पाणीपुरी

साहित्यः
पुरीसाठी:
मैदा - १ (नैवेद्याची) वाटी
बारीक रवा - १ वाटी
मीठ - चवी नुसार
तेल - तळण्यासाठी
पाणीपुरीचे पाणी:
पुदीना पाने - एक मूठ
कोथींबिर - २ मूठी
हिरव्या मिरच्या - ४
काळे मिठ - १ टेबलस्पून
चिंच-गुळाचे पाणी:
चिंच - १ लिंबाएवढी
गूळ - २ लिंबांएवढा
जीरे पावडर - १ टीस्पून
पांढरे मीठ - १/२ टीस्पून
रगडा:
पांढरे वाटाणे - १/४ वाटी
कांदा - १
टोमॅटो - २
आलं-लसूण पेस्ट - १/२ टीस्पून
तेल - पाव वाटी
तिखट - १/२ टीस्पून
हळद - १/४ टीस्पून
छोले मसाला - १ टीस्पून
कृती:
पुर्या:
मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून घट्ट भिजवा.
त्याची पातळ पोळी लाटून एखाद्या छोट्या झाकणाने पुर्या कापून घ्या.
मध्यम आंचेवर तेल तापवून सोनेरी रंगावर तळून घ्या.
पाणीपुरीचे पाणी:
पुदीना, कोथींबिर, मिरच्या बारीक चिरून मिक्सरवर ग्राइंड करून घ्या. एखाद्या बारीक गाळणीतून वरील मिश्रण गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळे मिठ चवीनुसार मिसळून थंड पाण्याने हे गाळलेले पाणी पातळ करून घ्या.
चिंच गुळाचे पाणी:
चिंच आणि गुळात थोडे पाणी घालून शिजवून घ्या. गॅस वरून खाली उतरवून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चिंच हाताने कुस्करून मिश्रण गाळणीने गाळून घ्या. त्यात आता जीरे पावडर आणि मीठ घालून चव जुळवून आणा.
रगडा:
वाटाणे किंचीत सोडा घालून ५-६ तास भिजत घाला.
नंतर, कुकर मध्ये किंवा ओपन शिजवून घ्या.
कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या.
कढईत तेल तापवून त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतला की आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्या नंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यात घालून वरून चवीनुसार मीठ घाला आणि टोमॅटो शिजेस्तोवर परता. टोमॅटो शिजून एकजीव झाला की त्यात तिखट, हळद, छोले मसाला घालून तेल सुटेस्तोवर परता. आता यात शिजवलेले वाटाणे घाला. जास्त पाणी घालू नका. घट्टसरच ठेवा. किंचीत उकळून खाली उतरवा.
आता, तिन वाट्यांमध्ये चिंच-गुळाचे पाणी, पुदीना-कोथींबिर पाण आणि रगडा काढून त्या बरोबर बशीत ७-८ पुर्या सजवून सादर करा.
टीपः पाणीपुरीचे पाणी आणि रगड्यातील साहित्याची प्रमाणे ऐच्छिक आहेत. आपल्या चवीनुसार प्रमाण कमी जास्त करण्यास हरकत नाही.
पुर्या आणि चिंच गुळाचे प्रमाणे शक्यतो बदलू नये.
प्रत्यक्ष पाणीपुरी बनविताना, चिंच गुळाच्या पाण्याचे प्रमाण तिखट पणाच्या आवडीनुसार जुळवून घ्यावे. चिंच गुळाचे पाणी पुर्णतः टाळले तरी चालेल.
धन्यवाद.
शुभेच्छा.....!
मिसळपाव
फोटो
फोटो काय क्लास आहे !
एक एक उचलून तोंडात घालाविशी वाटते आहे पुरी.पण पुरणार नाही एक प्लेट!
सोपी आहे करायला कॄती.पण वेळ खूप जाईल.
आली रे आली
प्रभाकरपंतांची पाणीपुरी आली!
त्या प्लेटीतल्या पाणीपुर्या मला वेडावून दाखवताहेत असा भास होतोय हो :((
पंत, तुमचे अपराध वाढत चालले आहेत आणि ह्याची सजा आम्ही जातीने पुण्यपत्तनी येऊन देऊ!
चतुरंग
अवश्य...
In reply to आली रे आली by चतुरंग
ह्याची सजा आम्ही जातीने पुण्यपत्तनी येऊन देऊ!
मानगुट हाजीर है जहाँपनाह.....
पुण्यनगरीत
In reply to अवश्य... by प्रभाकर पेठकर
केशवसुमार..
पुरीची कृती इथे दिली..
ते बरे झाले. पाणी सगळ्या प्रकारचे येत होते तसे आणि रगडाहि. पुर्याच जमत नव्हत्या.
पण प्रभाकरपंत.. फोटो इथे लावून माझ्या वर्मावर बोट ठेवलं आहे तुम्ही. याची शिक्षा भोगावी लागेल तुम्हाला. भारतात आले की.. नुसती तुमच्या घरीच तळ ठोकेन मी. बघा.. काय काय करून खायला घालायला लावीन तुम्हाला ते..
- ( पुरी सारखी टम्म फुगुन बसलेली)प्राजु
स्वागतम्...स्वागतम्....
In reply to पुरीची कृती इथे दिली.. by प्राजु
मस्तच!
मीनल यांनी म्हटल्याप्रमाणे पुरी उचलून तोंडात टाकावीशी वाटते आहे.पाणी सुटले तोंडाला..:-)क्लासच! म्हणजे आता मला इथे पाणीपुरी करता येईल तर.. वावा,पेठकरसाहेब ,धन्यु..:-)
शंका-ह्या प्रमाणात साधारण किती पुर्या होतील?एका नेवैद्याच्या वाटी मैदा+१ वाटी बारीक रवा,कोणती वाट्या? नेवैद्याची की साधी?शेवपुरीच्या पुर्या करताना हेच प्रमाण घेऊन तळायच्या आधी फोर्कने टोचा मारायच्या का?आणि रगडा पॅटीसची कृती द्या ना प्लीज.
स्वाती
अंदाजे...
साधारणपणे १५ ते २० पुर्या होतात.
नैवेद्याची वाटी = २ इंच व्यास, १ इंच खोली.
ज्या वाटीने मैदा घ्यायचा त्याच वाटीने रवा घ्यायचा.
शेवपुरीच्या पुर्यांसाठी हेच प्रमाण. पुर्या लाटून थोडावेळ तशाच उघड्या ठेवायच्या (म्हणजे जरा वाळतील), तसेच फोर्कने टोचे मारल्यावर फुगणार नाहीत. चपट्या आणि कडक होतील.
रगडा पॅटीसची कृती देईन लवकरच.
धन्यवाद.
धन्यवाद
In reply to अंदाजे... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद ,आता लवकरच फ्राफु मध्ये पापु होणार आणि तुम्हाला दुवा देत देत आम्ही खाणार,:)प्राजुने म्हटल्याप्रमाणे पुर्यांची कृती माहित नसल्याने पापु येथे करता येत नव्हती,आणि भारतातून येताना मी शेवपुरीच्या पुर्या आणते पण पापुच्या पुर्या न मोडता आणणे म्हणजे.. असो.पुन्हा एकदा धन्यवाद.
स्वाती
धन्यवाद...
In reply to धन्यवाद by स्वाती दिनेश
आता लवकरच फ्राफु मध्ये पापु होणार आणि तुम्हाला दुवा देत देत आम्ही खाणार,:)
शुभेच्छा..!
कशी झाली पाणीपुरी जरूर कळवा.
पाणिपुरी
तश्या मी पण करते घरी पु-या.
फुगली तर पाणिपुरी .चपटी झाली तर शेवपुरी आणि मोडली तर ,अजून चुरून भेळेत घालून खाल्ली.
सर्व चाट प्रकार पार पाडतात या पु-या प्रकरणात. काही काही म्हणून वाया जात नाही .
हे सांगातचा हेतू हाच की प्रयत्न जरूर करावा पु-यांचा. व्हरायटी खाता येईल घरच्या घरी एकाच वेळी. बीच किंवा चन्ना भंडार शोधायला नको.
माझ्या पाककृती तील अजून एक गंमत सांगते याच अनुशंघाने.मी चतुर्थीला मोदक केले की बरोबर होत नाही. मोडतात सरखे.म्हणून मी तो नाद सोडून दिला.माझे अहो म्हणतात ,`` यावर्षी नाही का तुझे मोडक ?कर ना कधी तरी घरी.मी खाईन मोडक असले तरी.``
तुम्ही सांगा माझी काय भिशाद होईल का असं ऐकल्यावर?
जबरा!
पेठकरशेठ, अहो का असे छळताय?! च्यामारी त्या संगणकाच्या स्क्रीनच्या! अहो अशी जिवघेणी चित्रं नुसती पाहवत नाहीत हो! :)
असो, अप्रतिम पाणीपुरी!
तात्या.
झालं?
चाळवलंत आम्हांला!!
आता घरी कारभारणीला पाणीपुरी करायला सांगितलं पाहिजे नाहीतर 'लिट्ल इंडिया' ला गेलं पाहिजे!!!
-डांबिसकाका
अवांतर.. :)
In reply to झालं? by पिवळा डांबिस
चाळवलंत आम्हांला!!
??
खाद्यपदर्थांच्या बाबतीत 'जीभ चाळवली' असं म्हणतात! ओव्हरऑल चाळवणार्या गोष्टी वेगळ्या असतात रे डांबिसा!
अर्थात, हे मी तुला सांगायला नको परंतु तुझे नुसतेच 'चाळवलंत आम्हाला' हे शब्द अंमळ खटकले! :)
असो..! चूभूद्याघ्या...
आपला,
(शंकेखोर) तात्या.
अहो, जीभच!
In reply to अवांतर.. :) by विसोबा खेचर
अहो जीभच म्हणायचं होतं मला!
तुम्ही काय दादा कोंडकेंची ट्युशन लावली होती का हो? :))
पंत पंत पंत
पंत पंत पंत,
सर्वप्रथम मिसळपावावर हार्दिक स्वागत.
आपला,
(स्नेही) धोंडोपंत
पानीपुरी लईईईईईईईईई झ्यांक.....
अशाच पाककृती येऊ द्यात. च्यायला लई दिसं उपाशी ठेवलं रावं तुम्ही.
तुमची "नमोगतावरची" डाल फ्राय नियमीतपणे आमच्या घरी होते आणि दरवेळेस "प्रभाकर पेठकर सुखी भव" हा आशीर्वाद आम्ही तुम्हाला देत असतो.
आपला,
(उपकृत) धोंडोपंत
गेली काही वर्षे आम्ही वेलणकरांबरोबर असलेल्या आमच्या वैयक्तिक स्नेह, आपुलकी आणि जिव्हाळ्यामुळे नमोगतावर जाणे बंद केले आहे .
त्यामुळे तुम्ही जरी तिथे पाककृती देत असाल तरी त्याला आम्ही मुकलो होतो.
आता तुम्ही इथे आलात हे पाहून आम्हांदिकांस आत्यंतिक आनंद झाला.
आपला,
(हर्षभरीत) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
धन्यवाद...
श्री. तात्या,
तुम्हाला मराठी पाणीपुरी मिळावी म्हणून हा उपद्व्याप.
श्री. पिवळा डँबिस,
चित्रातील पाणीपुरीच्या पाण्याचा रंग पाहा. असं चमचमीत/झणझणीत पाणी हवं पाणीपुरीसाठी.
श्री. धोंडोपंत,
सर्वप्रथम मिसळपावावर हार्दिक स्वागत.
धन्यवाद.
दाल फ्रायबद्दलच्या आपल्या भावना पोहोचल्या. आपले आशीर्वाद असेच पाठीशी असू द्यावेत.
पुनःश्च धन्यवाद.
धन्यवाद पेठकरकाका!
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
आता आम्हीही घरबसल्या 'मराठी' पाणीपूरीची चव घेवू
राजमुद्रा :)
धन्यवाद...
In reply to धन्यवाद पेठकरकाका! by राजमुद्रा
धन्यवाद राजमुद्रा,
घरच्या 'मराठी' पाणीपुरीला जो झ्झ्झ्झणका आहे नं, तो भय्यांच्या पाणीपुरीला नाही.
एकदम मान्य !
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
झ्झ्झ्झ्झण्क्याशिवाय पाणीपूरी अगदीच पाणचट लागते. आणि झ्झ्झ्झण्क्याशिवाय मराठीची तर कल्पनाच करवत नाही, भैय्यानी फार फार तर मिठाया, लाडू बनवावेत.
राजमुद्रा :)
असहमत..
In reply to धन्यवाद... by प्रभाकर पेठकर
घरच्या 'मराठी' पाणीपुरीला जो झ्झ्झ्झणका आहे नं, तो भय्यांच्या पाणीपुरीला नाही.
माझ्यामते ही तुलना चुकीची वाटते! प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी! त्यामुळे,
'घरच्या 'मराठी' पाणीपुरीला जो झ्झ्झ्झणका आहे नं, तो भय्यांच्या पाणीपुरीला नाही.'
हे जसं म्हणता येईल तसंच आणि तितक्याच ठामपणे,
'चौपाटीवरील भैय्याच्या हातची पाणीपुरी खाण्यातली गंमतही घरच्या 'मराठी' पाणीपुरीला नाही!'
असंही म्हणता येईल!
प्रत्येकाच्या हाताची चव वेगळी, अंदाज वेगळा! शिवाय जागेचंही माहात्म्य आहेच. जशी घरच्या घरी पाणीपुरी खाण्यातली मजा वेगळी तशीच चौपाटीवर पाणीपुरी खाण्यातली गंमतही काही औरच!
पेठकरसाहेबांनी केलेली पाणीपुरी उत्तमच आहे यात काहीच वाद नाही. परंतु मला पेठकरसाहेबांच्या मराठी पाणीपुरीबद्दल पूर्ण आदर राखून असे म्हणावेसे वाटते की चौपाटीवरच्या भैय्याच्या हातची पाणीपुरीही उत्तमच असते, न्यारी असते! आणि जोपर्यंत मला चौपाटीवर मराठी माणसाच्या हातची पाणीपुरी मिळत नाही तोपर्यंत मी भैय्याच्या हातची पाणीपुरीही तेवढ्याच चवीने खाणार!
मी मुंबईच्या चौपाटीवरील भैय्याच्या हातची अतिशय उत्तम आणि चविष्ट पाणीपुरीच गेली अनेक वर्ष खात आलेलो आहे. पेठकरसाहेबांनी बनवलेल्या घरच्या पाणीपुरीची जशी गंमत वेगळी तशीच चौपाटीवर भैय्याच्या हातची पाणीपुरी खाण्याचीही मजा काही औरच!
असो..
आपला,
(ठाम!) तात्या.
मान्य...
In reply to असहमत.. by विसोबा खेचर
श्री. तात्या,
मनोगतावर....आपलं.... मिपावर प्रत्येकाला मताधिकार आहे. त्यामुळे मी आपल्या मतांचा जरूर आदर करतो.फर्मास
फर्मास चित्र आणि पाककृती.
घरी पाणीपुरी करताना मी मसाला घरी बनवला तरी पुर्या बाहेरूनच आणत होतो. आता पुर्यादेखील घरी करायला हरकत नाही असे वाटते.
उत्तरेत पाणीपुरीला "गोलगप्पा" म्हणतात. त्याचा गोल कोंडाळे करून गप्पा मारत खायचा पदार्थ असा सोयीस्कर अर्थ मी काढला आहे!
सुनील (पाणीपुरीवाला)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
वा वा / सोडा
लवकरच पाणीपुरी करावी म्हणतो.
पुर्यांच्या पिठामध्ये सोडा घालायचा नसतो का? (ही शंका बाळबोध असली तरी प्रमाणिक आहे :)
पाकृ साठी आभार.
-- लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
छे..छे..!
In reply to वा वा / सोडा by लिखाळ
'पुर्यांच्या पिठामध्ये सोडा घालायचा नसतो का?'
छे... छे... प्रत्येक गोष्टीत सोडा नाही घालू. फक्त पाणी घालावे.
खो खो खो
In reply to छे..छे..! by प्रभाकर पेठकर
प्रत्येक गोष्टीत सोडा नाही घालू. फक्त पाणी घालावे.
मान्य!!!
सोड्यामुळे काही (द्रव) पदार्थांची मूळ चव बिघडते, तेव्हा पाणी किंवा बर्फ उत्तम!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
हा हा
In reply to खो खो खो by सुनील
प्रत्येक गोष्टीत सोडा नाही घालू. फक्त पाणी घालावे.
हा हा हा.. मस्त !
सोड्यामुळे काही (द्रव) पदार्थांची मूळ चव बिघडते, तेव्हा पाणी किंवा बर्फ उत्तम!!
हेच म्हणतो. मला सुद्धा सोड्या पेक्षा पाणी अधिक आवडते :)
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
अहाहा!
काय सॉलेट फोटु हाये.
तोंडात नळच सुरु झाला पाहिल्या पाहिल्या :)
पेठकर साहेब खासच.
तुमच्या उपहार गृहावर चक्कर मारलीच पाहिजे.
कुठे आहे हे??
भारतातच आहे ना?? पुण्यात??
पुण्यात...
In reply to अहाहा! by झकासराव
माझे कँटीन पुण्यात सिंबॉयसिसच्या मॉडेल कॉलनीतील भाषाविषयक कॉलेजात आहे.
पण, मिपावर प्रकाशित केलेली प्रत्येक पाककृती तिथे बनतेच असे नाही. घरी आलात तर फर्माईश पुरी करता येईल. कँटीनला आलात तर तिथला मेन्यू पाहून काय खायचे ठरवावे लागेल.
अरे वा!
मग तर जरुर भेट देवु घेवु :)
पुणेकर सगळे कधी जमत आहेत? के सु पुण्यात आगमन पावलेत अस कळालं.
मग कधी करायची मिसळ पार्टी?? :)
त्यावेळी येइनच.
मॉडेल कॉलनीत येणार असेन तर आधी कळवुन नक्की येइन :)
पुणे पेशल असा एक नवीन धागा सुरु करावा का आता??
मस्त रेसिपी
:)
In reply to मस्त रेसिपी by स्वाती राजेश
असेही चालेल.....
In reply to मस्त रेसिपी by स्वाती राजेश
प्रयोग
हो हो जरूर मने
In reply to प्रयोग by मनस्वी
वा..पेठकर काका...
पुर्या
चिंचगुळाच
ओ पेठकर ...
का?
माज्या मित्रानं
छान
Aaj cha maza pahilach divas
Photo kadhlet pan kase
या पानावर तुम्हाला मदत मिळेल
In reply to Photo kadhlet pan kase by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
मिपावर स्वागत
In reply to Photo kadhlet pan kase by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
- मदत -मिपावर फोटो चिकटवणे
- टंकलेखन सहाय्य
काही प्रश्न असल्यास खरडफळ्यावर विचारा. उपस्थितांपैकी कुणी ना कुणी उत्तर देईल.गुगल इनपुट टूल्सचा वापर करून मराठीत लिहिता येतं.
In reply to Photo kadhlet pan kase by अक्षदा (verified= न पडताळणी केलेला)
धन्यवाद.
मी सुद्धा त्या दिवशी पीठ
चुक झाली....
हाफशेंच्युरी निमीत्त पेठकर
धन्यवाद... धन्यवाद...
.
फोडणी
In reply to . by प्रभाकर पेठकर