Skip to main content

वसूलीचं काय करायचं?

लेखक उपयोजक यांनी गुरुवार, 01/11/2018 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या व्हॉटसअॅप समुहात एका महत्वाच्या विषयावर झालेल्या चर्चेवर आधारीत हा धागा आहे. व्यवसाय म्हटला की त्यात वसूली ही आलीच.नंतर आणून देतो रे,कुठे पळून जातोय का पासून अमुक तारखेला पेमेंट करतो असं सांगून ते वेळेवर न देणारे किंवा चक्क बुडवणारे अनेक 'नग' व्यावसायिकांना भेटतात. याला कोणताही व्यवसाय अपवाद नसावा.अगदी एका वैद्यकीय व्यवसाय करणार्‍या डॉक्टरांनीही त्यांचा याबाबतचा कटू अनुभव सांगितला. अशा व्यवहारांचं डॉक्युमेंटेशन शक्यतो नसतं.केवळ विश्वासावरच असे व्यवहार होतात.याचाच गैरफायदा घेऊन हे पैसे/उधारी देणं लांबवलं जात.टाळलं जातं.काही वेळा आपल्यालाच दमदाटी केली जाते,पोलिसांची भिती दाखवली जाते.मग कधीतरी एखादा अनुचित शब्द वापरला जातो,वाद होतो,नको ती कृती या मनस्तापातून घडते.अगदी तो ग्राहक पुढल्या वेळी 'कायमचा' तुटतोसुद्धा! छोट्या व्यावसायिकांचे हे अनुभव तर मोठ्या व्यवसायिकांसोबत कामाचे अनुभवही असेच आहेत.विशेषत: मोठ्या कंपनीला सेवा पुरवणार्‍या आणि तुलनेने छोट्या असणार्‍या व्यावसायिकांना या बड्या धेंडांकडून वसुली कशी करावी हा मोठा प्रश्न असतो.यांना 'दुखावलं' तर पुढल्यावेळी काम मिळेलंच याची खात्री देता येत नाही.दरडावून मागण्याइतपत आपण धाडस करु शकत नाही आणि पैसेही वेळेवर मिळत नाहीत.त्यात या मोठ्यांचे कनेक्शन्स 'गुंडापुंडांसोबत' किंवा 'राजकारण्यांसोबत' असले तर ही वसूली अजूनच कठीण होते.वाघाच्या जबड्यात हात घालण्याचा प्रकार असतो हा! अजून एक प्रकार म्हणजे तुमचा नातेवाईक किंवा जवळचा मित्र हाच तुमचा ग्राहक असणं.हे लोक घेतलेले पैसे परत देणं,कामाचा मोबदला वेळेवर न देणे असे प्रकार करत असतील तर त्यावेळी मनाला होणारे क्लेश हे तो भोगणाराच जाणो! पैसे तर अडकलेले असतात,आपणही व्यवसायासाठी कुठून तरी कर्ज घेतलेलं असतं.वर हा फुकटचा ताप! कोणाची गुलामी नको,स्वत:चा व्यवसाय करु म्हणून एखादा धडपडून व्यवसाय उभारतो आणि ही बाहेरची गुलामी निष्कारण सोसावी लागते. यामुळेच पडलेल्या काही प्रश्नांबद्दल मार्गदर्शन मिळावं,अधिक अनुभव शेअर व्हावेत म्हणून हा धागा. १) तुम्ही छोटे व्यावसायिक असाल तर ही थकलेली वसूली तुम्ही कशी करता?कोणत्या युक्त्या,शक्कल वापरता? २) छोट्या व्यावसायिकांनी वसुली वेळेत व्हावी,मनस्ताप टळावा यासाठी आधीपासूनच कोणती काळजी घ्यावी?छोट्या कामांचं डॉक्युमेंटेशन करता येतं का?जेणेकरुन काही पुरावा सादर करता येईल? ३) मोठ्या कंपन्यांसाठी काम करणार्‍या छोट्या व्यावसायिकांनी या 'मोठ्यांकडून' वसूली कशी करावी? यांच्याशी केलेले व्यवहार कागदोपत्री चोख असतात.पण प्रत्यक्ष ठरल्यावेळी पैसे मिळतीलंच याची खात्री नसते.अशा वेळी तग कसा धरावा? ४) कोणते/कोणाला दिलेले पैसे हे 'बुडीत' समजून सोडून द्यावेत? ५) नातेवाईक,जवळचा मित्र यांच्याकडून वसूली कशी करावी? ६)पंगुसिंमा(पंजाबी,गुजराथी,सिंधी,मारवाडी)समाजातील लोक व्यवसायासाठी/व्यावसायिकतेसाठी बरेच प्रसिद्ध आहेत.हे लोक वसूलीसाठी काय करतात?त्यांनाही हेच ताप सोसावे लागतात का?की काही वेगळ्या पद्धती वापरतात? ७) हे सगळं पाहता वसुलीचा त्रास नको म्हणूनच तर मराठी माणूस व्यवसायात फारसा दिसत नाही असं असेल का? वसूलीदरम्यानचे आपले कटू,थरारक,मार्मिक अनुभव असतील तर कृपया जरुर शेअर करा.जेणेकरुन इतरांनाही वापरता येतील.या 'वसुलीच्या जगातल्या फसवणूकीच्या जागा' समजून येतील,सावध राहता येईल.

वाचने 18339
प्रतिक्रिया 72

प्रतिक्रिया

शाळा कॉलेज चे गेट टुगेदर झाले कि जुने मित्र पैसे मागायल येतत , बरेच जण मैत्रेखातर चुना लावून घेतात


In reply to by कपिलमुनी

आपला पैसा बुडण्यामागे आपल्याला दानशूरपणाची खाज असते हे कारण आहे, स्पष्ट नाही म्हणायला शिकायला हवे किंवा अकाउंटला थोडीच रक्कम ठेवावी बाकीची ३ दिवस तरी निघणार अश्या कुठल्यातरी स्किम मधे गुंतवावी. म्हणजे आपली इच्छा असली तरीही पैसे दिले जात नाहीत.