Skip to main content

मुंबई निसर्ग निर्मित नाही!

लेखक मार्गी यांनी रविवार, 26/07/2026 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह 

✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली 

✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं 

✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप 

✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी! 

✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच! नमस्कार. 

आज २६ जुलै! २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेला महापूर कोण विसरू शकेल? आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा धडा त्या दिवशी आपल्याला मिळाला. अशी ही मुंबई आणि तिचा मुंबई स्पिरिट! पण मुंबई निसर्गनिर्मित नाही हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल? मुंबई हा ७ बेटांचा समूह आहे, हे अनेकांना माहिती असेल. माहिम, वरळी, परळ, लहान कुलाबा, कुलाबा, माझगांव आणि बाँबे ह्या नावांनी ती सात मुख्य बेटं ओळखली जात होती. पण ती बेटं एकमेकांना जोडलेली नव्हती. एकमेकांच्या जवळ होती पण एकसंघ नव्हती. पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटीश राजाला मुंबई बेट समूह मिळाल्यानंतर व्यापारी उद्देशाने ब्रिटीशांनी इथे पाय रोवले. बाजारपेठ, सुरक्षित बंदर व व्यापारी केंद्र ह्या त्यांच्या गरजेतून त्यांनी मुंबईचा विकास केला. ह्या बेटांवर वस्ती आधीपासून होती. कोळी, आगरी अशा वस्त्या होत्या आणि प्राचीन लेण्यासुद्धा ह्या बेटांवर होत्या. पण ही बेटं एकत्र नव्हती. पावसाळ्यामध्ये त्यांच्यामधला समुद्री संपर्क खंडित होत होता. हे शहर म्हणून विकसित करायचं तर इथे प्रवास आणि लोकांचं येणं- जाणं सोपं असलं पाहिजे ही‌ गरज होती. 

(माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत वाचता येईल. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.) 

ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल. 

त्यासाठी हळु हळु ब्रिटीशांनी इथे वेगवेगळे पूल (कॉजवे) बांधले आणि १७८३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील स्थानिक तत्कालीन गव्हर्नर विलियम हॉर्नबी ह्यांनी सगळी बेटं एकमेकांना जोडण्यासाठी प्रकल्प राबवला. पुढे चिकणमाती आणि गाळाची माती वापरून खाडी भरावाचं काम अनेक दशकं चाललं. १८३५ मध्ये सर्व बेटं जोडली तर गेलीच पण भराव आणि तटबंद्यांद्वारे समुद्राला मागे ढकलून आज दिसतं ते मुंबईचं स्वरूप मिळालं. खाड्या बुजवून सलग जमिनीचा पट्टा तिथे तयार करण्यात आला. काळाच्या ओघात पुढे ब्रिटीश सत्तेचं आणि नंतर भारतातलं प्रमुख आर्थिक केंद्र, अतिशय महत्त्वाचं शहर आणि पुढे आर्थिक राजधानी म्हणून मुंबई प्रसिद्ध झाली.

   

जमीन एकसंघ झाली तरी पाण्याचा निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग गेले. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती होऊन रस्ते व परिसर पाण्याखाली जाणं हे इथे तेव्हापासून नेहमीचंच. पुढे तर समुद्रामध्ये आणखी भराव घालून समुद्राला मागे केलं गेलं. रिक्लेमेशन म्हणून ओळखला जाणारा हा भाग! त्याबरोबर काळाच्या ओघामध्ये प्रचंड लोकसंख्या, शहरीकरण आणि पुढे तर ४०- ६० मजल्यांच्या इमारती ह्या मूळात वाळूच्या आणि खाडीच्या असलेल्या जागेवर आणि समुद्रावर उभ्या राहिल्या! मुंबई कितीही उच्च दर्जाचं शहर असलं आणि मुंबईची महत्ता फार मोठी असली तरी ह्या शहराला भविष्य नाही ही गोष्ट आता स्पष्ट आहे. अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी व वैज्ञानिकांनी मुंबई बुडण्याचे इशारे दिलेले आहेत. इतक्या प्रचंड लोकवस्तीचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं ओझं त्या ब्रिटीशकालीन भरावावर आहे हे विसरून चालणार नाही. शिवाय आज छोटी शहरंही एक- दोन दिवसांच्या पावसात पाण्याखाली येत आहेत. तिथे मुंबई तर समुद्राचंच आहे! आतून ते किती कमकुवत झालं असेल कोण सांगणार! आपलं क्षेत्र "रिक्लेम" करणं समुद्राला किती कठिण असेल? मुंबईचा खरा सत्ताधीश तोच तर आहे! 

मुंबईमध्ये तशीही मानवी प्रतिष्ठा मातीमोल आहे. लोक किडा- मुंगीसारखे जीव मुठीत धरून वावरतात. मुंबईला दोन शतकांचा इतिहास आणि विलक्षण असा वर्तमान आहे पण भविष्य नाही. आणि मुंबईच्याच वाटेवर कमी- अधिक प्रमाणात इतर शहरंही आहेत. तिथेही मानवी जीवनाची प्रतिष्ठा किती आहे हा प्रश्न आहे. तेव्हा ह्याविषयी सावध आणि सजग राहिलेलं चांगलं! 

-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 26 जुलै 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1009
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

पण मुंबई निसर्गनिर्मित नाही हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल? मुंबई हा ७ बेटांचा समूह आहे, हे अनेकांना माहिती असेल. माहिम, वरळी, परळ, लहान कुलाबा, कुलाबा, माझगांव आणि बाँबे ह्या नावांनी ती सात मुख्य बेटं ओळखली जात होती. पण ती बेटं एकमेकांना जोडलेली नव्हती. एकमेकांच्या जवळ होती पण एकसंघ नव्हती. पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटीश राजाला मुंबई बेट समूह मिळाल्यानंतर व्यापारी उद्देशाने ब्रिटीशांनी इथे पाय रोवले. बाजारपेठ, सुरक्षित बंदर व व्यापारी केंद्र ह्या त्यांच्या गरजेतून त्यांनी मुंबईचा विकास केला. ह्या बेटांवर वस्ती आधीपासून होती. कोळी, आगरी अशा वस्त्या होत्या आणि प्राचीन लेण्यासुद्धा ह्या बेटांवर होत्या. पण ही बेटं एकत्र नव्हती.

 

मुंबईचा इतिहास हा ब्रिटिश लोकांपासून सुरु होतो अशी एक गैरसमजूत आहे. मुंबई हे ब्रिटिश लोकांच्या कित्येक आधीपासून अत्यंत प्रसिद्ध व्यापाराचे केंद्र होते, बौद्ध धर्मचे एक प्रमुख स्थान होते. विविध विदेशी प्रवासी इथे येऊन गेले. Xaozhang सुद्धा इथे राहून गेला. गणेश, पशुपती, वैष्णव, बौद्ध, शकत विविध संप्रदायाच्या राज्यकर्त्यांनी इथे शासन केले.

पण त्याच्या आधी सुद्धा, प्राचीन काळा पासून इथे मानवी अस्तित्वाचे पुरावे मिळतात 


In reply to by साहना

@ साहना जी, बरोबर पण ते शहर "मुंबई" नव्हतं. ते सुप्पारक म्हणजे आजचं नालासोपारा. तिथे बुद्धांचा "पूर्ण" नावाचा शिष्य होता. परिसरातल्या सुप्पारक- ठाणे बंदर आणि कल्याणचेही उल्लेख आहेत. किंवा घारापुरीसारखी बेटं. पण आज जे शहर मुंबई आहे, ते नाही. 


In reply to by मार्गी

जुहूं, वाळुकेश्वर, तिथली बाणगंगा नदी अशा मुख्य मुंबईतल्या कित्येक ठिकाणांचा उल्लेख महिकावतीच्या बखरीत आहे की.


In reply to by प्रचेतस

बखर आपल्याला माहीम बंदरावरील भरभराटीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराबद्दल, मिठाच्या उत्पादनाबद्दल, ताडी काढणाऱ्यांबद्दल आणि (ठाण्यातील) घोडबंदर या घोड्यांच्या व्यापाराच्या मोठ्या केंद्राबद्दल सांगते. आपल्याला हेही कळते की, माहीम ही राजधानी असताना, मालाड आणि मारोल हे महत्त्वाचे प्रांत होते, ज्यांवर 'देसाई' किंवा 'देसाला' म्हणून ओळखले जाणारे राज्यपाल राज्य करत होते .

https://www.livehistoryindia.com/story/places/mumbais-hidden-history

@'माहिकवतीची बखर' 

वाचायलाच पाहिजे आता.कोणत्या प्रकाशनाची चांगली आहे ?


In reply to by Bhakti

मजकडे वरदा बुक्सची इतिहासाचार्य राजवाडेंनी केलेली संपादित महिकावतीची बखर आहे. आणि हीच सर्वात उत्तम आहे. राजवाडेंची प्रदिर्घ प्रस्तावना तर आवर्जून वाचण्यासारखी आहे. राजवाडेंनी केलेल्या संशोधनावर आधारीत इतर लेखकांनीही महिकावतीच्या बखरीवर संपादन केले पण मूळची सर त्यांना नाही.


मुंबईच्याच वाटेवर कमी- अधिक प्रमाणात इतर शहरंही आहेत.

खरंय, एवढ्यात कोणीतरी राजकारणी म्हणाले पुरंदर विकसित करून इथून पुढे पुण्यावर येणारा भार तिकडे वळवता येईल तेव्हा बरं वाटलं, प्रत्यक्षात काय होतंय माहिती नाही. 


मुंबई पुण्यावर येणारा भार कमी करायचा असेल तर उप्र आणि बिहारचा विकास करावा लागेल. तरच ते शक्य होईल.

 


सर्वांना धन्यवाद. खरं आहे. @ प्रचेतस जी, अजून माहिती देऊ शकाल का? जाणून घ्यायला आवडेल. धन्यवाद.


In reply to by मार्गी

प्रत्यक्ष महिकावतीची बखरच वाचा. बुकगंगावर छापील प्रत उपलब्ध नाही मात्र सह्याद्रीबुक्सवर उपलब्ध दिसते आहे.


घारापुरी (एलिफंटा बेट) येथील मोराबंदर गावात पुरातत्व विभागाने केलेल्या उत्खननात अत्यंत महत्त्वाचे दोन ताम्रपट सापडले आहेत, जे या बेटाचा प्राचीन इतिहास नव्याने समोर आणतात. पहिला ताम्रपट ५ व्या शतकातील असून तो त्रैकूटक घराण्याचा राजा महाराज इंद्रसेन याच्या काळातील आहे. या ताम्रपटाची नोंद राजघराण्याचे महासंधीविग्रहिक (परराष्ट्र मंत्री) 'मोमिक' यांनी केली असून, तो त्यांची प्राचीन राजधानी 'अनिरुद्धपूर' येथून जारी करण्यात आला होता. या लेखात राजाचे वडील नन्न-मल्लादास यांनी बांधलेल्या एका विशेष 'मंडपाचा' उल्लेख आहे, तसेच 'शंकरणारायण' (शिव आणि विष्णू यांचे एकत्रित रूप) यांच्या पूजेसाठी जमीन दान दिल्याचा ऐतिहासिक संदर्भ मिळतो.
 
दुसरा ताम्रपट ७ व्या ते ८ व्या शतकातील असून तो नवसारिका (नवसारी) येथील चालुक्य वंशाचा राजा जयश्रय मंगळरस याच्या काळातील आहे. या ताम्रपटावर "श्री जयश्रायाः" अशी अक्षरे कोरलेली शाही राजमुद्रा  स्पष्टपणे दिसते. हे ताम्रपट थेट उघड्यावर न सापडता, प्राचीन बंदराच्या एका गोदामापाशी दोन मोठ्या मातीच्या साठवणूक जारांमध्ये सुरक्षित लपवून ठेवलेले आढळले. या शोधामुळे आणि तिथे सापडलेल्या प्राचीन रोमन अ‍ॅम्फोरा व पर्शियन जारसारख्या वस्तूंमुळे हे सिद्ध होते की, घारापुरी हे केवळ लेण्यांचे धार्मिक केंद्र नव्हते तर १५०० वर्षांपूर्वीचे एक समृद्ध आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदर होते. या ताम्रपटांमुळे इतिहासकारांना खात्री पटली आहे की,ऐहोळेच्या प्रसिद्ध शिलालेखात पुलकेशी दुसरा याच्या 'पुरी' नावाच्या किनारी दुर्गाच्या विजयाचा उल्लेख आहे. काहींनी त्या 'पुरी'चा संबंध ओडिशाच्या 'पुरी'शी जोडला, तर नंतरच्या काळात काहींनी ती 'घारापुरी' असल्याचं म्हटलं. 

In reply to by Bhakti

Bhakti,

 

उत्तम माहिती. धन्यवाद. :-)

 

ज्या ताम्रपटांची चित्रे डकवली आहेत ते आधुनिक युगातले वाटतात. कापछिद्रे ( = पंचहोल्स ) पाडायचं तंत्रज्ञान तेव्हा अवगत होतं का, असा प्रश्न आहे. शिवाय त्या ताम्रपटांच्या कडा फारंच सरळसोट आणि कोपरे अतिशय काटकोनी वाटतात. असं तंत्रज्ञान भारतात पाचव्या ते आठव्या शतकात अस्तित्वात असेल तर ती अभिमानाची बाब आहे.

 

आ.न.,

-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

भारतात ही कला त्याकाळी अतिप्रगत असू शकते कारण ह्या कालखंडाच्या दीड दोन सहस्त्रक अगोदर सिंधू संस्कृतीच्या काळी असणाऱ्या एका लोथल नामे जगातील पहिल्या भरती ओहोटी आधारित "टायडल पोर्ट" वर एक मोत्ये आणि सागरी शिंपले/ मौल्यवान रत्नांच्या अभूषणांचं वर्कशॉप सापडलं होतं. तिथे सापडलेल्या मोत्यांच्या काही चारोळी इतक्या छोट्या वाटोळ्या गोलाकाराला बरोबर वेज पाडलेले सापडले होते. इतके precision drilling करायला tools कुठून अन् कशी उपलब्ध झाली असावीत हे समकालीन इतिहास अभ्यासातील एक महान रहस्य आहे.


In reply to by वृषभ खोंडे

वृषभ खोंडे,

 

माहितीबद्दल आभार. हे मोत्यांचं अभिछिद्रण ( = प्रीसिजन ड्रिलिंग ) की वेगळं काही तंत्र आहे? मला म्हणायचंय की मोती तयार होण्याच्या आधी शिंपल्यांत दोरा वगैरे ओवून त्यावर मोती वाढवला असेल? जे काही तंत्र असेल ते विस्मयकारक आहे हे नक्की.

 

आ.न.,

-गा.पै.