Skip to main content

बेभरवश्याचा निसर्ग

लेखक psajid यांनी गुरुवार, 24/09/2026 11:02 या दिवशी प्रकाशित केले.

संपूर्ण महाराष्ट्रात आज कुठंही पाऊस नाही. विधाता कोपलाय ? का ऋतुचक्र बदललंय ? हे कळेनासे झालंय. सगळीकडे ऐन पावसाळ्यात चक्क ऊन पडलंय, ढगांचा पत्ता नाही, आक्टोबर हिट आतापासून जाणवू लागली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. चार महिन्यांच्या पावसाळ्यावर पुढचे आठ महिने जगण्याचं गणित मांडणारा शेतकरी आज त्या निरभ्र आकाशाकडे आशाळभूतपणे डोळे लावून पाहतोय. पोटच्या लेकरांसारखं जपलेल्या जित्राबांच्या काळजीनंही शेतकरी हवालदिल झालाय… कारण शेतात उभं असलेलं पीक हे शेतकऱ्यासाठी केवळ पीक नसतं. त्यात त्याची स्वप्नं असतात..., कर्जफेडीची आशा असते......, लेकरांच्या शिक्षणाची चिंता असते....., घरच्या संसाराची धडपड असते !

कधी काळी पावसाचं गणित ऋतूंशी जोडलेलं होतं. आता मात्र पाऊस कधी येईल, किती येईल आणि किती दिवस टिकेल…. याचा भरवसाच राहिलेला नाही. कधी काही तासांत मुसळधार पाऊस पडतो आणि सगळं वाहून जातं… तर कधी पिकाला सर्वाधिक गरज असताना आभाळ कोरडं ठाक होतं. सांगायचा मुद्दा हा कि, ह्या पावसाचं काही खरं नाही... तो अंदाजावर नाही तर आपल्या मर्जीने कोसळतो. अलीकडे असंच होतंय. तो आपल्या वेळेत कधीच येत नाही. आणि आला तर आपल्या मर्यादेतपण राहत नाही. मागील तीन - चार वर्षांपूर्वी पण ह्या पावसाने दोन महिने वाट पाहायला लावून ऑगस्ट मध्ये तुफान बरसला. असा कोसळला कि त्याने सगळीकडे हाहाकार उठवून दिला, महापूर आला. घरं पडली, शेती बुडाली. प्राणी, माणसं यांची दैना दैना केली. रंक आणि राव सगळी रस्त्यावर आली.

कधीकधी वाटतं कि, आतासारखा निसर्ग पूर्वी बेभरवश्याचा कधीच नव्हता. तो माणसातलं शहाणपण घेऊन धरणीवर यायचा. अचूक वेळेवर बदलायचा. त्यावेळी सगळी मानवजात एकमेकांसाठी हृदयातली ओल जपायची, माणूस माणसातलं माणूसपण जपून रहायचा. त्यामुळे असेल कदाचित पण सगळं ऋतू त्यांच्या वेळेवर नेमाने यायचे…..

थंडी अशी पडायची कि लोकं काकडून जायची, थंडीत म्हातारी माणसं आपल्या दारातल्या चुलीला काट्या कुट्या किंवा शेणकुटानं पेटवून स्वतःला आणि पाण्याची डिचकी नाहीतर भगून्यालाही गरम करत बसायची. सकाळी - रात्री मोकळ्या जागेत शेकोट्या पेटवून गप्पा व्हायच्या. ऊस तोडलेल्या फडातंन नाहीतर उकिरड्यावरनं आणलेला पाला पाचोळा पेटवून माणसं उबीला बसायची. उन्हाळा असा यायचा कि माणसं हैराण व्हायची, वाहता वारा सुद्धा उन्हाच्या झळा घेऊन लोकांना पार करपून - काळवंडून टाकायचा, जीवाची पार कायली करायचा. जेष्ठ महिन्यात वळीव येईपर्यंत नुसती तगमग तगमग व्हायची. लोकं वेळेवर रानातली कामं करायची. पेरण्या व्हायच्या. मग पावसाळा पण त्येच्या वेळेवर यायचा, धो - धो पडायचा, ओढ्या - वगळी - नाले- नद्या तुडुंब भरून वहायच्या. पाऊस इतका बेदम पडायचा कि पार अगदी माणसांना घरातनं बाहेर पडणं जिकिरीचं हुन जायाचं, कुणीतरी कोंडून ठेवल्यागत अवस्था व्हायची. घराबाहेर नुसता चिकूल – राडीराड ! जरी त्यावेळी पाऊस अमाप पडायचा तरी तो लोकांना आनंद द्यायचा, जगण्यात उत्साह आणायचा, सर्वाना हर्षभरीत, उल्हासित करायचा. मुलं बारदाण्याची किंवा युरियाच्या पोत्याची खोळ डोक्यावर घेऊन पावसात धावणाऱ्या पाण्यात कागदी नाव सोडायला आणि मोठी माणसं ओढ्या नदीला मासं धरायला, काही लोकं पडणाऱ्या पावसात आणि बोचऱ्या थंड हवेत गुरं-ढोरांना गवताच्या कुरणात - डोंगरावर चरायला सोडून आपणही मनसोक्त माळावर आलेले कांगुण्या, करवंद, जांभळं यासारखा माकडमेवा खात फिरायची. मुक्या प्राण्यांबरोबरच निसर्ग माणसांनाही खाण्यासाठी रानमेवा घेऊन स्वागताला उभा राहायचा.

श्रावणात पडणारे इंद्रधनुष्य पाहून वाटायचं कि सप्तरंगात न्हालेल्या धरतीचं प्रतिबिंब जणू सगळं नभ व्यापून राहिलंय. पाऊस थांबल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा फुललेल्या हिरव्याकंच झाडीतनं बेडकांचे डराव - डराव, किर्र किड्याची किरकिर, साळी- टिटवीच्या झुडपं - पाण्यातलं लहान किडं टिपताना येणाऱ्या “टीट टीट टीट हूट” आवाजानं परिसर भरून जायचा. रंगीबेरंगी फुलपाखरं, भुंगा-घोडा उगाचच रस्त्याच्या दुतर्फा पांढऱ्या फुलांनी फुललेल्या गारवेलीच्या हिरव्या पानावरुन इकडून तिकडं फिरायची. संध्याकाळी दिवस मावळतीकडे झुकला कि काजवे रात्रीच्या अंधारल्या आकाशात चमचमणाऱ्या ताऱ्यांशी पिवळी धमक रांगोळी काढून स्पर्धा करायची. मग कुणीतरी एखादा काजव्याला तळहातावर हळुवार घेऊन दोन्ही हात अलगत मिटायचा अन उगाच हळूच त्याच्या पोटाखाली लुकलुकणारा तो सोनेरी-हिरवा प्रकाश पाहत रहायचा. निसर्ग वेगवेगळ्या हंगामात असा वातावरण भारून टाकणारा ऋतू घेऊन यायचा. त्या खळाळत्या झऱ्यासारख्या आठवणीं प्रत्येक माणसाच्या मनात रुतून बसलेल्या असतील. कवी मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांत सांगायचं तर “दिवस फुलायचे अन मन झोपाळ्यावाचून झुलायचे” असे मोरपंखी क्षण भेटायला यायचे.

आता मात्र हे सर्व चित्र बदलून गेलंय, बोलताना आपण सहज बोलून जातो माणूस बदललाय म्हणून निसर्ग बदलला पण त्या बदललेल्या लोकांत आपणही आहोत का ? याचा विचार करायला पाहिजे. रस्ते विकास किंवा अन्य कारणासाठी होणारी झाडांची कत्तल थांबली पाहिजे. जुनी जाणती माणसं आपल्याबरोबरच इतरांसाठी space ठेवून, त्यांचा विचार जपून आयुष्याला सामोरं जात होती. त्यावेळी एकमेकांच्या भावनांचा आदर करून किंवा एकमेकांना सवलत देऊन जगण्यात जे आत्मिक सुख किंवा समाधान मिळायचं, ते सुख किंवा ते समाधान लोकांना परमोच्छ बिंदूवर झुलवत ठेवत राहायचं. त्या सोनेरी दिवसात इतरांच्या कामी आपले काही क्षण खर्ची जाण्यातला पराकोटीचा आनंद जीवनातल्या कुठच्याही आनंदापेक्षा कमी नक्कीच नव्हता. जुन्या सोनेरी दिवसातलं जगणं हे संस्कारक्षम आयुष्य होतं, ज्यामध्ये लोकं फक्त माणसांचीच नाही तर निसर्गापासून प्रत्येक जीव-जंतूंची काळजी घेत वाटचाल करायची. 
एकमेकांविषयी पूर्वीसारखी आत्मीयता किंवा आपुलकी आता राहिली नाही. आयुष्य घडवण्याच्या शर्यतीत माणूस फक्त ससा - कासवाच्या गोष्टीमधल्या सस्यासारखा धावत सुटलाय….. स्वतःच्या मर्जीनुसार वागू लागलाय…. म्हणूनच कदाचित माणसासारखाच निसर्गही लहरी झाला असावा.  बाकी काय .... ?

वाटतं ते पूर्वीचं जगणं, पुन्हा नशिबी यावं....
व्यवहार वजा होऊन, प्रेम बाकी राहावं !

* साजीद पठाण (दह्यारी)

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 93
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

तुमच्या लेखातून तगमग जाणवली, तसेच पूर्वी ऋतूचक्र कसे चाले, व त्यानुसार ग्रामीण जीवनाचा रहाटगाडा कसा चाले, हे छान लिहीले आहे.

 

फक्त एकच-- दुष्काळ महाराष्ट्राच्या पाचवीलाच पुजलेला आहे. विशेषत: मराठवाडा हा पारंपारीक दुष्काळी टापूच समजला जातो. १९७२ चा दुष्काळ मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राने भोगलाय. तेव्हा, 'पूर्वी सर्वकाही आलबेल होते, आता निसर्गाचे काहीतरी बिनसले आहे', हे थोडे अतिशयोक्त वाटते. 

 

असेच लिहीत रहा,