सकाळपासून वर्गातली सगळीच शांत आहेत. तो नेहमी फरफर्या स्टोव्ह सारखा येणारा मुलांच्या बडबडीचा आवाज ही कमी येतोय
शाळेत सतत काही ना काही तरी व्हायला हवे. रोज नुसते अभ्यास ,लहान सुट्टी, मधली सुट्टी , खेळाचे तास असे करत बसलो की कंटाळा येतो. प्रत्येक तासाला काही ना काही शिकवत असतातच पण तरीही.
कितीही आवडत असली तरी बटाट्याची काचर्याची भाजी रोज खाऊन कंटाळाच येणार की. सोबत लोणचे , कारळ्याची नाही तर लसुण खोबर्याची चटणी तरी हवीच.
पण हे शाळेत म्हणायचे म्हंटले की भुगोलाचे भामरे सर म्हणतात. पृथ्वी गोल आहे. तुम्ही कुठूनही निघा , कोणत्याही दिशेने प्रवास करा. तुम्ही पुन्हा त्याच ठिकाणी येता.
पाटणला असताना गण्याला यावरही शंका आली असती. म्हणाला असता की पुन्हा तिथेच यायचे असेल तर जायचेच कशाला. त्याचे ही बरोबरच आहे म्हणा. पण जर लोक कुठेच गेले नसते तर खरेच बरेच झाले असते. बदायुनी लोक अरबस्तानात राहिले असते, ट्रुंड्रा प्रदेशातले लोक तिथेच बर्फात राहीले असते ,कोलंबसने अमेरीकेचा शोध लावलाच नसता, तो कुतुबुद्दीन ऐबक भारतात आला नसता तर किती बरे झाले असते. तो नसता आला तर इब्राहीम लोधी आला नसता. त्याला हरवायला बबर आला नसता. पर्यायाने अकबर , शहाजहान, औरंगबजेब वगैरेही तिथेच राहीले असते. युद्धेच झालीच नसती. लोक सुखाने राहिले असते.आणि मुख्य म्हणजे पोरांना शाळेत इतिहास भुगोल आणि नागरीकशास्त्र हे विषय शिकायला लागले नसते. भुगोल आणि इतिहास नुसते वाचायला छान वाटतात. टुंड्रा प्रदेशात बर्फाची घरे असतात हे वाचायला आवडते पण पाठ करायला लागले की नको वाटते. शिवाजी महाराजांनी अफझलखानाचे पोट फाडले किंवा पानीपतच्या लढाईत अब्दालीला पेशव्यानी धूळ चारली हे वाचताना आपल्याही अंगात काहीतरी संचारलेय असे वाटते.पण ते कोणत्या साली झाले , किंवा त्या तहाची कलमे काय होती हे विचारले की बळजबरीने आपल्या तोंडात चटणीचा बुकणा खुपसून त्याची चव कशी लागली असे विचारतोय असे वाटते. त्यापेक्षा भौतीक शास्त्र रसायन शास्त्र खूपच बरे. प्रात्यक्षीक करून शिकता येते. इतिहास आणि भुगोलाची ही प्रात्यक्षीके असायला हवी होती. बदाउनी लोकांबरोबर दोन मदारींच्या उंटावर बसता आले असते किंवा मग टुंड्रा प्रदेशात थेट त्यांच्या त्या टोपलीसारख्या बर्फाच्या घरात रहाता आले असते. इतिहासात तर थेट लढाया खेळाव्या लागल्या असत्या.
पाटणच्या शाळेत असताना भौतीक शास्त्राच्या तासाला गुरुत्वाकर्षणाचे प्रात्यक्षीक दाखवतो असे सांगून गण्याने अख्ख्या वर्गाला ग्राउंडवर नेले होते. शास्त्राच्या रोकडे बाईना गण्या काहीतरी रस घेऊन दाखवतो आहे याचेच कौतूक. त्यानी हे आणखी दोन शिक्षकाना संगितले आणि त्यानाही ग्राउंडवर नेले. ग्राउंड च्या कोपर्यात एक गुलमोहोराचे झाड होते. त्या झाडाला तलवारी लटकल्यासारख्या दिसतात तशा बर्याच शेंगा होत्या. गण्याने सगळ्या मुलांना गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगितला. जी वस्तू वर जाते ती खाली येते. आणि याचे प्रात्यक्षीक करायला म्हणून गण्या म्हणाला की मी चप्पल वर फेकतो , गुरुत्वाकर्षण असल्यामुळे आपोआपच वर गेलेली चप्पल परत खाली येईल आणि नियम सिद्ध होईल. गण्याने त्याची चप्पल बरोब्बर नेम धरून गुलमोहोराच्या शेंगेवर फेकली. त्याचा नेमही बरोब्बर बसला. चप्पल शेंगेला लागली.पण ती खाली आली नाही. चप्पल खाली येताना आडव्या आलेल्या एका बारीक फांदीत अडकली. ती चप्पल काढायला म्हणून त्याने दुसरी चप्पल ही काढून त्या चपलेवर फेकली. पहिल्या चपलेला सोबत असावी असे त्या फेकलेल्या चपलेला वाटले असावे. ती पण नेमकी त्याच फांदीवर अडकली. बर्याच जणाना गुलमोहोराच्या शेंगा हव्या होत्या पण गण्याच्या दोन्ही चपला अडकल्या हे पाहून त्यानी प्रात्यक्षीक करायचेच रहीत केले. गुरुत्वाकर्षणाचा नियम सिद्ध व्हायचे बाजूलाच राहीले, चपला परत मिळवण्यासाठी मुले ग्राउंडवरचे दगड शोधू लागली. गुलमोहराच्या शेंगा मिळवून तरी काय करणार होते काय माहीत. कारण तलवारची फाईट करताना त्या नेहमी हातावजवळ मुठीपाशी तुटतात आणि मग तुटकी तलवार मिरवताही येत नाही. नाही म्हणायला त्या शेंगातल्या बिया फरशीवर घासून चटका द्यायला मजा येते. समोरच्याला नकळत त्याच्या मानेला किंवा हाताच्या कोपर्यावर चटका दिला की तो एकदम शॉक बसल्यासारखा टणकन उडीच मारतो.
वर्गात काही न करता बसणे हे एल्प्याला शक्यच होत नाही. तो डोके बाकावर ठेवून काहीतरी बोलतो. इकडे टंप्याही माझ्या शर्टाची बाही धरून काहीतरी सांगतोय.
तेही ओठ न हलवता. ओठ हलवले की आपण बोलतोय हे सरांच्या लक्षात येते. त्यामुळे प फ ब भ म हे सगळे औष्ठ्य एकदम बाद होते. बोलताच येत नाही. काय पाटील म्हणायचे असेल तर काय आटील असे काहीतरी ऐकू येते.
हे शक्य नसेल तेंव्हा वहीच्या शेवटच्या पानावर जे बोलायचे आहे ते लिहून दाखवायचे.पण त्यामुळे एक गम्मत होते. वहीच्या शेवटच्या पानावर असे बरेच काहीतरी लिहीलेले असते. आणि ते आजच लिहिलेले असेल असे नाही. त्यामुळे जे बोलायचे आहे ते लिहीले तरी वाचणारा त्या ऐवजी दुसरेच काहितरी वाचतो.
म्हणजे डब्यात काय आणले आहे हे विचारायचे असते पण त्या ऐवजी शर्टातून बनियन बाहेर डोकावतो आहे असे वाचतो. बरं बाहेर दिसणारा बनियन कुणाच्या शर्टाबाहेर आहे ते समजत नाही. वाचणारा अगोदर स्वतःचा बनियन तपासतो. आणि तो बरोबर असेल तर त्याच्या वहीवर उत्तर म्हणून ; “ ए कुठे रे .. उगाच काहीतरी फेकू नकोस. नकोस “असे लिहीतो. विचारलेला प्रश्न आणि त्याला मिळालेले उत्तर याचा एकमेकांशी काय ते दूरान्वयाने ही संबन्ध राहीलेला नसतो.
आज इतका कंटाळा आलाय की हे असले प्रश्न उत्तरे पण नको वाटताहेत.
चौकोनात फुल्या आणि गोळे काढायचाही कंटाळा आलाय.
कंटाळा या शब्दाची एक गोष्ट आहे. गण्याला एकदा खूप कंटाळा आलेला असतो . तो म्हणतो कटाळा आला..... हे म्हंटल्यावर त्याच्या लक्ष्यात येते की कंटाळा मधल्या क वर अनुस्वाराचे टिंब द्यायचे राहीले. म्हणून गण्या म्हणतो क वर टिब. मग त्याच्या लक्ष्यात येते की टिंब वरल्या टो वर अनुस्वाराचे टिंब राहिले. मग गन्या म्हणतो की टि वर टिब....पुढे लक्ष्यात आल्यावर म्हणतो टि वर टिब ...टि वर टिब....टि वर टिब........
अशी पन्नास टि वर टिबे झाल्यावर हे म्हणायचा ही कटाळा येतो.
नवीन काहितरी घडायला हवे.
मी इकडे तिकडे बघतो. आप्पी शुभीच्या कानात काहीतरी सांगतेय. आपले कान एकदम तीक्ष्ण असायला हवे होते. म्हणजे कोण कुणाच्या कानात काय सांगतय ते समजेल तरी. पण मग या मुली सतत एकमेकींच्या कानात सतत काहितरी सांगत असतात आणि त्या पुढची दोन मिनीटे झाकण काढून उलटा केलेल्या डब्यातून गोट्या एकदम पडाव्या आणि फरशीवर घरंगळत जाव्या तशा खळ्ळकन हसत सुटतात. कान तीक्ष्ण असते तर मलाही तसे हसावे लागेल आणि एकटाच का हसलो म्हणून एल्प्या आणि टंप्या ला मधल्यासुट्टीत संदर्भासहीत स्पष्टीकरण द्यावे लागले असते. एल्प्याने एकदा मराठीच्या तासाला संदर्भासह स्पष्टीकरण या ऐवजी दर्भासह स्पष्टीकरण द्या असे वाचले होते. सोनसळे सर दोन दिवस एल्प्या दिसला तरी हसत होते.कारण काय असेल त्यानाच माहीत. तरी त्याना विचारता तरी येते त्या बद्दल. दामले सर असतील तर तेही अवघड होते. असे काही विचारले की ते शारीरीक शिक्षणाच्या तासाला फक्त सावधान विश्राम करायला लावतात.
पण आप्पी काहीतरी सांगतेय. ते ऐकून शुभीचे डोळे एकदम मोठे झालेत . शुभी ओरडते अय्या . हो. तीच्या ओरडण्यामुळे की काय पण शांत पण अर्धवट पेंगत असलेल्या आख्ख्या वर्गाला जाग येते. आणि आता नक्की काहीतरी मजेशीर ऐकायला मिळणार. पण या मुली अशा सांगणार नाहीत. त्या हे त्यांच्यातच ठेवतील.
अंजीला विचारावे तर ती भाव खाणार. उगीचच स्वतःला राष्ट्रपती समझणार.
दुपारच्या सुट्टीत डबे खाताना प्रत्येकालाच ते नक्की काय आहे याची उत्सुकता. कुठून कशी माहीत नाही पण अज्या ने ही गुप्त माहिती आणली. कुणाला सांगू नका या अटीवर त्याने सांगितलेली " या रविवारी शाळेत लग्न लावणार आहेत" ही बातमी सातव्या तासापर्यंत सगळ्यानाच समजली.
बातमी खरी होती कारण प्रत्येकालाच ती आता माहीत झाली होती. पण कोणाचे लग्न हे अजून समजायचे आहे.
मी सांगतो त्या दहावी ब मधल्या वर्षाचे असेल लग्न. सुम्या अगदी खात्रीने सांगतो.
नाही रे. तीचे नाही. आपल्या त्या नवीन सरांचे लावणार असतील लग्न. मह्या आणि अंबादासचे या बाबतीत एकमत. कारण काय तर म्हणे गेल्या रविवारी नवीन सर एकटेच बॉबी सिनेमाच्या तिकीटांच्या रांगेत उभे होते. त्यांचे लग्न झाले असते तर ते असे एकटेच तिकीटाच्या रांगेत नसते उभे राहिले.
मह्या तू तिथे काय करायला गेला होता? सिनेमा बघायला गेला होतास ?
नाही रे. वंदुताचीच्या सोबत गेलो होतो. तीच्या मामीला बाळ झाले. डबा द्यायचा होता?
लग्न व्हायच्या अगोदर बाळ? अज्याची शंका
का होत नाही का? त्या राजेश खन्नाच्या एका सिनेमात दाखवले होते की हीरॉईन ला लग्न न करताच बाळ झाले म्हणून. योग्या परस्पर उत्तर देतो. त्याच्या इतके सिनेमाची माहिती असणारे कोणीच नाही. प्रत्येक सिनेमा त्याने पाहिलेलाच असतो.
म्हणजे नवीन सरांचे लग्न वन्दुताईच्या मामीशी होणार आहे? शंका विचारणार्याचे तर्क की कसले ते शास्त्त्र एकदम पक्के आहे.
ए हे रे... मामीचे लग्न अगोदरच झाले आहे मामाशी. तीने नवीन सरांशी लग्न केले तर मामा कोणाच्या घरी राहील मग? पंचाईत होईल की त्याची.. संध्याकाळी ऑफिस सुटले की कुठल्या घरी जायचे प्रश्न पडेल त्याला.
पण मामाचे लग्न झाले आहे मग त्याला कशाला करायचे आहे पुन्हा लग्न. आता ही एक नवीन शंका.
आमच्या सगळ्यांच्या डोक्यात शंका जमिनीतून अचानक तण उगवून यावे तशा उगवून यायला लागल्या.
ए गपा रे. कुणी सांगितले मामीचे लग्न आहे म्हणून. तुम्ही उगाच अफवा पसरवू नका. मी फक्त म्हणालो की रविवारी शाळेत लग्न लावणार आहेत.
कोणाचे ते माहीत नाही.
ते माहीत असले तरी काय फरक पडतो. आपण लग्नाला जायचे. तिथे भरपूर गाद्या तक्ये उशा ठेवलेले असतात. उशानी मारामारी करायला मजा येते. टंप्या गेल्या सुट्टीत कोणाच्यातरी लग्नाला गेला होता. तिथे ते दिवसभर उशानी मारामारीच खेळत होते.
आणि हो मुलीना नटायला मिळते . त्याना इकडून तिकडे नुसते पळत फिरायचे असते. परकराचा घोळ सावरत. त्याना काय कळणार उशांच्या मारामारी ची गम्मत.
मला काय वाटते की दामले सरांचे लग्न असेल. श्रिपाद सर्वाना शांत बसवत म्हणाला.
कशावरून रे. काही ही बोलतोस
मी पाहिलेय ना. त्यानी अगदी बारीक केस कापून घेतले आहेत.
हे बाकी खरे आहे. दामले सरांचे केस खूपच बारीक कापले होते. इतके बारीक की त्यांच्या डोक्या वरचा एक अन एक केस टाचणीसारखा उभा राहीलेला होता. बाबांच्या ऑफिसमधे एकदा गेलो होतो तेंव्हा तिथे एका वाटीत एक मखमली चेंडु ठेवला होता त्यावर टाचण्या खोवुन ठेवल्या होत्या. दामले सरांचे डोके पाहून मला तर त्याचीच आठवण झाली होती.
पण केस बारीक कापण्याचा आणि लग्नाचा काय संबन्ध.
हो लहान मुलांचे लग्न लावतात तेंव्हा त्यांचे केस इतके बारीक कापतात. आमच्या समोरच्या प्रशांतचे कापले होते की. आण त्याने धोतरही नेसले होते. गुरुजीनी श्लोक म्हंटले होते.
ए येड्या ते लग्न नाही काही..त्याला मुंज म्हणतात. मुंज वेगळी आणि लग्न वेगळे.
पण दोन्ही वेळेस गुरुजी होम पेटवतात आणि श्लोक म्हणतात.
श्रिपाद चे म्हणणे सगळ्यानाच पटले.
आपण दामले सरांनाच विचारूया का?
काय विचारुया ? रविवारी त्यांचे लग्न आहे का म्हणून?
आपण नाय बॉ.... हा ... त्यांना विचारायला गेलो की ते सावधान विश्राम करायला लावतात.
त्याना सावधान विश्राम हे इतके आवडते की लग्नात ते नुसते शुभ मंगल सावधान ऐवजी , शुभ मंगल सावधान शुभ मंगल विश्राम असे म्हणणार असतील.
रविवारी शाळेत लग्न लावणार आहेत ही बातमी आता सर्वत्र झाली होती. आमच्या सगळ्यांच्या गप्पा इतक्या जोरात चालल्या होत्या की एरवी मुलींच्या गप्पात आणि फिदिफीदी हसण्यात झाकोळून जाणारे आमचे आवाज आज दुमदुमत की कसे होऊन त्या गप्प बसल्या होत्या.
ए.... कोण? कोण" दामले सर ? त्यांचे काय? लग्न? संगीताला हसू आवरत नाही. एक हात पोटावर आणि दुसरा तोंडावर ठेवून ती हसू सावरते. तीच्या साठी ती भलतीच गम्मतीची बातमी ठरली होती. संगीता ला समजल्यावर ती गुप्त माहिती एकदम वर्तमान पत्रात छापून आल्यासारखी सगळ्यानाच समजली.
सगळ्यांचा कंटाळा एकदम पळून गेला. दूर अगदी लांब. कुठेतरी लांब जम्मू काश्मीर खोर्यात किंवा विदर्भात.
अगोदर रविवारी शाळेत लग्न लावणार ही मोठी बातमी आणि त्यात दामले सरांचे लग्न ही त्यापेक्षा मोठी बातमी. चर्चा करण्यात तो तास कधी संपला ते समजलेच नाही. ठक ठक ठक ठक...... भणगे सर टेबलावर डस्टर आपटतात. पण कोणाचे त्या कडे लक्षच जात नाही. पोरांचे चर्चा सत्र चालूच आहे. मुलीना तर काय बोलायला विषयच मिळाला आहे नवा.
फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्रर्र्र्र्र्र्र र र्र्र्र र्र र्र र्र र्र र्र र्र वर्गात एक जोरदार शिट्टी वाजते. त्या आवाजाने गप्पांमधे खंड पडतो. एकदम शांतता पसरते.
काय रे काय चाललंय? भणगे सराना धड रागावताही येत नाही. पण वर्गात मुलांना शांत करण्यासाठी म्हणुन शिट्टी वाजवावी लागावी याचा त्याना राग आलाय.
काही नाही सर. एकसाथ नमस्ते म्हणावे तसे सगळेच जण एकमुखानी म्हणतात. तेही अजिबात प्रॅक्टीस न करता.
सराना याची अपेक्षा नसावी. आमच्या त्या एकसाथ काही नाही सर या वाक्यामुळे ते जरा शांत झाले. त्याना तसेही रागावता येतच नाही. आणि रागावले तरी ते दुसर्या मिनिटाला शांत होतात.
अरे मी वर्गात आलो. तुम्हाला कळाले सुद्धा नाही. डस्टर टेबलावर आपटले तरी तुमच्या गप्पा चालूच. शेवटी खिशातून शिट्टी काढली. आणि वाजवली तेंव्हा कुठे गप्पा थांबल्या तुमच्या.
सर मस्त वाजवली तुम्ही शिट्टी. अन्या डांगेलाना हे बोलायची काय जरूर होती कोणास ठाऊक. आम्हाला वाटले की आता सर आणखीन चिडणार.
आणि तेच झाले. कोण म्हणाले कोण म्हणाले....
नाही नाही मी नाही म्हणालो. मी नाही. बाकी कोणी बोलायच्या अगोदर अन्या स्वतःच पुढे होऊन म्हणाला.
मग कोण बोलले. या प्रश्नाला उत्त्तर म्हणून मघाशी शिट्टी वाजल्यावर शांतता पसरली होती त्यापेक्षाही मोठी शांतता पसरली. शेजारच्या आठवी क च्या वर्गात इंग्रजी चा तास चालू होता. मुले स्पेलिंग घोकत होती ते सुद्धा ऐकायला यायला लागले.
मला जोपर्यंत कळत नाही की कोण बोलले तो पर्यंत कोणीही खाली बसायचे नाही. आणि मी काही शिकवणारही नाही.
भणगे सर हे खेळाचे शिक्षक ते काय शिकवणार होते कोण जाणे. पण आम्हाला सर्वाना उभे रहाण्याची शिक्षा मिळाली. तेही हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून. तोंडावर बोट ठेवले तरी बोलायचे असेल त्याला काहीच अडचण येत नाही हे सराना माहीत नसावे. अर्थात त्यांचा एकूण राग पाहून आमचे कोणाचे तसे धाडस झाले नाही. तास संपल्याची घंटा लवकर होवो एवढेच काय ते आमच्या मनात येत होते. वर्गात उभे रहायची अडचण नव्हती. फक्त शांतपणे उभे रहायची सवय नव्हती.
एरवी वर्गात सर उभे असतात मुले बाकावर बसलेली असतात. आज सर खुर्चीत बसलेले होते आणि आम्ही उभे होतो.
फळा असलेली भिंत जरा इकडे सरकवली असती तर आम्ही सगळ्यानी शिकवायला सुरवात केली असती.
हा विचार मनात येतोय तोच शाळा सुटल्याची घंटा होते. आम्ही तसेही उभेच होतो. आणि दप्तरेही आवरलेलीच होती. सगळ्यानीच न ठरवता दप्तरे उचलली आणि पटकन वर्गाबाहेर धूम ठोकली , सरांच्या अगोदर.
क्रमशः
प्रतिक्रिया
20 Feb 2026 - 9:03 pm | अनन्त्_यात्री
"लंपन" आठवला.
21 Feb 2026 - 12:35 pm | राजेंद्र मेहेंदळे
दोसतार इज ब्याक!! वाचतोय आणि लवकर पुढचे भाग येउंद्या.
खरेच आता झुंबर पंखा शारदा संगीत पुन्हा वाचायला पाहीजे निवांतपणे
लगे रहो विजुभाउ
22 Feb 2026 - 10:09 am | कपिलमुनी
या वेळी पण मोठी इनिंग असू द्या ..
पु ले शु
26 Feb 2026 - 3:29 pm | विजुभाऊ
बर्याच जणांना दोसतार चा पुढचा भाग वाचायचा आहे,
एल्प्या , टंप्या आणि विन्याची धमाल पुन्हा अनुभवायचे आहे
26 Feb 2026 - 3:30 pm | विजुभाऊ
त्यामुळे परत सुरू करतोय.
पाहुया या वेळेस ते तिघे काय काय खोड्या करतात.
तुमचे प्रोत्साहन आहे हे महत्वाचे.
22 Feb 2026 - 11:05 pm | विजुभाऊ
https://www.misalpav.com/node/53539
पुढील दुवा