Skip to main content

शुनःशेप — मृत्यूच्या वेदीवर

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शनिवार, 19/09/2026 10:53 या दिवशी प्रकाशित केले.

पहाटेचा प्रकाश अजून डोंगरांच्या पलीकडेच होता.

अजून सगळीकडे अंधार पसरला होता. जंगलातील झाडांच्या फांद्यांवर रात्र थांबून होती. दूर कुठेतरी एखादा पक्षी जागा झाला होता.

पण त्या अंधारात राजा हरिश्चंद्र जागा होता, राजवाड्याच्या अंगणात एकटाच उभा राहून आकाशाकडे पाहत, त्याच्या चेहऱ्यावर राजेपणाचा गर्व नव्हता, फक्त चिंता होती.

कित्येक वर्षांपासून  त्याला एकच  दुःख होते.  राज्य होते, संपत्ती  होती, सेवक होते, सामर्थ्य  होते, पण या सगळ्या वैभवाला वारस नव्हता.  त्याने वरुणदेवाची प्रार्थना केली.

देवा, मला पुत्र दे. पुत्र झाला तर मी तुझ्यासाठी यज्ञ करीन. तुला तो पुत्र अर्पण करीन.”

काळ पुढे सरकला, त्याला पुत्र झाला, राजवाड्यात आनंदोत्सव झाला, राजकुमाराचे नाव ठेवले गेलेरोहित.

राजा मुलाकडे पाहून हरखून गेला.

पण वरुणाला दिलेला  शब्द त्याच्या कानात घुमत होता. “ तुला पुत्र अर्पण करीन"

राजाचे मन दुभंगले, एकीकडे देवाला दिलेले वचन, दुसरीकडे नुकताच जन्मलेला मुलगा.

तो दिवस ढकलत राहिला.

मूल अजून लहान आहे…. नवजात आहे….. अजून त्याला  दात आलेले नाहीत… आता तो थोडा मोठाहोऊ दे.” असे  करता करता रोहित मोठा झाला, एक दिवस वरुणाने पुन्हा मागणी केली.

राजा घाबरला.

त्याने रोहितकडे पाहिले.

नाही...”

त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडला….पण वचन तर दिलेहोते.

रोहितला जेव्हा समजले की आपल्या वडिलांनी आपल्याला यज्ञात अर्पण करण्याचे वचन दिले आहे, तेव्हा त्याच्या मनात भीती निर्माण झाली. त्याने राजवाडा सोडला, धनुष्य घेतले आणि जंगलात निघून गेला.

मी परत गेलो तर मृत्यू आहे,” तो स्वतःशी म्हणाला.

तो  जंगलात फिरत राहिलादिवस  गेले... महिने गेले…. काळ पुढे जात राहिला तसा वरुणाचा कोपही वाढत गेला. त्याने राजाला शाप दिला

राजाला व्याधी झाली, त्याचे पोट फुगू लागले.

वैद्यांनी उपचार केले, नाना प्रकारची औषधे दिली, पण रोग कमी झाला नाही.

राजाच्या लक्षात आले, हे वरुणाच्या वचनभंगाचे फळ आहे.”

त्याने रोहितला परत बोलावण्याचा प्रयत्न केला, पण रोहित परतला नाही, तो तसाच जंगलात भटकत राहिला

एके दिवशी जंगलातून फिरताना रोहितला एक अजिगर्त  नावाचा मनुष्य दिसला. त्याच्या सोबतत्याची पत्नी  आणि तीन मुले होती. घर दारिद्र्याने ग्रासलेले होते, कपड्यांवर ठिगळे होती, मुलांच्या चेहऱ्यावर उपासमारीची छाया होती.

रोहित त्यांच्याजवळ गेला,  त्याने त्यांची अवस्था पाहिली, काही वेळ तो शांत राहिला.

मग त्याच्या मनात एक भयंकर विचार आला.

त्याने अजिगर्ताला विचारले,

यजमान तुम्ही तुमच्या मुलांपैकी एकाला मला द्याल का?”

अजिगर्ताने त्याच्याकडे पाहिले.

कशासाठी?”

रोहितने सत्य सांगितले.

राजासाठी यज्ञ करायचा आहे. यज्ञा साठी मनुष्य हवा आहे.”

अजिगर्ताच्या चेहऱ्यावर कठोर भाव आले.

माझा मोठा मुलगा मी देणार नाही. कारण तो माझा उत्तराधिकारीआहे

रोहितने दुसऱ्या मुलाकडे पाहिले.

अजिगर्त म्हणाला,

धाकटा तर अजिबात नाही कारण तो माझ्या पत्नीला अतिशय प्रिय आहे.”

मग त्यांची नजर तिसऱ्या मुलावर शुनःशेप वर गेली.

तो शांतपणे उभा होता.

वडिलांच्या चेहऱ्याकडे पाहत होता.

त्याला सर्व काही समजत होते.

मला विकणार?”

त्याने हळू आवाजात विचारले.

अजिगर्ताने नजर चुकवली.

रोहितने त्याला धन देण्याचे मान्य केले.

शुनःशेपची किंमत ठरली, मुलगा विकला गेला, त्या शुनःशेपला जाणवले, आपल्या वडिलांनी आपल्याला एका वस्तूपेक्षाही  कमी किंमत दिली आहेतो काही बोलला नाही.

राज्यात यज्ञाची तयारी सुरू झाली, मोठमोठे वेदीमंडप उभारले गेले, ऋत्विज आले, मंत्रोच्चार सुरू झाले, अग्नी पेटवले गेले, लोकांची गर्दी जमली, पण त्या गर्दीत शुनःशेप शांत उभा होता.

त्याला यज्ञाच्या वेदीजवळ नेण्यात आले, त्याचे हात बांधले गेले, त्याच्या डोळ्यां समोर यज्ञाग्नी  जळत होता

त्याने आजूबाजूला पाहिले, इतके लोक, इतके मंत्र, इतका विधी...पण त्याच्यासाठी त्या सगळ्याचा एकच अर्थ होतामृत्यू.

त्याला प्रश्न पडला मीच का ? मीच का मरावे?”

त्याला उत्तर मिळाले नाही.  त्याने आकाशाकडे पाहिले,  “देवा, जर तू आहेस... तर मला वाचव.”

ऋत्विजांनी शून:शेपला यज्ञवेदीला बांधायला नकार दिला, सैनिक सेवक किंवा प्रजाजनांपैकी सुद्धा कोणीही हे कार्य करायला तयार नव्हते, अजिगर्त पुढेआला आणि म्हणाला, “मी बांधतो.”

त्याने स्वतःच्या मुलाला दोराने वेदीला बांधले, शुनःशेपने त्याच्याकडे पाहिले , क्षणभर त्यांच्या नजरा भिडल्या , मुलाच्या डोळ्यांत प्रश्न होता, वडिलांच्या डोळ्यांत मात्र काहीच नव्हते, अजिगर्ताने नजर वळवली, शुनःशेपच्या मनात काहीतरी तुटले.

नरबळी देण्यासही ऋत्विजांनी नकार दिला चांडाळाला पाचारण केले गेले त्यानेही राजाची आज्ञा मानण्यास नकार दिला, मग एक हजार गायींच्या बदल्यात अजितर्ग बळी घेण्यास तयार झाला. त्याने खड्ग हाती घेतले.

वेदीला बांधलेला शुनःशेप डोळे मिटून बसला. त्याला आठवलेऋषी, देव, आकाश, सूर्य, वारा...

त्याला वाटले, “माझ्याकडे शस्त्र नाही. माझ्याकडे सैन्य नाही. माझ्याकडे संपत्ती नाही. माझ्याकडे वाचवण्यासाठी कोणी नाही. हात पाय जखडलेले आहेत, आता मोकळा आहे तो  म्हणजे फक्त माझा आवाज .”

त्याने प्रार्थना सुरू केली.तो देवांना हाक मारू लागला, वरुणाला , इंद्राला , अग्नीला, आदित्याला. 

त्याचा आवाज सुरुवातीला थरथरत होता. पण हळूहळू त्यात सामर्थ्य आले, तो मृत्यूला विनवणी करत नव्हता, तो जीवनाला हाक मारत होता.

एका मागूनएक मंत्र त्याच्या मुखातून बाहेर पडू लागले.

यज्ञमंडपातील लोक शांत झाले , ऋत्विज त्याच्याकडे पाहू लागले, अग्नीच्या ज्वाला वर उठत होत्या, आकाशात वारा वाहू लागला.

शुनःशेपचा आवाज आणखी स्पष्ट झाला. “मला या बंधनातून मुक्त कर.”

अचानक राजाच्या शरीरातील वेदना वाढल्या, तो विव्हळला.

शुनःशेप मात्र डोळे मिटून प्रार्थना करत राहिला.

त्याच्या मनात आता भीती पेक्षा वेगळीच भावना होती.

मी या देहा पुरता नाही.”

माझा आवाज माझ्यापेक्षा  मोठा आहे.”

मी जगू इच्छितो.”

आणि त्या क्षणी जणू वातावरणच बदलले.

राजाच्या शरीरातील व्याधी कमी होऊ लागली, त्याच्या चेहऱ्यावरची वेदना ओसरली.

ऋत्विजांनी एकमेकांकडे पाहिले, शुनःशेपचे बंधन सोडण्यात आले…तो काही क्षण हललाच नाही.

त्याचा विश्वास बसत नव्हता….तो जिवंत होता.

ऋषी विश्वामित्रांचा सल्ला डावलून हरिश्चंद्राने यज्ञ आरंभला होता आणि त्यांना कानोकानी खबर लागू नये याची पुरेपूर काळजी घेतली होती, यज्ञातल्या अघोरी प्रकाराची  वार्ता कळताच ऋषी विश्वामित्र त्वरेने राजवाड्याकडे येण्यास निघाले होते, शेवटच्या क्षणी त्यांनी यज्ञशाळेत प्रवेश केला, त्यांची नजर शुनःशेपवर खिळली, त्यांनी त्या मुलाच्या डोळ्यांत पाहिले तर त्यांना तिथे भीती दिसली नाही.

एक खोल अनुभव दिसत होता.

विश्वामित्र त्याच्याजवळ गेले.

मुला.”

शुनःशेपने वर पाहिले.

तुझे नाव?”

शुनःशेप.”

तू कुणाचा मुलगा?”

त्याने उत्तर दिले नाही.

विश्वामित्रांना सगळे समजले.

त्यांनी त्याला जवळ घेतले.

आज पासून तू माझ्या सोबत राहशील.”

शुनःशेपच्या डोळ्यांत पाणी आले.

कदाचित पहिल्यांदाच कुणीतरी त्याला घेण्यासाठी हात पुढे केला होता.

कुणाला विकण्यासाठी नाही.

कुणाला अर्पण  करण्यासाठी नाही.

फक्त, आपला म्हणून स्वीकारण्यासाठी.

यज्ञा नंतर शुनःशेप विश्वामित्रां सोबत राहू लागला.

त्याने वेद आणि मंत्रांचे शिक्षण घेतले.

त्याच्या आयुष्यातील तो दिवस त्याला कधीही विसरता आला नाही, वेदी, दोर, अग्नी, वडिलांचा निर्विकार चेहरा, आणि मृत्यूच्या सावलीत निघालेला स्वतःचा आवाज.

कधीकधी रात्री तो अग्नीसमोर बसतअसे. ज्योतीकडे पाहत असे. त्याला त्या दिवसाची आठवण येई.

पण आता त्या आठवणी सोबत भीती नसे, कारण त्याला एक गोष्ट उमगली होती. 

त्या दिवशी त्याचे बंधन केवळ दोराने झाले नव्हते आणि मुक्तीही केवळ दोर कापल्याने झाली नव्हती.

त्याचा आवाज उठला आणि त्याच क्षणी त्याच्यातला माणूस स्वतःच्या जीवनासाठी उभा राहिला.

अग्नी समोर बसलेल्या शुनःशेपकडे  विश्वामित्र दूर उभे राहून शांतपणे पाहत असत.

एक मुलगा मृत्यूच्या वेदीवरून परत आला होता.

तो त्याचा दुसरा जन्म होता.

 

पैजारबुवा,

प्रेरणा:- वसु भारद्वाज यांचे "शुनाःशेप, उत्तंक आणि अष्टवक्र"

 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 44
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

भारतीय पुराणांतील शुन:शेप अख्यानावर आधारित डॉ. जयंत नारळीकरांनी लिहिलेली "शुन:शेप" ह्याच नावाची "यक्षांची देणगी" नावाच्या विज्ञानकथा संग्रहातील कथा आठवली मला. 

त्या कथेत वरुण - नेपच्यून ग्रहावरील एक अतिप्रगत संस्कृती पृथ्वी आणि मानवाशी संबंध संपर्क प्रस्थापित करते आणि काहीतरी नियमाने ब्रह्मांडाचा समतोल राखायला पृथ्वी लागणार आहे असे काहीसे सुचवते त्यावेळी वसुंधरेला वाचण्यासाठी चंद्राचा बळी दिला जातो. त्यात शेवटी कथानायकाच्या तोंडी एक वाक्य आहे "गुड बाय चंद्रा शुन:शेपा" एकदम ते आख्यान आठवले.

 

(गंगाधरपंतांचे पानिपत फॅन) खोंडे

 

 

21Cu2H3J1EL AC UF1000 1000 QL80