विचार करून सांगा की... एखाद्या बापाने रागाच्या भरात आपल्या सात वर्षांच्या मुलाला मृत्यूच्या स्वाधीन केले, तर काय होईल? तो मुलगा घाबरेल? रडेल? वडिलांकडे दयेची याचना करेल?
एखाद्या सर्वसाधारण मुलाने हेच केले असते. पण ऋषी वाजश्रवा यांचा पुत्र नचिकेत जरा वेगळा होता, तो सात वर्षांचा बालक जिवंतपणीच यमलोकाच्या दाराशी पोहोचला आणि मृत्यूदेव यमराजांच्या दरवाज्यात तीन दिवस आणि तीन रात्री निश्चयाने उभा राहिला. का? कशासाठी ? त्याने यमराजांकडे काय मागितले?
त्याला जाणून घ्यायचे होते, “मृत्यूचे रहस्य.”
जे सत्य जाणून घ्यायला कोणताही मनुष्य बिचकतो, त्याच सत्याचा शोध या बालकाने घेतला.
मृत्यूनंतरसर्व काही संपते का? की हा हाडामांसाचा देह नष्ट झाल्यानंतरही काहीतरी असे उरते, जे कधीच नष्ट होत नाही?
ही केवळ एका पित्याच्याक्रोधाची किंवा एखाद्या चमत्काराची कथा नाही. ही कथा आहे—
अशा ज्ञानाची, जे मनुष्याला मृत्यूच्या भीतीतून मुक्त करते.
ही कथा आहे कठोपनिषदातील अमर बालकाची —नचिकेताची.
या कथेची सुरुवात होते प्राचीन काळातील एका भव्य आश्रमातून. महर्षीवाजश्रवा मोठा यज्ञ करीतहोते. या यज्ञाचे नाव होते विश्वजितयज्ञ. स्वर्गप्राप्ती आणि महान पुण्य मिळविण्यासाठी हा यज्ञ केला जात होता. त्यामुळे अर्थातच विश्वजित यज्ञ काही साधा सोपा यज्ञ नव्हता. त्याचे नियम अतिशय कठोर होते. पूर्णाहुतीच्या वेळी यजमानाला आपली सर्व संपत्ती, धन आणि आपल्या प्रिय वस्तू दान कराव्या लागत. अर्थातच, हा काही केवळ संपत्ती वाटून टाकायचा विधी नव्हता. त्यामागे होता त्यागाचा संकल्प. जोपर्यंत मनुष्य आपल्या आसक्तीचा त्याग करत नाही, तो पर्यंत त्याच्या दानाला पूर्णता कशी येणार?
महर्षी वाजश्रवांनी यज्ञ सुरू केला. दानविधी सुरू झाला. पण... त्याच वेळी त्यांच्या अंतःकरणातील एक जुना शत्रू हळूहळू जागा झाला “मोह”
महर्षींकडे असंख्य गायी होत्या. त्या काळात गोदान हे अत्यंत पवित्र आणि श्रेष्ठ दान मानले जात असे. पण आपल्या चांगल्या, निरोगी आणि दुभत्या गायी देण्याऐवजी महर्षींनी भाकड गाई दानात देण्यास सुरुवात केली ज्यांच्याकडून आता दूध मिळण्याची काहीही शक्यता नव्हती.
यज्ञमंडपात बसलेला लहानगा नचिकेत हे सर्व पाहत होता. वय लहान होते, पण बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे अंतःकरण निर्मळ होते.
त्याला जाणवले, “दानाच्या नावाखाली जर निरुपयोगी वस्तू दिल्या, तर तर तो काही खरा त्याग नाही.”
पित्याची ही लबाडी त्याला सहन झाली नाही. तो उठला. आणि पित्याजवळ गेला. आणि भर यज्ञ मंडपातत्याने विचारले "तात ... विश्वजित यज्ञाततर ल्या सर्व प्रिय गोष्टी दान करायच्या आसतात ना? मी पण आपल्याला अत्यंत प्रिय आहे मग आपण मला, मला कोणाला दान करणार?”
वाजश्रवांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. नचिकेतापुन्हा म्हणाला “आपली संपत्ती, आपले सर्वस्व यामध्ये मी ही येतो ना? मग सांगा, आपण मला कोणाला दान करणार?” वडील काही बोलत नाही हे पाहून पित्याला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवावे, या भावनेने नचिकेत पुन्हा म्हणाला, “तात सांगा ना, मला कोणाला दान करणार?”
आता मात्र वाजश्रवा चिडले त्यांचा संयम सुटला आणि क्रोधाच्या भरात त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले
“मी तुला मृत्यूला दान देतो! जा—तुला यमराजांच्या स्वाधीन करतो!”
क्षणभर सगळीकडे शांतता पसरली. एका पित्याने क्रोधाच्या भरात आपल्या जिवंत मुलाला मृत्यूच्या हवाली केले होते.
नचिकेताने पितृआज्ञा शिरसावंद्य मानली. त्याच्या मनात एकचु विचार होता “हा देह नश्वर आहे.” माणसाचे शरीर शेतातील पिकासारखे आहे. ते उगवते, वाढते, पिकते, कापले जाते, मातीत मिसळते, आणि पुन्हा नव्याने जन्माला येते. म्हणून नश्वर शरीरासाठी सत्याचा त्याग का करावा? या विचाराने तो जिवंतपणीच यमलोकाच्या दिशेने निघाला.
मृत्यूच्या मार्गाची कल्पना केली तरी सामान्य मनुष्याचा थरकाप उडेल. पण नचिकेताच्या मनात किंचितही भीती नव्हती. कारण त्याचे अंतःकरण सत्याच्या शोधासाठी व्याकूुळ झाले होते,
प्रदीर्घ आणि खडतर प्रवासानंतर तो यमराजांच्या द्वाराशी पोहोचला. पण यमराज तेथे नव्हते. मृत्यूदेव काही कार्यासाठी बाहेर गेले होते. द्वारपालांनी त्या जिवंत बालकाला आत प्रवेश दिला नाही. लहानगा नचिकेत काय करणार? पण तो परत फिरला नाही , त्या दाराशीच तो बसून राहिला.
एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवसही गेला.
तीन दिवस आणि तीन रात्री तो अन्न-पाण्याविना यमराजांची प्रतीक्षा करीत राहिला.
अखेर तीन दिवसांनी यमराज परतले, त्यांच्या सेवकांनी त्यांना सांगितले, “धर्मराज, आपल्या दाराशी एक बालक तीन दिवसांपासून अन्नपाण्याविना आपली प्रतीक्षा करत बसला आहे.”
परंपरेनुसार अतिथीला देवतुल्य मानले जाते. तो उपाशी परतला तर तो गंभीर अधर्म मानले जाई. यमराज धर्मवान होते, त्यांना आपल्या चूकिचीी जाणिीव झाली आणि ते स्वतः नचिकेताजवळ गेले आणि म्हणाले
“हे बालका , माझ्या अनुपस्थितीत तू तीन रात्री माझ्या दाराशी अन्न-पाण्याविना राहिलास. माझ्याकडून अपराध झाला. त्याचे प्रायश्चित म्हणूनतू कोणतेही तीन वर माग. तुझ्या वरांची पूर्तता करण्यास मी वचनबद्धआहे”
नचिकेताने थोडा विचार केला आणि म्हणाला, “माझे वडील माझ्यावर रागावले आहेत. त्यांचा क्रोध आणि पश्चात्ताप दूर होऊ दे. मी परत गेल्यावर त्यांनी मला ओळखावे आणि प्रेमाने मला जवळ घ्यावे.”
यमराज प्रसन्न झाले, ते म्हणाले “तथास्तु! तुझा पिता तुला पाहताच त्याचा राग विसरेल, त्याचे मन शांत होईल आणि तो तुला प्रेमाने स्वीकारेल.”
बारकाईने विचार केला तर असे लक्षात येईल की नचिकेताने आपल्या पहिल्या इच्छेत स्वतःसाठी काही मागितले नव्हते. त्याने मागितले होते पित्याचे समाधान.
मग नचिकेताने दुसरा वर मागितला “हे यमदेवा, स्वर्गात भूक नाही, तहान नाही, वृद्धत्व नाही आणि मृत्यूचे भयही नाही, असे मी ऐकले आहे. त्या स्वर्गप्राप्तीचा मार्ग दाखविणाऱ्या अग्निविद्येचे ज्ञान मला द्या.”
उत्तरादाखल यमराजांनी नचिकेताला केवळ एक यज्ञ करण्याची पद्धत सांगितली नाही. तर त्यांनी स्वर्गप्राप्तीचा मार्ग दाखविणाऱ्या अग्नीचे तत्त्वज्ञान शिकवले, वेदीची रचना, इष्टकांचा प्रकार, संख्या आणि मांडणी यांसह त्या यज्ञामागील आध्यात्मिक अर्थही स्पष्ट केला. नचिकेताने ते सर्व एकाग्रतेने आत्मसात करून यमराजांना जसेच्या तसे सांगितले. त्याच्या या विलक्षण ग्रहणशक्तीने प्रसन्न होऊन यमराजांनी त्या अग्नीला ‘नचिकेताग्नी’ हे नाव दिले.
दोनवर पूर्ण झाले होते, पित्याचा राग शांत होणार होता, स्वर्ग मार्गाचे ज्ञानही मिळाले होते, आता तिसरा वर बाकी होता ,आणि तोच सर्वांत मोठा होता.
यमराजम्हणाले, “नचिकेता, आता तुझा तिसरा आणि अंतिम वर माग.” नचिकेताने थेट मृत्यूदेवांच्या डोळ्यांतपाहिले आणि तो म्हणाला, “हे मृत्युदेव, मनुष्याच्या मृत्यूनंतर काय होते, याबद्दल मोठा संशय आहे. काही म्हणतात की आत्मा मृत्यूनंतरही अस्तित्वात राहतो. काही म्हणतात की शरीर नष्ट झाले की सर्व काही संपते. आपण महाज्ञानी आहात आपण कृपया हे स्पष्ट करून सांगावे की मृत्यूनंतर काय उरते? आत्म्याचे खरे स्वरूप काय आहे? मला या रहस्याचे ज्ञान द्या. हाच माझा तिसरा वर आहे. ”
यमलोकात संपूर्ण शांतता पसरली, यमराजांना ठाऊक होते की हा काही साधा प्रश्न नव्हता, हे अत्यंत सूक्ष्म ज्ञान होते. ते म्हणाले, “बाळ नचिकेत, हा विषय अत्यंत गूढ आहे. देवतांनाही याचा शोध घेणे कठीण गेले आहे. त्या ऐवजी तू दुसरा कोणताही वर माग.” पण नचिकेत अढळहोता.
“जे ज्ञान अत्यंत दुर्लभ आहे, ते आपण जाणता. मग आपल्यापेक्षा श्रेष्ठ गुरु मला कोण मिळणार? आपण कृपया मला याचेच ज्ञान द्यावे या व्यतिरिक्त मला दुसरे काहीही नको”
हे ऐकल्यावर आता यमराजांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले, त्यांनी नचिकेतासमोर जगातील सर्व प्रकारचे ऐश्वर्य ठेवले. ते म्हणाले दीर्घायुष्य, पुत्रपौत्र, असंख्य गायी, घोडे, हत्ती आणि संपत्ती माग, संपूर्ण पृथ्वीचे राज्य माग, तुला हवे तितके आयुष्य माग.” आणि पुढे म्हणाले “देवतांनाही दुर्लभ असणाऱ्या अप्सरा, दिव्य रथ आणि वाद्ये मी तुला देईन. जगातील सर्व दुर्मिळ सुखे माग. पण बाळा मृत्यूनंतर काय होते, हे मात्र विचारू नकोस.”
सात वर्षांचा नचिकेत शांतपणे यमराजांचे ऐकत होता. त्याला या संपत्तीचे जराही आकर्षण वाटले नाही. तो म्हणाला, “हे धर्मराज, हे सर्व सुख क्षणभंगुर आहे. आज आहे, उद्या नाही. इंद्रियांचे सामर्थ्यही काळानुसार क्षीण होते. आणि जेव्हा मृत्यू तुमच्यासमोर उभा आहे, तेव्हा दीर्घायुष्याचा अर्थ तरी काय? आपले रथ, अप्सरा आणि संपत्ती आपणास लखलाभ, मला नश्वर संपत्ती नको, मला त्या सत्याचे ज्ञान हवे आहे, ज्याचा शोध मोठ मोठे ज्ञानी घेत आले आहेत.”
यमराजांच्या चेहऱ्यावर समाधानाचे स्मित उमटले. त्यांच्या लक्षात आले, हा बालक खऱ्या ज्ञानाचा अधिकारी आहे. यमराज प्रसन्न चित्ताने म्हणाले
श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतः
तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः ।
श्रेयो हि धीरः अभि प्रेयसो वृणीते
प्रेयो मन्दो योगक्षेमात् वृणीते ॥
( अर्थ मनुष्यापुढे दोन पर्याय असतात प्रेय आणि श्रेय, प्रेय म्हणजे जे त्वरित सुखद वाटते जसे की धन, भोग, सत्ता, इंद्रिय सुख इत्यादी आणि श्रेय म्हणजे जे खरे कल्याण करणारे असे ज्ञान म्हणजेच सत्य, आत्मशोध. बहुसंख्य लोक प्रेयाची निवड करतात, कारण ती निवड करणे अत्यंत सोपे आहे. पण खरा विवेकी, ज्ञानी मनुष्य मात्र श्रेयाची निवड करतो.
नचिकेताने ही प्रेय नाकारून श्रेय स्वीकारले होते.
आता यमराजांनी नचिकेताला आत्मविद्या सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले—
न जायते म्रियते वा विपश्चित्
नायं कुतश्चिन्न बभूव कश्चित्।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो
न हन्यते हन्यमाने शरीरे॥
विपश्चित अर्थात आत्मा कधी जन्म घेत नाही आणि कधी मरतहीनाही. तो कुठल्याही कारणा पासून उत्पन्न झालेला नाही आणि त्याच्या पासून दुसरे काही निर्माण झालेले नाही
यमराज नचिकेताला सांगतात की मनुष्य ज्याला "मी" समजतो ते शरीर नसून तो आत्मा आहे. शरीर बदलते, वृद्ध होते आणि नष्ट होते; परंतु आत्मा नित्य आहे, शाश्वत आहे , ते असे सत्य आहे जे कधीही बदलत नाही. शरीर नश्वर आहे, पण आत्मा अमर आहे. म्हणून मृत्यू हा आत्म्याचा अंत नसून केवळ शरीराचा अंत आहे. जसे मनुष्य जुने कपडे सोडून नवे कपडे परिधान करतो, तसे आत्मा जुने शरीर सोडून नवीन शरीर धारण करतो. आत्मा कधी जन्मत नाही आणि कधी मरत नाही; तो सदैव आहे.
आत्मतत्त्व अधिक स्पष्ट करण्यासाठी यमराजांनी नचिकेताला एक अद्भुत उदाहरण दिले.
ते म्हणाले “हे नचिकेता, या शरीराला एक रथ समज.” या रथाला जोडलेले घोडे म्हणजे पाच इंद्रिये, डोळे, कान, नाक, जिव्हा, त्वचा, जे सतत बाह्य विषयांकडे धावत असतात. या घोड्यांचा लगाम म्हणजे मन, आणि त्या लगामाला योग्य दिशा देणारा सारथी म्हणजे बुद्धी, या सर्वांच्या आत शांतपणे बसलेला रथाचा खरा स्वामी म्हणजे आत्मा.
जर मनावर बुद्धीचे नियंत्रण नसेल तर घोडे स्वैर धावतील, रथ चुकीच्या दिशेने जाईल, माणूस विषयांच्या मागे धावत राहील, पण बुद्धी जागृत असेल आणि मन नियंत्रणात असेल तर? तर घोडे योग्य मार्गाने धावतील रथ योग्य दिशेने जाईल आणि मनुष्य आपल्या अंतिम ध्येयापर्यंत सहज पोहोचेल.
आपण अनेकदा स्वातंत्र्य म्हणजे “मला जे वाटेल ते मी करेन” असे समजतो. पण यमराजांची शिकवण वेगळी आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, जर प्रत्येक इच्छा आपल्याला जिथे घेऊन जाईल तिथे आपण जात राहिलो, तर आपण स्वतंत्र आहोत की इच्छांचे गुलाम? खरे स्वातंत्र्य म्हणजे मन आणि इंद्रियांवर बुद्धीचे प्रभुत्व आणि बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याची ओळख. जो मनाला जिंकतो, तो स्वतःला जिंकतो, आणि जो स्वतःला जिंकतो, तो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो.
यमराजांकडून मृत्यू आणि आत्म्याचे हे परमज्ञान प्राप्त करून नचिकेत पृथ्वीवर परतला. यमराजांनी दिलेल्या पहिल्या वरानुसार त्याचे वडील त्याची वाट पाहत होते. नचिकेत आश्रमात परतला, वाजश्रवांनी त्याला पाहिले, त्यांचा क्रोध नाहीसा झालेला होता त्याची जागा आता पश्चातापाने घेतली होती, त्यांनी आपल्या मुलाला हृदयाशी कवटाळले, ज्या मुलाला त्यांनी क्रोधाच्या भरात मृत्यूच्या हवाली केले होते, तोच मुलगा आता आत्मविद्येचा ज्ञाता बनून परतला होता.
नचिकेताला काय मिळाले? नचिकेताला सोनं चांदी धनदौलत मिळाली नाही, की कोणत्याही राज्याचे सम्राट पद मिळाले नाही, दीर्घायुष्य त्याचे ध्येय कधीच नव्हते.
त्याला मिळाले मृत्यूच्या पलीकडचे ज्ञान. त्याला समजले शरीर नश्वर आहे, आत्मा अमर आहे, इंद्रिये घोड्यांसारखी आहेत, मन लगाम आहे, बुद्धी सारथी आहे आणि आत्मा या संपूर्ण रथाचा स्वामी आहे.
नचिकेताच्याकथेला एक अमर संदेशलाभला आहे—
“उत्तिष्ठतजाग्रत प्राप्य वरान्निबोधत।”
अर्थ - “उठा! जागे व्हा! आणि श्रेष्ठ ज्ञान प्राप्त करून सत्याला जाणून घ्या.”
हा मंत्र माणसाला निष्क्रियतेतून कृतीकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे आणि सामान्यतेतून श्रेष्ठत्वाकडे नेणारा प्रेरणा मंत्र मानला जातो.
नचिकेत फक्त सात वर्षांचा होता, पण त्याने एक गोष्ट ओळखली होती जी अनेक सुजाण माणसांच्याही लक्षात येत नाही, नश्वर गोष्टींनी शाश्वत समाधान मिळत नाही.
त्याने यमराजांकडून संपत्ती मागितली नाही. भोग मागितले नाहीत, दीर्घायुष्य मागितलेनाही, त्याने मागितले “सत्य ” आणि म्हणूनच तो भारतीय ज्ञानपरंपरेत अमर झाला.
नचिकेत आपल्याला शिकवतो—
सत्यासाठीप्रश्न विचारा , सत्यासाठी मोहाचा त्याग करा, सत्यासाठी भीतीवर मात करा, आणि सर्वांत महत्त्वाचे, आपण शरीरापुरते मर्यादित नाही; आपल्या अस्तित्वात एक असे तत्त्व आहे जे जन्मत नाही आणि मरत नाही.
कठोपनिषदाची ही कथा हजारो वर्षांपासून मानवाला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेत आहे.
मृत्यूची भीती दूर करण्याचा मार्ग मृत्यू टाळण्यात नाही, तर मृत्यूचे खरे स्वरूप जाणून घेण्यात आहे आणि म्हणूनच नचिकेताची कथा आजही आपल्याला सांगतेआहे,
उठा, जागे व्हा, प्रश्न विचारा, सत्याचा शोध घ्या, आणि जोपर्यंत सत्य सापडत नाही तोपर्यंत थांबू नका.
ॐशान्तिः शान्तिः शान्तिः ॥
पैजारबुवा,
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा
सर्व मिपाकरांना "गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा"
पैजारबुवा,
गणपती बाप्पांची
कृपा पैजारबुवा पुनश्च लिहिते झाले.
बाप्पा आपल्याला असेच अनथक लिहिण्याची बुद्धी देवो.
गणेशोत्सवा च्या हार्दिक शुभेच्छा.
लेख सवडीनुसार वाचून प्रतिसाद देतो.
लेख आवडला
लेख आवडला.
पण काही प्रश्न पडले---
सत्यासाठीप्रश्न विचारा , सत्यासाठी मोहाचा त्याग करा, सत्यासाठी भीतीवर मात करा,
कोणते सत्य? कसला मोह? मोहाचा त्याग करायचा म्हणजे नक्की काय करायचे? कशापासून भीती? त्या भीतीवर कशी मात करायची?
तर घोडे योग्य मार्गाने धावतील रथ योग्य दिशेने जाईल आणि मनुष्य आपल्या अंतिम ध्येयापर्यंत सहज पोहोचेल.
योग्य मार्ग कोणता? कोणते अंतिम ध्येय?
लेख आवडला
अत्यंत रसाळ ओघवत्या शैलीत नचिकेताची गोष्ट! बुध्दानेही जगात दु:ख का आहे याचा शोध घेतला होता, फक्त या पृथ्वीवर.
पैजारबुवा,मस्त! दिवाळी अंकात…
पैजारबुवा,
मस्त! दिवाळी अंकात शोभेलसा लेख आहे!
>> स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, जर प्रत्येक इच्छा आपल्याला जिथे घेऊन जाईल तिथे आपण जात राहिलो, तर आपण स्वतंत्र आहोत की इच्छांचे गुलाम? खरे स्वातंत्र्य म्हणजे मन आणि इंद्रियांवर बुद्धीचे प्रभुत्व आणि बुद्धीच्या पलीकडे असलेल्या आत्म्याची ओळख.
त्रिवार वंदन!!
_/\_ _/\_ _/\_
फ्री वील वर लिहाण्याचा विचार करत होतो. त्यांचा हा बेसच झाला.
- (जागं होण्याचा प्रयत्नान असलेला) सोकाजी
उत्तम लेख उत्तम आढावा
उत्तम विवेचन
तत्वज्ञान संबंधी
प्रमुख अडचण अशी की how चा अभाव या थिअरी मध्ये नेहमी असतो.
दुसर म्हणजे कितीही सूुंदर आदर्श आकर्षक भासले तरी निव्वळ कल्पना concrete नाही फार आढळत.
त्यामुळे कर्मठ आदर्शवाद (dogmatic idealism), गूढवाद (mysticism) पेक्षा materialistic जास्त जवळचे वाटतात
उदा what is deadand what is living in Indian philosophy या देवीप्रसाद यांच्या पुस्तकात ते लोकायत ,सांख्य आदी ना living असे म्हणतात ते यासाठी
public abstract methods?
हिंदु तत्वज्ञानाचे (अशातच नव्हे, एकेकाळी मी नास्तिक होतो तेव्हापासूनच) मला आकर्षण वाटत आले आहे. केवळ आध्यात्मिक पातळीवरच नव्हे तर तात्विक पातळीवरही त्याचे श्रेष्ठत्व appreciate करायलाच हवे.
तथापि, कदाचित मी त्याचे आकलन करायला अत्यंत तोकडा पडत असेल. माझ्या दृष्टीने असंख्य ग्रंथांमधून तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि कदाचित विज्ञान यांचे जे काही विवेचन थोर ऋषीमुनींनी केलेले आहे ते काहीसे Java interface मधल्या public abstract मेथड्स् प्रमाणे वाटते. ते विवेचन readymade वापरण्यासारखे वाटत नाही. त्या interface च्या आधारावर आपला स्वतःचा concrete class तयार करून त्यामध्ये त्या मेथड्स् implement करून मग त्या उपयोगात आणणे अपेक्षित असते.
ज्यांच्यात असे concrete class तयार करून पुढची सर्व प्रक्रिया पार पाडण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी हिंदू तत्वज्ञान खूप चांगला source आहे. पण माझ्यासारख्या कदाचित असंख्य layman साठी मात्र Spring Data JPA सारखं काही मिळालं तर ते खूपच सोयीस्कर पडेल.
अर्थात हे मी माझ्या अल्पमतीने लिहित आहे, सत्य-असत्य जगन्नियंत्याला माहीत!
- (लहानग्या जॉर्ज वॉशिंग्टनची कुऱ्हाड हाती धरलेला) कांदा लिंबू
+१
In reply to public abstract methods? by कांदा लिंबू
इन जनरल भारतीय लेखक/वक्त्यांविषयी माझा हाच आक्षेप असतो. नक्की काय करायचे आहे हे अगदी माझ्यासारख्या अतीसामान्याला समजेल अशाप्रकारे क्वचितच समजावून सांगितलेले असते. त्यामुळे दिसायला आणि वाटायला भारदस्त दिसणारे/वाटणारे तत्त्वज्ञान असले तरी त्याचा मला उपयोग काय आणि मी काय करू याचा काही उलगडा व्हायचा नाही. दुसरे म्हणजे जे काही सांगितले आहे ते तसे नसूनच त्यामागचा गूढ अर्थ वेगळाच काहीतरी आहे आणि त्यामागे फार मोठे विज्ञान दडलेले आहे असे ॲड नॉसिअम केलेले दावे खरं तर डोक्यात जायचे/जातात. म्हटलं सगळेच गूढ अर्थ कसे असतात? सरळ अर्थ आहेत कुठे? अर्थात मी सगळ्यांचे लेखन/भाषणे वाचायला/ऐकायला गेलेलो नाही त्यामुळे मला माहित नसलेले पण त्या गोष्टी योग्यप्रकारे सांगणारे अनेक लोक असतीलच. त्यांचे वाचायला/ऐकायला आवडेल.
वाटायला भारदस्त दिसणारे/वाटणारे तत्त्वज्ञान असले तरी त्याचा मला
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
वाटायला भारदस्त दिसणारे/वाटणारे तत्त्वज्ञान असले तरी त्याचा मला उपयोग काय आणि मी काय करू...
मला कबीरदासांचे विचार भावतात.त्यांच्या मते, कर्म करताना मनात 'मी करतोय' हा अहंकार (कर्ताभाव) नसावा. जेव्हा माणूस अहंकाराचा त्याग करून, निस्वार्थ भावनेने आणि ईश्वराचे स्मरण ठेवून कर्म करतो, तेव्हा ते कर्म भक्ती बनते. अर्थात हे प्रत्येक वेळेस जमतेच असे नाही.ते पुढे म्हणतात.
योग्य कर्म योग्य वेळीच केले पाहिजे. कामात आळस करणे, ते पुढे ढकलणे याचा परिणाम नकारात्मक होऊ शकतो.
काल करे सो आज कर, आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी, बहुरि करेगा कब॥
कर्म करताना सदसद्विवेक बुद्धीला अनुसरून कर्म करावे असे म्हणतात.
करता था सो क्यों किया, अब कर क्यों पछिताय।
बोया पेड़ बबूल का, आम कहाँ से होय ॥
त्यांचा ढोंगी कर्मकांडाला विरोध होता व ते सडेतोड पणे प्रतिवाद करत.
माला फेरत जुग भया, फिरा न मन का फेर।
कर का मनका डार दे, मन का मनका फेर॥
कर्माचा हिशोब इथेच करावा लागतो. स्वर्ग नर्क या संकल्पना स्पष्ट नाकारतात.ते म्हणतात इथेच नर्क आणी इथेच स्वर्ग आहे.
पाप करो या पुण्य, बने सभी स्वर्ग के वासी।
कितने भी मानव मरे, कहे स्वर्ग को जाय।
पता नहीं किस मूरख ने, दियो नरक बनाय॥
आजपर्यंत मी कित्येक जन परिजनांचे मृत्यू बघीतले. अंतिम संस्कारानंतर पिठावर दिवा लावून तो टोपलीने झाकायचा प्रघात आहे. दुसर्या दिवशी टोपले उघडून बघितल्यावर मृतात्म्या कुठल्या जन्माला गेला त्याच पावल पिठावर उमटतात असे म्हणतात.
आजपर्यंत गाय सोडून इतर कुठल्याही प्राण्याचे पाय उठलेत असे सांगितल्याचे आठवत नाही.
कर्म करत रहाणे एवढेच आपल्या हातात आहे.
+१
In reply to वाटायला भारदस्त दिसणारे/वाटणारे तत्त्वज्ञान असले तरी त्याचा मला by कर्नलतपस्वी
या सगळ्या बाबतीत मला अष्टावक्र गीता सगळ्यात भावली. https://www.youtube.com/watch?v=Y_P6zFLsAy4& हा व्हिडिओ मी अनेकदा ऐकतो. मला वाटते एक गोष्ट करता आली तरी बरेच काही होईल. ते म्हणजे आपल्याला काहीतरी मिळाले/आपण कुठेतरी पोचलो की आपल्याला सुख मिळेल या भ्रमातून मुक्ती मिळायला हवी. माझ्याकडे 'क्ष' इतके रूपये असतील तर मी सुखी होईन असे वाटते पण 'क्ष' रूपये जमल्यावर '२क्ष' रूपये मिळाले तर सुखी होईन असे वाटायला लागते. मग '२क्ष' मिळाल्यानंतर आणखी काहीतरी मिळाले तर मी सुखी होईन असे वाटायला लागते. ते मिळाल्यावर आणखी काही... म्हणजे आपण ट्रेनमध्ये बसलेलो असतो आणि सुख दरवेळी पुढच्या स्टेशनवर आपल्यासाठी वाट बघत असते. आपण तिथे पोचल्यावर तेच सुख त्याच्या पुढच्या स्टेशनवर निघून जाते. असे सुखाच्या मागे सतत धावत राहणारा माणूस कधीच सुखी होऊ शकणार नाही. तेव्हा आपण दुसरीकडे कुठेतरी पोचलो की आपल्याला सुख मिळेल या भ्रमातून मुक्ती मिळायला हवी.
+१ अष्टावक्र फारच थेट व्यवहारीक कोरडे आणि मर्मभेदी बोलतात
In reply to +१ by चंद्रसूर्यकुमार
हो
In reply to +१ अष्टावक्र फारच थेट व्यवहारीक कोरडे आणि मर्मभेदी बोलतात by ज्ञानोबाचे पैजार
अष्टावक्र गीता समजायला आणि आचरणात आणायला एक जन्म पुरेसा नसेल असे वाटते. निदान मला तरी नाही. त्यामुळे सध्या माझी उडी- सुख पुढच्या स्टेशनावर थांबले आहे तिथे पोचले की झाले या धावण्यापासून कशी सुटका होईल इथपर्यंतच. बहुदा त्यातच हा जन्म जाईल 😀
उपनिषदे वेदांचा शेवटचा भाग…
उपनिषदे वेदांचा शेवटचा भाग त्यातले हे ज्ञानांश खुप सहज सरल करुन समजावले आहे.आणखिनही उपनिषदे अशीच सरल करुन लिहा🙏
उत्कृष्ट लेख माऊली. __/\_…
उत्कृष्ट लेख माऊली. __/\__
उपनिषदातील यम नचिकेत संवाद महाभारतल्या अनुशासन पर्वात देखील आहे मात्र अगदी वेगळ्या स्वरुपात. तेथे तो संवाद गोदानाची महती सांगणाऱ्या कर्मकांडाच्या अनुषंगाने येतो. उपनिषदातील आत्मतत्त्व जाणणाच्या भावनेचा स्पष्ट अभाव महाभारतातल्या त्या प्रक्षिप्त संवादात जाणवतो.
जड चेतन समस्त प्राण्यांना न…
जड चेतन समस्त प्राण्यांना न दुखवता उत्तम रीतीने कर्म करून जगणे, हेच तत्वज्ञान सनातन धर्माचे आहे. लेख आवडला.
वाह वा
फार सुंदर!