विरुपाक्ष मंदिर, हंपी.

ज्याप्रमाणे नगर शहरात थोड्या उंचीवर गेलात तर कधी सपाट जागेवरून ‘चांदबिबी महाल’ दिसतोच, तसेच हंपीतलं विरुपाक्ष मंदिरही शहरातून कुठूनही सहज दिसतं. माझी रूम जिथे होती, तिकडूनही उत्तरेकडे नीट ठराविक उंचीवरून विरुपाक्ष मंदिराचे गोपुर दिसायचे. अगदी अंजनेरी पर्वतावरूनही हंपीचे गोपुर स्पष्ट दिसतात.
मंदिराच्या मुख्य गोपुरासमोर बाह्य प्रांगणात एक उंच आणि देखणा लाकडी रथ उभा होता. चैत्र पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने हा रथ बाहेर काढण्यात आला असावा.
विरुपाक्ष किंवा पंपापती मंदिर हे हम्पी (विजयनगर) येथील सर्वात प्राचीन आणि पवित्र मंदिर मानले जाते. शतकानुशतके हे मंदिर विजयनगर साम्राज्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र राहिले आहे. पंपापती म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या पंपा नदीची स्वामी किंवा पंपा-तीर्थाचा स्वामी. येथे तुंगभद्रा नदीला पंपा नदी म्हणूनही ओळखले जाते.हे मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर, हेमकूट डोंगराच्या उत्तरेला, अतिशय देखण्या निसर्गरम्य ठिकाणी वसले आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे.विरुपाक्ष मंदिराची मूळ स्थापना ७व्या शतकात बदामी चालुक्य काळात झाली. सुरुवातीला हे एक छोटे शिवमंदिर होते, ज्यात विरुपाक्ष किंवा पंपापती लिंगाची स्थापना करण्यात आली होती. ९व्या आणि १०व्या शतकातील उपलब्ध शिलालेखांमध्ये याचा उल्लेख आढळतो. १२व्या शतकात उत्तर चालुक्य काळात मंदिराचा लक्षणीय विस्तार झाला. याच काळातील पार्वती आणि भुवनेश्वरी ही दोन मंदिरे आजही अस्तित्वात आहेत. या मंदिरांमधील काळ्या दगडाचे लेथ-टर्न केलेले सुंदर स्तंभ हे त्या काळाचे जिवंत साक्षी आहेत.म्हणजेच, विजयनगर साम्राज्य स्थापन होण्यापूर्वीच हे मंदिर सुमारे ५०० ते ६०० वर्षे जुने होते.
१४व्या शतकापासून विजयनगर राजांनी या मंदिराला संरक्षण व संवर्धन दिले. देवराय दुसरा (१४२२–१४४६) यांच्या काळात मुख्य पूर्व गोपुर बांधण्यात आला. मात्र मंदिराचा सर्वात मोठा आणि वैभवशाली विस्तार कृष्णदेवराय (१५०९–१५२९) यांच्या काळात सुमारे १५१० मध्ये झाला. यावेळी रंगमंडप -महामंडप, आंतर गोपुर, अनेक उपमंदिरे, स्तंभयुक्त क्लॉइस्टर आणि इतर सजावटीचे काम पूर्ण करण्यात आले. लक्कण दंडेश (कृष्णदेवरायाचे सेनापती) यांनी या विस्तारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे विरुपाक्ष मंदिर विजयनगर साम्राज्याचे मुख्य देवस्थान बनले.
विरुपाक्ष मंदिराचा हा गोपुर उंचीने ५० मीटर आहे. त्याचे बाह्यरूप फ्रॅक्टल या गणितीय संकल्पनेतून तयार झाल्यासारखे दिसते (अर्थात ‘फ्रॅक्टल’ ही संकल्पना नंतर प्रसिद्ध झाली).
फ्रॅक्टल स्थापत्यशास्त्र
फ्रॅक्टल ही गणितीय संकल्पना आहे जी स्वसदृशता वर आधारित आहे. म्हणजे एका आकाराचा छोटा भाग संपूर्ण आकारासारखाच दिसतो. हे नमुने वेगवेगळ्या स्केलवर आकारमानांवर पुनरावृत्ती होतात. बेनॉइट मॅन्डेलब्रॉट यांनी १९७५ मध्ये या संकल्पनेला औपचारिक स्वरूप दिले. प्रकृतीत फ्रॅक्टल्स सर्वत्र दिसतात. झाडाची फांदी, हिमकण, ढग, समुद्रकिनारा, रक्तवाहिन्या इत्यादी.
स्थापत्यशास्त्रात फ्रॅक्टल्सचा वापर केल्यास इमारती ज्यात पुनरावृत्ती, स्केलिंग आणि स्वसदृशता यांचा समावेश असतो. यामुळे इमारत नैसर्गिक, जटिल पण सुसंगत वाटते. हे अनैच्छिक असू शकते ज्यात सौंदर्य किंवा संरचनात्मक कारणांसाठी फ्रॅक्टल रचना वापरली जाते. तर काही वेळा हे औपचारिक असते ज्यात आधुनिक काळात संगणकाच्या मदतीने डिझाइन केले जाते. उदाहरणार्थ फ्रँक लॉइड राइट यांच्या काही इमारती किंवा समकालीन आर्किटेक्चर यात मोडतात. फ्रॅक्टल डिझाइनमुळे इमारती अधिक बायोफिलिक निसर्गाशी जोडणारी होतात ज्यामुळे मानवी मनःशांती, एकाग्रता आणि कल्याण वाढते.
भारतीय हिंदू मंदिर वास्तुकला ही फ्रॅक्टल्सची सर्वोत्तम उदाहरणे आहेत. फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधीच भारतीय स्थापत्यकारांनी ही रचना वापरली होती. मंदिरांच्या शिखर किंवा गोपुरात मुख्य शिखराभोवती लहान शिखरे त्याभोवती आणखी लहान शिखरे अशी रिकर्सिव स्वसदृशता दिसते. यामागे प्रतीकात्मक अर्थ आहे. मंदिर हे ब्रह्मांडाचे सूक्ष्म प्रतिरूप आहे. पूर्णता प्रत्येक भागात प्रतिबिंबित होते हा हिंदू दर्शनाचा सिद्धांत फ्रॅक्टल संकल्पनेत स्पष्ट दिसतो.हिंदू मंदिरांमध्ये मोठ्या आकारात जे आहे, ते लहान आकारातही तसेच असते. हीच गोष्ट फ्रॅक्टल गणितात “स्वसदृशता” म्हणून ओळखली जाते. प्राचीन भारतीय स्थापत्यकारांनी हे तत्त्व हजारो वर्षांपूर्वी मंदिरांमधून अमलात आणले असावे का ?
विरुपाक्ष मंदिर हंपी याचे गोपुर हे फ्रॅक्टल रचनेचे उत्कृष्ट उदाहरण आहे. मुख्य आकार त्रिकोणी असून वर चढताना नमुने पुनरावृत्ती होतात जे स्नोफ्लेक सारखे दिसतात. हे १५व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील बांधकाम आहे. याचप्रमाणे खजुराहोचे कंदरिया महादेव मंदिर, मदुराई मंदिर आणि राणकपूर जैन मंदिर यांमध्येही फ्रॅक्टल रचना स्पष्टपणे दिसते.
इतर संस्कृतींमध्येही फ्रॅक्टल आर्किटेक्चर आढळते. आफ्रिकन गावे, घरं आणि कापड यांमध्ये स्केलिंग आणि रिकर्शनचे उत्कृष्ट नमुने आहेत ज्यांचा अभ्यास रोन एग्लॅश यांनी केला आहे. युरोपातील गॉथिक आणि बारोक कॅथेड्रल्स तसेच आधुनिक काळातील फ्रँक लॉइड राइट यांच्या ऑर्गेनिक आर्किटेक्चरमध्येही फ्रॅक्टल तत्त्वे आढळतात.
गोपुरातील स्वसदृशता म्हणजे मोठ्या आकारातील रचना लहान आकारात पुन्हा पुन्हा दिसणे. एकच नमुना वेगवेगळ्या आकारमानांवर पुनरावृत्ती होणे ही फ्रॅक्टलची मूलभूत वैशिष्ट्ये गोपुरांमध्ये स्पष्ट दिसून येते. विरुपाक्ष मंदिर हंपी याचे मुख्य राजगोपुर सुमारे पन्नास मीटर उंच आणि नऊ मजली आहे. यात स्वसदृशता अशी दिसते की संपूर्ण गोपुराचा मुख्य आकार त्रिकोणी आहे आणि खालच्या मोठ्या स्तरांवरील रेषा कोन व नक्षी वरच्या लहान स्तरांवरही त्याच रूपात पुनरावृत्ती होतात. प्रत्येक मजला हा खालच्या मजल्याचा लहान प्रतिरूप असतो. वर चढताना प्रत्येक पातळीवर नमुने लहान होत जातात तरी संपूर्ण गोपुरासारखेच दिसतात. ही रचना रिकर्सिव स्वसदृशता दर्शवते. म्हणजे गोपुराचा एखादा छोटा भाग वेगळा केला तरी तो संपूर्ण गोपुरासारखाच भासतो. याचप्रमाणे खजुराहोच्या कंदरिया महादेव मंदिरात मुख्य शिखराभोवती असलेल्या लहान शिखरांमध्येही आणखी लहान शिखरे दिसतात. मदुराई मीनाक्षी मंदिरातील गोपुरांवर प्रत्येक स्तरावर मुख्य गोपुरासारखीच नक्षी, देवमूर्ती आणि छोट्या शिखरांची पुनरावृत्ती होते. हिंदू दर्शनानुसार, गोपुर हे मेरु पर्वताचे प्रतीक आहे. ब्रह्मांडातील पूर्णता प्रत्येक छोट्या भागात असते, हेच तत्त्व गोपुरातील स्वसदृशतेतून व्यक्त होते. “पूर्णमदः पूर्णमिदम्” -पूर्णातून पूर्ण निघते, तरी पूर्णच उरते या वेदान्तातील कल्पनेशी हे जुळते.
विरुपाक्ष मंदिराच्या गोपुरात ही स्वसदृशता इतकी स्पष्ट आहे की, फ्रॅक्टल थिअरी आविष्कार होण्यापूर्वी शेकडो वर्षे आधी १५वे शतकात ती वापरली गेली होती?
या गोपुराच्या बाह्य भागावर अनेक सुंदर आणि अर्थपूर्ण शिल्पे कोरलेली आहेत. विशेषतः पहिल्या स्तरावर मैथुन शिल्पे स्पष्ट दिसतात. ही शिल्पे प्राचीन भारतीय परंपरेनुसार सृष्टीची सर्जनशीलता आणि जीवनचक्र दर्शवतात.
गोपुरावर विविध देवदेवतांची शिल्पेही मोठ्या प्रमाणात आहेत. शिव, विष्णू, गणेश, नंदी, राम-लक्ष्मण-सीता यांसारख्या देवमूर्ती, पौराणिक कथांमधील दृश्ये, यक्ष-यक्षिणी, गंधर्व आणि इतर सैद्धांतिक आकृत्या येथे कोरलेल्या आहेत. प्रत्येक मजल्यावर शिल्पांची रचना वेगळी असून, खालच्या स्तरांवर मानवी जीवन, प्रेम, सृष्टी आणि पौराणिक कथा यांचे दर्शन घडते, तर वरच्या स्तरांवर अधिक आध्यात्मिक आणि देवी-देवतांच्या रूपांचे चित्रण आहे.
एक सुंदर गजरा विकत घेऊन ,केसांत माळला ...चार पाच रील्स काढल्यावरच मंदिराकडे वळाले ,हे वेगळे सांगायला नको 😊
मंदिरात आत शिरताच तीन शिरे असणारा त्रिमुखी नंदी दिसतो.
एका भिंतीवर विजयनगर साम्राज्याचे चिन्ह म्हणजे वराह (जंगली डुक्कर), तलवार, सूर्य आणि चंद्र यांचा संयुक्त कोरीव आकृतिबंध दिसतो .वराह चिन्हाची सुरुवात मूळ चालुक्य राजवंशात झाली. बादामी चालुक्य (६व्या ते ८व्या शतक) यांनी सर्वप्रथम वराह (विष्णूचा तिसरा अवतार) याला आपले कुलचिन्ह स्वीकारले. चालुक्य राजे विष्णूचे परम भक्त होते आणि त्यांनी पृथ्वीला समुद्रातून वाचवणाऱ्या वराह अवताराला आपल्या राजकीय आणि सांस्कृतिक प्रतीक बनवले.
विजयनगर साम्राज्याने चालुक्य राजवंशाकडून हे चिन्ह आपल्या राजकीय चिन्ह म्हणून स्वीकारले. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर (१३३६) हरिहर आणि बुक्का राय यांनी चालुक्यांच्या परंपरेचा वारसा चालू ठेवला. विशेषतः कृष्णदेवराय आणि त्यानंतरच्या राजांच्या काळात हे चिन्ह सर्वत्र प्रसिद्ध झाले आणि साम्राज्याच्या वैभवाचे प्रमुख प्रतीक बनले.
चिन्हातील घटक आणि त्यांचा अर्थ-
हे चिन्ह सामान्यतः वराह, तलवार, सूर्य आणि चंद्र यांच्या संयोजनात दाखवले जाते. वराह हे शक्ती, साहस, धर्मरक्षण आणि विजयाचे प्रतीक आहे. तलवार युद्धक्षमता, न्याय आणि साम्राज्य संरक्षण दर्शवते. तर सूर्य आणि चंद्र “आचंद्रार्क” (सूर्य-चंद्र अस्तित्वात असेपर्यंत) हे साम्राज्य टिकावे, असा शुभ आणि चिरंतन अर्थ देतात.
विरुपाक्ष प्रांगणात डावीकडे लक्ष्मी हत्तिणीचे दर्शन झाले. ती झुलत-झुलत लुसलुशीत हिरव्या चाऱ्यावर ताव मारत होती.🐘
समोरच्या मोठ्या प्रांगणात दोन मंडप आहेत . एक मोठा व एक छोटा. यांना फलपुजा मंडप/कल्याण मंडप/सभामंडप अशी अनेक नावे आहेत. यातील मोठ्या मंडपात जवळपास १०० खांब आहेत. या खांबांवर सिंह, कृष्ण, पौराणिक कथा इत्यादी अनेक शिल्पे कोरलेली आहेत. मी खूप वेळ इथे रेंगाळले . प्रत्येक खांबावर वादकांची शिल्पे ही खूपच वेगळी आणि रोचक आहेत. छोट्या मंडपात मधोमध एक शिळा आहे, जिला कुंपण घातले आहे व भोवती खांब आहेत.
पुढे गोपुराच्या आतल्या भागावर आणखी एक मोठे प्रांगण आहे. त्याच्या समोर प्रथम दीपमाळ, नंदीमंडप, मग मोकळी जागा आणि पुन्हा विरुपाक्ष मंदिराचे प्रसिद्ध रंगमंडप येते. त्यानंतर अंतराल (अंतःप्रकोष्ठ) आणि गर्भगृह. गर्भगृहात ‘पंपापती’ विरुपाक्ष म्हणजे शंकराचे पिंड आहे.
रंगमंडपात ८ खांब आहेत, जे ससा, बकरी, घोडा, मंगर, सिंह, व्याघ्र, हत्ती अशा विविध प्राण्यांपासून बनवलेल्या व्यालकृती (याली) स्वरूपात आहेत. विजयनगर साम्राज्यात बाजार, कल्याण मंडप, सभा मंडप, वादक शिल्पे यांसारखे व्यालकृती खांब खूप प्रसिद्ध आहेत.
विरुपाक्ष मंदिरातील रंगमंडपाच्या पायऱ्यांजवळ शिलालेखात कृष्णदेवराय यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो, ज्यामुळे त्यांना या मंदिराचे सर्वात मोठे संवर्धक आणि दाता मानले जाते. विशेषतः १५१० ईसाली (त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळात) कोरलेल्या कन्नड भाषेतील शिलालेखात कृष्णदेवरायांनी विरुपाक्ष देवतेच्या नावाने मोठ्या प्रमाणात दान आणि बांधकाम केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यात त्यांनी रंगमंडप (महामंडप), आंतर गोपुर, मुख्य गोपुराची दुरुस्ती आणि इतर अनेक सजावटीचे काम पूर्ण केल्याचे नमूद आहे. त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी सिंगनायकनहळ्ळी या गावाचे दान दिले, तसेच सोन्याचे ताट, सोन्याचे आणि चांदीचे दिवे, अमृतपदीसाठी जमीन आणि उत्पन्नाची व्यवस्था केली.
यापुढे तिन्ही बाजूंनी ओसरी आहेत. त्यात एक भव्य दगडी रांजण दिसले, ज्यात पंचामृत करून प्रसाद तयार केला जात असे.त्याशेजारीच एक मीटर रुंद अशी दगडी चूल दिसली, जी चंदन उगाळण्यासाठी वापरली जाते असे समजले.
हम्पीतील विरुपाक्ष मंदिर हे विजयनगर चित्रकलेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. रंगमंडपाच्या छतावर ही चित्रे काढली आहेत. ही हम्पीतील एकमेव जिवंत विजयनगर चित्रे मानली जातात. यातील प्रमुख विषय म्हणजे विदुरण्य महर्षींची मिरवणूक, अर्जुनाने मत्स्ययंत्र भेदून द्रौपदीचा स्वयंवर, दशावतार, शिव-कामदहन, त्रिपुरारी, कल्याणसुंदरम (शिव-पार्वती विवाह) आणि गिरिजाकल्याणम (पंपा-विरुपाक्ष विवाह) यांसारख्या पौराणिक घटना आहेत. ही चित्रे १६व्या शतकातील आहेत आणि विजयनगर चित्रकलेची उत्कृष्ट उदाहरणे मानली जातात.विजयनगर चित्रकलेचा नंतरच्या काळात मैसूर आणि तंजावर चित्रकला शैलींवर मोठा प्रभाव पडला
मी आपली मन लावून चित्र पाहत असताना एका मर्कटाने चपळाईने माझ्या केसांतील गजरा जोरात ओढला आणि निवांत खात बसला ,कोणाच्या हातातला प्रसाद ,पेय घे अशा मर्कट लीला मंदिरात सतत सुरु होत्या.तर अनेक कुटुंब वत्सल मर्कट कुटुंबही दिसले.ज्यात आई माकडिणीला पिल्लु माकड चिकटले आहे आणि वडिल माकड त्या पिल्लाला प्रेमाने गोंजारत आहेत. हे पाहुन हेच आपले पुर्वज असतील हे नक्किच पटले.🤩🐒
पंपा-भुवनेश्वरी देवीचे मंदिर विरुपाक्ष मंदिराच्या अगदी जवळ, उत्तरेकडील शांत कॉरिडोरमध्ये विराजमान आहे. या प्राचीन मंदिरात पाऊल टाकताच सुंदर अलंकार-वस्त्रांनी सजलेली देवीची मूर्ती पाहून मन एक वेगळ्याच भक्तीभावाने भरून जाते. १२व्या शतकातील चालुक्य शैलीतील हे छोटेसे मंदिर इतके सुंदर आणि पवित्र आहे की, येथे उभे राहिल्यावर आपण इतिहासाच्या काळात हरवल्यासारखे वाटते. याच ठिकाणी हम्पीच्या महान सम्राटांची संपूर्ण वंशावळ दगडावर इंग्रजीत रंगविली आहे .जी वाचताना जणू हजारो वर्षांच्या गौरवशाली इतिहासाने आपल्याशी बोलत आहे असे वाटले.चार बाजूला स्तंभयुक्त क्लॉइस्टर भोवती फिरणारा मंडप-ओसरीवजा मार्गक्रमण भाग आहे.
पिनहोल कॅमेरा हा जगातील सर्वात सोपा आणि प्राचीन कॅमेरा आहे. यात कोणतीही लेन्स (काच) वापरली जात नाही. फक्त एका अंधार्या खोलीत भिंतीवर एक अत्यंत छोटे छिद्र (pinhole) केले जाते. या छोट्या छिद्रातून बाहेरचा प्रकाश आत येतो आणि भिंतीवर उलटी प्रतिमा तयार होते.हे तंत्र “Camera Obscura” नावाने ओळखले जाते.
प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो, ही मूलभूत भौतिकशास्त्रीय सत्यता विरुपाक्ष मंदिरातील पिनहोल कॅमेरा तंत्रामागील मुख्य रहस्य आहे. जेव्हा बाहेरचा तेजस्वी प्रकाश त्या छोट्याशा छिद्रातून आत येतो, तेव्हा प्रकाश किरण एकमेकांत मिसळत नाहीत किंवा एकत्र होत नाहीत. प्रत्येक किरण सरळ मार्गाने आत शिरतो आणि विरुद्ध भिंतीवर आपली छाप सोडतो. यामुळे बाहेरच्या गोपुराची प्रतिमा पूर्णपणे उलटी तयार होते .वरचा भाग खाली, खालचा भाग वर, डावा भाग उजवीकडे आणि उजवा भाग डावीकडे दिसतो.
मंदिराच्या उत्तरेकडील दाराने बाहेर पडताच, समोर एक पवित्र पुष्करणी दिसते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली होती, तरीही त्या ठिकाणचे शांत आणि पवित्र वातावरण मनाला मोहिनी घालते. हम्पी मंदिरासमोरून पुन्हा जाताना आम्ही हेमकूट टेकडी चढण्यास सुरुवात केली. प्रत्येक पाऊल उचलताना हृदयात एक वेगळाच रोमांच जाणवत होता .
फलपुजा मन्दिरातील खांबावरील वादक व सुरसुंदरी
.jpeg)

.jpeg)
हो त्या दिवशी संध्याकाळीही विविध रंगांनी सजलेल्या आकाशात विरुपाक्षचा गोपुरही पाहिला.त्या आकाशात तो शोभत होता तर त्या सर्वोच्च टोकावर चन्द्र्कोर विराजमान झाली होती..जणु पंपावती शंकराचेच हे रुप!!!😇


मिसळपाव
प्रतिक्रिया
विरुपाक्ष मंदिर अतिशय सुंदर…
विरुपाक्ष मंदिर अतिशय सुंदर आहे. हंपीतून कुठूनही त्याचे रायगोपूर आभाळात उठावलेले दिसते. फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत. पंपा भुवनेश्वरी मंदिरात तर एकदम प्राचीन मंदिरात आल्यासारखे वाटते.
तुमच्या लेखामुळे माझ्या विरुपाक्ष दर्शनाची आठवण आली.
फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर…
In reply to विरुपाक्ष मंदिर अतिशय सुंदर… by प्रचेतस
फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर शिल्पशास्त्रात खास शिखर- उपशिखर अर्थात शृंग-उपशृंग अशा संज्ञा आहेत.
अच्छा 👍
कन्नप्पा नयनार खुप शोधला पण सापडलाच नाही. मी कोणाला तरी विचारायला पाहिजे होते.
कन्नप्पा नयनार अंतराळातील…
In reply to फ्रॅक्टल्स पद्धतीला मंदिर… by Bhakti
कन्नप्पा नयनार अंतराळातील स्तंभावर आहे. केवळ विरुपाक्ष मंदिरातच इतकी शिल्पे आहेत की अगदी साताठ फेऱ्यांतही काहीतरी पाहणे राहून जावे.
हा लेख फार आवडला.
विस्तृत माहिती दिली आहे. इकडे या देवळात कितीही वेळ काढला तरी अपूराच पडतो. बहामनी सुलतानांनी एकत्र येऊन विजयनगर साम्राज्य ध्वस्त केले पण त्यातील देवळे पाडली नाहीत. राजवाडे पाडले, संपत्ती पळवली.
ते पुढे दिसेलच. लक्ष्मी हत्तीची आंघोळ सकाळी तुंगभद्रेत होते तेव्हा आपणही त्यात सहभागी होऊ शकतो.
देवळे पाडली नाहीत पण देव…
In reply to हा लेख फार आवडला. by कंजूस
देवळे पाडली नाहीत पण देव फोडले, विरुपाक्ष आणि आणि २/३ लहान देवळे वगळता एकाही देवळात गाभाऱ्यात मूर्ती नाही. अच्युतराय, विजय विठ्ठल, बाळकृष्ण, हजारराम, सरस्वती, चंद्रशेखर एकही लिव्हिंग टेम्पल नाही.
पण त्यातील देवळे पाडली…
In reply to हा लेख फार आवडला. by कंजूस
पण त्यातील देवळे पाडली नाहीत. राजवाडे पाडले, संपत्ती पळवली.
हे लिहायचे राहिले. नुकतीच एके ठिकाणी याबद्दल माहिती वाचली. फक्त विरूपाक्ष मंदिरात पूजा होते इतरत्र कोणत्याच मंदिरात होतं नाही कारण तिथल्या मूर्ती बहामनीन्नी फोडून भग्न केल्या आहेत.बडवेलिंग येथेही पूजा होते.
*****
हंपीतील बहुतेक मंदिरात मुख्य मूर्ती नाहीच, आणि आहेत त्या भंग केलेल्या....
चौदाव्या शतकात बहामनी सुलतानाने विजयनगर वर आक्रमण केले आणि त्यात त्याला थोडं फार यश आल्यावर भारतातील चारी -पाची मुस्लिम राजवटींनी हंपी अर्थात विजयनगर च्या साम्राज्यावर हल्ला केला. हल्ल्याचा मूळ उद्देश हा हंपीत असणार धन हा होता.
पण येणार सुलतानी आक्रमण एका हातात तलवार आणि एका हातात कुराण घेऊन येते. त्यातून हंपीतील अनेक मंदिराची तोडफोड झाली, मुर्ती भंग केल्या गेल्या.
पण त्यातून देखील जे दोन तीन मंदिर वाचले त्यातील प्रमुख म्हणजे "वीरूपाक्ष मंदिर " जे शिवाचे मंदिर आहे.
त्याची कथा स्थानिक लोक सांगतात की, मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर व बऱ्याच ठिकाणी विजयनगर च्या साम्राज्याचे राजचिन्ह कोरलेले आहे. ज्यात वराह (डुक्कर ),तलवार, चंद्र - सूर्य आहे. हे चिन्ह हंपीत बऱ्याच ठिकाणी दिसेल.
पण ह्या चिन्हात डुक्कर (वराह ) असल्याने ह्या मुस्लिम सैन्याला ते मंदिर तोडता आले नाही. कारण मुस्लिम डुकराला सगळ्यात अपवित्र मानतात, ते त्याच नाव देखील घेत नाहीत.
----- TEAM INDIAN HERITAGE PANDA
खखोदेजा.
बडवीलिंग, यंत्रोद्धारक…
In reply to पण त्यातील देवळे पाडली… by Bhakti
बडवीलिंग, यंत्रोद्धारक हनुमान मंदिर, उड्डाण वीरभद्र मंदिर ह्यात आजही पूजाअर्चा चालू असते.
तसेच बहमनीच्या शकले झालेल्या पाच सुलतानांच्या नासधुशीत ह्या मंदिरांच्या शिल्पांचे फारसे नुकसान झाले नाही (फक्त गर्भगृहातील मुख्य देवता नष्ट झाल्या) ह्याचे कारण म्हणजे ह्या दख्खनी सुलतानांच्या सैन्यात बरेच हिंदू सरदार होते. मूर्तींची नासधूस सर्वच शाह्यांच्या काळात झाली मात्र सुरुवातीची गझनवी, खिलजी, घोरी, आणि मुघलांच्या बाबर आणि औरंगजेब ह्या राजवटी सर्वात असहिष्णु होत्या असे म्हणता यावे, औरंगजेब तर सर्वाथाने बुतशिकन होता.
छान लेख
आताच दोन्ही भाग वाचले . विस्तृत माहिती आणि पूरक फोटो छानच .
🙏
In reply to छान लेख by गोरगावलेकर
🙏