Skip to main content

श्वेतकेतू — ज्ञानाच्या पलीकडचे ज्ञान

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी बुधवार, 16/09/2026 10:37 या दिवशी प्रकाशित केले.

आरुणी नावाचे एक प्रसिद्ध ऋषीहोते, लोक त्यांना उद्दालकआरुणी या नावाने ही ओळखत.

नदीच्या शांत काठावर त्यांचा आश्रम होता. आश्रमा भोवती उंच वृक्ष, फुलांनी भरलेली झाडे, दूरवर पसरलेली हिरवी कुरणे आणि त्या पलीकडे डोंगरांची निळसर रांग होती.

पहाट होताच आश्रम जागा होत असे, गोशाळेत गायी हंबरत, नदीवर पाणी भरण्यासाठी शिष्य जात, कुणी यज्ञकुंड साफ करत असे, कुणी समिधा गोळा करत असे, कुणी गुरूंच्या निवासस्थानासमोर अंगण झाडत असे, आणि काही वेळाने संपूर्णआश्रमात वेदमंत्रांचा गंभीर स्वर घुमू लागे, त्या आश्रमात वेदाध्ययना बरोबरच जीवन शिकवले जातअसे. शब्दांचा अर्थ, मंत्रांचा उच्चार, यज्ञाची पद्धत, ऋतूंचे ज्ञान, औषधी वनस्पती, तर्क, व्याकरण, छंदसगळे शिकवले जात असे.

पण उद्दालकांना एक गोष्ट फार महत्त्वाची वाटत असे, विद्या वाढली की मन अधिक नम्र झाले पाहिजे.

त्यांचा पुत्र श्वेतकेतू  जन्मतःच अत्यंत बुद्धिमान होता, त्याची स्मरणशक्ती विलक्षण होती, लहानपणीच तो वडिलांनी म्हटलेले मंत्र लक्षात ठेवत असे, एखादा श्लोक एकदा ऐकला की पुन्हा म्हणून दाखवत असे, एकदा उद्दालकांनी सहज म्हणून पाहण्यासाठी एक दीर्घ ऋचा म्हटली, श्वेतकेतूने ती पूर्णपणे ऐकली, उद्दालकांनी विचारले ,“ लक्षात राहिली ?”, श्वेतकेतूने लगेच ती संपूर्ण ऋचा म्हणून दाखवली, उद्दालकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला, “तुझी स्मरणशक्ती चांगली आहे.” श्वेतकेतू हसला, त्याला त्या दिवसापासून स्वतःच्या बुद्धीची जाणीव झाली.

वयाच्या बाराव्या वर्षी उद्दालकांनी ठरवले की आता श्वेतकेतूला गुरुकुलात पाठवावे, एका सकाळी त्यांनी मुलाला जवळ बोलावले

श्वेतकेतू.”,

हो, पिताश्री.”

आता तुला गुरुकुलात जावे लागेल.” श्वेतकेतूच्या डोळ्यांत चमक आली.

मी कधी जाऊ?”

लवकरच.”

उद्दालकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला.

वेद शिक, वेदांग शिक, शास्त्रे शिक, तर्क शिक, पण एकगोष्ट लक्षात ठेव.”

काय?”

जे तुला माहीत नाही, ते मान्य करण्यास कधीही लाजू नकोस.”

श्वेतकेतूने सहजपणे उत्तर दिले, “मला समजले, तात .”

उद्दालक त्याच्याकडे पाहत राहिले, त्यांना वाटले, याला समजले असेल का?

 

काही दिवसांनी श्वेतकेतू गुरुकुलात पोहोचला, गुरूंचा आश्रम त्यांच्या घरापेक्षा मोठा होता, शेकडो ग्रंथ होते, अनेक शिष्य होते, वेगवेगळ्या प्रदेशांतून आलेले विद्यार्थी होते, कोणी राजकुमार होता, कोणी ऋषीचा पुत्र , कोणी व्यापाऱ्याचा, सर्वजण एकाच वस्त्रात, एकाच नियमांनी राहत होते.

पहिल्याच दिवशी नवीन शिष्यांची परीक्षा झाली, गुरूंनी एक मंत्र म्हटला.

कोण म्हणेल?”

श्वेतकेतूने हात वर केला.

त्याने मंत्र अचूक म्हटला, गुरूंनी मान हलवली.

दुसरा मंत्र, श्वेतकेतूने पुन्हा अचूक म्हटला…. तिसरा…. चौथा…..प्रत्येक वेळी त्याचे उत्तर बरोबर.

गुरूंच्या चेहऱ्यावर समाधान होते.

इतर शिष्य त्याच्याकडे कौतुकाने पाहू लागले, एक शिष्य त्याच्याजवळ आला. “तुझे नाव काय?”

श्वेतकेतू.”

तू आधी कुठे शिकला आहेस?”

माझ्या पित्याकडे.”

तुला खूप काही येते असे दिसते.”

श्वेतकेतूने हसत उत्तर दिले, “ थोडेफार

पण त्याथोडेफार च्या मागे त्याला स्वतःची ताकद जाणवत होती.

पहिली काही वर्षे अत्यंत आनंदाने गेली.

श्वेतकेतू पहाटे उठत असे, स्नान, संध्यावंदन, वेदपाठ, गुरूंचे व्याख्यान, दुपारी आश्रमातील काम, संध्याकाळी पुन्हा अभ्यास, रात्री चर्चा.  तो प्रत्येक विषयात पुढे राहू लागला. इतर शिष्य त्याच्या कडून मंत्र शिकू लागले, कोणी व्याकरण विचारत असे, कोणी छंद, कोणी एखाद्या ऋचेचा अर्थ, श्वेतकेतूला उत्तरे देण्यात आनंद वाटत असे, हळूहळू त्याला वाटू लागले

मी इतरांपेक्षा अधिक जाणतो.”

गुरुकुलातील त्या सकाळी वातावरण नेहमीसारखेच होते.

पूर्वेला सूर्य नुकताच वर आला होता. यज्ञशाळेच्या समोरच्या वेदीवर कालच्या अग्नीची राख अजून उबदार होती. काही विद्यार्थी समिधा आणत होते, काही पाण्याने वेदी स्वच्छ करत होते. श्वेतकेतू  एका बाजूला बसून गुरुंनी दिलेला मंत्रपाठ मनात म्हणत होता.

त्याला आपला पाठांतराचा अभिमान होता. कोणताही मंत्र त्याला एकदा ऐकला की लक्षात राहत असे.

गुरु जवळ आले. “श्वेतकेतू.”

आज्ञा गुरुदेव.”

काल आपण यज्ञाविषयी बोललो होतो. सांग पाहू तुला काय समजले ?”

श्वेतकेतूच्या चेहऱ्यावर क्षणभर आत्मविश्वास  उमटला.

हा प्रश्न त्याला अगदी सोपा वाटला, तो ताठ बसला आणिम्हणाला,

गुरुदेव, यज्ञ म्हणजे वेदीवर अग्नी प्रज्वलित करून, मंत्रोच्चाराने देवतांना आहुती अर्पण करण्याची वैदिक विधिपूर्वक केलेली क्रिया.  त्यामध्ये ऋत्विज्, मंत्र, द्रव्य, अग्नी आणि नियमानुसार केलेले कर्म यांचा समावेश होतो.”

त्याने उत्तर पूर्ण केले आणि गुरुंकडे पाहिले, गुरु काही क्षण शांत राहिले. “ हे कुठे  वाचलेस? ”

श्वेतकेतूला प्रश्न समजला नाही, त्यांनी पुन्हा विचारले

हे उत्तर तुला कुठून मिळाले? ”

ग्रंथात आहे, गुरुदेव. ”

म्हणजे ग्रंथात जे लिहिले आहेते तू मला सांगितलेस? ”

हो जसेच्या तसे.”

गुरुंनी मान हलवली.

ठीकआहे. आता पुन्हा सांगतुला काय समजले?

श्वेतकेतू गप्प झाला.

त्याला प्रश्न सोपा वाटत होता; पण आता तोच प्रश्न अचानक कठीण झाला.

गुरुदेव... मी आत्ताच सांगितले ना?”

नाही, श्वेतकेतू.”

गुरुंचाआवाज शांत होता.

तू मला सांगितलेस की ग्रंथात यज्ञाची व्याख्या काय आहे. मी तुला विचारतो आहेयज्ञ म्हणजे तुला काय वाटते?

श्वेतकेतू काही बोलला नाही.

गुरुंनी त्याला यज्ञशाळेकडे नेले. वेदीसमोरएक शिष्य  समिधा घेऊन उभा होता. त्याने ती अग्नीत ठेवली. लाकूड चटकन पेटले. धूरवर गेला.

गुरुंनी विचारले, “श्वेतकेतू, आत्ता काय झाले?”

समिधाअग्नीत अर्पण केली.”

हो. पण फक्त एवढेच?”

श्वेतकेतू शांत. गुरुंनी हातातली एक समिधा त्याला दिली.

ही काय?”

समिधा.”

ती अग्नीत टाकली तर?”

ती जळेल.”

आणि जळताना?”

तिचे रूप बदलेल.”

कशात?”

श्वेतकेतूने थोडा विचार केला.

राख होईल... धूर होईल... उष्णता निर्माण होईल.”

गुरुंनी त्याच्याकडे पाहिले.

मग यज्ञात आपण फक्त लाकूड जाळतो का?”

श्वेतकेतू थांबला.

नाही...”

मग काय करतो?”

आहुती देतो.”

कशाची?”

श्वेतकेतू पुन्हा गप्प. गुरुंनी स्वतःच उत्तर दिले नाही.

ते त्याला वेदीजवळ घेऊन गेले.

समजा,” ते म्हणाले, “तुझ्याकडे तूप आहे. तू ते हातात धरून ठेवलेस. ते तुझेच आहे. पण ते तूअग्नीत अर्पण केलेस, तर त्याचे काय होते?”

ते अग्नीत मिसळते.”

आणि त्यानंतर तू म्हणू शकतोस का—‘हे तूप अजून माझ्या हातात आहे’?”

नाही.”

मग आहुती म्हणजे वस्तू नष्ट करणे आहे का?”

श्वेतकेतूच्या कपाळावर आठी पडली.

कदाचित... नाही.”

मग?”

आता त्याच्याकडे उत्तर नव्हते.

गुरुंनी शांतपणे म्हटले,

यज्ञात तू जे स्वतःजवळ ठेवू शकतोस, ते सोडतोस. पण केवळ वस्तू सोडणे पुरेसे नाही. हे माझे आहे’  या भावनेतून बाहेर पडणे याचा अनुभव तुलाआला आहे का?”

श्वेतकेतूने खाली पाहिले. गुरु पुढे म्हणाले,

ग्रंथ तुला सांगतो...काय करायचे....  मंत्र तुला सांगतो... काय म्हणायचे.... विधी तुला सांगतो...कसे करायचे.”

ते क्षणभर थांबले.

पण त्या कृतीचा अर्थ तुझ्या अंतःकरणात काय उमटावा हे ग्रंथ ठरवू शकत नाहीत. ”

श्वेतकेतूने हळू आवाजात विचारले,

म्हणजे माझे उत्तर चुकीचे होते?”

तुझ्या उत्तरात चूक नव्हती.”

गुरुंच्या चेहऱ्यावर हलकेसे स्मित आले.

पण तुझ्या उत्तरात तू नव्हतास.”

श्वेतकेतू ने वर पाहिले.

गुरु म्हणाले,

तू शब्द लक्षात ठेवलेस. अर्थ मात्र अजून तुझ्या अनुभवात उतरलेला नाही.”

त्या क्षणी श्वेतकेतूला प्रथमच जाणवलेत्याने किती तरी मंत्र पाठ केले होते, शेकडो ऋचा मुखोद्गत केल्या होत्या; पण गुरुंनी विचारलेल्या एका साध्या प्रश्नाचेे त्याच्याकडे स्वतःचे उत्तर नव्हते.

त्याचा तो पहिला पराभव होता, तो युद्धात हरला नव्हता, वादात हरला नव्हता, त्याच्या पेक्षा कुणीतरी अधिक मंत्र पाठ केले म्हणूनही हरला नव्हता.

तो स्वतःच्या ज्ञानाच्या कल्पने पुढे हरला होता.

 

त्या प्रसंगाने श्वेतकेतूच्या मनावर खोल परिणाम केला, त्याला पहिल्यांदा जाणवले, शब्द पाठ करणे आणि अर्थ समजणे यात फरक आहेपण या अनुभवातून त्याने दोन गोष्टींपैकी एक निवडायची होती, नम्रता किंवा अहंकार, त्याने सुरुवातीला नम्रतेचा मार्ग धरला, पण जस जशी त्याची विद्या वाढली, तस तसा जुना आत्मविश्वास पुन्हा परत आला.

 

वर्षे गेली, श्वेतकेतूने वेदांचे अनेक भाग आत्मसात केले, ब्राह्मण ग्रंथांचा अभ्यास केला, आरण्यके वाचली, व्याकरणात तो प्रवीण झाला, छंदशास्त्र त्याला सहज समजू लागले, तर्क वितर्कात तो अनेक ज्येष्ठ शिष्यांनाही मागे टाकू लागला, एका दिवशी गुरूंनी काही शिष्यांना प्रश्न विचारला, श्वेतकेतूने उत्तर दिले, गुरूंनी म्हटले,

बरोबर.”

श्वेतकेतूच्या चेहऱ्यावर अभिमान दिसला.

दुसऱ्या दिवशी एका कठीण प्रश्नाचेउत्तर त्याने दिले, पुन्हा प्रशंसा झाली, तिसऱ्या दिवशी काही पाहुणे विद्वानआश्रमात आले, त्यांच्या समोर चर्चा झाली, श्वेतकेतूने आपले मत मांडले, सर्वांनी त्याचे कौतुक केले. त्या दिवसा पासून त्याच्या मनात एक नवीन विचार दृढ झाला

आता मी कोणाकडून शिकायचे?”

हळूहळू त्याच्या बोलण्यात बदल झाला, पूर्वी तो म्हणत असे, मला असे वाटते.”

आता तो म्हणू लागला, “ हेच योग्य आहे. ”

पूर्वी तो इतरांचे म्हणणे ऐकत असे, आता तो मध्येच थांबवत असे, नाही, ते बरोबर नाही.”

एखादा शिष्य त्याच्याकडे प्रश्न घेऊन आला की तो आधी त्याच्याकडे पाहत असे आणि मग म्हणत असे,

तुला एवढेही माहीत नाही? ”

शिष्य गप्प होत.

श्वेतकेतूला त्याचा विजय वाटत असे, पण त्याला कळत नव्हते की ज्ञान वाढत असताना त्याच्या मनात अज्ञानाचेच एक वेगळे रूप वाढत आहे.

बारा वर्षे पूर्ण झाली, श्वेतकेतू चोवीस वर्षांचा झाला, आचार्यांनी त्याला निरोप दिला.

तू खूप काही शिकलास.”

श्वेतकेतूने नमस्कार केला, आचार्यांनी पुढे म्हटले,

पण लक्षात ठेव जे शिकलास त्याचा अभिमान बाळगू नकोस.”

श्वेतकेतूने हसत उत्तर दिले,  “ गुरुदेव, मी प्रयत्न करीन. ”

आचार्यांनी त्याच्याकडे पाहिले, त्यांना त्याच्या आवाजातील सूक्ष्म गर्व जाणवला.

 

श्वेतकेतू घरी निघाला.

रस्त्यात त्याच्या मनात अनेक विचार येत होते.

आता पिताश्री मला पाहून किती आनंदी होतील! ”

त्यांना मी किती कोणत्या विद्या शिकलो आहे ते सांगावे.”

आश्रमातील इतरांना माझ्याशी चर्चा करता येईल का?”

तो चालत होता आणि स्वतःच्या ज्ञानाच्या आठवणीं मध्ये रमला होता.

 

आश्रम दिसू लागला, तीच नदी, तीच झाडे, तीच गोशाळा, सगळे काही तेच होते.

पण बारा वर्षांपूर्वीचा मुलगा आणि आजचा युवक श्वेतकेतू यात जमीन-अस्मानाचा फरक होता.

श्वेतकेतूने आश्रमात प्रवेश केला, उद्दालक बाहेर आले, मुलाने पित्याच्या चरणांना स्पर्श केला.

स्वागतआहे, श्वेतकेतू.”

पिताश्री.”

शिक्षण पूर्ण झाले?”

होय.”

गुरूंनी प्रसन्न होऊन तुला पाठवले?”

होय.”

उद्दालक काही क्षण शांत राहिले.

त्यांनी मुलाकडे पाहिले.

त्याची वाणी, त्याची चाल, त्याचा चेहरासगळे त्यांना बरेच काही सांगत होते, मग त्यांनी विचारले,

श्वेतकेतू, तू अशी विद्या शिकलास का, ज्यामुळे  ऐकलेले ऐकले जाते विचारलेले विचारले जाते आणि  जाणलेले जाणले जाते?

श्वेतकेतूच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला, “पिताश्री, अशी कोणती विद्या?”

उद्दालक म्हणाले,

जिच्या मुळे मातीचे एक तत्त्व जाणले की माती पासून बनलेल्या सर्व वस्तूंचे स्वरूप समजते.”

श्वेतकेतू गप्प.

जिच्या मुळे एका सोन्याच्या तुकड्याचे स्वरूप जाणले की सोन्यापासून बनलेल्या सर्व अलंकारांचे मूलतत्त्व  कळते.”

श्वेतकेतू आता अधिकच शांत झाला.

उद्दालकांनी विचारले,

तुला ही विद्या शिकवली का?”

नाही.”

मग तू जे काही शिकलास ते व्यर्थ आहे असे मी म्हणत नाही. पण अजून बरेच काही  काही शिकायचे बाकी आहे.”

श्वेतकेतूला हे वाक्य टोचले.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी उद्दालकांनी त्याला अंगणात बोलावले,  तिथे कुंभाराने नुकतीच तयार केलेली मातीची भांडी ठेवली होती, एक माठ, एक घागर, एक वाटी, एक पणती.

उद्दालकांनीविचारले,

हे काय?”

माठ.”

हे?”

घागर.”

हे?”

वाटी.”

उद्दालकांनी एक माठ हातात घेतला.

हा फोडला तर?”

माती.”

वाटी फोडली?”

माती.”

घागर?”

माती.”

उद्दालक म्हणाले,

नाव वेगळे. रूप वेगळे. उपयोग वेगळा. पण ज्यापासून हे सर्व बनले आहे ते?”

माती.”

उद्दालकांनी हळू आवाजात म्हटले

यथा सोम्यैकेन मृत्पिण्डेन सर्वं मृन्मयं विज्ञातं स्याद्
वाचारम्भणं विकारो नामधेयं मृत्तिकेत्येव सत्यम् ॥

मातीपासून बनलेल्या सर्व वस्तूमडके, घडा, वाटी, मूर्ती इत्यादीही मातीचीच वेगवेगळी रूपे आहेत. त्यांना आपण वेगवेगळी नावे देतो; पण त्यांचे मूलभूत अस्तित्व मातीच आहे.

श्वेतकेतूने त्या वाक्याचा अर्थ मनात पुन्हा पुन्हा फिरवला.

 

दुसऱ्या दिवशी उद्दालक त्याला एका सुवर्णकाराकडे घेऊनगेले दुकानात अनेक अलंकार होते.

बांगड्या, कर्णफुले, हार, अंगठ्या.

उद्दालकांनी एक अंगठी उचलली.

हेकाय?”

अंगठी.”

वितळवली तर?”

सोने.”

बांगडी?”

सोने.”

हार?”

सोने.”

उद्दालक म्हणाले,

नाव बदलते. आकार बदलतो. पण मूलतत्त्व?”

सोने.”

श्वेतकेतूच्या मनात प्रश्न उभा राहिला.

मग माणसांची नावे आणि रूपेही अशीच आहेत का?”

तो प्रश्न त्याने मोठ्याने विचारला नाही, पण तो त्याच्या मनात राहिला.

 

काही दिवसांनी उद्दालक त्याला वडाच्या विशाल वृक्षाजवळ घेऊन गेले, वडाच्या फांद्या आकाशात पसरल्या होत्या, असंख्य पारंब्या जमिनीत उतरल्या होत्या.

उद्दालक म्हणाले,

या वृक्षाचे एक फळ घेऊ नये.”

श्वेतकेतू फळ घेऊन आला.

फोड.”

त्याने फळ फोडले.

काय दिसते?”

बिया.”

एक बी फोड.”

श्वेतकेतूने एक बी फोडली.

काय दिसते?”

तो बराच वेळ पाहत राहिला.

काहीच नाही.”

उद्दालक म्हणाले,

याकाहीच नाहीमधून हा विशाल वृक्ष निर्माण झाला आहे.”

श्वेतकेतू वर पाहू लागला.

त्याला त्या क्षणी आपल्या गुरुकुलातील असंख्य ग्रंथ आठवले.

हजारो शब्द, शेकडो मंत्र, असंख्य सिद्धांत.

पण त्या छोट्याशा बीजाच्या आत दडलेल्या शक्तीबद्दल त्याने कधी विचार केला होता का?

 

एका दिवशी उद्दालकांनी त्याला मीठ दिले.

हे पाण्यात टाक.”

श्वेतकेतूने तसे केले.

दुसऱ्या दिवशी उद्दालकांनी विचारले,

मीठ आण.”

दिसत नाही.”

वरचे पाणी चाख.”

खारट.”

मधले?”

खारट.”

तळाचे?”

खारट.”

उद्दालक म्हणाले,

म्हणजे दिसत नाही,  पण त्यात मीठ आहे.”

श्वेतकेतू शांत झाला.

 

त्या रात्री त्याने वडिलांना विचारले,

पिताश्री, जे दिसत नाही ते कसे ओळखायचे? ”

उद्दालकम्हणाले,

नेहमी डोळ्यांनीच ओळखावे असे नाही.”

मग? ”

कधी अनुभवातून, कधी परिणामातून,  कधी विचारातून आपल्याला गोष्टी ओळखता येतात, पण ती ओळख त्या  क्षणा पुरती असते हे  ही लक्षात ठेवावे . ”

श्वेतकेतूबराच वेळ शांत राहिला.

 

काही दिवसांनी उद्दालकांनी आणखी एक वेगळा प्रयोग केला.

श्वेतकेतू, आज तू काही काळ माझे म्हणणे ऐक.”

काय?”

पंधरा दिवस तू अन्न घेऊ नकोस.”

श्वेतकेतू चकित झाला.

पंधरा दिवस?”

हो. पाणी मात्र पिऊ शकतोस.”

श्वेतकेतूला याचा अर्थ समजेना.

याचा अभ्यासाशी काय संबंध?”

उद्दालक म्हणाले,

तो तुला नंतर समजेल.”

श्वेतकेतूने मान हलवली.

 

पहिला दिवस सहज गेला, दुसरा दिवसही, तिसऱ्या दिवशी भूक जाणवू लागली, पाचव्या दिवशी त्याची शक्ती कमी झाली, आठव्या दिवशी अभ्यास करताना त्याचे लक्ष वारंवार विचलित होऊ लागले, दहाव्या दिवशी त्याला मंत्र आठवण्यासाठी अधिक वेळ लागू लागला, बाराव्या दिवशी तो फार शांत झाला, पंधरावा दिवस संपला.

उद्दालकांनी त्याला बोलावले.

“श्वेतकेतू, ऋग्वेदातील पुरुषसूक्तातील तिसरी ऋचा म्हणून दाखव.”

श्वेतकेतूने डोळे मिटले. ओठ हलले; पण शब्द बाहेर आले नाहीत. काही क्षण तो शांत राहिला. त्याला मंत्राची सुरुवात आठवावी असे वाटत होते, पण मनाच्या पटलावर शब्दांची एकही ओळ स्पष्ट उमटत नव्हती.

त्याने पुन्हा प्रयत्न केला

एतावानस्य...”

पुढचा शब्द मात्र त्याच्या स्मरणातून निसटून गेला.

त्याने वडिलांकडे पाहिले.

तात... मला आठवत नाही.”

पुन्हा प्रयत्न कर.”

श्वेतकेतूने पुन्हा प्रयत्न केला.

काही शब्द आठवले, मग तेही विसरले.

त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटली.

तात... मला मंत्र आठवत नाही.”

उद्दालक शांत होते.

ठीक आहे वाईट  वाटून घेऊ नकोस, आता तू अन्न खाऊ शकतोसा.”

श्वेतकेतूने अन्न घेतले.

एक दिवस.

दोन दिवस.

हळूहळू त्याची शक्ती परत आली.

उद्दालकांनी पुन्हा विचारले,

आता पुरुषसूक्तातील तिसरी ऋचा म्हणून दाखव .”

श्वेतकेतूने डोळे मिटले.

आणि यावेळी मंत्र त्याच्या स्मरणात पुन्हा उमटला

“एतावानस्यमहिमा अतो ज्यायाँश्च पूरुषः।
पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि ॥“

तो पुढचे ही मंत्र म्हणून दाखवू लागला.

उद्दालक शांतपणे म्हणाले,

अन्नमयं हि सोम्य मनः । आपोमयः प्राणः । तेजोमयी वाक् ॥

आपण जे अन्न खातो, त्याचा सूक्ष्म भाग मनाच्या निर्मितीस पोषक ठरतो; पाण्याचा सूक्ष्म भाग प्राणाला पोषण देतो; आणि तेजाचा सूक्ष्म भाग वाणीला पोषण देतो. 

श्वेतकेतू बराच वेळ गप्प राहिला, त्याला प्रथमच जाणवले, ज्याचा त्याला आपल्या बुद्धीचा अभिमान होता, तीलाही काही मर्यादा आहे.

 

एका संध्याकाळी श्वेतकेतू आणि उद्दालक नदीकाठी बसले होते, नदीच्या पाण्यावर सूर्यास्ताचे  रंग पसरले होते.

श्वेतकेतू म्हणाला,

तात..  मी बारा वर्षे शिकलो,  मला वाटत होते की मी सर्व काही जाणतो.”

उद्दालकांनी काही उत्तर दिले नाही.

पण आता वाटते... जितके  समजते तितके प्रश्न वाढत जातात.”

उद्दालक म्हणाले,

हेच चांगले आहे.”

का?”

कारण ज्याला वाटते की त्याला सर्वकाही माहीत आहे, त्याचा शोध तिथेच थांबतो.”

श्वेतकेतू नदीकडे पाहत राहिला.

 

काही दिवसांनी उद्दालकांनी त्याला एक प्रश्न विचारला.

श्वेतकेतू, या सृष्टीच्या आरंभी काय होते?”

श्वेतकेतूने उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

असत्?”

उद्दालक म्हणाले,

असत्पासून सत् कसे निर्माण होईल?”

श्वेतकेतू गप्प झाला.

उद्दालकांनी म्हटले

सदेवसोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम् 

या सृष्टीच्या आरंभी केवळ सत् होते एकमेव, अद्वितीय.”

श्वेतकेतू लक्षपूर्वक ऐकत होता.

मग या अनेक वस्तू?”

त्याच सत् पासून.”

मग इतका भेद का दिसतो?”

नाव आणि रूपामुळे.”

श्वेतकेतूच्या मनात मातीचा घडा, सोन्याची अंगठी, वडाचे बी आणि पाण्यातील मीठ  सगळे पुन्हा एकत्रआले.

 

एक दिवस उद्दालकांनी त्याला नदीकाठी नेले, पावसाळ्या नंतर नदी भरून वाहत होती, अनेक छोटे प्रवाह तिच्यात येऊन मिसळत होते.

उद्दालक म्हणाले,

हा प्रवाह कुठून आला?”

डोंगरातून.”

आणि तो?”

दुसऱ्या दिशेने.”

नावे वेगळी?”

हो.”

समुद्रात गेल्यावर?”

श्वेतकेतू म्हणाला,

नावे राहणार नाहीत.”

पाणी?”

राहील.”

उद्दालकांनी त्याच्याकडे पाहिले.

श्वेतकेतू आता उत्तर देताना घाई करत नव्हता.

 

काही दिवसांनी उद्दालकांनी त्याला पुन्हा वडाच्या झाडाखाली नेले.

श्वेतकेतू,  त्या बीजाची आठवण आहे?”

हो.”

त्यात तुला काय दिसले होते?”

काहीच नाही.”

आणि त्यातून?”

हा विशाल वृक्ष.”

म्हणूनच जे डोळ्यांना दिसत नाही, ते नसतेच असे नाही.”

श्वेतकेतूने झाडाच्या खोडावर हात ठेवला.

त्याच्या मनात एक विचार उमटला

मी स्वतःला शरीर,  नावकुल,  विद्या आणि स्मरणशक्ती यांच्यात जोडून पाहत होतोपण माझ्या आतही काही असे आहे का जे या सर्वांपेक्षा सूक्ष्म आहे?”

 

एक दिवस श्वेतकेतूने पित्याला विचारले,

तात, ते सत् कुठे आहे?”

उद्दालक म्हणाले,

तुला कुठे वाटते?”

आकाशात?”

बरोबर तेथेही ते आहे  .”

पाण्यात?”

तेथे ही ते आहे.”

वृक्षात?”

तेथे ही.”

माझ्यात?”

उद्दालक काही क्षण शांत राहिले.

मग म्हणाले,

होय.”

श्वेतकेतूच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटले.

माझ्यातही?”

तू त्यापासून वेगळा आहेस असे तुला का वाटते?”

श्वेतकेतू उत्तर देऊ शकला नाही.

 

दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवत होता, आकाश लालसर झाले होते, उद्दालकआणि श्वेतकेतू आश्रमाच्या अंगणात बसले होते.

उद्दालक म्हणाले,

श्वेतकेतू.”

हो, तात.”

तू जे काही शिकला आहेसते विसरू नकोस.”  श्वेतकेतूने त्यांच्याकडे पाहिले, “पण त्याला अंतिम समजून थांबू नकोस.”

श्वेतकेतूच्या डोळ्यांत आता पूर्वीचा गर्व नव्हता.

तो विचारत होता, शोधत होता, उद्दालक म्हणाले

तत्त्वम् असिश्वेतकेतो 

श्वेतकेतूतेच तू आहेस.

श्वेतकेतू निश्चल बसला, त्याला गुरुकुलातील पहिला दिवस आठवला.

पहिला मंत्र.

पहिली प्रशंसा.

पहिला पराभव.

गुरूंचा कठोर प्रश्न.

रात्रभर केलेला अभ्यास.

नंतर मिळालेली कीर्ती.

आणि त्या कीर्तीने हळूहळू वाढवलेला अहंकार.

त्याला पित्याने दाखवलेला मातीचा माठ आठवला.

सोन्याची अंगठी आठवली.

वडाचे अदृश्य बीज आठवले.

पाण्यात विरघळलेले मीठ आठवले.

पंधरा दिवसांची उपासमार आठवली.

आणि नदी.

त्याला जाणवले

त्याने अनेक गोष्टींची नावे शिकली होती.

अनेक मंत्र पाठ केले होते.

अनेक शास्त्रे वाचली होती.

अनेक प्रश्नांची उत्तरे दिली होती.

पण  ज्याच्या आधारे हे सर्व जाणले जातेत्याचा शोध अजून बाकी होता.

उद्दालकांनी पुन्हा म्हटले

तत्त्वम् असिश्वेतकेतो 

श्वेतकेतू हळूहळू उठला.

तो पित्याच्या चरणांपाशी गेला.

आणि मस्तक टेकवून बराच वेळ तसाच राहिला.

उद्दालकांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला.

समोर नदी वाहत होती.

वडाचे झाड शांत उभे होते.

सूर्य वर येत होता.

आणि श्वेतकेतूच्या आयुष्यातील सर्वांत मोठा धडा

मला माहीत आहे पासून  मला अजून जाणायचे आहे  इथपर्यंतचा प्रवास

त्या सकाळी सुरू  झाला.

“तत्त्वमसि

पैजारबुवा, 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 36
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया