मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ४: पोंगल आणि गुडलूर- उटी- वेलिंग्टन ६७ किमी

मार्गी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार

✪ उदकमंडलम् अर्थात् उटी!! ✪ हिमालय आणि सह्याद्रीचा संगम ✪ पोंगलचा उत्साह आणि सजावट ✪ २० किलोमीटरमध्ये १२०० मीटर चढ असलेला उटीचा घाट ✪ वन्य परिसरातून वर चढत जाणारा रस्ता! ✪ वेलिंग्टन कँटमध्ये राहण्याचा अनुभव नमस्कार. जानेवारीमधल्या सायकल प्रवासाचे अनुभव शेअर करत आहे. १५ जानेवारीची‌ सकाळ. सायकल प्रवासाचा चौथा दिवस. काल गुडलूरमध्ये थांबलो होतो. गुडलूर! उटीच्या पायथ्याचं आगळं- वेगळं ठिकाण. अगदी डोंगराळ प्रदेशात आल्यासारखं वाटावं असं. आज उटीला जायचं आहे. उटीचा घाट! लहानपणी आजोबांसोबत व्यापार खेळताना उटी, कोचीन, दार्जीलिंग, मद्रास अशी‌ गावं ओळखीची झाली! ते उटी! ह्या दक्षिण भारत सायकल प्रवासातला सगळ्यांत मोठा घाट हाच असेल. एका अर्थाने ही एक मोठी परीक्षा आहे. उटीच्या पुढे फार कठिण टप्पे नाहीत, असं वाटतंय. उत्तर भारतातली संक्रांत अर्थात् लोहरी म्हणजे दक्षिणेकडचा पोंगल! काल संध्याकाळीसुद्धा गुडलूरमध्ये लोकांची सजावट आणि तयारी सुरू होती. घरासमोर काढलेल्या रांगोळ्या! त्यासाठी दूरवरून आणलेला ऊस! साग्रसंगीत सजावट आणि सुवासित वातावरण! आज निघताना सुरूवातीला ढग असतील असं वाटलं. पण आकाश खूप स्वच्छ आहे! दूर डोंगरात धुकं दिसतं आहे! गुडलूरमध्ये चहा बिस्कीट घेऊन निघालो. गुडलूरमधूनच घाट सुरू झाला. हा घाट २० किलोमीटर लांब आणि १२०० मी. चढ असलेला आहे. पण चढ पसरट आहे आणि फार तीव्र नाही. त्यामुळे हा घाट मला सायकलवर जमेल असं वाटतंय. आधी ह्याहून तीव्र अनेक घाट चढलो आहे. फक्त एक आहे की, ह्याची लांबी खूप मोठी आहे. त्यामुळे थोडी परीक्षा तो घेऊ शकतो. (माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.) . . . . . . सकाळचं प्रसन्न वातावरण! अजिबात ढग नाहीत. खूप सुंदर नजारे! नजा-यांचा आनंद घेत सायकल चालवतोय. गुडलूरच्या बाहेर छोट्या गावांमध्ये "पोंगलच्या वाईब्ज" जाणवत आहेत! रस्त्यावर वाहनं तुरळक आहेत. रस्ता चढाचा असला तरी खूप आरामात सायकल चालवता येते आहे. हळु हळु रस्ता वर चढत जातोय तसा दूरवरचा आसमंत नजरेच्या टप्प्यात येतोय! किती विलक्षण डोंगररांग आहे ही! हे वन क्षेत्र नसलं तरी प्रत्यक्षात वन आहेच. हत्ती रस्ता ओलांडतात, असे बोर्डस दिसत आहेत. काही ठिकाणी लाल तोंडाची माकडंही दिसत आहेत! व्वा! काही अंतरानंतर धुकं लागलं. पण विजिबिलिटी चांगली आहे. सायकलीच्या मागे ब्लिंकर लावला आणि लक्षपूर्वक सायकल चालवत राहिलो! असा विलक्षण निसर्ग बघून आपोआप गाणी आठवायला लागली. उटी पर्यटनाचं मोठं केंद्र आहे. त्यामुळे इथे बरेच स्पॉटस आहेत आणि म्हणून छोटे हॉटेल्स मिळत राहतील. पहिल्या तासाभरात साधारण नऊ किलोमीटर झाले! म्हणजे जवळ जवळ अर्धा घाट पूर्ण झाला. दूरवर पुढचे मोठे डोंगर दिसत आहेत! काय ठिकाण आहे हे! मनाली, शिमला, श्रीनगर, नैनिताल ह्या सगळ्यांपेक्षा उटीची उंची (२३०० मी.) जास्त आहे! हिमालय आणि सह्याद्रीचा अद्भुत संगम! आणि त्याला साजेसा निसर्ग. सुरूवातीला वृक्षराजी सपाटीवरची होती. पण पुढे युकेलिप्टस आणि पाईन वृक्ष लागले! गुडलूर साधारण १००० मी. उंचीवरचं गाव. तिथला निसर्ग आणि २३०० मी. उंचीवरचा निसर्ग! खूप फरक पडताना दिसतोय! अजिबात ढग नाहीत, त्यामुळे थोडीही आर्द्रता नाहीय. आणि थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे ऊन विशेष नाहीय. त्यामुळे आरामात जात राहिलो. इथे जर ढग किंवा पाऊस आणि आर्द्रता असती तर मात्र हे फार कठिण गेलं असतं! वाटेत अनेक व्ह्यू पॉईंटस लागले पण थांबावसं वाटलं नाही. हळु हळु वाहनांची वर्दळ सुरू झाली. काही बसेसमधली मुलं मला बघून हात करत आहेत! अशा घाटात लोकांना सायकलिस्ट बघण्याची तेवढी सवय नाहीय. अखेर अडीच तास सायकल चालवल्यावर साडेदहाला २० किलोमीटर पूर्ण झाले आणि घाटाचा मुख्य टप्पा संपला. कोणताही त्रास न होता उटीचा मोठा घाट पार झाल्याचा खूप आनंद झाला! आता वेलिंग्टन ४५ किलोमीटर आहे. ते अडीच तासांमध्ये पूर्ण होईल असं वाटतंय. पण नंतर जास्त वेळ लागत गेला. उटीच्या पुढेही छोटे चढ आहेत. मुख्य घाट २० किलोमीटरला पूर्ण झाल्यावर काही उतार आहेत पण मग परत चढ आहेत. त्यामुळे वेळ जास्त लागतोय. आणि सकाळ संपून आता दुपार जवळ येते आहे. त्यामुळे गरमही होतं आहे. उटी हळु हळु जवळ येतंय. जुनं पर्यटन केंद्र! अगदी ब्रिटीशांपासून प्रसिद्ध असलेलं ठिकाण. वाटेत पायकारा लेकसारखे अनेक लेक लागले. किती विलक्षण हा परिसर आहे! २००० मी. हून जास्त उंची असलेलं एक लांब पसरलेलं पठार! टेबललँड! साधारण २:३० पर्यंत तरी वेलिंग्टनला पोहचायचा विचार आहे. कारण तिथल्या कँटोनमेंटमधलं कँटीन २:३० ला बंद होतं. त्यामुळे थोडी वेळेची शर्यत झाली. उटीमध्ये तिसरा ब्रेक घेतला. शहरातली गर्दी मागे पडून लवकर मोकळ्या रस्त्यावर कधी येईन असं वाटतंय. कूनूर- कोईम्बतूरची दिशा दाखवणारा रस्ता घेतला आणि हळु हळु उटी मागे पडत गेलं. दोडा बेट्टा शिखराकडे जाणारा फाटा येईपर्यंत चढ कायम राहिला. तिथून पुढे मात्र सुसाट उतार! पेडल मारण्याचीच जवळ जवळ गरज नाही. थेट वेलिंग्टन कँटोनमेंटमध्ये येईपर्यंत उतार! तिथली व्यवस्था अर्चना ताईंनी केली आहे. अशा मिलिटरी एरियामध्ये जाताना थोडं अस्वस्थ वाटलं! पण तिथला शांत परिसर आणि निसर्ग बघून छान वाटलं. थोडं उशीरा म्हणजे पावणेतीनला पोहचलो. अर्चना ताईंनी तिथल्या लोकांना सांगून ठेवल्यामुळे काही अडचण आली नाही. जेवण करून मग गेस्ट रूममध्ये थांबलो. आजचे ६७ किलोमीटर पूर्ण व्हायला जवळपास ६ तास लागले! उटीच्या पुढेही चढ असल्यामुळे वेळ लागला. सायकल प्रवासातले चार दिवस पूर्ण झाले! दक्षिण भारत सायकल प्रवासातला उटीचा मोठा टप्पा पार झाला! सायकलिंगच्या एका परीक्षेत चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झालो! वेलिंग्टन! सेनेचं एक महत्त्वाचं युनिट, सैनिकी महाविद्यालय आणि प्रशिक्षण केंद्र इथे आहे! संध्याकाळी अर्चनाताईंचे ओळखीचे एक सिनियर ऑफिसर मला भेटायला आले. खूप अगत्याने त्यांनी विचारपूस केली. इतके मोठे ऑफिसर, पण इतक्या सहजपणे भेटले आणि बोलले! ऑफिसर म्हणून ते आलेच नाहीत, एक मित्र म्हणून सिव्हिलियन वेषातच भेटले. त्यामुळे काही दडपण वाटलं नाही. कँटोनमेंटमध्ये गेस्ट रूममध्ये राहण्याचा खूप नवीन अनुभव मिळाला! गेस्ट रूम परिसरातल्या इतर काही जणांसोबत अनौपचारिक भेटी झाल्या. काय दिवस गेला हासुद्धा! स्वत:च स्वत:चा हेवा वाटावा अशी स्थिती आहे! निसर्गरम्य परिसरामध्ये छान आराम झाला. आता उत्सुकता आहे ती उद्याच्या अशाच मोठ्या ठिकाणाची! पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव ५: वेलिंग्टन- ईशा आदि योगी (कोईम्बतूर) ९८ किमी वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 8 एप्रिल 2026.


वाचने 111 वाचनखूण प्रतिक्रिया 1