मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

साधी सुकी भेळ

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक भेळ आहे. रामण्णा बुट्टी भेळ. एका (प्लास्टिकच्या) बुट्टीत तिघा चौघांना पुरेल असा चिवडा, पातीचा कांदा, शेंगदाणे, कोथमीर, थोडं नावापुरतं फरसाण आणि मटकी शिजवून अशी भेळ देतात. वरून एक आक्खा कांदा आणि हिरव्या मिरच्या. बास. हिला मटकी भेळ असेही म्हणतात. यात चिंचेचा कोळ गूळ वगैरे काही नसते. चिवडा देखील आपले लांबडे मुरमुरे हळदीत आणि कढीपत्त्याची फोडणी दिलेले. आमचा आज्जा कधीतरी असे चिरमुरे फरसाण घरी घेऊन यायचा. आणि आम्ही मग कांदे चिरून कधी कधी टमेटो (पूर्वीचा उच्चार टोमॅटो) चिरून अशी सुकी भेळ करून खात असू. एखाद्या देवळाला जाताना हमखास या भेळेचे सामान घेऊन जाऊन तिथे अशी भेळ करून खाल्ली जायची. लहान पल्ल्यांच्या सहलींच्या नियोजनात आयत्यावेळेस देखील येऊन मंच गाजवणारा यशस्वी कलाकार असावा तशी ही भेळ. किंवा एखाद्या देवस्थानात लग्नाला जायला निघालेले वर्‍हाड असो, तिथे लगेच स्केल होऊ शकणारा हा नाश्ता कुणीतरी नियोजनपट्टू हमखास एकदम टाईट बजेट मधे बसवतोच. हिच्याबद्दल कुणी फारसे पॅशनेट नसते. हे एक बरे आहे, खरेतर अस्मितांचे गंड नाहीसे करायला भेळेवर माणसांनी एकमेकांशी बोलावं. तोंड खवळून घ्यावं पण पुढचा बकाणा भरण्यासाठी. आणि वचावचा बोलणं थांबवावं. त्यानंतर गावी गेल्यावर Knock Out किंवा एल.पी. सारखी थर्ड क्लास सुंदर बियर घेऊन दोस्तांचे टोळके गेले की पुन्हा अशीच भेळ साथीला. नोकरी लागल्यावर फक्त बियरचा ब्रँड बदलला मॅग्नम बडवायझर किंवा मिलर वगैरे, (उगाच आपला लायकी नसलेला शो ऑफ, लायकी एल पीचीच). पण भेळ तीच. मटकी भेळ तर खासच. आणि असल्या फाटक्या बियरपार्टीला असलीच भेळ पाहिजे. हार्ड लिकर वगैरे साठी इतर उच्चभ्रू चकणे. मग दूर गावाबाहेर एखादा वन बीएच के किंवा अजून थोडा मोठा ब्लॉक किंवा नवं बैठं घर असो की त्याचे बांधकाम कुठवर आले आहे त्या विझिट मधे बायको पोरांबरोबर गावठी चैन करायला आपले एक मध्यमवर्गीय रिच्युअल. हा एक टप्पा पूर्ण होत असताना भेळ असते साथीला. मग तेच चक्र पुन्हा. मला काही कधी चौपाटी समुद्रकिनारा लाभला नाही. तिथेही हिचे प्रकार मिळत अस्तात. ओल्या भेळेला ग्लॅमर आहे, आजकाल तिच्यात कैरीपासून अननसापर्यंत काहीही टाकतात मात्र ही अजून ही एकदम रिलायबल आहे. पेपरवर खा नाहीतर कागदी प्लेटात खा किंवा थेट आमच्या सारखे बुट्टीत खा. काही नखरे नाहीत. हा फोटो रेडिटवर पाहिला. bhel

वाचने 3077 वाचनखूण प्रतिक्रिया 33

ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. आमच्या इकडे यांना मुरमुरेच म्हणतात. अगदी ओपेक पांढरे नसतात. त्यामुळे ही भेळ वेगळीच लागते. विडिओ इथे.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

अभ्या.. गुरुवार, 02/26/2026 - 20:22
ह्या मुरमुर्‍यांना ट्रान्सपरंट फोड असतात. हे पंढरपुरी चुरमुरे. समस्त सोलापूर आणि मराठवाड्यात हेच चुरमुरे चालतात. हे भडंगच्या चुरमुर्‍यापेक्षा हलके, पोकळ आणि कुरकुरीत असतात त्यामुळेच ह्याचा चुराही होतो पटकन. केलेल्या चिवड्याच्या तळाशी मीठमसाल्यासोबत बसतो. सोलापुरात खैरमोडे, कत्ते आदी भडभुंजे लोक ह्या चुरमुर्‍यासाठी कित्येक वर्षे प्रसिध्द आहेत. भट्टीत भाजलेले चुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, लाह्या आदीसाठी खास त्यांची दुकाने आहेत. पंढरपुर गावात भत्ता म्हणले जाते. दहाबारा मित्र मिळून त्यातीलच एखाद्याच्या दुकानात, हपिसात, कारखान्यात भत्ता करतात. दिड दोन किलो चुरमुरे, शेंगदाणा कच्चे तेल, शेंगादाणे, दाळे, तिखट, गोडा मसाला, मिठ हे सर्व एकत्र चोळले जाते हलक्या हाताने. तीन चार पेपर पसरुन त्यावर हा ढीग असतो. हौसेसाठी थोडा फरसाण , शेव, गाठी, पापड्या, बारीक चिरलेला कांदा आणि पिळलेले लिंबू. सुरुवातीला मंदाद्रीसम दिसणारा पर्वत गप्पा, गावच्या कुचाळक्या आणि समस्त दुनियेची मापे काढत कधी पेपरखाली गेलेले चुरमुरे हुडकण्यात बदलतो ते कळतही नाही. बार्शी गावात गुंड म्हणून एक भेळवाला होता. चुरमुर्‍याचा चिवडा, तिखट चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, ओल्या हरभर्‍याची उसळ, तिखट, मसाले, कांदा, कोथींबीर आणि शेव फरसाणाचे असे जालीम मिश्रण करायचा की बस्स. लहानपणी ह्याची हातगाडी होती, त्याचे हॉटेल झाले पण हॉटेलच्या दारात हातगाडी कायम. समस्त बेवडे, हौशी आणि कुंटुंबवत्सलांच्या गर्दीत हा पुडा मिळवणे म्हनजे दिव्य कामगिरी असायची. थोडीफार अशीच पण जरा सॉफिस्टिकेटेड भेळ पिंपरीमध्ये नितीन म्हणून कुदळे बंधूंची आहे त्यांची सुकी भेळ ही आवडते. लेखात वर्णिलेली बिरादाराची भेळ ही चाखली आहे. सोलापूरपासून जतकडे जाणारे पब्लिक (मुख्यत्वे गुड्डापूर धानम्माचे भाविक) भरपूर असलेने आणि सांगली जिल्हा, कर्नाटक बॉर्डर ही साम्यस्थळे असल्याने ही संस्क्रुती ओळखीचीच.

In reply to by अभ्या..

गवि गुरुवार, 02/26/2026 - 20:40
भत्ता हा शब्द हा लेख वाचल्यावर आठवला होता. पुलंच्या खाद्यजीवनमध्ये बहुधा भत्त्याचा उल्लेख आहे. इतका विषय निघालाच आहे तर पुण्यात बाजीराव रोडला कोणते थिएटर होते (रतन का?) त्याच्या समोर घाटगे चिवडावाले एक गाडी लावायचे. विविध चिवडे मिक्स करून त्यावर कांदा, वेगवेगळे मसाले वगैरे शिंपडून कागदात द्रोण करून द्यायचे. फार वर्षे, म्हणजे पंचवीस सव्वीस झाली. घाटगे नावात काही चूक असेल तर चुभुदेघे. मुख्य म्हणजे फारच टेस्टी आणि ॲडिक्टिव्ह चिवडा मिक्सचर असायचे ते. अजून मिळते का? बहुधा अनिल अवचट यांनी या चिवड्याबद्दल कुठेतरी लिहीलं होतं.

In reply to by गवि

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:34
रतनपाशी असलेलं ते चिवड्याचं दुकान अगदी आत्तापर्यंत चालू होतं, कोविडच्या काळात कधीतरी बंद पडलं ते. परत सुरुही झालं होतं नंतर पण हल्ली दिसत नाही, दुसरीछ टपरी सुरु झालीय आता. आणि ते बाजीराव रोडवर नव्हे तर फरासखान्यापाशी होतं.

गवि गुरुवार, 02/26/2026 - 08:20
नॉक आऊट.. प्रयोगशील होतात म्हणजे तुम्ही देखील. कोब्रा, कॅनन १००००*, खजुराहो यांचा उल्लेख नसल्याने खिन्नता आली. बाकी तुमची भेळ फक्कड दिसते आहे. आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग. त्यात कांदा टोमॅटो घालून अधिकच भारी. त्यातही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, विशिष्ट लोकल, गल्लीतल्या खास काही नेहमीच्या दुकानांतून आणलेले भडंग. गेले ते दिवस.. * आकडा जितका जास्त तितकी स्ट्राँग अधिक असेल अशी मानसिक प्रतिमा होण्याचे ते दिवस. प्रत्यक्ष कायद्यानुसार आठ टक्केपर्यंत हीच मर्यादा, हे तेव्हा लक्षात येत नसे.

In reply to by गवि

सौंदाळा गुरुवार, 02/26/2026 - 16:34
कॅनन १०००० वरुन सुरुवात केली नंतर झिंगारो आणि खजुराहो कधी कधी पण कॅननची मज्जा वेगळीच होती. एकदा भंडारदर्‍याला एका खोपटात कॅनन १०००० मागतली तर नुसतीच १०००० असलेली कोणतीतरी बिअर दिली होती. मुसळधार पावसात अंधार्‍या खोपटात १०००० आणि खेकडा भजी आणि जेवायला अंडा भूर्जी आणि गरमा गरम चपाती अजून लक्षात आहे. किंगफिशर, ट्युबोर्ग, बडवायजर वगैरे आल्यावर कॅनन वगैरे गायब झाली आणि हेवर्डसपण आता मिळते का माहीती नाही. आता बिअर सोडून ७-८ वर्षे झाली. सध्या काळ्या कुत्र्यावर खूष आहे.

In reply to by गवि

चावटमेला गुरुवार, 02/26/2026 - 16:44
तही गोरे भोरे रूढ ब्रॅण्डेडपैकी नव्हे, भोरे भडंग मला कायम बकवास वाटला. गोरे चांगला आहे. कपाले बेश्ट. जयसिंगपूर चा अंबा पण काही खास नाही.

कांदा लिंबू गुरुवार, 02/26/2026 - 13:58
चटकदार दिसते आहे बुट्टी भेळ! विडिओ पहिला; चांगलीच लोकप्रिय दिसतेय. त्या भागात गेलो तर खाईन नक्की.
आमचे फेवरीट म्हणजे सांगलीचे भडंग.
हा सांगलीचा* सुप्रसिद्ध कपाले भडंग एकदा खाण्यात आला होता. अतिऽशय आवडला होता. खाऊन झाल्यावर कव्हर चा मुद्दाम फोटो काढून ठेवलाय.  कपाले भडंग  कपाले भडंग --- *विभक्तीचा प्रत्यय बरोबर आहे का?

In reply to by गवि

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:42
गवि आपण गावच्या आठवणी काढून हळवं केलंत बघा. कपाले हा बहुधा खूप वर्षांपूर्वी (३०-३५) पद्मा टॉकीज समोर एका खोक्यात सुरू झालेला ब्रँड असावा असे वाटते. गोरे आणि भोरे मात्र त्याहूनही जुने. गोरे भोरे खूप गोड करतात असं वाटतं. अगदी आमच्या शाळेसमोरेही पार्ले बिस्किटांच्या पत्र्यांच्या जोड डब्यात असा भडंग विकला जायचा. ओल्या भेळेच्या निम्म्या किमतीत. जुने आंबट गोड दिवस.

In reply to by स्वधर्म

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:03
पद्मा टॉकीज समोरील दुकानामधे गडकरी भडंग मिळते . के डब्लु सी कॉलेज कडे जाताना सांगली बेकरी या दुकाना मधे "सांगली भडंग " मिळते . ते ही चवीला चांगले आहे .

In reply to by कांदा लिंबू

मदनबाण Fri, 02/27/2026 - 12:41
जयसिंगपूर [ नृसिंहवाडी ]- कोल्हापूरला जाणे झाले की अंबा भडंग आठवते, ती बी लईच फेमस हाय. कपाले ट्राय मारायला हवी.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Karma Video Song (Hindi) - Kantara Chapter 1

विजुभाऊ गुरुवार, 02/26/2026 - 15:24
मी दोन वेळा कॅनन१०००० प्यालो. दोनही वेळेला अर्धा ग्लास घेतल्यावर डोके कोणीतरी दगडाने हाणले असावे इतके दुखायला लागले. तेंव्हापासून असल्या १०००० वगैरेच्या भानगडीत कधी पडलो नाही. बाकी भेळेबद्दल म्हणाल तर नगर पुणे रस्त्यावर सगळीकडे अशीच भेळ मिळते. सोबत झकास तळलेली मिर्ची.

स्वधर्म गुरुवार, 02/26/2026 - 15:58
भेळेसारखा साधा विषय... परंतु तुंम्ही भेळेप्रमाणेच खुसखुशीत आणि चटकदार करून मांडला आहे. आवडला. मी काही वर्षांपूर्वी अनुभव मासिकात संपत मोरे यांचा एक लेख वाचला होता. जतजवळच्या संख आणि उमदी या दोन गांवांतील पारंपारिक वैराबाबत. अनेक दशकांपासून दोन्ही गावचे गांवकरी काही झाले तरी परस्परांशी कसलाही व्यवहार ठेवत नाहीत. खूपच मजेदार लेख होता. तुंम्हाला त्यावर काही माहिती असेल तर नक्की लिहा.

In reply to by स्वधर्म

या वैराबद्दल ऐकले आहे परंतु आम्ही कधी ते प्रत्यक्ष अनुभवले नाही. हा लेख मी वाचला नाही, आता मिळेल का ते माहित नाही. धन्यवाद, मिळवायचा प्रयत्न करतो.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

सिरुसेरि Mon, 03/16/2026 - 21:06
पंढरपुर येथे "तुरीवाले" आणी "कलगीवाले" अशा दोन गटांमधे दिवाळीच्या काळात एका ठराविक दिवशी दगडफेकीचा सामना रंगतो , असे पुर्वी कधी तरी वाचले आहे .

In reply to by हणमंतअण्णा शंक…

स्वधर्म Tue, 03/17/2026 - 20:24
दोन्ही गावातील लोक एकमेकांच्या गावात पाणीही पीत नाहीत, कधीही मुक्काम करत नाहीत. मुली देण्याचे, सोयरिक करण्याचे तर दूरच. संपत मोरे यांचा लेख मनोरंजक होता व त्यांनी दोन्ही गावच्या गावकर्‍यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. मूळ वाद कैक दशकांपूर्वी कदाचित तालुक्याचे ठिकाण कुठले असावे यावरून किंवा देवस्थानाच्या यात्रेवरून झाला असावा अशी काहीशी माहिती होती.

Bhakti गुरुवार, 02/26/2026 - 16:37
सुकी भेळीचे आपले एक चाहते असतात.आमच्या ह्याना सुकी आणि मला ओलीच भेळ आवड्ते. नगराची आशा भेळ ,पुण्यातही आता मिळते.https://ashabhel.in/ नेप्ती भेळ्ही प्रसिध्द आहे.

१. एक लांबडे भातासारखेच पांढरे ओपेक २. एक गोल स्फेरिकल किंवा लहान पपईच्या आकाराचे जे सांगली भागात भडंगांसाठी वापरतात ३. एक ट्रान्स्परंट फोड असलेले हलके मुरमुरे चुरमुरे ==== कोण कशालाही मुरमुरे म्हणतात. भडगांचे गोलसर चुरमुरे हे मी पंढरपुरी चुरमुरे म्हणून समजत होतो. जर्मन लोकांनी हे सर्व कन्फ्युजन घालवण्यासाठी यांचे स्पष्ट प्रकार करून यांना अतिशय स्वयंस्पष्ट नावं दिली असती आणि हा गोंधळ कायमचा मिटवून टाकला असता. ====== एकदाचे मिपाकर बसून आपण ही नावं ठरवून मोकळं होऊ. गावांची किंवा प्रोसेसची नावे देण्यापेक्षा काहीतरी अनअ‍ॅम्बिग्युअस अशी नावे देऊ. किंवा कुणी व्यापारी लोकांनी केले आहे का असे नोमेनक्लेचर?

विंजिनेर Fri, 02/27/2026 - 02:23
वा! लेख आणि प्रतिसादात उघडलेले स्मृतीकोश - सगळेच चटकदार! वाचून तोंडात पातेलंभर लाळ जमा झाली (बर्‍याच दिवसांनी मिपा पेश्शल वाक्प्रयोग करायला मिळाला) जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय? आता म्हणे त्या मूळ भेळवाल्याचा नातू चालवतो स्टॉल...

In reply to by विंजिनेर

गवि Fri, 02/27/2026 - 03:44
जाता जाता: पुण्याच्या शिवाजीनगर रेल्वे स्टेशनावरची "झटका भेळ" कुणा कुणाला आठवतेय?
आठवते. फार पूर्वीची गोष्ट. आणि फार वेळा जाणं झालं नसलं तरी आठवतं आहे. ते वृद्ध गृहस्थ भेळेत चमच्याने एकेक घटक, मसाला किंवा चटणी घालताना अंगाला झटके देत देत घालायचे असे स्मरते. त्यावेळी कोणीतरी मला सांगितलं होतं की त्यांना काही व्याधी असल्याने असे होते. मुद्दाम करत नाहीत. खरं काय ते माहीत नाही. मला तर स्वारगेट स्थानकावर एक विशिष्ट भेळ नेहमी खात असल्याचं आठवतं. वेळी अवेळी कधीही बसने प्रवास असो, ही भेळ नेहमी घेतली जायची. नाव विसरलो.

In reply to by विंजिनेर

सौंदाळा Fri, 02/27/2026 - 11:20
हो आठवते ना प्लॅट्फॉर्मवर एका कट्ट्यावर तो माणूस बसायचा आणि भेळ मिक्स करताना हाताला लकवा मारल्यासारखा झटका द्यायचा. आता स्टेशनच्या बाहेर ते दुकान आहे आणि त्यांचा नातूच चालवतो असे ऐकले होते पण अजून पण तिकडे कधी गेलो नाही.

In reply to by विंजिनेर

प्रचेतस Sat, 02/28/2026 - 10:37
नाही तेव्हा ते दुकान तेव्हा स्टेशनच्या आवारातच होते, मात्र प्लॅटफॉर्मवर नव्हते. स्टेशनच्या प्रवेशद्वाराच्या ४ पायर्‍या चढून आल्यावर उजव्या हातास होते. आता मात्र ते पूर्णपणे स्टेशनच्या बाहेर एका टपरीवजा खोक्यात आहे. क्वालिटी मात्र खालावलीय.

अभ्या.. Wed, 03/18/2026 - 00:26
परवाच इथल्या एशियन स्टोअर मध्ये कल्याण भेळीचा पॅक मिळाला. चुरमुरे फरसाण आणि दोन चटण्या ची पाकिटे असा सरंजाम होता. कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि शेंगदाणे आपले आपण घालायचे होते. तिघांना चौघांना एकेक डिश येईल इतके प्रमाण होते. पुण्यात खाल्लेली कल्याण भेळ जवळपास तशीच चव होती. चार भेळीसाठी चार युरो मोजले. अधिकचे सामान आणि कष्ट मोजले तर दिडशे रुपयाला एक प्लेट पडली.