Skip to main content

भटकंती - ३

लेखक जयंत कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/08/2026 08:33 या दिवशी प्रकाशित केले.

भटकंती-३

 

...आमची सहानुभूती फक्त न्युइंग्लंडपुरती मर्यादित नाही. दक्षिणेशी आमचे संबंध ताणलेले असले तरी आम्हांला पश्चिमेबद्दल पूर्ण सहानुभूती वाटते. तरुणांना हा नवीन प्रदेश खुणावतोय, जसे स्कँडेनेव्हियाचे दर्यावर्दी तरुण समुद्रावर त्यांचा वारसा जपत आहेत. पण मला वाटते हिब्रू शिकण्याचा आटापिटा करण्यापेक्षा आजची बोली भाषा शिकण्यातच खरा शहाणपणा आहे.

काही महिन्यांपूर्वी मी ऱ्हाईनवर भटकण्यास गेलो होतो. चमकणाऱ्या एखाद्या मध्ययुगातील काळातील स्वप्न पडत असावे असं मला वाटलं. मनाने मी तिच्या इतिहासाच्या प्रवाहात वाहत होतो आणि शरीराने तिच्या पाण्यातून. रोमन लोकांनी तिच्यावर बांधलेल्या सुंदर पुलाखालून, काही नंतर दुरुस्त केलेल्या पुलाखालून, तिच्या काठावरील शहरांना मागे टाकून, किनाऱ्यावरील किल्ले पहात मी आपला वाहात होतो. या किल्ल्यांची नावे तर माझ्या कानाला एखाद्या कर्णमधुर संगीताप्रमाणे भासत होती आणि प्रत्येक किल्ल्याभोवती एखादी दंतकथा गुंफलेली होतीच. एरेनब्राईश्टाईन, रोलँडसेक आणि कोब्लेन्ट्झ ही फक्त इतिहासात वाचलेली नावे मी आता प्रत्यक्षात पाहात होतो. या किल्ल्यांच्या अवशेषांत मला विशेष रस होता. त्या जंगलांनी वेढलेल्या पाण्यातून मला एक गूढ संगीत ऐकू येत होते. मला क्षणभर वाटले क्रुसेडच्या काळात हे असेच संगीत त्या योद्ध्यांनी ऐकले असणार.. मी मंत्रमुग्ध होऊन ते सगळे पाहात होतो आणि त्या काळातील वातावरणाचा अनुभव घेत होतो.

त्यानंतर काहीच दिवसांनी मी मिसिसिपीवर भटकायला गेलो. मी तिच्या काठाकाठाने जेव्हा प्रवास केला तेव्हा मला तिच्या पाण्यात स्टिमबोटी दिसल्या, उभी राहणारी नवीन शहरे दिसली. पाण्यावरून प्रवास करणारे इंडियन लोक दिसले आणि नाऊवूचे भग्न अवशेषही दिसले. आणि पूर्वी मी जसे मॉसेले पाहिले तसे आज ओहायो आणि मिसोरी पाहिले. डुब्युकच्या वेनोनाच्या कड्याच्या दंतकथा ऐकल्या.. पण हे सगळे पाहताना माझ्या मनातून भविष्याचा विचार एक क्षणभरही बाजूला पडला नाही. हे सगळं पाहताना भूतकाळ आणि वर्तमानकाळापेक्षा मला भविष्यकाळाची जास्त ओढ लागली होती हे मी नाकारू शकत नाही. ही एक वेगळ्या प्रकारची ऱ्हाईन होती जिच्या तीरावर अजून शहरे उभी राहायची होती आणि किल्लेही व्हायचे होते. या पाण्यावर अजून अनेक पुल बांधले जाणार होते. मला वाटले ही एका नव्या युगाची सुरुवात आहे आणि याचा नायक हा साधासुधा, सर्वसामान्य अनोळखी माणूस आहे. 

ज्या पश्चिमेबद्दल मी बोलतोय त्याचेच दुसरे नाव आरण्यक असं आहे. आणि मी इतक्यावेळ जे सांगण्याचा प्रयत्न करतोय की याच आरण्यात हे जग सुरक्षित आहे. प्रत्येक वृक्ष निर्जन प्रदेश शोधण्यासाठी त्याची मुळे दूरवर पाठवतो तर शहरे त्यात आढळणाऱ्या शांततेसाठी कितीही पैसा मोजायला तयार असतात. मनुष्य निर्जन राने नांगरतो आणि त्यासाठी सातासमुद्रापार आपल्या नावा हाकारतो. याच रानावनातून माणसांना अनेक वनौषधी व लेप मिळतात. आपले पूर्वज रानटी होते. लांडग्यांनी पाळलेल्या रोमुलस आणि रेमुसची दंतकथा अर्थपूर्ण आहे असं आता मला म्हणावं लागतंय. अनेक साम्राज्यांच्या संस्थापकांनी याच अफाट निर्जन निसर्गातून प्रेरणा घेतली असावी असं मला वाटते. या साम्राज्याच्या जनतेचे पालनपोषण लांडग्यांनी केले नव्हते त्यामुळे झाले काय, त्यांना उत्तरेच्या टोळ्यांनी सहज हाकलून दिले असावे..

माझा जंगलावर नितांत विश्वास आहे आणि या अफाट पसरलेल्या कुरणांवरही.  एवढेच नाही तर ज्या रात्रीत कणसे वाढतात त्या रात्रींवरतीही माझा विश्वास आहे. मला तर वाटते आपल्या चहातही हेमलॉक व स्पृस झाडांचा थोडासा तरी अर्क मिसळायला हवा. शक्तीसाठी अन्न ग्रहण करणे आणि खादाडपणा यात आपल्याला फरक करता यायला हवा. श्वापदे कच्चे मास खात आणि काही इंडियन जमाती रेनडियरचे कच्चे मास खातात, जोपर्यंत ते मास ताजे असते तोपर्यंतच. या बाबतीत त्यांनी पॅरिसच्या खाद्यसंस्कृतीवर मात केली आहे असं मी मानतो. पॅरिसमधील स्वयंपाकी जे जाळून टाकायच्या लायकीचे मांस असते ते तथाकथित रुचकर पदार्थांसाठी वापरतात. पोसलेल्या गाई म्हशींपेक्षा त्यांचे (इंडियन जमातींचे) अन्न कितीतरी चांगले असावे. मी देवाकडे नेहमी मागणी करतो की मला त्या रानटी अवस्थेकडे घेऊन चल जेथे हा सुसंस्कृत समाज ढवळाढवळ करणार नाही.. किंबहुना त्यांचे तेथे नजर टाकण्याचे धाडसही होणार नाही.

मी अशा ठिकाणी जाईन जेथे वुडथ्रशची लकेर मला ऐकू येईल, जेथे अजून कोणी माणूस पोहोचलेला नाही. मला अशा जागांची चांगलीच सवय झाली आहे.

आफ्रिकेत शिकारी करून प्रसिद्ध झालेला शिकारी कमिंग म्हणतो की नुकत्याच शिकार झालेल्या हरणांच्या किंवा काळविटांच्या कातड्याला झाडांचा आणि गवताचा एक आगळाच सुगंध येतो. प्रत्येक माणूस या जंगली काळविटासारखा असता तर किती बरं झाले असते. म्हणजे तो या निसर्गाचा एक घटक झाला असता. त्याच्या व्यक्तिमत्त्वांत त्याला निसर्गातील जी गोष्ट सगळ्यात आवडते ती भिनली असती आणि ती काय आहे हे आपल्याला तो जवळ आला की लगेच कळले असते. मी उपहासाने म्हणत नाही, पण एखाद्या शिकाऱ्याच्या कातडी अंगरख्याला येणारा मुस्कॅशचा वास मला कुठल्याही अत्तरापेक्षा जास्त सुगंधित वाटतो. शहरातील विद्वानांच्या कोटाला येणारा वास मला त्यापुढे फिका वाटतो. त्यांच्या कपड्याला येणाऱ्या वासाने ना मला गवताळ कुरणांची आठवण येते ना उमललेल्या जंगली फुलांची.. त्यांच्या कपड्यांना वास येतो धुळीचा आणि तो सुद्धा कुबट.

रापलेल्या कातडीबद्दल मला जास्त आदर वाटतो. किंबहुना मी म्हणेन की रानातील माणसाला तपकिरी रंगच जास्त शोभून दिसतो. ‌‘‌‘पांढुरका गोरा माणूस‌’‌’ असं म्हणून आफ्रिकन जमाती गोऱ्यांची किव करत यात नवल ते काय. डार्वीनन म्हणत असे, ‌‘‌‘ताहिती माणसाशेजारी स्नान करणारा गोरा माणूस म्हणजे माळ्याने खोलीत ठेवलेली, खुरटलेली, फिकट पडलेली रोपे. त्याची हिरव्यागार, जोमाने वाढणाऱ्या उघड्यावरील रोपांशी तुलना कशी व्हावी बरं !

बेन जॉन्सन म्हणतो - गौरवर्ण म्हणजे चांगुलपणा. पण मी म्हणतो - जंगली म्हणजे चांगुलपणा.

जीवन म्हणजे निसर्ग. निसर्ग म्हणजे मूर्तिमंत जिवंतपणा. अजून माणसाने निसर्गावर पूर्ण ताबा मिळवला नसल्यामुळे त्याच्या अस्तित्वाने मनुष्यजातीचे आयुष्य सुखी आहे. सतत धडपड करत असलेल्या माणसाला, नवनवीन आव्हानांना सतत सामोरे जाण्याची सवय असलेल्या माणसाला, निसर्ग सतत खुणावत असतो. तेथे त्याला प्राचीन वृक्षांच्या मुळांवर चढण्याची संधी मिळते.

माझ्या बाबतीत म्हणाल, तर मला हिरवळी आणि बागबगिच्यांमधे कसलाही रस नाही ना मला त्यांच्याकडून काही आशा आहे. त्यापेक्षा ज्यावरून चालणेही अशक्य आहे अशा पाणथळी मला जास्त जवळच्या वाटतात. मी फार पूर्वी जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करीत होतो. माझ्या लक्षात एक गोष्ट त्या वेळेस आली की ज्या जमिनीत गचकण असे ती जमीन मला जास्त आकर्षित करत असे. झाडाझुडपांची ती छोटीशी पाणथळ जमिनीतील पाण्याचा निचरा होण्याची नैसर्गिक सोय असावी. माझ्या जमिनीतील ते माणिक माझे डोळे दीपवून टाकीत असे. गावातील बाग बगिच्यांपेक्षा मला गावाला वेढून टाकणाऱ्या पाणथळींनी जगण्यासाठी जास्त मदत केली आहे. बागेतील ताटव्यांपेक्षा माझ्या डोळ्यांना जंगलातील झुडपांचे दाट ताटवे जास्त सुख देतात. वनस्पतिशास्त्र मला त्या वनस्पतींची नावे सांगण्यापलीकडे जात नाही. मला कधीकधी वाटते माझ्या घराची समोरची बाजू या फिकट लाल रंगाच्या जंगली फुलांच्या समोर असावी आणि माझ्या घराला पटांगण नसावे कारण घरासमोरील बंदिस्त पटांगण म्हणजे निसर्गाची क्षमायाचना आहे असं मी समजतो. घर कसं निसर्गामधे उभे पाहिजे. त्याच्या आणि निसर्गाच्या मधे कशाला पाहिजेत आखीव रेखीव कृत्रिम ताटवे आणि फरश्यांनी, विटांनी मढवलेल्या पाऊलवाटा ? तुमच्या खिडक्यांच्या चौकटी पाणथळीच्या पाण्याला भिडू द्या म्हणजे त्या बाजूने तुमचा एकांतवासाचा भंग करण्यास कोणी आगंतुक घरात येणार नाही. घरासमोरील पटांगण हे घरात येण्यासाठी नसून घरामागे जाण्यासाठी असते असा माझा विश्वास आहे.

तुम्हांला मी कदाचित विक्षिप्त वाटेन पण मला जर एका सुंदर बगिच्यात राहायचे आहे का पाणथळीत असं विचारले तर माझे उत्तर ‌‘‌‘पाणथळीत‌’‌’ असेच असेल. मग त्या बागेसाठी  खर्च आणि कष्ट कशासाठी?

ज्या भयाण गोष्टींना माणसे घाबरतात त्यात माझे मन रमते. उदा. सागर घ्या किंवा वाळवंट घ्या, किंवा अफाट निर्जन जंगले घ्या. मला वाळवंटात हवा कोरडी असेल कदाचित पण ताजी हवा मिळते आणि मला हवा हवासा वाटणारा एकांत मिळतो. प्रसिद्ध प्रवासी बर्टन म्हणतो, ‌‘‌‘ वाळवंटात तुमचे नैतिक धैर्य वाढते, तुम्ही उदारमतवादी होता. त्या तेथे एकांतवासात तुम्ही खरंच विचार करू लागता. एखाद्या श्वापदाचे अस्तित्वही किती आनंददायी असते हे मी सांगायला नको.‌’‌’ जे तार्तार प्रदेशातील कुरणांमधे भटकंती करतात ते म्हणतात, ‌‘‌‘ भटकंतीअखेर आम्ही जेव्हा परत लागवडीखाली आलेल्या जमिनीवर आलो तेव्हा त्या संस्कृतीग्रस्त समाजात उडालेल्या गोंधळात आमचा जीव घुसमटला. आम्हांला त्या वातावरणात श्वास घेणे कठीण होऊ लागले.‌’‌’ मला जेव्हा स्वतःचे मन रिझवायचे असते तेव्हा मी घनदाट अरण्याची वाट धरतो किंवा जेथे सामान्य माणूस जाण्यास बिचकतो अशा अफाट विस्तार असलेल्या पाणथळींना भेट देतो. मी पाणथळीत एखाद्या मंदिराच्या पवित्र गाभाऱ्यात प्रवेश करावा तसा प्रवेश करतो. पाणथळ म्हणजे निसर्गाचा गाभा आहे, निसर्गाच्या शक्तीचा स्रोत आहे. नवोढ्या पृथ्वीवर जंगलातील वृक्ष चादर ओढतात आणि मग ती जमीन वृक्षांसाठी आणि माणसांसाठी राहण्यायोग्य होते. शेतात जेवढी कुजलेली पाने घालाल तेवढे चांगलेच असते, त्याप्रमाणे माणसांच्या चांगल्या आरोग्यासाठी जेवढी कुरणे असतील तेवढे चांगलेच. गाव वाचते ते त्यात राहणाऱ्याया पुण्यवान माणसांमुळे नाही, तर गावाला वेढा घातलेल्या जंगलांमुळे आणि पाणथळींमुळे. ज्या गावाच्या भूमीवर प्राचीन जंगले आहेत आणि जमिनीखाली प्राचीन मुळांचे जाळे आहे अशा गावात फक्त पीकपाणी उत्तम असते असे नव्हे तर त्या भूमीत थोर कवी आणि तत्त्वज्ञानी जन्म घेतात. अशाच भूमीवर होमर आणि कन्फ्युशियससारख्यांनी आणि ऋशीमुनींनी जन्म घेतला आहे.

 प्राणीजगताच्या वाढीसाठी त्यांच्यासाठी जंगले राखणे अत्यंत आवश्यक आहे हे सगळ्यांनाच मान्य होण्यासारखे आहे. मी तेच माणसासाठीही म्हणतो. शंभर वर्षांपूर्वी बाजारपेठेत आपल्याच जंगलातील झाडांचे छिलके विकले जायचे. ज्याच्यापासून रंग तयार केले जायचे जे कातडी कमवणारे कारागीर वापरायचे. मला वाटतं त्यात जे तत्त्व वापरले जायचे त्याच तत्त्वानुसार माणसाचे विचारांचे तंतू टणक झाले असावेत. पण माझ्या गावाच्या भ्रष्ट भविष्यात लाकडाचे साधे छिलकेही मिळणेही दूरापास्त होणार आहे या कल्पनेनेच माझ्या अंगावर शहारे येतात.

ग्रीस, रोम आणि इंग्लंडसारखे देश हे कुजलेल्या प्राचीन जंगलांवर उभे आहेत आणि म्हणूनच तग धरून आहेत. जोपर्यंत माती संपत नाही तोपर्यंत ते तग धरून राहतील पण दुर्दैवाने माणसांच्या संस्कृतीबद्दल मात्र तसं म्हणता येत नाही. ज्या देशांना कुजणारी पाने संपली म्हणून आपल्याच वाडवडिलांची किंवा जनावरांची हाडे खतं म्हणून शेतात घालावी लागतात त्या देशांकडून कसली अपेक्षा ठेवणार ? 

क्रमशः

- थोरो

अनुवाद - जयंत कुलकर्णी

-

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 131
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

निव्वळ अप्रतिम अनुवाद. अमेरिकन ॲडव्हेंचरीजमच्या व्याख्या ज्यांच्या व्यतिकमत्वातून अभिव्यक्त झाल्या त्यातील एक ठळक नाव थोरो. प्रगल्भ आणि आशयघन असे हे अनुवाद अजूनच भावले. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.