उच्च शिक्षण म्हणजे केवळ उदरनिर्वाहा साठी, धनप्राप्तीसाठी किंवा बाह्य जगाचे ज्ञान मिळविण्यासाठी केलेली साधना आहे का?
की त्यापलीकडेही त्याचा काही अर्थ आहे?
विद्याप्राप्त करण्याचा अधिकार समाजातील काही विशिष्ट वर्गांपुरताच मर्यादित आहे का?
की ज्ञानाच्या शोधात निघालेल्या प्रत्येक मनुष्याचा त्यावर समान अधिकार आहे?
लौकिक दृष्टिकोनातून पाहिले तर आज आपण जी शिक्षणव्यवस्था स्वीकारली आहे, तिचा मुख्यउद्देश लौकिक ज्ञान प्राप्त करून जीवनात यशस्वी होणे, व्यवसाय करणे आणि धनार्जन करणे हा आहे. हे ज्ञान निश्चितच आवश्यक आहे. परंतु ज्ञानाला सीमा नाही. मनुष्याचे जीवन केवळ उदरनिर्वाहासाठी नसते. सतत शिकत राहणे, प्रश्न विचारत राहणे आणि ज्ञानाच्या अधिक गहन स्तरांचा शोध घेत राहणे, हा ही मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भागआहे.
पण मग हे ज्ञान नेमके कोणते?
हा प्रश्नच एका बालकाच्या मनात सतत घोळत होता.
त्या बालकाचे नाव होते — सत्यकाम.
सत्यकाम एका दासीचा पुत्र होता. लहानपणापासूनच तो अत्यंत बुद्धिमान, जिज्ञासू आणि शांत स्वभावाचा होता. त्याच्या मनात सतत नवनवीन प्रश्न निर्माण होत असत. आजूबाजूचे जग त्याला केवळ दिसत नव्हते; ते त्याच्याशी जणू काही संवाद साधत होते.
नदीकडे पाहताना त्याला प्रश्न पडत असे —
“नदीला दोन तीर असतात. मग माझ्याही अस्तित्वाला असे दोन तीर आहेत का? एक मला दिसणारा आणि दुसरा मला अजून न दिसलेला?”
अग्नीची धग जाणवली की तो विचार करी —
“ताप माझ्यातही आहे आणि अग्नीतही. मग माझ्यातील हा ताप आणि अग्नीतील ताप एकच आहे का? मी ही अग्नीच आहे का?”
सूर्याकडे पाहताना त्याच्या मनात पुन्हा प्रश्न उभा राहत असे —
“ताप सूर्यालाही आहे. मग मी सूर्य आहे का? सूर्य माझ्यात आहे का?”
पावसाचा थेंब जमिनीवर पडताना पाहून त्याला विलक्षण विचार सुचत —
“बिंदू जलात मिसळतो, जल प्रवाहात मिसळते, प्रवाह नदीत, नदी गंगेत आणि गंगा सागरात. पण मग हा सागर कुठे मिसळतो? मेघात? आकाशात? आणि पुन्हा मेघातून पाऊस पडतो, पुन्हा थेंब तयार होतो, पुन्हा जल होते. मग मी कुठून आलो? आणि शेवटी कुठे जाणार?”
असे असंख्य प्रश्न त्याच्या मनात उठत. उत्तरांच्या शोधात तो एका आचार्याकडून दुसऱ्या आचार्याकडे भटकत असे.
एकदा त्याने एका ऋषींच्या आश्रमात जाऊन विनम्रपणे विचारले, “आचार्य, मला आपला शिष्य करूनघ्याल का?”
ऋषींनी त्याच्याकडे पाहिले.
“तू कोणाच्या पुत्र आहेस? तुझे कुल कोणते? गोत्र कोणते?”
सत्यकामा कडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते.
दुसऱ्या आश्रमातही त्याने शिष्य होण्याची इच्छा व्यक्त केली. तेथेही त्याला त्याच प्रश्नांचा सामना करावा लागला.
हळूहळू त्याला समजू लागले की त्याची बुद्धी, त्याची जिज्ञासा किंवा त्याची ज्ञानाची तहान यापेक्षा त्याचा जन्म अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.
पण त्याने प्रश्न विचारणे सोडले नाही.
एके दिवशी त्या प्रदेशात गौतमऋषी आले. सत्यकामाने त्यांना पाहिले. ऋषी दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा नदीतून स्नान करून बाहेर आले , तेव्हा सत्यकाम धावत त्यांच्या जवळ गेला. त्याने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले.
“आचार्य,” तो म्हणाला, “मी तुमचा शिष्य होऊ शकतो का?”
गौतमऋषींनी त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित उमटले.
“प्रश्न विचारणे ही चांगली गोष्ट आहे, बालका. पण शिष्य होण्याची विनंती तुझ्या वडिलांनी माझ्याकडे करायला हवी होती.”
सत्यकाम काही क्षण शांत राहिला.
“माझे वडील नाहीत, आचार्य.”
ऋषी पुन्हा म्हणाले,
“मग तू घरी जा. आपल्या आईला विचार. आपल्या वडिलांचे नाव काय, तुझे कुल कोणते आणि गोत्र कोणते. ही माहिती घेऊन परत ये. कारण माझा शिष्य होण्यासाठी कुल आणि गोत्राची माहिती आवश्यक आहे.”
सत्यकामाच्या चेहऱ्यावर मात्र निराशा नव्हती. तो नमस्कार करून घरी परतला.
घरी पोहोचताच त्याने आईला विचारले,
“आई, माझ्या वडिलांचे नाव काय? आपले कुल कोणते? माझे गोत्र कोणते?”
आईने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले.
“अचानक तुला हे का जाणून घ्यायचे आहे?”
सत्यकामाने गौतम ऋषींशी झालेला सारा संवाद तिला सांगितला.
“आई, गौतम ऋषी मला शिष्य करून घेऊ शकतील. पण त्यासाठी मला माझ्या वडिलांचे नाव, कुल आणि गोत्र सांगावे लागेल.”
त्याची आई काही काळ शांत राहिली. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या आयुष्याचा सारा प्रवास उभाराहिला.
ती म्हणाली, “सत्यकाम, मला तुझ्या वडिलांचे नाव माहीत नाही. मी तरुणपणी अनेक लोकांची सेवाकेली. त्या काळात तुझा पिता कोण होता, हे मला निश्चितपणे सांगता येणार नाही.” ती क्षणभर थांबली आणि म्हणाली,
“पण तू तुझ्या आचार्यांना खरे तेच सांग. त्यांना सांग — ‘मी जाबाला यांचा पुत्र आहे आणि माझे नाव सत्यकाम जाबाल आहे.’”
सत्यकामाने आईचे शब्द मनात कोरूनघेतले. दुसऱ्याच दिवशी तो गौतम ऋषींच्या आश्रमात पोहोचला.
ऋषींनीविचारले, “मग? तुझ्या वडिलांचे नाव आणि गोत्र कळले?”
सत्यकामाने शांतपणे उत्तर दिले, “आचार्य, माझ्या आईने सांगितले की, तिच्या तरुणपणी तिने अनेक लोकांची सेवा केली. त्यामुळे माझे वडील कोण, माझे कुल कोणते किंवा गोत्र कोणते हे तिला माहीत नाही. तिने मला एवढेच सांगितले की, मी जाबाला यांचा पुत्र आहे आणि माझे नाव सत्यकाम जाबाल आहे.”
गौतमऋषी काही क्षण त्याबालकाकडे पाहत राहिले. त्यांच्याडोळ्यांत समाधान होते.
नैतदब्राह्मणोविवक्तुमर्हति । नानृतमवादीः । समिधं सोम्य आहर । उप त्वानेष्ये । न सत्यादगाः ॥
“अशा प्रकारे सत्य बोलण्याचे धैर्य ज्या बालकात आहे, तो ब्राह्मण स्वभावाचाआहे,” ऋषी म्हणाले. “तू असत्य बोलला नाहीस. समिधा घेऊन ये. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारतो. कारण तू सत्यापासून दूर गेला नाहीस.”
त्या दिवसापासून सत्यकाम आश्रमात राहू लागला.
तो गुरुसेवा करी, आश्रमातील कामे करी, इतर शिष्यांसोबत अध्ययन करी आणि आपल्या मनात उठणारे प्रश्न गुरुंना विचारी.
एक दिवस गौतम ऋषींनी त्याला एक वेगळेच काम दिले. आश्रमाच्या गोशाळेत चारशे कृश गायी उभ्या होत्या. गौतम ऋषींनी सत्यकामाला सांगितले, “या चारशे गायी घेऊन वनात जा.”
सत्यकामाने आनंदाने गायींची दोरी हातात घेतली. “आचार्य, मी त्यांची सेवा करीन.”
ऋषीम्हणाले, “पण एक अटआहे. जोपर्यंत या चारशे गायींची संख्या एक हजार होत नाही, तोपर्यंत तू आश्रमात परत येऊ नकोस.”
सत्यकामाने क्षणभरही विचार केला नाही. “आज्ञा, आचार्य.”
तो चारशे गायी घेऊन वनाच्या दिशेने निघाला.
दाट जंगलात त्याने गायींसाठी सुरक्षित जागा शोधली. सकाळी त्यांना चरण्यासाठी घेऊन जाई, दुपारी सावलीत बसवी, आजारी गायांची काळजी घेई आणि रात्री त्यांना कळपात सुरक्षित बसवत असे .
ऋतू बदलत गेले. पावसाळे आले आणि गेले. उन्हाळ्याच्या कडक उन्हात वनातील झाडांची पाने सुकली. हिवाळ्याच्या रात्री थंडीने अंग गोठत असे. परंतु सत्यकाम आपल्या गायींसोबत राहिला. हळूहळू त्या गायी त्याचे कुटुंबच बनल्या.
त्याला प्रत्येक गायीचा आवाज ओळखता येऊ लागला. कोणती गाय आजारी आहे, कोणती हरवली आहे, कोणत्या वासरालाआई सापडत नाही — हे त्याला सांगण्याची गरज पडत नसे.
वर्षे सरली. गायींची संख्या वाढत गेली. चारशे... पाचशे... सहाशे... सातशे... आठशे... नऊशे...
एक दिवस त्या कळपातील एक बलवान वृषभाने सत्यकामाकडे पाहिले. संध्याकाळचे सूर्यकिरण जंगलावर पसरले होते. गायी शांतपणे चरण्यात मग्न होत्या. सत्यकाम जवळच्या दगडावर बसला होता. अचानक तो वृषभ त्याच्याजवळ आला. तो काहीक्षण सत्यकामाकडे एकटक पाहत राहिला आणि जणू काही मानवी आवाजात म्हणाला,
“सत्यकाम!”
सत्यकाम दचकला.
त्यानेआजूबाजूला पाहिले, कोणीही नव्हते, वृषभ पुन्हा म्हणाला, “सत्यकाम, आता आमची संख्या एक हजार झाली आहे. आता तू आम्हाला गुरुकुलाकडे घेऊन जाऊ शकतोस.”
सत्यकामाच्या डोळ्यांत आश्चर्य दाटले. “तू बोलतोस?”
वृषभशांतपणे उभा राहिला. “मी तुला ब्रह्माचे एक पद सांगतो.
प्राचीदिक् कला, प्रतीची दिक् कला, दक्षिणा दिक् कला, उदीची दिक् कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः प्रकाशवान् नाम ॥
पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर याचार दिशा ब्रह्माच्या एकाचतुष्कल पादासारख्या आहेत. त्याला प्रकाशवान् असे म्हणतात. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण — याचार दिशा त्याचे चारअंश आहेत. जे सर्व दिशांना व्यापून राहते, त्या विराट अस्तित्वाचा विचार कर.”
सत्यकाम शांतपणे ऐकत राहिला. वृषभाचा आवाज पुन्हा आला,
“आता आम्हाला घेऊन आपल्या गुरूकडे जा.”
दुसऱ्या दिवशी पहाटे सत्यकामाने एक हजार गायींचा कळप गोळा केला आणिआश्रमाच्या दिशेने प्रवास सुरू केला. परंतु त्याचा प्रवास अजून संपलेला नव्हता.
त्या संध्याकाळी सत्यकामाने एका मोकळ्या जागी मुक्काम केला. गायी एका बाजूला शांतपणे विसावल्या. सत्यकामाने लाकडे जमा केली आणि अग्नी प्रज्वलित केला. रात्र गडद होत गेली. आकाशात असंख्य तारे चमकत होते. अग्नीच्या ज्वाळा वर उसळत होत्या. सत्यकाम अग्नी समोर शांतपणे बसला होता.
अचानक अग्नीच्या ज्वाळांमधून एक आवाज ऐकूआला. “सत्यकाम!”
तो सावध झाला. “कोण?”
ज्वाळाअधिक तेजस्वी झाल्या. “मी अग्नी. वृषभाने तुला ब्रह्माचा एक अंश सांगितला. आता मी तुला दुसराअंश सांगतो.”
सत्यकामाने हात जोडले. अग्नी म्हणाला,
पृथिवीकला, अन्तरिक्षं कला, द्यौः कला, समुद्रः कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणोऽनन्तवान् नाम ॥
पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक आणि समुद्र या चार व्यापक तत्त्वांतून ब्रह्माच्या अनंत स्वरूपाची कल्पना करता येते.
त्याला अनन्तवान् म्हणतात.
“पृथ्वी, अंतरिक्ष, द्युलोक आणि समुद्र या सर्वांमध्ये जे एक तत्त्व व्यापून आहे, त्याचा विचार कर. पृथ्वीवर तू स्थिरता पाहतोस, अंतरिक्षात विस्तार, आकाशात उंची आणि समुद्रात अथांगता. या सर्वांच्या पलीकडेआणि या सर्वांमध्ये जे एक आहे, त्याचा शोध घे.”
सत्यकाम अग्नीच्या ज्वाळांकडे पाहत राहिला. ज्वाळा हळूहळू शांत झाल्या. रात्र पुढे सरकत गेली.
दुसऱ्या दिवशी पहाटे सत्यकामाने गायींना पुढे नेले, काही अंतर गेल्यावर एका विस्तीर्ण जलाशयाजवळ तो थांबला. जलाशयावर सकाळचे सूर्य किरण पडले होते. पाण्यावर एक शुभ्र हंस अलगद तरंगतहोता. सत्यकाम त्या दृश्याकडे पाहत राहिला. अचानक तो हंस पाण्यावरून उडाला आणि त्याच्या जवळ येऊन बसला.
“सत्यकाम!”
सत्यकामानेआश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. “तू ही मला बोलावतोस?”
हंस म्हणाला, “तुला ब्रह्मविद्येचा तिसरा अंश सांगण्यासाठी आलो आहे.”
सत्यकाम शांत झाला. हंसम्हणाला,
अग्निःकला, सूर्यः कला, चन्द्रमा कला, विद्युत् कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः ज्योतिष्मान् नाम ॥
अग्नी, सूर्य, चंद्र आणि विद्युत्—या सर्वां मध्ये प्रकाश आहे. त्या प्रकाशातून ब्रह्माच्या ज्योतिष्मान्, म्हणजे प्रकाशमय स्वरूपाची अनुभूती घ्यावी.
“सूर्य, चंद्र, विद्युल्लता आणि अग्नी या सर्वांमध्ये जे तेजस्वी तत्त्वआहे, त्याचा विचार कर. सूर्याचा प्रकाश, चंद्राची शीतलता, विजेची चमक आणि अग्नीचे तेज त्यांच्या मध्ये वेगवेगळे पणा दिसतो; पण त्यांना प्रकाशित करणारे तत्त्व एकच आहे.”
सत्यकामाने आकाशाकडे पाहिले. पूर्व क्षितिजावर सूर्य उगवत होता. हंसआकाशात झेपावला आणि काही क्षणांतच दूर अदृश्य झाला.
त्या दिवशी संध्याकाळी सत्यकाम पुन्हा एका जलाशया जवळ थांबला.
रात्र झाली. गायी झोपी गेल्या. सत्यकाम मात्र जागाच होता. वृषभ अग्नी आणि हंस यांच्याशी झालेल्या संवादाचे तो चिंतन करत होता.
पाण्याच्या पृष्ठभागावर अधूनमधून लहरी उठत होत्या. पहाटेच्या वेळी पाण्यात डुबकी मारणारा एक पक्षी त्याच्या नजरेस पडला. तो पक्षी पुन्हा पुन्हा पाण्यात बुडी मारी आणि क्षणभराने वर येई. अचानक तो सत्यकामा जवळ येऊन बसला.
“सत्यकाम!” पक्षी म्हणाला, “मी तुला ब्रह्मविद्येचा चौथा अंश सांगण्यासाठी आलो आहे.”
सत्यकाम एकाग्र झाला. पक्षी म्हणाला,
प्राणःकला, चक्षुः कला, श्रोत्रं कला, मनः कला ।
एष वै सोम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः आयतनवान् नाम ॥
प्राण, दृष्टी, श्रवण आणि मन ही सर्व आपल्या अनुभवाची साधने आहेत. त्यांच्या मागे असलेल्या चेतनेला आयतनवान्, म्हणजे सर्व अनुभवांचे आश्रयस्थान, असे म्हणतात.
“प्राण, नेत्र, श्रोत्र आणि मन — या सर्वांचा आधार असलेल्या त्या तत्त्वाचा शोध घे. ज्या मुळे प्राण चालतो, डोळे पाहतात, कान ऐकतात आणि मन विचार करते, त्या अंतःस्थित तत्त्वाकडे वळ.”
सत्यकाम बराच वेळ निःशब्द बसूनराहिला, त्याच्या मनात बालपणा पासून घोंघावणारे प्रश्न पुन्हा जागे झाले.
मीकोण?.....ज्याने पाहिले तो कोण?.....ज्याने ऐकले तो कोण?....ज्याने विचार केला तो कोण?...ज्यामुळे हे सारे घडते, ते काय आहे?....
पूर्व क्षितिजावर पुन्हा प्रकाश उमटू लागला, चारशे गायी आता एक हजार झाल्या होत्या.
वृषभाने त्याला ब्रह्माचा एक अंश सांगितला होता, अग्नीने दुसरा, हंसाने तिसरा, आणि त्या जलपक्ष्याने चौथा.
सत्यकामाच्या अंतःकरणात जणू एक नवा प्रकाश जन्माला आला होता. तो हजार गायींचा कळप घेऊन आपल्या गुरूंच्या आश्रमाच्या दिशेने निघाला.
सत्यकाम आश्रमाच्या जवळ पोहोचला, गौतमऋषी आश्रमाबाहेर उभे होते, दूरवरूनच त्यांना एक हजार गायींचा प्रचंड कळप दिसला, पण त्या कळपापेक्षा त्यांचे लक्ष एका दुसऱ्याच गोष्टीकडे गेले.
सत्यकामाच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता होती. त्याच्या डोळ्यांत एक वेगळे तेज होते.
वनात अनेक वर्षे राहून, निसर्गाच्या सहवासात राहून, गायींची सेवा करून आणि वृषभ, अग्नी, हंस व जलपक्ष्याकडून ब्रह्मविद्येचे अंश ऐकून त्याच्या अंतःकरणात काहीतरी बदलले होते.
सत्यकाम गुरूंच्या चरणांजवळ जाऊन नतमस्तक झाला. गौतम ऋषींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला.
“सत्यकाम,” ते म्हणाले, “तू परत आलास.”
सत्यकामाने नम्रपणे उत्तर दिले, “होय, आचार्य.”
गौतमऋषींनी त्याच्याकडे पाहिले आणि मंद स्मित केले.
“तुझ्या मुखावर मला ब्रह्मविद्येचे तेज दिसत आहे. तरीही, ज्या ज्ञानासाठी तू माझ्याकडे आलास, ते ज्ञान मी तुला आता स्वतः सांगतो.”
आणि त्या दिवशी गौतम ऋषींनी सत्यकामालाआपल्या समीप बसवून ब्रह्मविद्येचा अंतिम बोध दिला.
चारशे गायी घेऊन वनात गेलेला तो बालक, जेव्हा एक हजार गायींसहआश्रमात परतला, तेव्हा तो केवळ गुरूचीआज्ञा पूर्ण करून परतलेला शिष्य नव्हता.
तो सत्यकाम जाबाल म्हणून ब्रह्मविद्येचा अधिकारी झालेला साधक होता.
पैजारबुवा,
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राण, दृष्टी, श्रवण आणि मन…
साधू, साधू, साधू!!!
सिक्वेन्सिगमधे काहीतरी गल्लत होते आहे का?
ह्या असल्या सगळ्या कथांचा प्रोब्लेम हा असतो की ह्या फक्त भावनिक गाभा अधोरेखित करतात. महत्वाची गरजेची गोष्ट त्यात नेमकी नसते. ह्या गोष्टीत ब्रह्मविद्या म्हणजे काय आणि ब्रह्मविद्येचा अंतिम बोध दिला म्हणजे नेमकं काय केलं तेच मिसिंग आहे. जुन्या गोष्टीमधे जसं, "Happily married ever after" असं म्हणून गोष्ट संपायाची पण संसारात नेमकी काय त्रेधातिरपीट उडते हे गुलदस्त्यात ठेवलं जायचं, तसंच ह्या सगळ्या कथांचं असतं.
- (अद्भुत प्रवासी) सोकाजी
हम्म
In reply to प्राण, दृष्टी, श्रवण आणि मन… by सोत्रि
"Happily married ever after" असा शेवट केलेलाच बरा. त्यापुढे काय होते ते बघण्यासाठी "सुमित सम्हाल लेगा" (एव्हरीबडी लव्हस रेमंड), साराभाई व्हर्सेस साराभाई वगैरे पर्याय आहेतच की. नाहीतर बोधकथेचा पार ग्रंथराज किंवा ग्रंथमाला व्हायची वेळ येईल.
शांत... गदाधारी भीम शांत...
In reply to प्राण, दृष्टी, श्रवण आणि मन… by सोत्रि
शांत... गदाधारी भीम शांत... 😄
मला क्षमा करा.
“ब्रह्मविद्या”, “सत्य”, “अंतिम बोध” असे वेगवेगळे शब्द वापरून गोंधळ उडवायचा माझा हेतू नक्कीच नव्हता. पण नचिकेत, सत्यकाम किंवा आज प्रकाशित केलेली श्वेतकेतूची गोष्ट , या सगळ्या कथा एका बैठकीत लिहिलेल्या नसल्यामुळे, वेगवेगळ्या वेळी शब्दप्रयोग बदलले गेले असतील. वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या भावना उमटल्या असतील
तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा मात्र अगदी योग्य आहे. केवळ “ब्रह्मविद्येचा अंतिम बोध झाला” असे म्हणून गोष्ट संपवणे पुरेसे नाही; तो अंतिम बोध नेमका काय होता, गुरूंनी काय सांगितले आणि त्या आधीच्या अनुभवांशी त्याचा संबंध कसा जोडला गेला, हे कथेत स्पष्ट झाले पाहिजे.
खरं सांगायचं तर तुमच्या प्रतिक्रियेमुळे मलाही जाणवलं की कथा सांगताना भावनिक आणि नाट्यमय भागावर भर देताना काही ठिकाणी मूळ तात्त्विक आशय गाळला गेला आहे.
त्यामुळे हा मुद्दा मी गांभीर्याने घेतो आणि पुढच्या कथांमध्ये “बोध झाला” एवढ्यावर न थांबता काय समजले, कसे समजले आणि त्याआधीच्या प्रवासाशी त्याचा संबंध काय हे कथेतच आणण्याचा प्रयत्न करेन.
अर्थात ते माझे आकलन असेल, म्हणजे तेच अंतिम असेल असेही नाही, पण आपण सगळे प्रयत्न करत राहू
आणि त्याच साठी “साधू, साधू, साधू!!!” नंतर आलेली तुमची ही कानउघाडणीही तितकीच आवश्यक होती!😃
पैजारबुवा,
सुंदर लेख!!
परदेशात असताना दाक्षिणात्य लोक हा मंत्र आरतीनंतर म्हणायचे. थोडे गुगलुन हे सापडले. काहीतरी साधर्म्य वाटते आहे. कॉलिंग प्रचेतस!!
य एवं वेद योपामायतनम वेद आयतनवानभवती!!
हा मंत्र तैत्तिरीय आरण्यकातील प्रसिद्ध ‘मंत्रपुष्पांजली’ (Mantrapushpam) मधील सुरुवातीचा भाग आहे.
मूळ संस्कृत मंत्र:
शब्दार्थ:
यः = जो
अपाम् = जलाचे (पाण्याचे)
आयतनम् = मूळ स्थान, आश्रय किंवा आधार
वेद = जाणतो / समजून घेतो
आयतनवान् = प्रतिष्ठायुक्त, स्थिर आश्रय किंवा प्रतिष्ठा लाभणारा
भवति = होतो
अर्थ: जो मनुष्य पाण्याचे मूळ कारण, आधार किंवा त्याचे विश्वव्यापक महत्त्व जाणतो, तो स्वतः समाजात आणि जीवनात प्रतिष्ठित, संपन्न व स्थिर आधार असलेला (आयतनवान) बनतो.
या सूक्तात पुढे अग्नी, वायू, सूर्य, चंद्र आणि नक्षत्र या सर्वांचा उगम आणि आधार पाण्याच्या (जीवनशक्तीच्या) तत्त्वात कसा आहे, याचे सविस्तर व सुंदर वर्णन केले आहे. शेवटी ‘य एवं वेद’ (जो हे अशा प्रकारे जाणतो) असा उल्लेख करून साधकाला स्थैर्य व समृद्धीची फलश्रुती सांगितली आहे.
ब्रह्मविद्या
छांदोग्य उपनिषदात आलेली ही कथा आहे ना? प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने याचा उपदेश प्रजापतीला , प्रजापतीने मनूला आणि मनूने आपल्या पुत्रांना हा उपदेश केला...
'ब्रह्मविद्या' म्हणजेच या विश्वाचे खरे रूप काय आहे याचे उत्तर. ऋषी गौतमांनी त्याला ब्रह्मविद्येचे सार दिले "जे बाहेर निसर्गात आहे, तेच तुझ्या आत आहे. संपूर्ण विश्व आणि तू वेगळे नाही, तर एकच आहात. जो सर्व प्राणिमात्रांमध्ये, झाडापानांमध्ये स्वतःला पाहतो आणि स्वतःमध्ये या विश्वाला पाहतो, त्यालाच खरे ज्ञान मिळाले असे म्हणतात." म्हणजे अद्वैताचा सिद्धांत उलगडून दिला.
देव कुठे बाहेर शोधायची गरज नाही; तो निसर्गाच्या कणाकणात आणि आपल्या स्वतःच्या आत्म्यात वसलेला आहे, हे ओळखणे म्हणजेच ब्रह्मविद्या! व आपल्या आत आहे, याचा अर्थ आपल्यामध्ये एक अफाट शक्ती आणि चांगुलपणा दडलेला आहे. जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा घाबरून न जाता शांत राहणे. स्वतःच्या आत डोकावून पाहणे की, "मी एकटा नाहीये, माझ्यात ती शक्ती आहे जी मला यातून बाहेर काढेल." स्वतःला कमी न लेखणे आणि चुकीच्या मार्गावर जाण्यापासून स्वतःच्या मनाला रोखणे, हा याचा खरा अर्थ आहे.
आता हा अद्वैताचा सिद्धांत दोन मिनिटात उलगडून दिला तर त्याची काही किंमत नाही! पण तोच सत्यकामाला जेव्हा ४०० च्या हजार गायी होतांना 'रियलाइझ' झाला तेव्हा त्याचे महत्त्व जाणमव्ले कारण त्यासाठी त्याने वेळ दिला, मंथन केले कारण त्याला उत्तरे हवी होती.
असे मला समजलेले अर्थ आहेत. प्रत्येकाला हाच अर्थ गवसेल असेही नाही... आपापल्या परीने अर्थ लावावा शोधावा!
एकच आणि सोपा अर्थ
In reply to ब्रह्मविद्या by निनाद
माझा नेमका हाच आक्षेपाचा मुद्दा आहे. जो अर्थ सामान्यातल्या सामान्यालाही विनासायास समजायला हवा तो असा गर्भित, गवसून काढायचा का असावा? अजिबात शब्दबंबाळ न होता अत्यंत सोपं आणि अनुकरणीय तात्पर्य असायला हवं गोष्टीचं, कसलही क्रिप्टीक नसलेलं.
ह्यामुळे आपापल्या परीने वेगवेगळे अर्थ लावणाऱ्या बाबा बुवांची दुकानं फोफावतात आणि मूळ उद्देश्यापासून नेमकं उलट्या दिशेने जाऊ लागतं.
हे समजलं नाही, दोन मिनिटात उलगडून दिला तर त्याची काही किंमत का नाही ?
- (एकच आणि सोपा अर्थ असायला हवा असं मानणारा) सोकाजी
कारण
In reply to एकच आणि सोपा अर्थ by सोत्रि
अद्वैत हा पोपटपंची करण्याचा विषय नाही. तो स्वतःच्या आत डोकावून पाहण्याचा आणि 'मी कोण आहे?' शोधण्याचा मार्ग आहे. दोन मिनिटांत या चिंतनासाठी लागणारी शांतता आणि वेळ मिळत नाही. कष्ट आणि वेळ दिल्याशिवाय ज्ञानाचे मूल्य कळत नाही. एखादी अत्यंत सखोल आणि मौल्यवान गोष्ट अवघ्या दोन मिनिटांत वरवर सांगून संपवली जाते, तेव्हा तिचे गांभीर्य आणि महत्त्व ही नष्ट होते.
रूपके
कथेत जबाला ही एक साधी दासी आहे. पोटापाण्यासाठी अनेक ठिकाणी कामे केली आहेत. त्यामुळे तिला आपल्या मुलाच्या वडिलांचे नाव किंवा गोत्र माहीत नाही. आजच्या संदर्भात पाहायचे झाले, तर जबाला म्हणजे आपली ‘परिस्थिती’ किंवा आपला ‘भूतकाळ’. (हे असे कॉमा टाईपतांना जरा गोंधळ होतो आहे)
अनेकदा आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलो, आपली आर्थिक स्थिती काय आहे, किंवा आपल्या भूतकाळात आपल्यासोबत काय घडले आहे, या गोष्टी आपल्या हातात नसतात. मला वाटते की जबाला हे असे आपलेच एक प्रतीक आहे जिथे आयुष्यात आपण खूप संघर्ष करत आहोत. आणि तरीही आपल्या वाट्याला सुखसोयी आलेल्या नाहीत. आणि ‘सत्यकाम’ या नावाचा मूळ अर्थच असा आहे की, ‘ज्याला फक्त आणि फक्त सत्याचीच इच्छा आहे’.
आणि तोच जबालाचा मुलगा आहे. म्हणजे माझी परिस्थिती (जबाला) कितीही गरिबीची, संकटांची किंवा अनिश्चिततेची असली, तरीही मनात सत्याची आणि काहीतरी चांगले करण्याची इच्छा (सत्यकाम) माझ्या मनात जन्माला येऊ शकते. परिस्थिती कशी आहे याने काही फरक पडत नाही, विचार कसे आहेत याला जास्त महत्त्व आहे असे मला वातते. गौतम ऋषी हे ‘खऱ्या ज्ञानाचे’ प्रतीक आहेत. जेव्हा आपण स्वतःशी प्रामाणिक असतो, तेव्हा हे जग किंवा निसर्ग नक्कीच साथ देतो. ओळख तुमच्या पैशांवरून किंवा जातीवरून ठरत नाही, तर आपल्या गुणांवरून ठरते.
जबालाने आपल्या मुलाशी खोटे बोलून स्वतःची परिस्थिती लपवली नाही, आणि सत्यकामानेही समाजात आपली लाज वाटेल म्हणून गुरूंसमोर खोटे गोत्र सांगितले नाही. त्यांनी परिस्थितीचा स्वीकार केला. जो पर्यंत मी परिस्थितीचे वास्तव स्वीकारत नाही, तोपर्यंत प्रगती करू शकत नाही. मनातले डिनायल जेव्हा सुटते तेंव्हाच काही तरी घडते...
असो, मोठा प्रतिसाद झाला. पण उपनिषदे मला फार आकर्षीत करतात. त्यात इतके काही लपलेले असते की...
तिन्ही लेख प्रदीर्घ आणि एक…
तिन्ही लेख प्रदीर्घ आणि एक लेखमाला स्वरूपाचे आहेत. चांगले मुद्देसूद आहेत. फॉरमॅटिंग आदर्श आहे. पण तुमची गुड ओल्ड पैजारबुवा शैली खूपच मिस करतोय. होप ओरिजनल यू आर बॅक सून.
वाचतो आहे.
एक हजार गायी या जन्मात तरी होणार नाहीत पण संवर्धन यज्ञ चालूच राहिल.
सुंदर कथा: दोन प्रश्न
कथा अतिशय सुंदर लिहिलेली आहे. रसाळ आणि प्रासादिक. यूट्यूबवर ही कथा आहे. परंतु ही सुंदर भाषेची आवरणे आहेत आणि त्याच्या पलिकडे जाऊन कथेतील तपशीलांकडे व तात्पर्याकडे पाहिले असता काही प्रांजळ प्रश्न पडतात. आपण त्याची उत्तरे द्याल अशी आशा आहे.
=============================
सत्यकामचा मूळ प्रश्न: पण मग हे ज्ञान नेमके कोणते?
गौतम ऋषी: मग तू घरी जा. आपल्या आईला विचार. आपल्या वडिलांचे नाव काय, तुझे कुल कोणते आणि गोत्र कोणते. ही माहिती घेऊन परत ये. कारण माझा शिष्य होण्यासाठी कुल आणि गोत्राची माहिती आवश्यक आहे.
...
अशा प्रकारे सत्य बोलण्याचे धैर्य ज्या बालकात आहे, तो ब्राह्मण स्वभावाचाआहे. ... तू असत्य बोलला नाहीस. समिधा घेऊन ये. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकारतो. कारण तू सत्यापासून दूर गेला नाहीस.
थोडक्यात, ज्ञान मिळवण्यासाठी ज्यांना जन्म व गोत्र माहित आहे (ब्राम्हण?) त्यांना सहज प्रवेश होता. परंतु ज्यांना नाही त्यांना मात्र इतर प्रकारे त्यांचे ब्राम्हणत्व सिध्द करावे लागत असे. तो म्हणजे 'सत्याचा शोध घेण्याची वृत्ती'. एवढे ज्ञान मिळवलेल्या ऋषींनी जन्मावरून भेदभाव न करता फक्त 'सत्याचा शोध घेण्याची वृत्ती' एवढा एकच निकष सर्वांना का लावला नसेल, असा प्रश्न पडतो.
==============================
सत्यकामचा उद्देश: अंतीम ज्ञान, सत्य शोधणे.
त्यासाठी दिलेली कामगिरी:
गौतम ऋषी: पण एक अट आहे. जोपर्यंत या चारशे गायींची संख्या एक हजार होत नाही, तोपर्यंत तू आश्रमात परत येऊ नकोस.
एक हजार गाई करून परत येताना भेटलेल्या वृषभ, अग्नी, हंस व पक्षी यांच्याकडून ब्रम्हविद्येचे अंश ऐकून आल्यावर:
गौतम ऋषी: तुझ्या मुखावर मला ब्रह्मविद्येचे तेज दिसत आहे. तरीही, ज्या ज्ञानासाठी तू माझ्याकडे आलास, ते ज्ञान मी तुला आता स्वतः सांगतो.
गौतम ऋषींनी ब्राम्हण असल्याने शिष्य म्हणून स्विकारलेल्या सत्यकामला असे वैश्याचे काम करून शेवटी धनवृध्दी करण्याचीच कसोटी का सांगितली असावी? वृषभ, अग्नी, हंस व पक्षी यांनीही सत्यकामला ब्रम्हविद्येचे अंश त्याच्या चारशेच्या हजार गाई झाल्यावरच ऐकवले. तीच खरी ब्रम्हविद्येचे अंश जाणण्याची कसोटी होती, हे थोडेसे सत्यकामच्या मूळ ज्ञानप्राप्तीच्या उद्देशाशी व गौतम ऋषींच्या जे ज्ञान ते देणार होते त्याच्याशी सुंसगत कसे ठरते?
थोडे वेगळे मत आणि त्या मागचा विचार आवडला
In reply to सुंदर कथा: दोन प्रश्न by स्वधर्म
सर्वे गुणां कांचनम आश्रयाती:?
In reply to थोडे वेगळे मत आणि त्या मागचा विचार आवडला by ज्ञानोबाचे पैजार
>> उपनिषदकालीन समाज कदाचित पूर्णपणे समतावादी नसेलही
मान्य! फक्त पूर्वीच्या काळी असा काही अन्याय होत होता, विशिष्ट वर्णांना शिक्षणाच्या संधी नाकारल्या जात होत्या हे मान्य करणे हे अनेकांना आजही जड जाते. गौतम ऋषी समतेच्या किमान मानवी मूल्यांना अनुसरून वागण्याऐवजी त्यांच्या काळाच्या रितीनुसारच ते वागत होते असे नक्की म्हणता यावे. त्यांना दोष देण्याचा उद्देश नसून ब्रम्हज्ञानी ऋषी असतील तरी त्यांच्या मानवी मूल्यांच्या ज्ञानाला नक्कीच मर्यादा होत्या असे म्हणावे लागेल. पुढे अनेक प्रकांड पंडीत नसलेल्या एकनाथासारख्या संतांनी मात्र या मर्यादा उल्लंघलेल्या आहेत आणि समतेचा पुरस्कार केलेला आहे. सोकाजीराव यांनी म्हटल्याप्रमाणे गोष्टीत ब्रम्हज्ञान म्हणजे नेमके काय त्याचा उल्लेख नाही. एक बौध्दिक कुतूहल म्हणून ते कदाचित रोचक आहे. त्यामुळे भलेही ब्रम्हज्ञान असले तरी एकूण समाजाचे मानवी जीवन सुखी करण्यासाठी त्याचा काही उपयोग होता असे स्पष्ट होत नाही.
>> अनुभवाशिवाय ज्ञान नाही, तेव्हा ४०० ते १००० हा अनुभवाच्या प्रवासाचे रुपक असावे, तीच गोष्ट वृषभ, अग्नी, हंस, इत्यादींची असावी.
रूपककथा म्हटले तर मग काहीच म्हणता येणार नाही पण ज्या ज्ञानासंबंधी कथा आहे त्याच ज्ञानाशी सुसंगत कसोट्या का वापरल्या नसतील हा प्रश्न आहेच. सर्वे गुणां कांचनम आश्रयाती: या श्लोकाची आठवण झाली.
>> ब्रम्हज्ञानी ऋषी असतील…
In reply to सर्वे गुणां कांचनम आश्रयाती:? by स्वधर्म
>> ब्रम्हज्ञानी ऋषी असतील तरी त्यांच्या मानवी मूल्यांच्या ज्ञानाला नक्कीच मर्यादा होत्या असे म्हणावे लागेल
ह्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला आणखी पुढे नेऊया. खाली ब्रह्मज्ञानी ऋषींची नावं आहेत आणि त्यांचं नाव घेतल्यावर लगेच मनात येणारे त्यांचे गुणविषेश त्यांच्या नावासमोर आहेत.
विश्वामित्र - संपत्ती, सत्ता, अहंकार, कामवासना
सौभरि - कामवासना, संसारासक्ती
पराशर - क्रोध, सूड
जमदग्नी - क्रोध, अधिकारभाव
दुर्वासा - क्रोध
हे असे विकार असणारे ब्रह्मज्ञानी कसे आणि नेमकं कसलं ब्रह्मज्ञान बाळगून होते हा प्रश्न पडतो. आणि, त्या ब्रह्मज्ञानाचा मोक्षप्राप्तीसाठी किंवा अनुयायांना शिकवण्यासाठी कसा काय उपयोग होत होता हे आकलनापलीकडचं आहे.
- (विकारी) सोकाजी
कुणीच सर्वगुणसंपन्न नसतो
In reply to >> ब्रम्हज्ञानी ऋषी असतील… by सोत्रि
मुळात सर्वगुणसंपन्न हीच एक युटोपिअन संकल्पना आहे. थोर व्यक्तींनाही स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या मर्यादा चुकत नाहीत. प्रवृत्ती आणि निवृत्तीमधला संघर्ष चुकत नाही. तत्कालिन समाजाच्या धारणांशी जुळवून घेत जगणे चुकत नाही.
मी या ब्रह्मर्षी वगैरे उपाधींचा विचार पद्मश्री, पद्मभूषण सारखा करतो. कठोर तपश्चर्या करून काही सिद्धी प्राप्त केलेल्या व्यक्ती. व्यावहारिक आयुष्य जगणारी व्यक्ती आतून 'त्रिगुणातीत' असू शकते, पण व्यवहार सांभाळताना सत्त्व, रज आणि तमाचा विळखा टाळता येत नाही. लोकापवाद देखील कुणाला चुकत नाहीत. जगाकडे पाठ फिरवून काल्पनिक आदर्शवत आयुष्य जगलेल्यावर देखील पलायनवादाचा आणि परजीवी असल्याचा ठपका ठेवता येतो.
थोडासा आजच्या काळातला विचार केला तरी असे दिसेल की प्रवृत्तीकडे कल असलेल्या आपापल्या क्षेत्रात काही व्यक्ती दिग्गज असतात (ताल महर्षी, स्वरभास्कर, फिल्ड मार्शल, शिक्षण महर्षी, उद्योग महर्षी, नटसम्राट वगैरे). निवृत्तीकडे कल असलेले महात्मे, योगी, परमहंस वगैरे आजही आहेत, किंवा अलीकडच्या काळात झालेले आहेत. पण कुणीच पूर्णपणे विकारांपासून किंवा त्रिगुणांच्या प्रभावापासून मुक्त असू शकत नाही. या सगळ्यांचे शिष्य म्हणा किंवा अनुयायी म्हणा त्यांचाकडून काही ना काही शिकतात आणि त्या बाबतीत तरी त्यांच्यातल्या काही गुणांचा उत्कर्ष होतो. त्यातले काही शिष्य सगुरूंनी दिलेले सारे ज्ञान आत्मसात करून, त्यात काही नाविन्यपूर्ण भर घालून त्यांच्याही पुढे जातात. त्याचा मानवी समाज समृद्ध होण्यासाठी उपयोग देखील होतो. हेच त्या काळातही लागू होत असावे.
द्रोणाचार्य अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे शस्त्र, अस्त्रांचे शिक्षक होते. पण ते विवेकी नव्हते. युद्धात त्यांनी चुकीची बाजू निवडली. अश्वत्थामा गेला अशी वावडी उठल्यावर ते हतप्रभ झाले, म्हणजेच ते स्थितप्रज्ञही नव्हते. त्यामुळे त्यांची महत्ता कुठेही कमी होत नाही.
मानवी मूल्यांबद्दलच्या समाजाच्या धारणा सतत बदलत असल्यामुळे "मानवी मूल्यांचे ज्ञान' अशी त्रिकालाबाधित अशी कुठली गोष्टच अस्तित्वात नाही. त्यामुळे एकच फूटपट्टी सगळ्या काळातल्या, युगातल्या कथांना न लावलेली बरी.
ब्रह्मज्ञानी या शब्दाचा अर्थ त्या बाबतीतले पांडित्य, पुस्तकी ज्ञान संपादन केलेली व्यक्ती आणि ब्रह्म प्रचितीने जाणलेली व्यक्ती असा दोन्ही पद्धतीने घेता येतो. पुस्तकी ज्ञान असलेल्या व्यक्तीचा अनुयायांना पांडित्य शिकवण्यासाठी आणि प्रचिती असलेल्या सद्गुरूंचा शिष्यांना अनुभूतीच्या मार्गावर जाण्यासाठी उपयोग होत असावा. आधी पुस्तकी ज्ञान आणि मग चिंतन, मनन, निदीध्यासाने ब्रह्मप्राप्ती असाही काहींचा प्रवास झाला असणे शक्य आहे. या प्रवासात अधेमधे कुठेतरी असताना त्यांच्यात असलेले विकार उफाळून आले असतील, तर त्यांचा उल्लेख होणे आणि त्यांच्या सुरस कथा होणे देखील साहजिक आहे. असो.
>> कुणीच पूर्णपणे…
In reply to कुणीच सर्वगुणसंपन्न नसतो by मूकवाचक
>> कुणीच पूर्णपणे विकारांपासून किंवा त्रिगुणांच्या प्रभावापासून मुक्त असू शकत नाही.
अरिहन्त = अरि + हन्त. अरि म्हणजे शत्रू (षड्रिपु) आणि हन्त म्हणजे नाश केलेला.
ज्याने षड्रिपुंचा नाश केला आहे म्हणजे विकारांवर विजय मिळवला आहे तो अरिहन्त किंवा अर्हंत असतो.
त्यामुळे विकारांपासून कुणीच मुक्त असू शकत नाही असं म्हणता येत नाही.
बाकी, "कुणीच सर्वगुणसंपन्न नसतो" ह्यावर पास कारण ते मूळ लेख आणि माझा प्रतिसाद ह्याच्याशी विसंगत आहे.
- (विकारी) सोकाजी
लेखमला वाचत आहे. (माझे…
लेखमला वाचत आहे. (माझे अज्ञान मी पहिल्या भागावर प्रकट केले आहे तरीही) जमतील तितके ज्ञानकण गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.