मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तयांचे व्यर्थ न हो बलिदान ( अंदमान पर्व)

सर्वसाक्षी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ध्येयाने भारलेला मनुष्य जेव्हा संग्रामात उतरतो तेव्हा त्याला जीवनाची आशा नसते आणि मृत्युचे भयही नसते. अखेर बलाढ्य शत्रूही अशा वीरांपुढे हतबल होतो. हिंदुस्थान प्रजासत्ताक सेना, युगांतर, अनुशिलन चे क्रांतिकारक हे ध्येयवादाचे प्रतिक आहेत. हाती शस्त्र घेउन रणांगणात उतरलेले हे योद्धे. काही आपल्या कार्यात धारातिर्थी पडले, काही शत्रूच्या गोळ्यांना बळी पडले, काही फासावर चढले आणि आपल्या हौतात्म्याने हिंदुस्थानच्या इतिहासात अजरामर झाले. मात्र या सशस्त्र संग्रामपर्व गाजविणाऱ्या संघटनांमध्ये कार्यरत असलेले अनेक वीर इंग्रजांच्या हाती जीवंत सापडले आणि अभियोग दाखल होऊन जन्मठेपेला गेले. अर्थातच अंदमानच्या काळ्या पाण्यावर. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या अंदमानात या वीरांनी एक नवे हौतात्म्यपर्व निर्माण केले. या नरसिंहांना दात व नखे काढुन अंदमानच्या नरकात साखळदंडाने जखडुन टाकल्यावर आपण जिंकलो असे इंग्रजांना वाटु लागले. मात्र सिंह पिंजऱ्यात असला, जर्जर असला तरी तो मरेपर्यंत सिंह असतो हे इंग्रज विसरले होते. आपण या भयंकर वीरांना छळुन, तडफडुन मरणाची वाट पाहायला लावणार आणि सूड उगवणार हे इंग्रजांचे स्वप्न. मात्र इंग्रजांचा हा मद उतरविणारे महाभाग या अंदमानात पोहोचले आणि नवा इतिहास घडला. अंदमानात १२ मे १९३३ रोजी आमरण उपोषण सुरू झाले. या आधीही एक दोन वेळा अशी चळवळ झाली होती मात्र अनेक कारणांमुळे तिला यसह आले नव्हते. अगदी अलिकडचा त्या आधिचा प्रयत्न ३ जानेवारी १९३३ चा. मात्र १९३३ मध्ये राजकीय बंदिवानांची नवी तुकडी अंदमानात दाखल झाली आणि लढा उभा राहीला. इथे असलेले बंदिवान हे खुनी वा दरोडेखोर नव्हेत तर ते राजद्रोहाचा आरोप असलेले राजकिय कैदी आहेत आणि त्यांना जुलुमी सरकार अमानुष वागणुक देउ शकत नाही हे दाखवुन देण्यासाठी जीवनाची आसक्ती आणि मृत्युचे भय यापासुन मुक्त असलेल्या अंदमानच्या वीरांनी आमरण उपोषणास १२ मे १९३३ रोजी प्रारंभ केला. आम्ही तसेही मरणारच आहोत तर छळाने पिचुन मारल्याचे समाधान सरकरला लाभु न देता आम्ही आमच्या मर्जीने ताठ मानेने मरु आणि जुलुमी इंग्रज सरकारला झुकायला लावु हा निर्धार होता. या आधी हेच दिव्य हुतात्मा जतिन दास यांनी लाहोर कारागृहात तर हुतात्मा मणींद्रनाथ बॅनर्जी यांनी फतेगढ तुरुंगात करुन दाखविले होते. या आमरण उपोषण पर्वात एकाहुन एक असे महान क्रांतिकारक उतरले होते. हुतात्मा महाविरसिंह, जयदेव कपूर, कमलनाथ तिवारी, हुतात्मा मोहित मित्र, हुतात्मा मनकृष्ण नामदास उर्फ मोहन किशोर दास, बटुकेश्वर दत्त, विजयकुमार सिन्हा, शिव वर्मा, गया प्रसाद, अंबिका चक्रवर्ति, लोकनाथ बोल, गणेश घोष, अनंत सिंग, आनंद गुप्त, रणधीर दासगुप्त, फकिर सेन असे धुरंधर उतरले होते. आम्ही चोर दरोडेखोर नाही, आम्ही आमच्या मातृभूमिच्या मुक्तीसाठी रणात उतरलेले योद्धे आहोत, आम्ही सरकारच्या नजरेत राजद्रोही असलो तरी प्रत्यक्षात योद्धे आहोत आणि आम्हाला भयानक यातना देत अमानवी जीवन जगायला सरकार भाग पाडु शकत नाही; अंदमानची दहशत निर्माण करुन सरकारला हिंदुस्थानचा क्रांतिसंग्राम चिरडु देणार नाही या निर्धाराने हे सर्व क्रांतिकारक अखेरच्या संग्रामात उतरले. सरकारने हा प्रयोग मोडुन काढण्यासाठी या उपोषणार्थींना जबरद्स्तीने अन्न देण्याचा प्रयत्न सुरू केला. पण गाठ होती हुतात्मा महाविरसिंहांशी! हे असले प्रयोग त्यांनी पूर्वी लाहोर तुरुंगात पचवले होते. त्या लाहोरच्या उपोषणात हुतात्मा महाविरसिंहानी तुरुंगाधिकारी व पोलीसांना सळो की पळो करुन सोडले होते. जेव्हा दूध, रबरी नळ्या वगैरे साहित्य घेउन सरकारी लवाजमा कोठडीच्या दारात येई, तेव्हा प्रथम ते कोठडीचा दरवाजा आपल्या भक्कम देहाची ढाल करुन लढवित. उपाशी असलेला कैदी अनेक शिपाई रेटा लावत असताना देखिल एकट्याने दरवाजा उघडु न देता लावुन धरतो याचे पोलीसांना आश्चर्य वाटत असे आणि संतापही येत असे. एकदा दरवाजा उघडला की त्यांना दूध पाजण्यासाठी आडवे पाडणे हे दिव्य करावे लागत असे. बलदंड देहाचे हुतात्मा महाविरसिंह आपल्या छाताडावर बसणाऱ्या शिपायाला अचानक एक झटका देउन पाडीत असत. अखेर ते जखडले गेले की नळी घशात घालायचा प्रयत्न करताच ते मानेला हिसडा देउन तो प्रयत्न हाणुन पाडीत असत. मग नळी घुसवली तरी ती नळी ते दातात दाबुन टाकत असत. पुढे हुतात्मा महाविरसिंहांची रवानगी बेल्लारी तुरुंगात व तिथुन अखेर अंदमानला झाली. अंदमानात गेल्याचे भय तर दूरच मात्र बटुकेश्वर दत्त, विजय कुमार सिन्हा वगैरे आपले जुने साथी पुन्हा एकदा आपल्याला भेटले याचा आनंद त्यांना झाला. आपली रवानगी अंदमानला झाल्याचे वर्तमान त्यांनी तुरुंगातुन पत्राद्वारे आपल्या पित्याला; श्री देविसिंह यांना कळविले तेव्हा मुलाच्या पुन्हा कधी न दिसण्याचा शोक न करता त्या बापाने मुलाला लिहिले "अंदमान म्हणजे साक्षात पैलुदार हिऱ्यांचा टापु, सरकारने तिथे अश्या अनेक हिऱ्यांचा संग्रह केला आहे तेव्हा तुलाही त्यांच्या सहवासाने आता तेज लाभेल" उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजे १६ मे १९३३ रोजी उपोषण मोडण्यासाठी पोलीस व तुरुंगाधिकारी हुतात्मा महाविरसिंहांच्या कोठडीत शिरले. पुन्हा तोच जबरदस्त प्रतिकार आणि पुन्हा सरकारचा पाशवी बळाचा वापर. अखेर झटापटीत पोलीस यशस्वी ठरले आणि नळ्या घुसवल्या. मात्र आपल्या मनोनिग्रहाने हुतात्मा महाविरसिंहानी प्रतिकार केला आणि दूध अन्ननलिके ऐवजी श्वासनलिकेत शिरले. हुतात्मा महाविरसिंहांना श्वास घेणे जड होऊ लागले. संध्याकाळी त्यांची तब्येत भयंकर खालावली आणि दिनांक १७ मे च्या पहाटे त्यांना हौतात्म्य लाभले. मात्र या गोष्टीचा कैद्यांमध्ये व बाहेर बोभाटा होऊ नये यासाठी अंधारात हुतात्मा महाविरसिंहांच्या देहाला दगड बांधुन त्यांचा मृतदेह समुद्रात फेकण्यात आला. आणि हुतात्मा महाविरसिंहांनी आपल्या प्रिय नेत्याची, आपल्या आदर्शाची, आपल्या दैवताची बरोबरी साधली. हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा सुखदेव व हुतात्मा राजगुरु यांची सरकारला जिवंतपणी तर धास्ती होतीच पण मृत्युनंतरही त्यांच्या मृतदेहाचे देखिल सरकारला इतके भय होते की त्यांचे देह मरणोत्तर संस्कार न करता फाशी अमलात येताच घाईघाईने तुकडे करुन त्यांचे मृतदेह पोत्यात भरुन नष्ट केले गेले होते. तोच मान हुतात्मा महाविरसिंहाना मिळाला, त्यांची भीती सरकारला त्यांच्या मृत्युनंतरही सोडत नव्हती. मात्र याचा परिणाम इतर आंदोलकांवर अजिबात झाला नाही उलट ते आणखी इरेला पेटले. हाच जबरद्स्तीने अन्न नळीने नाका-तोंडातुन घुसवण्याचा प्रयोग त्या नंतर झाला तो हुतात्मा मोहित मित्र यांच्यावर. हुतात्मा मोहित मित्र यांचा जन्म गाव नतुन-भरेंगा, जिल्हा पाबना (आता बांगला देशचा भाग) येथला. हुतात्मा मोहित मित्र हे अनुशिलन चे कार्यकर्ते होते आणि ते ५ वर्षांच्या शिक्षेवर अंदमानला आले होते. त्यांना शस्त्रास्त्र कायद्याखाली अटक करण्यात आली होते, ते मास्टर सूर्यसेन यांचे समकालीन होते. अन्न जबरदस्तीने घुसवण्याच्या प्रयोगात त्यांना न्युमोनिया झाला व २० मे रोजी त्यांना हौतात्म्य लाभले. कागदोपत्री त्यांचा मृत्यु हा उपोषणाने झाला नसून तो आजाराने नैसर्गिक मृत्यु होता असे दाखविण्यात आले. पुढे त्या अहवालाला कायदेशीर आव्हान दिले गेले. पुढचा मान होता हुतात्मा मनोकृष्ण नामदास उर्फ मोहन किशोर दास यांचा. त्यांचा जन्म मैमनसिंग (आता बांगलादेश) येथला. त्यांना बंगाल मधील सशस्त्र क्रांतिसंग्रामात भाग घेतल्यबद्दल अंदमानला रवाना केले होते. याच्या एखाद दोन दिवसच अगोदर आणखी एक बंगाली क्रांतिकारक बिधु भूषण सेन हेही मृत्युच्या दारात पोहोचले होते; त्यांच्या फुफ्फुसांना जबरदस्तीने अन्न घुसविण्याच्या प्रयत्नात सूज आली आणि परिणामत: त्यांच्या नाकपुड्यांमधुन रक्त वाहु लागले, त्यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले व त्यांचे प्राण वाचवीले गेले. अर्थातच हुतात्म मनोकृष्ण यांचा मृत्युही उपोषणाशी अजिबत संबंधित नसुन तो नैसर्गिक मृत्यु होता असा खोटा वैद्यकिय अहवाल सफाईदारपणे सादर करण्यात आला. मुख्य आयुक्तांनी साळसूदपणे जाहिर केले की हे मृत्यु नैसर्गिकच होते आणि दोन अपवाद वगळता सर्व उपोषणार्थींची प्रकृति स्थिर आहे! ’कि तोडीला तरु फुटे आणखी भराने" या उक्तिला अनुसरुन जुलुमी सरकार जो जो आंदोलन दडपायला पाहत होते, तो तो अधिकाधीक क्रांतिकारक उपोषणात सहभागी होऊ लागले आणि हुतात्मा मनोकृष्ण यांच्या मृत्यु नंतर आमरण उपोषण करणाऱ्या क्रांतिकारकांची संख्या तब्बल ३९ वर पोचली. मारणारे थकत होते पण मरणारे संपत नव्हते. या काळात सरकारी आणि हिंदुस्थानी स्वातंत्र्यवादी अशा दोहोबाजुंनी या उपोषणाला संलग्न अशा घडामोडींना वेग आला. हे उपोषण हाताळण्यासाठी; खास करुन मोडण्यासाठी लेफ्टनंट कर्नल बार्कर याला पाचारण करण्यात आले. या बार्करला लाहोर तुरुंगातील उपोषणाचा अनुभव होता. बार्करने तेथे पोहोचताच या राजबंद्यांना दिवसातुन किती वेळा काय व कसे अन्न द्यायचे याच्या योजना आखल्या. मात्र दगडी तटबंदीप्रमाणे उपोषणकर्त्यांचा निश्चय अभेद्य होता. अंगातले त्राण सरत आले तरी प्रतिकार व स्वाभिमान कायम होता. जे सरळ सरळ मृत्युकडेच झेपावले होते त्यांचे त्यापलिकडे कोण व काय वाकडे करु शकणार? बार्कर साहेबाला हळुहळु सदबुद्धी सुचु लागली. नाईलाजास्तव अन्न देण्याचे प्रयत्न दिवसातुन चार ऐवजी कमी करण्यात आले. अन्नाचा भर कमी करण्यात आला. मग ’जंतुसंसर्गाचा धोका लक्षात घेता’ गपचुप नाकपुड्यांमधुन नळ्या घुसविणे बंद केले गेले. इकडे कितीही दडपल्या तरी अंदमानच्या बातम्या इकडे पोचत होत्या. जनतेचा क्षोभ व नेत्यांचा अस्वस्थपणा वाढु लागला. कलकत्त्यात या तीन हौतात्म्यांची बातमी पोचताच संतापाची लाट उसळली. कलकत्त्याच्या अल्बर्ट सभागृहात नगराध्यक्ष संतोष कुमार बोस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत दोन ठराव मांडले गेले - पहिला म्हणजे "कलकत्त्यातील समस्त जनता अंदमानातील उपोषण व त्यात तिघांना प्राप्त झालेले हौतात्म्य यामुळे संतप्त तसेच चिंतित झाली आहे. या प्रकरणाची ताबडतोब जाहिर चौकशी करण्याची करण्यात यावी" अशी मागणी तर दुसऱ्या प्रस्तावाद्वारे मध्यंतरी खंडीत झालेली राजकिय कैद्यांना अंदमानला हद्दपार करण्याची प्रथा पुन्हा सुरु करण्याचा निषेध केला गेला. दिनांक ५ जुन १९३३ - आमरण उपोषण्कर्त्यांची संख्या ४५ वर गेली. वास्तविकत: १३ जुनला विधान परिषदेचे मननिय सदस्य श्री अजहार अलि, श्री अमर नाथ दत्त, बी. व्ही. जाधव, एस, सी. जोग, बी. एन मिश्र, एस सी मित्र, गय प्रसाद सिन्ग आणि के.बी. हे गृहस्मितीचे सदस्य सर हॅरी हेग यांना भेटले होते. त्यांनी अंदमानला कैदी धाडण्याची बंद केलेली प्रथा मोडुन लाहोर, जलालाबाद व अन्य कटातील क्रांतिकारकांना पुन्हा काळ्या पाण्यावर पाठविणे, तिथली हवा, रोगराईजन्य परिस्थिती, यातनामय तुरुंगवास, अमानवी वागणुक, उपोषण व त्यात झालेले मृत्यु या बाबत सदस्यांनी हेग यांना जाब विचारला. उपोषणकर्त्या हुतात्म्यांचे मृत्यु हे अकुशल रित्या हलगर्जीपणे अन्न जबरद्स्तीने देण्याचा प्रयत्न केल्यामुळेच झाल्याचा आरोप सदस्यांनी सरकारवर केला. सर्व सदस्यांनी सरकारने आंदोलकांची नावे जाहिर करावीत कारण या बातमीमुळे अंदमानला धाडण्यात आलेल्या सर्व राजबंद्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त व शोकाकुल आहेत व त्यांना सत्य परिस्थिती समजलीच पाहिजे असा आग्रह धरला. मात्र उद्दाम व उन्मत्त हेगने हे सर्व आरोप फेटाळुन लावीत सर्व कैद्यांची प्रकृति स्थिर आहे; अपवाद वगळता सगळे उपोषणकर्ते समंजसपणे नळीद्वारे अन्न घेत आहेत असा कांगावा केला. वर हेग यानी आता परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बार्करला पाचारण केल्याची दर्पोक्तिही केली. मात्र आता जनजागृति तीव्र झाली होती. जनता, वृत्तपत्रे, राजकिय व्यक्तिमत्त्वे आणि राजकिय पक्ष या सर्वांचे लक्ष अंदमान कडेच लागले होते. दिनांक १६ जुनच्या फ्री प्रेस जर्नल मध्ये निरन्जन सेन गुप्त, सतिश प्रकाशि, सुधान्शु दास गुप्त, निशिकान्त चौधरी, नारायन रॉय, भुपाल बोस, बटुकेश्वर दत्त आणिन्द सुशिल दास गुप्त या राजबंद्याची नावे उपोषणकर्ते म्हणुन प्रसिद्ध झाली. पुढे श्री. विनायक विठ्ठल काळीकर यांनी या नावांचा राज्य संसदेत पुनरुच्चार केला व सरकारनेही त्याला विरोध केला नाही. बार्करला अंदमानच्या ११२ पैकी ५५ राजबंदी आमरण उपोषणात सामिल असणे जड गेले. अखेर तिन राजबंद्यांचे हौतात्म्य, ५५ राजबंद्यांचा वज्रनिश्चय आणि वाढता जनक्षोभ यापुढे बार्करचा ताठा व सरकारचा जुलुम पराभूत झाला. दिनांक २६ जुन १९३३ रोजी उपोषण समाप्त झाल्याचे वृत्त देताना हेग यांनी हलकटपणे ’हे आंदोलन उपोषणकर्त्यांनी बिनशर्त मागे घेतले असल्याचा निखालस खोटा दावा केला. मात्र पुढे प्रत्यक्ष उपोषणकर्ते श्री. धिरेंद्रनाथ चौधरी यांनी खरी हकिगत सांगितली ब तिला श्री. विजय कुमार सिन्हा यांच्या कथनातुनही दुजोरा मिळाला - ते सत्य असे की सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याचे व न मागितलेल्या सोयी-सुविधा देखिल बहाल केल्याचे सांगत २६ जुनला अंदमानच्या अंदमानच्या मुख्य आयुक्ताने काही उपोषणकर्त्यांना सांगत आता उपोषण संपवण्यास सांगितले. मात्र हा कुणा एकाचा निर्णय नसुन हा सर्वांचा निर्णय असल्याचे आंदोलकांनी ठणकावुन सांगितले व सर्वांना एकत्र आणुन सर्वांसमोर जाहिर कथन करण्याची मागणी केली व त्याप्रमाणे सर्वांना रुग्णशय्येसह एकत्र आणण्यात आले व मुख्य आयुक्ताने सर्वांना सांगितले की राजकिय दर्जा, मानवी वर्तणुक, माणसाला खाता येइल असे अन्न, अमानुष कष्टाच्या शिक्षा रद्द करणे, वैद्यकिय सेवा, वृत्तपत्रे या सर्व मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत व आता उपोषणाची गरज नाही. लवकरच म्हणजे जानेवारी १९३४ मध्ये सर्व राजबंद्याना त्यांच्या तक्रारींची सुनावणी करुन देण्यात आली. अंदमानवर नवा वटहुकुम जारी झाला आणि नरकराज्य संपुष्टात आले. अर्थात इंग्रजांनी सरकारला घातक वाटक वाटणाऱ्या ज्वलज्जहाल क्रांतिकारकांना अंदमानला पाठविणे बंद केले नाही; ते १९३७ पर्यंत चालु होते परंतु अंदमानचे ’नरक’ किंवा ’छळछावणी’ हे स्वरुप मात्र नष्ट झाले. "तुम्ही आम्हाला पिचवुन काय माराला? आम्ही स्वत:च मृत्युला सामोर जात आहोत; आता आम्हाला तुमचे भय नसून तुम्हालाच आमचे भय निर्माण होईल. आणि त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर" या वज्रनिश्चयाने क्रांती व क्रांतिकारक यांना प्रतिष्ठा मिळवुन देण्यासाठी व भावी काळात अंदमानात राजबंद्यांना नरक यातना भोगायला लावुन त्यांचा कणा मोडायचा व पर्यायाने क्रांतिमार्गावर येण्यापासुन हिंदुस्थानी तरुणांना परावृत्त करण्याचा सरकारचा कुटील डाव हाणुन पाडण्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या हुतात्मा महाविरसिंह, हुतात्मा मोहित मित्र व हुतात्मा मनोकृष्ण नामदास यांना हुतात्मा महाविरसिंह यांच्या हौतात्म्यदिनी सादर अभिवादन.

वाचने 3227 वाचनखूण प्रतिक्रिया 9

विसोबा खेचर 16/05/2009 - 23:49
आपण किती छोटे आहोत, आपल्याच डबकेवजा दुनियेत किती गुंतले आहोत याची जाणीव करून देणारा साक्षिचा पुन्हा एक सुरेख लेख..! नतमस्तक..! तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सहज 17/05/2009 - 09:39
हेच म्हणतो. अवांतर - सावरकरांची वचने असलेल्या पाट्या अंदमानातुन नष्ट करणारे मणिशंकर अय्यर निवडणूक हरले तो एक आनंद आहे.

यशोधरा 17/05/2009 - 00:12
वाचून अंगावर शहारा आला! किती त्रास भोगले आहेत ह्या क्रांतीकारकांनी! नतमस्तक!

अनामिका 17/05/2009 - 00:14
अर्थात विसोबांशी सहमत सर्वसाक्षीजी आपण हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढ्यातील या अनामविरांना व त्यांच्या असामान्य देशभक्तीला व निस्वार्थी कार्याला प्रकाशात आणुन आंम्हा मिपाकरांवर फार मोठे उपकार करित आहात ...........हा इतिहास पुढ्च्या पिढिला व येऊ घातलेल्या अनेक भावी पिढयांना माहित व्हावा म्हणुन या सगळ्या लेखांना पुस्तक रुपात उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावात अशी नम्र विनंती आहे या क्रांतीकारकांना कोटीकोटी प्रणाम!!!!!!!!!! व स्वातंत्र्यसंग्रामात ठराविक लोकांचा व घराण्यांचाच सहभाग असल्याचा खोटा व गोबेल्स प्रचार करणार्‍यांचा जाहीर निषेध! "अनामिका" जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे। ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

In reply to by अनामिका

नितिन थत्ते 17/05/2009 - 20:52
क्रांतिकारकांना आणि त्यांच्या धैर्याला प्रणाम. हा प्रतिसाद अनामिकाला नसून जनरल आहे. तसेच हा प्रतिसाद येथे योग्य नाही हे मान्य. पण क्रांतिकारकांविषयी काही लिहिले की 'स्वातंत्र्यसंग्रामात ठराविक लोकांचा व घराण्यांचाच सहभाग असल्याचा खोटा व गोबेल्स प्रचार करणार्‍यांचा जाहीर निषेध' या टाइपची वाक्ये लिहिलीच जातात म्हणून प्रतिसाद देणे आवश्यक. आम्ही जी इतिहासाची पुस्तके वाचली त्यात क्रांतिकारकांचा इतिहासही शिकवला जात होताच. त्या इतिहासात क्रांतिकारकांच्या कार्याविषयी टीका किंवा हेटाळणी वगैरे कधीही आढळली नव्हती. त्यांचा सहभाघी कधी नाकारला गेलेला नाही. अजूनही असा 'खोटा आणि गोबेल्स प्रचार करणारा' इतिहास अधिकृतपणे शिकविला जात नाही. प्रश्न प्रपोर्शनचा असेल तर तेही योग्य प्रमाणात (म्हणजे जेवढ्या प्रमाणात क्रांतिकारकांचे कार्य स्वातंत्र्य मिळवण्यास परिणामकारक ठरले त्यापेक्षा थोड्या जास्तच प्रमाणात क्रांतिकारकांचा उल्लेख असतो). (संपादकांना हा प्रतिसाद अस्थानी वाटत असेल तर काढून टाकावा) खराटा

राघव 17/05/2009 - 10:07
हॅट्स ऑफ! स्वत:चा स्वार्थ सोडून देशासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा विचारसुद्धा आपल्याला महाग पडतो. यावरून हे सगळे किती मोठे लोक होतेत ते जाणवते. यांना मनापासून अभिवादन! साक्षीजी, अतिशय सुंदर लेख. तुमच्यामुळे आम्हाला या सगळ्यांची माहिती मिळत असते. शतशः धन्यवाद! राघव

अनंता 17/05/2009 - 10:12
फुटका मणी शंकर अय्यर पराभूत झाला हे योग्यच झाले :) वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

क्लिंटन 17/05/2009 - 16:52
सर्व क्रांतिकारकांच्या पवित्र स्मृतीस शतशः वंदन.सर्वसाक्षींचा लेख नेहमीप्रमाणेच आवडला. ************************************************************** विल्यम जेफरसन क्लिंटन माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी **************************************************************

स्वाती दिनेश 17/05/2009 - 20:50
सर्वसाक्षी, लेख नेहमीप्रमाणेच आवडला. स्वातंत्र्यसमरात स्वखुषीने आहुती पडलेल्या वीरांना वंदन. स्वाती