मिसळपाव कुटुंबातील सर्व कवी, लेखक, वाचक, समीक्षक मित्रांना नमस्कार आशा करतो कि तुम्ही सर्व मजेत आणि आनंदात असाल ! आज सुमारे नऊ वर्षानंतर (२०१७ नंतर) इथे मी तुम्हाला भेटायला आलोय खूप दिवसांपासून जेपी, अतिवास, पाषाणभेद, यशोधरा, सौंदाळा, पेठकर काका, प्यारे, आयुर्हित, पैसा, अतृप्त आत्मा, गवि, चौकटराजा, अर्धवटराव, मुक्त विहारी यांना मिसळपाव वर पुन्हा भेटायला उत्सुक होतो ; खास करून माझ्या सांगली जिल्ह्यातील गाववाले बलवडीचे कपिलमुनी, मिरजेचे बॅटमॅन हे अजून इथे सक्रिय आहेत का ? हे पण पहायचे होते. पुर्वीसारख्याच पुन्हा इथे कविता, कथा, लेख लिहीनच परंतु जुन्या काळच्या आठवणी, संस्कृती यावर लिहण्याचा मानस आहे. कारण आपण सर्वांनी जुन्या काळच्या काही हळव्या आठवणी आपल्या मनात कायमच्या जतन करून ठेवलेल्या असतात. त्या आठवणींवर आताच्या धावत्या वेळेची किंवा आधुनिक काळाची पुटं चढलेली राहतात… मी त्या पुटांवर हलकीशी फुंकर घालून, मनाच्या गाभाऱ्यात दडलेल्या त्या सोनेरी आठवणी अलगद तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करीन ! गोड मानून घ्या !
🙏
- साजीद पठाण (दह्यारी, पलूस /सांगली)
आज हॉटेलची गोड, चविष्ट, सुगंधी, मनात दरवळणारी आणि मन तृप्त करणारी आठवण सांगतो
तसा पूर्वीपासून मी बाहेर खाण्याचा जास्त शौकीन नाही कधीतरी Occasionally किंवा एखाद्या आनंदाच्या प्रसंगी कुटुंबिय किंवा मित्रांसोबत हॉटेलमध्ये खाण्यासाठी जातो. (आताशा माझा मित्र संदीप आण्णामुळे हॉटेलमध्ये खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे हे मान्य करावे लागेल) परवा गावाकडून माझे काही मित्र कामानिमित्त इकडे आले होते तर त्यांच्याबरोबर दिवसभर राहिलो दुपारी जेवणाच्या वेळेस डेक्कन जवळील एका हॉटेलमध्ये गेलो आणि तिथला श्रीमंती थाट पाहून डोळे विस्फारून गेले, एकदम पॉश हॉटेल, आकर्षक इंटिरियर, एसी हॉल, लाईव्ह इंस्ट्रुमेंटल म्युझिक आणि अतिशय प्रोफेशनल सर्व्हिस देणारे मॅनेजर पासून वेटरपर्यंत लोकं आणि टेबलवर छोट्या पुस्तकाएवढं मेनूकार्ड आणि त्याच्या शेवटच्या पानावरील मेनूस्कॅनर आणि बिलस्कॅनर कोड ! पदार्थ वाचण्याचा कंटाळा आला तर मेनूस्कॅनर स्कॅन करून ऑर्डर द्यायची ज्यात शेकडो पदार्थ, त्यांची विदेशी नावं, वेगवेगळे प्रकार, फ्युजन, कॉंटिनेंटल डिशेस..... मेनू वाचतच अर्धावेळ जातो, दमून जायला होतं आणि शेवटी "काय घ्यायचं?" हा प्रश्नच पडतो. शेकडो पदार्थ आहेत पण तरीही 'जो पदार्थ इथला खास आहे तो घेऊन ये' असे वेटरला सांगायची वेळ येते आणि शेवटी जे आणलं ते आल्यानंतरही त्यात नेमकं काय आहे, हे समजण्यासाठी पुन्हा वेटरची मदत घ्यावी लागते अशी अवस्था ! हा जो बदल आहे त्या बदलाला दोष देण्यात अर्थ नाही. आता सगळीकडे पंचतारांकित हॉटेलं आहेत, हजारो रुपयांची बिलं आहेत...आजची पिढी नवीन चवी अनुभवते, जगभरचे पदार्थ चाखते. बदल हा काळाचा नियम आहे. काळ बदलणं स्वाभाविक आहे. नवीन पदार्थ यायलाच हवेत, नवीन चवी अनुभवायलाच हव्यात. बदलाला विरोध नाही कारण प्रत्येक काळाचं स्वतःचं सौंदर्य असतं.... सगळ्या बाबतीत प्रगती होत आहे पुढेही होत राहील पण या प्रगतीच्या प्रवासात पूर्वीचा साधेपणाचा गोडवा, माणुसकीची ऊब आणि समाधानाची खरी चव हरवू नये असं मनात कुठेतरी वाटत राहतं. कारण साधं वातावरण, अमूल्य समाधान आणि मनाला स्पर्श करणारा आपलेपणा... यांची सर आजही कशालाच येत नाही. हॉटेलं बदलली, मेनू बदलले, चवी बदलल्या... पण त्या साध्या जेवणाच्या आणि त्या दिवसांच्या आठवणी मात्र आजही तितक्याच ताज्या आहेत.
सुमारे पंचवीस - तीस वर्षांपूर्वी हॉटेलांमध्ये फारशी सजावट नव्हती. स्टीलची टेबलं नाही तर विटांच्या चौकोनी कट्ट्यावर शहाबादी फरशी टाकून बनवलेला टेबल, त्याच्या दोन्ही बाजूला बसायला त्याच्यापेक्षा कमी उंचीचं बाकडं किंवा कळकाचे चार पाय लावून बनवलेलं लाकडी बाकडे किंवा साध्या खुर्च्या, भिंतीवर देवाचं कॅलेंडर, कोपऱ्यात हात धुण्याचा नळ, काचेच्या बरणीत ठेवलेली बडीशेप, एखादी बटरपाव, बिस्कुटची बरणी आणि काऊंटरवर बसलेले मालक. ते हॉटेल मालकपण असे कि, खूप जुनी ओळख असल्यागत आलेल्या ग्राहकाचे तोंडभरून स्वागत करणार, ग्राहक आत येताच त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हेच त्या हॉटेलचं खरं स्वागत असायचं. सगळ्या हॉटेलमधील वेटरांची नावे पण छोटूच ! कॉउंटरवरून मालक "छोटू काय हवंय बघ” म्हणणार आणि वेटरही खांदयावरचा कपडा झटकून टेबल पुसत “काय देऊ मालक?” म्हणत ऑर्डरची वाट पाहणार. मग आपण बाजूलाच भिंतीवर काळ्या फळ्यावर किंवा छोट्याशा पाटीवर थोड्याच पदार्थांची लिहलेली यादी आणि पेन्शीलने लिहलेले दरपत्रक पाहत ‘एक भजी दोन चहा’ अशी ऑर्डर देणार…. वेटरही विलक्षण ! चेहऱ्यावर राग नाही, थकवा नाही ; फक्त कामातली तल्लीनता. एका हातात चार-पाच स्टीलच्या प्लेट, दुसऱ्या हातात प्रभू-प्रसाद लिहलेल्या आणि एकावर एक रचलेल्या कप-बशीतील चहा घेऊन एकावेळी वेटर दोनतीन टेबलवर ते ग्राहकांना देत जायचा, मग खाऊन झालं कि वेटर छोट्याश्या चौकोनी चिठ्ठीवर पेन्शीलने बिलाची रक्कम लिहायचा आणि पैसे दिल्यावर हसतमुख चेहऱ्याने मालक म्हणायचा, "पुन्हा या..." त्यावेळी पोट भरल्याच्या समाधानात आपण बाहेर पडत असू. आपलं आणि हॉटेलचं असलं समीकरण त्या काळी होतं. तेव्हा कमी पैश्यात सगळ्यांच्या जिभेवर समाधानाची चव रेंगाळत राहायची, तृप्तीची ढेकर यायची. तेव्हा पदार्थ साधे होते, पण चवीला मनापासून होते. आज पदार्थांची रेलचेल आहे, पण अनेकदा मन शोधत राहतं ते जुनं समाधान. आणखी एक मोठा फरक म्हणजे पूर्वी हॉटेल म्हणजे गप्पांचं व्यासपीठ होतं, हॉटेलमध्ये गप्पा रंगायच्या, मित्र भेटायचे, वर्तमानपत्र वाचलं जायचं, राजकारणावर चर्चा व्हायची, कॉलेज बुडवून आलेले विद्यार्थी, राजकारणावर रंगणाऱ्या चर्चा, कवी-लेखकांच्या मैफिली... एका कप चहाभोवती कितीतरी अशी असंख्य नाती तयार व्हायची. आमच्यापैकी बऱ्याच मित्रांना आमच्या कॉलेजच्या पाठीमागे (बुर्ली-आमणापूर रोडवर) दिलखुष हॉटेलमध्ये लाकडी बाकड्यावर बसून शेजारच्या नवरंग तात्यांच्या गणेश टॉकीजच्या स्पीकरमधून ऐकू येणाऱ्या गाण्यासोबत एक भेळ किंवा भजी पाच-सहा मित्र चहाचा घोट घेत घेत खायचो हे आठवत असेल.
त्या काळी सुरवातीला महाराष्ट्रीय हॉटेल म्हटलं की भजी, बटाटेवडा, मिसळ, उसळ-पाव आणि चहा एवढीच दुनिया होती. त्यानंतर मग केरळ आणि कर्नाटकातून आलेल्या उडिपी हॉटेलवाल्यांनी महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत एक वेगळीच चव आणली. उडपी हॉटेलांनी महाराष्ट्राला इडली, वडा-सांबार, मसालाडोसा, रवा डोसा, उत्तप्पा, पोहे, उपमा, शिरा आणि फिल्टर कॉफीची ओळख करून दिली. रामानंदनगर मध्ये ‘स्वागत’ आणि पलूस मध्ये ‘समर्थ’ किंवा त्यानंतर आलेल्या ‘श्रीदेवी’ इत्यादी हॉटेल्स त्यावेळी खूप चांगले, चविष्ट आणि स्वच्छ असे दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ ग्राहकांना द्यायचे. अजूनही पलूसमधील जुन्या एस.टी. स्टॅन्डच्या बाजूला आंधळी रोडवर 'समर्थ' आणि रामानंदनगरचे ‘स्वागत’ हॉटेल ग्राहकांना उत्तम सेवा देत आहेत. त्यांच्या पदार्थांमध्ये दिखाऊपणा नव्हता; पण चवीत जीव होता. इडली म्हणजे काय, डोसा कसा असतो, सांबाराची चव कशी असते, खोबऱ्याची चटणी काय असते, हे उडपी हॉटेलांनीच दाखवलं. साधेपणा, स्वच्छता आणि सातत्यपूर्ण चव हे त्यांच्या हॉटेलचं वैशिष्ट्य होतं. आजही एखादं जुनं उडपी हॉटेल दिसलं की नकळत पावलं तिकडे वळतात. गरमागरम इडली, खरपूस डोसा, वाफाळतं सांबार आणि फिल्टर कॉफीचा सुगंध मनाला पुन्हा अनेक वर्षं मागे घेऊन जातो.
त्याकाळात मेनू लहान होता, पण माणुसकी मोठी होती, हॉटेलं छोटी होती, पण माणसं मोठी होती, पदार्थ कमी होते पण चवी अफाट होत्या, किंमती छोट्या होत्या पण समाधान भरपूर होतं. काळ बदलला…. पिढ्या बदलल्या…. हॉटेलचे रूपही बदलले... पण आठवणींच्या चवीला कधीच कालबाह्यता आली नाही. खरंच, त्या काळी. खिसा हलका असला तरी मन श्रीमंत होतं, त्यांच्या आठवणी अमूल्य होत्या.
म्हणूनच आजही मन हळूच म्हणतं... "गेले ते दिवस... पण राहिल्या त्या गोड, चविष्ट, सुगंधी आणि कायम मनात दरवळणाऱ्या, आणि मन तृप्त करणाऱ्या आठवणी!"
- साजीद पठाण (दह्यारी, सांगली)
मिसळपाव
प्रतिक्रिया
पठाण साहेबहॉटेलच्या…
पठाण साहेब
हॉटेलच्या रंगरूपाचा आणि त्यात मिळणाऱ्या पदार्थांच्या चवीचा संबंध असेलच असे नाही.
भरपूर मेकअप केलेली मुलगीच सुंदर असते असे नव्हे तर एखादी गावची साधी साडीतली मुलगी सुद्धा अप्रतिम सुंदर असते तसेच आहे.
साध्या हॉटेलात कोथिंबीर वडी म्हटली कि सत्तर किंवा ऐंशी रुपयाला चार मोठ्या चौकोनी वड्या येतात.
तेच एखाद्या पंच तारांकित हॉटेलात पुदिन्याच्या चटणी बरोबर बोन चायनाच्या प्लेटमध्ये येतात गोल रूपात छोट्याशा आठ वड्या "धनिया कबाब" म्हणून किंमत रुपये ५५०/- मात्र, अधिक वस्तू आणि सेवा कर (जी एस टी).
आमच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी आम्ही कोडाईकॅनॉल ला गेलो होतो. चार दिवसात सर्व पंच तारांकित जेवणे झाली पण बायकोचा दाल वडा खायचा राहून गेला होता. कोडाईचा घाट उतरायला सुरवात केली तेथे असलेल्या छोट्याशा टपरीवर केवळ २० रुपये प्लेटला मिळालेला दाल वडा आणि २० रुपयाला मिळालेली वाफाळता फिल्टर कॉफी हे केवळ अतुलनीय होते.
चालायचंच.
आपण लिहीत जा -- जुन्या त्या गोड, चविष्ट, सुगंधी आणि कायम मनात दरवळणाऱ्या, आणि मन तृप्त करणाऱ्या आठवणी!"
उत्तम लेखन. यावर खूप काही…
उत्तम लेखन. यावर खूप काही म्हणण्यासारखे आहे. पुन्हा येईनच. ही केवळ पोच. आणि मुख्य म्हणजे वेलकम बॅक.
लेखन आवडलं.
स्वच्छता टापटीप आणि मोक्याची जागा म्हणजे उडुप्याचे हॉटेल. सहमत.
वेलकम ना, मग…
वेलकम ना, मग वेलकम
द्दिवाळीच्या काळात नातेवाईक पुरूष मंडळी घरातले दिवाळीचे पदार्थ खायचे सोडून हॉटेलीत जात असत.
आता तर नातेवाईक एकत्र येणेच कठीण झाले आहे.
साजिद भाऊवेलकम बॅक....
साजिद भाऊ
वेलकम बॅक....
वा, जुना कट्टेकरी परत आला…
वा, जुना कट्टेकरी परत आला आणि लेख लिहिला
नऊ वर्षांच्या खंडानंतर लेखन मात्र ओघवतेच आहे.
जुना काळ असो की नवा पण मोठ्या हॉटेलापेक्षा छोट्या अनवट जागी खाल्लेच लक्षात राहते हे मात्र आहे.
शिरोडा वेतोबा देवळाजवळ खाल्ली चहा-भजी, आंबोलीला पहाटे ५ वाजता खाल्लेला उप्पीट शिरा, माळशेज घाटातून परत येताना रस्त्यात टपरीवर खाल्लेले पंजाबी जेवण आणि जवळ जवळ सर्व ट्रेक मधले जेवण हे अजूनही लक्षात आहे.
मोठ्या हॉटेलात खाऊन जेव्हा सर्व चांगले असते तेव्हा लक्षात राहत नाही पण जेव्हा पदार्थ फसतात ते अजूनही लक्षात आहेत.
असो. लिहीत रहा आता.
साजिद भाई
लेख आवडला, खाद्य आठवणींच्या भोवताली फिरणारे मुक्तक ही एक युनिक कन्सेप्ट वाटली मला तरी.
तुम्ही वर्णन केलेली ग्रामीण सांगली भागातली हॉटेल इस्लामपूरला राजारामबापू पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कामाने जात असे तेव्हा खूप एन्जॉय केली आहेत. कराड पासून आत तासगाव रोडवर सगळी गावे मग ते कारवे ते तासगाव मध्ये तुमचे दह्यारी, लोण्यारी, तुपारी, ताकारी, येडे मच्छिंद्र, सगळी डोळ्यासमोर आली, अर्थात आम्ही ताकारी पासून उजवीकडे वळून इस्लामपूरकडे सुटायचो बहुतकरून.
अगदी सुरुवातीला केबल टाकणाऱ्या एक कंपनी मध्ये सुपरवायजर म्हणून काम करताना पलूस पर्यंत प्रवास व्हायचा. पलूस मला अजूनही अंधुक आठवते मला वाटते बस स्टँड होते त्याच्यापासून चालत चालत अंतरावर श्रीदेवी हॉटेल होते, आणि बसस्टँड पुढे रस्त्याच्या पलीकडे पलूस गावाचे एक सिद्धपुरुष / ग्रामसंत होते (माफ करा नाव विसरलो) ह्यांचे देऊळ होते, तिथून पुढे मुख्य बाजार रस्ता होता, अर्थात आम्ही गावात शिरत नसू पण बघितले आहे मात्र येताजाता.
ह्या भागात एक विशेष प्रकार म्हणजे आंबोळी हा होता ह्याला काही लोक बहुतेक टोमॅटो ऑमलेट पण म्हणत बारीक चिरलेला टोमॅटो, बेसन, हिरवी मिरची इत्यादी जिन्नस घालून केलेला एक जाळीदार पण मऊ डोश्यासारखा तो प्रकार असे. जुन्याकाळच्या एकेकाळी घाम गाळलेल्या भागातील आठवणी मूर्त स्वरूपात मांडल्याबद्दल आपले असंख्य आभार.
(खाद्ययात्रा कढई पथिक) खोंडे.
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद !
तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद ! @ वृषभ साहेब, आमच्या भागाकडच्या तुमच्या आठवणींना शेयर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद ! तुमच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर - पलूस परिसरातील आठवणींना एक वेगळीच अस्सलता आहे. अशाच आठवणींमधून एखाद्या प्रदेशाची खरी चव आणि तिथल्या माणसांचं जगणं समोर येतं. पलूस मध्ये समृद्ध अध्यात्म परंपरेचा वारसा सांगणारे धोंडीराज महाराज यांची समाधी आहे. धोंडीराज महाराजांनी सुरु केलेली अन्नदानाची परंपरा आजही येथे अखंडपणे सुरू आहे हे विशेष.
लेख वाचून तुमच्याही जुन्या आठवणी जाग्या झाल्या, हेच या लेखनाचं खरं समाधान ! 🙏
हा बरोबर !
In reply to तुमच्या सर्वांच्या प्रतिक्रियेबद्दल खूप धन्यवाद ! by psajid
श्री धुंडिराज महाराज किंवा आमचे स्थानिक कर्मचारी म्हणत तसे धोंडीबुवा. मला नेमके नावच आठवत नव्हते.
चायनीज् सॉल्ट /अजिनोमोटो / MSG - मोनो सोडियम ग्लूटामेट
आजकाल जवळपास सर्व रेस्टॉरंटस् , फूड जॉइन्ट्स, स्ट्रीट फूड इत्यादी ठिकाणी सर्रास पांढरी पावडर / चायनीज् सॉल्ट /अजिनोमोटो / MSG -मोनो सोडियम ग्लूटामेट वापरतात असे म्हणतात. खाद्यपदार्थांना त्यामुळे उमामी चव लाभते परंतु MSG च्या वापराने आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल (Chinese restaurant syndrome) संदिग्धता आहे असे कळते.