ब्रेक के बाद..

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
3 Feb 2026 - 6:13 pm

ब्रेक या विषयावर मला खूप दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं. ब्रेक म्हणजे सिरीयल मधले ब्रेक बरं का! मध्ये मध्ये गॅप असते ना ती!

या गॅपमध्ये म्हणजे ब्रेकमध्ये मालिका दहा मिनिटे असते आणि ब्रेक वीस मिनिटांचा असतो. या ब्रेक मध्ये खूप गोष्टी काही काही जण करून घेतात. म्हणजे नॅचरल कॉल्स उरकून घेणे ,गाद्या घालणे , झोपण्यापूर्वी दात घासणे.

माझ्या सासूबाई तर म्हणायच्या", मी पटकन देवाचं म्हणून घेते. आणि देवापुढे दिवा लावायच्या .दोन स्तोत्रंही त्या म्हणायच्या. तरीही ब्रेक सुरूच असायचा. जेवणाचे ताट घेऊन खूप जण ब्रेकच्या वेळात जेवायला बसतात. संध्याकाळी असेल मालिका ,तर नवऱ्याचं चहा ,पाणी, खाणं ,हे सगळं त्या ब्रेक मध्ये उरकलं जातं आणि काही काही मालिकांमध्ये सुद्धा किंवा सिनेमांमध्ये सुद्धा जाहिरात करताना एकही ब्रेक नसलेला सिनेमा किंवा एकच ब्रेक असलेला सिनेमा असं मुद्दाम लालूच दाखवण्यासाठी त्याची जाहिरात करतात. जाहिरातीमध्ये जो अँकर असतो ना तो काय म्हणतो "कही भी मत जाना , मैं अभी गया और अभी.आया" म्हणजे ज्या जाहिरातींच्या जीवावर तुम्ही प्रेक्षकांना मालिका दाखवता त्याच जाहिरातींच्या विरुद्ध तुम्ही बोलता? म्हणजे जाहिरात सुरू झाली की प्रेक्षक उठणार आणि कुठेतरी जाऊन येणार ते बोर होणार .ते जाहिराती बघणार नाहीत आणि मग पुन्हा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे मालिका सुरू झाली की ते येणार, बघणार असं सरळ म्हणणार? जाहिराती लोक बघत नाहीत असं कबूल करणार ?"मनाच्या मोटारीला विचारांचा ब्रेक लावा" असं वाक्य मी एका शाळेत लिहिलेलं लहानपणी पाहिलेलं होतं .ब्रेक या शब्दाचा पहिला वापर मी त्यावेळेला बघितला. ब्रेक च्या स्पेलिंगनं तर मला अनेकदा दगा दिलाय बर का लहानपणी! म्हणजे break की brake?

मालिकेतल्या ब्रेक मध्ये अत्यंत कमी कपड्यातल्या कमनीय देह असलेल्या आणि तो दाखवणाऱ्या सुंदर सुंदर मुली येतात मग हसतमुख चेहऱ्याच्या खूप काम करूनही न दमलेल्या माता येतात आणि मग हसरी आई काय काय काय बोलते, आणि ती सांगते हे वापरा ते वापरा.पोषक पेयं पिणारी शहाणी मुलं ब्रेक मध्ये दिसतात. कंटाळवाण्या ट्रॅफिक मध्ये दोन दोन तास अडकलेले पण तरीही त्यांचे हसतमुख फ्रेश चेहऱ्याचे नवरे कामावरून घरी येतात त्यांना आपला ब्लेझर वगैरे काढायला आणि हातातली बॅग घ्यायला सुंदर बायको तयार असते. या ब्रेक मध्ये आपल्याला शिकवलं जातं .सकाळपासून रात्रीपर्यंत काय वापरावं. कोणती पेस्ट वापरावी, कोणता माऊथ फ्रेशनर ,कोणता चहा प्यावा आणि कोणता गिळ गिळीत पदार्थ ब्रेकफास्ट ला खावा.कोणता मसाला, हळद ,तिखट, मीठ ,हिंग ,तूप,तेल सगळं कुठलं वापरावं याचं ज्ञान ब्रेक मधून मिळतं. अगदी संडास बाथरूम आणि कमोड पर्यंत सुद्धा .ते स्वच्छ करण्यासाठी काय वापरावं याचं ब्रेक मध्ये आपल्याला ज्ञान पाजलं जातं आणि आपण जेवत असतो ,खात असतो ,चहा पीत असतो ,तरीसुद्धा आपल्याला ते कमोड घासलेले बघावे लागतात . मला असं वाटतं की ब्रेक हे ज्ञानाचे भांडार आहे. त्याच्यात सर्व माहिती मिळते.

आणि मला सुद्धा रुटीनचा नोकरीचा कंटाळा आलेला होता आणि ब्रेक हवा होता माझ्या आई ह्यालाच उद्देशून म्हणायची ,"या चुलीपासून मेली सुटका नाही .कंटाळा आलाय. असं वाटतं की कुठेतरी लांब पळून जावं. म्हणजे तिलाही ब्रेक हवा असायचा .ते पळून जाणं वगैरे वगैरे होतं ना,त्यालाच आता ब्रेक म्हणतात "ब्रेक"चं स्पेलिंग काही का असेना मलाही ब्रेक घ्यावासा वाटतो. तसा मी मध्यंतरी घेतला होता .मी मध्यंतरी थोडसं लिहिणं थांबवलं होतं ,पण आता पुन्हा तुमच्या भेटीसाठी आली आहे .ब्रेक नसलेली मस्तपैकी लेखणी घेऊन!"हिच्या बडबडीला ब्रेक लावा",असं मला उद्देशून म्हणायची वेळ तुमच्या वर येऊ देणार नाही, अशी खात्री देते.

ताजा कलम:

काय म्हणता,मी मध्यंतरी लिखाणातून ब्रेक घेतला होता,हे तुमच्या लक्षातही आलं नाही? ओह! हाय हाय!

वाङ्मयमुक्तकजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

रात्री जेवायला बसल्यावर टीव्हीवर हमखास हार्पिकने लोकांचे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्ही प्रकारचे कूप स्वच्छ होताना त्यांतील किटाणूंच्या वर्धित प्रतिमांसह पाहणे टाळता येणे अशक्य. येतेच ते समोर.

गवि ना पडला तो प्रश्न मलाही पडतो.
याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय , नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.
आज्जी बाई. तुम्ही गायबला होतात हे जानवलं होते.
त्यामुअ‍ॅळ तुमचा लेख दिसलयावर लै बरे वाटले

सोत्रि's picture

6 Feb 2026 - 1:38 pm | सोत्रि

याना कसे कळते की आम्ही जेवायला बसलोय, नेमके त्याच वेळेस हार्पीक च्या झैराती येतात.

तुम्ही जेवायला बसला आहात की नाही ह्याच्याशी त्यांना काहीही देणे-घेणे नसते हो विजुभौ! I will display 😂

- (जाहिरातबाज) सोकाजी

गामा पैलवान's picture

3 Feb 2026 - 7:48 pm | गामा पैलवान

पनवेलच्या पुढे प्रवासी रेलवे सेवा नुकतीच सुरू झाली होती, तेव्हाची गोष्ट. आम्ही दिव्याहून गाडी पकडली व पनवेलच्या पुढे जाणार होतो. पनवेलास समोरचा माणूस उठून गेला. त्यानंतर गाडी जी थांबली ती हलायचं नावंच घेईना. शेवटी पाऊण तासाने गाडी हलली. तेव्हढ्यात समोरचा माणूस येऊन बसला व म्हणाला की लवकर निघाली गाडी. आम्ही प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर म्हणतो की नेहमी एक तास तरी लागतोच. मागील महिन्यात त्या एका तासात त्याने बहिणीकडे जाऊन भाऊबीजही आटोपली होती, अशी बहुमोल माहिती पुरवली. तो रेलवेत कामास होता. पुढे म्हणाला की पनवेलास मोटरमनास कागदी अर्ज भरून पुढील प्रवासाची परवानगी ( ब्लॉक क्लिअरन्स ) घ्यावी लागते व तिची एक प्रत इंजिनात ठेवावी लागते. त्यामुळे एक तास मोडतो. अहाहा, काय तो ब्रेक होता. हल्ली असे ब्रेक मिळंत नाहीत.

दुसऱ्या ब्रेकची कथाही दिवा पनवेल मार्गाशी संबंधित आहे. असाच दिव्याहून पनवेलच्या दिशेने पाशिंजर पकडून चाललो होतो. पाणी मिळणार नाही म्हणून घरून पाणी भरपूर पिऊन निघालो होतो. आणि थंडीचे दिवस होते. मग काय जलनिष्कासावेग जरा जास्तंच जाणवू लागला. म्हणून निळजे स्थानकात खाली उतरून जमिनीचे क्षारवर्धन अभियान राबवू लागलो. सुदैवाने फलाट नसल्याने गाडीपासून दूर जावं लागलं नाही. मोहीम ऐन भरात असतांना गाडी हलली. मग काय, कसंबसं अभियान आवरलं आणि गाडीत चढलो. मग उरलेलं अभियान पुढल्या स्थानकात तळोजात पूर्ण केलं. परत एकदा सुदैवाने फलाटाची रुंदी अगदी नगण्य असल्याने गाडीपासनं जवळंच कार्यभाग आटोपता आला. असा हा अभियानी ब्रेक घेण्याची वेळ कोणावर येऊ नये.

-गा.पै.

प्रचेतस's picture

5 Feb 2026 - 8:42 am | प्रचेतस

'ब्रेक के बाद' स्वागत आहे.
लेखन नेहमीसारखंच सहज सुंदर.

मूकवाचक's picture

6 Feb 2026 - 2:10 pm | मूकवाचक

'भक्त' आणि 'रूग्ण' यांच्या किंवा अन्य वैचारिक रणकंदनातून 'ब्रेक' घेऊन असे काही सहज सुंदर लेखन वाचले की मिपावर आल्याचे सार्थक होते.

निनाद's picture

5 Feb 2026 - 11:15 am | निनाद

८० किंवा त्या आधीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना भुसावळला बराच वेळ थांबायच्या. बहुदा इंजिने आणि डब्यांमध्ये पाणी भरण्यासाठी खूप वेळ लागायचा. एकदा आमची गाडी आऊटरलाच उभी राहिली. उन्हाचे दिवस भयंकर गरमी आणि पंखे गरम हवा मारायचे. गाडी थांबली की पंखे बंद व्हायचे कारण डब्याला असलेली ब्याटरी डाऊन. असे आमचे हाल चाललेले असतांना शेजारच्या बर्थवरचे एक काका शांतपणे सामानाची राखण सोडून खाली उतरले आणि चक्क रेल्वे लाईन ओलांडून पलीकडच्या कॉलनीत निघून गेले. आम्ही आपले काळजीत की या माणसाची गाडी सुटली तर काय?
खूप वेळ झाला तरी ते आलेच नाही..
नंतर ते काका, हातात घरचा डबा घेऊन पाऊण तासाने परत आले, ते म्हणाले, माझा भैण रेल्वेच्या वसाहतीत राहते. तिचा नवरा म्हणजे म्येव्हणा त्याला शिफ ड्युटी. झोपला स्टेशनवर यायला नव्हता, मग मीच विचार केला की इंजिन पाणी घेईपर्यंत आणि 'सिग्नल क्लिअरस्तोर घरची चौकशी करून येतो. गाडी काय १० मिनिटात सुटायचं नाही.

गा पै मुळे असा ही एक ब्रेक आठवला.

त्या काळात रेल्वे कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स आणि रेल्वेचे स्टेशन्स यांच्यात एक अनोखं समीकरण होतं.

त्यातही मोठी जंक्शन स्टेश्न्स जरा वेगळीच असायची.

अवांतराबद्दल क्षमस्व!

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Feb 2026 - 12:45 pm | राजेंद्र मेहेंदळे

वेलकम ब्याक आज्जी. असेच खुसखुशीत लेख लिहुन आम्हाला हसवत रहा.

बाकी आजकाल चेपु ,ईन्स्टाआणि तूनळीवरील रील्स मुळे ब्रेक असा तो काय मिळतच नाही बघा. दोन मीटीन्गांमध्ये किवा रात्री बेरात्री क्लायंटच्या शिव्या ऐकुन संपल्या की ब्रेक घ्यावा न झोपावे तर हे रील्स स्क्रोल करत अजुन १ तास निघुन जातो.

माझा एक कलीग म्हण्तो "सर, मै तो सुब्बे सुब्बे पॉटी करते हुवे रातभरके टिम्स चॅट पढ लेता हुं, क्या पता बॉस का कॉल आ जाये......" बायो ब्रेकमधेही टीम्स वर काय काय मेसेज येउन पडलेत ते बघावे लागते.आता बोला.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2026 - 2:22 pm | अमरेंद्र बाहुबली

गेले वर्षभर इंस्टा नी फेसबूल बंद केले आहे, युट्यूबही उडवले! रिल्स पासून सुटका मिळाली, प्रचंड मोकळा वेळ नी शांतात मिळतेय. माझ्या बरोबरीच्या अनेकांनी हे केले आहे.

छान लेख :) तुम्ही विना ब्रेक कायम लिहित रहावे हि इच्छा.

बाकी tv २०२१ पासून नाही.. त्यामुळे बरे आहे सध्या.. असले ब्रेक बघायलच नको..

परंतु क्रिकेट match पाहतानाच्या जाहिराती जरा बऱ्या असतात असे माझे मत..

बाकी थिएटरात पैसे देऊन गेल्यावर, सिनेमा चालू होण्या अगोदर आनी interval नंतर ती खैनी, पान, गुठख्या ची जाहिरात डोक्यात जाते... आम्हीच सापडलो काय दाखवायला असे वाटते..

श्वेता२४'s picture

6 Feb 2026 - 1:11 pm | श्वेता२४

आजी तुमचे लेख नेहमीच खुमासदार असतात....