Skip to main content

बुद्धीबळाची गोष्ट: मॅक्सवेलसारखा थरार

लेखक मार्गी यांनी सोमवार, 31/08/2026 20:42 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार. बुद्धीबळ हा खेळ मुलांच्या बुद्धीमत्तेला चालना देण्यासाठी ओळखला जातो. कल्पनाशक्ती, विचार शक्ती, संयम, दृढता ह्या गुणांसाठी तो उपयोगी ठरतो. अदू- माझ्या मुलीसोबत माझे आजवर शेकडो बुद्धीबळाचे डाव झाले आहेत. खूप छोटी होती तेव्हा हरल्यावर रडून माझ्या राजावर हवाई हल्ला करण्यापासून ते आता मला अधून मधून हरवण्यापर्यंत! किमान ३०० डाव आम्ही खेळलो असू. काही डाव खूप गाजले! एक डाव तर टायसुद्धा झाला. नियमित खेळायला लागल्यावर तिला हळु हळु गोष्टी कळत गेल्या. आता इथून पुढे मला तिच्याविरुद्ध जिंकणं कठीण आहे. एक मात्र खूप वेगळा रंगलेला डाव आठवतो. अगदी मी हरलोच होतो तो डाव. त्याची गोष्ट अशी. 

(माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत वाचता येईल. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)   

डाव सुरू झाला. तेव्हा ती बरीच नव्याने खेळत होती. त्यामुळे मी आक्रमण करत गेलो आणि जिंकेन असं वाटत असतानाच माझा प्रधान तिने घेतला! मी घोडचूक करून बसलो! तिने चांगला खेळ केला आणि माझा हल्ला परतवला. तिचा हल्ला सुरू झाला आणि नंतर माझा एक हत्तीसुद्धा तिने घेतला! संभाव्यतेमध्ये ९५% ती जिंकणार होती. मी तिला गमतीने बोललो की, "माझी अवस्था तू अफगणिस्तानने ऑस्ट्रेलियाची केली होती तशी ९१/७ अशी केली आहेस- तेही ३०१ चं आव्हान असताना!" 

आणि खरोखर मी हरल्यात जमा होतो. पण... पण पुढे अनपेक्षित झालं. तिचा हल्ला मी कसा बसा रोखून धरला. परतावून लावला. अगदी हळु हळु डाव पुढे सरकत गेला. हल्ला यशस्वी न झाल्यामुळे ती वैतागली आणि तिच्या चुका झाल्या. मी शांत राहून खेळत राहिलो. मग माझ्या एकमेव उरलेल्या खेळाडू हत्तीने मॅक्सवेलसारखी खेळी सुरू केली! मी तिचा प्रधान आणि हत्ती घेतला. माझ्याकडेही फक्त राजा, एक हत्ती आणि प्यादे इतकेच उरले! मग तिचा दुसरा हत्तीही गेला. तिच्याकडे राजा, काही प्यादे व उंट होता. प्यादे आणि हत्तीने आक्रमण सुरू केलं. तिने खूप प्रतिकार केला पण हळु हळु तिचा राजा अडकत चालला! 

कुठूनही शक्यता नसताना केवळ टिकाव धरल्यामुळे हत्ती आणि प्यादे मला जिंकवून द्यायला निघाले. शेवटच्या क्षणी तर माझा प्रधानसुद्धा जीवंत होऊ शकत होता. आता तिचा राजा चेक मेट होणार, तितक्यात तिने चिडून डाव मोडला! थोडा वेळ तिला वाईट वाटलं. पण शांत झाल्यावर मला म्हणाली, "Bro काय डाव झाला! कुठून कुठे डाव गेला. असा कसा काय तू जिंकू शकलास!" मग मी तिला मॅक्सवेलच्या त्या नाबाद २०१ धावांच्या डावाबद्दल सांगितलं. ९१/७ पासून त्याने एकट्याने मॅच जिंकवून दिली होती. 

असे आमचे थरारक डाव होतात. आता इतके डाव खेळल्यावर तिलाही चांगलं खेळता येतंय. माझ्या पूर्वीच्या ट्रिक्स काम करत नाहीत. आणि कधी कधी मी पूर्वीच्या सवयीने हल्ला करण्यात गुंग होतो आणि माझा बचाव भेदून ती अचानक मला चेक मेट करते! पण बुद्धीबळात शिकायला खूप मिळतं. मुख्य म्हणजे पराभव पचवण्याची मानसिकता. शिकत राहण्याची वृत्ती. तिच्या चुकांनी ती वैतागते पण शिकतेसुद्धा. आणि हळु हळु सराव करून करून तिच्या चुका कमी होत आहेत. मी तिला सांगतो की, शंभर डाव खेळण्यासारखी तयारी व सातत्य असेल तर तू कोणतीही गोष्ट शिकू शकतेस. मी तिला एक किस्सा सांगितला होता. खूप पूर्वी मी माझ्या एका भावाला सलग १६ डाव हरवलं होतं. पण तिला हेसुद्धा बोललो की, इतक्या वेळेस हरवूनही तो अजिबात नाराज झाला नाही किंवा चिडला नाही. तर त्याला माझ्या जिंकण्याचा आनंदच होत होता- त्याला आनंदच वाटत होता की, मी किती छान खेळतोय. असं बुद्धीबळातून खूप शिकता येतं! हळु हळु मला जिंकणं कठिण होत जाणार आहे! पण गंमत म्हणजे नेहमी खेळून मीसुद्धा शिकतोय! त्यामुळे मजा तर येणार आहे! 

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 31 ऑगस्ट 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 68
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

छान लिहिलंय. आवडलं. कोणत्याही क्षेत्रात संयम टिकवून धरला तर पराभव लांबणीवर टाकता येतो किंवा विजयही मिळू शकतो. 


चेस चे मला सुद्धा व्यसन आहे. विशेषतः chess.com वर online. सध्या दर रोज न चुकता मी सतत ९०० दिवस किमान एक तरी गेम खेळले आहे. पण इलो कधी १००० च्या वर गेले नाही.

काही गोष्टी लक्षांत आल्या :

१. चेस मधील फॉर्म असंख्य गोष्टीवर अवलम्बुन असतो. 
२. आधल्या रात्री झोप व्यवस्थित घेतली नाही तर आपोआप इलो रँकिंग घसरते. 
३. ताप इत्यादीतून रिकव्हर होताना इलो घसरत जाते. 
४. संयम महत्वाचा आहे . 
५. चेस मध्ये प्राविण्य मिळाल्यास इतर गोष्टींत सुद्धा फायदा होतो. एका गोष्टीवर फोकस करण्याची क्षमता वाढते. 
६. चेस मध्ये काहीही resign करू नये . शेवट पर्यंत लढावे. ह्यातून खूप काही शिकायला मिळते. अनेकदा राजा आणि एक हत्ती घेऊन चेकमेट करायला अनेकांना जमत नाही.