Skip to main content

मॉडेलचा झगा

लेखक मनस्विता यांनी शनिवार, 15/08/2026 21:59 या दिवशी प्रकाशित केले.

मागच्या रविवारी आमच्या Art Kitty चे एक वर्कशॉप होते. Art  kitty नावाप्रमाणेच गप्पा-गोष्टी, खाणं-पिणं आणि कला असं सगळं एकत्र असतं. तर तेव्हा काही तरी विषय निघाला आणि आमच्या मॅम म्हणाल्या की त्या पुण्यातील चित्रकारांच्या ग्रुपमध्ये आहेत आणि शुक्रवारी त्यांना पोर्ट्रेट drawing साठी एक मॉडेल हवा/हवी आहे. मी म्हटलं की तुम्हाला तर जरा सुरकुतलेला चेहरा असलेले लागतात ना? जेवढे जास्त बारकावे टिपायला तेवढे तुमच्यासाठी आव्हानात्मक. तर म्हणाल्या 'नाही, नाही असं काही नाही'. आणि मला विचारलं की तुम्ही येता का मॉडेल म्हणून? मी पण बिनधास्त लगेच हो म्हणाले. 

तो विषय तिथेच संपला. वर्कशॉप संपलं. आणि नेहमीचं आयुष्य सुरु झालं. त्यानंतर साधारण मंगळवारी मॅमचा मेसेज आला की तुम्ही खरंच याला का? आणि येणार असल्यास तुमचा एखादा फोटो पाठवा. मॅम त्या ग्रुपमध्ये असल्याने ग्रुपमधील कलाकारांबद्दल खात्री वाटत असल्याने हो म्हटले आणि फोटो पाठवून दिला. मॅमने तो फोटो त्यांच्या कलाकारांच्या ग्रुपमध्ये पाठवला आणि मी मॉडेल म्हणून जाण्यावर शिक्कामोर्बत झाले. 

मला तर मी दहावीत असतानाच्या शिक्षक दिनाचीच आठवण झाली. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनून शाळेत खालच्या वर्गांना शिकवायचे होते. शाळेत आपण शिक्षक होणे आणि त्यात साडी नेसून जायला मिळणे ह्याचे फार अप्रूप वाटले होते. मला अजून आठवते की मी आईची एक साऊथ कॉटनची साडी दिसली होती. बहुतेक शेवाळी रंगाची होती आणि एक मोत्याची माळ गळ्यात घातली होती. शाळेत शिकवून वगैरे झाल्यावर आमच्या सायन्स शिकवणाऱ्या शर्मा मॅडम भेटल्या होत्या. मी साडी नेसून तयार झालेली पाहून मला म्हणाल्या ' तू मॉडेलिंग कर'. हे ऐकून भारी वाटलं. पण नंतर विचार झटकुनही टाकला. त्यात घरी जाऊन आईला त्या काय म्हणत होत्या हे सांगितल्यावर आई वैतागली. आई म्हणे की चांगली डॉक्टर, इंजिनीयर किंवा सायंटिस्ट हो असं म्हणायचं सोडून असलं काय म्हणतात तुमच्या बाई. 

बहुधा आमच्या शर्मा मॅडमची जीभ काळी असावी. कारण जवळपास ३३ वर्षांनी मी पोर्ट्रेट ड्रॉईंगसाठी का होईना मॉडेल म्हणून जाणार होते. 

गुरुवारी संध्याकाळी मॅमना दुसऱ्या दिवशीचे ठरवण्यासाठी फोन केला. त्यांनी आवर्जून सांगितले की तुम्हाला जे सोयीचे आहेत ते कपडे घाला. मी साडी नेसणार म्हटल्यावर शक्यतो फार मेकअप करू नका अशी सूचना दिली. आणि ह्या कामाचे पैसे मिळणार नाहीत हेही सांगायला त्या विसरल्या नाहीत. पण माझा उत्साह इतका दांडगा होता की मी तिथे जाण्यासाठी पैसे हे कारण असूच शकत नव्हते. असो. 

माझ्यादृष्टीने हा एक वेगळा अनुभव असणार होता. एक तर तीन तास काहीही न करता न बोलता एका जागेवर बसून राहायचे होते. अलीकडच्या काळात मोबाइलला हातात आल्यापासून, मी असे केलेले आठवत नव्हते. त्याचबरोबरीने मी स्वतःला आरशात पाहते त्यापेक्षा प्रत्येक कलाकाराला दिसणारी मी कशी असेन ह्याची उत्सुकता होती. हीदेखील शक्यता वाटत होती की कदाचित मला स्वतःला अपरिचित असलेलं माझं रूप माझ्यासमोर येईल. अशा अनेक मिश्र भावना मनात येत होत्या. त्यात घरातलं सगळं आवरून वेळेत पोहोचायचं होतं, ह्या नादात शुक्रवारी पहाटे लवकरच जाग आली. ठरल्या वेळेत सगळं आवरून झालं.              

नेमकी शुक्रवारी माझ्याकडे गाडी नव्हती. तसेच नवीन ठिकाणी पहिल्यांदा जाताना पार्किंगचा अंदाज नसेल तर गाडी घेऊन जायला नको वाटते, पण मॅमने मी तुम्हाला नेते असं म्हणून माझा प्रश्न सोडवला. कधी, कुठे, कसं भेटायचं ठरवून आम्ही दहाच्या आत इच्छित स्थळी पोहोचलो. 

१० ते १ असे त्यांचे ३ तासाचे सेशन असते. कामाचा सराव राहतो. तसेच वेगवेगळी माध्यमं वापरायची ठरवली तर त्यात त्यांना प्रयोग करता येऊ शकतात. अशी एकूण त्या ग्रुपने एकत्र येण्याची धारणा दिसली. आता ग्रुप म्हटला की त्याबरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या पाडायला कोणीतरी पुढाकार घेणे अपेक्षित आहे त्या त्यांच्या दोन म्होरक्यांची ओळख झाली आणि त्यांची नावं लक्षात राहिली.  

ज्या हॉलमध्ये बसून हे काम होणार होते तिथे गेलो. अजून सगळेच कलाकार आले नव्हते म्हणून जुजबी ओळख झाली. खरं तर इथून पुढे मजा येणार होती. कारण आता मला सगळ्यांसमोर जरा उंचावर असलेल्या कोचावर बसायचे होते. चेहऱ्यावरचा भाव साधारण एकसारखा राहील हे बघायचे होते आणि नजर एके ठिकाणी स्थिर असणे अपेक्षित होते. 

एकूण कालावधी ३ तासांचा असला तरी २०-२० मिनिटांची सेशन्स होती. दर २० मिनिटांनी मला एक लहानसा ब्रेक मिळणार होता. तेव्हाच त्यांना - कलाकारांना विचारलं की शांत बसल्यावर माझ्या मनात अनेक विचार येतील आणि माझ्या चेहऱ्यावरचे भाव बदलले तर. तेवढं चालतंय हो असं म्हणून मला धीर दिला. 

पहिलं सेशन सुरु झालं. मनात कायम वर असणारे विचार म्हणजेच शिकायला बाहेर गेलेल्या मुलींचे विचार सुरू झाले. त्यांच्या आठवणींचे कढ डोळ्यांत पाणी आणि दाटलेला गळा देऊन गेले. मनाला समजावून सांगायचा प्रयत्न केला की भविष्यात कधी ना कधी होणारी गोष्ट जरा लवकर घडली आहे. आणि मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी घडली आहे. हळूहळू तो कढ ओसरला. आणि मन बरंच स्थिर झालं. तेवढ्यात पहिली २० मिनिटे संपल्याचा गजर झाला. 

बसल्या जागी पाय लांब केले, मान इकडे-तिकडे हलवली आणि पुन्हा पुढच्या सेशनसाठी आधीच्या पोजमधे बसले. ह्यावेळी मात्र फोनवर गाणी लावली. २००० साल नंतरची रोमँटिक गाणी. त्यामुळे मन त्यात रमलं. त्यामुळे झालं असं की मनाच्या खोल तळात असलेल्या गोष्टी शोधून वर आणणे हा प्रकार झाला नाही. उलट उगाच तुळशीबागेत चक्कर मारावी तसे वेगवेगळे विचार, कल्पना मनात तरंगत राहिले. 

कलाकार चित्र काढत होते. मी माझ्या जागेवर बसले होते. दर वीस मिनिटांनी ब्रेक मिळत असले तरी एकदाच पाणी पिण्यासाठी म्हणून जागेवरून उठले होते. पण साधारण पावणेबाराच्या सुमारास कॉफीसाठी उठलो. एसीमुळे त्या हॉलमधील वातावरण बरंच थंड झालं होतं त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास कॉफी प्यायचे वेध लागले होते. तिथेच एक कॅफे आहे. तेथे जाऊन कॉफी प्यायलो. माझ्या अचानक लक्षात आले की आपण वेळेत परत जायला पाहिजे कारण आपण मॉडेल आहोत. 

मग आता जाऊन परत जागेवर बसले. तेव्हा कोणीतरी आधीच गझल लावल्या होत्या त्या लावाव्या असे ठरले. मला चालतील ना असंही विचारून झालं. (आता त्यांना काय सांगू आमचा जन्मच गझला किंवा तत्सम गाणी ऐकण्यासाठी झाला आहे ते!) मेहदी हसन यांच्या गझल लावल्या होत्या. त्यामानाने मी त्यांच्या गझल कमी ऐकल्या आहेत. पण बारीक आवाजात ऐकू येत होत्या. शेवटी एक गझल लागली. आणि त्याचे सूर मला खूपच ओळखीचे वाटू लागले. ती गझल लाईव्ह कॉन्सर्टमधली होती. त्यामुळे मेहदी हसन त्याच्या राग भूपालीबद्दल सांगत होते, त्यांनी त्याचे आरोह-अवरोह देखील गाऊन दाखवत होते. तर मला त्यातला ध - धैवत कोमल आहे हे ऐकून कळले. घरी आल्यावर नवऱ्याला विचारून खात्री करून घेतली. आणि तो कोमल धच आहे हे कळल्यावर मला माझंच कौतुक वाटलं. 

मला त्या गझलचे शब्द ऐकू येत नव्हते. पण कोणत्या ओळखीच्या गाण्यासारखे सूर आहेत हा विचार करता करता लक्षात आले की हे सूर 'मालवून टाक दीप' ह्या गाण्यासारखे आहेत. नंतर कळलं कि ती गझल 'अब के हम बिछडे' हे प्रसिद्ध गझल होती. बहुधा मनातली आणि अवतीभवती असलेली शांतता ह्याने मी बारीक आवाजात येणारे सूर टिपू शकले आणि ओळखू शकले. असो.

साधारण एकच्या सुमारास वेळ संपली. मी जागेवरून उठायला मोकळी झाले. उठून सगळ्यांनी काढलेली चित्रं पाहायला मिळाली. प्रत्यकजण मला वेगवेगळ्या अँगल्समधून बघून चित्र काढत होता त्यामुळे प्रत्येकाचा perspective वेगळा होता. प्रत्येकाच्या चित्रात दिसणारी मी वेगळी होते. त्याचप्रमाणे असं दिसलं की काही चित्रांत माझ्या डोळ्यांत उदास छटा दिसत होती. मनात त्याक्षणी प्रश्न तरळून गेला की असं का? आणि नंतर अर्थातच लक्षात आलं की पहिल्या २० मिनिटांत माझ्या मनात उसळलेला आठवणींचा डोंब नक्कीच डोळ्यांत उतारला असणार आहे. 

त्यामुळे प्रत्येक चित्रात प्रत्येक कलाकाराला दिसणारी मी तर होतेच पण त्याच बरोबरीने त्या त्या वेळेचे माझ्या मनातील भावनांचे प्रतिबिंब होते. 

सगळ्या कलाकारांची आवराआवर सुरू झाली होती. मी पण माझं सामान आवरून घेतले. न कंटाळता, न पेंगता पोज दिली म्हणून माझे आभार मानण्यात आले.  मीही त्यांचे आणि आमच्या मॅमचे आभार मानले.   

हॉलच्या बाहेर आले आणि मॉडेलचा झगा उतरवून, आलेल्या अनुभवाची शिदोरी बांधून पुन्हा परतीच्या वाटेला लागले.

लेखनविषय:

वाचने 358
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

वाह ! रविवार सकाळ कसली भारी अनुभवकथन वाचून झाली ! Social Media/ मिसळपाव इत्यादींवर वेगवेगळे लोक आपले वेगवेगळे अनुभव लिहितात पण आर्ट स्कूल मॉडेलिंग संबंधी हा मी वाचलेला पहिलाच अनुभव आणि तो पण कलाकार नाही तर मॉडेल perspective मधून ! 

 

पहिलं सेशन सुरु झालं. मनात कायम वर असणारे विचार म्हणजेच शिकायला बाहेर गेलेल्या मुलींचे विचार सुरू झाले. 

 

हे आत डोकावून पाहणे तुम्हाला जितक्या लवकर जमले तितक्या लवकर सगळ्यांना जमले तर क्या कहने! , मुबारक हो ! अतिशय लवकर अन् अतिशय वेगळ्या मार्गाने तुम्ही एकदम स्वतःशी कनेक्ट झाल्या आहात. आजकाल बाहेरच्या जगात इतका क्लॅमर ऐकायला मिळतो की हे "मी माझ्याशी केलेले संभाषण" दुर्मिळ होत चालले आहे. तुम्हाला ते मिळाले करायला अन् ते सुद्धा एका कलात्मक अभिव्यक्तीपूर्ण वातावरणात त्याबद्दल तुमचे दुबार अभिनंदन.

 

(मकबूल फिदा) खोंडे


छान अनुभव. जरी २० मिनिटांनी ब्रेक मिळत असेल तरी तीन तास सतत स्थिर बसणे किती कठीण असेल याची कल्पना करू शकते. तुम्हालाही वेगळा अनुभव मिळाल्याबद्दल अभिनंदन.