✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कायदेविषयक अडाणी प्रश्न...(बरेच आहेत..!!)

ग
गवि यांनी
Fri, 11/16/2012 - 15:50  ·  लेख
लेख
नेहमी काहीतरी कथा आणि गविछाप लेख लिहून मी कंटाळलो आहे. मलाही आता काथ्याकूट करायचा आहे. आणि खरंच जेन्युईन काथ्या मनात भरला आहे. शिवाय किमान वर्षभरात मी काथ्या कुटला नाही, तेव्हा खलबत्त्यावर गंज चढला आहे. तर... -अमुकअमुक न्यायालयाच्या खंडपीठाने अमुक निर्णय दिला. -न्यायाधीश अमुकतमुक यांनी ***वर कडक ताशेरे ओढले. -सुप्रीम कोर्टाने अमुक केसमधे दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार आता अमुक करता येईल. -सध्याही एका आयटेम गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्त्रीने एका राजकारण्यावर बर्‍याच कोटींचा "अब्रूनुकसानीचा दावा" लावला आहे.. असं बरंच काही वाचण्यात येतं माझ्या. आणि मग माझ्या मनात पूर्वीपासून साठलेले बरेच प्रश्न पुन्हा रिफ्रेश होतात. १. न्यायाधीश ही व्यक्ती आपल्या सारासार विवेकबुद्धीने सर्व बाजू पाहून निर्णय देते असं माझं मत झालेलं आहे. पण त्यात त्याचा स्वतःचा काही विचार असतो की फक्त आणि फक्त कायद्याच्या पुस्तकातल्या चपखल बसणार्‍या कलमांचं अ‍ॅप्लिकेशन?.. म्हणजे त्याला स्वतःच्या विचारांनी / भावनांनी / मतांनी /सद्सद्विवेकबुद्धीने निवाडा करण्याचा हक्क नसतोच आणि फक्त घटनेत काय लिहीलंय ते पाहून त्याप्रमाणे आज्ञा द्यायची हे इतकंच त्याचं काम आहे? नेमकं काय करायचं असतं जज्ज या व्यक्तीने. २. कोणत्याही खटल्यात "निर्णय देणं" हे जर न्यायाधीशाचं काम आहे, यामधे कोणावर "ताशेरे" मारणं बसतं का? ३. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयांना पुढे अनेक खटल्यांत रेफर केलं जातं, याचा अर्थ सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा कायदा होतो का? कायदा तर लोकसभेत / राज्यसभेत बनतो ना? ४. सर्वच गुन्ह्यांना किमान आणि कमाल शिक्षा ही आधीच घटनेत ठरवून दिलेली असते का. कमाल आणि किमान शिक्षा ठरलेली असेल तर मग त्यातली नेमकी किती (वर्षे /दंड रक्कम) द्यायची हा निर्णय न्यायाधीशाच्या बुद्धीवर, व्यक्तिगत इच्छेवर सोडलेला असतो का? ५. कोणत्याही खटल्यात नुकसान (डॅमेज) कसं मोजून काढतात? फिर्यादीने जो आर्थिक आकडा नमूद केला असेल तितकं नुकसान बिनशर्त मान्य करणं शक्य नाही. मग पुराव्यांवरुन हे नुकसान शोधण्याचं काम जज्ज करतात का? यात कॉन्सिक्वेन्शियल डॅमेज धरलं जातं की कसं? कॉन्सिक्वेन्शियल डॅमेजची सीमारेषा कशी ठरवावी? उदा. "धबॉक" कंपनीचा बूट खरेदी करुन मी शोरुमबाहेर पडताक्षणी त्याचा सोल फाटला आणि: अ. त्यामुळे माझा तोल जाऊन माझ्या डोक्याला मार लागला, आयसीयूत दाखल केले, तीन लाख खर्च आला. ब. या पडण्यामधे माझा ३० हजाराचा टॅबफोन उडून हरवला. क. आणि माझ्या खिशात असलेलं महाराष्ट्र राज्य लॉटरीचं एक कोटी रुपयांचं पोटेन्शियल तिकीट गटारात वाहून गेलं. ते आता माझ्याकडे नसल्याने तेच विजेतं तिकीट आहे का हे सिद्ध करता येणार नाही, आणि अन्य कोणी बक्षिसावर दावा केला नाही तर मीच तो विजेता असण्याची शक्यता गृहीत धरावी ड. पुढचे तीस दिवस मी हॉस्पिटलात असल्याने माझा तीस लाखांचा धंदा बुडाला. ई. शिवाय माझा नवीन (ग्यारंटीवाला) दीड हजाराचा बूट फाटून नष्ट झाला हे नुकसान झालं. यापैकी कोणत्या क्रमांकांचे दावे कायद्याने ग्राह्य आहेत? धबॉक कंपनी मला काय काय देऊ लागते. हा प्रश्न अतिशयोक्त आहे, पण हे विचारण्याचं कारण असं की माझ्या अर्धज्ञानी वाचनात कायद्यामधे "मेकिंग गुड द लॉसेस" किंवा "नुकसानभरपाई करुन देताना जणू ती मूळ नुकसानकारक घटना घडलीच नसती तर फिर्यादीची आज जी स्थिती असती ती पैशाने रिस्टोअर करणे" असा अर्थ होतो. ६. साक्षीदार आणि पुरावे हे दोन्ही शब्द आपण सिनेमात आणि बातम्यांत ऐकतो. हे दोन्ही घटक एकसारखेच समजले जातात का? कोणताही एक भाग असला तरी बास होतं की साक्षीदार आणि पुरावे असे दोन्ही वेगवेगळे सादर करावेच लागतात? साक्षीदाराच्या म्हणण्याला वेटेज असतं की तो जे म्हणेल ते सत्य मानलं जातं? साक्षीदाराचं म्हणणंही पुन्हा पुराव्याने शाबीत करावं लागतं का? साक्षीदार नात्यातला असणं नसणं याने काही फरक पडतो का? ७. गीतेवर हात ठेवून शपथ घेणे यामागे केवळ एक परंपरा याखेरीज काही अर्थ आहे का? कायदा एरवी इतका काटेकोर आहे तर गीतेवर हात ठेवून शपथ या क्रियेला काय अर्थ राहतो? ..फार प्रश्न झाले. काही उलगडा होत नाहीये. गूगलबाबाला साकडे घालूनही बर्‍याच कल्पना क्लियर होत नाहीयेत. कोणी यातली माहिती असलेले आहेत का? ही फक्त एक उत्सुकता आहे. मी कोणत्याही खटल्यात पडलेलो नाही सुदैवाने.. डोके पिकवण्याबद्दल काही खटला दाखल करता येत असेल तर मिपाकर माझ्यावर करतील अशी भीती आहे.. मग तो गुन्हा दखलपात्र आहे का हे बघावं लागेल. त्यानंतर मी जामिनावर बाहेर येईन. हो .. आणखी दोन विसरलेले प्रश्न आठवले. ८. दखलपात्र /अदखलपात्र गुन्हा म्हणजे काय? अदखलपात्र गुन्हा म्हणजे तो करणार्‍याला पोलीस पकडतच नाहीत का? मग अशा गुन्हा-क्याटेगरीला अर्थ काय राहतो? ९. जामीन नेमका कोणाला मिळू शकतो आणि कोणाला नाही? सिनेमात पाहून आणि पेपरात वाचून तर जो कोणी अटकेस प्राप्त होतो तो पुन्हा जामिनावर बाहेर येतोच. हा काय प्रकार असतो? कोणीही यावे आणि पैसे भरुन सोडवावे इतकं सोपं आहे का? अडाणीपणाबद्दल क्षमस्व. हे खरंच मला पडलेले प्रश्न आहेत.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30467 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

कृष्ण बिहारी नूर.....

कर्नलतपस्वी
Mon, 05/26/2025 - 10:17 नवीन
धन के हाथो बिक गये है सभी अब जुर्म की कोई सजा ही नही शंभर अपराधी सुटले तरी चालतील पण एका निर्दोषीला सजा झाली नाही पाहिजे. शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. (म्हणून बरेचसे अन्याय सहन करणारा आर के लक्ष्मण चा काॅमन मॅन) न्यायदेवता अंधळी असते. ( आता डोळ्यावरची पट्टी निघाली आहे,कदाचित निकाल दिल्यानंतर आरोपीचा निकाल लागला किंवा दिलेला निकाल निकालात काढण्यात आला हे कदाचित दिसेल.) तारीख पे तारीख. दोन खटले लवकर संपवण्यात सरकारला मदत केली. न्यायपालिके वर फारसा विश्वास नसलेला. जिल्हा न्यायालय, एक भूतपूर्व सैनिकाचा द्वितीय विश्व युद्धातील सेवानिवृत्ती वेतन करता दावा. सात वर्षा पासुन प्रलंबित. तारीख पे तारीख. दोन वकिलांकडून सरकारव भूतपूर्वसैनिका कडून मंथली इन्कम, सरकारी प्रतिनिधी वारंवार बदलत असल्याने व न्याय संस्थेतील संबधित घटक उदासीन असल्याने दावा टाचा खरडत आहे त्या जागीच होता. भगवान के घरमे देर है अंधेर नही. न्यायालयात सरकारी प्रतिनिधित्व करण्यासाठी माझी नियुक्ती झाली. जाण्यापूर्वीच सात वर्षाचे प्रोसिडिंग्ज वाचले. संपुर्ण केस लक्षात आली. संबधित विषयाची सखोल माहिती होती. महिला न्यायाधीश महोदयांना सर्व सरकारी नियम समजावून सांगीतले व दावा किती चुकीचा आहे ते दाखवून दिले. एक महिन्याचा वेळ मागीतला सर्व मुळ कागदपत्र सरकारी आर्काईव्हज मधून सादर केले. दावा सरकारच्या बाजूने निकाली काढण्यात आला. गरीब वृद्ध भूतपूर्व सैनिक व श्रीमंत वकिलांनी मला खुप Xxx शब्दांनी अलंकृत केले. माझ्या,पर्यायाने सरकारी एक न्यायप्रविष्ट दावा निकाली झाल्याने तिजोरीवरचा भार कमी झाला. दावा काय होता- वृद्ध सैनिक से नि. वेतन मागत होता. पुरावा कुठलाही नव्हता. फक्त एक आर्मी नंबर माझा आहे म्हणून सांगत होता. तो नंबर त्याचा नसून दुसर्‍याच सैनिकाचा आहे व तो केरळनिवासी असून से नि वेतनभोगी आहे असे कागदोपत्री दाखवून दिले. खटला संपल्यावर त्या तथाकथित भूतपूर्व सैनिकाला माझ्या कार्यालयात बोलावून घेतले. सर्व सखोल चौकशीनंतर कळाले, तो खरेच बोलत होता पण पन्नास वर्षाच्या कालावधीत सर्व कागदपत्र, मिळालेले मेडल्स हरवले होते. तसेही, तो अशिक्षित व एका छोट्याच गावातला असल्याने सिद्ध करणे फार कठीण होते. शेवटचा उपाय म्हणून विचारले तुझ्या बरोबर कोणी मित्र आहे का ज्याने तुझ्याच बरोबर नोकरी केलीय. सुदैवानेच होता. दोघेही ब्रिटीश सैन्यात होते. त्या मित्राच्या कागदावरून मागोवा घेतला. पुरावा मिळाला. पुढे काय करायला हवे ते समजावून सांगीतले. स्थानिक भूतपूर्व सैनिक कार्यालयात जाऊन अर्ज देण्यास सांगीतले. पुढे काय झाले माहीत नाही. कारण जे काही करायचे ते त्यानेच करायचे असल्याने माझा रोल संपला होता व लवकरच तेथून माझी बदली झाली. दुसरी केस- जमीन वाॅर जागीर म्हणून मिळाली आहे व त्याचा ताबा मिळावा या संबधित. फार,फार वर्षापासून प्रलंबित होती. माझ्यावर जबाबदारी सोपविण्यात आली होती. प्रचंड दबाव होता. त्या दाव्या संबधित एकोणीस शे बत्तीस पासूनचे कागदपत्रांचा मागोवा घेतला व दावा खोटा आहे असे निदर्शनास आणून दिले. आज त्या जागेवर मोठी सरकारी शाळा उभी आहे. दोन उदाहरणे मुद्दाम दिली कारण न्याय देवता अंधळी असल्याने प्रत्येक जण तीला वेठीस धरतो का काय अशी शंका येते. बाकी असे अनेक खटले जे आजही प्रलंबित आहेत. अनेक निरपराध, अपराधी न्याय मिळेल म्हणून वाट बघताहेत तर अनेक मोकाट फिरताहेत. वरील प्रतिसाद केवळ स्वानुभवावर आधारीत आहे. न्यायदेवता किंवा अन्य संबधित लोकांचा अवमान करण्याचा कदापी उद्देश नाही.
  • Log in or register to post comments

तुम्ही कष्ट घेऊन कागदपत्रे

कंजूस
Mon, 05/26/2025 - 13:40 नवीन
तुम्ही कष्ट घेऊन कागदपत्रे,पुरावे जमवून दिल्याने काम झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कर्नलतपस्वी

पुस्तक

कंजूस
गुरुवार, 06/12/2025 - 11:35 नवीन
पुस्तक भाडेकरूंच्या समस्या व त्यावरील उपाय दत्तात्रय सोनोपंत कुलकर्णी मनोरमा प्रकाशन,दादर. २००२-२००७-२०१० पाने २२० भाडेकरू कायदा १९९९ पर्यंत आढावा आणि सुधारणा. विविध कलमांतर्गत खटले,निकाल आणि लेखकाची टिपणे. खूप माहितीपर पुस्तक.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा