भटकंती - ५ भाग शेवटचा -

...आपले दुर्दैव दुसरे काय! आईच्या मायेने आपल्यावर प्रेमाचे पांघरुण घालणाऱ्या निसर्गाशी फारकत घेऊन आपण समाजाशी नाळ जोडतो. हे म्हणजे स्तनपान करणाऱ्या तान्हुल्यांना पोट भरण्याआधीच स्तनांपासून अलग करण्यासारखे आहे. अलग करायचे आणि शिवाय त्याला दुग्धपान सोडून दुसरे काहीतरी खाणयास किंवा पिण्यास द्यायचे. या इतका क्रूरपणा विश्वात कुठे नसेल.... त्याला अशा संस्कृतीत ढकलायचे जेथे फक्त माणसांशीच संपर्क येतो. असा समाज जेथे शेवटी तो घरंदाज होतो व लवकरच त्याला उमजते की आता यापुढे काही नाही.
आपल्या समाजामधे किंवा आपल्या संस्थांमधून कमी वयात अनेक गोष्टी आत्मसात केलेली मुले दिसतात. आपण ज्या वयात वाढायचे असते त्या वयात आपण मोठी माणसे झालेली असतो. हे अगदी अनैसर्गिक वाटते. मला असा समाज द्या जो पाणथळींमधून गाळ काढून शेतात ओतेल आणि आपली जमीन सुपीक बनवेल. उष्णता निर्माण करणारी खते मातीत ओतणारा समाज मला नको.
मला खात्री आहे, जी मुले रात्रभर जागरणे करून, घोकंपट्टी करून पढतमूर्ख होतात त्यांच्यापेक्षा प्रामाणिकपणे झोपणाऱ्या (मुर्ख) मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ झपाट्याने होत असेल.
सगळे जग ज्याच्यामुळे दिसते त्या प्रकाशकिरणांचाही अतिरेक होतो असं म्हणतात. फ्रेंच शास्त्रज्ञ नेप्स याने ‘‘ॲक्टिनिझम’’चा शोध लावला. (किरणांचा वस्तूंवर होणारा परिणाम..उदा पानांमधे तयार होणारे हरीत द्रव्ये..इ.इ.) तो म्हणतो, सूर्यकिरणांनी लोह, दगड इत्यादी पासून तयार झालेल्या पुतळ्यांवर रासायनिक परिणाम होतो आणि काही काळानंतर त्या परिणामांमुळे हे सगळे नामशेष होणार आहेत. पण त्याने कालांतराने एक निरीक्षण नोंदवले. ‘‘ज्या वस्तूंवर परिणाम झाला आहे किंवा ज्यांची हानी झाली आहे ती हानी रात्रीत भरून निघते आणि त्या वस्तू परत मुळपदावर येतात.’’ त्यावरून एक निष्कर्ष काढला गेला की जेवढा प्रकाश आवश्यक आहे तेवढाच अंधारही आवश्यक आहे. जेवढी शरीराला रात्र आवश्यक आहे तेवढीच आवश्यक ती दगडालाही आहे. चंद्रही रोज आकाशात झळाळत नाही. तोही अंधाराचा मान राखून त्याच्यासाठी दोन पावले माघार घेतो.
ज्याप्रमाणे या धरतीचा प्रत्येक इंच लागवडीखाली आणणे मला अपेक्षित नाही त्याच प्रमाणे सगळ्या मनुष्यप्राण्याचा किंवा मनुष्यप्राण्याचा सगळ्या अवयवांचा विकास व्हायलाच पाहिजे अशी अपेक्षा धरणेही चूक आहे. या धरतीवर नांगर चालेल पण त्याचे प्रमाण अल्प असेल. जास्तीत जास्त भूमीवर जंगले असावीत, कुरणे असावीत आणि पाणथळीही असाव्यात. या पाणथळीमधे गवत आणि पाने कुजतील आणि भविष्याची काळजी घेतील.
अशी ग्रीक दंतकथा आहे की कॅडमसने ग्रीक मुळाक्षरे मानवाला दिली. पण मुलांनी इतर अक्षरेही शिकावीत अशा मताचा मी आहे. स्पॅनियार्ड जमातीने या इतर अक्षरांना चांगले नाव दिले आहे. ग्रामॅटिका पारदा ! जे वाघिणीचे दूध मी म्हणतो ते हेच.
आपण नेहमी ऐकतो की उपयुक्त माहिती किंवा ज्ञानाचे समाजात झिरपले पाहिजे. कारण ज्ञान हीच खरी शक्ती आहे इ.इ. असे म्हणतात. यापुढे जाऊन मी असं म्हणतो की ज्ञानाचा प्रसार तर व्हायलाच पाहिजे पण उपयुक्त अज्ञानाचा प्रसार होणेही अत्यंत आवश्यक आहे. आपण ज्याला ज्ञान म्हणतो, तो वास्तविक एक भ्रम असतो. आपल्याला सगळं कळलं आहे हाच तो भ्रम आणि त्यालाच ज्ञान समजून आपण अज्ञानाचा उपयोग करण्याची संधी गमावतो. म्हणून अज्ञानाचाही प्रसार होणे आवश्यक आहे. ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते खरे तर निश्चितपणे अज्ञान असते आणि खरे अज्ञान हे अनिश्चित ज्ञान असते. अनेक वर्षं वर्तमान पत्रे वाचून (शास्त्रावरील पुस्तके ज्या ग्रंथालयात असतात ती शास्त्रावरील बातम्यांशिवाय दुसरे काय असते?) माणूस माहिती गोळा करतो त्याच्या मेंदूत साठवतो आणि मग जेव्हा त्याच्या आयुष्याचा वसंत येतो तेव्हा विचारांमधे विहार करतो. थोडक्यात काय एखादा तबेल्यातील घोडा सगळे लगाम, बंधने मागे टाकून जसा कंटाळून हिरव्या गवतावर धाव घेतो तसा हा माणूस पुस्तकी ज्ञान मागे सोडून निसर्गात धाव घेतो. मी समाजाला आवाहन करतो ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी गवतावर जा. खूप काळ तुम्ही वाळलेला चारा खाल्ला आहे आता वसंत ऋतू नवीन हिरवळ घेऊन आला आहे. मित्रहो ! जनावरांनाही वसंत ऋतूत चरण्यासाठी मोकळ्यावर सोडतात हे लक्षात घ्या. अर्थात मला एक शेतकरी माहीत आहे तो त्याच्या गाईला वर्षभर वाळलेले गवतच खायला घालतो. बाहेर सोडत नाही. तशीच उपयुक्त ज्ञानाचा प्रसार करणारी माणसेही सामान्यांना या जनावरांसारखेच वागवतात. त्यांना मोकळे सोडत नाहीत.
काही वेळा माणसाचे अज्ञान नुसते उपयुक्तच असते असे नाही तर ते सुंदरही असते आणि काही वेळा उपयुक्त ज्ञान विद्रूप असते. त्याचा काडीचाही उपयोग नसतो. तुम्हीच सांगा, ज्या माणसाला काहीच ज्ञान नाही पण त्याला काही ज्ञान नाही याचे ज्ञान आहे त्याला समजावून सांगणे सोपे, का ज्याला थोडेसे ज्ञान आहे पण त्याला वाटत असते की त्याला सर्वज्ञान आहे, अशा माणसाला समजावून सांगणे सोपे?
माझी ज्ञानलालसा अखंडित आहे असं मला वाटत नाही पण ज्याठिकाणी माझी पावले अजून पोहोचलेली नाहीत अशा निसर्गात आकंठ बुडावे ही माझी इच्छा मात्र चिरतरुण आहे. ज्ञान हे माझे ध्येय नाही तर माझ्या बुद्धीबद्दल सहानुभूती बाळगणे हे माझे ध्येय आहे. मी विनम्रतेने हे स्वीकारले पाहिजे. माहिती ज्याला काही लोक ज्ञान म्हणतात ती एका कादंबरीशिवाय दुसरे काही नाही. असे ज्ञान ते किती अपुरे आहे हे कळल्यावर आपल्याला आश्चर्यचकित करते. अवकाश आणि पृथ्वीवर आपल्याला समजल्या आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त गोष्टी आहेत हे समजल्यावर दुसरे काय होणार? हे धुक्यावर पडलेल्या प्रकाशा सारखे आहे ज्याने गोष्टी अधिकच धूसर होतात.
नियम पाळून आयुष्य व्यतीत करण्यात एक प्रकारची गुलामगिरी आहे. या विश्वाच्या नियमांचा अभ्यास करणे आवश्यक आहेच पण यशस्वी आयुष्याला कुठलेही नियम लागू होत नाहीत. ज्या नियमांनी आपण बांधले गेलो आहोत त्या नियमांचा शोध आपल्याला त्या नियमांत बांधले गेल्यावर लागतो यासारखी दुसरी शोकांतिका नाही. स्वतंत्र विचार करा आणि खऱ्या स्वातंत्र्यात जगा. जर ज्ञानलालसेचा विचार केलात तर आपण सगळे त्या विस्कळीत धुक्याचे वंशज आहोत हे लक्षात घ्या. जो माणूस जगण्याचे स्वातंत्र्य घेतो तो त्या सगळ्या नियमांपेक्षा श्रेष्ठ असतो. नियम तयार करणारी शक्ती आणि त्या माणसांमधील नात्याने हे श्रेष्ठत्व त्याला प्राप्त होत असते. तेच त्याचे कर्म आहे असे विष्णू पुराण म्हणते. ते पुढे जाऊन असंही म्हणते की ज्ञान हे आपल्याला गुलामगिरीत ढकलत नाही तर आपल्याला मुक्त करण्यासाठी आहे. हे कर्म सोडल्यास बाकी सगळी कर्मं त्याची दमछाक करतात. बाकी सगळे ज्ञान हे त्या कलाकाराची हुशारी आहे हे लक्षात घ्या !
एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आपल्या आयुष्यात फार कमी महत्त्वाच्या घटना घडतात किंवा फार कमी संकटे आपल्यावर कोसळतात. त्यामुळे संकटांना तोंड देण्याची आपल्या मनाची तयारीच नसते. किती अननुभवी असतो आपण! निराशेच्या आणि अंधाऱ्या रात्रीतून माझी प्रगती होणार आहे हे मला कोणी सांगितले तर मला निश्चितच आवडेल पण या प्रगतीमुळेच जर माझी मनःशांती ढळणार असेल तर मात्र कठीण आहे.
कधी कधी आपण रुळाच्या कडेने विचारमग्न होत चालत असतो. तेव्हा शेजारून आगगाडी गेली तरी आपल्याला तिचा धडधडणारा आवाज ऐकू येत नाही. पण काही क्षणानंतर कुठल्यातरी कठोर नियमांनी काळ पुढे सरकतो आणि त्या आगगाड्या परत येतात.
अदृष्यपणे वाहणारा मंद वारा,
त्याने लवणारी झुडपांची पाने नदीकिनारी.
दऱ्याखोऱ्यातून तू भणभणतोस,
का एवढ्यातच शांत झालास...!
जवळजवळ सगळ्याच माणसांना समाजात राहण्याची ओढ असते. फार कमी माणसांना निसर्गाची ओढ असते. निसर्गाबद्दल प्रतिक्रिया देताना मला माणसे जनावरांपेक्षा खालच्या प्रतीची वाटतात. वन्यजिवांचे आणि निसर्गाचे नाते जसे नितांत सुंदर आहे तसे माणसाचे आणि निसर्गाचे नाते आहे असे म्हणता येत नाही हे आपले दुर्दैव. निसर्गाच्या सौंदर्याचे आपल्याला कौतुकच नाही. आपल्याला ग्रीक दंतकथांतून या पृथ्वीला ‘‘ब्युटी’’ असे संबोधले आहे असे सांगावे लागते पण त्यांनी पृथ्वीला ते नाव का ठेवले हे आपल्याला समजत नाही आणि समजले तरी खऱ्या अर्थाने ते आपल्याला उमजत नाही. आपण त्या शब्दाकडे फक्त भाषेच्या दृष्टिकोनातून पाहतो.
माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर मी नेहमी मानवाच्या सभ्यतेच्या काठावर रेंगाळत असतो आणि परत परत निसर्गात परत जातो. मी ज्याला नैसर्गिक जीवन म्हणतो ते शोधण्यासाठी मी जंगलातील घनदाट झाडीत लपलेल्या भुतांच्या मागे मागे जाण्यास तयार आहे पण ना चंद्राने ना काजव्यांनी मला तेथे जाण्याचा रस्ता दाखवला. निसर्गाचे व्यक्तिमत्त्व इतके विशाल आणि वैश्विक आहे, की त्याचे संपूर्ण आकलन होणे अशक्य आहे. काही ना काहीतरी राहून जातेच. माझ्या गावाच्या आसपास भटकणारा माणूस कधी कधी चुकून त्याच्या गावाची हद्द सोडून दुसऱ्या गावाच्या हद्दीत करतो. या प्रदेशात कॉन्कॉर्डची सीमा संपते आणि कॉन्कॉर्ड या शब्दाने जे काही डोळ्यासमोर येते त्यालाही काही अर्थ राहात नाही. या शेतजमिनीचे सर्वेक्षण मीच केले आहे आणि त्याच्या सीमा मीच आखल्या आहेत, त्या आता मला स्तब्ध आणि धुक्यातून पाहिल्यासारख्या अस्पष्ट दिसतात. त्या आता अस्पष्टच होत जाणार आहेत आणि काही वर्षांनी त्याची कोणाला आठवणही होणार नाही.
काही दिसांपूर्वी मी उतरत्या दुपारी स्पाल्डिंग फार्मवर भटकायला गेलो होतो. मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात पाईनच्या जंगलांची ती बाजू उजळून निघाली होती. एखाद्या प्रासादातील सभागृहात जशी सूर्यकिरणे घुसतात तसेच जंगलांच्या या बेटांमधे ती सोनेरी किरणे घुसत होती. मला क्षणभर वाटले त्या प्रासादात कोणी प्राचीन काळातील अनोळखी तेजःपुंज कुटुंब राहण्यास आले आहे आणि प्रत्यक्ष सूर्य त्यांचा नोकर आहे. हे कुटुंब गावात गेलेले नाही ना त्यांना कोणी आमंत्रण दिले आहे. त्या घराची बाग मी पाहिली आणि जंगलापलीकडे असलेले क्रॅनबेरीच्या कुरणाचे क्रीडांगण पाहिले. पाइन वृक्षांनी त्या त्यांच्यावर छाया धरली होती. पण ते घर आपल्या नजरेस दिसत नव्हते कारण त्या घरातून वृक्ष उगवले होते. त्या घरातून दबलेल्या आवाजातील हसण्याचा, खिदळण्याचा आवाज मला ऐकू आला की नाही हे मला आठवत नाही. सूर्यकिरणांना टेकून ते बसतात आणि त्यांच्या घरात मुलेही आहेत. आनंदात आहेत. गाड्यांचा रस्ता त्यांच्या बैठकीच्या खोलीतून जातो पण त्यामुळे ते विस्थापित झालेले दिसत नाहीत कारण बऱ्याच वेळा तेथे डबक्यात निळे आकाश दृष्टीस पडते खरे ! त्यांनी स्पाल्डिंगबद्दल काही ऐकलेले नाही आणि ते त्यांचे शेजारी आहेत याची त्यांना साधी कल्पनाही नाही पण त्या घरातून त्यांनी मारलेली कर्णमधुर, मंत्रमुग्ध करणारी शीळ मला ऐकू येते. त्यांच्या शांत व प्रसन्न आयुष्याची बरोबरी कोणीच करू शकणार नाही. त्यांच्या घराण्याची निशाणे म्हणजे वृक्षांना लटकलेले शेवाळ्याची पोळी. अनेक पाइन आणि ओकवर ही निशाणे फडकताना मी स्वतः पाहिली आहेत. त्यांचे माळे झाडांवर आहेत. त्यांच्याकडे कसलेली राजकारण नाही ना कामगारांची गडबड. तेथे ते कताई किंवा काही विणत नसावेत कारण तसा आवाज मी कधीच ऐकला नाही. पण कधी कधी मे महिन्यामधे मला अस्पष्ट पण गुणगुणणे मात्र ऐकू येते. बहुधा हा त्यांच्या विचार करण्याचे संगीत असावे. त्यांच्या विचारांना सुस्ती कधी येत नाही आणि कोणाला त्यांचे काम दिसत नाही कारण ते नजरेत पकडता येत नाही.
पण आता त्यांना आठवताना मला प्रयत्न करावे लागतात. ते माझ्या स्मृतीतून हळू हळू नाहीसे होत आहेत. मी आत्ता हे बोलतानाही त्यांची स्मृती अस्पष्ट होत आहे. त्यांना आठविण्याच्या अथक प्रयत्नांनंतर मला त्यांच्या अस्तित्वाची परत जाणीव होते. हे शेजारी नसते तर मी कॉन्कॉर्ड केव्हाच सोडले असते.
आपल्याकडे आजकाल चिमण्या दिवसेंदिवस कमी होत आहेत याबद्दल मोठी चिंता व्यक्त करण्यात येते. आपल्या रानात आजकाल त्यांना घरटी बांधण्यासाठी फांद्याच उरल्या नाहीत तर त्या तरी काय करणार बिचाऱ्या. चिमण्या कमी होत आहेत आणि दिवसेंदिवस उत्तमोत्तम विचारांच्या भेटीही कमी होत आहेत कारण आपल्या मनातील झाडेझुडपे आधीच विकली गेली आहेत. एकतर ती वाळली आहेत किंवा लाकडांच्या वखारींना विकली गेली आहेत. विचारांना बसायला एकही फांदी उरली नाही तर ते तरी काय करणार बिचारे! आता विचारांची जोपासना होत नाही ना नवीन विचार जन्माला येतात. कधी कदाचित पण क्वचित एखादा चांगल्या विचारांच्या पंखाची सावली आमच्या मनाच्या रखरखीत वाळवंटावरून पसरत जाते. जातच नाही असं नाही, पण जेव्हा मान वर करून आम्ही या विचारपक्षांकडे पाहतो तेव्हा त्याची व्याप्ती आणि खोली कळत नाही हे खरं. आम्ही पाहतो त्याच क्षणी त्या विचारपक्षांचे खाद्य झालेले असते. कुठल्यातरी शिकाऱ्याला तो बळी पडलेला असतो. मग ते उंच आकाशात भरारी घेत नाहीत आणि समजा एखाद्या विचाराने भरारी घेतलीच तर ते कोचीन किंवा चीनच्या तत्त्ववेत्त्यांच्या दरबारात हजर होतात अशी मला शंका आहे.
आपण या धरतीला कधी मिठी मारत नाही... किती वेळा आपण निसर्गात जातो? मी म्हणतो आपण जरा उंचावरून धरतीकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहू या. कदाचित आपल्याला एखाद्या वृक्षावर चढावे लागेल. मी एकदा एका उंच वृक्षावर चढलो होतो त्याची आठवण माझ्या मनात अजूनही ताजी आहे. ज्या उंच व्हाईट पाइनवर मी चढलो होतो तो एका टेकडीच्या माथ्यावर होता. जरी मला धडपडत चढावे लागले होते तरी त्या कष्टाचे चीज झाले असेच म्हणावे लागेल. मला कधीही न दिसलेले क्षितिजावरच्या डोंगर रांगा दिसल्या. धरती आणि आकाशाचे भव्य दिव्य स्वरूप मी अनुभवले. मी खाली कितीही पायपीट केली असती तरी ते आकाश, धरती आणि त्या डोंगररांगा मला दिसल्या नसत्या. पण माझ्या अवती भोवती अजून एक सुंदर मला दिसले. मला आठवतंय जूनचा महिना होता. पाइनच्या सगळ्यात वरच्या फांद्यांना थोडा मोहोर आला होता. नाजूक आणि लालचुटुक रंगाची ती फुले आकाशाकडे पाहात लगडली होती. मी त्यातील थोडी खुडली आणि सरळ गावातील एका माणसाला ती फुले दाखवली आणि नंतर काही शेतकऱ्यांना, लाकुडतोड्यांनाही दाखवली. त्यांच्यापैकी कोणीही ती आजवर पाहिली नव्हती. एखादा तुटणारा तारा पाहताना जसे आपले डोळे विस्फारतात तसे त्यांचे डोळे विस्फारलेले मला अजूनही आठवतात. प्राचीन शिल्पकार जेव्हा एखादा स्तंभ घडवीत तेव्हा खालील भागावर केलेल्या नक्षीकामांपासून ते पार वरच्या टोकावर असलेल्या भागावर तेवढ्याच कुशलतेने व अचूकतेने नक्षीकाम करीत. निसर्गाने सुरुवातीपासून या चिमुकल्या, नाजूक मोहोरातील फुलांना स्वर्गाजवळ, मनुष्याच्या डोक्यावर, त्यांच्या दृष्टीस पडणार नाहीत अशा जागी नेऊन ठेवले आहे. आपण पाहतो ती कुरणातील फुले आपल्या पायाशी असतात. पाइन वृक्षांनी गेली कित्येक युगे प्रत्येक उन्हाळ्यात आपला नाजूक मोहोर झाडाच्या टोकावर फुलवला आहे. पण फार क्वचित एखाद्या शेतकऱ्याने या फुलांना पाहिले असेल... दुर्दैव त्यांचे दुसरं काय!
वर्तमान काळात न जगणे परवडणारे नाही पण एक एक क्षण मागे जाताना भूतकाळातील प्रत्येक क्षणाची आठवण ठेवणारा खरंच थोर म्हटला पाहिजे. जर आपल्या तत्त्वज्ञानाने क्षितिजाच्या सीमांच्या आत असलेल्या परसातील प्रत्येक कोंबड्याचे आरवणे ऐकले नाही तर त्या तत्त्वज्ञानाचा काही उपयोग नाही. आरवण्याचा आवाज आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देत असतो. उदा. आपण आळशी झालेलो आहोत, आपला व्यवसाय जुनाट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले विचार बुरसटलेले आहेत. त्याचे तत्त्वज्ञान हे आपल्या तत्त्वज्ञानापेक्षा ताजे आहे. ते नवीन टेस्टामेंट आहे. तो मागे पडलेला नाही. तो लवकर उठला आहे आणि त्याने आपल्यालाही उठवले आहे. तो जेथे आहे तेथे असणे हे आपल्या फायद्याचे आहे. त्याचे आरवणे हे उत्तम आरोग्याची, निसर्गाची आरती आहे. सळसळत्या तारुण्याचे, स्वातंत्र्याचे कारंजे आहे. तो जेथे राहतो तेथे गुलामगिरीचे समर्थन करणारे कायदे मंजूर केले जात नाहीत. आणि हे सगळे तो न चुकता गेली कित्येक युगे करत आलाय...
या पक्षाच्या सुरावटीत सगळ्या काळज्या झुगारून देण्याचे सामर्थ्य आहे. एखादा उत्कृष्ट गवई आपल्या डोळ्यात अश्रू किंवा आनंदाश्रू आणू शकतो पण पहाटे आपल्यासमोर येणाऱ्या दिवसाचे आशादायक चित्र फक्त हाच पक्षी उभे करू शकतो. एखाद्या दिवशी आपल्या घरादाराला निराशेने घेरले असते तेव्हा याचे आरवणे माझ्या कानावर पडल्यावर माझ्या मनात विचार येतो, ‘‘ चला ! कोणाची तरी परिस्थिती चांगली आहे तर !’’ आणि मी भानावर येतो.
मागच्या नोव्हेंबरमधे मी एका सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य पाहिले. मी एका कुरणातून चाललो होतो. या कुरणातून एक छान झुळझुळ वाहणारा झरा वाहत होता. शेवटी त्या कंटाळवाण्या दिवसाच्या अखेरीस, एका क्षणी सूर्य मावळण्यासाठी क्षितिजावर आला. सकाळी पडतो तसा कोवळा, सोनेरी सूर्यप्रकाश कुरणातील वाळलेल्या गवतावर आणि समोरच्या क्षितिजावर असलेल्या झाडांच्या बुंध्यांवर पडला. टेकड्यांवर श्रबओकची पाने चमकू लागली आणि आमच्या सावल्या त्या कुरणात लांब झाल्या. जणू काही आम्ही त्या प्रकाशातील एक सूक्ष्म जीव आहोत. असा अद्भुत प्रकाश आता पडणार आहे याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. वातावरणही उबदार होते आणि इतके शांत आणि प्रसन्न होते की त्याची आम्हांला झिंग चढली.. जणू त्या कुरणावर स्वर्गच अवतरला होता. ते दृश्य अनिमिष नजरेने पाहताना आमच्या मनात एक विचार आला आणि आम्ही त्या विचाराने अत्यंत आनंदीत झालो. - ‘‘हे दृश्य असेच युगानयुगे दिसणार आहे. हा प्रकाश असाच अनेक संध्याकाळी पडत राहणार आहे. अनेक वर्षांनंतर एखादे बालक या कुरणावर चालताना हे दृश्य परत पाहणार आहे आणि ते दृश्य त्याच्या डोळ्यात साठवणार आहे. ही अद्भुत संध्याकाळ काही शेवटची नाही...’’
सूर्य एखाद्या निर्जन कुरणावर, जेथे एखादी झोपडीही दिसत नाही, त्यावर मावळतो जसा तो शहरांवर मावळतो जणू काही असा तो परत कधीच मावळणार नाही. एखादा ससाणा पंख फैलावून तो सोनेरी प्रकाश कापत कुरणावर तरंगत असतो आणि त्याच्याकडे बिळातून मुस्कॅश कुतूहलाने पाहतो. एखादा झरा वळणे घेत त्या कुरणातून शांतपणे एखाद्या कुजलेल्या झाडाच्या बुंध्याला वळसा मारत वाहत असतो. आम्ही त्या स्वच्छ प्रकाशातून गवत व वाळलेला मऊशार पाला पाचोळा तुडवत चालत होतो. मी आजवर असल्या तरंग न उठणाऱ्या सोनेरी धबधब्याखाली कधीच न्हालो नव्हतो. जंगलाची पश्चिम बाजू आणि त्यातील जमिनीचे उंचवटे एलिसियमच्या कुंपणासारखे चमकत होते (ग्रीक दंतकथेनुसार प्रत्येक स्वर्गवासी झालेल्या योध्याला पुढच्या आयुष्यात एक घर आणि शेत मिळते त्याला ते एलिसियम म्हणत) आणि आमच्या पाठामागे असलेला सूर्य एखाद्या प्रेमळ गुराख्यासारखा आम्हांला घरी हाकलत होता.
तर मग आम्ही नवीन कुरणांच्या शोधात भटकतो, जोपर्यंत हा सूर्य अधिक तेजाने तळपत नाही तोपर्यंत भटकतो. कदाचित तो आमच्या मनात आणि ह्रदयातही तळपेल आणि आमचे आयुष्य त्याच्या प्रकाशाने उजळून टाकेल. जसा तो एखाद्या नदीचा काठ, कुरण आणि जंगल त्याच्या प्रकाशाने उजळून टाकतो....
- थोरो
- जयंत कुलकर्णी
आपल्या विचारांवरही असाच प्रकाश पडो आणि आपले आयुष्य उजळून निघो ...

मिसळपाव
प्रतिक्रिया
खूप सुंदर झाली लेखमाला,…
खूप सुंदर झाली लेखमाला, निसर्ग पाहता तर येतो, पण इथे निसर्ग वाचता आला. मूळ विचार आणि अनुवाद दोन्ही आवडले.