Skip to main content

धर्म, देश आणि सोयीची व्याख्या!

लेखक अनिशासूत यांनी रविवार, 19/07/2026 09:48 या दिवशी प्रकाशित केले.

​आज सोशल मीडिया स्क्रोल करताना एका व्हिडिओवर काही कमेंट्स वाचल्या आणि डोके भणभणून गेले. देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्काच्या आंदोलनाला किंवा त्यांच्या मागण्यांना थेट 'देशविरोधी' किंवा 'धर्मविरोधी' ठरवण्याचा एक नवा ट्रेंड सध्या जोरात सुरू आहे. अशाच एका कमेंटमध्ये कुणीतरी लिहिले होते, "हा आमच्या देश आणि धर्माच्या विरोधात जाणारा आहे, त्यामुळे आमचा अजिबात पाठिंबा नाही." ​हे वाचून मला पडलेला प्रश्न अगदी साधा आहे, भावांनो, तुमचा 'धर्म' आणि 'देश' म्हणजे नेमकं काय रे? ​हा प्रश्न पडण्यामागे माझी एक जुनी आठवण आहे. २०२४ मध्ये जेव्हा मी हॉस्टेल जॉइन केलं होतं, तेव्हा तिथं माझा एक मित्र झाला. असाच एकदा मी रूमवर बसून ध्रुव राठीचे विश्लेषणात्मक (Analytical) व्हिडिओ पाहत होतो. ते पाहून तो मित्र अचानक भडकला आणि मला थेट 'देशद्रोही' म्हणून मोकळा झाला! ​माहितीचे विश्लेषण करणारे व्हिडिओ पाहणं म्हणजे देशाच्या विरोधात जाणं कसं काय असू शकतं, हे मला आजवर न सुटलेलं कोडं आहे. पण त्या क्षणी मी मनोमन खूप हसून घेतलं होतं. कारण, ज्या हिंदू धर्माचा आणि संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखं तो वागत होता, त्या धर्माचा पाया असणारी 'संस्कृत' भाषा मला अवगत आहे. अनेक क्लिष्ट स्तोत्रं मला अगदी शुद्ध उच्चारांसहित मुखोद्गत आहेत. पण तरीही, केवळ एका व्हिडिओवरून मी त्याच्या नजरेत 'देशद्रोही' ठरलो होतो! ​ज्यांना फक्त उथळ घोषणाबाजीत आणि द्वेषातच धर्म दिसतो, त्यांना मूळ संस्कृतमधील धर्माची व्याख्या तरी ठाऊक आहे का? महाभारताच्या कर्णपर्वात (६९.५९) धर्माचे मूळ लक्षण सांगताना स्पष्ट म्हटले आहे: ​धारणात् धर्ममित्याहुः धर्मो धारयते प्रजाः। यत् स्याद् धारणसंयुक्तं स धर्म इति निश्चयः॥ ​याचा सरळ अर्थ असा की, 'जो समाजाला एकत्र धरून ठेवतो, जो प्रजेचे (माणसांचे) कल्याण करतो आणि व्यवस्था टिकवतो, तोच खरा धर्म!' ​लोकांमध्ये फूट पाडणं, प्रश्न विचारणाऱ्या तरुणांच्या विचारांना देशद्रोही ठरवणं आणि समाजात द्वेष पसरवणं हा धर्म नसून निव्वळ 'अधर्म' आहे. हे समजायला कोणत्याही आयटी सेलच्या गाईडलाईन्सची किंवा प्रोपगंडाची गरज नाही. कर्मकांडाला, अंधश्रद्धेला आणि भेदभावालाच जर तुम्ही देव, देश आणि धर्म समजत असाल, तर मग देव आणि देश वाचवायची नाही, तर आधी तुम्हाला स्वतःला सुधारण्याची गरज आहे. ​काही लोकांना वाटते की केवळ सण-उत्सव साजरे करणे, उथळ घोषणाबाजी करणे आणि स्वतःच्या विचारांशी असहमत असणाऱ्यांवर 'देशद्रोही'चा शिक्का मारणे म्हणजेच देशप्रेम! जर तुमच्या व्याख्या इतक्या संकुचित असतील, तर तुमचा पायाच कच्चा आहे. जेव्हा देशातला तरुण, विद्यार्थी आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतो, किंवा एखादा सुजाण नागरिक प्रश्न विचारतो, तेव्हा त्याला थेट कोणत्यातरी विशिष्ट चौकटीत बसवून मोकळे होणे, हा निव्वळ बौद्धिक दिवाळखोरीचा प्रकार आहे. ​धर्माचा आणि देशाचा अभिमान असणे चांगलीच गोष्ट आहे, पण त्या अभिमानाचे रूपांतर जेव्हा आंधळ्या अहंकारात आणि दुसऱ्यांबद्दलच्या द्वेषात होते, तेव्हा तो 'अभिमान' उरत नाही, ती एक विकृती बनते.

 ​विशेष सूचना आणि स्पष्ट इशारा: 

हा लेख वाचून ज्यांच्या पोटात दुखणार आहे, किंवा ज्यांना आपल्या संकुचित चौकटीबाहेरचा विचार पचनी पडत नाही, त्यांनी कृपया दूर राहावे. जे केवळ कर्मठ, बुरसटलेल्या, संकुचित मानसिकतेचे आहेत आणि जे इथे निव्वळ वाहवाही करायला किंवा उथळ घोषणाबाजी करायला येणार आहेत, त्यांनी मुळीच आपल्या घाण विचारांचे दर्शन कमेंट बॉक्समध्ये देऊ नये. हा मंच वैचारिक देवाणघेवाणीसाठी आहे, तुमच्या पूर्वग्रहांचा कचरा टाकण्यासाठी नाही. 

​मुळात मला आज इथल्या सुजाण वाचकांना विचारायचे आहे: तुमच्या मते धर्म आणि देशप्रेमाची खरी व्याख्या काय असावी? 

ती सर्वसमावेशक असावी की केवळ काही ठराविक लोकांच्या सोयीची?

लेखनविषय:

वाचने 239
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

पुस्तकी परिभाषा - देशाचे सार्वभौमत्व, एकता आणि घटनात्मक कायदे जोपासणे म्हणजे देशभक्ती ! त्यासाठी रस्त्यावर थुंकले नाही तरी चालते, इन्कम टॅक्स वेळेवर भरला तरी चालते, राजकीय तळ्या उचलल्या नाही तरी चालते. मुद्दे आधारित बोलणे, राजकीय विचार जास्त जीवाला न लावून घेणे, हे काही added advantages असतील. आमच्या आडात नागरिकशास्त्र नाही अन् आम्ही पोहऱ्यात राजकारण आणू पाहतोय हेच आमचे दुर्दैव.


अवांतर :

 

आयशप्पत ! तुम्ही येशूला मानता की पोपला असा प्रश्न कुणी ख्रिश्चनांना विचारीत नाही. तुमचा खलिफा कोण हा प्रश्न मुस्लिमांना कोणी विचारीत नाही. साम्यवाद आणि समाजवाद यांतला नेमका फरक काय हे कोणीही डाव्यांना विचारीत नाही. 

 

पण देशप्रेम आणि धर्मप्रेम म्हणजे काय याची डोस्केफोड मात्र हिंदूंनी करायची. इ कौणसा इण्साफ हुवा जी ? ज्यांनी घास घेतला त्यांच्या तोंडचा वास घ्यावा जी.

 

-गा.पै.


> पण देशप्रेम आणि धर्मप्रेम म्हणजे काय याची डोस्केफोड मात्र हिंदूंनी करायची. 

ख्रिस्ती धर्मांत ख्रिती लोकांनीच आपल्या धर्म आणि विश्वासावर प्रचंड टीका, चिंतन लेखन केले आहे. त्यातून अनेक विविध ख्रिस्ती संप्रदाय तसेच पराकोटीचे नास्तिक निर्माण झाले आहे. आत्मचिंतन, आत्मभिमुखता कुठल्याही विचारसरणी साठी चांगलीच आहे.

साम्यवाद आणि समाजवादातील फरक ह्यावर त्याच लोकांनी विपुल लेखन केले आहे. माझ्या सारख्या भांडवलशाही पुरस्कर्तीला दोन्ही सेम वाटतात.

-- 

Patriotism is the last refuge of a scoundrel. - सॅम्युएल जॅक्सन १७७५ 

-- 

 

चला ध्रुव राठी पाहायचा नाही (मला तो चिप आणि मूर्ख वाटतो) तर मग भारतीय सरकार आणि त्याच्या पॉलिसी ह्यांच्यावर टीकात्मक काही वाचायचे आहे, पाहायचे आहे तर राष्ट्रप्रेम approved असे काय आहे ? जसे हलाल सर्टिफिकेट असते तसे देशप्रेम सर्टिफिकेट सुद्धा ह्या मंडळींनी काढावे सोपे पडेल ! 

 

 


In reply to by साहना

साहना,

 

तुम्हांस भारतीय सरकार आणि त्याच्या धोरणांवर टीकात्मक काही वाचायचं असेल वा लिहायचं असेल तर त्यासाठी राष्ट्रप्रेमाचा शिक्का कशास्तव हवा? नसला तरी काय बिघडतं?

 

कोणी माझ्यावर अंधभक्त म्हणून छाप मारला तर मारला. माझ्या अंगास काय भोकं पडतात का? हे विधान कुठल्याही छापास लागू पडतं.

 

आ.न.,

-गा.पै.


मी बरेच म्हंजे बरेच वर्ष मिपा वर असून केवळ वाचनमात्र होतो , पण हे भाऊ फक्त आपल्यालाच सगळं माहित आहे आणि आपल्या मताशी सहमत नसरणारे  सगळे म्हणजे  केवळ कर्मठ, बुरसटलेल्या, संकुचित मानसिकतेचे आहेत आणि मिपावर राहण्याच्या त्याना अधिकार नाही असेच लिहीत आहेत

भाऊ जर तू म्हणतोस "हा मंच वैचारिक देवाणघेवाणीसाठी आहे" तर दुसर्याने काही लिहले कि इतका उचकतोस का ??

आता मूळ मुद्याकडे

आंदोलन (Andolan) म्हणजे एखाद्या विशिष्ट सामाजिक, राजकीय, आर्थिक किंवा पर्यावरणीय ध्येयासाठी किंवा बदलासाठी लोकांच्या समूहाने एकत्र येऊन केलेली संघटित व शांततापूर्ण कृती. हे सामान्यतः अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी, हक्क मिळवण्यासाठी किंवा जनमत तयार करण्यासाठी उभारले जाते.


देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या सर्वांना  एकत्र करून त्याच्या मार्फत तरुणांना भडकावणे 
फक्त हिंदू धर्मातील देवदेवतांची टिंगल करण्याचा आणि एका अशांतिप्रिय धर्माचे गुणनगण गाऊन त्याचा धर्मप्रसार (??) करणे
एखाद्या समाजसेवकाला (??) पुढे उपोषणाला बसवून , त्याच्याच पुढ्यात जेवणावर आडवा हात मारणे
तरुणांना उन्हात बसवून आपण फाईव्ह स्टार मध्ये राहणे आणि शिफ्ट ला आल्यासारखे भेट देऊन जाणे

असले धंदे कोणी करत असेल तर तुमचा आंदोलन सुरु करण्याचा हेतू कितीही उद्दात्त असला तर लोक नावं ठेवणारच , त्यातून आपले आंदोलन सरळ मार्गावर न्यायाचे कि जो कोणी नाव ठेवेल किंव्हा प्रश्न विचारेल तो लगेच सरकारचा गुलाम ह्या चौकटीत बसवून मोकळे व्हायचे , जर तुमच्या व्याख्या इतक्या संकुचित असतील, तर तुमचा पायाच कच्चा आहे.

देशविरोधी वक्तव्ये करून फूट पडणे, तुमच्या आंदोलनाची दिशा काय किंव्हा तुमच्या नेमक्या मागण्या काय असा  प्रश्न विचारणाऱ्या तरुणांच्या विचारांना सरकारचे गुलाम ठरवणे आणि समाजात द्वेष पसरवणं हे`आंदोलन नसून निव्वळ लोकशाहीचा मांडलेला खेळ (तमाशा ??) आहे. हे समजायला कोणत्याही आयटी सेलच्या गाईडलाईन्सची किंवा प्रोपगंडाची गरज नाही.

मुळात मला आज इथल्या सुजाण वाचकांना विचारायचे आहे: तुमच्या मते "देशातल्या विद्यार्थ्यांच्या, तरुणांच्या हक्काच्या आंदोलनालाची " खरी व्याख्या काय असावी?  ती सर्वसमावेशक असावी की केवळ काही ठराविक लोकांच्या राजकारणात उतरण्याचा सोयीची?

आता मला लगेच अंधभक्त्त वैगेरे ठरवू नकोस , मला अंधभक्त्त , आपटार्ड , चमचे , गुलाम, सतरंजी उचले हे सगळे एकाच लेव्हलचे वाटतात.