✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वारी !!!

क
किल्लेदार यांनी
Tue, 05/27/2025 - 10:12  ·  लेख
लेख
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते. सगळ्यात पुढे मुख्य पुजारी घोड्यावर स्वार होऊन आणि त्यापाठोपाठ “डोलीचे” भोई भोलेनाथांना खांद्यावर घेऊन घाटातून झपझप चालू लागतात. रस्त्यांत भेटणारी लहान लहान गावं डोलीत बसून येणाऱ्या आपल्या आवडत्या दैवताची आतुरतेनं वाट बघत असतात. डोली गावात आली की एकच झुंबड उडते. डोलीत बसलेले भोलेनाथ मान वाकवून भक्तांनी प्रेमानं अर्पण केलेले हार- तुरे, लाल-पिवळे शेले स्वीकारतात. डोली वाजतगाजत पुढच्या गावाकडं निघते. मजल दरमजल करत तब्बल पंधरा मैलांचा, डोंगरातला थकवणारा प्रवास करून डोली जेवायच्या वेळेपर्यंत पहिल्या मुक्कामाच्या, रांसी गावात पोहोचते. गावातल्या राकेश्वरी देवी मंदीरात मोठा सोहळा रंगतो. यथासांग पूजा-अर्चा, आरती झाल्यावर भक्तांसाठी भंडाऱ्याची (प्रसादाची) सोय होते. देव दर्शनाने आधीच तृप्त झालेले भक्तगण गरमागरम पुरीभाजी आणि शिऱ्याच्या प्रसादानं आणखिनच तृप्त होतात. 20250527_080151 सकाळी हिमशिखरांमागून सूर्यकिरणं डोकावली की वारी पुढच्या प्रवासाला निघते. उकाड्यानं कासावीस झालेल्या वारकऱ्यांसाठी बुरांश फुलांच्या किंवा माल्ट्याच्या (संत्र्याच्या) शीत पेयांची सोय होते. निसर्गही ठिकठिकाणी झऱ्यांचं गार पाणी आणि रानमेवा पुरवून आपल्या परीनं वारकऱ्यांचा श्रमपरिहार करतो. बाजूच्या खोल दरीतून मध्यमहेश्वर गंगा वारीला सतत सोबत करत असते. जंगलातून जाणारी, चढ उतारांची, फरसबंदी वाट दुपारपर्यंत वारीला गौंडार गावात आणून सोडते. आजचा पाहुणचार भोलेनाथांना याच गावात मिळणार असतो. 20250527_075636-COLLAGE 20250527_094038 20250527_080610 20250527_093716 उजाडू लागताच वारकरी आता शेवटच्या टप्प्यासाठी सज्ज होतात. सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते. छोटी वनतोली, वनतोली, खड्डरा, नानू ही गावं भराभर मागं पडतात. आता खडा चढ सुरू होतो. उत्साहानं वारीत सामील झालेले नवखे भक्त धापा टाकत मागे पडू लागतात. शेवटच्या काही मैलात घनदाट अरण्य, वारकऱ्यांच्या आणि भोलेनाथांच्या डोक्यावर दाट सावलीचे छत्र धरते. 20250527_080758 20250527_094816 20250527_081244 सकाळचे साडे दहा उलटून गेलेले असतात. मध्यमहेश्वर मंदिराच्या अलीकडे चार पाच फर्लांगावर आदल्या दिवशीच येऊन बसलेले गावकरी आणि बाहेरून आलेली मंडळी पहाटे पाच पासून वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. मंदिरातले दोनेक मुख्य पुजारी सोडल्यास पूर्ण गाव रिकामे केलेले असते. भोलेनाथांच्या आगमनाआधी गावात कुणीही थांबू नये असा कडक नियम असतो. उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतांना दुरून ढोल, डमरू आणि रणशिंगाचे आवाज ऐकू येऊ लागतात. अचानक उत्साहाचे उधाण येते. “ हर हर महादेव!” जय भोले!” असा जयघोष होतो. एवढ्या उंचावर येता येता बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते. अतिप्राचीन, काळया पाषाणात घडवलेले मध्यमहेश्वराचे देऊळ भगव्या झेंडूच्या माळांनी मढवून सुशोभित केलेले असते. शंभू महादेव आनंदात आपल्या “समर हॉलिडे होम” मध्ये स्थानापन्न होतात. त्यांच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी उसळते. सहा महिने शांत, निर्मनुष्य असलेले मध्यमहेश्वर शिवस्तुतिच्या गजरात दुमदुमू लागते. मध्यमहेश्वर 20250527_092904 बुढ्ढा मध्यमहेश्वर 20250527_091637
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
माध्यमवेध
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
5556 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

वाह !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/27/2025 - 10:15 नवीन
छायाचित्रे जबरा. आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

शस्त्र''संधी'

सरनौबत
Tue, 05/27/2025 - 10:54 नवीन
  • Log in or register to post comments

वारी मस्तच.

कर्नलतपस्वी
Tue, 05/27/2025 - 10:56 नवीन
हिमाचल उत्तराखंड भागात अशी देवस्थाने व वारी सोहळा बरेच ठिकाणी असतो. प्रचि अप्रतिम तसेच वर्णन सुद्धा. नुकताच अम्रीकेत जाऊन आलो. वरील प्रचि मधली काही फळे फुले तिथेही आढळली.
  • Log in or register to post comments

शस्त्र''संधी'

सरनौबत
Tue, 05/27/2025 - 10:56 नवीन
  • Log in or register to post comments

अप्रतिम फोटो

श्वेता२४
Tue, 05/27/2025 - 12:29 नवीन
आणि वर्णन शैलीही छानच....रानमेवा फोटोतून उचलून तोंडात टाकावासा वाटला...फोटोंचा कोलाज करण्यापेक्षा वेगवेगळे टाकायला हवे होते ....स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच असेल का.....
  • Log in or register to post comments

खूपच सुंदर.

प्रचेतस
Tue, 05/27/2025 - 15:22 नवीन
खूपच सुंदर. डोळे तृप्त झाले. मध्यमहेश्वर मंदिर काय विलक्षण सुंदर दिसतेय.
  • Log in or register to post comments

सुंदर !!

सुक्या
Tue, 05/27/2025 - 23:47 नवीन
सुंदर !!
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

कॉमी
Wed, 05/28/2025 - 09:41 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

सुंदर लेख आणि प्रचि!!

राजेंद्र मेहेंदळे
Wed, 05/28/2025 - 12:30 नवीन
लेख वाचता वाचता आणि सुंदर प्रचि बघताना सगळा सोहळा डोळ्यासमोर आणलात!! शीर्षक वाचुन जरा गंडलो होतो, म्हटले वारी तर १९ जूनला आहे आपल्या विठुरायाची!! लेख लवकरच कसा आला?
  • Log in or register to post comments

सुंदर

कपिलमुनी
Wed, 05/28/2025 - 12:43 नवीन
सुंदर
  • Log in or register to post comments

आवडली वारी.

कंजूस
Wed, 05/28/2025 - 14:12 नवीन
आवडली वारी. .......... कसं जातात इकडे, केव्हा?
  • Log in or register to post comments

सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे

Bhakti
Wed, 05/28/2025 - 14:24 नवीन
सुंदर ठिकाण, सुंदर छायाचित्रे,सुंदर लिहिलंय. स्वर्ग वाटत आहे! वर्णनात सरस्वती?? कशी?
सरस्वती आणि मोरखंडा गंगा या नद्यांच्या संगमावरचा चिंचोळा लाकडी पूल ओलांडून वारी पुढे निघते.
  • Log in or register to post comments

सुंदर प्र चि

अनन्त्_यात्री
Wed, 05/28/2025 - 16:00 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments

धन्यवाद

किल्लेदार
Wed, 05/28/2025 - 17:03 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.
  • Log in or register to post comments

हा हा हा ....

श्वेता२४
Wed, 05/28/2025 - 18:01 नवीन
पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. हा हा हा ....भारी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

धन्यवाद

किल्लेदार
Wed, 05/28/2025 - 17:03 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, सुक्या, कॉमी, कपिलमुनी - धन्यवाद. सरनौबत - शस्त्र''संधी'मुळे मिळालेली पर्यटनसंधी. कर्नलतपस्वी - हो खरंय. पण वारीचा माझा पहिलाच अनुभव. श्वेता२४ - बरोबर आहे. मोठे फोटो चांगले दिसले असते पण फार जागा व्यापतात. स्वर्ग आहे खरा. पंधरा-सोळा किलोमीटर डोंगर चढून पायाची दहाही बोटं सुजली की स्वर्ग दोन बोटं पण उरत नाही. प्रचेतस - तुमचा मंदिरांमधला दांडगा अभ्यास बघता हे मंदिर तुम्ही करायलाच हवे. राजेंद्र मेहेंदळे - विठोबाच्या वारीचा योग अजून आला नाही. कंजूस - मे महिन्याच्या अखेरीस मंदिराची कवाडं उघडतात. ती तारीख बघून गेल्यास उत्तम. त्याआधी गावकरी जाऊ देत नाहीत. Bhakti - मला तरी मुख्यत्वे याच दोन नद्यांचा संदर्भ सापडला. माझी माहिती चुकीची असल्यास जरूर सांगा म्हणजे सुधारता येईल.
  • Log in or register to post comments

पंढरपुरास २२-२३-२४ जूनला

कंजूस
गुरुवार, 05/29/2025 - 13:11 नवीन
पंढरपुरास २२-२३-२४ जूनला गेल्यास आरामात दर्शन होईल. ( ज्येष्ठ कृष्ण द्वादशी-.-चतुर्दशी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो.

चित्रगुप्त
Fri, 05/30/2025 - 08:00 नवीन
व्वा. काय सुंदर आहेत जागा आणि त्यांचे फोटो. डोळे आणि मन तृप्त झाले. या जागेची माहिती पूर्वीसारखे पाय चांगले बळकट असताना मिळाली असती तर जरूर गेलो असतो. अनेक आभार आणि पुढील भटकंतीसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

किल्लेदार
Fri, 05/30/2025 - 15:19 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खूपच छान

अकिलिज
Fri, 05/30/2025 - 17:04 नवीन
फोटू अप्रतिम. खासकरुन कुठेही मानवांची गर्दी दिसणार नाही याची विशेष काळजी घेतलेली दिसतेय. वर्णनही सुंदर. '' बारीक झालेली वारीची रेष या सर्व गर्दीला कवेत घेऊन टम्म फुगते.'' - व्वा. क्या बात है. असेच लेख येऊद्यात. मनापासून शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

किल्लेदार
Sat, 05/31/2025 - 12:58 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अकिलिज

मस्त लेख आणि अप्रतिम फोटो

सस्नेह
Mon, 06/02/2025 - 16:13 नवीन
मस्त लेख आणि अप्रतिम फोटो आवडले... स्नेहा
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

किल्लेदार
Sun, 06/15/2025 - 08:09 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा