✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह
✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली
✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं
✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप
✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी!
✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच! नमस्कार.
आज २६ जुलै! २६ जुलै २००५ रोजी मुंबईत आलेला महापूर कोण विसरू शकेल? आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा धडा त्या दिवशी आपल्याला मिळाला. अशी ही मुंबई आणि तिचा मुंबई स्पिरिट! पण मुंबई निसर्गनिर्मित नाही हे आपल्यापैकी किती जणांना माहिती असेल? मुंबई हा ७ बेटांचा समूह आहे, हे अनेकांना माहिती असेल. माहिम, वरळी, परळ, लहान कुलाबा, कुलाबा, माझगांव आणि बाँबे ह्या नावांनी ती सात मुख्य बेटं ओळखली जात होती. पण ती बेटं एकमेकांना जोडलेली नव्हती. एकमेकांच्या जवळ होती पण एकसंघ नव्हती. पोर्तुगीजांकडून हुंडा म्हणून ब्रिटीश राजाला मुंबई बेट समूह मिळाल्यानंतर व्यापारी उद्देशाने ब्रिटीशांनी इथे पाय रोवले. बाजारपेठ, सुरक्षित बंदर व व्यापारी केंद्र ह्या त्यांच्या गरजेतून त्यांनी मुंबईचा विकास केला. ह्या बेटांवर वस्ती आधीपासून होती. कोळी, आगरी अशा वस्त्या होत्या आणि प्राचीन लेण्यासुद्धा ह्या बेटांवर होत्या. पण ही बेटं एकत्र नव्हती. पावसाळ्यामध्ये त्यांच्यामधला समुद्री संपर्क खंडित होत होता. हे शहर म्हणून विकसित करायचं तर इथे प्रवास आणि लोकांचं येणं- जाणं सोपं असलं पाहिजे ही गरज होती.
(माझ्या ब्लॉगवर हा लेख इंग्रजीत वाचता येईल. विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, सायकलिंग, फिटनेसबद्दलचे लेख वाचता येतील.)
ह्या लेखाचा व्हिडिओ सारांश इथे बघता येईल.
त्यासाठी हळु हळु ब्रिटीशांनी इथे वेगवेगळे पूल (कॉजवे) बांधले आणि १७८३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील स्थानिक तत्कालीन गव्हर्नर विलियम हॉर्नबी ह्यांनी सगळी बेटं एकमेकांना जोडण्यासाठी प्रकल्प राबवला. पुढे चिकणमाती आणि गाळाची माती वापरून खाडी भरावाचं काम अनेक दशकं चाललं. १८३५ मध्ये सर्व बेटं जोडली तर गेलीच पण भराव आणि तटबंद्यांद्वारे समुद्राला मागे ढकलून आज दिसतं ते मुंबईचं स्वरूप मिळालं. खाड्या बुजवून सलग जमिनीचा पट्टा तिथे तयार करण्यात आला. काळाच्या ओघात पुढे ब्रिटीश सत्तेचं आणि नंतर भारतातलं प्रमुख आर्थिक केंद्र, अतिशय महत्त्वाचं शहर आणि पुढे आर्थिक राजधानी म्हणून मुंबई प्रसिद्ध झाली.
जमीन एकसंघ झाली तरी पाण्याचा निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग गेले. त्यामुळे पावसाळ्यामध्ये पूर परिस्थिती होऊन रस्ते व परिसर पाण्याखाली जाणं हे इथे तेव्हापासून नेहमीचंच. पुढे तर समुद्रामध्ये आणखी भराव घालून समुद्राला मागे केलं गेलं. रिक्लेमेशन म्हणून ओळखला जाणारा हा भाग! त्याबरोबर काळाच्या ओघामध्ये प्रचंड लोकसंख्या, शहरीकरण आणि पुढे तर ४०- ६० मजल्यांच्या इमारती ह्या मूळात वाळूच्या आणि खाडीच्या असलेल्या जागेवर आणि समुद्रावर उभ्या राहिल्या! मुंबई कितीही उच्च दर्जाचं शहर असलं आणि मुंबईची महत्ता फार मोठी असली तरी ह्या शहराला भविष्य नाही ही गोष्ट आता स्पष्ट आहे. अनेक पर्यावरणतज्ज्ञांनी व वैज्ञानिकांनी मुंबई बुडण्याचे इशारे दिलेले आहेत. इतक्या प्रचंड लोकवस्तीचं आणि इन्फ्रास्ट्रक्चरचं ओझं त्या ब्रिटीशकालीन भरावावर आहे हे विसरून चालणार नाही. शिवाय आज छोटी शहरंही एक- दोन दिवसांच्या पावसात पाण्याखाली येत आहेत. तिथे मुंबई तर समुद्राचंच आहे! आतून ते किती कमकुवत झालं असेल कोण सांगणार! आपलं क्षेत्र "रिक्लेम" करणं समुद्राला किती कठिण असेल? मुंबईचा खरा सत्ताधीश तोच तर आहे!
मुंबईमध्ये तशीही मानवी प्रतिष्ठा मातीमोल आहे. लोक किडा- मुंगीसारखे जीव मुठीत धरून वावरतात. मुंबईला दोन शतकांचा इतिहास आणि विलक्षण असा वर्तमान आहे पण भविष्य नाही. आणि मुंबईच्याच वाटेवर कमी- अधिक प्रमाणात इतर शहरंही आहेत. तिथेही मानवी जीवनाची प्रतिष्ठा किती आहे हा प्रश्न आहे. तेव्हा ह्याविषयी सावध आणि सजग राहिलेलं चांगलं!
-निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 26 जुलै 2026.
मिसळपाव
प्रतिक्रिया
पण मुंबई निसर्गनिर्मित नाही…
मुंबईचा इतिहास हा ब्रिटिश लोकांपासून सुरु होतो अशी एक गैरसमजूत आहे. मुंबई हे ब्रिटिश लोकांच्या कित्येक आधीपासून अत्यंत प्रसिद्ध व्यापाराचे केंद्र होते, बौद्ध धर्मचे एक प्रमुख स्थान होते. विविध विदेशी प्रवासी इथे येऊन गेले. Xaozhang सुद्धा इथे राहून गेला. गणेश, पशुपती, वैष्णव, बौद्ध, शकत विविध संप्रदायाच्या राज्यकर्त्यांनी इथे शासन केले.
पण त्याच्या आधी सुद्धा, प्राचीन काळा पासून इथे मानवी अस्तित्वाचे पुरावे मिळतात