एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो.
फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती.
हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53531
इतके कंटाळलो होतो की रोजच्यासारखे जित्या बोलावत असतानाही ग्राउंडवर क्रिकेट खेळायला गेलो नाही. त्याची कालची बॅटिंग द्यायची राहिली होती.पण बॉलिंग करताना टाकलेला बॉल समोरच्या स्टंपापर्यंत तरी पोहोचला असता ही शंकाच होती. घरी लवकर आलो तर आई शेजारी किल्ली देऊन दळण आणायला गेली होती.
शाळेतून कंटाळा सोबत आणलेला होता. आईने सांगितले असते तर डबाभर कंटाळा गिरणीत दळायला टाकून आलो असतो. पीठ झालेला कंटाळा मग वार्यावर उडवून लावला असता. अंजी अंगणात फुलबॅट खेळत होती. तीला कंटाळा कसा येत नाही कोण जाणे. कोणाचे लग्न हा शाळेतला प्रश्न तीलाही पडला असणारच. पण ती तसे दाखवणार नाही. आपण विचारायला गेलो की जास्तच भाव खाणार.
त्यापेक्षा आईला विचारले तर? पण तीला तरी काय माहीत. ती थोडीच शाळेत आली होती.
आईला शाळेत न येताही बर्याच गोष्टी माहीत असतात. गणीते येतात. इंग्रजी शब्दांची स्पेलिंग येतात. मराठी कविता येतात. संस्कृत मधली सुवचने देखील येतात.
पुस्तकात न लिहीलेले श्लोकही येतात.आपल्याला गृहपाठ काय मिळणार तेही माहीत असते. पण दामले सरांचे लग्न आहे हे माहीत असते तर तीने सांगितले असते. लग्न रविवारी आहे. म्हणजे परवाच की.आईलाच विचारायला हवे.
ते विचारायला मी गिरणीत जातो.पीठाच्या गिरणीबाहेर बरीच मोठी रांग.लोक आणि डबे दोन वेगवेगळ्या रांगा आहेत. गिरणीलाही कंटाळा आला असावा. सारखे तेच तेच दळून हे होणारच की? आम्ही शाळेत तरी काय वेगळे केले आज. इतर वेळी दळणाचा डबा आणायला मजा येते. डबा गरम त्यातले पीठ गरम हात घातला की उबदार लागते. अगदी गरम पोळी सारखे.पण आज तेही करायला नको वाटतय.
शाळेत काहीच झालेले नाहिय्ये. त्यामुळे गृहपाठ ही नाहीय्ये हे एक बरे आहे. हातपाय धुवून सरळ शांताकारम भुजग शयनम म्हणून थेट जेवायला बसलो. खेळ नाही, अभ्यास नाही. काहीच नाही. हे म्हणजे दिवाळीमधे काहीच नसलेला एखादा दिवस असतो भाकड दिवस की काहितरी म्हणतात त्याला. तसा आजचा दिवस.गेला.
निदान झोपल्यावर तरी स्वप्ने पडावीत.
सकाळी उठल्यावर समजले की काहीच स्वप्ने पडली नाहीत. शनिवार म्हणजे सकाळची शाळा. शाळेत गेल्यागेल्या पहिला तास मासपीटीचा. सगळी शाळा ग्राउंडवर उभी. शाळा म्हणजे सगळी मुले.मुले म्हणेज मुले आणि मुली आठवी अववी आणि दहावी. धुमाळ सर समोर उभे राहून एका मोठ्ठ्या ढोलावर गोळाच्या काठीने ढम ढम आवाज करतात. त्या ढम ढम च्या तालावर कापसे सर शिट्टी फुंकतात. मजा येते ढम ढम आणि शिट्टी चा आवाज ऐकायला. आम्ही त्या आवाजावर कवायतीचे हातवारे करतो. सावधान विश्राम करतो. कदम ताल करतो. सावधान विश्राम ऐकल्यावर सगळेचजण तिरक्या नजरेने इकडे तिकडे बघतात. दामले सर कुठेच दिसत नाही. बउतेक ते लग्नाच्या तयारीत असणार. पण कुठल्याच लग्नात ज्याचे लग्न असते तो तयारी करताना दिसत नाही. गोट्याच्या काकाचे लग्न होते त्या वेळेस त्याला फक्त कपडे नेसून पहायचे इतकेच काय ते काम होते. बाकी तो काही करायला गेला की तू नवरा मुलगा आहेस. तू काही काम करायचे नाही.असे सगळेच म्हणायचे.काही कामच करू देत नव्हते. जेवणे आणि कपडे नेसून पहाणे हीच काय ती कामे असतील की जे त्याच्या ऐवजी दुसरे कोणी करू शकत नाही म्हणून त्याला करू दिली असतील. दामले सरांना बहुतेक सगळ्यानी असेच सांगितले असेल म्हणून ते शाळेत आले नसावेत.
मासपीटी संपली. या नंतर पुढचा तास नागरीक शास्त्राचा. त्या तासाला काय शिकवताहेत तेच कळत नव्हते. आमचे लक्ष्य असेल तर कळेल ना.
कोणी कोणाशी बोलत नव्हते तरीही अभ्यासात कोणाचेच लक्ष्य नव्हते.
मधल्या सुट्टीची वाटच पहात होते सगळे.
रोजच्या सारखे डब्यात काय आणले आहे हे पण पाहिले नाही.
काय रे उद्या कोणकोण येणार.
कोणकोण म्हणजे सगळेच येणार आहेत की. मी तर उद्यासाठी नवीन शर्ट पण काढून ठेवलाय. शरद उत्साहात म्हणाला
आणि मी आईची टिकल्यांची साडी नेसणार. संगीता प्रत्येक कार्यक्रमाला टिकल्याटिकल्यांची साडीच नेसून येते.
मी तर नवे बूट आणि मोजे घालून येणार.
ए नुसते बूट मोजे आणि वर काही नाही का? एल्प्याला असे सुचणे म्हणजे त्याचे डोके चालायला लागल्याची खूण असते. आता त्यातून अजून काहीतरी भारीभारी येणार येतेय ते पहायचे.
आपण काय करुया. सगळे जण मस्त गणवेशात येवूया. धुमाळ सरांकडून तो मोठ्ठा ढोल घेउया. त्या तालावर मस्त सरांच्या लग्नाची वरात काढूया. बाकीच्या लग्नात लोक काहीबाही नाचतात त्या ऐवजी आपण कवायत करू. संचलन करुया. एल्प्याची आयडीया सगळ्यानाच मस्त वाटते.
आणि त्या सोबत एक मस्त झेंडा पण नेऊया. एकदम झेंडावंदन झाले पाहिजे. टंप्याने त्यात स्वत्:चे मत सांगितले.
पण दामले सरांना आवडेल का ते.
हे बघा याला फक्त शंका सुचतात. वैजू चा पराग वर राग कशाला आहे ते माहीत नाही. पण त्याने काहिही सांगितले तरी तीला ते पटतच नाही.
का नाही आवडणार सरांना? आपन छान कवायत करतोय. रस्त्याने दोन दोन च्या रांगात जाऊयात. मस्त झेंडा नाचवतोय. का नाही आवडणार कोणाला?
बँडवर कशी छान गाणी वाजवतात लग्नाच्या वरातीत. आणि आपन काय करतोय तर कवायत.
नाहीतर आपण असे करुया का आपण शाळेचे घोष पथक घेऊन जाउया. गणपतीच्या मिरवणुकीत नेहमी असते की ते. शिल्पा ला बरे सुचले घोष पथकाचे. घोष पथक म्हणजे शाळेचे बँड पथक. गणेशसोत्सवाच्या मिरवणुकीत गेल्या वर्षी पहिला नंबर मिळाला होता. पण एक अडचण आहे. त्यातल्या मुलांना फक्त जयोस्तुते आणि जनगणमन आणि सुखकर्ता दुखकर्ता ही तीनच गाणी वाजवता येतात. लग्नाच्या वरातीत जयोस्तुते जयोस्तुते कुणी वाजवते का?
नाही तर असे करुया रेखाच्या मावशीच्या लग्नात वरातीत बायका गाणी म्हणत होत्या सगळ्या मिळून. आपण तसे करुया. कशाला हवंय घोष पथक. जयु ने घोषपथकाची आयडीया बाद केली.आम्हाला सगळ्याना मिळून येणारे गाता येणारे गाणे म्हणजे " आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान" सगळ्यानी मिळून म्हंटले तर एल्प्या चा आवाजही लपून जातो. आणि ऐकायला ही छान वाटते. मोठ्ठ्या ढोलाच्या तालावर हे गाणे म्हंटले होते आम्ही एका कार्यक्रमात.
त्या शिवाय आम्हाला मटंगे बाईंनी माणूसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू जिंकु किंवा मरू, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे आणि रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी... ही गाणीही शिकवली होती. वरातीत ती पण म्हणता येतील
आणि आपण काही घोषणा देऊ लाल बावट्टे की जय. कोण म्हणतो देणार नाय . घेतल्याशिवाय रहाणार नाय, पम्याचा दादा मुंबैत कुठल्यातरी गिरणीत कामाला आहे तो आला की शिकवतो अशा घोषणा त्याला. पम्या सगळ्यांकडून प्रॅक्टीस करून घेणार आहे या घोषणांची शाळा सुटल्यावर. या दोन्ही मुद्द्यांवर बहुतेकांचे एकमत काय म्हणतात ते झाले आहे.
हे झाले वरातीचे. दुसरे म्हणजे आपण शाळेचा गणवेष करून जाउया म्हणजे सगळ्यांचेच कपडे एकसारखे दिसतील. आपली शाळा उठुन दिसेल बाकीच्यांपेक्षा.
खरे तर लग्न म्हणजे नवे छान छन कपडे घालून मस्त मिरवायचे तर तुम्ही लोक सुट्टीच्या दिवशीही गणवेश घालायचा म्हणताय. संध्याला तीचा नवा फ्रॉक घालून मिरवायची संधी गमवायची नाहिय्ये. पण तीलाही शाळा उठून दिसेल हे पटते.
आता एक करायचे उद्या सगळ्यानी शाळेत यायचे . सकाळी दहा वाजता. ठरले मग.
डबे आणायचे का? ही शंका नक्की सांगतो सुम्याची असणार. त्यालाच अशा शंका येतात.
ए हे रे . लग्नाला जाताना कोणी डबा घेऊन जाते का. तेथे मस्त जेवण असते लाडू पुरणपोळी खीर आमटी मसालेभात काय काय असते. वैशालीला एवढेच आठवले म्हणुन बरे नाहीतर असते तर तीने लग्नाच्या पंगतीत लाडु शिरा पुरी बासुंदी , अळूची भाजी , वरणफळे , शेव , बटाटाभजी , वांग्याचे भरीत अशी मोठ्ठी यादीच मांडली असती.
मला एक शंका आहे. लग्न दामले सरांचे आहे. तिथे येणार्या सगळ्या पाहुण्याना केस बारीक कापून आले पाहिजे अशी अट घातली नाहिय्ये ना. काही जण लग्नात आहेर आणु नये अशी एक अट घालतात . म्हणून विचारले. दाम्याची शंका चुकीची नाही. कारण ते दामले सर आहेत त्यांनी एकदा मनावर घेतले की ते केल्याशिवाय रहात नाहीत. गेल्या वर्षी ८ वी ड मधल्या एका मुलाला केस बारीक कापून आला नाही म्हणून शाळेत केस कापणार्या काकाना बोलावून घेतले होते आणि त्याचे केस कापायला लावले होते हे सगळ्याना माहीत आहे. त्यामुळे आता शाळेत बहुतेकांचे केस बारीकच असतात.
पण ते तसे करणार नाहीत. कारण हे त्यांचे लग्न आहे. जावळ नाही जावळात लहान मुलांचे केस कापतात.. जावळ असते तर सराना त्यांच्या मामाच्या मांडीवर बसवून केस कापले असते. अभ्याच्या संदर्भासह स्पष्टीकरणाने दाम्याची शंका पाण्यात चिखल विरून जावा तशी विरुन गेली.
महात्मा गांधी गोलमेज परिषदेला गेले होते. तिथे झाली असेल तशी भली मोठी चर्चा झाली.
चर्चेचे खालील प्रमाणे ९ मुद्दे सगळ्यानाच मान्य झाले.
१ रविवारी सकाळी सर्वानी गणवेशात शाळेत यायचे. दोन दोन च्या जोड्या करून उभे रहायचे.
२ वाढले आहेत की कसे ते कळू नये म्हणून केसाना भरपूर तेल लावून अगदी चपटे बसवून यायचे
३ डबा आणायचा नाही. जिलेबी , लाडू जे काय असेल ते तिथेच खाऊन संपवायचे.
४ घोषणा देताना लाजायचे नाही. आपण ते सरांसाठी करतोय स्वतःसाठी नाही हे लक्षात ठेवायचे
५ शाळेत आल्या आल्या वरातीत वाजवण्यासाठी ढोल आणि ढोलाची गोळेवाली काठी ताब्यात घ्यायची
६ वरातीत म्हणावयाची गाणी सुषमाने सुरू केल्या नंतरच इतरानी गायची. म्ह्णजे गोंधळ होणार नाही.
७ मंगलाष्टके म्हणताना गुरुजीनी शुभ मंगल सावधान म्हंटल्यावर कोणीही पाय जुळवायचे नाही.
८ तसेच गुरुजीनी सावधान म्हंटले म्हणुन ते विश्राम म्हणतील या अपेक्षेत उभे रहायचे नाही.
९ संपूर्ण लग्नात कोणीही उगाच बडबड करायचे नाही. वरात आणि जेवणाची पंगत हे दोन प्रसंग सोडून सतत हाताची घडी तोंंडावर बोट ठेवायचे.
घरी जाऊन उजळणी करण्यासाठी हे मुद्दे वहीत लिहून घेतले.
उद्या रविवार असूनही शाळेत जायचे आहे या कल्पनेने मज्जा वाटतेय.
ए आई मला उद्या सकाळी लवकर ऊठवशील का. हवे तर गजर लाव.
किती वाजताचा.
सात नको नको...साडे सातचा चालेल. नौ वाजे पर्यंत शाळेत जायचे आहे.
उद्या शाळेत? आईचा हा प्रश्न येणार हे मला माहीत आहे.
हो.
का रे?
शाळेत उद्या लग्न आहे?
लग्नं ? कुणाचं?
आमच्या सरांचे?
सरांचे लग्न? कोणत्या?
दामले?
माझ्या उत्तरावर एकदम गप्पच बसली. तीने माझ्या कडे नाकाला सुरकुत्या पाडून डोळे बारीक करून कसल्यातरी विचित्र नजरेने पाहिले.
दामले सरांच्या मुलीचे लग्न ठरवायची वेळ आली असेल. ते कसले लग्न करताहेत. कुणी सांगितले तुला? पत्रीका दिली आहे का तुला निमंत्रणाची? दामले सर जर लग्न करणार असतील तर हे दामले वहिनी ना माहीत आहे का?
असे प्रश्न आल्या नंतर मग आईला सगळी हकीगत सांगावीच लागली.
माझी सगळी हकीगत ऐकून आईने कपाळावर हात मारून घेतला. असे असते होय कोणाचे लग्न? शाळेत दुसर्या कोणाचे तरी लग्न लागणार आहे. त्यानी शाळेचे सभागृह लग्नासाठी म्हणून घेतले आहे. आणि कोणाचेही असु देत तुम्हाला कोणाला आमंत्रण नाहिय्ये त्यामुळे तुम्ही लग्नाला जायचे नाही. सिनेमाला जसे तिकीट नसेल लग्नाला आमंत्रण पत्रिका. तिकीट नसेल तर सिनेमाला आत सोडत नाहीत तसेच आमंत्रण पत्रिका असेल तरच लग्नात आत जाऊ देतात. आमंत्रण नाही याचा अर्थ अजिबात जायचे नाही. आईच्या या बोलण्याने माझ्या उद्याच्या सगळ्या बेतावर पाणी की काय ते पडले. माझ्या चेहेर्यावरून ते तीला समजले असावे.
आता काय विचारात पडला आहेस?
तु उद्या गव्हाची खीर करशील?
का रे?
उद्या लग्नात गेलो असतो तर मला तेथे लाडू करंजी बासुंदी गुलाबजाम मिळाले असते.
माझ्या बोलण्यावर आईने माझा गालगुच्चा घेतला आणि हसून म्हणाली. हो नक्की करते. अगदी नक्की.
शाळेत लग्न कोणाचे का असेना. आपल्याला काय फरक पडतो.आपल्याला खीर खायला मिळणे महत्वाचे.
रविवारी एल्प्याच्या आईने गुलाबजाम आणि टंप्याच्या आईने बासुंदी केली होती
संगीताकडे पुरणपोळी , अंजीकडे शिकरण , अन्या कडे ,शिरा सुषमाकडे मसालेभात , मंग्याकडे पोळीचा लाडू ,असे प्रत्येकाच्या घरी काहीतरी गोडधोड केले होते हे सोमवारी समजले.
( समाप्त)
प्रतिक्रिया
22 Feb 2026 - 11:33 pm | कपिलमुनी
पण फारच लौकर समाप्ती केली
23 Feb 2026 - 9:47 am | विजुभाऊ
पुढे पण लिहीत रहातो.
समाप्त हे या भागापुरते आहे.
पुढचे भाग लवकरच पोस्ट करतो.
दोसतार लिहीताना मलाही आनंद मिळत असतो.
23 Feb 2026 - 1:03 pm | राजेंद्र मेहेंदळे
कसे काय जमते बुवा तुम्हाला!!
एकदम म्याड झाल्यासारखे वाटते वाचताना काय की ते.....आयला शाळाच बरी!!
26 Feb 2026 - 3:33 pm | विजुभाऊ
मला ही म्याड की असे होते.
बर्याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे,
एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे.
त्या वेळेस मुद्दाम होऊन प्रयत्न न करता सहजगत्या लिहू शकलो. त्या पात्रांची निरागसता राखून लिहीणे कितपत जमतेय माहीत नाही.
पाहुया लिहायचा प्रयत्न करतोय. तुम्हा लोकांचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.