नुकताच मानवजातीने एक महत्वाचा लोकसंख्याशास्त्रीय टप्पा ओलांडला आहे. मानवाच्या संपूर्ण इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे किंबहुना असे काही घडेल अशी कल्पना कधीही केली गेली नसेल.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या यू.एस. सेन्सस ब्युरोच्या नवीन अंदाजानुसार, जगभरात आता ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची संख्या पाच वर्षांखालील मुलांपेक्षा जास्त झाली आहे. हा बदल एकाच वेळी घडणाऱ्या दोन मोठ्या प्रवृत्तींमुळे झाला आहे. एकीकडे वैज्ञानिक प्रगतीमुळे लोकांचे आयुर्मान वाढत आहे, तर दुसरीकडे कुटुंबांमध्ये मुलांची संख्या कमी होत आहे. किमान पाच अपत्ये असणाऱ्या मागील पिढीपासून आता एक अथवा फार तर दोन अपत्ये किंवा अपत्यहीन जीवनशैली (DINKs - Double Income No Kids) हा पर्याय निवडण्यापर्यंत मजल गेली आहे.
२०२५ मध्ये अंदाजे १०.५% लोकसंख्या आधीच ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची झाली आहे. २०६० पर्यंत या वयोगटातील जागतिक लोकसंख्या सुमारे २ अब्ज लोकांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. त्या कालावधीतील एकूण लोकसंख्या वाढीपैकी निम्म्याहून अधिक वाढ ही वृद्ध वयोगटांमधून होण्याची अपेक्षा आहे.
हे केवळ श्रीमंत आणि प्रगत देशांमध्येच घडत असे असे नाही तर आशिया, लॅटिन अमेरिका आणि इतर विकसनशील प्रदेशांमध्येही प्रजनन दरात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान २०२४ मध्ये जागतिक सरासरी आयुर्मान सुमारे ७३.३ वर्षांवर पोहोचले आहे आणि २०५४ पर्यंत ते ७७.४ वर्षांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
आणि ही तर केवळ सुरुवात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार, २०७० च्या दशकाच्या अखेरीस, ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे सुमारे २.२ अब्ज लोक असू शकतील. ही संख्या केवळ पाच वर्षांखालील मुलांपेक्षाच नव्हे, तर १८ वर्षांखालील प्रत्येकापेक्षा जास्त असेल.
या परिवर्तनाचा परिणाम जवळजवळ प्रत्येक गोष्टीवर होईल ज्यामध्ये आरोग्यसेवा, निवृत्तीवेतन, गृहनिर्माण, रोजगार, नागरी सेवा, कार्यक्षम वयोगटातील घटणारी लोकसंख्या इत्यादी बाबींचा समावेश असेल. ८० वर्षे आणि त्याहून अधिक जगणे हे अपवादात्मक न राहता एक सामान्य बाब होईल.
मानवी इतिहासाच्या बहुतेक काळात, लोकसंख्येच्या पिरॅमिडच्या तळाशी प्रचंड संख्येने मुले आणि शिखरावर तुलनेने कमी वृद्ध लोक असत. आता तो प्राचीन आकार हळूहळू बदलत असून तो एखाद्या घटासारखा (माठासारखा - earthen pot) होतो आहे. भविष्यात त्याचा पाया (base) लहान आणि वरील भाग रुंद होईल. अशी आकृती अस्थिरता दाखवते.
असा अनुभव मानवजातीने या आधी कधीही घेतलेला नाही परंतु गेल्या काही दशकातील बदलती demography बघता -
ये तो होना ही था ...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
यदा यदा ही.....
प्रमाणे भविष्यात या परिस्थितीवर निसर्ग काही तोडगा काढेल काय?
खरे आहे कर्नल काका,
In reply to यदा यदा ही..... by कर्नलतपस्वी
खरे आहे कर्नल काका,
सध्या क्वांटम फिजिक्स मधून इतक्या विचित्र आणि अतार्किक गोष्टी बाहेर येत आहेत कि ऐकावे ते नवलच.
हे ब्रह्मांड स्व जाणीव असलेले (Conscious) आहे असा एक युक्तिवाद आहे.
हे म्हणजे अगदी पिंडी ते ब्रह्मांडी असे झाले.
हे खरे असेल तर निसर्ग तोडगा काढेलही. लोकसंख्या एका मर्यादेवर स्थिर होईल असे वाटते.
अर्थात काळाच्या उदरात काय दडले आहे कोणास ठाऊक?
आणि काळ हा भूत, वर्तमान आणि भविष्य एकाच वेळी अस्तित्वात आहे असा एक मतप्रवाह शास्त्रज्ञांमध्ये आहे.
खरंय ! आणि......
ह्या निमित्ताने मांडावे वाटते की भारताची सुद्धा लोकसंख्या स्थैर्याच्या दिशेने दमदार वाटचाल झाली आहे
टॅग केलेल्या बातमी नुसार मागच्या दोन तीन वर्षात भारताचा टोटल फर्टिलिटी रेट (टी.एफ.आर) हा रिप्लेसमेंट रेट पक्षी २.१ संतती प्रति जननक्षम स्त्री पासून १.९ संतती प्रति जननक्षम स्त्री इतका खाली उतरला आहे. हा फरक फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा दिसून आला असून, ह्या दरात झालेली घसरण ही लोकसंख्या स्फोटात खलनायक भूमिका निभावणाऱ्या उत्तर प्रदेश आणि बिहार मध्ये पण दिसले आहे, दोन्ही राज्यांचा जनन दर हा राष्ट्रीय सरासरी पेक्षा जास्त असला तरी मागच्या जनगणनेपेक्षा अर्ध्यावर आलेला आहे सरासरी.
विशेष म्हणजे २.१ हा जनन दर हा रिप्लेसमेंट रेशो म्हणवला जातो कारण प्रति जननक्षम स्त्री जर २.१ बालके जन्माला घालत असेल तर त्या दराने एक पिढी पूर्ण रिप्लेस होऊन लोकसंख्या स्थिर राहते.
सध्या भारताचा जनन दर हा १.९ वर स्थिर झाला असून त्यामुळे लोकसंख्या कमी होत होत काही दशकांत वरिष्ठ नागरिक असणारी लोकसंख्या जास्त होऊन तरुण लोकसंख्या कमी होईल.
कोटीमध्ये गेलेला हा आकडा बऱ्याच परिमाणांना परत री-डिफाइन करण्यास भाग पाडेल.
त्यामुळे मला वाटते जर भारताने जननदर मेन्टेन ठेऊन २.१ टी एफ आर काटेकोर पाळून लोकसंख्या स्थिर ठेवली तर पुढे येणाऱ्या प्रॉब्लेम्सला एक उत्तम कुशनिंग मिळून जाईल.
(मालथस महालनोबीस) खोंडे
अरे व्वा वृषभभाऊ, तुम्ही तर सांख्यिकीय आकडेवारीच सादर केली कि!
In reply to खरंय ! आणि...... by वृषभ खोंडे
अरे व्वा वृषभभाऊ तुम्ही तर सांख्यिकीय आकडेवारीच सादर केली कि, छान.
एप्रद (एकूण प्रजनन दर) २.१ वर स्थिर होऊन लोकसंख्या देखील भविष्यात स्थिरावेल अशी आशा आहे.
वंश सातत्य हीच निसर्गाची आदिम प्रेरणा आहे.
रोचक मुद्दा आहे
आणखीही एक मुद्दा याला जोडून पाहणे रोचक ठरेल. तो म्हणजे जगातील माणसाची काम करण्याची गरज कमी कमी होत जाणे. ए आय मुळे अनेक लोक कामातून मुक्त होतील व कदाचित त्यांना फुकट पोसावे लागू शकते. अशी लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढू शकते कारण तंत्रज्ञानाचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे हा बदल येत्या एका दशकातच घडू शकतो. असे कामरहित लोक वाढले तर मानवजातीवर काय परिणाम होईल?
हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही अचूक नाडीवर बोट ठेवलंय.
In reply to रोचक मुद्दा आहे by स्वधर्म
हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही अचूक नाडीवर बोट ठेवलंय. आपण आतापर्यंत विचार करत होतो एआय मुळे नोकऱ्या जातील. पण खरा प्रश्न नोकरी जाण्याचा नाही. खरा प्रश्न आहे, जेव्हा कामाचीच गरज संपेल, तेव्हा माणूस काय करेल?
पोटासाठी काम करायची गरज संपेल, तेव्हा माणसाला स्वतःचा स्वधर्म, म्हणजे मी कशासाठी जन्मलोय हेच शोधावे लागेल. जो समाज हा अर्थ लवकर शोधेल, तो टिकेल. जो फक्त फुकट पोसण्यावर अवलंबून राहील, तो आतून कोलमडेल, असे वाटते.
ह्याला superabundance असे…
In reply to हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि तुम्ही अचूक नाडीवर बोट ठेवलंय. by चामुंडराय
ह्याला superabundance असे म्हणतात. ह्यामुळे माणूस हा अंतर्मुख होईल.