गणेशा यान्ची लेखमाला पुढे नेत हा एक चरण -
प्रिय सागर,
तुझ्या मिलनासाठी आतूर मी हजारो मेल प्रवास करुन येते. हा किती कठीण प्रवास असतो हे तुला कधीच कळणार नाही. इतकी वर्षे मी तुला कधीच तक्रार केली नव्हती. आपले मिलन झाल्याक्षणी आपण दोघे एक होतो. मी माझी आणि तू तुझा राहातच नाही. त्यामुळे मी तुझी किंवा तू माझी तक्रार करायचा प्रश्नच येत नाही. आपले मिलन झाल्यावर उत्छ्ंखल मीदेखील तुझ्यासारखी धीरगंभीर होते. तुझी अपार सहनशक्ती माहीत असल्याने, माझे अंग मलीन करणाऱ्या लोकांना क्षमा करायला मी शिकले आहेच. पण अजूनही मी तुझ्यासारखी स्थितप्रज्ञ होऊ शकले नाही. माझ्या खेळकरपणावर बंधने लदणाऱ्या लोकांवर रागावून मी कधीकधी त्यांची घरे उद्ध्वस्त करते. मला माहीत आहे की माझे वर्तन म्हणजे ‘वड्याचे तेल वांग्यावर काढण्यासारखे आहे. परंतु तुझा शांतपणा मला जमत नाही. तू मात्र युगानुयुगे साऱ्या जगाची पापे पोटात घेऊन ज्ञानी ऋषीसारखा सोसत रहातोस. वसुंधरेला आपण दोघेही वस्त्रे पुरवितो. तू तिच्या विशाल देहावर शीतल पांघरूण घातले आहेस. तर मी तिच्या विविधरंगी सौंदर्याला लपेटणारी वस्त्रे पुरविली आहेत. मेघराज आपणा दोघांनाही सततचा जीवनावश्यक आहार पुरवित असतात. त्याची कृतज्ञता म्हणून वसुंधरेच्या कुटुंबाचे पालनपोषण आपण दोघे मिळून करतो. हे चक्र युगानुयुगे सुरू आहे.
परंतु हे सागरा, आजचे युग मात्र आपले राहिले नाही असे म्हणावे लागते आहे. हे युग पालनकर्त्याचाच नाश करणाऱ्या कृतघ्नांचे आहे. ठिकठिकाणी माझी गळचेपी केली जात आहे. माझ्या अंगावर शहरांची विष्ठा विसर्जित केली जात आहे. विषारी रसायनांचे अर्क मला भरवले जात आहेत. कृश झालेल्या माझ्या देहावर दगडमातीचे ढिगारे लोटून तिथे शहरे वसवली जात आहेत. पुर्वी जी शहरे माझ्या अंगाखांद्यावर खेळली ती आता मला मरणभूमी बनवत आहेत. तुला भेटल्यावर मला कळतेय की तुझी अवस्थादेखील माझ्यासारखीच दयनीय झाली आहे. माझ्या अंगावर सांडलेले प्लॅस्टिक आणि घाण शेवटी तूच सहन करीत आहेस. तुझ्या दयाळू स्वभावामुळे तू मात्र क्रुद्ध होत नाहीस. मला माहीत आहे, आतामध्ये तू धुमसतो आहेस. तुझा वाढणारा ताप आता या कृतघ्न लोकांनासुद्धा कळू लागला आहे. त्यामुळे चिंतीत झालेले काहीजण अपुरी किंवा काहीजण तोंडदेखली उपाययोजना करीत आहेत. पण हा आपण मानवजातीला वाचविण्यासाठी महान कार्य करीत आहोत असा खोटा अभिमान आहे.
सागरराजा, मला अगदी दु:खाने म्हणावेसे वाटते की तुझा ज्वर थांबवू नकोस. पुर्वी अगस्ती ऋषींनी तुला प्राशन केले होते. आता तापाने अंग फुलवून गिळून टाक साऱ्या पृथ्वीला. शिकव मोठा धडा या कृतघ्न लोकांना. मीदेखील त्याचवेळी तांडव करेन. ही घाण संपवून आपण दोघे पुन्हा शुद्ध होऊ आणि नवनिर्मिती करुन वसुंधरेला पुन्हा सुजलाम सुफलाम बनवू या. एकदा तरी माझे मागणे ऐक रे!
तुझी सरीता
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
👍
👍
अप्रतिम
अप्रतिम