अशोक खरातवर बोलू काही ?
महाराष्ट्र पुरोगामी म्हणून ओळखल्या राज्यात सध्या अशोक खरात या भोंदूबाबामुळे सगळेच हादरले आहे. महाराष्ट्रातील मंत्री व बड्या राजकीय नेत्यांच्या भविष्य कथनाने नावारुपास आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्याकडे डोळे दीपवणारी संपत्ती सापडल्याच्या बातम्या आहेत. नाशिक शहरासह सिन्नर, अहिल्यानगरमधील शिर्डी, राहता, निघोज, निमगाव कोऱ्हाळे आदी ठिकाणी शेकडो कोटींचे भूखंड आणि शेत जमिनी त्याच्यासह कुटुंबियांच्या नावे आहेत, असेही आपण वाचत आहोत. महाराष्ट्रात आणि बाहेरही या भोंदू खरातने मोठी माया जमवली असावी. काही शासकीय शासकीय अधिकारी त्याचा भागीदार बनल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे महिलेचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी खरातचा शहरातील बंगला, कार्यालय आणि सिन्नर येथील शेत घराची झाडाझडती घेतली. त्यात पिस्तूल, जिवंत काडतुसे, आठ लाखांची रोकड, दोन लॅपटॉप, मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आल्या. स्वतःसह कुटुंबाच्या नावावर, अनेक मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, असे वृत्तपत्र बातम्या आहेत, शेकडो कोंटीच्या घरात या किमती आहे. एकीकडे भोंदुगिरी आणि दुसरीकडे जमिनीच्या खरेदी-विक्री असेही उद्योग तो करत होता, शंभर हून अधिक देशांची त्याने सफर केल्याचे सांगितले जाते.
महाराष्ट्रातील जनता फ़सतेच कशी हा मूख्य प्रश्न आहे, चर्चा प्रस्तावात सविस्तर चर्चा व्हावी, कोणतेही आक्षपार्ह व्हीडीयो टाळून छायाचित्र टाळून आपली मतं नोंदवावीत. धन्यवाद.
प्रतिक्रिया
उत्तर
महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात अशा प्रकारच्या घटनांनी खरोखरच चिंतेची भावना निर्माण होते. अशोक खरात याच्याबाबत समोर येणाऱ्या बातम्या- अत्यंत मोठी संपत्ती, राजकीय-सामाजिक वर्तुळात वावर, आणि त्याचबरोबर गंभीर गुन्ह्यांचे आरोप या केवळ एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नसून, व्यापक सामाजिक समस्येकडे निर्देश करतात.
मुख्य प्रश्न हा आहे की, “लोक फसतात कसे?”
यामागे काही ठळक कारणे दिसून येतात:
अनेक लोक संकटाच्या काळात तर्कापेक्षा “कोणी तरी मार्ग दाखवेल” या आशेने अशा व्यक्तींवर विश्वास ठेवतात. भविष्यकथन, उपाय, पूजा यामधून मानसिक दिलासा मिळतो, आणि तेच पुढे विश्वासात रूपांतरित होते.
जेव्हा मंत्री, अधिकारी किंवा नामांकित व्यक्ती अशा बाबांच्या संपर्कात असल्याचे दिसते, तेव्हा सामान्य माणसाचा विश्वास अधिकच वाढतो—“हे मोठे लोक जातात, म्हणजे काहीतरी खरे असेल” अशी मानसिकता तयार होते.
अशा प्रकरणांमध्ये अनेकदा तक्रारी उशिरा येतात किंवा पुरावे गोळा होण्यास वेळ लागतो. तोपर्यंत अशा व्यक्तींचे जाळे मोठे झालेले असते.
काही लोकांना पटकन यश, पैसा किंवा समस्या सोडवण्याचा शॉर्टकट हवा असतो. हीच मानसिकता भोंदूगिरीला खतपाणी घालते.
शिक्षण असूनही वैज्ञानिक दृष्टिकोन (scientific temper) प्रत्यक्ष आयुष्यात वापरण्याची सवय कमी आहे.
पुढे काय करायला हवे?
शेवटी, ही घटना केवळ एका “भोंदूबाबा”ची नाही, तर समाजाच्या विचारसरणीची कसोटी आहे. लोकांनी प्रश्न विचारण्याची सवय लावली, तर अशा घटना कमी होऊ शकतात.
लोक विश्वास ठेवतात आणि फ़सतात.
आपली मतं ही टूल्सचा वापर करुन दिलेली असलेली तरी योग्यच आहेत. खडे, मूत्र, व्हीयाग्रा आणि काय काय माध्यमामधून येत आहे. च्यायला, लोक आपल्या विवेकाचा बुद्धीचा वापरत थोडाही करत नाहीत. इतका कसा हा मोह माया सत्ता संपत्तीचा नाद म्हणायचा. काल एका महिलेने आरोप केला की, २०२० पासून हा भोंदु पूजा धार्मिक विधी करायचे आहेत म्हणून ब्लैकमेल करुन बलत्कार करायचा. तू ऐकले नाहीस तर, मुलांना मारुन टाकेन. घरातल्याना मारुन टाकेन. अतिरेक झाला या बाबाचा.
माणसं बुद्धीवादी व्हायच्या ऐवजी आपण पाहतो की, अजून गोबरवादी व्हायला लागली आहेत. राजकारणात कोणाला तरी शह द्यायचा, दाबायचं, आहे, त्यासाठीही अशा गोष्टींचा वापर होत आहे, हे सगळ दुर्दैवी आहे. अशोक खरात जस जसा प्रकरणे काढेल मला वाटतं, त्याला फ़ार काळ जगूही देणार नाहीत असे वाटते.
-दिलीप बिरुटे
प्रतिसाद टेस्टिंग व्हावे…
प्रतिसाद टेस्टिंग व्हावे म्हणून टूल वापरले.
बाकी तुम्ही येथे गोबरवाद आणणे अस्थानी आहे असे वाटते. मध्येच दुसरा विषय घुसडल्यामुळे मूळ विषयाचे गांभिर्य कमी होते असे वाटते.
शब्द....
अज्नानी प्रवृत्तीसाठी तो शब्द आहे, विवेक गमावल्यानंतर लोक कसे वावरतात त्याचं उत्तम उदाहरण आहे, आपण त्या शब्दाकडे दूर्लक्ष करावे. मात्र या विषयावर लिहिते राहावे.
-दिलीप बिरुटे
फॉरवर्ड पोष्ट.
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनचे राजकीय लागेबांधे होते. सत्तांतरात त्याच्याकडे महत्वाचे रोल असत. आमदारांचा घोडेबाजार असो की निवडणूकीसाठीचा पैसा असो, तो लक्षणीय मदत करत असे.
चंदन तस्करीआडचा वीरप्पनचा चेहरा भेसूर नसून त्याच्या ब्लॅकमेलिंगचा होता.
तो जिवंत राहिला तर आपल्या नरड्यातले हाडूक ठरू शकतो हे लक्षात येताच एरव्ही दर्शन दुर्लभ असलेल्या वीरपप्पनचे एन्काऊंटर केले गेले.
अशीच हकीकत अब्दुल करीम तेलगीची होती.
तेलगीने बनावट स्टॅंपची प्रिंटिंग प्रेस काढली होती. तत्कालीन पॅावरफुल राजकारण्यांनी त्याला लाळ गळेपर्यंत ओरपून ओरपून खाल्ले.
त्याच्याकडे पैसा मजबूत होता. पोलिसांनी तर त्याला अक्षरशः ओरबाडून घेतले. नंतर त्याचा वापर संपला नि मग तुरूंगात असताना त्याला मृत्यू आला.
अशोक खरातकडे ॲाफिसबॅाय म्हणून कामाला असणारा नीरज जाधव करामती माणूस. खरातकडे येणाऱ्या बायकांच्या संपर्कात तो राहायचा.
काही विशिष्ट मंदिरातील निवडक पुजाऱ्यांशी खरातने संधान बांधले. तिथे येणाऱ्या भाविक स्त्रियांना जाधवशी कनेक्ट केले जायचे. जाधव त्या नडलेल्या अडलेल्या बायकांना नीट कनेक्ट करायचा.
जाधवने खरातचे बिंग फोडलेय. विविध राजकारणी मंडळींना ‘मल्टिपल सर्व्हिस आणि माझा मॅंगो‘ देणारा खरात केवळ हेपल्या माणूस नव्हता. तो मिडिएटर होता.
तेलगी आणि वीरप्पन सोबत जे घडले ते खरातसोबत घडू शकते.
भारतातली लोकशाही एका महान टप्प्यावर पोहोचलीय तिथे अशा घटनेचे सरकारी उदात्तीकरण करून त्याचे लॅालिपॅाप चघळायला मीडियाला खूप आवडते. लोकदेखील याचे हाडूक चार दिवस चघळतात आणि सोडून देतात;
नवा खरात, नवा तेलगी आणि नवा वीरप्पन पैदा झाला तरी आम्ही खोलात जाऊन मुळावर घाव घालत नाही, प्रश्नचिन्ह लावत नाही! दीड अब्ज नंदीबैलांच्या देशात प्रश्न विचारणे हा गुन्हा ठरला आहे, इथे आता लोकांनी नंदीबैलांगत मान डोलावणेच अपेक्षित आहे!
- समीर गायकवाड
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर सदर…
@प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर
सदर आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी ही अपेक्षा आहे.
या आरोपीला मनुवादी म्हणायचं आहे की नाही हे एकदा क्लिअर करून सांगता का?
तसेच वर "माणसं बुद्धीवादी व्हायच्या ऐवजी आपण पाहतो की, अजून गोबरवादी व्हायला लागली आहेत." असंही तुम्ही म्हटलं आहे. तर सदर आरोपीलाही गोबरवादी म्हणायचं आहे की नाही हेही एकदा क्लिअर करून सांगता का?
नाही म्हणजे, त्या हिशोबाने प्रतिसाद द्यायचं ठरवता येईल म्हणून म्हणतो.
दररोज नवं काही तरी....
अशोक खरात या भोंदूच्या दररोज नवनव्या कथा येत आहेत. किती सांगाव्या आणि किती लिहाव्यात....
एक दिवस आपण यालाही विसरु इतकंच वाटत आहे.
-दिलीप बिरुटे
दुनिया झुकती है....
झूकानेवाला चाहिए....
ह्या नराधमाला कठोर शिक्षा व्हायला हवी....
तरी नशिब
तरी नशिब, ह्यात पहिल्यांदा शाहु, फ़ुले, आंबेडकरांच्या नावाने चालणार्या पक्षची महिला सापडली, पदावरुन पाय उतार झाली. नावडत्या पार्टीचा नेता सापडला असता तर आतापर्यंत टाळ्या, थाळ्या, टिर्या आणि उर बडवून झाला असता.
भोंदूबाबा ह्याचा नक्की अर्थ…
भोंदूबाबा ह्याचा नक्की अर्थ काय ? भोंदू सोडून आणखीन कुठल्या प्रकारचा बाबा असतो का ? आणि हे कोण ठरविणार ?
धार्मिक भावनांचा फायदा घेऊन माया जमविणे ह्यांत नवीन काहीच नाही आणि काही चुकीचे सुद्धा नाही. लोकांनी स्वतःहून दिले तर त्यानं लुडबुड करणारे आपण कोण ? त्यामुळे किती जमिनी आहेत आणि किती संपत्ती आहे हा मुद्दा नगण्य आहे.
लैगिक शोषण आणि बेकायदेशीर हत्यारे वगैरे हे वेगळे गुन्हे आहेत त्याची चौकशी व्हावी. पण अंधश्रद्धा किंवा व्यक्ती बाबा होती कि नाही ह्याचा काहीही संबंध नाही.
भोंदूगिरी...
>>>अंधश्रद्धा किंवा व्यक्ती बाबा होती कि नाही ह्याचा काहीही संबंध नाही.
आपल्याला करणी-बाधा झाली आहे, किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येणार आहे, अशी भीती घालून, त्यातून मुक्त होण्यासाठी महागडे विधी किंवा अघोरी उपाय करायला लावणे, हे भोंदूपणाचे मुख्य लक्षण आहे. यामध्ये लोकांच्या मानसिक हतबलतेचा फायदा घेतला जातो.
आपली योनी शुद्ध झाली की आपल्याला होणारे बाळ अद्भुत अलौकिक जन्माला येईल. अशा भूल थापा मारून अबलेचा फायदा घेणे ही बुवाबाजीच आहे आहे भोंदूगिरी आहे. चिंचोके पूजा, मध पूजा, सापांची भिती दाखवून चमत्कार आणि आपण ईश्वराचे अवतार सांगून देवाळू श्रद्धाळु लोकांना भरीस घालणे ही भोंदूगिरीच आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती असा दावा करते की ती केवळ स्पर्शाने, अंगारा देऊन किंवा मंत्राने कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करू शकते, तेव्हा ते भोंदुपणाचे लक्षण मानले जाते. वैद्यकीय शास्त्राला आव्हान देणारे हे दावे पुराव्याविना केले जातात त्यास स्पष्ट भोंदूगिरी म्हणतात.
-दिलीप बिरुटे
खरातचं काय चुकलं? काही नाही…
खरातचं काय चुकलं? काही नाही.
त्याने फक्त डिमांड सप्लाय वापरलं.
समाजातील लोक लोभापायी आणि आणखी लाभ मिळवण्यासाठी तोडगे शोधत असतात.