दोन · स्वित्झर्लंड
ती गणपतीपुळ्याची गोष्ट अद्वैतने कधीच कोणाला सांगितली नाही. सांगणार तरी कुणाला ... आणि नेमकं काय ... की समुद्रकिनाऱ्यावर त्याला एक अनोळखी स्त्री भेटली होती जिला त्याचं नाव माहीत होतं… की ती अचानक कुठूनतरी आली आणि क्षणात हवेत विरून गेली..?
तिच्या डोळ्यांत काहीतरी इतकं विचित्र होतं, की आजही ते आठवलं की अंगावर काटा यायचा…
लहानपणी काही गोष्टी आपण स्वतःलाच समजावून सांगतो."स्वप्न असेल", "भास झाला असेल", "लहान होतो तेव्हा वाटलं असेल काहीतरी" आणि मग त्या आठवणी मनाच्या एखाद्या बंद कप्प्यात हळूच ढकलून देतो. अद्वैतनेही तेच केलं होतं. पण मनात खोल कोरल्या गेलेल्या काही आठवणी थोड्या पुसट झाल्या तरी त्यांचं अस्तित्व मिटत नाही. अवचित येणाऱ्या वळिवाच्या पावसासारख्या त्या अचानक परत येतात… आणि हरवलेल्या भावनांना पुन्हा जिवंत करून जातात.
आईला मात्र त्याच्यातला बदल जाणवत होता. पूर्वी सतत काही ना काही बोलणारा, घरभर धावणारा अद्वैत अचानक शांत झाला होता. अनेकदा तो खिडकीत बसून शुन्यात टक लावुन बाहेर बघत राहायचा.
“काय झालं रे?” आई विचारायची. “शाळेत काही झालं का?”“कोणी काही बोललं का तुला?”
तो फक्त हलकेच नकारार्थी मान हलवायचा. कारण उत्तर त्याच्याकडे नव्हतंच.
वर्षं सरली.
कॉलेज, नोकरी, जबाबदाऱ्या… आयुष्य हळूहळू स्थिरावत गेलं.
आणि मग इरा आली. इराच्या अस्तित्वातच एक चैतन्य होतं, स्वभावात एक प्रसन्न अशी उर्मी होती. ती हसायची तेव्हा तिच्यासोबत आसपासचं वातावरणही उजळल्यासारखं वाटायचं. तिच्याशी लग्न झाल्यावर अनेक वर्षांनी अद्वैतला आयुष्य पुन्हा साधं आणि सरळ वाटायला लागलं होतं.
हनिमूनला स्वित्झर्लंडला जायचं हे इराचं स्वप्न होतं.
तिथले बर्फाच्छादित पर्वत, आरशासारखे स्वच्छ आणि नितळ तलाव तिला अनुभवायचे होते. यश चोप्रांच्या फिल्म्सची भुरळ तिच्या मनाला पडली होती. त्या शुभ्र हिमराशींमध्ये डिझायनर साडी नेसून मनसोक्त फिरावं, नकळत एखाद्या गाण्यावर थिरकत स्वतःलाच एखाद्या चित्रपटातील नायिकेसारखं अनुभवावं, आणि भरपूर फोटो काढून घ्यावेत… स्विस हॉटचॉकलेटचा घोट घेत त्या क्षणांना मनात कायमचं साठवून ठेवावं, असं बरंच काही तिने बोलता बोलता मोकळेपणाने सांगून टाकलं होतं.
अद्वैतनेही मग तिच्या नकळत स्वित्झर्लंड ची हनिमून ट्रिप बुक करून तिला सुखद धक्का दिला. जेंव्हा विमानाची तिकिटे त्याने तिच्या हातात ठेवली तेंव्हा इरा अक्षरशः हरखून गेली होती. स्वित्झर्लंडमध्ये उतरल्यानंतर पहिल्याच दिवशी इरा अक्षरशः लहान मुली सारखी उत्साहात होती. झ्युरिक एअरपोर्टच्या बाहेर पडल्या पडल्या, तिने तिचे दोन्ही हात पसरले आणि थंड हवेत खोल श्वास घेत हसत म्हणाली, “आदी… हे खरंच आहे ना? आपण खरंच स्वित्झर्लंड मध्ये आहोत?”
अद्वैत तिच्याकडे पाहतच राहिला.
त्या क्षणी तिच्या डोळ्यांमधला आनंद त्याला कोणत्याही दृश्यापेक्षा अधिक सुंदर वाटत होता.
हॉटेल ला जातानाचा स्विस ट्रेनचा तो प्रवास इराच्या कायम लक्षात राहणाऱ्या गोष्टीं पैकी एक झाला. मोठ्या काचेच्या खिडक्यांबाहेर जणू काही एकाहून एक सुंदर निसर्गचित्रं सरकत होती. बर्फानं झाकलेली लाकडी घरं, दूरवरच्या खोल दऱ्या, टेकड्यांवर चरणाऱ्या गायी, मधूनच दिसणारे धुक्यात हरवलेले चर्चचे मनोरे. इरा खिडकीला नाक टेकवून बाहेर पाहत होती.
“हे बघ… हे अगदी पोस्टर सारखं दिसतंय!” क्षणाक्षणाला ती त्याचा हात पकडून काही ना काही दाखवत होती.
त्यांची ट्रेन एका बोगद्यातून बाहेर आली आणि अचानक पूर्ण डबा सोनेरी सूर्यप्रकाशाने उजळून गेला. बर्फावरून परावर्तित होणाऱ्या त्या प्रकाशात इराचा चेहरा चमकत होता. अद्वैतला क्षणभर वाटलं की हा क्षण इथेच थांबला तर…?
त्या रात्री त्यांनी हॉटेलच्या छोट्याश्या कॅफेमधून हॉट-चॉकलेट रूम मध्ये मागवले.
बाहेर हलकासा हिमवर्षाव सुरू होता.
इराने तिचे थंड पडलेले हात मुद्दाम त्याच्या गालांवर ठेवले आणि गंभीर चेहऱ्याने म्हणाली, “तुझे गाल त्या हीटर सारखे गरम आहेत.”
“आणि तुझे हात बर्फासारखे.” त्याने पटकन उत्तर दिले
“मग गरम कर ना.” ती खोडकरपणे हसली.
अद्वैतने तिचे हात आपल्या हातात घेतले आणि प्रश्नार्थक नजरेने विचारले "फक्त हात ?"
खिडकीबाहेर बर्फ पडत राहिला.
आत मात्र त्यांच्या छोट्याशा रूम मध्ये गुलाबी ऊब पसरली.
दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैतला जाग आली ती इराच्या आवाजाने.
“उठा मिस्टर,” ती पडदे बाजूला सारत म्हणाली, “आपण इथे फक्त आराम करायला आलेलो नाही आहोत.”
खिडकीतून आत शिरणाऱ्या फिकट सोनेरी सूर्यप्रकाशाने खोली उजळून गेली होती. बाहेर दूरवर बर्फाच्छादित पर्वतरांगा चमकत होत्या. रात्री पडलेल्या बर्फावर सकाळच्या उन्हाची हलकीशी चांदी पसरली होती.
अद्वैतने अर्धवट मिटलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहिलं तर ती आधीच तयार झाली होती. हलक्या गुलाबी स्वेटरमध्ये, मोकळ्या सोडलेल्या केसांमध्ये आणि चेहऱ्यावर नेहमीसारखाच उत्साह.
तो आळसावतच पुन्हा पांघरुणात शिरत म्हणाला, “इथेच एवढं सौंदर्य आहे… बाहेर जाऊन अजून काय पाहायचं?”
क्षणभर इराला त्याचा अर्थ समजला नाही आणि जेंव्हा समजला तेंव्हा तिचे गाल नकळत गुलाबी झाले.
“आदी!” ती मुद्दाम रागावल्यासारखी म्हणाली.
तो मिश्कील हसत तिच्याकडे पाहत राहिला.
“खरंच सांगतोय. बाहेरचे आल्प्सपण तुझ्यापुढे फिक्के आहेत"
“फारच लोणी लावतोयस हं तू.” ती हसू दाबत त्याच्याजवळ आली आणि एका झटक्यात त्याचं पांघरूणओढून घेतलं.
गार हवेत अद्वैत अक्षरशः दचकला.
“इराऽऽ!”
ती खळखळून हसू लागली.
“दहा मिनिटांत तयार व्हा. नाहीतर मी एकटीच जाईन हं.”
“ब्लॅकमेल आहे हे.” तो कुरकुरला.
“हनिमूनमध्ये सगळं चालतं.” हसत हसत ती ड्रेससिंग टेबलेकडे वळाली मात्र तिच्या केसांतून मंद परफ्यूम चा सुगंध मागे हवेत रेंगाळत राहिला.
अद्वैत काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहिला. तिच्या हसण्यात अडकलेला तो क्षण मागे झटकत मग लगबगीने उठून तयार होण्यासाठी गेला.
बाहेर फिरताना इरा सतत फोटो काढत होती. आकाशाचे, बर्फावर उमटलेल्या पावलांचे, अद्वैतचे, आणि अर्थातच अद्वैतकडून स्वतःचे.
संध्याकाळी ते दोघे एक तलावाजवळ फिरायला गेले. आसपास पांढऱ्याशुभ्र बर्फाची चादर पसरली होती. दूरवर आल्प्सची शिखरं संध्याकाळच्या केशरी प्रकाशात चमकत होती.
इराने खास हट्टाने हिरवी साडी नेसली होती, गडद हिरवी, आणि त्याच रंगाचे काठावर विणलेले सुदंर गुलाब त्या साडीला आणि साडीतील इराला अजून खुलवत होते. त्या बर्फाळ पार्श्वभूमीवर त्याला इरा स्वर्गातल्या अप्सरेपेक्षाही सुंदर दिसत होती.
क्षणभर अद्वैतला वाटलं, की तो पृथ्वीतलावर नसून खरच स्वर्गात आहे. त्याला पुन्हा वाटले... हा क्षण इथेच थांबला तर…?
थंड वाऱ्याच्या झुळुकीने तिचा पदर सारखा हवेत उडत होता आणि तो सावरण्यासाठी तिची चाललेली धडपड पाहून अद्वैतला हसू आवरेनासे होत होते.
“हसतोयस काय?” ती लगेच फुरंगटली.
“काही नाही.”
“माहितीय मला तुझं ‘काही नाही’.”
ती मुद्दाम रागावल्यासारखी करत पुढे निघून गेली.
तलावाच्या काठावरच्या एका मोठ्या दगडावर बसून तिने हात पाण्यात बुडवला.
क्षणात ती दचकली.
“आदी! हे पाणी अक्षरशः बर्फ आहे!”
ती हसत हसत कुठलं तरी छान रोमँटिक गाणं गुणगुणू लागली.
अद्वैत थोडा मागेच थांबला.
त्याने कॅमेरा उचलला.
तिच्या नकळत काही कँडिड फोटो काढायचे… आणि मग ते दाखवून तिचा रुसवा घालवायचा, कदाचित बदल्यात तिचे ओठ.… तो फोकस सेट करणार इतक्यात त्याला जाणवली…सळसळ.
त्याच्या उजवीकडच्या झाडीतून.
अतिशय हलकी.
पण विचित्र.
क्षणात त्याच्या पाठीतून थंड शिरशिरी गेली.
श्वास जड झाला.
हवा अचानक अधिक थंड वाटू लागली.
आणि मग
ती भावना. तीच.
गणपतीपुळ्याला जाणवलेली.
जणू नेणिवेच्या पलीकडून कुणीतरी त्याच्याकडे पाहत होतं.
अद्वैतने हळूहळू मान वळवली.
झाडांमध्ये… ती उभी होती.
तशीच.
अगदी तशीच.
तीच साडी.
तेच लांबसडक केस.
तेच डोळे.
वीस वर्षं उलटून गेली होती.
पण तिच्या चेहऱ्यावर काळाने स्पर्शही केला नव्हता.
ना कसली सुरकुती. ना थकवा. ना वय वाढल्याची कसलीशी खूण.
जणू ती काळा च्या बाहेर उभी होती.
अद्वैत नकळत तिच्याकडे चालू लागला.
संमोहित झाल्यासारखा.
“काय झालं, अद्वैत?”
ती मंद हसली.
“गोंधळलास का?”
तोच आवाज.
तोच स्वर.
तोच प्रश्न.
जणू मध्ये वीस वर्षं गेलीच नव्हती.
अद्वैतच्या ओठांवर शब्दच फुटेनात.
“ त...तू… कोण आहेस?” त्याने कसाबसा विचारलं.
ती काही क्षण फक्त त्याच्याकडे पाहत राहिली.
“आदी!”
इराचा आवाज दूरवरून आला.
“हे बघ मला काय सापडलं!”
अद्वैत दचकून मागे वळला.
इरा हातात काहीतरी चमकणारं घेऊन त्याच्याकडे धावत येत होती.
फक्त एका क्षणासाठी त्याने पुन्हा मागे पाहिलं.
ती तिथे नव्हती.
रिकामी झाडी.
निश्चल हवा.
पानांची सळसळही थांबली होती.
जणू काही तिथे कुणीच कधीच नव्हतं.
त्या रात्री इरा शांत झोपली होती.
पण अद्वैत मात्र टक्क जागा होता. डोकं अगदी भणभणत होतं.
हॉटेलच्या खिडकीतून बाहेर दिसणाऱ्या काळोखात बर्फ हलकेच चमकत होता. खोलीत हीटरची उब होती… तरी पण त्याच्या हातांना थंडी वाजत होती.
ती कोण होती? अचानक कुठेही कशीही कसे काय प्रकट होते ??
आणि सर्वात महत्त्वाचं
वीस वर्षांत तिच्यात काहीच कसा बदल झाला नाही?
काळाचा तिच्यावर परिणाम होत नाही का?
…की ती काळाच्या बाहेरची आहे?
त्याच्या मनात अचानक आणखी एक विचार चमकून गेला.
भयावह.
कदाचित ती या जगातलीच नाही.
त्या विचाराने त्याच्या छातीवर दडपण वाढलं.
तो इराकडे पाहू लागला.
ती शांत झोपली होती. तिच्या चेहर्यावर हलकंसं समाधान होतं.
या सगळ्या गोंधळापासून पूर्ण अनभिज्ञ.
अद्वैत मात्र जागाच होता.
आणि त्याच्या मनाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात…
एक जुनं, न सुटलेलं कोडं पुन्हा डोळे उघडून बसलं होतं.
क्रमशः
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा भागही आवडला.
मस्त लिहीलय.
ती दोन वेळा दिसली,दोन्ही मधे अंतर वीस वर्षाचे. आता लवकर लवकर भेटणार की पुन्हा वीस वर्ष वाट बघावी लागेल.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
हा भागही आवडला.
मस्त लिहीलय.
ती दोन वेळा दिसली,दोन्ही मधे अंतर वीस वर्षाचे. आता लवकर लवकर भेटणार की पुन्हा वीस वर्ष वाट बघावी लागेल.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
हा भागही आवडला.
मस्त लिहीलय.
ती दोन वेळा दिसली,दोन्ही मधे अंतर वीस वर्षाचे. आता लवकर लवकर भेटणार की पुन्हा वीस वर्ष वाट बघावी लागेल.
पुढचा भाग लवकर येऊ द्यात.
त्रिवार धन्यवाद
In reply to हा भागही आवडला. by कर्नलतपस्वी
त्रिवार धन्यवाद कर्नलतपस्वी! 😀
बीस साल बाद
मस्त आहे--पुभाप्र
धन्यवाद
In reply to बीस साल बाद by राजेंद्र मेहेंदळे
धन्यवाद राजेंद्र मेहेंदळे !