणी शोधाची दिशा बदलते. आपण आतापर्यंत ‘मला काय माहीत आहे?’ असे विचारत आलो. आता प्रश्न असतो—‘मला माहीत आहे, हे कोणाला माहीत आहे?’”
मैत्रेयी निःशब्द झाली.
याज्ञवल्क्य पुढे म्हणाले, “जेव्हा दोन गोष्टी वेगळ्या असतात, तेव्हा एक दुसऱ्याला पाहू शकतो, ऐकू शकतो, जाणू शकतो. तू एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला पाहतेस कारण तू आणि तो पाहिला जाणारा वेगळे आहात. तू एखादा शब्द ऐकतेस कारण ऐकणारी आणि ऐकली जाणारी गोष्ट वेगळी आहे. तू एखाद्या वस्तूचा विचार करतेस कारण विचार करणारे मन आणि विचाराचा विषय यांत भेद आहे.”
ते थांबले.
“पण जेव्हा सर्वांच्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेले ते एकच आत्मतत्त्व जाणायचे आहे, तेव्हा त्याला दुसऱ्या वस्तूप्रमाणे समोर ठेवून कोण जाणणार? तोच तर सर्व जाणण्यामागचा आधार आहे.”
मैत्रेयी बराच वेळ काही बोलली नाही.
तिच्या मनात सुरुवातीचा प्रश्न पुन्हा उभा राहिला—‘संपत्तीमुळे अमरत्व मिळेल का?’
त्या वेळी तिला वाटले होते की अमरत्व म्हणजे कदाचित मृत्यूच्या पलीकडे जाणारी एखादी गोष्ट असेल. आता तिला जाणवत होते की याज्ञवल्क्य तिचे लक्ष मृत्यू टाळण्याच्या कल्पनेपासूनच दूर नेत आहेत. प्रश्न शरीर किती काळ टिकेल हा नव्हता; प्रश्न ‘मी’ म्हणून ज्याला आपण ओळखतो, त्याचे खरे स्वरूप काय आहे हा होता.
याज्ञवल्क्यांनी तिच्याकडे पाहिले.
“मैत्रेयी, ज्यामुळे हे सर्व जाणले जाते, त्या जाणणाऱ्याला पुन्हा कोणाच्या माध्यमातून जाणणार?”
आणि मग त्यांनी उच्चारले—
“विज्ञातारमरे केन विजानीयात्?”
मैत्रेयीसमोर जणू एक वेगळेच दार उघडले होते.
ज्याला ती शोधत होती, तो तिच्या बाहेर नव्हता.
ज्याच्यामुळे ती प्रश्न विचारत होती, विचार ऐकत होती, त्यावर मनन करत होती—तोच त्या प्रश्नाच्या केंद्रस्थानी होता.
पण तरीही प्रश्न उरला होता—
मग तो जाणणारा कोण?
पैजारबुवा,
मिसळपाव
प्रतिक्रिया
इत्यलम्...
मिपावर श्रीगणेश लेखमाला काही कारणाने खंडित झाली, त्याचे किंचितसे प्रायश्चित्त म्हणून ही लेखमाला लिहायला घेतली. सात-आठ कथा तर बऱ्याच दिवसांपासून मनात आणि कागदावर तयार होत्याच.
यावेळी गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्यामुळे बारा कथांची मालिका लिहायची, असे ठरवले. जेव्हा याबद्दल सासंशी चर्चा केली, तेव्हा त्यांनी, “तुम्ही लिहाच, आम्ही सोबत आहोतच,” असा ठाम पाठिंबा दिला. त्यानंतर डोक्यात असलेल्या उरलेल्या कथांनाही या निमित्ताने शब्दबद्ध करता आले.
ही लेखमाला लिहिताना एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली—कथा लिहिणे हा एकतर्फी प्रवास नसतो. प्रकाशित झालेल्या कथांवर अनेक अभ्यासपूर्ण, विचार करायला लावणारे आणि कधी कधी कथेकडे नव्या दृष्टीने पाहायला भाग पाडणारे प्रतिसाद आले. त्यामुळे मालिका पूर्ण करण्याचा उत्साह तर वाढलाच; पण काही प्रतिसादांमुळे प्रकाशित करण्यापूर्वी काही कथांमध्ये आवश्यक ते छोटे-मोठे बदलही करता आले. वाचकांनी केवळ कथा वाचल्या नाहीत, तर त्या कथांबरोबर विचारांचाही प्रवास केला, ही माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे.
या संपूर्ण लेखमालेत वेळ काढून प्रतिक्रिया देणाऱ्या सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या प्रश्नांनी, सूचनांनी, कौतुकाने आणि कधी कधी केलेल्या कानउघाडणीनेही या कथांना अधिक समृद्ध केले आणि ज्यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता ही मालिका शांतपणे वाचली, त्या सर्व मूक वाचकांचेही तितकेच मनःपूर्वक आभार.
बारा दिवस, बारा कथा आणि त्यामागे असंख्य विचार, संदर्भ, चर्चा आणि आठवणी....हा प्रवास आता इथे थांबवतो.
इत्यलम्.
पैजारबुवा,