Skip to main content

आजीचं पुस्तकांचं हॉटेल

लेखक नपा यांनी बुधवार, 24/06/2026 15:52 या दिवशी प्रकाशित केले.

काही महिन्यांपूर्वी नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावरील  'आजीचं पुस्तकांचं हॉटेल' या पुस्तकालय-कम-भोजनालयाला योगायोगाने भेट देता आली. 

नावाप्रमाणे या हॉटेल मध्ये तुम्हाला अनेक पुस्तके छान मांडून ठेवलेली दिसतील. हॉटेलची जागा अत्यंत प्रशस्त आहे आणि त्यात पुस्तकांनी व्यापलेल्या जागेने हॉटेलच्या भव्यतेत वाढ होते. 

हॉटेलच्या मागे गार्डन रेस्टॉरंट सारखी बैठक व्यवस्था आहे आणि वरच्या भागात वाचन कट्टा दिसेल - तिकडे सेमिनार, मीटिंग साठी सोय आहे. अंदाजे हजाराच्या वर पुस्तकं  याठिकाणी आहेत. ही सगळी पुस्तकं तुम्हाला तिथेच वाचता येतातविकत किंवा वाचनालयासारखं घरी घेऊन जाण्याची सोय नाही, दुसऱ्या भागात पुस्तकं विक्रीची सोय आहे.

हॉटेलच्या आतिल भिंती देखील कल्पकतेने चितारल्या आहेत - समोर नाशिक व जवळपास च्या ठिकाणांची सचित्र माहिती आहे. कवितेची भिंत आहे, तसेच वाचन संस्कृतीवरील दिग्गजांचे Quote सुद्धा आहेत, जसे  A reader lives thousand lives before he dies. The man who never reads lives only one. (by George R.R. Martin)

एकूण हॉटेलच इंटिरियर, बैठक व्यवस्था वाचनासाठी अत्यंत पूरक आहे, अगदी अजिबात न वाचणारी व्यक्ती पण अनावधानाने एखादे पुस्तकं हातात घेऊन ते चाळू लागते. हॉटेलचे जेवण छान रुचकर होतं, वाचनप्रेमींसाठी तर हे ठिकाण नक्कीच वेळोवेळी भेट द्यावी असे आहे. 

आता हॉटेल च्या संकल्पानेविषयी - सौ. भीमाबाई संपत जोंधळे, या हॉटेल च्या नावातील आजी होय. त्यांच शिक्षण परिस्थितीमुळे केवळ इयत्ता पाचवी पर्यंत झालेलं.  १२-१५ वर्षांपूर्वी, आजींनी वयाच्या साठीत, आर्थिक गरजेपायी पपेरविक्री त्यासोबत चहाची टपरी सुरु केली तिचेच रूपांतर आज शेकडो सन्मान मिळालेले हे जगातील एकमेव पुस्तकांचं हॉटेल म्हणून नावाजले आहे. आजींच्या वाचनाच्या आवडीमुळे 'खाद्य संस्कृतीत वाचन संस्कृती रुजवणारं पहिलं हॉटेल' सुरु करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. 

शिक्षण व परिस्थिती पोषक नसतानाही समाजप्रबोधन करायचे असेल, बदल घडवायचे असतील तर प्रबळ इच्छाशक्तीला कल्पकतेची जोड देऊन हे नक्कीच शक्य आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजींचा हा प्रेरक प्रवास. त्यांच्या या प्रयन्तांना विनम्र अभिवादन.

नाशिकचा साहित्याचा वारसाहॉटेलचं मोक्याचं ठिकाण, जेवणाची वेळ - एव्हडं  असून सुध्दा आम्ही गेलो तेव्हा इकडे विशेष गर्दी नव्हती हे पाहून मला आश्चर्य वाटले. गप्पा मारताना हॉटेल चे मालक श्री. प्रवीण जोंधळे (आजींचा मुलगा)यांना याविषयी सहज विचारले. त्यांचे यावर खूप समर्पक मत होतं - ते म्हणाले - इकडे गर्दी पेक्षा दर्दी लोकं येतात. 

हॉटेल मधून निघताना अभिप्रायासाठी एक वही ठेवली आहे, त्यात देश विदेशातील अनेक अभिप्राय नोंदलेले दिसले.

 

 


वाचने 525
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

युरोप मध्ये खाद्य पदार्थानुसार वाईन देतात ,,

तसे येथे पुस्तकाच्या विषय / शैली नुसार खाद्य पदार्थ मिळाले तर काय मजा येईल 


युके मध्ये अनेक पब मध्ये अशा प्रकारे पुस्तके टेबलाच्या मागे कपाटात लावलेली असतात. अगदी जुनी रोचक पुस्तके. गर्दी नसेल तर पब मध्ये लोक तासनतास बसू शकतात. पहिल्यांदा पाहिले तेंव्हा खूप अप्रूप वाटले होते. 


त्यात पुन्हा लहान मुले, मोठी माणसे आणि नोकरी धंध्यातून सुटी घेऊन येणारे सहा सात जण असतात. वाटेत तीन चार तासांनी थोडा वेळ थांबबण्याचीच सवड असते. तर ते किती वेळ घालवतील?