Skip to main content

सी पी बेरार सर्किट

लेखक गवि यांनी बुधवार, 18/02/2026 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक माझ्या लहानपणीचा भूगोल आठवला. आमचा रत्नागिरी जिल्हा तेव्हा, .. तेव्हा म्हणजे १९७० आणि १९८० च्या दरम्यान,.. पार गोव्याला जाऊन टेकला होता. देवगड हापूस आणि रत्नागिरी हापूस हे एकाच जिल्ह्यातले होते. भूगोलाच्या "आपला जिल्हा" शिकवणाऱ्या एका शालेय वर्षात आमचा रत्नागिरी जिल्हा म्हणजे नकाशातला एक लांबलचक उभट पट्टा होता. सिंधुदुर्ग जिल्हा झाला आणि तळकोंकण अशी वेगळी आयडेंटिटी गडद झाली. माझ्या रम्य बालपणी आम्ही रोज शाळेत पोचताच प्रार्थना म्हणण्यापूर्वी "प्रतिज्ञा" म्हणायचो. त्या माझ्या भारत देशात, ज्यावर माझं प्रेम आहे, ज्याच्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मी पाईक आहे, त्या देशात तेव्हा २२ राज्यं आणि ९ केंद्रशासित प्रदेश होते असं मला आठवतं. अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि गोवा ही त्यावेळी राज्यं झालेली नव्हती. दिल्ली पण. हे सर्व केंद्रशासित प्रदेश होते. "गोवा दमण दीव" ऊर्फ "गो.द.दी." हा मिळून एकच केंद्रशासित प्रदेश. नकाशावर गोवा कुठे, दीव कुठे आणि दमण कुठे..!! पण आम्ही बच्चे लोक ते एकच आहेत हे स्वीकारायचो. आमच्या दैनंदिन जीवनात, म्हणजे काजूची बोंडे चोखणे किंवा पर्ह्यातले बारके मासे पिशवीत पकडणे यात, त्याने काय फरक पडत होता? मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार ही भलीथोरली पसरलेली भव्य राज्यं. जगातल्या अनेक देशांपेक्षा आकाराने मोठी होती. त्यावेळी. मधल्या काळात बघता बघता वयाची पन्नाशी आली आणि बघता बघता नवीन राज्यंही तयार झाली, जिल्हे फुटले, "केंद्रशासित"ची राज्यं बनली आणि राज्यांचे "केंद्रशासित" बनले. आता २८ राज्यं आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत असं दिसलं गूगललं तेव्हा. हे सर्व नॉस्टॅल्जिक पुराण आता का आठवावं? तर पुढच्या मजकुराला प्रस्तावना हवी ना. थेट मुद्द्याला हात घालायचा म्हणजे कायतरीच. पुन्हा एकदा सुकाणू मूळ विषयाकडे आणतो. तर .. नुकतंच एका ठिकाणी फिल्म डिस्ट्रिब्यूशन ऊर्फ चित्रपट वितरणाच्या प्रदेशांविषयी वाचलं. त्यातली दुर्बोध नावं बघून कळेचना की या कोणत्या टेरिटरीज बुवा ? मला वाटलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यावर यथावकाश जी भाषावार प्रांतरचना झाली त्यानुसारच या सिनेमा वितरणाच्या टेरिटरीजसुद्धा असतील. पण यांची नावे पाहतो तर, "निझाम टेरिटरी", "सीपी अँड बेरार" वगैरे. बेळगाव हे महाराष्ट्रातल्या बऱ्याच जिल्ह्यांच्या सोबत. बॉम्बे टेरिटरी ही एक मोठी प्रसिद्ध. शोध घ्यायला लागलो तर दिसलं की अगदी आजही याच टेरिटरीज त्याच जुन्या काळच्या नावांसहित चित्रपट वितरणाच्या धंद्यात टिकून आहेत. तो धंदा अजूनही त्या काळच्या भूगोलात गोठला आहे. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याचं काम आहे त्या प्रकारे उत्तम चाललं आहे. उलट आता त्यात उगाच बदल करणं हे जास्त अडचणीचं आहे. म्हणतात ना की देअर इज नो प्रॉब्लेम टू सॉल्व्ह फॉर देम. भारतात फिल्म डिस्ट्रिब्यूशन व्यवसायात टेरिटरीसाठी आजही "सर्किट्स" ही संकल्पना वापरली जाते, जी घटनेनुसारच्या, राजकीय राज्यांच्या सीमांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. १९५० मध्ये "सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार" (C.P. Berar) हे "राज्य" (?) संपुष्टात आलं. १९५६ मध्ये भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती झाली. पण चित्रपट वितरणात अजूनही सीपी बेरार जिवंत आहे. त्यात महाराष्ट्राचा विदर्भ भाग, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचा काही भाग येतो. चूकभूल देणे घेणे. मराठी सिनेमे या टेरिटरीत चांगले चालतात. आणखी एक असेच सर्किट, "निजाम सर्किट". यामध्ये तेलंगणा आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्याचा भाग येतो. इथेही मराठी सिनेमे चांगला धंदा करतात. देश बदलला, नकाशावर रेषा बदलल्या, पण चित्रपट वितरकांनी आपली जुनी पाळंमुळं उखडली नाहीत. ते बदलले नाहीत. आजही "बॉक्स ऑफिस"चे आकडे मोजताना विदर्भ हा महाराष्ट्राचा भाग न धरता सीपी बेरारचा भाग मानला जातो. रोचक भाग असा की ही सर्किटस फक्त मेजॉरिटी लोकांची भाषा हा एकच क्रायटेरिया न मानता प्रेक्षकांच्या आवडीनिवडीवर ठरलेली आहेत असं मला वाटतं. म्हणजे कदाचित, विदर्भातल्या प्रेक्षकांचा आवडता "सिनेमा टाईप", किंवा अभिरुची म्हणू.. मुंबईपेक्षा वेगळी असू शकते, म्हणूनच ते अजूनही स्वतंत्र सर्किट म्हणून ओळखलं जात असू शकेल. राज्यांच्या रेषा आखून तिथल्या माणसांचे सगळेच चॉईसेस बदलत नसतात. आजच्या आधुनिक भारतात चित्रपट व्यापार आजही ब्रिटीशकालीन आणि संस्थानकालीन नकाशावर चालतो हे मला तरी रोचक वाटलं. आणि बॉम्बे टेरिटरी या नावावरून लहानपणी कोणाकडून तरी ऐकलेलं वाक्यही आठवलं, "कापडं काय बॉम्बेवरून आणली का?" तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. नॉस्टॅल्जियाला आताशा* कोण विचारतो!? आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून बोलत राहू.. * तळटीप: आताशा..!!! छे... च्यायला वय झालं राव..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7123
प्रतिक्रिया 132

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

ज्ञानसमृद्ध प्रतिसाद. धन्यवाद. याविषयी खरेतर स्वतंत्र लिहायला हवे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताची भागोलिक समज. आजकाल ऐतिहासिक चित्रपट दाखवतात तेव्हा शिवराय किंवा एखादा खान खलबते करत असताना टेबलवर चक्क त्यांच्यापुढे नकाशा वगैरे मांडलेला असतो आणि ते त्यात लाकडाचे घोडे वगैरे सरकवून स्ट्रॅटेजी हाकतात. तेव्हा मला प्रश्न पडायचा की यांना समुद्र कुठून कुठे आहे हे तरी कसे कळायचे. कारण कार्टोग्राफर ही एक अतिशय महत्त्वची गोष्ट असणार तेव्हा शिवरायांनी तशा माणसाला अतिशय उच्च पद दिले असेल इंदलकर सारखे.

याबरोबरच लहानपणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाकेंद्र ओरोस बुद्रुक आहे. सिंधुदुर्गचे जिल्हाकेंद्र मालवण का नाही? ओरोस का निवडले? जिल्ह्यांना राजधान्या नसतात म्हणून आपल्या पंप्रंची चेष्टा झाली होती तेव्हा जाणवले आपल्या कडे सुद्धा जिल्ह्याच्या केंद्रांना शब्दच नाही आहे. राजधानी म्हणायला काही हरकत नाही. तरीही ओरोस कडे कुणाचे विषेश लक्ष जात नाही. आता तर तिथे मोठे सरकारी मेडिकल कॉलेज देखील आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

नावाच्या गावात कलेक्टर ऑफिस आणि जिल्हा रुग्णालय सोडून काहीही नाही. हे गाव अजिबात वाढले नाही. कुडाळ बरेच मोठे झाले आहे असे दिसते. मालवण देखील बरेच मोठे आहे. मग या ओरोस मधे जाते तरी कोण? त्या जिल्हा रुग्णालयाचा काही उपयोग आहे का? कुणाच्या डोक्यात आले होते हे ओरोस चे?

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोसजवळून आता हातखंबा गोवा महामार्ग गेला आहे. याच गावाला स्वतःचे रेल्वे स्टेशन आहे. पश्चिमेला रेल्वे स्टेशन आणि पूर्वेला हायवे. त्यांच्या मधे एक गाव. या गावात जिल्हापरिषदेपासून सगळी जिल्ह्याची मुख्य ठिकाणे आहेत. या गावात 2021 ला सरकारी मेडिकल कॉलेज झाले आहे. याच गावाजवळ अजून एक मेडिकल कॉलेज आहे. या गावात एक मोठे तळे असून गावाला पाणी पुरवठा भरपूर आहे. या गावात एक इंजिनियरिंग कॉलेज आहे. हे गाव भविष्यात चांगले वाढू शकते त्यामुळे ओरोस या ठिकाणी गुंतवणूक करण्यास चांगला वाव आहे. इथे गुंठामंत्री होणे सध्या शक्य वाटते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

ओरोस का? कुडाळ किंवा मालवण किंवा कणकवली का नाही वगैरे प्रश्न पुरातन काळापासून पडलेले आहेतच.

In reply to by गवि

ओरोस अगदी सेंटरला आहे. आधी वळणे वळणे म्हणून अंतर जास्त त्यात एका टोकाला केंद्र नको म्हणून निवडलेले दिसते. शिवाय लँड घेणे हा प्रोब्लेम इतर शहरात येतोय असे दिसतेय.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

माझ्या माहितीप्रमाणे ओरोस बुद्रुक या गावाला राजधानी बनवण्याचे कारण राजधानी बनवण्यावर असलेले वाद. यात कणकवली, मालवण कुडाळ आणि सावंतवाडी अशा चारही ठिकाणच्या स्थानिक नेत्यांना आपल्याच शहरात राजधानी हवी होती. यावर तोडगा म्हणून चारही ठिकाणच्या मध्यभागी असलेले आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आणि मुंबईत गोवा रेल्वे मार्गावर असलेले ओरोस बुद्रुक हे गाव निवडण्यात आले. मालवण आणि सावंतवाडी पासून दोन्ही (रस्ता आणि रेल्वे मार्ग) तसे लांबच होते शिवाय सरकारी कार्यालयांसाठी भरपूर जमीन हवी होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. यामुळे ओरोस बुद्रुक हे गाव निवडले आणि मालवण जवळ असलेला समुद्रातील किल्ला सिंधुदुर्ग यावरुन गावाचे नाव सिंधुदुर्ग नगरी आणि जिल्ह्याचे नाव सिंधुदुर्ग ठेवण्यात आले. एकदा सरकारी कार्यालये आली कि शहर वसतेच. कारण जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस मुख्यालय, आर टी ओ, जिल्हा रुग्णालय, जिल्हा आणि सत्र न्यायालय अशी कार्यालये आली आणि त्याच्या अनुषंगाने पायाभूत सुविधा निर्माण झाल्या कि वस्ती होतेच

भारताचा नकाशा डोळ्यासमोर आणला तर बिहार आणि बंगाल यांना उत्तर भारतात का धरतात आणि मेघालय वगैरे यांना पूर्वेकडेची राज्ये न म्हणता इशान्येकडेची का म्हणतात हा गोंधळ मला नेहमी होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

यासदृश एक आणखी निरीक्षण माझंही आहे. अंदमान निकोबार बेटे ही सांस्कृतिक दृष्ट्या काही प्रमाणात ओरिजनल असली (उदा. आदिवासी) आणि तिथली आधुनिक संस्कृती ही भारतातल्या अनेक भागातल्या लोकांची संस्कृती- सरमिसळ असली, तरी अनेकदा व्यवहारात, नियोजनात, कंपन्या किंवा संस्थांच्या विभागीय वाटणीत, शाखांचे मुख्य ऑफिस कुठे, या दृष्टीने अंदमान हे चेन्नईपेक्षा कोलकत्याशी जास्त जोडलेलं दिसतं. अंदमानातून बाहेर पडलेले लोक कोलकात्यात चेन्नईपेक्षा जास्त दिसतात आणि सांस्कृतिकदृष्ट्या देखील पश्चिम बंगालशी अधिक जवळचे असतात. इतर कोणाचं निरीक्षण अगदी विरुद्ध देखील असू शकतं. माझ्याकडे मोठा विदा नाही.

स्पेनचे एक शहर आफ्रिका खंडात आहे- त्या शहराचे नाव आहे सेयुटा. सौदी अरेबियामध्ये इस्लामचा उदय झाल्यानंतर अरबांनी हल्ले सुरू केले. जॉर्डन-पॅलेस्टाईन ओलांडून ते आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात घुसले. त्यातून ते आफ्रिका खंडाच्या पश्चिमेला असलेल्या मोरोक्कोपर्यंत पोचले. तिथून जिब्राल्टरचा समुद्र ओलांडला की स्पेन येते. ते स्पेनमध्येही घुसले. त्यांना स्पॅनिश लोक मूर म्हणायचे. त्या मुस्लिम आक्रमणाविरोधात स्पेनचे लोक जवळपास ५०० वर्षे लढत होते आणि त्यांनी १४९२ मध्ये मूरांना हाकलून दिले. १४१० मध्ये स्पेनमधील एका राजपुत्राने सध्या पोर्तुगाल आहे तो प्रदेश मुक्त केला आणि तिथे पोर्तुगाल या नव्या राज्याची स्थापना केली. त्यापूर्वी पोर्तुगाल असा वेगळा देश नव्हता. तिथे हेनरी म्हणून राजा होता. युरोपातून भारत आणि दक्षिणपूर्व आशियाबरोबर व्यापार चालायचा त्या व्यापार मार्गावर मुस्लिमांचे वर्चस्व होते तसेच कॉन्स्टॅन्टीनोपल (आताचे इस्तंबूल) मार्गे आलेला माल इटलीतील व्हेनिस आणि जिनोआमार्गे युरोपात जायचा तेव्हा त्या व्यापारावर इटालीयनांचेही वर्चस्व होते या गोष्टी स्पॅनिश आणि पोर्तुगीज ख्रिश्चनांना डाचत होत्या. त्यामुळे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधून काढायचे प्रयत्न त्या हेनरी राजाने सुरू केले. त्यामुळे त्याला हेनरी द नेव्हिगेटर असेही म्हणतात. त्यात धार्मिक अँगल पण होतात- मुस्लिमांचे वर्चस्व खिश्चनांना डाचत होते. त्यामुळे हेनरी द नेव्हिगेटरने युरोपिअन देशांनी केलेली पहिली समुद्र मोहिम काढली आणि सेयुटा या मोरोक्कोतील शहरावर नियंत्रण मिळवले. ही गोष्ट १४१५ ची. त्यानंतर १४८० मध्ये पोर्तुगाल आणि स्पेनचे एकीकरण झाले आणि सेयुटावर स्पॅनिशांचे नियंत्रण प्रस्थापित झाले. १५४० मध्ये परत पोर्तुगाल वेगळा झाला तरीही सेयुटावर स्पेनचे नियंत्रण कायम राहिले- आजही आहे. खालील नकाशात सेयुटा स्पेनच्या जवळ आहे हे दिसेल. Ceuta या नकाशावरून आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताकडे जायचा समुद्रीमार्ग शोधायच्या उद्योगात पोर्तुगीज लोक पुढे का होते. त्याचे कारण पश्चिमेकडे अटलांटिकचा अ‍ॅक्सेस त्यांना जवळ होता आणि आफ्रिका खंडही जवळ होता. तीच गोष्ट स्पॅनिश लोकांची. त्यामानाने इंग्लंड बरेच लांब आहे. त्यामुळे भारतात युरोपिअनांनी हातपाय पसरायला सुरवात केली त्या काळात पोर्तुगीज दिसतील- मग फ्रेंच आणि शेवटी ब्रिटिश. त्याचे कारण या भूगोलात दडले आहे. त्यात इटालियन, ग्रीक आणि जर्मनांचे नावही दिसणार नाही. त्याचे कारणही हा नकाशा बघून समजेल. इटली आणि ग्रीसला अटलांटिकचा डायरेक्ट अ‍ॅक्सेसच नाही कारण भूमध्य समुद्र आणि आजूबाजूचे जमिन यातून जहाजे जाणार कुठून? जर्मनीला थोडासाच अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे पण त्या भागात कदाचित चांगले बंदर असायला परिस्थिती अनुकूल नसावी. त्या तुलनेत डच लोक भारतात पोचले आणि इंडोनेशियातही पोचले. कारण नॉर्थ सी मधून त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस आहे. तीच गोष्ट डेन्मार्कची. ते मर्यादित प्रमाणात का होईना भारतात पोचले. कारण त्यांना अटलांटिकचा अ‍ॅक्सेस होता. इतिहास वाचताना असा भूगोलही बघितल्यास अशा बर्‍याच गोष्टींचा उलगडा होतो.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

ह्या वरून आठवले , अब्दालीसारखा नदीचा उतार शोधत आमचा एक मित्र खडवलीच्या काळू नदीत घसरून पडला होता

ब्रिटीशांच्या काळातील मुंबै प्रोविन्स शोधत असताना तो फार मोठा होता असे ऐकले. नुकतेच कुठे तरी वाचले की ब्रिटीश मुंबई प्रोव्हिन्स हे ओमान पर्यन्त होते.

In reply to by खटपट्या

नौदल पश्चिम विभाग (मुख्यालय :मुंबई) ह्यांच्या अखत्यातातील भागात अजूनही बहुदा एकच पोलीस स्टेशन आहे. नौदलातील नागरी तक्रारांसाठी/गुन्ह्यांसाठी येथे गुन्हा नोंदवला जातो. त्याची हद्द गुजरात खंबात पासून अगदी केरळ, कन्याकुमारीपर्यंत आहे. नक्की नाव आणि संदर्भ आठवत नाहीये. मिळाले कि बाकी पोस्ट करतो.

In reply to by अनिकेत वैद्य

२६/११ चा हल्ला झाल्यानंतर भारताने मरीन पोलिसिंग कॉन्सेप्ट अजून घट्ट करायला मरीन पोलिस इत्यादी स्थापन केले (आणि राज्यांना पण तशा सूचना केल्या कारण पोलिस हा राज्य सूची विषय आहे) त्यात परत कोस्टल सिक्युरिटी स्कीम वगैरे आणली, त्याचा आता तिसरा फेज लागू करण्याचे चालू आहे, सुरक्षा कारणांसाठी जास्त खोलात तर मला जाता येणार नाही पण सागरी सुरक्षेत तीन स्तर असतात पहिले काही सागरी मैल मरीन पोलिस/ कस्टम्स, नंतर कोस्ट गार्ड अन् सगळ्यात बाहेर नौदल. आधी प्रत्येक राज्यात एक एक येलो गेट पोलिस स्टेशन स्थापन केले गेले होते मुंबईत ते इंदिरा डॉक जवळ आहे पी डिमेलो रोड सिन्दुर ब्रीज (जुना कार्नक ब्रीज संपतो तिथे इंदिरा डॉक फायर स्टेशनच्या शेजारी) , महाराष्ट्रात सागरी हद्दीत काही विशिष्ट सागरी मैलाच्या आत जर एखाद गुन्हा झाला तर त्याची तक्रार नोंद तिथे होते. आता अर्थातच हाय सी वर गुन्हा घडला तरी त्या गलबताला किनाऱ्यावर यावेच लागणार , किंवा कोस्ट गार्ड ने जरी काही कॉन्ट्रबँड पकडले, किंवा VBSS करून काही माणसे धरली तरी शेवटी ती माणसे किनाऱ्यावर आणावीच लागतात, त्यांच्यासाठी सिंगल पॉईंट म्हणजे येलो गेट. अर्थात नंतर येलो गेटच्या मदतीला मरीन पोलिस स्टेशन (सागरी पोलिस ठाणे) अशी शृंखला पण सुरू करण्यात आली आहे, बेलापूर नवी मुंबई मध्ये किल्ल्याजवळ असेच एक सागरी पो स्टे आहे, रत्नागिरीला पण आहे. ह्यात काही चूक असल्यास कोणी तज्ञ माणसाने दुरुस्त करावी.


In reply to by वृषभ खोंडे

अशी प्रत्येक राज्याची स्वतःची येलो गेट आणि मारीन पो स्टे arrangement आहे आणि कोस्टल पोलिसांचे राष्ट्रीय ट्रेनिंग सेंटर गुजरात मध्ये स्थापन करण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शहा ह्यांनी गुजरात मधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग चे भूमिपूजन २०२३ मध्ये केले होते 

 

 


जिल्हाकेंद्र - जिल्हाकेंद्र / जिल्ह्याचे मुख्यालय / डिस्ट्रिक हेड क्वार्टर याला राजधानी हा शब्द सध्या अनपेक्षित वाटत असला तरी रुळल्यावर तो योग्य वाटेल असे वाटते. सामान्यतः जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव हे एकाच असते. उदाहरण नांदेड या जिल्ह्याची राजधानी नांदेड या नावाच्या गावी (किंवा शहरात) आहे. तथापि, काही ठिकाणी जिल्ह्याचे नाव व त्या जिल्ह्याच्या राजधानीच्या गावाचे नाव ही दोन्ही वेगवेगळी असलेली दिसतात. महाराष्ट्रात रायगड हा बहुधा असा एकाच जिल्हा असावा ज्या जिल्ह्याच्या राजधानीचे नाव वेगळे, अलिबाग हे आहे. आंध्र प्रदेशात (सध्याचा तेलंगणा धरून) मात्र असे अनेक जिल्हे पूर्वी होते. मागच्या दहा-बारा वर्षांत जिल्ह्यांची विभाजने झाली व हा भूगोल काहीसा बदलला. २०१४ पूर्वीची स्थिती - जिल्हा -- राजधानी पूर्व गोदावरी -- काकिनाडा पश्चिम गोदावरी -- एलुरु कृष्णा -- मछलीपट्टणम मेदक -- संगारेड्डी प्रकाशम -- ओंगोल

In reply to by कांदा लिंबू

असे अनेक जिल्हे आहेत, गुजरातेत तापी, नर्मदा, साबरकाठा, बनासकाठा!

In reply to by कांदा लिंबू

प्रकाशम -- ओंगोल
या प्रकाशम जिल्ह्याची नेहमी गंमत वाटते. प्रकाशम नावाचे कोणतेही गाव आहे असे वाटत नाही कारण त्या जिल्ह्याचे नाव आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री टी.पी.प्रकाशम यांच्या नावावरून दिले आहे. मुख्यमंत्र्याच्या नावावरून जिल्हा हा जरा गंमतीचाच प्रकार आहे. महाराष्ट्रात चव्हाण, पवार, नाईक किंवा फडणवीस नावाचा जिल्हा असेल तर कसे वाटेल? तसेच तिकडे केले आहे. उत्तर प्रदेशात मायावतींनी जिल्ह्यांचे नामकरण करून मूर्खपणाची परिसीमा गाठली होती. अमेठी जिल्ह्याचे नामकरण केले छत्रपती शाहूजी महाराज नगर. शाहू महाराजांच्या कामाविषयी आदर असला तरी शतकानुशतके असलेले एखाद्या ठिकाणाचे अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर करायचे? शाहू महाराजांचा कधी अमेठीशी संपर्क आला असेल असे वाटत नाही. मग अचानक अमेठी हे नाव बदलून शाहूजी महाराज नगर हे नाव देणे तसे विचित्रच वाटते. तीच गोष्ट अमरोहाची. अमरोहा जिल्ह्याचे नाव ज्योतिबा फुले नगर असे केले. मग यथावकाश ज्योतिबा फुले नगरचे लोकांनी जेपी नगर केले. अखिलेश मुख्यमंत्री झाल्यावर ही नावे बदलली पण समजा अशी नावे बदलली नसती तर जेपी नगर म्हणजे जयप्रकाश नारायणांच्या नावाने नाव दिले आहे असे कोणाला वाटले असते. असे ऐकले आहे की कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन करायची वेळ आली तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी विद्यापीठ असे सुटसुटीत नाव ठेवावे असा आग्रह धरला होता. त्याचे कारण वडोदर्‍याच्या महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचे एम.एस.युनिव्हर्सिटी झाले तसे कोल्हापूरमधील विद्यापीठाचे सी.एस.एम युनिव्हर्सिटी व्हायला नको- जसे युपीत जेपी नगर झाले. जिल्ह्याविषयी आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे सांगली जिल्ह्याची. सांगली जिल्ह्याचे मुख्यालय अर्थातच सांगली शहर आहे. पण सांगली जिल्ह्यात सांगली हा तालुकाच नाही. त्यामुळे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय असलेले सांगली शहर येते मिरज तालुक्यात. असेही फार कुठे बघायला मिळत नसावे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

हे महानगर असले तरी ते हातकणंगले तालुक्यात येते. काही गावांचे नशीब फळफळते तसे आहे. इस्लामपूर आताचे ईश्वरपूर आणि वाळवा तालुका, खानापूर तालुका पण विटा मुख्य शहर असे अनेक. लहानपणी काका लोकांना मुली पाहायला जेव्हा सगळी फॅमिली जात असे तेव्हा पहिल्यांदा भूगोलाच्या पुस्तकात पाहिलेली गावे पाहता येत. वेगळेच फीलिंग असायचे. मी खूप हट्ट करून नवनीतचा अटलास विकत घेतला होता. तासनतास नकाशे पाहत घालवणे आणि ती गावे कशी असतील यांचे इमॅजिनेशन करणे खूप उत्तम टाइमपास. पहिल्यांदा कोल्हापूर पहिले तेव्हा तर भंजाळूनच गेलो होतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अजून एक गम्मत म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणी सांगली जिल्हा ह्यांच्या सीमारेषेवर रेल्वे लाईनजवळ निमशिरगाव आणि तांदळगे हि दोन गावे आहेत. त्या छोट्याश्या स्टेशनला दोन्ही गावाची नावे आहेत पण निमशिरगाव चे इंग्लिश बरोबर आहे तांदळगे चे स्पेलिंगनुसार तमदलगे असे केलेले आहे आणि स्टेशनबोर्डवर तसेच देवनागरीत लिहिलेले आहे. कॉलेजला दररोज मिरज-कोल्हापूर-मिरज ट्रेनने प्रवास करताना ते तमदलगे असे कसे नांव म्हणून मजा वाटायची. m

In reply to by अभ्या..

ऑ??? मी तर खरोखरच तमदलगे असंच आजतागायत समजत होतो. - (शिवाजी विद्यापिठाचा जुना विद्यार्थी) गवि ता.क. गूगल सर्च केली असता विकिपीडिया पानावर, लोकसत्ता आणि अन्य अनेक वृत्तपत्रांत तमदलगे असंच दिसतं आहे. आणि तांदळगे असं शोधू गेलं तर एकही निकाल आला नाही. म्हणजे मूळ नाव सर्वत्रच चुकीचं पसरलं असावं. तमदलगे हे नाव बसेसवर बघितल्याचं आठवतं आहे सांगली कोल्हापूरमध्ये असताना तीस वर्षांपूर्वी.

In reply to by गवि

Locality Name : Tamdalage ( तांदलगे ) Taluka Name : Shirol District : Kolhapur State : Maharashtra Region : Desh or Paschim Maharashtra Division : Pune Language : Marathi and Kannada Current Time 05:55 PM Date: Sunday , Feb 22,2026 (IST) Time zone: IST (UTC+5:30) Elevation / Altitude: 550 meters. Above Seal level Telephone Code / Std Code: 02322 . मी खूप जणाना तांदळगे असेच म्हणताना ऐकलेले आहे.

In reply to by गवि

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे. गोव्यात निदान कुंकळे माजोर्डे किंवा तशी नावे स्थानिकांच्या बोलण्यात तरी असतात मात्र बहुतेक बाहेरचे लेम करतात असे काहीसे कोल्हापुरात होईल असे वाटले नव्हते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

मी ही तमदलगे असेच नाव वाचले पाहिले ऐकले आहे.
मी पण. माझी पहिली अस्थायी नोकरी कोल्हापुरात होती- २००२ मध्ये. तेव्हा विश्रामबागहून सकाळी सव्वाआठच्या सुमारास येणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजरने दररोज कोल्हापूरला जायचो. तेव्हा जयसिंगपूर आणि हातकणंगले या दोन स्टेशनच्या मध्ये निमशिरगाव-तमदलगे हे स्टेशन होते. ते एक बिना प्लॅटफॉर्मचे स्टेशन होते. नुसत्या दोन पाट्या त्यावेळेस त्या स्टेशनला होत्या. पहिली पाटी म्हणजे स्टेशन सुरू झाले आणि दुसरी पाटी म्हणजे स्टेशन संपले :) त्या स्टेशनवर ती पॅसेंजर थांबायची. तमदलगे हेच नाव त्या स्टेशनवर आणि पुढारी वगैरे स्थानिक पेपरांमध्येही वाचल्याचे चांगलेच आठवते. गुगल मॅपवर मराठीत तांदळगे हे नाव वाचल्यावर त्या नावाला तमदलगे हे एडिट सुचवले होते. पण गुगल मॅपने ते मान्य केले नाही. बाकी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काहीकाही गावांची नावे अगदीच विचित्र आहेत. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, गैबी कुडुत्री, येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, यशवंंतराव चव्हाणांचे जन्मगाव देवराष्ट्रे, विठुरायाचीवाडी, दिघंची, बेळंकी, बेळुंडगी वगैरे.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

रूढ नसलेली डबल बॅरल नावे ही सांगली जिल्ह्याची खासियत म्हणवी लागेल. १. येडे * २. कवठे * ३. ३२ शिराळा ४. म्हैसाळ (एम) ५. करोली (टी) ६. शिंदेवाडी (एच) ७. रामपूरवाडी (द्विरूक्ती) ८. अलकूड (एम) ९. अग्रण धुळगाव कर्नाटकी नावे : आमचे रावळगुंडवाडी, अचकनहळ्ळी

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो. करोली(टी) वगैरे नावे विसरलोच. अशा नावांमधील टी, एम, एच वगैरे काय असतात काय माहीत.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

जुन्या बार्शी लाईट रूटवर बार्शी ते कुर्डूवाडी दरम्यान चिंचगाव नावाचे गाव आहे. तेथील स्टेशन हे चिंक हिल नावाने आहे. ब्रिटिश काळापासूनच तसे नाव आहे स्टेशनचे. मध्यरेल्वेच्या अखत्यारीत येते. तेथे नॅरोगेज असताना स्टीम इंजिने पाणी भरायला थांबायची. बहुधा इथे आधी आरक्षी प्रशिक्षण केम्द्र ही होते. सध्याचे माहीत नाही. चिंक हिल हे अगदी नॉर्थवेस्ट किंवा कुर्ग भागात असल्यासारखे हे नाव चक्क पंढरपूर तालुक्यात कुर्डूवाडी जंक्शनजवळ आहे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

हो असे कुठून जाताना कुठेतरी वाचलेल्या/ऐकलेल्या नावाच्या गावाची पाटी दिसणे हा एक मस्त अनुभव असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाताना असा अनुभव अनेकदा येतो. काही काही टिपीकल कोकणी अडनावे असतात त्या लोकांचे मूळ गाव असलेली गावे दिसली की छान वाटले. पूर्वी झारापकर टेलरींग कॉलेज म्हणून एक मुंबईत होते. ते झाराप नावाचे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. तीच गोष्ट वायंगणकर अडनावाच्या लोकांचे मूळ गाव- वायंगणी, वालावलकरांचे वालावली, आचरेकरांचे आचरे, मुणगेकरांचे मुणगे वगैरे. ही गावे नकाशात बघितली होती त्यापैकी काही गावांच्या नावाच्या पाट्या रस्त्यावरून जाताना बघितल्यावर छान वाटले होते. तीच गोष्ट गोव्यात- मयेकरांचे मये(म), बोरकरांचे बोरी(म), पोंभुर्पेकरांचे पोंभुर्पे, लोटलीकरांचे लोटली वगैरे. दक्षिण गोव्यात कांसावलीमधून दाबोळी विमानतळावर जाताना एक डॉ.लुई प्रोतो बार्बोझा रोड दिसला होता. डॉ.लुईस प्रोतो बार्बोझा हे १९९० मध्ये काही महिने गोव्याचे मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्रीपदावरून दूर झाल्यानंतर त्यांचे नाव ऐकले ते थेट २०११ मध्ये त्यांचे निधन झाले तेव्हा. त्यांच्या नावाचा रोड तिथे पहिल्यांदा बघितल्यावर एकदम छान फिलींग आले. कदाचित ते त्या भागातील असावे. पण दरवेळेस अशी नावे वाचून छान फिलींग येते असे नाही. गुरगावमध्ये अशीच एकदा ध्यानीमनी नसताना शहिद रूपीन कट्याल मार्ग ही पाटी बघितली आणि कंदाहार विमान अपहरण प्रकरण आठवून विलक्षण कालवाकालव झाली. ते कंदाहार हायजॅकिंग प्रकरण, रूपीन कट्यालची गळा चिरून केलेली हत्या आणि त्याची पत्नी रचनाची त्यावेळेस काय अवस्था झाली असेल अशा काही गोष्टी निदान या जन्मात तरी विसरता येणार्‍यातील नाहीत. बहुदा रूपीन कट्यालचे घर त्या भागात कुठेतरी असावे. तसेच एकदा दिल्लीत जवाहरलाल नेहरू स्टेडिअम मेट्रो स्टेशनजवळ असाच शहिद अजय आहुजा मार्ग ही पाटी दिसली होती. कारगील युध्दात दुसर्‍या दिवशी आपली दोन विमाने पडली होती. त्यापैकी एका विमानाचा वैमानिक होता दिल्लीचा अजय आहुजा. बहुतेक तो दिल्लीत त्या भागात राहायला असावा.

माझ्याकडे रेल्वेची बरीच पुस्तके आहेत आणि त्यांत भरमसाठ माहिती आहे. माथेरान रेल्वे साठीचा खर्च आजही जीजीभॉय यांनी केला होता. नंतर ती रेल्वे सेंट्रल रेल्वेकडे देण्यात आली. पण आताचे रेल्वे मंडळ ही माहिती त्यांच्या हिल रेल्वेमध्ये देत नाही.

In reply to by कंजूस

दुरुस्ती:- रेल्वेसाठीचा खर्च आदमजी जिजिभॉय यांनी केला होता.

तुमच्या आठवणींत असलेला भूगोल आणि इतिहास इथे मुक्तपणे मांडा. १९९८-९९ साली मी तिसरीत होतो. तेव्हा तिसरीच्या भूगोलात जिल्ह्याची माहिती शिकवली जायची आता शिकवतात का माहीत नाही, तर माझ्या पुस्तकातला धुळे जिल्ह्याचा नकाशा नी वर्गातील इतर मुलांच्या पुस्तकातील धुळे जिल्ह्याचा नकाशा ह्यात मोठा फरक होता, माझ्या पुस्तकातल धुळे जिल्हा भला मोठा होता, हे असे का झाले हे मला नंतर बऱ्याच वर्षांनी कळले, १९९८ साली, नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्यातून वेगळा झाला होता भूगोलाची पुस्तके नवी आली होती, माझ्याकडे मात्र जूनच पुस्तक आल होत. माझे एक चुलत काका जे ९९-९९ व्या वर्षी २ वर्षाआधी गेले ते सांगायचे की जळगाव जिल्ह्यात ते रहायचे तेव्हा काहीही लफडे झाले नि इंग्रज मागे लागले की ते २०-२५ किमीवरील निजामाच्या राज्यात लोक पळून जायचे नि इंग्रज पोलिस काही करू शकायचे नाहीत.

फ्रान्सची सीमा सगळ्यात जास्त लागून कुठल्या देशाला आहे? स्पेन? जर्मनी? बेल्जियम? नाही! उत्तर आहे ब्राझील!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

रोचक आहे. आणि जगात अनेक असे प्रदेश आहेत जे कोणत्याच देशात येत नाहीत.

दक्षिण निकोबार चा इंदिरा पॉईंट तर इंडोनेशियाच्या बंद अकेह पासून फक्त १४८ किमी आहे https://www.google.com/maps/dir/Banda+Aceh,+Banda+Aceh+City,+Aceh,+Indo…

In reply to by सुबोध खरे

१९६५ च्या भारतपाक युद्धाच्या वेळेस इंडोनेशियाने अंदमान व/वा निकोबार ताब्यात घ्यायच्या हालचाली केलेल्या होत्या. पण पुढे फारसं काही झालं नाही. -गा.पै.

अवांतर : पहिल्यांदा CP & Berar ( सी.पी. अँड बेरार ) वाचलं तेव्हा ते बीदर वाटलं. म्हंटलं, Central Provinces च्या सोबत नागपुराऐवजी बीदर का बरं जोडलंय? बरीच वर्षं गुंता उलगडला नाही. शेवटी एके दिवशी मेंदूत दिवा पेटला. ज्या कोणी वऱ्हाडचं स्पेलिंग Berar केलं त्याच्या अंगठाछापपणास कडक कुर्निसात. म्हणतात ना कृत्रिम बुद्धीमत्तेस अंत असो वा नसो, नैसर्गिक बावळटपणा अमर्याद आहे. -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा.पै. मी परवा एका इंग्रज प्रवाशाची दैनंदिनी वाचत होतो, त्यात Metrich नावाचे गाव होते, ते मिरज आहे हे कळायला दोन दिवस लागले. इंग्रजीत जुन्या काळात जसे उच्चार तसे स्पेलिंग देण्याची मुभा होती असे कळते. Standardization नंतर अठराव्या शतकात आले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्या नगर आहे! विशेष म्हंजे हा जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्याही भौगोलिक भागात येत नाही, ना खानदेशात ना मराठवाड्यात, ना कोकणात, ना पश्चिम महाराष्ट्रात ना कोकणात ना विदर्भात, प्रशासकीत विभाग उत्तर महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रील सर्वात मोठा तालुका धुळे जिल्ह्यातील साक्री हा आहे, ह्या तालुक्यात तब्बल २२५ गावे आहेत, हा तालुका इतका मोठा आहे की स्थानिक लोकानी सोयीसाठी चार किथे भाग पाडले आहेत, ह्या तालुक्यात चार मोठे भाग आहेत नी त्यांची नावे लोक वापरात आहेत, ते भाग म्हणजे काटवान, कोकण , माळमाथा नी पांझरा- कान परिसर.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

एखाद्या तालुक्यात चार मोठे लोकवापरातील उपविभाग असतील ह्याचे हे उदाहरण मालतारी एकमेव दिसले.

आपण जिथे राहतो त्याच्या आजूबाजूचा भूगोल माहिती असणे गरजेचे आहे- निदान एखादे गाव आपल्या गावाच्या कोणत्या दिशेला येते, तिथे जाताना कोणती गावे मधे लागतात अशी माहिती नसेल तर मात्र हसे/अडचण/खोळंबा जे काही असेल ते होऊ शकते. त्याचे एक उदाहरण आमच्या कॉलेजातील एका कन्यकेचे. ती राहायला होती कोल्हापुरात आणि तिचे कॉलेज सांगलीत. ती आमच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायची. घरी जाताना नेहमी बसने जायची. पण एकदा ट्रेनने जायला निघाली. सांगली ते कोल्हापूर हा मार्ग बसने आणि ट्रेनने थोडा वेगळा आहे. ट्रेनने जाताना सांगली-मिरज-जयसिंगपूर आणि पुढे कोल्हापूर असा मार्ग आहे. वास्तविक जयसिंगपूर आहे सांगलीजवळ. रस्तामार्गाने कोल्हापूरला जाताना सांगलीनंतर लगेच १५ मिनिटात जयसिंगपूर येते आणि मिरज लागत नाही. पण रेल्वेमार्ग मात्र सांगलीहून मिरजला जातो आणि तिथून परत उलट्या दिशेने जयसिंगपूरला. मिरजहून जयसिंगपूरला जाताना ट्रेन एक मोठ्ठा गोल वळसा त्यामुळे घेते. तर ही कन्यका कोल्हापूरला घरी जायला म्हणून मिरज स्टेशनला गेली. रस्ता आणि रेल्वेमार्गातील हा फरक तिला माहित नव्हता. तिला वाटत होते की मिरज-सांगली-जयसिंगपूर आणि पुढे कोल्हापूर अशी ट्रेन जाईल. त्यामुळे कोणाला तरी अमुक एक ट्रेन सांगलीमार्गे जाते का असे विचारून ती पुण्याला जायच्या पॅसेंजरमध्ये चढली. मिरजनंतर सांगली स्टेशन दिसल्यावर आपण योग्य मार्गावर आहोत असे तिला वाटले असावे. पण ती बरोबर उलट्या दिशेला चालली होती. आता जयसिंगपूर कधी येते याची ती वाट बघत होती. पण कुठचे काय ती जयसिंगपूरची वाट बघत बघत कराडला पोचली. योगायोगाने आमच्याच कॉलेजमधील कराडची एक मुलगी तिच्याच डब्यात पुण्याला जायला म्हणून चढली. मग- अगं तू इथे कुठे हा प्रश्न आलाच. तर ही कन्यका- मी घरी निघाले आहे असे बिनधास्तपणे बोलून गेली. मग झालेला घोटाळा लक्षात आला. मग ती सातार्‍याला उतरून बसने कोल्हापूरला गेली. त्यानंतर ती कन्यका आमच्या कॉलेजात एक लिजेंड असल्यासारखी झाली होती. त्या दुसर्‍या मुलीने तिसरीला, तिसरीने चौथीला 'फक्त तुला म्हणून सांगते इतर कोणाला सांगू नको' असे म्हणत सांगितलेली गोष्ट पूर्ण कॉलेजात पसरायला फार वेळ लागला नाही :)

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कोल्हापुरात राहणाऱ्या कन्येला जर मिरज, सांगली आणि मग कोल्हापूर असा ट्रेनचा रूट अपेक्षित असेल तर अवघड परिस्थिती आहे. :-))

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मीही तो एक लिजंड आहे. :) . अजून असेच एक कांड केलेले मी. मी कोल्हापूरला पहिल्यांदा गेलो ते एसटीने. स्टँड (कोल्हापूरच्या भाषेत सीबीएस) च्या दारात सिटी बस स्टॉप होता. तेथून डायरेक्ट कळंबा बस पकडून आयटीआय स्टॉप उतरायचे. आयटीआयच्या समोर आपले कलानिकेतन इतकेच माहीत होते. परत येताना सेम स्टोरी. काही दिवस बसने गेल्यावर काही मिरजेचे मित्र भेटले ते सगळे ट्रेनने येत. त्याचा स्टुडंट पास अविस्वसनीय कमी किमतीत असायचा. मग त्यांच्यासोबत ट्रेनने तिकिट काढून आलो. स्टेशनवर उतरताच ते एक्झीट गेट मधून निघून गेले. मी एकाला सीबीएस विचारले त्याने स्टेशनच्या दुसर्‍या टोकाला (कोल्हापूर हे रुटवरचे शेवटचे स्टेशन आहे, पुढे ट्रेन जात नाही) एक क्रॉसिंग गेट आहे तेथुन जाण्यास सांगितले. तेथे जाऊन मी कळंबा बस पकडली. ती फिरुन स्टेशनच्या दारात असलेला बससस्टॉप करुनच व्हीनस टॉकीजवरुन पुढे जायची हे लक्षातच आले नाही. परत येतानाही उलटा तसाच आलो. ट्रेनने कॉलेजात येणारे मित्र भेटेपर्यंत माझी ही पायपीट पार पडली. नंतर खुलासा झाला. . त्यानंतरही एकदा संभाजीनगर(कोल्हापूरचे दुसरे बस स्टॅन्ड, इथे झपाटलेला मधला बाहुला बस पकडून जातो त्या भागाचे चित्रण झालेले म्हणे) हून स्टेशनला जायला बस मिळाली ती कसबा बावडा बस होती. आक्खे गाव फिरवून ती वेगळ्याच रुटने आली आणि माझे ईच्छित स्टॉप सोडून कधी पुढे आली ते कळलेच नाही. एक लाहनसे हेर्ले का काहीतरी गाव होते तिथे उतरुन परत आलेलो अजून आठवते.

In reply to by अभ्या..

रोचक :)
एक लाहनसे हेर्ले का काहीतरी गाव होते तिथे उतरुन परत आलेलो अजून आठवते.
हो. कोल्हापूर-सांगली रोडवर हेर्ले या गावाची पाटी बघितली आहे.

मॅपवर मुशाफिरी करताना कुलवंतीन कोड्याचा माळ हे प्रकरण दिसले. कोणतीतरी प्रीहिस्टॉरिक साईट असावी. कातळशिल्प सदॄश्य. की कोण्या बोअर्ड मेंढपाळाचे अर्वाचीन काम? कुलवंतीन कोड्याचा माळ : लोकेशन

In reply to by हणमंतअण्णा शंक…

धन्यवाद. तुम्ही दिलेल्या लोकेशनवर जाऊन पाहिले असता शिलावर्तुळ दिसले. अश्मयुगीन मानवांची दफनभूमी.

In reply to by प्रचेतस

आजकाल उठवळ इन्फ्लुएन्सर इतिहास संशोधक कुणालाही घेऊन असल्या गोष्टींचा इतिहास पिळूनच काढतात. वरील वर्तुळे कोडे म्हणूनच प्रसिद्ध आहे आणि आता तिथे नेहमीप्रमाणे प्रचंड छेडछाड तर झालीच आहे पण एकूण त्याला प्रिझर्व करण्याचे प्रयत्न झालेले आहेत. तरीही मुख्य प्रवाद हे एक कोडे आहे आणि ते अर्वाचीन आहे असाच आहे म्हणजे ४०० वर्षापूर्वीचे वगैरे. ही दफनभूमी आहे हे सिद्ध करणे अवघड आहे का? अभ्या म्हणताहेत त्यावरून पॅटर्न वगैरे पाहता तसेच असायची शक्यता आहे. परंतु सध्या लोकांची डोकी भलतीच उत्साही असल्याने हे कोडेच म्हणून याची इन्फ्लुएंसर वाट लागेल असे वाटत आहे.

काय पण धागा काढलायं एखाद्या कापडातून एखादा धागा बाहेर यावा आणि तो उसवता उसवता दुसरा, मग तिसरा असे करता करता सगळेच धागे बाहेर निघावेत अगदी तस्से झालेय या धाग्याचे. लगे रहो मुविभाई ! मजा आ गया !

हिरव्या देशात मी विद्यार्थी म्हणून गेलो होतो तेव्हा आम्ही तिघे- मुंबईतील एक मुलगा आणि आणखी एक मुलगी एका विमानातून गेलो होतो. तिकडची भारतीय विद्यार्थी संघटना पहिले काही दिवस राहायची व्यवस्था तिथल्याच कोणत्या तरी भारतीय विद्यार्थ्याकडे करते. दरम्यान नव्या विद्यार्थ्यांनी आपले अपार्टमेंट बघायचे असते. त्याप्रमाणे आम्हा तिघांची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केली गेली. त्या मुलीची राहायची व्यवस्था भारतीय विद्यार्थी मुलींकडे केली गेली होती. त्याकाळी whatsapp तर नव्हतेच आणि कोणत्या पत्त्यावर जायचे हे ई-मेलवर समजायचे. त्या मुलीला जायचे होते १७१९ मोरो स्ट्रीट अपार्टमेंट ४ मध्ये. तिला ई-मेलवर चुकीचा पत्ता आला होता की तिने चुकीचा पत्ता लिहून घेतला कल्पना नाही पण तिला वाटत होते की तिला १९१७ मोरो स्ट्रीट अपार्टमेंट ४ मध्ये जायचे आहे- म्हणजे तिला जायचे होते त्याच्या दोन ब्लॉक दूर. त्यावेळी भारतीय विद्यार्थी संघटनेने तिकडच्या लाईफस्टाईल विषयी सगळ्यांना कळविले होते त्याप्रमाणे समजले होते की भारतीय विद्यार्थी (आणि इतरही) बाहेर जाताना घराला कुलुप लावून जात नाहीत. त्यावेळी कोणाकडे लॅपटॉप नसायचे आणि घरातून मुद्दामून चोरावे असे काहीही नसायचे. त्यामुळे कोणालाही कुलुप लावून जायची गरज वाटायची नाही. ती मुलगी ज्या चुकीच्या पत्त्यावर गेली तिथे एक गोरा विद्यार्थी त्याच्या गर्लफ्रेंड बरोबर राहात होता. ती तिथे गेली तेव्हा ते दोघे घरी नव्हते आणि त्यांच्या घरालाही कुलूप लावलेले नव्हते. ही मुलगी सरळ आपले सामान घेऊन आत गेली. आणि भारतातून विमान प्रवास करून गेल्याने तिला जेट lag आला होता त्यामुळे झोप येत होती. तिला वाटले ती ज्या घरी जाणे अपेक्षित होते त्या घरच्या मुली बाहेर गेल्या असतील. थोडा वेळ वाट बघून ती सरळ बाहेरच्या खोलीतील सोफ्यावर झोपली. थोड्या वेळाने तो गोरा मुलगा त्याच्या घरी परत आला. आपल्या घरी वेगळीच कोणती तरी भारतीय मुलगी झोपली आहे हे बघून त्याला नक्कीच धक्का बसला असेल. त्या मुलीच्या नशीबाने तो गोरा मुलगा चांगला होता. त्याने तिला उठविले आणि कोण तू वगैरे विचारले. तिने सांगितले की या अपार्टमेंटमध्ये कोणत्या भारतीय मुलींकडे तिची राहायची व्यवस्था केली गेली आहे. मग त्या मुलाला कळले की ती चुकीच्या पत्त्यावर आली आहे. नशीबाने त्या मुलीने ज्यांच्याकडे जायचे होते त्यांचा फोन नंबर लिहून आणला होता. त्याकाळी भारतीय विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन पण खूप कमी जणांकडे असत. तेव्हा landline वर त्यांच्याकडे फोन करून नक्की पत्ता विचारला. तेवढ्यात त्या गोर्या मुलाची गर्लफ्रेंड पण बाहेरून आली. तो मुलगा वेगळ्याच मुलीबरोबर घरी आहे हे बघून ती पिसाळली नाही :) मग त्या दोघांनीच त्या मुलीला तिच्या ४०-५० किलो सामानसह त्यांच्या गाडीतून योग्य पत्त्यावर नेऊन सोडले. दरम्यान ती मुलगी ज्या घरी उतरणार होती त्या घरी राहणार्या भारतीय मुलींना ती कुठे गेली हे कळायला काहीही मार्ग नव्हता. ती घरी सुखरूप आल्यावर सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला असेल. चुकीचा पत्ता मिळाल्याने/ लिहून घेतल्याने हा गोंधळ झाला. त्या दिवशी ती मुलगी नशीबाने थोडक्यात वाचली असे म्हणायला हवे. तो गोरा मुलगा चांगला होता हे मोठेच नशीब. ती मुलगी तिचा कोर्स पूर्ण झाल्यावर काही वर्षे न्यू यॉर्क राज्यात रॉचेस्टर मध्ये होती आणि आता बंगलोरला स्वतःचा व्यवसाय करते.

आमच्या ओळखीतील एक जण ह्या लाईन मध्ये होता, ज्या काळी आजच्यासारखे UFO satellite प्रोजेक्टर IMAX इत्यादी लाड नसत आणि सिंगल स्क्रीन असत त्या काळी हे गृहस्थ स्पेसिफिक डिस्ट्रिब्यूशन कंपनी साठी फिल्मच्या रिल घेऊन गावोगाव हिंडत, त्यांची स्वतःची अशी एक लोखंडी पेटी होती (रेल्वेत लोको पायलट किंवा तिकीट चेकर मंडळींची असते तशी) त्यात रिल्स कपडे, थोडे खायचे सुके राशन, पार अमृतांजनच्या डब्या, सुई दोरा इत्यादी असत, आयुष्याच्या शेवटी शेवटी ते काका पोराबाळांना सेटल करून अतिशय कृतार्थ निवृत्त जीवन जगताना कधीतरी त्यांची ती त्यांनी प्रेमाने जतन केलेली पेटी दाखवत आणि किस्से सांगत, मुघले आझम अकोल्याला घेऊन गेलो होतो तेव्हा प्रचंड गर्दी होती पार स्टेशन ते थिएटर reels न्यायला पोलिस बंदोबस्त केला होता थिएटर मालकाने इत्यादी. बाय द वे हा धंदा सुद्धा स्पोक्स अँड हब मॉडेल वापरत असे वितरणाला. सीपी अँड बेरार सर्किट मध्ये अमरावती हे शहर एक मोठे फिल्म डिस्ट्रिब्यूशन हब होते/ आहे. पूर्ण पश्चिम विदर्भ (वऱ्हाड प्रांत) म्हणजे अकोला अमरावती वाशिम (अकोल्यातून वेगळा झाल्यावर) यवतमाळ आणि बुलढाणा जिल्हे आणि त्यांतील तालुका ठिकाणे आठवडी बाजाराच्या दिवशी बऱ्यापैकी गजबजलेली गावे अन् त्यातील टुरिंग टॉकीज इत्यादी मधे वरती सांगितलेल्या काकांसारखी माणसे reels घेऊन प्रवास करत, कित्येक ठिकाणी ग्रामपंचायत/ नगरपालिका दवंड्या देत की "अमर अकबर अँथनी ह्या आठवडी बाजारात नीलम टुरिंग टॉकीज मधे फक्त पुसदवासियांसाठी" रसिक प्रेक्षक पार स्टेशन वर बस स्टँड वर गाड्या येण्याची वेळ अन् दिवस मोजून reel runner उतरतोय का नाही ते बघून गावभर वर्ड टू माऊथ मौखिक प्रसिद्धी इत्यादी करत अशा आज कालबाह्य वाटू शकणाऱ्या पण त्याकाळी ट्रेडिंग असणाऱ्या गोष्टी ते काका कायम सांगत.


हा प्रश्न मी आधी कधीतरी दुसर्या चर्चेमध्ये विचारला होता.

अजूनही आपल्या देशात केंद्रशासित प्रदेश का आहेत? जवळच्या राज्यात विलीन न करण्याचे काय कारण आहे?


In reply to by वृषभ खोंडे

धन्यवाद. लदाख, जम्मू/काश्मिर, अंदमान/निकोबार, दिल्ली हे समजू शकतो

पण चंदिगड (हरियाणा आणि पंजाब यांना वेगळी राजधानी करायला हवी), दीव, दमण, पुदुचेरी इ. केंद्रशासित का आहेत अजूनही?

 


In reply to by अमेरिकन त्रिशंकू

चंडीगड - planned city तसेच तुम्ही म्हणाले तसे दोन्ही राज्यांना सामायिक. दमण, दीव - वेगळी सांस्कृतिक ओळख (पोर्तुगीज) पुद्दुचेरी - वेगळी सांस्कृतिक ओळख (फ्रेंच)


कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात असलेले चौंडी मुखेड हे गाव चक्क महाराष्ट्र्रात आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात हे गाव येऊन पडले आहे. चहुबाजुना महाराष्ट्र आणि मध्ये हे एकच कर्नाटकी गाव अशी विचित्र स्थिती इथे तयार झाली आहे. यामुळे गावाला प्रशासन, वीजपुरवठा, आरोग्य, शिक्षण अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे असे का, कधी आणि कुणामुळे झाले याचे उत्तर कोणाकडेही नाही. गावातील सर्व व्यवहार मराठीमध्ये चालतात, मुले शिकायला लातूर, उदगीरला जातात. गावात मराठी माध्यमाची एकमेव शाळा आहे. कर्नाटकाशी या गावाला जोडण्यासाठी रस्ता हवा म्हणून काही वर्षांपूर्वी कर्नाटक सरकारने लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून जमीन विकत घेतली आणि रस्ता बनला. विशेष म्हणजे कर्नाटक राज्यातील प्रथम क्रमांकाचे मतदान केंद्र या गावात आहे. गाव सर्व सुविधांसाठी महाराष्ट्रावर अवलंबून असले तरी गावकऱ्यांना महाराष्ट्रात विलीन व्हायचे नाही. यामुळे चौंडी मुखेडला भारतातील सर्वात गुंतागुंतीचे गाव असे म्हटले जाते.  या गावावर ABP News ने आणि बोलभिडुने केलेल्या रिपोर्टची लिंक खाली दिली आहे.

https://www.youtube.com/watch?v=N8NAUImDcdI

https://www.youtube.com/watch?v=ZJ5XEtUBUg4


इचलकरंजी, सोलापूर, मालेगाव भिवंडी इत्यादी गावे आहेत हे कायम ऐकून होतो काल एका यंत्रमाग (पॉवरलुम) कारखान्याला भेट देण्याचा योग आला ,  कालच्या दिवशी आयुष्यात काहीतरी नवीन शिकायला मिळाले. व्हिव अँड व्हार्प असे काहीसे .

 

PXL-20260627-130527111PXL-20260627-130444549