✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

म्हातारा न इतूका....

क
कर्नलतपस्वी यांनी
गुरुवार, 06/19/2025 - 09:32  ·  लेख
लेख
आज सकाळ पासून नव्हे रात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. एका मागोमाग एक अशी पाऊस गीते कानात हजेरी लावत आहेत. आज तुकोबाराय यांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. संतश्रेष्ठ तुकोबाराय व अधुनिक वाल्मीकी गदिमा यांच्या जीवनात एक सम्यक घटना घडली.इंद्रायणीत गाथा तरली व १९६१ पुण्यात पानशेत धरणफुटीने आलेल्या पुरामधे वरदक्षिणा या चित्रपटाचे मुळ हस्तलिखित जसेच्या तसे,कोरडे तरले. एकच होते. "आठवणीतील गाणी" या संकेतस्थळावर माहीती मिळाली. याच हस्तलिखितातले ,मन्ना डे यांनी गायलेले गाणे,"घन वन माला नभी ग्रासल्या,कोसळती धारा",हे अप्रतिम गाणे आपल्याला मिळाले. घन वन माला नभी ग्रासल्या आज बाहेर जाता येत नाही,घरातच बसून रहावे लागत आहे वेळ सत्कारणी लागावा म्हणून संत साहीत्य अंतरजालावर चाळत असताना विसाव्याच्या क्षणी दिलासा देणारा तुकोबाराय यांचा अभंग समोर आला. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे || १ ||. नको करू खेद कोणत्या गोष्टीचा | पती लक्ष्मीचा जाणतसे || २|| आता सर्व स्वानंदा साठी. कुठलीच चिंता नाही. कोणाची काळजी नाही. संत तुकाराम सर्वानाच माहीती आहेत पण त्यांचे जेष्ठ बंधू सावजी सुद्धा तेव्हढेच विरक्त.नेहमी म्हणत, "गोरूये रूखातळी बैसली",गुराख्याने हाकललं की घराकडे चालू लागायचं. खरोखर वडिलांचे दिवस झाले.जेष्ठ सर्वसंग त्यागून कुठे निघून गेले कळाले नाही. सत्तरी पार केलीय पण वृद्ध नाही झालो. काही महानुभावांना वाटते काही नवीन शिकण्या पलिकडे गेलेला अडमुठा,अडेलतट्टू म्हातारा, पण एक लक्षात घ्या "म्हातारा न इतूका अवघे पाऊणशे वय माझे....". विरंगुळा म्हणून बाल्कनीत बसून काल अनुभवलेला निसर्ग आज बाल्कनीतून चिंब भिजताना बघत असताना कालचा अनुभव शब्दबद्ध केला. "आज सकाळी तीन तास जंगलात भटकत होतो.चातकपक्षी आवाज देत होता,दिसला नाही.हा पक्षी हिमाचल मधून स्थलांतर करतो. या पक्षी सोबत अनेक अख्याईका जुडल्या आहेत. दरवर्षीच चातक पक्षी (Jacobin Cuckoo) पावसाळ्यात येतो पण दर्शनासाठी खुप कष्ट आणी चिकाटी लागते.मागील वर्षी बाल नामदेवा प्रमाणे हट्ट धरून बसलो होतो. चार पाच तास प्रतिक्षा केल्यावर महाराज दिसले. डौलदार राजस पक्षी, प्रचि संग्रही आहे. छोटा पावश्या,कारूण्य कोकीळ(Grey billed Cuckoo,) दिसला. टिपला सुद्धा. हा पक्षी आपल्या जोडीदाराला बोलावण्या साठी जो आवाज करतो तो "वळीव,वळीव"असा ऐकू येतो. शेतकर्‍यांचा मित्र,पावश्या(Common Hawck Cuckoo) "पेरते व्हा", म्हणून संदेश देत बरेच दिवसापासून ठाण मांडून बसलाय. इंग्रज याला ब्रेनफिव्हर म्हणतात. महादेव वाडीच्या जंगलात सुरवंट वयात आले, त्यांची नक्षीदार फुलपाखरे झाली आहेत. पुढे आणखीनच वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं दिसतील.चतुर (ड्रॅगनफ्लाय) आपली पुढची पिढी घडवण्यात रममाण होते. हायला, निसर्गात बघावे ते आश्चर्यच, भटकत असताना चतूर हवेत समागम,स्वमग्न तरंगताना दिसत होते. एक नाही तर अशी बरीच जोडपी हवेत जोडी जोडीने तरंगत होती.अमेझींग न! चतूर वेडे राघू चतुरपणे त्यांना भक्ष्य बनवत होते. एकावर एक फ्री टाईप... चिमण चंडोल,भट चंडोल मस्त किडे टिपत मधूनच लकेर फेकत होते.नेहमीप्रमाणेच सातभाई,फुलचुखी,प्रणयातूर बुलबुल, कोकीळ, कोकीळा,ब्राह्मणी मैना,होला साळुंक्या,कबुतरं स्वमग्न,भक्ष्य टिपत होते. डोंगरावर नैसर्गिक तलाव आहे. पावसाळ्यात पाणी साचते.या वर्षी पण भरपूर पाणी साठले आहे.,बगळे,हेराॅन,सॅण्डपाईपर, थोरला, धाकला धोबी, पाणकोंबड्या खंड्या,कोतवाल,वेडा राघू असे किटक भक्षी पक्षी इथे हमखास दिसतात,आजही दिसले.एकदिवस तर चक्क एक नागराज तलावावर लपलप करून पाणी पिताना दिसला.काळा कभिन्न कोब्रा होता. सौंदर्य आणी भय असा विचित्र मिश्र अनुभव होता. माळरानावर भारद्वाज,हुपुप,छोटे शिकारी, कावळे,भटकी कुत्री अशी मांदियाळी.भरपुर झाड झाडोरा,जाणाऱ्या नागमोडी पायवाटा. थोड्या दिवसात रानफुले,पक्षी,रंगबिरंगी फुलपाखरे किटकांची भर पडेल, निसर्ग बहरून येईल आणी आनंद द्विगुणित होईल. माळरानावर लाल, पिवळ्या टिटव्यांनी पालं टाकलीत.वडार,गडिया लोहार या जमाती प्रमाणे उघड्यावर संसार थाटलाय.अंडी घातली आहेत.काही बाळं जन्मली आहेत.खुप सार्‍या टिटव्या हिंडत,उडत आहेत.बाळे, अंडी यांच्यावर नजर ठेवून आहेत. सटवी घार, नतद्रष्ट डोमकावळा आणी इतर शिकार्‍यांची वाईट नजर आहे.त्यांच्या रक्षणार्थ टिटव्यांनी चक्रव्यूह रचलाय. कुत्री,घारी,कावळे,शिक्रे यांना जवळ फटकू देत नव्हत्या.जवळून जाणाऱ्या वाटसरूं वर सुद्धा फायटर जेट सारखी झेप घेत होत्या. जणू राफेल व F सोळाची डाॅग फाईट चालू आहे असेच वाटले. सगळीकडे हवाहवासा हिरवागार रंग त्यावर टंणटणीच्या फुलांची नक्षी, काय मस्त देखावा होता.मला तर पक्षीदर्शन आणी ध्यान योग (मेडीटेशन) यात साम्य वाटते.सकाळ मस्त गेली. इथून पुढे निसर्गाचा आलेख वर चढत जाणार. आगदी बालकवींच्या कविते सारखे. हिरवे पिवळे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे ..... अतिशय सुखद अनुभव.नादब्रह्मच जणू.दयाळ,शिंपी,कोकीळ कोकीळा, सातभाई यांचे सतत कानावर पडणारे आवाज म्हणजे जुन्या काळा तील मेलडी मेकर्सचा ऑर्केस्ट्रा किवां सिंम्फनी म्हणावे लागेल. घरी परतायचे भान रहात नाही.मात्र दररोजचे वाटसरू याची आठवण करून देतात मग पावले घराकडे वळतात." टिपलेली छायाचित्रे बघण्यासाठी तू नळीची लिंक दिली आहे. एक सकाळ जंगलातली
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद
अनुभव
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
2146 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

पद्म पुरस्कृत मारूती चितांमपल्ली...

कर्नलतपस्वी
गुरुवार, 06/19/2025 - 10:24 नवीन
भावपूर्ण श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments

सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा

Bhakti
गुरुवार, 06/19/2025 - 10:52 नवीन
सुरेख लिहिलंय.असं निसर्गाचा भाग होतं जगण्यातली मजा अविस्मरणीयच असते. अरण्यऋषी ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांना विनम्र अभिवादन!! खुपच सच्चा, संवेदनशील माणूस होता!!जंगलाशी बोलायला शिकवणूक गेले.युट्युबवर अनेक व्हिडिओ पाहिले.अनेकदा त्यांचे डोळे जंगलाविषयी बोलताना डबडबले असायचे..
  • Log in or register to post comments

वा छानच सहल झाली सकाळची.

कंजूस
गुरुवार, 06/19/2025 - 11:11 नवीन
वा छानच सहल झाली सकाळची. महादेव वाडीचा डोंगर कुठे आहे आणि कसे जायचे. जवळचे रेल्वे स्टेशन/ बस स्टॉप कोणता?
  • Log in or register to post comments

व्वा... सुंदर चित्रदर्शी

चौथा कोनाडा
गुरुवार, 06/19/2025 - 12:28 नवीन
व्वा... सुंदर चित्रदर्शी निसर्ग भटकंती ! ... आणि प्रचि सुद्धा सुंदर !
  • Log in or register to post comments

सुंदर ....

सुधीर कांदळकर
गुरुवार, 06/19/2025 - 19:27 नवीन
सुंदर निसर्गाचे तितकेच सचेत, उत्कट, शब्दचित्र. आवडलेच. माझ्या मालवणच्या घराशेजारूनच वहाळी जाते. वहाळी म्हणजे भरपूर पाऊस पडल्यावर उतारावरून वाहणारा अवखळ झरा. त्यामुळे एका बाजूला घराला लागूनच घनदाट झाडी. अनेक पक्ष्यांची बारमाही दिवसभर वर्दळ. मोरांचा वावर असतोच. सुतार, तांबट यांचे आवाज असतातच. दोनतीन प्रकारचे बुलबुल, कोकिळ, सातभाई, भारद्वाज, कांही प्रकारचे बॅबलर उदा. बफ ब्रेस्टेड बॅबलर, दोन प्रकारचे दयाळ, दोनतीन प्रकारचे खंड्या, कापशी घार, धनेश-हॉर्नबिल, डोमकावळे, टिटवी, चिमणीपेक्षां छोटे किंचित लांब चोचीचे बी ईटर इ. इ. पक्ष्यांच्या बाबतीत माझे ज्ञान सामान्य, त्यामुळे जास्त तपशील देऊं शकत नाहीं. कावळे आणि चिमण्या मात्र नाहीत. डोमकावळे कावळ्यांना येऊं देत नाहीत असे इथे म्हणतात. इथून जवळच सुमारे १५ किमीवर आंगणेवाडीजवळ बिळवस इथे सातेरी मंदीर आहे. मंदिराभोवती १५ - २० फूट रुंद तळे आहे. यात पावसाळ्यात पाणी साचले की मंदीर पाण्यात उभे आहे असे वाटते. पावसाळ्यात फोटो व्हीडीओ काढायला मजा येते. आणखी बरेच काही आहे. त्यामुळे मी वर्षभर इथेच रहतो. फोटो व्हीडीओ गूगलवर टाकून दुवे देईन.
  • Log in or register to post comments

जबरदस्त निरीक्षणशक्ती, प्रचंड

प्रचेतस
गुरुवार, 06/19/2025 - 19:54 नवीन
जबरदस्त निरीक्षणशक्ती, प्रचंड संयमाचे काम आहे हे. आपली आवड अशीच वाढत राहो.
  • Log in or register to post comments

कर्नलजी ...

सुधीर कांदळकर
गुरुवार, 06/19/2025 - 20:24 नवीन
फारच सुंदर प्रकाश चित्रे. लेखातले आपले समालोचन जितके प्रत्ययकारी, कवितेच्या जवळ जाणारे आहे तितकेच आपले प्रकाशचित्रणही सुंदर आणि प्रत्ययकारी. जबरदस्त. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

लेखन व प्र चि

अनन्त्_यात्री
गुरुवार, 06/19/2025 - 21:11 नवीन
दोन्ही आवडले
  • Log in or register to post comments

प्रतिचित्रांमुळे लेख उठावदार

नचिकेत जवखेडकर
Fri, 06/20/2025 - 06:03 नवीन
प्रतिचित्रांमुळे लेख उठावदार झालाच आहे पण नसती तरी वर्णनशैली सुंदर असल्यामुळे वाचनातूनच चित्र डोळ्यासमोर उभी राहतायत!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा