Skip to main content

बेस्ट दिन विशेष - मुंबईतील बेस्ट सेवेचा इतिहास (स्थापना ते 1947)- भाग 1

लेखक साहित्ययात्री यांनी बुधवार, 19/08/2026 00:46 या दिवशी प्रकाशित केले.

मुंबईतील ट्रॅम सेवा 

 

तारीख होती नऊ मे 1874. मुंबई शहरातले बरेच नागरिक ठेवलेले कपडे घालून रस्त्यावर उभे होते. टन टन आवाज करत जाणारी घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रॅम चा मुंबईच शुभारंभ होत होता. कुलाबापासून क्रॉफर्ड मार्केट पर्यंत आणि बोरीबंदर पासून पायधूनी मार्गे काळबादेवी असे टदोन ट्रामचे  फाटे त्या दिवशी सुरू झाले. आणि मुंबईत सार्वजनिक  परिवहन वाहतुकीची सुरुवात बॉम्बे ट्रॅमवे कंपनी ह्या कंपनीद्वारे झाली.सुरुवातीला सामान्य मुंबईकरांना ट्रॅम मधून प्रवास करण्यास खूप भीती वाटे. पण मग हळूहळू ट्रॅम ला मुंबई करांची पसंती मिळू लागली. 


दोन घोड्यांची आणि एका घोड्याची असे दोन प्रकार ह्या ट्रॅम सेवेचे होते. ब्रिटिश लोकांसाठी सुरुवातीला ट्रॅमला लोकल सारखं फर्स्ट क्लास सुद्धा होता. पण ही व्यवस्था जास्त काळ चालली नाही. ट्रॅम हे मुंबईतील पहिले वर्गविरहित सार्वजनिक  वाहतूकीचे साधन बनले. 1874 साली सुरु झालेल्या ट्रॅमचे भाडे होते 3 आणे! पुढे 1899 साल येता येता सर्व ट्रॅम मार्गाचे सर्व सरसकट भाडे प्रतिसाद मिळावा म्हणून एक आणा केले गेले.

शहरांत ट्रॅम तर धावू लागली ट्रॅम ला गर्दीही होऊ लागली. आणि मग नवीन वाहतूकीची साधने सुरु झाली की काय होते होते तेच होऊ लागले. ट्रामच्या आधी शहरातील वाहतूक विक्टोरिया घोडा गाड्या बैलगाड्या यांच्यामार्फत केली जाई. ट्रॅम च्या सेवेमुळे  आमच्या उत्पन्नावर परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे होते. म्हणून मग ट्रॅम च्या ट्रॅक मध्ये खडी भरणे, ट्रामची चाके रुळावरून घसरावीत म्हणून प्रयत्न करणे असे प्रकार घडू लागले. असा उद्यो करणाऱ्य  एक महाभागाला ट्रामच्या स्टाफ ने पकडले आणि पोलिसाच्या हवाली न करता तेथल्या तेथे ठोकून काढल्याची बातमी बॉम्बे टाइम्स मध्ये त्यावेळी छापून पण आली होती. 


घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रॅम मुळे मुंबईच्या रस्त्यावर घोड्याच्या लिदीची मोठीच समस्या उद्भवत होती. तसेच मुंबई नगरीचा वाढत्या विकासाच्या वेगापुढे घोड्याची ट्रामचा वेग कमी पडत होता. म्हणून मग 1899 साली कंपानीने मुंबईतील ट्रॅम सेवा विजेवर चालवण्यासाठी अर्ज केला. 
मुंबईतील महापालिकेने बॉम्बे ट्रॅमवे कंपनीला ट्रॅम सेवा चालवण्यासाठी जो करार केला होता त्यात एक अट अशी होती की महापालिकेला दर सात वर्षाने कंपनी खरेदी करण्याचा अधिकार असेल. 1874 ते 1899 अशी सुमारे 21 वर्षे महापालिकेने न बजावलेला अधिकार विजेवरील ट्रॅम चालवण्यासाठी येणारा अवाढव्य भांडवली खर्च बघून महापालिकेने कंपनी विकत घेण्याचा निर्णय घेतला. बॉम्बे ट्रॅमवेज कंपनी या निर्णयाविरोधात न्यायालयात गेली परंतु त्याचा काहीही उपयोग न होता मुंबई महापालिकेने 1905 साली बॉम्बे ट्रामवेज कंपनी विकत घेतली. 


या कंपनीचे नाव नामकरण पुढे बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी लिमिटेड (बेस्ट) असे झाले. 
1905 साली अस्तित्वात आलेल्या ह्या कंपनीने मुंबईत कुलाबा ते क्रॉफोर्ड मार्केट अशी विजेवरील ट्रॅम सेवा 7 मे 1907 रोजी सुरु केली. मुंबईतील सर्व ट्रेनचे विद्युतीकरण होईपर्यंत विजेवरील ट्रॅम बरोबरच घोड्याच्या ट्राम देखील या मार्गावर धावत होत्या  
पुढे 1947 पर्यंत सुमारे 31 वर्षात मुंबईत मुंबईतील इलेक्ट्रिक ट्रॅमचा विस्तार थेट राणीचा बाग आणि दादर ट्रॅम टर्मिनस पर्यंत झाला.

 

मुंबईतील बस सेवा 

 

मुंबईतील ही सगळी ट्रॅम ची घोडदौड चालू असताना ट्रॅम सेवेची लिमिटेशन्स सुद्धा लक्षात येत होती. खडखडत जाणारी ट्रॅम मुंबईतील काही मुख्य रस्ते आणि विभागापूरतीच मर्यादित राहत होती. पूर्ण मुंबईत सेवा देणारे सार्वजनिक वाहतूकीचे नेटवर्क अस्तित्वातच नव्हते. म्हणूनच दिनांक 10 फेब्रुवारी 1926 रोजी एक प्रयोग म्हणून काही निवडक रस्त्यांवर मोटार बस चालू करण्याचा निर्णय बेस्ट कंपनीने घेतला. सुरुवातीला अफगान चर्च क्रॉफर्ड मार्केट, दादर टीटी पासून पारशी कॉलनीतून किंग सर्कल पर्यंत, आणि ऑपेरा हाऊस पासून लॅमिंग्टन रोड अर्थ रोड मार्गे लालबाग पर्यंत अशा तीन मार्गावर बस वाहतूक सुरू करण्याचे ठरले. मुंबईचे पोलीस कमिशनर आणि महापालिका यांची संमती मिळाल्यानंतर दिनांक 15 जुलै 1926 रोजी मुंबईतील पहिली बस दर दहा मिनिटाच्या अंतराने क्रॉफर्ड मार्केट ते कुलाबा अफगाण चर्च ह्या मार्गावर 15 जुलै 1926 रोजी सुरू झाली. 

 

ही बस सेवा नागरिकांना सुखावह व्हावी म्हणून या वाहतुकीकडे कंपनीने बारकाईने लक्ष दिले. बस वाहने रोड धुवून स्वच्छ ठेवली जातील अशा प्रकारच्या दंडक कंपनीने घालून दिला. रामप्रमानेच या सेवेला सुद्धा व्हिक्टोरिया वाल्यांचा विरोध होता. ही सेवा बंद करा असा अर्ज टॅक्सी आणि व्हिक्टोरिया वाल्यांनी पोलीस कमिशनर साहेबांकडे कडे सुद्धा केला आम्हाला त्रास व्हावा म्हणून बस कंपनीने बसचे थांबे मुद्दामून आमच्या टॅक्सी आणि व्हिक्टोरिया थांबांचा जवळ ठेवले आहेत अशी तक्रार या लोकांनी कमिशनरांकडे केली. पण तत्कालीन उच्च मध्यमवर्गीयांचे वाहतुकीचे साधन असलेली ही बस सेवा आणि सामान्य लोकांचे वाहतुकीचे साधन असलेले व्हिक्टोरिया असे कारण देऊन कमिशनरांनी हा अर्ज फेटाळून लावला आणि मुंबईतील बस सेवा वाढवण्यासाठी असलेला शेवटचा विरोध मोडून काढला गेला. ट्रॅमचे एक आणि भाडे असताना या बस सेवेचे भाडे मात्र कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त सहा आणे ठेवले गेले होते. मुलांचे अर्धे देखील 1928 सालापासून सुरू करण्यात आले. 1928 मध्येच प्रत्येक बसमध्ये पोस्ट ऑफिस आणि प्रवासी यांची सवय व्हावी म्हणून लेटर बॉक्स सुद्धा बसवण्यात आले होते. पण प्रतिसाद अभावी 1930 मध्ये ही सोय बंद करण्यात आली. मुंबईतील वाढती वाहतुकीची गरज भागवण्यासाठी कंपनीने 1937 साली मुंबई दुमजली बस गाड्या सुरू केल्या. 36 प्रवाशांची सोय असलेली एक मजली गाडी आणि तेवढाच रस्ता व्यापून 58 प्रवाशांना येणारी दुमजली गाडी असा फरक असल्यामुळे कंपनीने दुमजली बस गाड्या अधिकाधिक ताफ्यात आणण्यास सुरुवात केली. 1939 सालच्या महायुद्धकालीन परिस्थितीत टायरची कमतरता पेट्रोल रेशनिंग यांनी खाजगी वाहनातून प्रवास करणारे अनेक जण बस कडे वळले. मुंबईच्या उपनगरात सुद्धा बस सेवा सुरू करण्याची परवानगी महापालिकेतर्फे कंपनीला मिळाली. 1940 फेब्रुवारी मध्ये कुलाबा ते माहीम ही मुंबईतील पहिली मर्यादित बस सेवा सुरू झाली. सुरुवातीला फक्त सकाळ संध्याकाळ गर्दीच्या वेळेला असलेली सेवा पुढे इतकी लोकप्रिय झाली की मुंबई वर अनेक ठिकाणी लिमिटेड सर्विस बसेस सुरू करण्यात आल्या.

(क्रमश:) 

 

पुढील भागात - 

 

1947 नंतरचा बेस्ट सेवेचा उत्कर्ष आणि सद्यस्थिती..... 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 85
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

१९७५ मध्ये ट्रॉली बसेस चेंबूर ते कुलाबा , सायन ते वरळी धावू लागल्या.एका अपघातानंतर त्या बंद करण्यात आल्या.

बहुतेक १९९५ नंतर बेस्ट सेवा तोट्यात जाणे सुरू झाले. महापालाकेची सेवा असल्याने पेन्शनही होती.

हल्ली तर दिवाळीचा अडीच हजार रुपये बोनस तरी द्याहो अशा मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांची आंदोलने होतात. 

पूर्वीच्या दुमजली बसेस बंद झाल्या. आणि आता पुन्हा एसी दुमजली बसेस सुरू केल्या तरी त्यांचा हिशोब वेगळा आहे. मालकी बेस्टची आणि चालवतात कंत्राटाने.