Skip to main content

कंटाळा आल्यावर घरच्या घरी तुम्ही काय खाता ?

कंटाळा आल्यावर घरच्या घरी तुम्ही काय खाता ?

Published on 18/06/2019 - 20:27 प्रकाशित मुखपृष्ठ
मंदार भौंचा बाजार आमटीवाला धागा पाह्यला आणि डोक्यात किडा वळवळला बघा. तुम्हाला कधी अस होत का कि लयी कंटाळा आलाय आणि घरात असलेल काहीच खावस वाटत नाही ? मला तर खुपदा होत अस. मग काहीतरी झोलझाल करून मी नाही नाही ते खात बसतो, शाकाहारी असल्यामूळ थोडी मर्यादा येते पण काय हरकत नाही. १) शिळा भात असला आणि तो थोडासा मोकळा असला कि त्यावर कच्च तेल टाकून + आपल्याला झेपेल इतके लाल तिखट + मीठ टाकून मस्त हाणतो, सर्दी झाली असल तर नाक मोकळ होत आणि तोंडाला चवही येते. २) वरचाच प्रकार थोडा मोल्ड करून पोह्याला वापरायचा त्यात आवडत असल तर घरचे घट्ट दही टाकायचे कधी कधी + कोथमिर मारायची थोडी वरून. मस्त लागतंय. ३) टोमाटो भात - खूप पूर्वी आमच्याकडे एक बिगारी काम करणारी यायची (घरकामाला)पण बघता बघता आमची इतकी गट्टी झाली कि मला तीन भाऊच करून टाकला मग तिच्या माग माग कधीतरी तिच्या झोपडीत जाऊन काय काय खायचो मी ती पण प्रेमान खायला घालायची. तर तिथ त्या लोकांचा टोमाटो भात मी पाहिला आणि खाल्ला होता साधा आणि सिम्पल पण चवीला बिर्याणी बिर्याणी बिर्याणी (द अंग्रेज ची आठवण आली) च्या तोडीचा. टम्बाटी भात :- १ मिडीयम वाटी तांदूळ घ्या तो धुऊन निथळत ठेवा ३ मोठे टोमाटो घ्या आणि त्याचे मोठे काप करा तसेच मिडीयम २ बटाटे सालासकट घेऊन त्याचे हि मोठे काप करायचे. पातेलीत थोडे सढळ हस्ते (मानवेल इतके) तेल घेऊन त्यात आधी सालासकट खरपूस बटाटे परतून घ्यायचे नंतर त्यात टोमाटो घालून परतून घ्यायचे नंतर झेपेल इतके तिखट + चवीला मीठ टाकून ते मिश्रण मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्या. आता आपला निथळत ठेवलेला तांदूळ यात टाकून २ मीन परतून घ्या आणि अंदाजाने पाणी टाकून (कोमट पाणी नायतर गार पाण्याने चव बिघडते) शिजत ठेवा. काही वेळाने तुमचा साधा, सिम्पल टोमाटो भात तयार. टीप - याला फोडणी लावू नये / कोथिंबीर टाकू नये/ मसाला वापरू नये -------------------------------------- तुम्ही कंटाळा आला तर काय अतरंगी खाता ते जरूर सांगा.

याद्या 33412
प्रतिक्रिया 59

हल्ली फोटोविना पाकृ टाकायची टूम निघाली आहे. मिपावरच्या प्रघाताप्रमाणे हा फाऊल समजला जातो व प्रतिसाद मिळत नाहीत / कमी प्रतिसाद मिळतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

म्हात्रे सर, जल्ला मेला कसली बोडक्याची पाक्रु , रिकामपणाचे उद्योग आमचे सगळे तोंडाची चव गेली कि असले उद्येग करायचे बघा. ;)

करुन पाहायला हवा. बाकी भात + तेल + तिखट या कॉम्बोमध्ये तिखटाऐवजी कांदा लसूण मसाला घालूनही भारी लागतं.

In reply to by गवि

बाकी भात + तेल + तिखट या कॉम्बोमध्ये तिखटाऐवजी कांदा लसूण मसाला घालूनही भारी लागतं. असं माझं वैयक्तिक मत आहे.

दही भात - ०भात + पाणी + दही + ( मोहरी-मिरची-कडीपत्ता) फोडणी चीज (तुकडे, किसून नाही) टाकून ऑम्लेट असेल त्या रस्सा भाजीमध्ये पाव (किंवा ब्रेड, मला लोकल ब्रेड आवडतो, ब्रँडेड-क्वालिटी, ब्रिटनिया, गोल्डन इत्यादी अजिबात नाही आवडत. फातिमानगरच्या डायमंड/क्राऊनचा ब्रेड ब्येष्ट) बुडवून खाणे बारीक चिरलेला कांदा(उत्साह असल्यास टोमॅटोसुद्धा)+तेल+कांलम चपातीबरोबर

In reply to by तुषार काळभोर

पोह्यांवर ताक शिंपडायचे, वरून घट्ट दही, साले काढलेल्या शेंगदाण्याचा कूट, मीठ, साखर आणि जिरेपूड घालून मिक्स करायचे. कडीपत्ता, मिरची आणि जिरे हळद हिंगाची फोडणी वरून ओतायची. मोजून15 मिनिटात होते.

In reply to by अभ्या..

पातळ पोह्यांवर करडी तेल, शेंगादाने, डाळवे, मीठ, तिखट, काळा मसाला टाकून शिस्तीत एकत्र करायचे. बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो. दातांना चांगलाच व्यायाम होतो पण टेस्ट चस्का लावते.

In reply to by अभ्या..

उरलेल्या चपातीवर पिझ्झा टॉपिंग पसरून त्यावर एखादी भाजी पसरवायची. डॉमिनोज ची उरलेली ऑरगॅनो ची पाकिटे फोडून ते फ्लेक्स पसरवायचे. एक चपाती वरून दाबून बसवायची. दोन्ही बाजूने बटर टाकून फ्राय करायचे. कट डोसा सारखे तुकडे करायचे. एक्स्ट्रा मजेसाठी शेव, बारीक कांदा आणि कोथिंबीर.

In reply to by अभ्या..

विन्ट्रॅष्टींग वाटतंय. मसालापोहे पास. व्यायामाचा (दातांचा असला तरी) आपल्याला लै कट्टाळा! फ्रँकी फुरसतीत करून बघायला पाहिजे.

In reply to by अभ्या..

हे तर गुज्जू आडनाव वाटतेय... हा हा हा .. आधी हे लक्षात नाही आले. :) आता इन्स्ट्रक्शन कुकिंग करायला घेतो आणि पाकृ टाकतो.

नाचणीच्या पिठाच्या झटपट आंबोळ्या ! दोन वाट्या नाचणीचे पीठ, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, चिमुटभर मीठ, असेल तर थोडे ताक , चिमुटभर धने जिरे पूड पाणी घालून भज्याच्या पीठासारखे सरसरीत भिजवावे. एक तासाने अर्धी वाटी पाणी घालून एकजीव करावे आणि नॉन स्टिक तव्यावर पातळ आंबोळ्या घालाव्या. मस्त कुरकुरीत होतात. बरोबर दही -मेतकूट, तूप- मेतकूट, शेंगदाणा चटणी जे काय असेल ते ! झटपट आणि पौष्टिक मेनू !

In reply to by सस्नेह

अरे वाह स्नेहा ताई करून बघायला पाहिजे. आमच्या घरी तांदळाची पिठी असेल तर त्यात थोडी मिरची+कोथिंबीर +आंबट ताक आणि चवीपुरते मीठ टाकून डोश्याच्या पिठासारखे सरसरीत करून धिरडी करतो आम्ही, वरून लोणी मारले कि मस्त लागतात. (आंबट ताक नसेल तर लिंबू पिळायचे)

इंटरेस्टिंग आहे टोमॅटो भाताची रेसिपी. कधीतरी एकटा असताना करून बघणार!
तुम्ही कंटाळा आला तर काय अतरंगी खाता ते जरूर सांगा.
मूड असला तर पाव भाजी, पाणीपुरी, जीरा राईस + दाल तडका बनवायला आवडतात. पण कंटाळा आला असेल तर मात्र मऊभात+मेतकुट किंवा पटकन तयार होणारी मुगाच्या डाळीची खिचडी खाऊन वेळ निभाऊन नेतो :)

सगळ्याचाच कंटाळा आला असेल तर पाणीपुरी ला पर्याय नाही ... अर्थात पाणीपुरी खाण्याचीही एक पद्धत आहे ... प्रथम द्रोणात थोडा कांदा मागून घ्यावा सुरवातीस पाणीपुरीवाल्या भैयाला (आता कल्याणभेळ मधला गांधी टोपी घातलेला मराठी गडी असला तरी पाणीपुरी पुरता भैयाच) ... तर भैयाला मिडीयम असं सांगावं ... मग तो छान चिंचेचं आंबटगोड आणि पाणीपुरीच्या तिखट पाणी एकत्र करून देतो . त्यात चवीप्रमाणे कांदा टाकत राहावं .. अशा ४-५ पुऱ्या उडवल्यानंतर "तिखा" अस म्हणावं ... आता पुण्यात जरी असलात तरी एकदा त्याला "भैया" असं संबोधल्यावर "तिखट" च्या ऐवजी "तिखा" या शब्दाला पर्याय नाही . मग तो चिंचेचे पाणी कट करून मस्त तिखट पुरी देतो. या पुरेश्या खाऊन झाल्या की द्रोणात साचलेलं तिखट पाणी, थोडं वाढवून घ्यावं आणि तोंड लावून मनापासून प्राशन करावं. यानंतर उपसंहार म्हणून एक ड्राय पाणीपुरी मागून घ्यावी ... याने कुठलाही कंटाळा दूर होतो मुळात हे पाणीपुरी व्रत जर नियमपणे केलं तर कंटाळा तुमच्यापासून दूर राहतो

In reply to by अमर विश्वास

आता कल्याणभेळ मधला गांधी टोपी घातलेला मराठी गडी असला तरी पाणीपुरी पुरता भैयाच
गांधी टोपी घातलेलं आसामी पोरगं कट डोश्यात चीज किसत असताना दिसलं की ते दुकान कल्याण भेळ म्हणावं. च्यामारी ह्या मेट्रो खेड्याच्या.

In reply to by अमर विश्वास

पाणीपुरी बद्दल लाखवेळा सहमत. परवाच धायरीतल्या दादांकड खाल्ली (मराठी आहेत) साधी हातगाडी आहे पण वृत्ती चांगली आणि हात सढळ आहे, त्यांचे तिखट पाण्याला इतका खंग्री झटका आणि चव असते कि काही विचारू नका. पाणीपुरी झाली कि आग्रह करून नुसते पाणी प्यायला देतात + त्यावर मस्त गरम गरम रगडा मारतात काय अफलातून लागते काय सांगू. आणि नंतर मसालापुरी देताना पण १न देता हाताला लागतील तितक्या ४/५ पुर्या डिश मध्ये मस्त मसाला + रगडा मारून देतात. साधारण ५/६ वर्ष झाली असतील त्यांना गाडी चालू करून पाणीपुरीच्या डिश ची किंमत आधी १०/- रु आता १५/- रु फ़क़्त आहे.

मुळात हे पाणीपुरी व्रत जर नियमपणे केलं तर कंटाळा तुमच्यापासून दूर राहतो +1

घरी एकटेच असल्यावर पुरुषानं करता येणार सर्वात सोपा पदार्थ आम्लेट आणि त्या बरोबर पाव. किंवा भेळ,फोडणीचा भात, आणि अगदीच जास्त कंटाळा आला तर अंडे शिजवून खाणे. अवघड पदार्थ पुरुष बनवू शकत नाहीत (अपवाद म्हणून १ दा असू शकतो)

घरी एकटेच असल्यावर पुरुषानं करता येणार सर्वात सोपा पदार्थ आम्लेट आणि त्या बरोबर पाव. किंवा भेळ,फोडणीचा भात, आणि अगदीच जास्त कंटाळा आला तर अंडे शिजवून खाणे. अवघड पदार्थ पुरुष बनवू शकत नाहीत (अपवाद म्हणून १ दा असू शकतो)

भेळ. फार काही चटण्या वगैरे पण नकोत. कांदा, टोमॅटो कापून, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अगदी बारीक कापून. हे सारे आणि कुरमुरे, फरसाण आणि शेंगदाणे एकत्र करायचे. थोडेसे तिखट, चवीला मीठ. बास. किंवा रेडिमेड सूप. किंवा काळी कॉफी. किंवा गरमागरम चहा, त्यात वरून कुरमुरे पेरायचे. चमच्याने चहा - कुरमुरे खायला मजा येते. किंवा पोळी( चपाती) चा चिवडा. मोहरी, कांद्याची फोडणी करून पोळीचे बारीक तुकडे करून परतायचे आणि वरून थोडी कोथींबीर.

In reply to by यशोधरा

गरमागरम चहा, त्यात वरून कुरमुरे पेरायचे. चमच्याने चहा - कुरमुरे खायला मजा येते. किंवा पोळी( चपाती) चा चिवडा. मोहरी, कांद्याची फोडणी करून पोळीचे बारीक तुकडे करून परतायचे आणि वरून थोडी कोथींबीर. हे दोन्ही प्रकार लैच आवडीचे.

In reply to by श्वेता२४

पोळी( चपाती) चा चिवडा. मोहरी, कांद्याची फोडणी करून पोळीचे बारीक तुकडे करून परतायचे आणि वरून थोडी कोथींबीर. हे दोन्ही प्रकार लैच आवडीचे.
फक्त ह्यात कांदा आवडत नाही. बाकी रेशिपी जरा जास्त कुरकुरीत परतून घट्ट दह्यासोबत अम्रुतासम लागते.

वा वा वा... हा प्रकार मला प्रचंड आवडतो. बाकी मला चहात भिजवून (!!) पार्लेजी, बटर (लोणी नाही, बेकरीवालं), आणि विशेषतः खारी लै आवडते.

In reply to by तुषार काळभोर

खारीतली पिळखारी (तो बो सारखा आकार असतो तो) मस्त. एकतर हातात चांगली धरुन अर्धी बुडवता येते. ती खाल्ली की मधल्या गाठीला धरुन उरलेली अर्धी बुडवायची. एकच ळंबर टेस्ट. थोडासा तुपकट होतो चहा पण टेस्ट का टेस्ट. जिरा बटर (वर्क्या) पण भारी. पार्लेजीशी मात्र आपली जन्माची दुश्मनी आहे. अगदी सगळ्या मार्‍याशी पण. बिस्कीटात लेटेस्ट म्हणले तर उनिबिकची फ्रुट नट वाली कुकीज बेस्ट. जुने ते सोने म्हणले तर मोनॅको डार्लिंग. आणि साखर पेरलेले नाईस कोकोनट.

In reply to by तुषार काळभोर

खरेच की पैलवान भाऊ! ते बटर प्रकरण विसरलेच मी. कोकणात ( जिरा नसलेले) जे बटर मिळतात, ते चवीला मस्त असतात. चहा आणि ते(च) बटर. किती दिवसांत खाल्ले नाहीयेत.

बटाटा किसून, पाण्यातून काढून पिळून घ्यायचा, पाणी पूर्णपणे निथळले की त्यात तिखट, हळद, गरमा मसाला, थोडे बेसन आणि चवीपुरते मीठ, साखरेची चिमूट टाकायची. कोथींबीर, पुदिना बारीक चिरून. एकत्र करायचे. गरज असली तर अगदी जरुरीपुरते पाणी. लाडूसारखे वळून, जरा चपटे करून शॅलो फ्राय करायचे. जरा वेळ लागतो पण कंफर्ट फूड आहे.

बिबडया, कच्चे शेंगदाणे भिजवून त्यात कांदा, शेंगदाण्याची चटणी, तेल टाकून ५ मिनिटात तयार. (दुपारच्या वेळी खाण्यासाठी मस्त.) (बिबड्या : जळगांव भागात बहुतेक शेतकरी घरांमध्ये साधारण फेब्रुवारीत वर्षभरासाठीच्या बिबड्या तयार करतात. यासाठी ज्वारी, गहू वेगवेगळे भिजवून त्याचा चीक काढल्या जातो. नंतर तो शिजवून गरम असतांनाच धोतरावर पापडासारखे थापून त्याच्या बिबड्या तयार केल्या जातात. या भाजून अथवा तळूनही जेवणाबरोबर खाल्ल्या जातात .}

In reply to by गोरगावलेकर

आमच्याकडे (नागपूरला) ह्याला 'धापोडा' म्हणतात.. भाजलेला धापोडा हा खिचडी, झुणका, मुंगवड्यांची भाजी ह्यासारख्या प्रकारांसोबत तोंडी लावायला अफलातून पदार्थ आहे.

In reply to by गोरगावलेकर

धान्याचा चिक काढणे हे खूप कष्टाचं काम आहे . पूर्वीच्या बायका हे सर्व करत असतील . पण आताच्या पिढीतील स्त्रिया एवढं कष्ट घेतील असे वाटत नाही ..त्या मुळे आत्ता हा bibadya अस्तित्वात असेल वाटत नाही इतिहास जमा झाला असेल

In reply to by Rajesh188

मेहनत करायची तयारी असली तरी अपुरा वेळ, जागेची उणीव, वाळवणासाठी कडक ऊन इ. गोष्टींची कमतरता असल्याने शहरात या गोष्टी बनवणे कठीणच. हे पदार्थ गेल्या वर्षापर्यंत मलाही आईकडूनच येत होते. पण हौस म्हणून या वर्षी स्वत: बनवले व तेही मुंबईच्या विपरीत हवामानात. शहरी भागात हा पदार्थ माहीत नसेल पण गावी अजूनही दोन-चार जणी मिळून असे पदार्थ हसत खेळत बनवतात. ज्या ग्रामीण भागात ज्वारी, गहू या धान्याचे उत्पादन होते त्या भागात अजून तरी हे पदार्थ कालबाह्य होणार नाहीत. (आता गावी बिबड्या काही ठिकाणी ऑर्डर प्रमाणे बनवूनही मिळतात. साधारण ₹600/- प्रति शेकडा)

झटपट चीज पाव ( ओपन ग्रिल ) १) साधा प्रकार " पावाच्या लादी वर चीज ची एक लादी किंवा किसलेले चीज घालून ग्रिल खाली भाजणे. चीज जरा खरपूस हुन त्याचा रंग बदले पर्यंत. पटकन होते . यात महत्वाचे असे कि हे ग्रिल खालीच जमते तव्यावर नाही आणि ओव्हन मध्ये शक्यतो नाही ( त्याचा वरील ग्रिलर वापरावा) कारण आच वरून असावी लागते आणि ती सुद्धा चीज ला न चिकटता, आणि हे सँडविच नव्हे आणि यात दुसरे महत्वाचे म्हणजे कोणत्या प्रकारचे चीज, शक्यतो थोडेसे खारट प्रकार कडे झुकणारे "टेस्टी" जातीचे चीज उत्तम २) याचा भारतीय प्रकार, चटणी किंवा लोणचे हलके वरून घालणे ( भाजायचा आधी) ३) पाश्चिमात्य प्रकार + = ऑलिव्ह किंवा वाळलेले टोमॅटो ( सून ड्राईड) घालावे

हल्ली चायनीज मसाला मिळायला लागल्यापासून फोडणीचा भात घरातून हद्दपार व्हायला लागलाय आमच्या, कारण आई, बायको आन पोरग (पोरगी लहान आहे म्हणून नायतर ती पण) सगळे पट्टीचे चायनीज खाणारे, माझा बाप आन मी दोघांना भाकरी + शेंगदाण्याची चटणी आणि कांदा असलो कि आम्ही खुश सोबत कोवळी हिरवी मिरची पण भारी लागतीय. :)

In reply to by उपेक्षित

शिळ्या भाकरीवर तिखट आणि वर थोडं तेल! कित्तीपण कंटाळा, डिप्रेशन वगैरे असलं तरी पळून जातं हो! डिप्रेशन/ कंटाळ्याच्या मात्रेत तेल तिखटाची मात्रा वाढवायची! =)) किंवा, शिळी भाकरी, दही आणि तिखट. चिमटीभर मीठ. अ आणि हा आणि हा!!

हो. मलाही खूप आवडते. चटणी, तेल टाकून भाकरी तव्यावर कडक करून घेतली तर अजून छान लागते. असाच दुसरा प्रकार म्हणजे चिकणीचा पापड भाजून त्यावर चटणी, तेल टाकून खाणे.

In reply to by उपेक्षित

@उपेक्षित काही हरकत नाही गल्ली चुकली तरी. खादाडीसाठी कधीही तयार. थोडेसे अवांतर होतंय पण तरीही सांगायचे म्हणजे आपल्याकडे खान्देशचे बरेच प्रकार आहेत. *हिवाळ्यात हिरव्या-पांढऱ्या मोठ्या वांग्याचे कांद्याची पात घालून केलेले भरीत सोबत बाजरीची भाकरी किंवा बाजरीच्या पुऱ्या. * कळण्याची भाकरी आणि हिरव्या मिरच्यांचा ठेचा. (ज्वारी व उडीद प्रमाणात एकत्र दळून केलेली भाकरी) *झणझणीत शेव भाजी (भरपूर तेलाचा तवंग असलेली) आणि भाकरी. * चिवळचे फुणके कान्होले व कढी : फुणके:धान्याच्या डाळी तयार करतांना बरीच चूर उरते. ही डाळींची चूर प्रमाणात एकत्र करून, भिजवून त्यात कांदा, चिवळची भाजी घालून त्याचे मुटकुळे करून वाफवले जातात. (चिवळची भाजी नसली तरी नुसता कांदा टाकूनही करतात) कान्होले: गव्हाचे पीठ मीठ,हळद,तेल,पाणी टाकून भिजवायचे. चपाती सारखे लाटून घ्यायचे. पूर्ण चपातीवरून तेलाचा हात फिरवायचा. चपातीची लांबट गुंडाळी करून कुकरमध्ये वाफवून घ्यायची. आता फुणके चुरून, त्यात कढी टाकून वाफवलेल्या कान्होल्यां बरोबर हादडायची.

आकबर : भो बिर्बला, सग्ळ्यात भारी फळं कोण्तं ? बिर्बल : म्हाराज, येळला हाताशी येईल ते केळंच भारी ! तात्पर्य : कंटाळा आला म्हणजे काय होतं ? की अगदी काही बनवून खाण्याचा पण कंटाळा आला पाहिजे. अशावेळी अर्धा- एक डझन केळी विकत आणायची आन हाणायची !

जवळ जवळ ६ वर्षांनंतर मिसळपाव वर आलोय, माहेरी आल्यासारखे वाटत आहे. शेवटचा धागा मुद्दाम वर काढतोय. बाकी ६ वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलं.

In reply to by कंजूस

मी सुद्धा मुरमुरे हल्दीराम च्या आलू भुजिया सोबत खातो. कधी कधी रतलामी लसूण शेव बरोबर खातो. कच्चा कांदा असला तर आनंद होतो नसला तरी चालतो