२१ ऑगस्ट २०२६ रोजी भारतीय रेल्वेने एक नवा इतिहास रचला आहे. आपल्या देशात जगातील पहिली सर्वात लांब इलेक्ट्रिक डबल स्टॅक कंटेनर ट्रेन यशस्वीरीत्या धावली. या ट्रेनची एकूण लांबी १.३ किलोमीटर एवढी आहे. अशी कामगिरी जगात इतर कुठेही झालेली नाही. ही ट्रेन जेएनपीटी बंदरावरून वडोदरा येथील गतिशक्ती कार्गो टर्मिनलमधील कॉनकोरसाठी रवाना झाली होती. या ऐतिहासिक ट्रेनने तब्बल ४२२ किलो मीटरांचे अंतर अगदी सुरक्षितपणे पार केले.
या ट्रेनची तांत्रिक रचना खरोखरच कौतुकास्पद आहे. या एकाच ट्रेनमध्ये एकूण १८० कंटेनर्स लोड करण्यात आले होते. दोन वेगवेगळ्या माल गाड्या एकत्र जोडून ही महाकाय ट्रेन तयार करण्यात आली. पहिल्या ट्रेनचे नेतृत्व १२,००० हॉर्स पॉवरचा शक्तिशाली WAG 12 हे इलेक्ट्रिक इंजिन करत होते. या इंजिनाने ९० कंटेनर्स असलेले ४५ वॅगन्स सहज खेचले. तर दुसऱ्या ट्रेनला WAG 7 हे इंजिन जोडलेले होते आणि त्यावरही ९० कंटेनर्स लोड होते.
भारताचा WAG 12 हा काही साधासुधा लोकोमोटीव्ह नाही, तर आपल्या रेल्वेचा खराखुरा बाहुबली आहे! हा दोन भागांत जोड लेला आहे. पूर्णपणे विजे वर चालणाऱ्या या इंजिनची बॉडी एकदम दणकट आहे. ट्रॅकवर मजबूत पकड राहण्यासाठी यात खास चाके दिली आहेत. आणि इंजिन गरम होऊ नये म्हणून भारी इन्व्हर्टर अन् कुलिंग सिस्टीम बसवली आहे. चालकांसाठी ड्रायव्हर केबिनमध्ये एसी आणि डिजिटल स्क्रीन दिल्या आहेत, ज्यामुळे गाडी नियंत्रण सोपे झाले आहे. या इंजिनमध्ये शेकडो स्मार्ट सेन्सर्स बसवलेले आहेत. इंजिनचे तापमान, चाकांचा वेग, मोटरचा दाब, ओव्हरहेड वायरमधून मिळणारा विद्युत पुरवठा आणि ब्रेक सिस्टीमची स्थिती यावर हे सेन्सर्स २४ तास बारीक लक्ष ठेवून असतात. हा सर्व डेटा नेटवर्कद्वारे थेट रेल्वेच्या मुख्य कंट्रोल रूम कडे पाठवला जातो. जर धावत्या ट्रेनमध्ये काही तांत्रिक अडचण आली, तर कंट्रोल रूमा तील इंजिनिर्स दूर बसूनच कॉंपुटरवर संपूर्ण रिपोर्ट पाहू शकतात. तेथूनच लोको पायलटला स्क्रीनवर मेसेज पाठवून किंवा गाईड करून बिघाड कसा दुरुस्त करायचा, याचे मार्गदर्शन केले जाते. इंजिनमध्ये अत्याधुनिक जीपीएस बसवलेले आहे. यामुळे मालगाडी सध्या कोणत्या लोकेशनला आहे, तिछा वेग किती आहे आणि ती पुढच्या स्टेशनवर कधी पोहोचेल, याचा अचूक डेटा आणि रिअल टाईम मिळतो. यामुळे संपूर्ण फ्रे कॉ 'चे ट्रॅफिक मॅनेज करणे सोपे होते.
आपल्याकडे मालगाड्यांचा वेग वाढवणं खूप गरजेचे आहे. जुनी इंजिनं जास्त वजन घेऊन वेगाने धावू शकत नव्हती, त्यामुळे माल पोहोचायला खूप उशीर व्हायचा. 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर'साठी भारताला एका पॉवरफुल इंजिनची गरज होती. कमी वेळेत अन् कमी खर्चात जास्त माल नेणं आणि रस्त्यांवरच्या ट्रक्सचा ताण कमी करून प्रदूषण थांबवणं, हा यामागचा मुख्य उद्देश होता. अशी महाकाय इंजिनं जगात फक्त काहीच देशांकडे आहेत. मोदी सरकारने रेल्वे साठी आजवरचे विक्रमी बजेट दिले आहे. बिहारमधील मधेपुरा येथे फ्रान्सच्या अल्टॉम कंपनीसोबत मिळून देशातील सर्वात मोठा कारखाना उभारला आणि मेक इन इंडियाअंतर्गत अवघ्या काही वर्षांत WAG 12 सारखी महाकाय इंजिनं प्रत्यक्ष ट्रॅकवर धावू लागली. रशिया, चीन आणि अमेरिकेनंतर आता भारतही या खास क्लबमध्ये सामील झालाय. विशेष म्हणजे 'मेक इन इंडिया' अंतर्गत बिहारच्या मधेपुरा कारखान्यात ही इंजिनं आता आपल्याकडेच बनत आहेत. (हो बरोबर आहे बिहार बरोबर वाचले आहे!) मोदी सरकारने 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' आणि WAG 12 इंजिन यांसारख्या प्रकल्पांना फक्त कागदावर न ठेवता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरवाले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने भारतीय रेल्वे आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी 'मिशन मोड'वर काम केलं आहे हे दिसून येते आहे.
या नवीन प्रयोगामुळे भारतीय वाहतूक क्षेत्राला खूप मोठे फायदे होणार आहेत. आधी एकाच मार्गावर अनेक गाड्या चालवाव्या लागायच्या. आता दोन वेगवेगळ्या गाड्या एकत्र जोडून एकच मोठी ट्रेन चालवल्यामुळे ट्रॅकवरची गर्दी एकदम कमी झाली आहे. परिणामी, ट्रॅक मोकळे मिळतात, ट्रेनांची क्षमता वाढते अन् माल ठरलेल्या वेळेत पोहोचतो.
रेलवेसाठी सर्वात महत्त्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च! दोन वेगळ्या गाड्यां ऐवजी एकाच वेळी दुप्पट माल गेल्यामुळे इंधन, ड्रायव्हर अन् मेंटेनन्सचा खर्च अर्ध्यावर येतो. यामुळे संपूर्ण वाहतूक खर्च खूपच कमी होतो, ज्याचा थेट फायदा आपल्या अर्थव्यवस्थेला होतो. ही नवीन इंजिनं अन् ट्रेन पूर्णपणे विजेवर धावतात. यामुळे डिझेलवरचं आपलं अवलंबित्व तर संपलंच आहे, शिवाय रस्त्यां वरून धावणाऱ्या हजारो ट्रकांचा ताणही कमी झालाय. रस्ते मोकळे झालेत अन् हवेत पसरणारा धूर-प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.
तशी जगात 'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' ही संकल्पना काही नवी नाही. जगातील ज्या देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेला बुस्टर डोस दिला, त्यांनी सर्वात आधी मालवाहतुकीसाठी असे वेगळे मार्ग तयार केले. अमेरिकेने रेल्वे मालवाहतुकीवर भर दिल्यामुळे तिथला माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्याचा खर्च खूप कमी झाला. तिथे रस्त्यांवरील ट्रक्सवरचा ताण कमी झाला आणि बंदरांवरून माल थेट देशाच्या कानाकोपऱ्यात वेगाने पोहोचू लागला. चीनने गेल्या दोन-तीन दशकांत हजारो किलोमीटरचे भारी-भरकम फ्रेट कॉरिडॉर उभारले आहेत. कोळसा, पोलाद आणि कंटेनर्सची वाहतूक इतक्या वेगाने झाली की त्यांच्या कारखान्यांना कधीच कच्च्या मालाची कमतरता भासली नाही. चीन जगाचा कार खाना बनण्यामागे त्यांच्या या वेगवान माल वाहतुकीचा खूप मोठा वाटा आहे.
भारतात हे बदल इतक्या वेगाने केवळ मोदी सरकारच्या प्रयत्नांमुळे हे घडते आहे यात शंकाच नाही. भारत आता ट्रॅकवर येतोय असे म्हणायला वाव आहे. मालगाड्यांचा सरासरी वेग २५ किमी/तास वरून थेट ६० ते ७५ किमी प्रती तास वर गेला आहे. म्हणजे माल आता अर्ध्यापेक्षा कमी वेळेत पोहोचतोय. जिथे आधीच्या काळात १० वर्षांत काही किलोमीटरचे ट्रॅक टाकणेही कठीण झाले होते, तिथे मोदी सरकारने हजारो किलोमीटर लांबीचे ईस्टर्न आणि वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर पूर्णत्वास नेले आहेत आहे त्यावर गाड्या धवून जागतिक विक्रम करत आहेत. या वेगा बद्दल भारतीय रेल्वे मंत्री अश्विनि वैष्णव यांचे अभिनंदन!
थोडक्यात सांगायचं तर, अमेरिका आणि चीनने जो रस्ता पकडून आपली प्रगती साधली, भारत आता त्याच 'फास्ट ट्रॅक'वर आला आहे. फ्रेट कॉरिडॉर मुळे भारत भविष्यात जागतिक व्यापाराचा एक मोठा पॉवरहाऊस बनेल यात माझ्या मनात शंका नाही!
मिसळपाव
प्रतिक्रिया
दर वेळी टायपायचा कंटाळा
'डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर' हे दर वेळी टायपायचा कंटाळा आल्याने काही ठिकाणी शॉर्ट वापरले आहे. जमले तेव्हा कॉपी पेष्ट केले आहे. वाचनात खडा लागत असल्यास क्षमस्व!
छान लेख
एकंदरीत अजून एक खंदा पट्टीचा आणि लिहिता रेल फॅन मिपावर पाहून असीम आनंद झाला आहे.
एक वाक्य थोडे खटकले ते हक्काने सांगतोय (हो बरोबर आहे बिहार बरोबर वाचले आहे!)
फ्रँकली हे वाक्य अप्रस्तुत, अवास्तव आणि अवांछित वाटले स्पष्ट बोलता.
एक रेल फॅन म्हणून मुंगेर रेल्वे इन्स्टिट्यूट, मुंगेर, बिहार आपल्याला ठाऊक असेलच न ?
हो हो
In reply to छान लेख by वृषभ खोंडे
मान्य आहे... मुंगेर म्हणजे भारताचे बर्मिंगहॅम होते. धातूकाम, शस्त्रनिर्मिती आणि तांत्रिक कौशल्यासाठी खरे तर हा भाग पुर्वी प्रसिद्ध होता. आणि म्हणून तर इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (थकलो हे लिहून 😁 ) इथे आले. सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे सर्वांनाच हा इतिहास माहित असेल नाही.
उत्तम माहिती आणि लेखकोकण…
उत्तम माहिती आणि लेख
कोकण रेल्वेवर रो-रो सेवा आहे. त्यात आणि यात मला लेख वाचून वाटले ते फरक असे:
१. रो-रो मधे ट्रक जातात, कंटेनर नाही. काही संख्या वजनाचे लिमिट आहे का?
२. रो-रो साठीचे इंजिन कामी पॉवरचे असावे.
हे बरोबर आहे का?
रो-रो सेवेबद्दल प्रश्न
In reply to उत्तम माहिती आणि लेखकोकण… by सौंदाऴा
रो-रो सेवा अजून चालू आहे का? त्याबद्दल काही प्रश्न आहेत.
रेल्वेच्या जाणकारान्ना विनन्ती आहे की ही सेवा कितपत उपयोगी आणि किफायती आहे याबद्दल साङावे.
स्वत: चालू शकणारे एक वाहन (ट्रक) दुसर्या वाहनावर (ट्रेन) का ठेवतात? दोन्ही वाहनान्ची क्षमता पूर्ण वापरली जात नाहिये असे वाटते.
त्यापेक्षा, सामान जलद आणि सुरक्षित चढवणे आणि उतरवणे याची सोय केली तर चाङले नाही का?
अशी कुठली विशेष परिस्थिती (युज केस) आहे का जिथे रो-रो गरजेची आहे?
स्वत: चालू शकणारे एक वाहन …
In reply to रो-रो सेवेबद्दल प्रश्न by अनामिक सदस्य
रेल्वे ला ट्राफिकची समस्या नसते. त्यामुळे ती वेगाने होऊ शकते. ट्रक सारखे वाहन छोट्या गावाला जाऊ शकते. याचा फायदा असा होतो की ज्या ठिकाणी रेल्वे ने माल पोहोचवला जाऊ शकेल तेथपर्यंत रेल्वेने आणि त्या पुढे ट्रकने नेता येतो.
ट्रक सारखे वाहन रेल्वे वर चढवण्यचा फायदा असा होतो की मालाच्या चढ उतरवण्यात वेळ जात नाही. ट्रक रेल्वेवर असल्यामुळे ट्रकचे इन्धन वाचते
आहे ना
In reply to रो-रो सेवेबद्दल प्रश्न by अनामिक सदस्य
अशी कुठली विशेष परिस्थिती (युज केस) आहे का जिथे रो-रो गरजेची आहे?
खुद्द कोकण ! घाटवाटांच्या रस्त्यांनी जाता ट्रक्स वेळ पण जास्त घेतात, इंधन पण आणि देखभाल खर्च सुद्धा वाढीव, रो - रो मध्ये हे प्रश्न (कोकणपुरते) निराकरण होतात. मूलतः रो रो सेवा ही दुर्गम जागांवर जिथे लोहमार्ग पोचले आहेत तिथे एक स्मार्ट सोल्युशन आहे.
ह्याउलट उत्तर प्रदेशात किंवा गंगेच्या मैदानी खोऱ्यात जिथे मैलोनमैल सपाट जमीन आहे, भारतातले सगळ्यात मोठे एक्सप्रेसवे नेटवर्क आहे तिथे कंटेनर वाहू शकणारे फ्लॅट बेड रोलिंग स्टॉक रो - रो मध्ये लावणे म्हणजे वेळ, पैसा, मनुष्यबळ, अन् दोन परस्पर पर्यायी वाहतूक पर्याय वाया घालवणे होय.
मैदानी प्रदेशांत रोरो
In reply to आहे ना by वृषभ खोंडे
वृषभ खोंडे,
मला वाटतं की मैदानी प्रदेशांतही यानवाहन सुविधा बरीच फायद्याची ठरू शकते. समजा चार कंटेनर भरून कपडे नॉयडाहून नागपुरास पाठवायचे आहेत. त्यासाठी चार ट्रक मध्ये माल भरून, चार चालकांना दोन दिवस रस्त्यावर घालवावे लागतील. याउलट जर रेल्वेने चार ट्रक पाठवले तर ते १२ तासांत पोहोचतील. ट्रकचालकांना ट्रकसोबत प्रवास करायची गरज नाही. लोकल चालक गन्तव्यस्थानी काम करवून देतील. ( हे उदाहरण साधारण अंदाजांवर आधारित आहे. कृपया कीस काढू नये. माझी फेफे उडेल. )
एकंदरीत वेळ, मनुष्यबळ, वाहन झीज आणि इंधन बरंच वाचेल.
एखादा ट्रक जर तशी १०० किमी वेगाने जात असतांना इंजिन बंद केलं तर दीड दोन किमी जातो. याउलट रेल्वे इंजिन आठेक किमी सहज जातं. यावरून रेल्वे किमान चारपट कमी ताकद ( = थ्रस्ट ) वापरते. हा बराच मोठा समास आहे.
आ.न.,
-गा.पै.
रो रो सेवा मध्ये…
In reply to मैदानी प्रदेशांत रोरो by गामा पैलवान
रो रो सेवा मध्ये रस्त्यापेक्षा एक मूलभूत फरक असतो तो म्हणजे रुळांचे घर्षण खप कमी असते. यामुळे कोकण रेल्वे वर चालू झालेली पहिली रो रो सेवा यात १९९९ मध्ये कोलाड ( रोहा) येथून गोव्यातील वेर्णा येथे ट्रेकला वाहून नेत असत. हीच सेवा नंतर २००४ मध्ये कर्नाटकातील उडुपी जवळील सुरतकल येथपर्यंत वाढवण्यात आल. यात ट्रक ला २४ तासात रोह्याहून सुरतकल ला पोचवण्याची हमी दिलेली होती. यात मोठा फायदा म्हणजे ट्रक ला हे अंतर कापण्यासाठी किमान ४८ तास लागत असत याशिवाय ट्रकचे डिझेल आनि झिजणाऱ्या टायरची किंमत बरीच जास्त होत असे.
एक WDG ३ A इंजिन एका वेळेस ५० ते ७० ट्रक घेऊन जात असे. आणि एक किमी साठी याचे ५ लिटर डिझेल खर्च होत असे. या उलट एक ट्रक साधारण एक लिटर डिझेल मध्ये दीड ते २ किमी जात असे. यामुळे ट्रकच्या इंधनखर्चात मोठी बचत होत असे शिवाय चालक रो रो मालगाडी वर झोपून गेल्यामुळे तेथे उतरे पर्यंत त्याची पूर्ण विश्रांती होत असे. शिवाय ट्रकच्या टोलची पण बचत होत असे.
या सर्व विभागात घाट रस्ते मोठ्या प्रमाणावर असल्याने ट्रकची झीजही मोठ्या प्रमाणावर कमी होत असे. दुर्दैवाने कोकण रेल्वे हि संपूर्ण एकेरी मार्ग असल्याने या सेवेस मोठ्या प्रमाणावर वाढवता येणे कठीण होते.
उत्तम माहिती.
धन्यवाद.
लेख आवडला.
रेल्वेला नेहमीच प्रश्न पडतो की एंजिने किती एचपी( आता वॉट्स?) बनवावीत. ४५०० का ६००० एचपी.
बऱ्याच प्रवासी वाहक रेल्वे १६ डब्यांच्या असतात. मालगाड्या ५० डब्यांच्या. मालगाडीला दोन एंजिने लावतात. १६ ते २४ डब्यांसाठी स्टेशनांचे प्लॅटफार्मस आहेत. मालागाडीला त्यांची गरज नाही. अगदी १२००० एचपीची एंजिने बनवली तरी काही तोटे शिल्लक राहतात किंवा काही नवीन प्रश्न निर्माण होतातच.
नव्या एंजिनांत एसी केबीन, अत्याधुनिक यंत्रणा आहे म्हणता पण मालगाडीच्या गार्डकडे आणि त्याच्या ब्रिटिशकालीन रचनेकडे पाहिल्यावर वाईट वाटते. काहीही सोय नाही. रात्री डास किती चावत असतील. दिवाबत्ती ही नाही.
प्रवासी गाड्या आणि मालगाड्या यांमध्ये पूर्वी प्रवासी गाडीलाच प्राधान्य देऊन पुढे काढणे आणि मालगाडीला साइडिंगला बाजूला टाकणे असा अग्रक्रम पूर्वी होता. आता तो बदली झाला आहे. हे कोकण रेल्वेच्या पनवेल भागांत आता जाणवते. इथूनच जेएनपिटी बंदराला मार्ग जातो. त्या गाड्या उभ्या असतात. जेएनपिटीकडून पेण रत्नागिरीकडे किंवा उलट जाणाऱ्या गाड्यांना एंजिने रिवर्स करावी लागतात, प्लॅटफॉर्मस ब्लॉक होतात. एका वेळी दहा दहा गाड्या उभ्या असतात. सांगायचा मुद्दा काही ठिकाणी अडचणी आहेत.
एका वेबसाईटवर भारतातील सर्व बंदरांची आकडेवारी, क्षमता दिलेली आहे. इराण अमेरिका युद्धामुळे तेल गॅस आणणारे जहाजाला लवकरात लवकर रिकामे/ मोकळे करणे गरजेचे झाले. अशा वेळी मोठ्या मालगाड्यांची गरज पडली.
माहितगारांनी यावर उजेड पाडावा.
अरे वा!!
असे काहीतरी वाचले की चांगले वाटते. लेख आवडला
उत्तम रस्ते, उत्तम रेल्वे (दळणवळण) ,
उत्तम दुरसंचार आणि वेगवान ईंटरनेट ची साधने (माहीती वहन)
स्वच्छ आणि मुबलक उर्जा ( जल, पवन,सौर, अणू, तेल, कोळसा उतरत्या क्रमाने)
परवडणारे, उत्तम आणि सहज उपलब्ध शिक्षण
स्वच्छ हवा, पाणी, अन्न, निवारा
सहज उपलब्ध आणि परवडणाऱ्या वैद्यकीय सुविधा
ईतके लिहुन दमलो. हे सर्व कधी मिळेल तो सुदिन
खुप छान लेख
खुप छान लेख
रो रो प्रवासावर एक सुंदर व्लॉग
मस्त आहे एकदम, ट्रक मधे बसून फ्लॅटबेड रेक वरून रो रो ट्रेन मार्फत मंगळूर ते रत्नागिरी प्रवास दाखवला आहे. ट्रकच्या मोठ्या विंड स्क्रीन मधून पुढील पूर्ण ट्रेन बोगद्यात शिरताना, आजूबाजूचा परिसर, हिरवळ इत्यादी फारच बेस्ट वाटते आहे पहायला
मस्त लेख!
मस्त लेख. विषय आवडीचा आहेच.
या ट्रायलबद्दल परवाच माहिती बघितली. या इंजिनांमुळे वाढणारा वेग आणि मालगाड्यांना स्वत:चा वेगळा मार्ग असण्याचा फायदा म्हणजे यातून शिपिंग मधे माल कधी पोहोचेल याबद्दल एक वेळापत्रक तयार होईल आणि लोकांना/कंपन्यांना त्यानुसार आपले नियोजन करता येईल. हे झाले तर औद्योगिक कारणांकरता होणारी मालाची वाहतून यातून जास्त होऊ लागेल. आत्ता जेव्हा प्रवासी व मालगाड्या एकाच मार्गावरून जातात तेव्हा माल एका ठिकाणाहून दुसरीकडे नक्की कधी पोहोचेल हे सांगता येत नसे असे वाचले आहे. कंपन्यांना कच्चा माल लागतो त्याला असे चालत नाही.
ही इंजिने डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरकरता बनवली आहेत असे वाचले - जेथे चढ-उतार (ग्रेडिंग) कमी ठेवले आहे आणि वेगही जास्त वापरता येतो. अशी हेवी लोड्स जेव्हा भारतीय रेल्वेच्या नेहमीच्या मार्गांवरून न्यायची असतील - जसे खंडाळा घाट - तेथे ही इंजिने सुटेबल नाहीत. त्याकरता रेल्वेने डी९ ही नवीन ९००० हॉर्सपॉवरची इंजिने बनवली आहेत - ती ही आता आलेली दिसतात. यातली बरीच पुणे यार्डाला मिळणार आहेत. त्यामुळे पुणे-मुंबई मधे दिसू लागतील.
डीएफसी ही सिस्टीमच वेगळी आहे असे दिसते. त्यांचे व भारतीय रेल्वेचे रूळ एकत्र फार नसावेत. पण मुंबईजवळ खारबाव येथे इकडून तिकडे कनेक्षन दिलेले आहे अशी एक क्लिप पाहिली. बहुधा ड्रोनमधून केलेले शूटिंग आहे. मस्त दिसते
https://www.youtube.com/watch?v=AFvXPUVxb4M
समर्पित कार्यद्वार स्वतंत्र आहे
In reply to मस्त लेख! by फारएन्ड
फारएन्ड,
तुमचं निरीक्षण बरोबर आहे. लांब पल्ल्याचा समर्पित कार्यद्वार स्वतंत्र पद्धती आहे. फक्त स्थानिक प्रदेशांना जोडणी दिलेली आहे. जेणेकरून गर्दीच्या प्रदेशात ( मोठी शहरे वगैरे ) प्रवासी व माल वाहतूक एकाच जालावर करून शहराबाहेर माल समर्पित जालावर चढवता यावा. साधारण अशीच पद्धती युरोपात अतिजलद टीजीव्ही प्रवासी गाड्यांसाठी वापरली जाते. विशेषत: फ्रान्समध्ये गाडी स्थानकाच्या जवळ आली की सामायिक जालावर घेतली जाते व गावाबाहेर समर्पित अतिवेगवान टीजीव्ही जालावर हाणली जाते.
आ.न.,
-गा.पै.
धन्यवाद
In reply to समर्पित कार्यद्वार स्वतंत्र आहे by गामा पैलवान
धन्यवाद गापै! बऱ्याच दिवसांनी आपला प्रतिसाद वाचून छान वाटले. तुमचा मराठी पर्यायी शब्दांचा वापर इंटरेस्टिंग आहे :)
आभार
In reply to धन्यवाद by फारएन्ड
प्रोत्साहनाबद्दल आभार!
-गा.पै.
डिझेल एंजिने काढून विद्यूत एंजिने आणल्याने...
खंडाळा घाटातली वाहतूक मंदावली आहे का? सर्वच गाड्यांना विद्यूत एंजिने म्हणजे एकाच वेळी घाटात चार पाच गाड्याच जाऊ शकत असतील असं वाटतं. विद्यून भार वाढतो. जर काही गाड्या डिझेल एंजिनावर असतील तर ही अडचण येणार नाही. पूर्वी उद्यान एक्स्प्रेस, कोयना एक्सप्रेस डिझेल एंजिनवरच धावत. आणि मालगाड्याही .
असे
In reply to डिझेल एंजिने काढून विद्यूत एंजिने आणल्याने... by कंजूस
जाणवले तर नाही बुवा खास.
तसे नसावे
In reply to डिझेल एंजिने काढून विद्यूत एंजिने आणल्याने... by कंजूस
मी मिड-९०ज पर्यंत पुणे-मुंबई रूटवर फार डिझेल इंजिने पाहिली नाहीत. पुण्याला बदलली जात. पण त्या वेळेस ती जुनी डब्ल्यू-सी-एम इंजिने मोठ्या प्रमाणावर बंद पडू लागली. मग नंतर मिक्स (ड्युअल व्होल्टेज) इंजिने येईपर्यंत डिझेलचा वापर वाढला असावा. गेल्या काही वर्षांत खूप इंजिने दिसली हे बरोबर आहे. पण मी त्यापूर्वी कोल्हापूर व सोलापूर कडे जाणाऱ्या जवळजवळ सर्व गाड्या पुण्यापर्यंत इलेक्ट्रिक इंजिनांनीच आलेल्या पाहिल्या आहेत.
घाटातील लोड मॅनेज करायला रूटवरची पॉवर स्टेशन्स वाढवली असावीत. दुसरे म्हणजे वॅप सिरीज मधली बहुसंख्य इंजिने रिजनरेटिव्ह ब्रेकिंग करतात व त्यातून निर्माण झालेली पॉवर त्याच ग्रिड मधे जाते असे वाचले आहे.
ही वॅप इंजिने कायच्या काय भारी आहेत. विशेषत: वॅप-७
WAP एंजिने ♥️
In reply to तसे नसावे by फारएन्ड
वाइड गेज आल्टरनेटिंग करंट पॅसेंजर (WAP) म्हणजे भारतीय रेल्वेचे कायापालट करणारी लोको. लहानपणी मला आठवते तसे सुरुवातीला डब्ल्यू डी पी श्रेणीतील डीझेल इंजिन असत. स्टेशन सोडताना किंवा ग्रेडियंट पकडताना ती जे भाकभाक धूर सोडत त्याचा एक वेगळा आनंद वाटे पण हळूहळू कळू लागले का ते धुपाट फारच वांगाळ असते. त्यानंतर ठराविक सेक्शन मध्ये डब्ल्यू. डी. एम इंजिन लागणे सुरू झाले, ती जरा जास्त पॉवरफुल होती आणि त्यानंतर लगेच सुरू झाली ती डब्ल्यू. ए. एम सिरीज, जबरदस्त होती ती पण, अर्थात थोडी ठोकळेबाज होती दिसायला अगदी बाटा बुटांचे खोके असावे तसा. नंतर मात्र डब्ल्यू. ए. पी. त्यातही पुढून थोडे slant डिझाइन उगाच एरोडायनॅमिक फिलिंग द्यायचे ! WAM रामभरोसे वाटत, एकदा अकोल्याहून कोलकात्याला जायला बसलो होतो WAM संचलित गीतांजली एक्सप्रेस मधे सकाळी उठून बघतो ते बिलासपूर मरत मरत आलेले काही कारणाने म्हणे लोको पॉवर ओढत नव्हते, आता तर असे प्रॉब्लेम पहायला मिळत नाहीत ह्याचे समाधान वाटते. आमचे सगळ्यात लाडके वडोदरा शेडचे आमच्या लाडक्या अमूल लिवरी मध्ये रंगवलेले (का विनाईल शीट चिकटविलेले) WAP-5
वॅग ५ आणि ७
In reply to WAP एंजिने ♥️ by वृषभ खोंडे
मधला फरक मला पूर्वी कळत नसे. दोन्ही सारखीच दिसत. निरखून पाहिले तर मॉडेल टाइप दिसतो पण मधे एका क्लिप मधे सहज समजेल असा फरक कळाला - ५ वर दोन लाल पट्ट्या असतात व ७ वर एकच. बाकी बोबो/कोको वगैरे चाकांची ॲरेंजमेण्ट आहेच पण पटकन जाणारे इंजिन दिसले तर पट्ट्यांवरून लगेच कळते.
आपली बहुतांश एसी व्होल्टेजवाली इलेक्ट्रिक इंजिने मूळच्या वॅम च्या असेम्ब्लीवरच आधारित होती असे वाचले आहे. प्रत्येक मॉडेलमधे त्यात थोडाफार फरक केला गेला. वॅप ५, ७ आणि वॅग ९, १२ बद्दल नक्की माहीत नाही. वॅप ७ हे वॅग ९ वर आधारित आहे असेही ऐकले.
माझा नॉस्टॅल्जिया मात्र डब्ल्यू सी एम इंजिनांचा. डेक्कन क्वीन ची इंजिने. मिले सुर मेरा तुम्हारा ने आणि कभी हॉ कभी नॉ मधल्या "दीवाना, दिल दीवाना" गाण्याने त्यांना अजरामर केले आहे.
उद्यान एक्स्प्रेस, कोयना…
In reply to डिझेल एंजिने काढून विद्यूत एंजिने आणल्याने... by कंजूस
उद्यान एक्स्प्रेस, कोयना एक्सप्रेस डिझेल एंजिनवरच धावत. आणि मालगाड्याही .
या गाड्या डिझेल इंजिनावर धावत याचे कारण त्यांच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झालेलं नव्हतं. मध्येच इलेक्ट्रिक इंजिन बदलून डिझेल लावणे आणि परत बदलणे हे वेळखाऊ आणि कटकटीचे होते होते.
आजसुद्धा बऱ्याच लोको शेड कडे डिझेलची इंजिने ठेवलेली आहेत आणि ती वापरात राहावीत म्हणून मधुन मधून काही गाडयांना ती लावली जातात.
जवळ जवळ १०० % विद्युतीकरण झाले असले तरी ग्रीड फेल्युअर, हॅकिंग, नैसर्गिक आपत्ती आणि युद्धात जर वीज केंद्रे किंवा ताराना नुकसान झाले तरी डिझेल इंजिने तेथे काम करू शकतात. यासाठी सर्व डिझेल इंजिने अजून मोडीत काढलेली नाहीत (कदाचित कधीच संपूर्ण मोडीत काढणार नाहीत)
WAP-5 हे इंजिन शक्तिशाली…
WAP-5 हे इंजिन शक्तिशाली असलं तरी त्याची चाकांची रचना CO -CO (३ + ३ = ६ ऍक्सल) नसून BO -BO (२+२ =४ ऍक्सल) आहे
त्यामुळे याचे ट्रक्टिव्ह एफर्ट २५८ किलो न्यूटन इतका आहे
याउलट WAP-7 ची चाकांची रचना CO -CO आहे.त्यामुळे त्याचे ट्रक्टिव्ह एफर्ट २५८ किलो न्यूटन इतका आहे.
शिवाय WAP-5 हे इंजिन हलके आहे ७८ टन याउलट WAP-7 १२३ टन आहे. यामुळे WAP-5 मध्ये गाडीचे वजन जास्त असल्यास व्हील स्लिप (चाके जागच्या जागी फिरणे) हे जास्त प्रमाणात होते म्हणून हि इंजिने वेगाने जाणा ऱ्या हलक्या गाड्यां साठी वापरली जातात उदा शताब्दी, गतिमान एक्सप्रेस
पण २४ डब्यांच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी WAP-7 हे जास्त योग्य आहे.
हो
In reply to WAP-5 हे इंजिन शक्तिशाली… by सुबोध खरे
वरती वॅग-१२ आणि डी-९ बद्दल लिहीले आहे त्यात हा ही एक फरक आहे. वॅग-१२ बोबो आहेत आणि डी-९ कोको. त्यामुळे घाटात ती जास्त उपयोगी आहेत. डी-९ आलीसुद्धा मुंबईत, असे ऐकले.
वॅप ७ चं कर्षण मूल्य ....
In reply to WAP-5 हे इंजिन शक्तिशाली… by सुबोध खरे
विकीवर वॅप ७ चं कर्षण प्रारंभमूल्य ३२२ किन्यू दिलंय, तर संततमूल्य २२८ किन्यू दिलंय. वॅप ५ चं कर्षण प्रारंभमूल्य ३२२ किन्यू दिलंय. मात्र संततमूल्य दिलेलं नाही. यावरनं अंदाज बांधला तर वॅप ७ समोर वॅप ५ अगदीच किरकोळ भासतं. मला आठवतं त्याप्रमाणे वॅप ७ हे मालगाडीच्या जोऱ्यावर बेतलेली प्रवासी आवृत्ती आहे.
-गा.पै.
काल फालना राजस्थानला गेलो होतो
आज परतताना दिल्ली सराय रोहिला - वांद्रे टर्मिनस गरीबरथ मधून डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मध्ये शांतपणे पण फास्ट स्पीडने मालगाडी ओढणारा हा तगडा गडी दिसला WDG(6G) भारतीय रेल्वेतील सगळ्यात ताकदवान डिझेल लोकमोटिव
आम्ही आमच्या गरीबरथातून फोटो काढणार तोवर हा लाजून मागे तरी रहायचा किंवा पुढे तरी पळायचा त्या स्पर्धेत काढलेला फोटो आहे घ्या गोड मानून आहे तसा
क्लिअर पिक्चर नेट वरून साभार
मस्त!
In reply to काल फालना राजस्थानला गेलो होतो by वृषभ खोंडे
माझ्या रेल्वेच्या बहुतांश आठवणी इलेक्ट्रिक इंजिनांच्या आहेत (पुणे-मुंबई). पण इतर भागांत राहणाऱ्यांच्या नॉस्टॅल्जिया मधे डिझेल इंजिने असणार. आता विद्युतीकरण झाल्याने डीझेल इंजिने मिस करणाऱ्यांच्या सोमिवर पोस्ट्स पाहिल्या आहेत.
100% मला मुख्यतः WDM-2 पुणे,…
In reply to मस्त! by फारएन्ड
100%
मला मुख्यतः WDM-2 पुणे, हीच इंजिने आणि त्यांचे आवाज आठवतात. त्यांचा विशिष्ट तपकिरी रंग, आतून हिरवी केबिन आणि तोंड काळे करणारा धूर.
मला एकदा कोळशाचे चालते, वापर असलेले इंजिनही, ते सुद्धा आत चढून बघायला मिळालं होतं. ब्रॉडगेजवरती जी काही शेवटची इंजिने साइड लायनीवर पॅसेंजर गाड्यांना वापरत, त्यातले ते शेवटचे होते.
त्या मानाने मुंबई पुणे प्रवासातली विद्युत इंजिने (लोकमान्य) इत्यादी ही आवाज न करणारी, लहान मुलांच्या दृष्टीने आकर्षक नव्हती.
दोन आकडी गाडी क्रमांक असणारे (म्हणजे ८३ अप ८४ डाउन महाराष्ट्र एक्सप्रेस) ते दिवस जास्त साधे होते. तुमच्यापैकी कुणी कोळशाची इंजिने असणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवास केला आहे का?
सह्याद्री एक्सप्रेस
In reply to 100% मला मुख्यतः WDM-2 पुणे,… by मनो
अगदी लहानपणी सह्याद्री एक्सप्रेसने पुणे कोल्हापूर गेलो होतो. रेल्वेच्या आवडीमुळे हरखून जाऊन रात्रभर जागाच होतो (आणि माझे आजोबा तो परिसर खूप फिरलेले होते, त्यामुळे ते ही प्रत्येक भागाची माहिती मला देत होते, माझ्यासारखेच जागून). खिडकीला डोके लावून बसल्यावर चेहऱ्यावर कोळशाचे कण जमा झाले होते. आमचा डबा बहुधा इंजिनाजवळ असावा. लहानपणी पुणे स्टेशनच्या कोल्हापूर/सोलापूर साइडला कोळशाची इंजिने उभी असलेली पाहिली आहेत. नंतर डिझेल आली. आता तर तिथेही इलेक्ट्रिकच आहेत.
कोल्हापूरला शाहुपुरीजवळ की राजारामपुरीजवळ एक मोठे टर्न टेबल होते. तिथे ३-४ लोक मिळून एक महाकाय कोळशाच्या इंजिनाची दिशा बदलताना पाहिले आहे.
मी मीटर गेज च्या कोळशाच्या…
In reply to 100% मला मुख्यतः WDM-2 पुणे,… by मनो
मी मीटर गेज च्या कोळशाच्या इंजिनात (YP) वेरावळ ते सासन गीर प्रवास केलेला आहे.
मीटर गेज च्या डिझेल इंजिनात (YDM ४) ब्रॅगान्झा घाटात गोमंतक एक्सप्रेस ने गोव्याला जाताना प्रवास केला आहे.
WCM ५ या लोकमान्य नाव असलेल्या इंजिनातून इगतपुरी ते कसारा पुष्पक एक्सप्रेस ने प्रवास केला आहे.
WCG २ या इंजिनातून हि प्रवास केला आहे. कल्याण ते नेरळ डेक्कन एक्सप्रेस मध्ये.
WDM २ या इंजिनातून दिवा ते पनवेल प्रवास केला आहे.
WAM ४ या इंजिनातून विजयवाडा ते तेनाली कोरोमंडेल एक्स्प्रेस ने प्रवास केला आहे.
सर्व ठिकाणी थोडा धीट पण दाखवून मी लष्कराचे आयकार्ड दाखवून लोको पायलट ला इंजिनात प्रवास करता येईल का असे विचारत असे. बहुतेक वेळेस ते परवानगी देत असत.
मुंबई दिल्ली राजधानीच्या WCAM २ हे इंजिन पाहायला मिळाले पण त्यात प्रवास करण्यास लोको पायलटने नकार दिला ( कदाचित पहिला स्टॉप थेट सूरत असल्याने असावे).
वेरावळ ते सासन गीर या वेळेस माझा डॉक्टर मित्र पण बरोबर होता. लोको पायलट यांची मुलगी मुंबईत के इ एम मध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होती. माझ्या मित्राने एम बी बीएस के इ एम मधूनच केलेलं होतं. त्यामुळे त्यानी अतिशय आत्मीयतेने आम्हाला इंजिनातून प्रवास करण्यास परवानगी दिली आमचा दोघांचा त्यांच्या बरोबर इंजिनात उभे असतानाच फोटो सुद्धा काढू दिला.
WDS ६ या सहा सिलिंडरच्या…
In reply to मी मीटर गेज च्या कोळशाच्या… by सुबोध खरे
WDS ६ या सहा सिलिंडरच्या स्केल डाऊन शंटिंग इंजिनात मुलुंडच्या यार्डातही प्रवास केला आहे.
WDM २ या १२ सिलिंडर इंजिनाऐवजी ६ सिलिंडरचे हे इंजिन केवळ शंटिंग साठी वापरले जाते.
खूपच छान लेख
खूपच छान लेख आणि तितक्याच महितीप्रद प्रतिक्रिया.
_/\_
WAG 12
2006 concept/approval → 2008 global bidding attempt → 2013 formal RFQ → 2015 Alstom contract under Suresh Prabhu → 2016 project commencement → 2017 factory production → 2018 first locomotive/PM inauguration → 2020 commercial operation.
माझ्यामुळ हरभरा टरारून वर !
बाकी छान !
2006 concept/approval → 2008…
2006 concept/approval → 2008 global bidding attempt → 2013 formal RFQ
It was not until November 2015, however, that Alstom was finally awarded the contract to build the locomotives.
सात वर्षे काथ्याकूट चालला होता. धोरण लकवा म्हणतात तो हाच होता.
२०१७ मध्ये रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्पाचा बंद केला त्यामुळे रेल्वे मंत्रालय हे "प्रतिष्ठे"चे राहिले नाही.
या अगोदर आपल्या पोळीवर तूप ओढण्यासाठी सर्व रेल्वे मंत्र्यांनी त्याचा वापर केला. अब्दुल घनी खान चौधरी, ममता बॅनर्जी शरीफ सारख्या लोकांनी केवळ आपल्या मतदार संघापर्यंत गाड्या चालू करण्यापलीकडे काही भरीव केले नाही. श्री मधू दंडवते यांचा सन्माननीय अपवाद वगळता श्री सुरेश प्रभू येईपर्यंत रेल्वे मंत्री हे "मला पहा आणि फुले वहा" या श्रेणीत होते.
मधेपुरा सारख्या महा आडवळणी ठिकाणी WAG १२ या इंजिनाचा कारखाना आहे जे ठिकाण कोणत्याही मुख्य रेल्वे मार्गावर नाही कोणत्याही बंदराचा जवळ नाही कोणत्याही राष्ट्रीय महामार्गाच्या जवळपास सुद्धा नाही तेथे का निघाला?
कारण मधेपुरा हि लालू प्रसाद यादव यांचा मतदार संघ होता. भंगार विकून रेल्वे नफ्यात आणून दाखवण्याची लबाडी याच माणसाने केली होती. अर्थात हे पितळ नंतर उघडे पडलेच.
By the year 2004, Indian Railways had electrified roughly 17,000 to 18,000 route kilometers.
The pace remained slow at roughly 1.42 km/day, totaling about 21,800 route kilometers electrified across several decades leading up to 2014. Railway electrification from 2004 to 2014 progressed at a slow average pace of about 1.42 kilometers per day ,700–800 route km per year
This slower pace contrasted sharply with later periods, such as 2019–2025, when the national daily average surged past 15 km per day.
Indian Railways dramatically accelerated its electrification pace between 2014 and 2024, raising broad-gauge network coverage from roughly 20% to over 94%
अब्दुल घनी खान चौधरी, ममता बॅनर्जी शरीफ सारख्या लोकांनी केवळ आ
२००९ ते २०११ दरम्यान इष्ट्रन कॉरिडर च्या कामाला गती येणे अपेक्षित होते. मुघल सराय ते सोनगर दरम्यानच्या सुमारे ४० किलोमीटर क्षेत्रातील भू संपादनावरून स्थानिक स्तरावर आंदोलन सुरू झाले (की केले गेले?). स्थानिक राज्य सरकार प्रकल्पासाठी आणि जमीन अधिग्रहणासाठी पूर्ण मदत करण्यास तयार होते. मात्र, तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रक्रियेला थेट खीळ घातली. बॅनर्जी यांनी रेल्वे मंत्रालयाला स्पष्ट आदेश दिले की, कोणत्याही प्रकारे सक्ती करू नका आणि काम थांबवून ठेवा. सिंगूर आणि नंदीग्राममधील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, त्यांना स्वतःची जमिन रक्षक ही प्रतिमा महत्त्वाची असावी. देशाच्या विकासापेक्षा स्वतःचे राजकारण मोठे, हाच यामागचा मुख्य विचार होता. एका महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रकल्पाचे काम जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आले. यामुळे पुढील अनेक वर्षे केवळ नव्याने सर्वेक्षण करण्यात वाया गेली.
या राजकीय अडवणुकीमुळे प्रकल्पाचे पुन्हा पुन्हा सर्व्हे करावे लागले, जे थेट २०१५ पर्यंत चालले. प्रकल्पाचा खर्च अफाट वाढला. सुरुवातीला जमिनीसाठी ५,००० कोटी रुपयांचा अंदाज होता, तो थेट २५,००० कोटी रुपयांवर पोहोचला. ममताच्या या भूमिकेमुळे भारताचेचे आरथिक नुकसान तर झालेच, शिवाय भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प तब्बल दीड दशक मागे पडला. वैयक्तिक आणि प्रादेशिक राजकारणासाठी राष्ट्रीय हिताचा बळी देण्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
म्हणून ममताने केवळ आपल्या मतदार संघापर्यंत गाड्या चालू करण्यापलीकडे काही भरीव केले नाही - असे म्हणणे अजिबात योग्य नाही! याबाबतीत मी पुर्णत: असहमत आहे!
धाग्यातील राजकीय भाग वगळला…
धाग्यातील राजकीय भाग वगळला तरी इतर माहिती चांगली होती, प्रतिसादांमधून पण बऱ्याच नवीन गोष्टी समजत होत्या. आता हा धागा देखील राजकीय होऊन मूळ विषयाला माहितीपूर्ण राहणार नाही असे दिसते.
माझ्यामुळे हरभरा टरारून वर…
माझ्यामुळे हरभरा टरारून वर
यातून काय ते दिसलं!
छान लेख व प्रतिसादही
दोन्ही अतिशय आवडले.
असेच, रेल्वे ह्या विषयाला वाहिलेले लेख येत राहोत.
डीझेल इंजिन मध्ये सौंदर्य बघायचे तर
आमचे डब्ल्यू डी एस - ४ बेस्ट. वाईड गेज डिझेल शंटर सिरीज ४. हे स्पेशल इंजिन/ लोको रुळावर गाड्या ओढत गावोगाव भटकायला नाही तर यार्डात डबे ओढत तोडत जोडत तयार झालेली ट्रेन शंट करून फलाटापर्यंत पोचती करायला कामाचे ! मुंबईत आजही मस्जिद/ वाडीबंदर यार्ड/ सँडहर्स्ट रोड येथे कुर्ला डिझेल लोको शेडचे WDS-4 फिरताना दिसते शंटिंग लाईन वर
हे सर्वत्र आहे
In reply to डीझेल इंजिन मध्ये सौंदर्य बघायचे तर by वृषभ खोंडे
हे सगळीकडेच दिसते. पुण्यातही पाहिले आहे.
याला प्रत्यक्षात एक्सप्रेस ट्रेन्स प्रवासात ओढायला मिळत नाहीत पण हिंदी पिक्चर्समधे हे नेहमी तो "रोल" करते :) यादोंकी बारात पासून कुली पर्यंत सगळीकडे आहे.
पप्पू, लाव रे ती मेलगाडी फलाटास ....
In reply to डीझेल इंजिन मध्ये सौंदर्य बघायचे तर by वृषभ खोंडे
या इंजिनास पप्पू म्हणतात : https://en.wikipedia.org/wiki/Indian_locomotive_class_WDS-4
हे इंजिन डिझेल जाळून तैलमंडळ मतिवाहू ( = हायड्रॉलिक सर्किट मोटिव्हेटर ) वर चाकांकडे उर्जा संक्रमित ( = पॉवर ट्रान्समिट ) करतं.
-गा.पै.
म्हणजे मोठ्या डीझेल इंजिनांपेक्षा वेगळे म्हणताय ना?
In reply to पप्पू, लाव रे ती मेलगाडी फलाटास .... by गामा पैलवान
मोठी डिझेल इंजिने डिझेल वापरून इलेक्ट्रिक पॉवर तयार करतात आणि त्यातून ट्रान्समिशन चालते, त्यापेक्षा हे वेगळे असते असे म्हणताय ना?
हो.
In reply to म्हणजे मोठ्या डीझेल इंजिनांपेक्षा वेगळे म्हणताय ना? by फारएन्ड
फारएन्ड,
हो. लिहायचं राहून गेलं. क्षमस्व. डिझेल जीपप्रमाणे हे कार्य करीत नाही. वा डिझेल जाळून वीजही उत्पन्न करीत नाही.
आ.न.,
-गा.पै.
उलट आभार आपले
In reply to हो. by गामा पैलवान
तुमच्या वाक्यामुळे त्याबद्दल माहिती शोधत गेलो आणि बरीच नवीन माहिती मिळाली. त्यामुळे तुमचेच आभार :)
>>या इंजिनास पप्पू म्हणतात…
In reply to पप्पू, लाव रे ती मेलगाडी फलाटास .... by गामा पैलवान
>>या इंजिनास पप्पू म्हणतात
पप्पू... अनेकांना फलाटाला लावत असतो.. पण स्वत: कधीच फलाटाला लागत नाही.
नशीब ! दुसरे काय म्हणावे ?
लै हासलो बगा !
In reply to >>या इंजिनास पप्पू म्हणतात… by राज जोशी
लै हासलो बगा !
-गा.पै.
कोळशाची इंजिने असणाऱ्या गाड्या
निनाद, तुमचे लेख नेहमीच वाचत असतो. हाही लेख व प्रतिक्रिया आवडल्या.
तुमच्यापैकी कुणी कोळशाची इंजिने असणाऱ्या गाड्यांमध्ये प्रवास केला आहे का?
हो. सातवी-आठवीला असल्यापासूनच आम्ही मुलेमुले, मोठी माणसे सोबत नसतानाही रेल्वेने जिल्ह्याच्या गावी जायचो. मग कॉलेजला जायला म्हणून आणि नंतर काही वर्षे नोकरीनिमित्त म्हणून रेल्वेने अप-डाउन करू लागलो.
आधी मीटरगेजला कोळश्याची इंजिने असायची. ती नंतर बंद झाली व डिझेलची इंजिने आली. कोळश्याच्या इंजिनाला पाणी लागायचे. पाणी भरण्यासाठी स्टेशनवर हत्तीच्या सोंडेसारखा एक मोठा पाईप स्तंभ असायचा. गोरगरीब लोक इंजिनातून टाकून दिलेला अर्धवट जळालेला कोळसा उचलायचे. बहुधा काचीगुडा-मनमाड चालणारी एक लिंक एक्सप्रेस होती. परतीच्या प्रवासात तिचे इंजिन उलटे लावलेले असायचे. ते विचित्र दिसायचे. "उलटे इंजिन गाडीला कसे ओढते बुवा?" अशी आमची पोरकट चर्चा व्हायची.
झुक झुक झुक झुक आगीनगाडी
धुरांच्या रेघा हवेत काढी
पळती झाडे पाहूया
मामाच्या गावाला जाऊया
जाऊया
मामाच्या गावाला जाऊया
हे खरोखरच अनुभवायला मिळायचे कारण आमच्या मामाच्या गावाला आम्ही रेल्वेनेच जायचो. आमचे इतर कझिन्स रेल्वे नसलेल्या गावी राहायची. त्यांना रेल्वेचे फारच अप्रूप होते. ते आमच्याकडे आल्यावर मग दिवसभर जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या मोजणे, दुपारी एक मेल गाडी जायची तिला एक लाल डबा असायचा तो ठरवून पाहणे. आठवडाभरात एकदातरी जिल्ह्याच्या गावी रेल्वेला नुसतेच जाऊन येणे असे प्रकार चालायचे.
नंतर ब्रॉडगेज झाले. कोळश्याची इंजिने मागेच बंद झाली होती. इंजिने डिझेलची, पण आता रुंद, उंच ब्रॉडगेज गाड्या सुरु झाल्या. तोवर आम्ही कॉलेजला गेलो. रोजच्या अप -डाउन ला पाऊण-एक तास लागायचा. तेंव्हा रेल्वेत जागा पकडून बसून पत्ते खेळायचो. जिंकलेल्या पैशांतून पत्ते जिंकलेले, हरलेले, न खेळलेले असे सर्वच जण स्टेशनबाहेरच्या रेस्टो मध्ये पुरी-भाजी, खिचडी-भजे वगैरे खायचो. सोबत कुणीच नसेल तर अर्ध्या किमतीला घेतलेली व नंतर पाव किमतीला विकायची असलेली जाड कागदाची केशव पंडित, गुलशन नंदा वगैरेंची हिंदी पॉकेट बुक्स वाचायचो. खूप नंतर कळले की त्या पुस्तक दुकानदारांचा खरा धंदा हे पॉकेट बुक्स नसून पिवळी पुस्तके विकणे हा होता!
या सगळ्या नादात कॉलेजात चांगले मार्क्स कधी मिळायचे नाहीत. पण नापाससुद्धा कधी झालो नाहीत.
पुढे नोकरी करू लागल्यावर थोडे सुधारलो. व असेच वर्तन करणाऱ्या कॉलेज वयीन मुलांना सुधारण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागलो.
आता सर्वत्र दुहेरी व इलेक्ट्रिक रेल्वे झालीय. प्रवास खूपच वेगाने होतोय. मनोबांच्या या प्रश्नाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
- (रेल्वे अप-डाउन नॉस्टॅल्जीक) कांदा लिंबू